निरोप
निरोप
त्या कडाक्याच्या थंडीत सीमेवरती शेवटचे श्वास मोजताना, त्याला आठवत होते तिचे निरोप घेताना चे व्याकुळ डोळे, चेहऱ्यावर हास्य होतं ते निव्वळ त्याच्यासाठी. पण डोळे रडत होते, व्याकुळ झाले होते, पुन्हा हा कधी दिसेल? दिसणार की नाही ?या शंकेने भयभीत झालेले. त्याला आठवत होता छोटीने हलवलेला चिमुकला हात त्या बाल जीवाला पण जस सारं काही कळत होतं.
तिने कुठलं खेळण मागितलं नाही की खाऊ मागितला नाही बाबा "तू लवकल पलत ये हं, मला ना तुझ्याशी खूप खूप खेलायचय! आणि आईचा डोक्यावरून फिरणारा थरथरता हात आणि दिलेला
आशीर्वाद दीर्घायुष्यी हो त्याही परिस्थितीत त्याला हसायला आलं सैनिकाला कोणी असा आशीर्वाद देते का? पण ती आई असते ना.
त्याने निघताना तिघींना पण स्वतःच्या आश्वासक मिठीत घेतलं आणि मी पुन्हा येईल असं ठामपणे सांगितलं पण आता दिलेले वचन पाळणे शक्य नव्हतं या देशासाठी ,या देशातल्या जनतेसाठी त्याने ऐन तारुण्यात आपल्या जीवाची कुर्बानी दिली होती भारतमाता हात पसरून त्याला जवळ ये असं म्हणत होती आता त्या आईचा हात सोडून तो या आईच्या कुशीत जाणार होता शेवटचे श्वास, शेवटचे क्षण, आठवणी आठवणी आणि फक्त आठवणी