Madhuri Sharma

Inspirational

4.1  

Madhuri Sharma

Inspirational

मुक्तता

मुक्तता

3 mins
301


ए ताई..

काय गं श्रावणी?

तुला एक विचारू का?

(असं जेव्हा कोणी विचारतं ना तेव्हा त्या व्यक्तीला त्याच्या मनातलं काहीतरी महत्वाचं बोलायचं असतं)

अगं विचार की..

तुझी शेवटची ईच्छा काय आहे?

(एक क्षण मला काही सुचलंच नाही की तिला काय उत्तर देऊ ते...)

काय गं श्रावणी अचानक हा प्रश्न कशासाठी?

मधु ताई, तू उत्तर दे ना प्लीज..

अगं बेटू, मी असा कधी काही विचार केलाच नाही, तुला नीट विचार करून उत्तर देईल चालेल का तुला?

बरं पण खरं बोल हं

अगं त्यात खोटं बोलण्यासारखं काय आहे? बरं माझं जाऊ दे 

तू सांग मला तुझी शेवटची ईच्छा काय आहे ती?

ताई,सांगू का खरंच?

हो मग सांग ना, मला पण तर कळू दे तुझ्या कल्पना, ईच्छा, आंकाक्षा, भावना, नक्की तुझ्या मनात काय चाललंय ते...

ताई माझी ना एकच ईच्छा आहे की - माझ्या आईने तिच्या आयुष्यातला एक दिवस फक्त एक दिवस स्वतःच्या मनाप्रमाणे जगावा, तिला वाटेल ते करायचं कुणाचंही आणि कसलंही दडपण तिला नसावं.

आजवर मी तिला सतत दुसऱ्याच्या मनाप्रमाणे जगतांना बघितलं आहे, तिच्या स्वतःसाठीचे निर्णयसुध्दा तिने स्वतः एकटीने कधी घेतले नाही, तिच्या विचारांना, मतांना घरात कधी ग्राह्यच धरलं गेलं नाही. म्हणुन माझी ईच्छा आहे आईने तिच्या आयुष्यातला एक दिवस तरी स्वतःच्या मनाप्रमाणे, स्वतःसाठी, मुक्त, स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर होऊन जगावा...

     श्रावणी बोलली तो शब्द न शब्द मी माझ्या आयुष्यात असलेल्या सर्व स्त्रियांना बघुन रिलेट करु शकत होते. फक्त श्रावणीची आई नाही तर सर्वच स्त्रियांना त्यांच्या मनाप्रमाणे जगण्याचं स्वातंत्र्य हवंय.. गेली अनेक दशके स्त्रियांना सामाजिक चौकटीच्या साच्यात घालून त्याचं अस्तित्व धोक्यात आणलं गेलं यामुळे स्त्री स्वातंत्र्य ही संकल्पनासुध्दा मर्यादित होत गेली. आजची परिस्थिती बघता स्त्रीया शिक्षित होत आहेत, स्वावलंबी बनत आहेत,आर्थिकरित्या स्वतःच्या पायावर उभं राहत आहेत पण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य अजूनही त्यांना नाहीये. त्यांच्या भविष्याचा विचार त्या करतात पण त्यांच्या मनासारखं भवितव्य त्या विना परवानगी घडवू शकत नाही.

खरं म्हणजे स्त्री स्वातंत्र्य हा विषय समजून घेण्याचा नसून अनुभवण्याचा आहे. 

"स्त्री स्वातंत्र्य" हा मुद्दा वादाचा का आहे हेच मला कळत नाही. पूरुषांप्रमाणे एक व्यक्ती म्हणुन स्त्रीयांना का त्यांचे अधिकार उपभोगता येत नाही? संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले असता का स्त्रीयांच्या अधिकारांची गळचेपी होत असते. स्त्री स्वातंत्र्यावर साधी चर्चाही होत नाही ही आमच्यासाठी सर्वात मोठी शोकांतिका आहे.आजही महिला कौटुंबिक हिंसाचार,बलात्कार,छेडछाड, हुंडाबळी,इ. बाबींनी त्रस्त आहेत. स्त्रीयांची ही स्थिती कधी बदलणार? मला आठवतं मी लहान असतांना आजी नेहमी म्हणायची, तुला जे काही करावंसं वाटतं ना बाई, ते आता करून घे. मोठी झाली लग्न झालं की त्यागाचं आयुष्य सुरु होतं स्त्रीयाचं.. मग तुला वाटेल ते तुझ्या मनाप्रमाणे तुला काही करता येणार नाही हं...

आजीचे ते शब्द न शब्द तेव्हाही आणि आजही टोचतात पण ते म्हणतात ना सत्य नेहमी कडूच असतं. तिच्या नुसत्या शब्दांनी त्रास होतो मग ज्या स्त्रीया गेली अनेक दशके हे सहन करत आहेत त्यांची स्थिती, वेदना,दुःख शब्दांत नाही व्यक्त करता येणार. स्त्रीयाचं आयुष्य कसं ना...लहान असतात तेव्हा वडिलाचं ऐका, थोडं मोठं झाल्यावर मोठ्या भावडाचं ऐका, लग्न झाल्यावर नवरा आणि सासरची मंडळी म्हणेल तसं वागा, नंतर स्वतःची मुलं म्हणतील तसं करा आणि उतारवयातही सूटका नाही हं नातवडं म्हणतील तसं वागा..

मग स्वतःच्या मनाप्रमाणे कधी वागायचं ?

या लोकांच्या मनाप्रमाणे जगण्यातुन सर्वंच स्त्रीयांना आज "मुक्तता" हवी आहे. काही पुरुष मंडळी म्हणतीलही की ते स्त्रीयांना स्वातंत्र्य देतात मुळात आम्ही स्वतंत्र आहोत ते देत आहात हे सांगुन ओदार्य दाखवण्याची गरज नाहीये. ते सहज स्वाभाविक असलं पाहिजे. आम्हांला आता समाजाच्या नावाखाली आखलेल्या त्या चौकटीतून मुक्तता हवी आहे. परंपरेच्या नावाखाली लावण्यात आलेल्या अयोग्य रुढीतुन मुक्तता हवी आहे. आम्हाला स्त्री म्हणुन नाही व्यक्ती म्हणुन जगण्याची मुक्तता हवी आहे. आम्हाला चुका करण्याची मुक्तता हवी आहे. संस्कृतीच्या नावाखाली आखुन दिलेल्या बंधनातुन मुक्तता हवी आहे.आम्हाला तुमच्या त्या फालतू प्रतिष्ठेच्या दागिन्यातुन मुक्तता हवी आहे आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे आम्हाला लोकं काय म्हणतील या मानसिकतेतुन मुक्तता हवी आहे....भारत गुलामगिरीतुन मुक्त झाला हो.. स्त्री कधी होणार..... "मुक्त" ?

श्रावणीला तिच्या आईमध्ये स्वतःच भवितव्य दिसत होतं.  


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational