मस्त चाललंय आमचं
मस्त चाललंय आमचं
काल जुन्या मैत्रिणींचे अचानक भेटायचे ठरले . ठरल्या प्रमाणे सगळ्या भेटल्याही . नवरा आणि वाढतं वय .... हेच मुख्य मुद्दे होते बोलायचे.
इतकी वर्षे झालीत लग्नाला पण अजून नवरा घरकामात मदत करत नाही. काळा बरोबर नवऱ्यांनी बदलायला हवे थोडे अशी तक्रार त्या एकीकडे करत होत्या तर वाढत्या वयाबरोबर होणारे बदल नियंत्रणात ठेवून आपण अजूनही किती मेन्टेन आहोत ... त्यासाठी आपण काय काय आणि कसे करतो याचे कौतुकही सुरू होते. अचानक त्या सगळ्यांची नजर अलकावर खिळली .
अलका त्यांच्यात अगदीच " Odd Man ( woman) out " होती. दोन वर्षात येवू घातलेली चाळीशी स्पष्ट दिसत होती तिच्या चेहऱ्यावर..... त्यात भर म्हणजे पूर्वी काळेभोर असलेल्या केसात आता चंदेरी केसांची उपस्थितीही प्रकर्षाने जाणवत होती. लहानपणी लहान न राहता मोठे होण्याची हौस असते आणि मोठे झाल्यावर मात्र एका विशिष्ट टप्प्यावर वय वाढूच नये असा आग्रह का असतो?? तिचा मात्र असा आग्रह कधीच नव्हता . लहानपणी तिच्या घरी त्यांच्या बाबतचे निर्णय घेतांना घरातले मोठे नेहमीच म्हणायचे, " उगाच उन्हात पांढरे नाही केलेत हे केस ......... अनुभवाचं देणं आहे हे " तिला भारी गंमत वाटे या वाक्याची. तेव्हाच तिच्या बाल मनाने .... आपणही " हे अनुभवाचं देणं " असंच मिरवायच असं ठरवून टाकलं होतं. सगळेच केस पांढरे झाले की कोणती केश रचना करायची हे देखील तिचं ठरलं होतं . आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर होणारे बदल मनसोक्त उपभोगायचे होते तिला. वृध्द झाल्यावर .... सगळे केस पांढरे नसतील.... त्वचा सुरकुतलेली नसेल .... नातवंडांचे लाड करताना ... आशिर्वाद देताना .... थरथरणारे हात नसतील तर काय मजा आहे.. मग वृध्द होण्यात? असे तिला वाटे . होणाऱ्या शारिरीक बदलांसाठी ती मानसिक दृष्ट्या तयार होती. मन कायम सुदृढ रहायला हवे या साठी ती आग्रही होती.
पण मनातले विचार मनातच ठेवून अलकाने मैत्रिणींचे प्रेमळ सल्ले ऐकून घेतले.
घरी आल्यावर रात्री झोपताना मात्र ...'आपल्याला आपले मत ठामपणे का सांगता येवू नये ' या गोष्टीचा तिला प्रचंड त्रास झाला. चिडचिड... धुसफूस झाली तिच्या मनाची .
सकाळी जरा उशीराच उठली ...... उठली म्हणजे काय नवऱ्याने व मुलाने प्रेमाने उठवले . नवऱ्याने हळूच ओठ टेकले कपाळावर तर मुलाने मिठीच मारली आणि लाडीक हट्ट केला , " उठ ना ग मम्मी" .
तशी ती लगबगीने उठली . नाश्त्याची वेळ ही झालीच होती म्हणून पटापट आवरून केसांना चिमटा लावत ती स्वयंपाक घरात दाखल झाली. तिथे पोह्यांचा मस्त सुवास दरवळत होता तर आल्याच्या चहाचे पाणी उकळत होते. ती काही विचारणार तेवढ्यात मागून नवऱ्याने व मुलाने ." सरssssप्राइज..." असा जल्लोष केला. तिच्या डोळ्यातला आनंद दोघांनाही सुखावून गेला. तिने प्रेमानेच मुलाला जवळ घेतले . "मला ही घ्या रे तुमच्यात" असं म्हणून नवराही बिलगला दोघांना. सुख... समाधान, आनंद ...... प्रेमात न्हावून निघालेली त्यांची ही छबी शेजारच्या आरश्यात स्पष्ट दिसत होती आणि आरश्याला ठामपणे सांगत ही होती...... " येवू दे चाळीशी .... वाढू दे वय ... मला पर्वा नाही त्याची.... कारण .... कारण ...... मस्त चाललंय आमचं "
अलकाच्या आयुष्यातील हे दोन प्रसंग थोड्या फार फरकाने आपल्या सोबत ही घडत असतात . आपल्यावर भरभरून प्रेम करणाऱ्यांसाठी आपण कसे दिसतो हे कधीच महत्त्वाचे नसते. त्यांनी आपल्यासाठी बदलावे असे वाटत असताना आपण मात्र आपल्यात होणारे नैसर्गिक बदल ही टाळू पहात असतो. लोक काय म्हणतील याचेच जास्त भय वाटून अनेकदा आपण आपल्या मनाविरूद्ध वागत असतो. आहे त्या पेक्षा कमी वयाचे दिसावे असा अट्टहास करत असतो. उगाच केसांना काळे करण्यासाठी लावलेल्या डायचे दुष्परिणाम ही भोगत असतो . जे करायचे आहे ते स्वतः साठी करावे ... लोकभया पोटी नाही. स्वतः मधले बदल सकारात्मकतेने स्विकारले तरच आपण या लोक भयापासून मुक्त होऊ शकतो . तेव्हा आपणच आपल्या दिसण्यास पेक्षा असण्याला महत्व देवू .... आणि आपल्या प्रियजनांच्या साथीने बिनधास्त म्हणू ..." मस्त चाललंय आमचं ".