Anjali Elgire Dhaske

Tragedy

3  

Anjali Elgire Dhaske

Tragedy

अबोली

अबोली

3 mins
1.1K


   पूजेला फुले हवीत म्हणून अश्विनी शेजारच्या वाड्यात गेली. शेजारी राहणारे आजी आजोबा तिला आपली नातच मानत. त्यामुळे ते तिला हक्काने बोलावून घेत व टोपली भर फुले देत. आजी १० दिवसांसाठी माहेरी गेल्या होत्या . आजोबा एकटेच होते घरी म्हणून मग दोन्ही घरच्या पूजेसाठी फुले वेचायचं आणि फोटो साठी हार करायचं काम तिलाच मिळालं होत. ती रोजच्यासारखीच फुले वेचत होती. अबोलीची थोडी फुले घ्यावीत म्हणून तिने हात पुढे केला तेवढ्यात आजोबा मागून आले व म्हणाले , " अबोलीची फुल तेवढी तोडू नकोस .......आजी रागवेल आपल्यावर ". त्यावर ती आश्चर्याने म्हणाली, " का नको? रोजच तर घेते आजींना फार आवडतात ". त्यावर ते म्हणाले, " तेच तर ..... तिला फार आवडतात ही फुलं. रोज त्याचा छोटा गजरा बनवून माळते ती केसात. तिची फुलं आपण पूजेला घेतली तर तिला गजरा बनवता येत नाही मग ती कुरकुर करत असते. ( आजीची नक्कल करत) " एवढी फुल असतांना ...... काय गरज असते अबोलीची फुले तोडायची कुणास ठाऊक. मला मेलीला एक तर आवड आहे अबोलीचा गजरा माळायची पण हे........ मुद्दाम विसरतात आणि पूजेला घेतात सगळी फुलं".

त्यावर ती दोघही खळाळून हसली. " आजोबा तुम्ही फारच धाकात आहात ह आजींच्या. त्या घरी नाहीत तरी तुम्ही फुल तोडत नाही. " असं ती म्हणाली तसे आजोबा मिश्किल पणे म्हणाले " तिच्या डाय केलेल्या केसात सुंदर दिसतो गजरा.... पण मी मुद्दाम घेतो चार दोन फुलं पूजेला ....... ती लाडीक चिडते , बडबड करते ... घर कसं भरल्यासारखं वाटतं. आता ती घरी नाही तर फुलं तोडून आणि ती पूजेला घेवून तरी काय फायदा".

      आजी परत आल्यावर त्यांना झाडावर सुकलेली फुलं दिसली . तेव्हा अश्विनीने त्यांना आजोबांनी एकही फुल तोडू दिलं नाही अशी कौतुकास्पद तक्रार केली. त्यावर आजी लटक्या रागाने म्हणाल्या, "बघ कसे मुद्दाम त्रास देतात मला . मी नव्हते घरी तर एक फुल तोडले नाही अबोलीचे आणि म्हणतात कसे, "सगळी फुलं जपून ठेवली आहेत तू चिडतेस म्हणून". खरं तर त्यांनाच मी अबोलीची फुले केसात माळलेली आवडतात. ही फुलं खूपच नाजूक म्हणून मग मी त्यांचा गजरा विणते ....गजरा कसला .....सुटी फुलं माळता येत नाही म्हणून दोऱ्यात गुंफून छोटा गुच्छ करते इतकच.

अबोलीच झाड ते केवढ..... त्याला फुलं येतात ती किती ......

बरं मी केसात फुल मळावी हा आग्रह ही त्यांचाच ..... तरी मुद्दाम फुल घेतात माझी "

    त्यावर अश्विनी ," आजी ... ते मुद्दाम तसं करतात तुम्ही चिडावं म्हणून  ". आजी गालातल्या गालात गोड हसल्या , " मला ही माहित आहे ग ते गंमत करतात अशी ...... पूर्वी सासू , सासरे , नणंद, माझ्या माहेरची माणसं .... मुलं .....यावरून छोटे मोठे वाद व्हायचे. मग काय धुसफूस , रागवण... रूसून बसणं .... समजूत काढणं ..... यात दिवस मजेत जायचे . आता एकही कारण नाही संवाद साधायला .... आणि जुन्या आठवणी काढत बसायला आम्हाला आवडत नाही तेव्हा अशी फुटकळ कारण काढून लुटूपुटूचे भांडण करतो . दिवस कसा मजेत जातो . उगाच का आजोबा रोज सकाळी अबोलीला आवर्जून पाणी घालतात . मला लागतील तेवढी फुल बाजूला काढून जास्तीची फुल तेवढी पूजेला घेतात . तरी... मी बडबडते .... कारण त्यांना बहाणा मिळतो मग हसण्याचा आणि हळूच केसात फुले माळून माझा राग घालवण्याचा. नाव ' अबोली ' आहे या फुल झाडाचं पण आमच्या संवादाचं .... सुखाचं कारण आहे बघ ".

दोन वर्षे झाली या संवादाला.......

      आजही अश्विनी सकाळी फुले वेचायला येते .

 आजही आजी न चुकता आबोलीचा गजरा विणतात आणि लाडीक तक्रार ही करतात , " मुद्दाम मला मागे ठेवून गेलात न ... माझी फजिती बघायला ... पण मीही खमकी आहे . सगळं एकटीने करते ... अगदी तुम्ही अबोलीच्या झाडाला जसे झारीने हळुवार पाणी घायलायचे तसेच घालते हो मीही .... बघा फुले कशी टवटवीत आहेेत ..... हारही किती सुंदर झालाय ते.... तुमच्या तसबिरीला कसा .....एकदम खुलून दिसतो".

     अश्विनीचे मात्र डोळे पाणावतात.... " आजी ... ते मुद्दाम तसं करतात तुम्ही चिडावं म्हणून " असं आता तिला म्हणवत नाही. धूसर नजरेने ती सुईत दोरा ओवण्याचा निरर्थक प्रयत्न करत राहते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy