STORYMIRROR

Sneha Kale

Inspirational Others

3  

Sneha Kale

Inspirational Others

नराचा नारायण

नराचा नारायण

14 mins
373

  जनार्दनराव देशमुखांच्या बंगल्यावर आज आनंदाचे वातावरण होते.देशमुखांची मोठी सून गर्भवती आहे हे कळल्यावर संपूर्ण कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

     

   सुमन आणि अजयचे लग्न होऊन ४ वर्ष झाली होती. या ४ वर्षांत सुमन २ वेळा गर्भवती राहिली होती. परंतु तिचे गर्भच राहत नव्हते.जणू हाताशी आलेला घास नियती हिरावून घेत होती.वंशवेल वाढत नव्हती.अजयने सुमनला बऱ्याच डॉक्टरांना दाखवले.सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असायचे.देवधर्माचही करण्यात आलं.पण गर्भ न राहण्याचे काहीच कारण कळत नव्हते. सगळेच चिंतेत असायचे. गावातील सुखवस्तू आणि प्रतिष्ठित घराणं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशमुख कुटुंबाला हीच एक गोष्ट सलत होती..पण आज सर्व आनंदित होते.. सुमनच्या सासूबाई कलादेवी सुमनला लेकीप्रमाणे जपत.. घरात नोकर चाकरांचा राबता होता.. त्यामुळे सुमनला विशेष काही काम करावं लागत नसे.अजयचा सुमनवर खूप जीव होता.सुमनने दिलेल्या गोड बातमीनंतर तर अजय खूप खुश होता.

  

     जनार्दनराव देशमुख दत्तभक्त होते. त्यांच्यामुळे घरातल्या सर्वांनाच दत्तनामाची गोडी लागली.दत्त संप्रदायात कठोर तपाचरणाला फार महत्व आहे. काटेकारपणाने आचारधर्माचे पालन करणाऱ्याला दत्तसाक्षात्कार सुलभ होतो, अशी सांप्रदायिकांची श्रद्धा आहे. गावापासून तासाभराच्या अंतरावरच सिद्धेश्वर स्वामींचा मठ होता.औदुंबर वृक्षाची घनदाट छाया असलेल्या मठाच्या प्रसन्न आणि शांत वातावरणात स्वामींनी तपश्चर्या करून सिद्धी प्राप्त करून घेतली होती म्हणून सर्व त्यांना सिद्धेश्वर स्वामी म्हणून ओळखू लागले.देशमुखांची सिद्धेश्वर स्वामींवर खूप श्रद्धा होती.सुमनला गर्भ राहण्यात येणाऱ्या अडचणी देशमुखांनी स्वामींना सांगितल्या.यावर उपाय म्हणून स्वामींनी गाणगापूरला जाऊन दत्तगुरूंचे अनुष्ठान करण्यास सांगितले.त्याचेच फलस्वरूप आज देशमुखांच्या घराण्यात बाळाच्या आगमनाची गोड बातमी मिळाली.

   

       सुनेची गोड बातमी कळल्यावर त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी सुनेला घेऊन जावे, असे त्यांना वाटले. कलादेवींना त्यानी त्यांची इच्छा बोलून दाखवली... त्यांच्या ही मनात तेच होत..

      

      एके दिवशी घरातील सर्वच दर्शनासाठी निघाले.अर्ध्या वाटेत गेल्यावर त्यांची गाडी बंद पडली.ड्रायव्हरला मेकॅनिकला आणायला पाठवलं. त्यालाही बराच वेळ लागला.गाडीत बसलेल्या सुमनला अस्वस्थ वाटत होतं. मठात जाऊ नये, असे वाटत होते.ती अजयला विचारणार तेवढ्यात मेकॅनिक आला.त्याने गाडी बघितली. गाडीत काहीच बिघाड नव्हता.थोडा वेळाने गाडी सुरू झाली.काही वेळातच सर्व मठात पोहोचले. तिथे पोहोचल्यावर सर्वांचा प्रवासाचा क्षीण निघून गेला.सुमनलाही खूपच उत्साही आणि प्रसन्न वाटू लागले.

    

     मठात गेल्यावर शिष्यांनी देशमुख कुटूंब दर्शनासाठी आले असल्याचे स्वामींना सांगितले.त्यांना बोलावणे पाठवले.सर्वांनी स्वामींचे दर्शन घेतले.स्वामी ध्यानमग्न होते.. काही वेळाने त्यांनी डोळे उघडले. देशमुखांनी येण्याचा उद्देश सांगितला.सुमनला पाहताच त्यांचा चेहरा गंभीर झाला.अजयला जवळ बोलवून त्यांनी सुमनची विशेष काळजी घेण्यास सांगितले आणि एका कागदावर एक मंत्र लिहून दिला आणि विभूती पण दिली. स्वामींचा आशीर्वाद घेऊन सगळे निघाले.


   इकडे स्वामींच्या मुखावरचे भाव बदलले.पुढे घडणाऱ्या अघटिताची आधीच जाणीव झाली होती. ते पुन्हा ध्यानावस्थेत गेले. अजय सुमनची विशेष काळजी घेत असे. तीच खाणंपिणं, पथ्य, औषध, व्यायाम, महिन्याची तपासणी याकडे त्याचे बारीक लक्ष असायचे..


   सुमनला दुसऱ्या महिन्यात उलट्या, मळमळ, काही खावंसं न वाटणं,रात्रीची झोप न लागणे इत्यादी त्रास सुरू झाले. दर महिन्याच्या तपासणीमध्ये डॉक्टरांनी सोनोग्राफी केली तेव्हा सुमनच्या पोटात गर्भच दिसत नव्हता. सगळे खूपच घाबरले. सुमनला तर चक्करच आली. डॉक्टरांनी २ आठवड्यांनी पुन्हा बोलावले. औषधांसोबत सुमन स्वामींनी दिलेला मंत्र नित्यनेमाने म्हणत होती आणि विभूती पण स्वतःला आणि पोटाला लावत होती. बाळाच्या काळजीने तिला अजूनच त्रास होत होता. पण अजय आणि घरातले सर्वच तिला काळजी न करता मन प्रसन्न ठेवण्यास सांगत असत, धीर देत असत.२ आठवड्यांनी सुमनची पुन्हा सोनोग्राफी करण्यात आली. आणि जे दिसलं त्यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता.२ आठवड्यांपूर्वी दिसत नसलेला गर्भ आता दिसू लागला आणि गर्भाचे ठोके पण व्यवस्थित ऐकू येत होते.सुमन आणि अजयने मनोमन भगवंताचे आणि स्वामींचे आभार मानले.


   चौथ्या महिन्यात एके दिवशी सकाळी अचानक सुमनच्या पोटात दुखायला लागलं. थोड्या वेळाने तिला रक्तस्त्राव होऊ लागला. 'माझं बाळ, माझं बाळ', अस बोलून ओक्साबोक्शी रडायला लागली. अजयचा ही धीर सुटला. स्वतःचे रडू आवरत तो सुमनला सांभाळत होता. तिला ताबडतोब दवाखान्यात भरती करण्यात आले. सर्व देशमुख कुटुंबच दवाखान्यात आले.डॉक्टरांनी सुमनला सलाईन लावून इंजेक्शन चालू केलं. काही वेळाने रक्तस्त्राव थांबला.सुमन आराम करत होती. इकडे कुटुंबातील प्रत्येक जण दत्तप्रभुंचा धावा करत होते.कलादेवींनी स्वामींनी दिलेली विभूती सुमनच्या पोटाला आणि तिच्या कपाळाला लावली.दुपारी पुन्हा रक्तस्राव सुरू झाला.सलाईन आणि उपचार सुरूच होते. सगळ्यांचा धीर सुटत चालला होता. आपलं बाळ गेलं,म्हणून अजय तर कोसळूनच गेला.


    थोड्या वेळाने सुमनचा रक्तस्त्राव थांबला.तिने डॉक्टरांना सोनोग्राफी करायला सांगितले. तस त्याचा काही फायदा झाला नसता पण सुमनच्या समाधानासाठी डॉक्टरांनी सोनोग्राफी केली. आणि काय आश्चर्य ! गर्भ सुरक्षित होता..डॉक्टर ही आवक होऊन बघत राहिले.. असा चमत्कार ते त्याच्या आयुष्यात प्रथमच पाहत होते. देशमुख कुटुंबात पुन्हा आनंद परतला. सर्व कुटुंबीय दत्तप्रभुंच्या या चमत्काराने भरून पावले.

    

      सुमनला आता सहावा महिना लागला होता. मागील महिन्यांमध्ये तिला जो त्रास झाला त्यानंतर सगळे तिला फुलाप्रमाणे जपत होते. ती देखील जास्त ताण न घेता जास्तीत जास्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असे. बाळाशी बोलत असे, राम कृष्णाच्या गोष्टी ऐकून दाखवत असे.दत्तप्रभुंचा जप करत असे.तेव्हा बाळ खूप हालचाल करी. जणूकाही त्याला देवाचं नाव घ्यायला आवडतय..सर्वकाही सुरळीत चालू होतं.

    

     सातवा महिना लागल्यावर एके दिवशी सकाळी सुमन उठली तेव्हा तिला गरगरायला लागल.थोड्याच वेळात ती बेशुद्ध पडली.अजयने पोटावर हात ठेवून पाहिले तर बाळाची काहीच हालचाल नव्हती.अजयने लगेच डॉक्टरांना बोलावून घेतलं.सर्वकाही नॉर्मल असताना अस का होतंय, हे कळत नव्हतं. डॉक्टरांनी इंजेक्शन दिले. थोड्या वेळाने सुमन शुद्धीवर आली. ती रडत रडत बाळाशी बोलत होती. दुसऱ्याच क्षणाला बाळाची हालचाल सुरू झाली.

   

    कलादेवींनी देशमुखांना स्वामींच्या दर्शनाला जाण्याचा मानस बोलून दाखवला तेव्हा देशमुखांच्या मनातही खूप दिवसांपासून हाच विचार घोळत होता, असे ते म्हणाले. उभयतांनी लगेचच मठात जाण्याची तयारी केली.

     

     मठात गेल्यानंतर त्यांना काही वेळ थांबावे लागले. स्वामींच्या ध्यानाची वेळ होती.थोड्या वेळाने त्यांच्या शिष्यांनी देशमुख दर्शनासाठी आले आहेत, असे स्वामींना सांगितले. त्यांनी लगेचच देशमुखांना बोलावून घेतले.

  देशमुखांनी मागील काही महिन्यांमध्ये झालेल्या घटना स्वामींना सांगितल्या.अंतर्ज्ञानी स्वामींना हे सगळं आधीच कळलं होतं. ते देशमुखांची वाटच पाहत होते.


"स्वामी, कृपा करा..काय घडतंय आमच्या सुनेसोबत...आम्हाला काहीच कळत नाहीये...खूप त्रास होतोय तिला...काहीतरी उपाय सुचवा स्वामी, काहीतरी उपाय सुचवा..", एवढं बोलून देशमुखांनी आवंढा गिळला.. त्यांना बोलायला येईना...


"रावसाहेब",  स्वामी देशमुखांना रावसाहेब म्हणत.


"रावसाहेब, आधी तुम्ही शांत व्हा.तुम्ही जेव्हा पहिल्यांदा तुमच्या सुनेला घेऊन आला होतात तेव्हाच मला या घटनांची जाणीव झाली होती..कोणतीही घटना घडते त्यामागे कार्यकारणभाव असतो.तुमच्या घरात जन्माला येणारे बाळ एका विशिष्ट उद्देशासाठी येणार आहे."


स्वामी सांगू लागले...


"देशमुख घराणे हे पूर्वीपासूनच भक्तीमार्गी होते.एके दिवशी देशमुखांच्या घरी एक मोठा नाग निघाला. त्याची फणा डोलत होती.सर्वच घाबरले. त्याला मारायला धावले.घरातली वयस्कर व्यक्ती म्हणाली, 'अरे त्याला मारू नका.कुठेतरी लांब सोडून या त्याला.' परंतु त्यांचे कोणी ऐकले नाही.शेवटी कोणीतरी बंदूक घेतली आणि नागाला मारून टाकले.सर्वांना वाटलं.

    

     त्या रात्री तो नाग त्या व्यक्तीच्या स्वप्नात आला आणि म्हणाला,'मी तुमच्या घराण्याचा रक्षक होतो. तू माझी हत्या केलीस.माझी कृपादृष्टी तुमच्यावर होती.आता तुमचे हे घराणे टिकणार नाही. निर्वंश होईल तुमचा.'

    

    आपल्या हातून फार मोठे पाप घडले,याची जाणीव त्याला झाली. त्याने नागापुढे हात जोडले आणि पश्चातापाने म्हणाला,' माझ्या हातून पाप घडले. मला क्षमा करा.माझ्या पापांची शिक्षा माझ्या घराण्याला, माझ्या वंशाला देऊ नका.'

ते म्हणाले, 'तुमच्या घराण्यात एक दैवी बालक जन्माला येईल. तो तुमच्या कुळाचाच नाहीतर संपूर्ण विश्वाचा उद्धार करेल.पण तो ब्रम्हचारी राहील आणि त्यायोगे तुमचा वंश तिथेच खुंटेल.' या संभाषणानंतर तो नाग अदृश्य झाला.

   

      आणि तेव्हापासून देशमुखांच्या घराण्याला उतरती कळा लागली. घरातील कित्येक माणसे मेली. कित्येक देशोधडीला लागली. काही गाव सोडून गेली.तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय दत्तप्रभूंची भक्ती करता म्हणून तुमच्यावर प्रभूंची कृपा आहे.याचाच परिणामस्वरूप तुमच्या सुनेच्या पोटी दैवी बालक जन्म घेणार आहे, जो तुमच्या कुळाचा उद्धार करणार आहे."


"परंतु हे जर दैवी बालक आहे तर मग सुमनला इतका त्रास का झाला??", देशमुखांनी शंका व्यक्त केली.


"पूर्वीच्या काळी ऋषीमुनी जप तप, यज्ञ याग यासारखी साधना करत तेव्हा असुर निरनिराळी रूप घेऊन त्यांच्या साधनेत विघ्न आणण्याचा प्रयत्न करत असत.कारण त्यामुळे दैवीतत्व बलवान होत असे, वातावरणात सात्विकता वाढत असे आणि असुर दुर्बल होत असत.कालांतराने असुरांनी आपले अवाढव्य रूप त्यागून सूक्ष्म रूप धारण केले.सूक्ष्म म्हणजे डोळ्यांना दिसू न शकणारे.ज्यावेळी एखादी व्यक्ती देवाचे कार्य करी तेव्हा ते विविध प्रकारे अडचणी निर्माण करत.देवाचा जप करायला बसलं की त्याच्या मनात अनावश्यक विचार निर्माण करणे, संसारातील विचार आणणे इत्यादी मानसिक त्रास आणि देवाच्या कार्याला जाताना गाडीत बिघाड होणे, अपघात होणे इत्यादी शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली.

   

    तुमच्या सुनेच्या गर्भात दैवी बालक आहे आणि ते विश्वकल्याणासाठी जन्म घेणार आहे , हे कळल्यामुळे त्यांनी सुनेला आणि गर्भाला त्रास देण्यास सुरुवात केली. परंतु भगवंताच्या कृपेने गर्भाला काही दुखापत झाली नाही आणि गर्भ सुरक्षित राहिला."


"स्वामी, दैवी बालक आमच्या घरी जन्म घेणार यासारखं आमचं भाग्य नाही.मला दैवी बालकाविषयी अजून जाणून घेण्याची इच्छा आहे.कृपया मला सांगाल का???", देशमुखांनी विनंतीच्या स्वरात विचारले.


"अवश्य. व्यक्तींच्या मृत्यूनंतर २ टक्क्यांहून कमी व्यक्तींचा सूक्ष्मदेह स्वर्गलोकात जातो.ब्रह्मांडाच्या उच्च सकारात्मक लोकांमध्ये सूक्ष्मदेह जाण्याचे प्रमाण फारच कमी आहे.अधिकांश व्यक्तींचे सूक्ष्मदेह मृत्यूनंतर भुवर्लोकात जातात.पृथ्वीवर व्यक्तींद्वारे केलेल्या वाईट कर्मांचे दंड म्हणून ते पाताळातील सात लोकांमधील एका लोकामध्ये जाऊ शकतात.


    ब्रह्मांडातील उच्च सकारात्मक लोक, स्वर्गलोकांमधून सूक्ष्मदेह पृथ्वीवर पुन्हा जन्म घेत नाहीत.कारण त्यांचे प्रारब्धभोग भोगून संपलेले असतात. पृथ्वीवर जन्म घेणारे अधिकांश सूक्ष्मदेह भुवर्लोकामधून येतात. परंतु ब्रह्मांडाच्या उच्च लोकांमधून आध्यात्मिक रूपाने उन्नत सूक्ष्म देह पृथ्वीवर एखाद्या विशिष्ट कार्यासाठी जन्म घेतात. हेच ते दैवी बालक होत.दैवी बालकांचा जन्म होण्याची संभावना तिथे अधिक असते जिथे पालक स्वतः भक्तीमार्गी असतात.कारण त्यांना त्याप्रकारचे आध्यात्मिक वातावरण मिळणे आवश्यक असते."

   

      आपल्या शंकेचे निरसन करून घेतल्यांनंतर देशमुख स्वामींची आज्ञा घेऊन निघाले. अजूनही धोका टाळलेला नव्हता.स्वामींनी सुमनसाठी एक मंतरलेला धागा आणि विभूती देशमुखांजवळ दिली.

 

     घरी आल्यावर देशमुखांनी स्वामींनी जे काही सांगितले ते सर्व कुटुंबाला सांगितले.अजय आणि सुमन स्वतःला खूप भाग्यवंत मानत होते.अश्या दैवी बालकाचे पालक होण्याची संधी आपल्याला मिळाली. हळूहळू दिवस पुढे जात होते.सुमनचे डोहाळे जेवण ही खूप थाटामाटात करण्यात आले.गावातील प्रत्येक जण समारंभाला हजर होते.

  

  एके दिवशी रात्री सुमनला कळा सुरू झाल्या.लगेचच दवाखान्यात नेण्यात आले.ऑपरेशन थेटर मध्ये लगेच तिची तपासणी केली आणि पुढच्या १० मिनिटांमध्ये तिची प्रसूती झाली.सुमनला कळलेही नाही इतकी सुलभ प्रसुती झाली. बाळाला बघितल्यावर हे बाळ असामान्य आहे, असे डॉक्टरांना आणि नर्सला जाणवले. सूर्याची किरणे डोळ्यावर पडावीत आणि आपले डोळे दिपावे असे तेजस्वी वलय त्याच्या चेहऱ्याभोवती दिसत होतं. त्याच्याकडे पाहून एका वेगळ्याच आनंदाची अनुभूती येत होती.सुमनला ही खूप शांत वाटत होते. तिला नॉर्मल वॉर्ड मध्ये नेण्यात आले.बाळाला पाहून देशमुख कुटुंबाच्या आनंदाला पारावर उरला नाही. सुमन आणि बाळाला घरी आणले.बाळाच्या येण्याने देशमुखांच्या घरात जणू उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते..

   

    बाळ जसजसे मोठे होऊ लागले तस सगळ्यांना त्याच्या असमान्यत्वाची प्रचिती येऊ लागली. त्याच्याकडे कितीही वेळ पाहिले तरी पाहतच राहावे वाटायचे.इतर बालके खूप रडतात, रात्रीची जागरण करतात तसा काहीच त्रास बाळाने दिला नाही. ते स्तनपान केल्यावर शांतपणे झोपी जाई.बाळ झाल्यावरही सुमनने तिच्या भक्तीत खंड पडू दिला नाही.स्वामींनी दिलेला मंत्र ती नित्यनेमाने जपत असे. एके दिवशी बाळाला घेऊन स्वामींच्या दर्शनाला जावे असा विचार सुमनच्या मनात आला.त्यांच्या आशिर्वादाने सर्वकाही सुरळीत झालं होतं.त्याप्रमाणे सर्वच मठात गेले. ते तेजस्वी बाळ पाहून स्वामींनी त्याचे नाव ठेवले "चैतन्य " काही महिन्यांनी बाळाचा नामकरण सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला..


      बघता बघता चैतन्य बाळ ७ महिन्याचं झालं..रांगू लागलं...बसण्याचा प्रयत्न करू लागलं. एकदा बाळाला झोपवून सुमनही झोपी गेली.. तेव्हा अचानक त्याच्या खोलीत नाग आला आणि तो बाळ झोपलेल्या ठिकाणी गेला. बाळाला जाग आली आणि ते नागासोबत खेळू लागलं.. सुमनला काहीच कल्पना नव्हती.थोड्या वेळाने तिला जाग आली आणि ती मोठ्याने ओरडली.घरातले सगळे धावत त्याच्या खोलीत गेले.समोरच दृश्य पाहून सगळेच अचंबित झाले..सर्वांनी मिळून नागदेवतेला प्रार्थना केली... तेव्हा नाग कोणाला काही न करता निघून गेला..बाळाला मात्र काहीच इजा झाली नव्हती.


     वेगवेगळ्या लीला दाखवत बाळ मोठे झाले आणि घरच्यांनी त्याला शाळेत घातले.कोणतीही गोष्ट हि मनापासून करायची हे त्याच्या रक्तातच होत..अभ्यास पण मन लावून करायचा.पण अभ्यासापेक्षा देवाधर्माचं करण्यात , ग्रंथ वाचण्यात त्याला जास्त रुची वाटे..त्याचे आजोबा जनार्दनराव जेव्हा पूजा करायला बसत तेव्हा चैतन्य पण त्याच्यासोबत बसे..पूजा झाल्यावरही तो तासनतास देवघराजवळ बसून राही...कधी कधी तो देवघरातल्या मूर्तींशी गप्पा मारत बसे.


  चैतन्य आता १० वर्षांचा झाला..जसजसा चैतन्य मोठा होत होता तसतसं त्याचं देवाचं वेड वाढत होत..हा मुलगा इतर मुलांपेक्षा फारच वेगळा आहे हे संपूर्ण गावाने ओळखले होते.शाळा सुटल्यावर बाकीची मुले हि पहिले खेळण्यासाठी धावत पण चैतन्य मात्र वाटेवर असलेल्या दत्तमंदिरात जाऊन बसे.


   एकदा सुमन तब्येत बरी नसल्याने झोपून होती..तिचं डोकं फार दुखत होतं..चैतन्य शाळेतून आला होता...त्याने पाहिलं की आपली आई झोपली आहे...तो सुमनच्या जवळ गेला आणि त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला..जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे तिचं दुखणं गायब झालं..आपल्या पुत्राच्या ठिकाणी काही सुप्त शक्ती आहेत असे तिला आधीही जाणवले होते. पण आज त्याची प्रत्यक्षता पाहायला मिळाली.


एके दिवशी चैतन्य आईसोबत सिद्धेश्वर स्वामींच्या मठात गेला होता...भक्तिरसाने ओथंबलेल्या मठाचे वातावरण पाहून चैतन्य भारावून गेला...मठात सतत भाविक मंडळींची रेलचेल असायची...भजन,कीर्तन,आरत्या सातत्याने होत असे..मठाच्या अश्या पवित्र आणि शांत वातावरणात भाविक आसन घालून, माळ घेऊन जपाला बसत..काही सेवेकरी मठाची स्वच्छता करत..चैतन्यला मठात आल्यावर समाधान लाभले आणि आत्मिक आनंद मिळाला...त्याने आईच्या मागे लागून जपमाळ आणि आसन मागून घेतले...ज्या ज्या वेळी आईसोबत मठात जाई, त्यावेळी इतर भाविकांप्रमाणे आसन आणि जपमाळ घेऊन बसत असे..डोळे मिटुन जपमाळ घेऊन बसलेल्या छोट्या चैतन्यला पाहून सर्वांनाच त्याचे कौतुक वाटे..


मठातील औदुंबर वृक्ष पाहिल्यापासून तो चैतन्यचा अगदी प्रिय बनला होता..तो कितीतरी वेळ त्या झाडाखाली बसून राहायचा..मठात अनेक देवतांची चित्रे लावली होती..त्या देवतांच्या चित्रांकडे बघत राहायचा..हळूहळू चैतन्यला त्या चित्रांकडे पाहण्याचा जणू छंदच जडला..असे वाटे की देवतांशी बोलत आहे..त्यावेळचा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद काही निराळाच असायचा..कधी कधी त्याचे ध्यान लागे.. मुखात दत्तप्रभूंचे नाम सतत असायचे..मठातच राहावे, असे अनेकदा त्याला वाटे..मग इच्छा नसतानाही आई त्याला बळजबरीने घरी घेऊन येई...


महाशिवरात्री ते दत्तजयंती हे वर्षभर असलेले सगळ्या देवतांचे उत्सव बंगल्यावर मोठ्या प्रमाणावर होत असे..घरातील सगळी मंडळी जय्यत तयारी करत असत..चैतन्यही प्रत्येक उत्सवात हिरीरीने भाग घेई.. एक वेगळाच उत्साह असायचा त्याच्या चेहऱ्यावर...त्या दिवसात कीर्तनकार बंगल्यावर यायचे...कीर्तन ऐकण्यात चैतन्य इतका मग्न होई की कोणी हाक मारलेली सुद्धा त्याला कळत नसे...देहभान हरपून तल्लीन होऊन तो कीर्तन ऐकायचा...कीर्तनात ऐकलेल्या गोष्टी तो त्याच्या मित्रांना सांगायचा पण त्यांना या गोष्टींत रस नसे..आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत त्यामुळे आपल्या बरोबरीच्या मुलांना जे आवडते ते आपल्याला आवडत नाही, आपण जे आपल्या मित्रांना आध्यात्मिक ज्ञान देतो ते या मुलांना काहीही कळत नाही. देव, धर्म याबद्दल आपल्याला असलेला अभिमान बाकीच्या मुलांमध्ये दिसत नाही, हे त्याच्या हळूहळू लक्षात येऊ लागले..


    वयासोबत चैतन्यच्या जिज्ञासेतही वाढ होत होती..निरनिराळे प्रश्न विचारून तो आईला भंडावून सोडी..आईला जेवढी माहिती असायची ती तेवढे त्याचे शंकानिरसन करत असे..पण त्याची ज्ञानाची भूक काही केल्या मिटेना..मग आईने त्याच्याकडून श्रीगुरुचरित्र, दत्तप्रबोध, दत्तमाहात्म्य,

गुरुलीलामृत, नवनाथभक्तिसार, नवनाथ सार, दक्षिणामूर्ती, संहितादत्तसंहिता या ग्रंथांचे पारायण करून घेतले..


   चैतन्य जसजसा मोठा होत होता त्याच्या चेहऱ्यावरचे तेज वाढत होते..तो अधिकाधिक तेजस्वी दिसू लागला होता..सर्वकाही नीट सुरू असतानाच चैतन्यला एका असाध्य रोगाने ग्रासलं..सर्वोत्तम डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू झाले..जनार्दनरावांना मात्र निर्वंश होण्याची भीती सतत वाटत होती..चैतन्य सुमनच्या गर्भात आल्यापासून बऱ्याच वेळा त्याच्या जीवावर बेतलं होत..चैतन्याला लवकरात लवकर बर वाटावं यासाठी औषधोपचारासोबत नवस, उपास हे देखील होऊ लागलं..कुटुंबातील सगळेच चैतन्यसाठी देवाकडे साकडे घालत होते..आणि काही दिवसांनी सगळयांची प्रार्थना फळाला आली..चैतन्य आजारातून पूर्णपणे बरा झाला..सर्वांनी दत्तप्रभुंचे आभार मानले..


शालेय शिक्षण पूर्ण करून चैतन्य महाविद्यालयात प्रवेश केला.अभ्यासात खूप हुशार असल्याने दर वर्षी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत असे.परंतु भगवंताच्या नामाचे वेड नसानसांत भिनल्यामुळे सर्वस्वाचा त्याग करून परमार्थ साधावा, असे त्याला सारखे वाटे..देश, धर्म आणि समाज यांप्रतीचे कर्तव्य त्याला स्वस्थ बसू देत नसे.


ज्याप्रमाणे एखाद्या विषयात पारंगत होण्यासाठी त्या विषयातील सखोल ज्ञान असलेल्या व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे लागते त्याप्रमाणे अध्यात्मात प्रगतीसाठी गुरूंचे मार्गदर्शन घ्यावे लागते.अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा मार्ग दाखवणारे आणि योग्य साधना करवून घेणारे गुरूच असतात. म्हणून त्याने सिद्धेश्वर स्वामींचे मार्गदर्शन घेण्याचा निर्णय घेतला..महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होताच चैतन्य मठात गेला. या काळातच चैतन्यवर दुःखाची कुऱ्हाड कोसळली..त्याचे संपूर्ण कुटुंब एका अपघातात गेले..चैतन्यने स्वतःला सावरले आणि आपल्या निर्णयावर ठाम राहत मठात जाऊन साधना करण्याचे ठरवले..


मठात आल्यावर त्याला आत्मिक समाधान लाभले.. सिद्धेश्वर स्वामींनी त्याला साधनेचे मार्गदर्शन केले..त्याच्या शंकांचे निरसन केले..ज्ञान दिले..मनुष्य जन्माचे खरे उद्दिष्ट साधना करून जन्ममृत्युच्या फेऱ्यातून सुटका करून घेणे हेच आहे..सामान्य माणसांचे जीवन ऐहिक सुख प्राप्त करून समाधानी होण्यात खर्च होते.. सत्पुरुष मात्र कठोर साधना करण्यात आणि अत्युच्य आनंद मिळवण्यात आपले आयुष्य व्यतीत करतात..या सत्याची जाणीव जेव्हा चैतन्यला झाली तेव्हा आपले जीवन ईश्वरचरणी अर्पण करण्यासाठी प्रयत्न चालू केले.. 


 अध्यात्मात साधनेबरोबर सेवेलाही महत्व आहे, हे कळल्यावर मठात झाडलोट करणे, फरश्या पुसून काढणे, अंगण साफ करणे, पाणी भरणे, पूजेला फुले आणणे, धूप घालणे, स्वामींच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांची व्यवस्था पाहणे, इत्यादी सेवा तो करू लागला..त्या सेवा करत असताना त्याच्या मुखी भगवंताचे नाम सतत असे..मोक्षप्राप्ती हे अतिउच्च ध्येय गाठण्याच्या उद्देशाने सतत प्रयत्नरत असे. अशाप्रकारे चैतन्यची भक्तीची आणि सेवेची तळमळ वाढत गेली..काही कालावधीतच लोक त्याला पू.चैतन्यमहाराज म्हणू लागले...


गुरूंच्या आज्ञेनुसार पू. चैतन्यमहाराजांनी अनेक देवस्थानांचे दर्शन घेतले..त्यामध्ये औदुंबर, श्रीसरस्वती गंगाधर यांनी श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ जेथे लिहिला ते कडगंची, कर्दळीवन, श्रीगुरु नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान असलेले कारंजा, श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे वास्तव्य आणि पादुका असलेले कुरवपूर, योगी श्री वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबेस्वामी यांची समाधी असलेले गरुडेश्वर,नृसिंहसरस्वती यांनी आपले वास्तव्य करून तपाचरण तीर्थाटनात समावेश केल्याने दत्त संप्रदायाकरिता श्रद्धेची क्षेत्रे बनलेली गाणगापूर आणि नरसोबाची वाडी, दत्तगुरूंनी जेथे साडेबारा हजार वर्षे तप केले असे मान्यता असलेले दत्तक्षेत्र गुजरात येथील गिरनार, नारेश्वर, पीठापूर,बसवकल्याण,बाळेकुंद्री,माणगाव,माहूर, अक्कलकोट इत्यादी दत्तात्रेयाची महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि अन्य राज्यांतली तीर्थक्षेत्र यांचा समावेश आहे..


भारत ही संतांची भूमी आहे..संत नेहमीच आपल्या आचरणाने जनमानसात धर्मासंबंधी जागृती करण्याचा प्रयत्न करत असतात..पू.चैतन्यमहाराजही जेथे जेथे भ्रमण करत तिथे धर्मविषयक ज्ञानाचा प्रसार करत.'जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱ्यांसी सांगावे', या उक्तीप्रमाणे महाराजांना त्यांच्या साधनेद्वारे मिळालेले दिव्यज्ञान ते लोकांमध्ये प्रसारित करत होते..त्यांना अनेक लोक येऊन मिळाले..अनेकांना त्यांनी शिष्य करून घेतले..अनेक संघटना स्थापन केल्या..


ज्याप्रमाणे फुलाचा सुगंध सतत दरवळतो, सर्वत्र पसरतो त्याप्रमाणे पू.चैतन्यमहाराजांची कीर्ती सर्वदूर पसरत होती..लोक लांबून लांबून त्यांच्या दर्शनाला येत असत.त्यांच्या मुखावरील तेजाने , त्यांनी केलेल्या उपदेशाने जनमानसाच्या चेहऱ्यावर शांत व समाधानकारक भाव निर्माण होऊ लागले..लोकांमध्ये परोपकाराची भावना निर्माण होऊ लागली..दर्शनाला येणारा प्रत्येक भक्त त्यांच्या केवळ दर्शनाने भावविभोर होई..येणाऱ्या प्रत्येकाच्या अडचणी सोडवत.उपाय सांगत..कित्येक भक्तांना त्यांनी स्वप्नांत येऊन दर्शन दिले.


एकदा एका गावाला पू.चैतन्यमहाराजांचा दौरा होता..भक्तांनी त्यांची आणि त्यांच्या शिष्यगणांची चांगली व्यवस्था केली होती. त्या गावी पाणी खूपच कमी होते.ही समस्या महाराजांना कळली तेव्हा ते गावात एके ठिकाणी जाऊन उभे राहिले आणि त्यांनी त्या ठिकाणी काठीने खणले..आणि काही क्षणातच तिथून पाण्याचे कारंजे उडू लागले..सर्व भक्त आनंदाने नाचू लागले..महाराजांचा जयजयकार करू लागले..


एका व्यक्तीला भूतप्रेताची बाधा झाली होती..त्याला महाराजांच्या समोर आणण्यात आले..महाराजांनी त्याच्यावर तीर्थ शिंपडले..तसा तो आरडाओरडा करू लागला, शिव्या देऊ लागला..सुरुवातीला महाराज त्याच्याशी प्रेमाने बोलत होते पण तो काही जायचं नाव घेईना. मग महाराज त्याच्या जवळ गेले.तेव्हा त्याला त्रास होऊ लागला ..तो गयावया करू लागला..अशाप्रकारे फक्त महाराजांच्या अस्तित्वानेच त्या व्यक्तीची बाधेपासून आणि त्या अतृप्त आत्म्याची योनीतून मुक्तता झाली.


काही दिवसांनी सिद्धेश्वर स्वामींनी देह ठेवला.तेव्हा मठाची व्यवस्था पू.चैतन्यमहाराजांनी पाहिली.मठाचे नूतनीकरण केले.अनेक सुधारणा केल्या. सतत भ्रमण करत राहिल्यामुळे महाराजांना एकांताची ओढ वाटू लागली.एकांतात ईश्वराशी अनुसंधान साधणे त्यांना अधिक प्रिय होते.त्यांनी १० वर्ष एकांतवास केला. त्यानंतर एके दिवशी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.


पू.चैतन्यमहाराजांनी भक्तांना कधी प्रेमाने तर कधी कठोरपणे ज्ञान दिले. ते म्हणत,

१.संसारातील सुख हे क्षणिक सुख असते.आपल्याला सुखप्राप्ती नाही तर आनंदप्राप्ती करायची आहे.चिरकाळ टिकणारा आनंद मिळवायचा आहे.आणि हा आनंद केवळ भगवंताच्या नामाने मिळणार.

२.आपल्या अंतरीतले दोष,मत्सर, अहंकार हे कमी करण्याचा प्रयत्न करावा.मनातील घाण घेऊन भगवंतासमोर गेलं तो कधी आपलं मानत नाही.


पृथ्वीवर अनेक जीव,जंतू , प्राणी जन्माला येतात पण आपल्या जीवनाचे प्रयोजन जाणून घेऊन त्या दिशेने वाटचाल करण्याची संधी फक्त मनुष्याला मिळते..त्यातही भगवंताच्या सेवेत आपला देह झिजवण्याचे, त्याच्या चरणी अर्पण करण्याचे भाग्य एखाद्याला मिळते..आणि मगच तो बनतो नराचा नारायण...  


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational