पाडाचा आंबा
पाडाचा आंबा


सकाळपासून शिरी पतीने औताला बैल जुपली होती. ऐन उन्हाळ्याचे दिवस होते. शेतातली सुगी आटोपत आली होती. शेतात मोत्यासारखं ज्वारीचं पीक आलेल यंदा अपेक्षे पेक्षा जास्ती पीक घावल होतं, त्यामुळे तो खुशीत होता. आता नांगरणी कुळवणी झाली की दोन महिने मृगाचा पाऊस पडेपर्यंत शेतात फिरकण्याची गरज नव्हती. यंदा ज्वारी पंचवीस रुपये किलोने जरी गेली ,तरी त्याला अडीच हजारांचा भाव मिळाला असता. मग दोन महिने गावोगावच्या जत्रा ,तमाशा, नाटक बघत फिरायला हरकत नव्हती.
श्रीपती खात्यापित्या घरचा होता .घरात आई-वडील लहान भाऊ शंकर, त्याची स्वताची बायको हिरा व दोन वर्षाची मुलगी राधा असा सुखाचा संसार चालला होता.
अजून कशी" हिरा "आली नाही ,त्यांनाडोळ्यावर आडवा हात धरून दूरवर गावाच्या वाटेकडे नजर टाकली. पांदीअआडून कोणा बाईची आकृती हळूहळू मोठी मोठी होत होती. जरा पुढे आल्यावर श्रीपतीने आपल्या बायकोला हिराला ओळखलं. डोक्यावर भाकरीचे गाठोडे ,हातात पाण्याची कळशी ,घेऊन झपा झपा ती चालत होती. हिराला सातवा महिना चालू झाला होता .त्यामुळे चालताना दम लागत होता कपाळावरून घामाच्या धारा लागल्या होत्या. मोठी गोड दिसत होती .रामवाडीच्या सोपान शिंदे यांची मुलगी त्याला पाहताक्षणी आवडली मग हुंड्यापांड्याचा विचार न करता त्याने ताबडतोब हो म्हणून टाकलं ,आणि आल्या तारखेला हिराच्या बापाने त्यांच्या लग्नाचा बार उडवून दिला .
हिरा स्वभावाने मनमिळावु होती ,घरातील कामाचा तिला उरक होता .घर कामाची आवड देखील होती. शेतात कष्ट करणे तिला आवडत होते. रोज सकाळी लवकर उठून अंगण झाडून अंगणात पाणी टाकून स्वच्छ करायचं ,त्याच्यावर एखादी बारकीशी रांगोळी काढायची, मग घरातील सगळी कामे बारा वाजेपर्यंत उरकायची आणि जेवणाचे गाठोडे बांधून शेतावर दोघांनी जेवण करायच . नवऱ्याच्या जोडीने दोन-चार तास स्वतःच्याच शेतात काम करायचं व संध्याकाळी दोघांनी परतायचं असा त्यांचा रोजचा दिनक्रम होता
घरात सासू-सासरे सर्वांची मर्जी सांभाळून ती होती त्यामुळे सर्वांची लाडकी होती. पहिल्या वेळी दिवस राहिले तेव्हा सर्वांना मुलाची "आशा" होती पण झाली मुलगी तरीपण आपलं पहिलं अपत्य "पहिली बेटी धनाची पेटी "या नात्याने सर्वांनी तिचं स्वागत केलं मोठ्या थाटामाटात बारस करून राधा हे नाव ठेवलं मग परत दोन वर्षांनी दिवस राहिले, यावेळी सगळी लक्षणं मुलाची वाटत होती .
श्रीपती जातीने तिला हवं नको बघत होता, काय खावसं वाटतं ते विचारत होता तिला जपत होता .शेतावर येत जाऊ नको म्हणून श्रीपती रोज तिला ओरडत असे पण घरात तरी दुपारी काय करू तेवढाच मला व्यायाम होईल असे उत्तर देऊन तीत्याच न ऐकता रोज शेतावर जात होती. तिच्या हातातली कळशी घेण्यासाठी श्रीपती लगबगीने पुढे चालत गेला अर्ध्या रस्त्यातच त्याने तिला गाठली व तिच्या हातातील कळशी घेतली व डोक्यावरची भाकरी देखील त्याने हातात घेतली. कशाला फुकटची दमत असते ,आता दिवस भरत आले ना? कशाला रोज येते शेतामध्ये सकाळीच मला भाकर बांधून देत जा तो बोलला .आणि सकाळी केलेली थंडगार भाकरी तुम्ही दुपारी शेतात खाणार त्यापेक्षा आपल्या नवर्याला गरमागरम जेवण घेऊन यावे ,असे मला वाटते माझ्या जिवाला .शिवाय मला पण तेवढा व्यायाम होतो तिने उत्तर दिलं
श्री पतीने आपल्या बायकोला न्याहाळून पाहिले. लाल जर्द काठपदरी साडी त्याच्यावर मॅचिंग ब्लाऊज सगळ्या अंगावर गरोदर पणाचे तेज चढलेले, काळाभोर केसांचा अंबाडा बांधलेला व पायातली जोडवी यांचा टकाक टकाक आवाज करत त्याच्या ठेक्यावर चालणं मोठे मोहक वाटत होतं जणू काही तो आपल्या बायकोला आज नव्यानेच पहात होता तिच्या प्रेमात पुन्हा एकदा पडला होता
दोघेजण शेतात आले त्याने बैलांना सोडून वैरण घातली पाटाचं पाणी आणून दोन बादल्या पाणी त्यांना पाजुन बैल रवंथ करीत झाडाच्या सावलीला बसले. दोघांनी भाकरीचे गाठोडे सोडले सांडग्याची कोरड्यास, कांदा, लाल ठेचा, शेंगा, व भाकरी अशी जय्यत तयारी करूनच ती आली होती. दिवस आंब्यांचे होते झाडाला बऱ्याच कैऱ्या लटकलेल्या होत्या. भाकर खाता-खाता हिराची नजर आंब्याच्या झाडाकडे गेली .आंबा लगडलेला तशी ती देखील बहरलेली होती तसं झाड देखील बहरलं होतं. जेवणाच्या जोडीला जर एखादा पाडाचा आंबा मिळाला तर काय मज्जा येईल असा विचार तिच्या मनात आला आणि ती खुदकन हसली .
का ग हिरा काय झालं ,का हसलीस त्याने विचारले
काही नाही
अगं सांग तरी खरं ,नवऱ्यापासून काय लपवतेस ?
अहो काही नाही सांगितलं ना एकदा!
जा ,मग मी जेवणारच नाही श्री पतीने तिला धमकी दिली. त्यावर तिचा नाईलाज झाला व तिने जेवणाच्या संगट एक पाडाचा आंबा मिळाला तर काय मज्जा येईल असे मला वाटले असे तिने सांगितले
"हात्तिच्या एवढंच ना ?पाडाचा आंबा काय आत्ता हजर करतो! तो बोलला व जेवता जेवता उठवून सर सर झाडावर चढला
आव ऐका माझं मला नको पाडाची कैरी पण तुम्ही जेवता जेवता असे उठून जाऊ नका
अगं बायकोची इच्छा पूरी करणं माझं कर्तव्य आहे गरोदरपणात जर एखादी इच्छा अपुरी राहिली तर मुलाचा कान फुटतो असं म्हणतात!
आवं ऐन उन्हाच झाडावर चढू नका ते लई वाईट असतं तुम्ही पहिले खाली उतरा
ती झाडाखाली उभी राहुन त्याला झाडावरन चढण्याविषयी विनंती करतच राहिली आणि तिची इच्छा पूर्ण करण्याच्या जिद्दीने श्रीपती वर वर चढतच राहिला आणि एका एकी त्याच्या पायाखालची फांदी काडकाड आवाज करत तुटली हातातली छोटीशी डहाळी कितीसा आधार देणार एखाद्या चेंडूसारखा या फांदीवरून त्या फांदीवर आपटत आपटत श्रीपती जमिनीवर धाडकन कोसळला, खाली असणाऱ्या दगडावर त्याचं डोकं आपटलं आणि रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या एका क्षणात हे सारं घडलं घडलं आणि श्रीपती निपचित झाला
धनी असा जोराचा हंबरडा फोडून हिरा त्याच्या दिशेने धावली तिच्या आवाजाने शेजारच्या शिवारातील माणसं पण धावत आले त्यांनी एकदा श्रीपती कडे पाहिलं व सगळा खेळ खलास झाल्याचं त्यांच्या ध्यानी आलं
ते श्रीपती च्या अंगावर पडून पडून आक्रोशत होती त्याला हलवत होती धनी ,अवो धनी उठाना, नको मला पाडाचा आंबा ,अर्ध्या जेवणावरून तुम्ही कसे उठलात हे मेलं कार्टं अवलक्षणी त्यानं तुमचा घात केला .असं म्हणून ती स्वतःच्या पोटावर बुक्की मारून घेऊ लागली तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी जेवणावरून उठलेला श्रीपती जिवनाच्या मेजवानी तून अर्ध्यातच उठवुन गेला होता तो तिच्या हाकेला कधीच देणार नव्हता