प्रा.डॉ.नरेश शंकरराव इंगळे

Drama

3.5  

प्रा.डॉ.नरेश शंकरराव इंगळे

Drama

नामा

नामा

11 mins
394


सामान्य माणसाची असामान्य कामगिरी उलगडणारी "नामा" कादंबरी


    सामाजिक जाणिवेतून कसदार लेखन करणाऱ्या नव्या पिढीतील मोजक्या लेखकापैकी एक म्हणजे पुरोगामी चळवळीतील अग्रणी आणि आंबेडकरी विचारवंत कवी,लेखक रवी दलाल हे एक आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर असलेल्या तिवसा या तालुक्याच्या ठिकाणी त्याचा बालपण गेलेल आहे आणि येथेच त्याची जडणघडण झाली आहे. त्यामुळे ईथल्या परिस्थितीचा/समाजजीवनाच मार्मिक आणि वास्तव परिस्थितीच चित्रण त्यांच्या एकंदर लेखनातून प्रतिबिंबित होते. वयाच्या अवघ्या विशीच्या आत रवी दलाल यांच्या लेखन कौशल्यातून वादळरेषा, आम्ही स्वातंत्र्यात प्रवेश करतो, स्मशानातील माती (काव्यसंग्रह), नामासह पारध, खाल्याखैली, आठवणीतील दिवस (कादंबरी), अवधुती भजन बौद्ध धम्मातील प्रवाह (समीक्षाग्रंथ) अशी अनेक पुस्तके व काव्यसंग्रह लक्षवेधी ठरलीत. त्यापैकी सामान्य माणसाची असामान्य कामगिरीचे वास्तव उलगडणारी कादंबरी म्हणजे "नामा" कादंबरी होय.कादंबरीतील मुख्य नायक नामा म्हणजेच नामदेव शिवराम कठाणे हा होय.अक्षरशून्य पण भारदस्त व्यक्तिमत्वाचा धनी असलेला नामा सर्वपरिचित असला तरी त्याचे असामान्य कर्तृत्व जगासमोर आणण्याचे आणि नव्या पिढीला प्रेरणास्थान ठरावे या उदात्त हेतूने नामाच्या जीवनात घडलेल्या सत्य घटनेचे/प्रसंगाचे वास्तवदर्शी चित्रण नामा या कादंबरीतून लेखक रवि दलाल यांनी केले आहे.    


   अठराविश्व दारिद्र्यतील कुटुंबात जन्मलेल्या नामाला निसर्गतःच आडदांड शरीरयष्टी लाभली.सर्वसामान्यांचे हित आणि शोषितांचे कल्याण आणि न्यायासाठी आपल्या रांगड्या शरीरयष्टीचा आणि बलाढ्य ताकदीचा कसा उपयोग करून घेतला आहे याबाबतचे अनेक प्रसंग दृष्टिपटलावर येते. कादंबरीत प्रवेश करताना अगदी बालपणापासून तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मदीक्षा सोहळ्या पर्यंतचे विविध पैलू मोठ्या खुबीने लेखक रवि दलाल यांनी रेखाटले आहे.संपूर्ण कादंबरी हे नामाच्या सभोवती केंद्रीत असून या सर्व घटना जिवंत आणि काळजाचा ठाव घेणाऱ्या वाटतात.त्यातील शिवराम,शेवंती,दामुअन्ना,राऊत पाटील,हरी पाटील,लक्ष्मण पाटील,रायबा,डुकरा,वर्मा साहेब,शिपाई बाबुराव,सखू,आशा,दुर्गा,पारनु उस्ताद,तसेच नामाचे जिवलग संवगडी ही सर्व पात्रे प्रसंगानुरूप प्रवेशली दिसतात.


   भारी भक्कम देह,दोन हल्याचं बळ असलेल्या नायक नामाने पारनू उस्ताद कडून कुस्तीचे धडे गिरविले.लाठी काठी भालाफेक,दांडपट्टा,इत्यादी कौशल्यही अवगत केले.पांरनूचा चेला म्हणून त्याला इतर कुणालाही ओळख देण्याची गरज नव्हती.पण भांडण-तंटे उधळे घेणारा गावगुंड म्हणूनही सर्वपरिचित होण्यास वेळ लागला नाही.त्यामुळे त्यांना गाव परिसरात छोट्या मोठ्या कामासाठी कुणीही सांगत नव्हते. मात्र ताकदीचे/बळाचे कामासाठी नामाशिवाय अनेकापुढे पर्याय नव्हता.तसा दबदबा त्यांनी निर्माण केला होता.त्याकाळी प्रस्थापितांनी/धनदांडग्यांनी त्याच्या ताकदीचा कसा दुरुपयोग करून घेतला आहे याबाबतचे अनेक प्रसंग लेखकानी ताकदीने रेखाटले आहे.


    कादंबरीतील अनेक घटना ह्या स्वातंत्र्यपूर्व काळाशी संबंधित आहे.परकियांच्या राजवटीत गावाच्या कारभाराचे सूत्र आणि कृषी व न्याय न्यायनिवाड्यासह अनेक बाकीचा निपटारा करण्याची जबाबदारी त्याकाळी गावाच्या पाटील/देशमुखाकडे असत.पाटलाचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ मानली जात असत.त्याच्या निर्णयाच्या विरोधात जाण्याची हिम्मत कुणामध्येही नव्हती.अधिकाराचे सूत्र आणि वर्चस्वाचा दबदबा कायम ठेवण्यासाठी पाटील आपल्या दिमतीला पहेलवान पोसत असे.त्याकाळी पहेलवान म्हणजे पाटलाचे सुरक्षाकवच समजावे!!! पाटलाच्या निर्णयाची अंमलबजावणी पहेलवानांच्या शक्ती बळावरच कार्यान्वित होत असे.पाटलाचा सरदार म्हणून पहेलवान कार्यरत राहत असे. अशा पहेलवानाला काही लोक गावगुंड,दरोडेखोर लुटारू अश्या उपमा देत असत.नामाही जावऱ्याच्या पाटलाच्या दिमतीला होता.परंतु नामा उपरोक्त चौकटीत नक्कीच बसणारा नव्हता.पाटील व प्रस्थापितांच्या आदेशान्वये नामा करीत असलेली कृती सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर,गोरगरीब,दुर्बल वर्गावर अन्याय करणारी नक्कीच नव्हती.उलट त्याची कृती अशा वर्गांना बळ आणि सुरक्षा देणारी होती.म्हणूनच समाज त्याच्याकडे आस्थेने बघत असे.नामातील चांगुलपणा आणि उदारता त्याच्या कर्तुत्वाचे बलस्थान होते.यातील गोरगरीब,दुर्बल,शोषित वर्गाला प्रती असलेली आस्था, प्रामाणिकपणा,बंधुभाव, सामाजिक तळमळ ओतप्रोत भरलेली असल्याचे अनेक प्रसंगावरून लेखकांनी तितक्याच ताकदीने निदर्शनात आणून दिले आहे.त्या अर्थी लोक त्याच्या कृतीकडे न्यायिक दृष्टिकोनातून बघत असल्याचे प्रसंगानुरूप आपसुकच कळते.


   जोखमीच्या कामासाठी नामा हीच सर्वांची पहिली पसंती असे. जिथे भल्याभल्यांचे प्रयत्न थांबते;तिथे नामा काम फत्ते करते अशी लोकप्रियता त्याच्या वाट्याला आली होती.जावऱ्याच्या दामु अण्णाची बैल जोडी जळगावच्या राऊत पाटलांनी सोडून नेली असते.जळगावच्या राऊत पाटलाकडून जोडी सोडून आणणे म्हणजे वाघाच्या तोंडातून शिकार आणण्यासारख कठीण आणि जोखमीचं काम त्याने हाती घेतल.मुलाप्रमाणे जपलेली आणि घरच्या गाईच्या वासरा पासून तयार केलेली बैलजोडी दामू अण्णा आणि त्याच्या बायकोसाठी जीव की प्राण असते.नामाशिवाय असे काम दुसरे कुणीच करू शकत नाही असा विश्वास पाटलांना नक्कीच होता.नामाने हे आव्हानही अंगावर घेतल आणि त्याच दिवशी राऊत पाटलाकडे बांधून ठेवली जोडी;मनगटाच्या जोरावर दामू अण्णाच्या गोठ्यात आणून बांधली.दिलेला शब्द मोडायचा नाही आणि पुढे टाकलेले पाहून कधी मागे घ्यायचे नाही असा कणखरपणा नामात होता.


   अशीच नांदपुरातील कुस्तीची घटना.गावातील रामराव पाटलाच्या वाड्यासमोर कुस्तीचे आयोजन करण्यात आले असते. कुस्ती सहभागासाठी आर्वीचा रायबा पहेलवान विजयी अविर्भावात वाजत गाजत गावात प्रवेशतो.त्याच दरम्यान गरीब उकंड्याची दुभती गाय पडून मोडते.त्याच्याकडून करण्यात आलेली भरपाईच्या मागणीची पूर्तता करण्याऐवजी रायबा जातीवरून शिवीगाळ करतो. नामाला हा अपमान व अस्पृश्यतेची अवमानजनक वागणूक सहन होत नाही.त्याची न्यायी स्वभाववृत्ती त्याला अस्वस्थ करते.नामा हा कुस्तीसाठी नव्हे तर जावऱ्याच्या हरी पाटला सोबत वसुलीसाठी आलेला असतो.अन्यायी वागणूक आणि जातीवाचक शिवीगाळीचा वचपा कुस्तीच्या मैदानात घेण्याचा तो "पण"घेतो.रांगडया आणि सशक्त नावासमोर रायबा महारा सोबत कुस्ती न खेळण्याचा डाव फेकतो.रायबाच्या अयशस्वी प्रयत्नात जातीय द्वेषाने आणि अपमानाने पेटून उठलेला नामा रायबाला अवघ्या पाच मिनिटात नामोहरम करतो.राष्ट्संत तुकडोजी महाराज या घटनेचे साक्षीदार असतात.विजय मल्लासाठी राष्ट्रसंताकडून होणारा सत्कार व सन्मान नामासाठी अविस्मरणीय ठरतो.कुस्तीच्या प्रसंगाने नामाला अस्पृश्यतेची असलेली चीड आणि तत्कालीन अस्पृश्य समाजाची असलेल्या विदारक स्थितीचा उलगडा लेखकांनी अगदी चाणाक्ष रित्या अधोरेखित केला आहे तसेच शोषित,पीडित,बहुजन समाजाप्रती असलेली कणव आणि प्रस्थापिताप्रती असलेली प्रचंड चीडही उजागर करण्यास लेखक विसरत नाही.


  पुढे एका घटनेत तिवसा तालुक्यातील सातारगाव-जावरा मार्गावरील घटना.गरीब विधवा सखुबाई सातरगाव वरून मोठ्या खटल्यातील कामे आटोपून डोक्यावर जीवनावश्यक वस्तूचे ओझे जावरा गावाकडे परतीच्या वाटेने एकटीच जात असताना दृष्ट संतु पारधी तिच्या आडवा होतो.वासनांध संतु अब्रू लूटण्याच्या प्रयत्नात असतानाच नामा मदतीसाठी धावून येतो. पत्नी शेवंताला सखुबाई सोबत गावाकडे पाठवून नामा पारध्याचा सूड उगविन्यासाठी पारधी वेड्यावर धाव घेतो आणि संतू ला चांगलाच धडा शिकवितो.(वीस ते पंचवीस पारध्याला नामा एकटाच लोळवितो) येथे नामाच्या अंगी महिला प्रती असलेली आस्था आणि स्त्रियावरील अन्यायाबाबत असलेली प्रचंड चिड उजागर होते.


   नामाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच असल्याने कुटुंबासाठी आपलाही हातभार असावा अशी तळमळ नामाची असते.भांडणे उधळे घेणारा म्हणून सर्व परिचित असल्याने त्याला छोट्या-मोठ्या कामासाठी कुणीही कामाला सांगत नसे.परिस्थिती समोर त्याने हात टेकले होते.नाईलाजास्तव पाटलाच्या स्वार्थी व दृष्ट मनसुब्यास बळी पडण्याची त्याच्यावर वेळ आली होती.पाटलावर निष्ठा कायम ठेवत पाटील म्हणेल त्या कामास कधीही कसूर केली नाही.नामाचा संघर्ष हा पोटाच्या भाकरीसाठी होता. परिस्थितीने त्याला हतबल केले होते.अनिच्छेने तो मारामारीचे कामे करण्यास प्रवृत्त होत असे.प्रस्थापितही त्याच्या बलाढ्य ताकदीचा सोयीनुसार वापर करण्यास कसलीही कसर सोडत नसे.म्हणूनच अखेरच्या क्षणात तो म्हणतो,"ताकद ही अनेकांसाठी देणगी असते,पण माझं बलदंड शरीर मला शाप ठरलं.मी सामान्य जीवन केव्हाच जगलो नाही,मला अनेकांनी ताकदीसाठी वापरून घेतलं"त्याच्या या बोलण्यात खूप सत्य आणि विदारक होतं.वैयक्तिक कारणासाठी त्याने गोरगरीब अन दुर्बलावर कधी अन्याय केला नाही की कधी हात उगारला नाही.उलट दुर्बलांच्या न्यायासाठी अखेरपर्यंत लढला!!परंतु त्यांच्याकडे आलेले मारामारीचे दुष्टचक्र आणि दारिद्र्याचे दुष्टचक्र थांबता थांबेना.त्यातच नामाच्या लग्नाबाबत शिवरामची होणारी घालमेल अगतिक पित्याची व्यथा सांगून जाते.अखेर तिवस्यातील उपाशाच्या शेवंती सोबत विवाह बंधनात अडकतो.तसेच पोलिसांची धरपकड, शिवराम चा मृत्यू,शेवंतीच एकटेपण आणि त्यातच गर्भनाश,नवऱ्याच्या पश्चात एकाकी जगण्याचा शेवंतीचा संघर्ष असा क्लेशदायक जीवन प्रवास नामाच्या कुटुंबाला भिजवतो, रडवतो, त्याचं जगणं मुश्कील करतो,त्याची सत्वपरीक्षा पाहतो.त्याचे हाल हाल करतो. जगणे मुश्कील करतो.असे सर्व प्रसंग कथानकाचा अविभाज्य भाग म्हणून सहज स्पूर्तपणे येतात.त्यामुळे कथानकात कृत्रिमता डोकावत नाही.कैक चटका लावणारे प्रसंग लेखकांनी अत्यंत ताकदीने मांडले आहेत. अर्थात नामाच्या जीवनातील अनेक अलक्षित बाबीही लेखक निदर्शनास आणून देण्यात विसरत नाही.

   

आष्टी संग्रामातील सहभाग त्यांच्यातील देशसेवा आणि स्वातंत्र्यासाठी असलेली तळमळ अधोरेखित करते.१९४३ च्या "चले जाव"च्या घोषणेने संपूर्ण देश स्वातंत्र्यासाठी पेटून उठलेला असतो.ब्रिटिशांच्या विरोधातील या आंदोलनात नामाही उतरतो.सहकार्याच्या मदतीने आंदोलनाची दिशा ठरवतो. ठरल्याप्रमाणे ब्रिटिश प्रशासनाला कसलाही मागमूस लागू न देता गावागावात स्वातंत्र्याची ज्योत पेटवितो आणि थेट आष्टीच्या पोलिस ठाण्यावर धडक देतो.इंग्रज दरोगा जरासंध ला पोलिस ठाण्याच्या आवारात ठेचून यमसदनी धाडले जाते.आंदोलनात पंछी गोंड डॉ. मालवे शहीद होतात.जमावाच्या अचानक हल्ल्याने ब्रिटिश प्रशासन चवताळते आणि आंदोलकांना दिसताक्षणी पकडण्याचे आदेश जारी करतात.धरपकडीच्या सत्रात उस्ताद पारनु सह नामा भूमिगत होऊन सालबर्डीत तळ ठोकतो. पंधरा महिन्यात आलेली अत्यंत दयनीय अवस्था शिक्षेपेक्षा नक्कीच कमी नव्हती.मारामाऱ्या करणारा एक निरक्षर माणूस परिणामांची तमा न बाळगता संग्रामात उतरतो आणि इतरांनाही प्रेरित करण्याचे अवघड कार्य एक राष्ट्रप्रेमी/राष्ट्रभक्तच करू शकतो हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. म्हणूनच नामा हा मारामाऱ्या करणाऱ्या गावगुंड/दरोडेखोरापेक्षा खरा राष्ट्भक्त अधिक जवळचा वाटतो. परिस्थिती आणि धनिकाने घेतलेल्या गैरवापराने तो गावगुंड ठरला असे लेखक ठासून मांडतात.नामा हा बहुजन समाजातील आणि त्यातही महार जातीचा असल्याने आष्टीच्या संग्रामातील उल्लेखनीय कामगिरीसाठी कुठेही दखलपात्र ठरला नाही आणि इतिहासालाही नोंद घ्यावयाशी वाटली नाही!!!अशी खंत लेखक रवी दलाल व्यक्त करतात.

   

नामाच्या आयुष्यातील संघर्ष नदीच्या प्रवाह सारखा होता जिचा अंत भटकंतीच्या आणि धावपळीच्या सागरातच होता.शेवंती संग सुखी संसाराचे स्वप्नपूर्तीसाठी त्याचा गुन्हेगारी प्रवृत्तीचा पूर्वइतिहासाने त्याचा कधीच पाठलाग सोडला नव्हता.त्याच दरम्यान तिवसाच्या ठाण्यात मुनाफ साहेबांच्या जागी वर्मासाहेब आलेत.नामाचा पूर्व इतिहास त्याला नजरेआड करता आला नाही.त्यातच सूडाच्या भावनेतून जळगावच्या राऊत पाटलांनी वर्मा साहेबा समोर ओढून ताडून गुन्हेगारी प्रवृत्तीचा पूर्वइतिहास उजागर करण्यास कसलीच कसर सोडली नव्हती. वर्मा साहेबांनी नामाला पकडून आणण्याचा आदेश काढला. पोलीस जावऱ्यात धडकले. नामाचा पूर्वइतिहास बघता नामाला जेरबंद करण्यास कुणाचीही हिंमत झाली नाही.कायदेशीर बाजूचा दाखला देत अटक करून घेण्यासाठी त्याची समजूत काढली.शेवंतीचा शब्द,कायद्याच् पालन आणि पोलीस शिपायाला दिलेल्या शब्दावर कायम राहून स्वतःच पोलीस ठाण्यात जमा होणारा प्रमाणिक नामा वाचकाला वाचायला मिळतो.परिणामाचा विचार न करता दिलेला शब्द मोडायचा नाही यांवर कायम राहणारा,कायद्याच्या चौकटीत अडकतो आणि अखेर जिल्हा कारागृहाच्या प्रवासासाठी तयार होतो


आता मात्र बलाढ्य नामाच्या सहनशीलतेचा बांध फुटतो. शक्तिशाली नामाचं काळीज फाटते.आपल्या पश्चात पोटूशी असलेली शेवंती स्वतःबरोबरच वृद्ध पित्याची जबाबदारी कशी पेलणार या चिंतेने व्याकुळ होऊन ओक्साबोक्शी रडतो.नामाच्या हळव्या हृदयाचा ठाव रेखाटण्यासाठी लेखकांनी कसब पणाला लावलेले दिसते. 

   

पाटलाद्वारा कर वसुली आणि पचलेला पैसा काढण्यासाठी बलदंड नामाने नेहमीच भांडणे अंगावर घेतली.मात्र अटक झालेल्या नामाच्या सुटकेसाठी कुणीही कृतज्ञता दाखविली नाही.जमानती अभावी नामा जेलात अडकतो.अशा कठीण प्रसंगी पारनू उस्ताद यांच्या सूचनेवरून जानराव पाटील जमानती साठी येतो.अन नामाला मोकळ्या श्वासासाठी कैदेतून मुक्त करतो.त्यावेळी शेवंती भेटीचा आनंद झाला पण पश्चात वडील गेल्याचे दुःख पचनी पडले नाही. आता बलाढ्य असलेला नामा अंतर्मनातून पूर्णपणे खचलेला असतो.अशाही स्थितीत गुरूकडून दिलेल्या शब्दाची कारणमीमांसा न करता अगदी छातीवर गोटा ठेवून गुरूच्या वचनपूर्ती साठी सज्ज होतो.जमानत घेतलेल्या जानराव पाटलाच्या एकुलत्या एक पोरीच्या सोयरीकी दरम्यान सैलगावच्या अफाट श्रीमती असलेल्या दौलत पाटलाकडून झालेली फसगत नामा समोर ठेवली जाते.लेकीचे शोषण आणि आलेल्या दैना अवस्थेंने/ नरकयातनेने आई बाबाचे काळीज फाटते.कायदा आणि शक्य त्या मार्गाचा अवलंब करूनही दौलत पाटलाच्या कचाट्यातून लेकीला कोणीही सोडवू शकले नव्हते.अस कठीण काम गुरूच्या शब्दाखातर नामान स्वीकारलं आणि स्वतःच्या मनगटाच्या जोरावर दौलत पाटलाच्या कचाट्यातून शोषित-पीडित मुलीला मुक्त केलं. जोखमीचे काम केवळ नामाच करू शकतो या गुरुच्या वचनाला मूर्त रूप दिले.सामाजिक उत्तरदायित्व आणि गुरूच्या आज्ञेच नवं उदाहरण जगासमोर आणलं.विनाकारण कुणाला मारायचं नाही आणि कोणी अंगावर आलं तर सोडायचं नाही असच काहीसे धोरण नामाचे होते.नामा स्वतःचे धोरण स्वतःच ठरवत असे.दुर्बलावर अन्याय होणार नाही अशी खबरदारी घेण्यास मात्र तो कधीही विसरत नसे.लढवय्या नामाने अनेक माजलेल्या धनिकांना वठणीवर आणण्याचे कार्य कांदबरीत येणाऱ्या विविध प्रसंगानुरुप वाचकाला वाचायला मिळते.एक भला,प्रामाणिक, सहृदयी माणूस लेखक वाचकासमोर ठेवतो.

   

नामाचा आयुष्य म्हणजे एक संघर्षाचा रान होत.धावपळीच आयुष्य आणि भटकंती त्याचा पाठलाग कधी सोडत नव्हती. सैलगाव च्या प्रकरणातील पुरेशा पुराव्याअभावी निर्दोष सुटके नंतरही राऊत पाटलाच्या जुन्या वैमनस्यातून खोटया रिपोर्टर च्या आधारावर नामाला तडीपार करण्याचा आदेश जारी होतो.नामासह त्याचे पाचही सवंगडी अखेर परागंदा होतात. तब्बल एक महिन्याच्या फरका नंतर लक्ष्मण पाटलाच्या सहकार्याने पारडीत मुक्काम ठोकतो.काबाडकष्ट करून उपजीविका भागवितो.पण सामाजिक विषमता आणि त्यातून होणारा छळ त्याच्या स्वाभिमानी स्वभावाला स्वस्थ बसू देत नव्हते.त्यातच लक्ष्मण पाटील विद्रोही विचाराच व्यक्तिमत्व!त्यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले होते.त्यासाठी बहुजनांना बंडासाठी हाक दिली. आतापर्यंत इतर पाटलांनी नामाच्या ताकदीचा स्वतःच्या स्वार्थासाठी गैरवापर करून घेतला.महार पाटलांनी प्रथमच स्वतःसाठी नव्हेतर देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी हाक दिली होती.लक्ष्मण पाटलाच्या प्रेरणेतून आणि पुढाकारातून नामा सह त्याचे सवंगडी उत्स्फूर्तपणे स्वातंत्र्य लढ्यात उतरते. तळेगावच्या जंगलात वृक्षतोड सत्याग्रह पेटतो.भेदा-भेदीच्या काळातही सत्याग्रहाचे नेतृत्व अस्पृश्यकडे आलेले असते.नामा पुढे होऊन मोर्चा सांभाळतो.पुढे स्वातंत्र्य आंदोलनातील लोकांची धरपकड सुरू होते.नामा व त्याचे सवंगडी पुन्हा परागंदा होतात.त्याच वर्षी मनाने खचलेला लक्ष्मण पाटील स्वातंत्र्याच्या सूर्योदयापूर्वीच मृत्यूला कवटाळतो.अटक केलेल्या पैकी सोयीनुसार तत्कालीन प्रस्थापित उच्चवर्णीय नेतृत्व आपल्या कार्यकर्त्यांची सुटका करून घेतो.मात्र केवळ अस्पृश्य असल्याने बारा आंदोलकास सोडवण्यासाठी कोणीही प्रस्थापित पुढारी समोर येत नाही.दुर्दैवाची बाब म्हणजे प्राणाची बाजी लावून लढणाऱ्या अस्पृश्य कार्यकर्त्यांची कोणत्याही स्वातंत्र्यलढ्यातील शहीद सैनिकाच्या यादीत नोंद घेणे आवश्यक वाटले नाही!! अस्पृश्यची ऐतिहासिक नोंद आणि अस्पृश्य नेतृत्व पुढे येईल या भीतीपोटी कदाचित नोंद घेतली नसावी.त्यासाठी जातीय चौकट कारणीभूत ठरली असावी अशी भावना लेखक व्यक्त करतात.

   

पुढील एका प्रकरणात कलावतीबाईचा मनोरंजनात्मक तमाशाचा फड तर दुसरीकडे संत गाडगेबाबा यांच्या प्रबोधनात्मक किर्तन.लोक तमाशा ऐवजी कीर्तनात रमले.भगवंता व सरपंचाला असा अपमान पचनी पडला नाही.अपमानाचा वचपा त्यांनी हेटीवरच्या झोपड्यांना आग लावून घेतला.संपूर्ण लोक कीर्तनात तल्लीन असल्याने ते परतण्याच्या आतच झोपड्यांची राखरांगोळी झाली होती.त्यातच दुर्गाची तीन महिन्याची मुलगीही पाळण्यातच राख झाली होती. दुर्गाला हा धक्का सहन होत नाही त्यातच तिचे मानसिक संतुलन पूर्णपणे खचले.दुसरीकडे लोकांकडे पोटाची/भुकेची आग बुजविण्यासाठी काही शिल्लक राहील नव्हतं.अशा कठीण प्रसंगी दानी पूना गाडगे मदतीसाठी धावून आला आणि त्याने धान्याचे कोठार खुले करून दिले.त्याच दरम्यान मुलीच्या विरहाने दुर्गाचे मानसिक संतुलन अधिकच बिघडते.जादूटोणा,जंतर-मंतर, उपास-तापास,आणि नवसाने प्रकृतीत सुधारणे ऐवजी अधिकच बिघडण्यास कारणीभूत ठरली. दुर्गाचा आकांत नामाला सहन होत नव्हता.दवाखान्या शिवाय पर्याय नाही हे नामाने हेरले.पण दवाखान्यासाठी पैसा नव्हता. अशावेळी बारूद सुरुंग लावूनही न फुटणारा दगड नामाने रक्ताचे पाणी करून चार तासात लोखंडासारखा दगड फोडून काढला आणि प्राप्त पैसे घेऊन दुर्गाला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.पुन्हा पैशाच्या अडचणीने नामाच्या चिंतेत भर घातली पण याच वेळी एकेकाळी दौलत पाटलाच्या दास्यातून मुक्त केलेली आशा मदतीला धावून आली आणि तिची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली.रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीचा नातं जपणारा नामा दुर्गा साठी जीवनदाता ठरला!

   

अर्ध्या तप पश्चात नामा शेवंतीच्या मिलापानंतर जिवाभावाच्या सर्व सवंगड्याचा जड अंतकरणाने निरोप घेत पत्नीसह मूळगावी आणि त्यानंतर तिवसयात आला.नामाचा पूर्व इतिहास बघता अंहगमेहणीतीचे कामे मिळण्याअभावी उपासमारीची वेळ आली. संसाराचा भार शेवंतावर आला. दरम्यानच्या काळात २४ एप्रिल १९३३ ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पूलगावात सभा होणार असल्याची बातमी नामाच्या कानावर पडली. सहकाऱ्यासह नामा पुलगावात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ऐकायला गेले.सभेने त्यांच्यात आमूलाग्र बदल घडून आणला. गावी परताच दारूभट्टी फोडली. दारू वर्ज्य केली.पुढे कौंडन्यपूरची भीम टेकडी ताब्यात घेण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला.बाबासाहेबाच्या विचाराने नाम्यात सर्वकंशं बदल घडून आणला.सभा त्याच्यासाठी प्रेरणादायी आणि परिवर्तन घडविणारी ठरली.हीच प्रेरणा त्याला नागपूरच्या धम्मदीक्षा सोहळ्याला घेऊन गेली. ऐतिहासिक सोहळ्याचे प्रत्यक्षदर्शी केले.लाखो लोकांनी धम्मदीक्षा घेतली.नामाच्या मैत्रीसाठी गैर महार अर्थात गोंड समाजातील तिघांनी सुद्धा धम्मदीक्षा घेतली.ही त्यांच्या आयुष्यातील अद्वितीय घटनाच म्हणावी लागेल.जेथे एक माणूस घडविणे किंवा प्रेरित करणे अवघड आहे तेथे अक्षरशून्य अडाणी नामाने तीन गैर महारांना धम्म स्वीकारन्यासाठी प्रेरित करण्याचे सत्कार्य केले.

   

नामाचा उभं आयुष्य संघर्षांन माखलं होतं.उत्तरार्धातही जगण्यासाठीचा त्याचा संघर्ष थांबला नव्हता.सततच्या भटकंतीने गावात त्याचा नावाने सरकारी दरबारी कोणत्याही प्रकारचं रेकॉर्ड नसतं.वारसा हक्काने मिळालेलं घर जवळच्या नातेवाकाच्या स्वाधीन करून जावऱ्यात उर्वरित आयुष्य झोपडीत काढतो.अनेकांच्या उदरनिर्वाहासाठी लढणारा नामा आता स्वतःला पोटभर अन्न मिळवण्यासाठी चक्की वरून पीठ आणण्याची वेळ येणे यापेक्षा कोणते दुर्दैव असू शकते!! प्रचंड ताकतीचा,रण माजविणारा तळपता सूर्य जावऱ्यात मावळतो.पिंपळाच्या झाडाखाली अखेरचा श्वास घेतो.बौद्ध विहार बांधणी इच्छापूर्ती म्हणून त्या जागी पंचशील झेंडा डौलाने फडकत आहे.

    

 दुर्गा आणि आशाचं मातीमोल झालेलं जीवन फुलविण्याच कार्य,भाकरे महाराजांच्या सूचनेवरून भुयार खोदण्यासाठी उचललेला सिंहाचा वाटा,स्त्रीची इब्रत वाचविण्याचे कार्य,स्वातंत्र्य संग्रामातील सहभाग,प्रस्तापिताच्या विरोधात आरंभलेलं बंड,इतर धर्मीयांना धम्मदीक्षासाठी घेतलेला पुढाकार, सवंगड्यांची ताटातूट हे सर्व प्रसंग कथानकाचा अविभाज्य भाग म्हणून प्रसंगानुरुप येतात.त्यात कुठलीही कृत्रिमता नाही.त्याच्या जीवनात घडलेल्या सत्य घटनेवर आधारीत घटनेचे वास्तव चित्रण लेखकाने वाचकांसमोर आणले आहेत.लेखकांनी विनाकारण प्रसंग ताणले नाहीत व प्रत्येक वेळी नामाचा बेडरपणा न उमटविता समजदारीचे वर्णन तितक्याच ताकदीने मांडले आहे. कणखरपणा,प्रामाणिकपणा, एकवचनीपण न्यायीपणा,राष्ट्रप्रेमी तसेच स्वातंत्र्य,समता,बंधुत्व यासाठी लढणाऱ्या नामाचे विविध गुण कौशल्यांना अधोरेखित करण्याचं काम लेखकानी केले आहे.

   

सदर कादंबरीत प्रसंगानुरूप केवळ घटना म्हणून घटना येत नाही तर लेखकाच्या समग्र नि समृद्ध जिवानूभवाच्या भाषेच्या माध्यमातून कलात्मक बाजही साकारतो.भाषेचा समृद्धपणा,आशयनिष्ठ अभिव्यक्ती,उच्च साहित्यमूल्य इत्यादीमुळे साहित्यकृती म्हणून या कादंबरीला एक विशिष्ट उंची प्राप्त झाली आहे.पात्र,घटना, परिसर याबरोबरच शब्दाची अचूक व परिणामकारक निवड आणि विश्लेषण यामुळे ही कादंबरी प्रारंभापासून ते अखेरपर्यंत आपल्या मनाची जबरदस्त पकड घेते.म्हणूनच वाचक या कादंबरीचे मनःपूर्वक स्वागत करतील असा मला विश्वास वाटतो.शेवटी लेखकाच्या हातून अधिकाअधिक समाजोपयोगी साहित्यनिर्मिती साठी आणि भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama