रंजना
रंजना


पै पै जमवून संसार करावा. काहीतरी संकट यावं आणि सगळंच संपून जावं. असंच काहीसं रंजनासोबत होत होतं. शिकलेला नवरा आहे म्हणजे आज ना उद्या चांगली नोकरी लागेल या आशेने तिने संसाराला सुरुवात केली. एका मागोमाग तीन मुलांचे मातृत्व तिने स्विकारले. घरातले सदस्य वाढत गेले तरी नवऱ्याला नोकरी लागायचा पत्ता नाही. त्याने शेवटी मजुरीचा मार्ग पत्करला. तिनेही चार घरची धुणीभांडी करायला सुरुवात केली. जरा सुरळीत सुरू झालं नाही तितक्यात लहान मुलाचा सारखा दवाखाना सुरू झाला. आधीच शिल्लक काही रहात नव्हतं त्यात दवाखान्याचा खर्च , मोठ्या दोन मुलींच्या शिक्षणाच्या खर्चाची भर पडली. नवऱ्याने जास्तीचे काम घेतले तर हिनेही अजून काही घरची काम धरली. बघता बघता मोठी मुलगी दहावीत, लहानी आठवीत तर मुलगा पाचवीत पोहचले. खर्च वाढतच चालले. निराश न होता तिने मेहनत वाढवली. रोजचं खायला मिळतं आहे आणि मुलांचे शिक्षण सुरू आहे यातच समाधान होतं. पण हे समाधान ही फारस टिकलं नाही . बांधकामावर असतांना नवरा वरच्या मजल्यावरून खाली पडला. कमरेच्या हाडाला जबर मार लागला. त्याने अंथरून धरलं. ऑपरेशनला पर्याय नव्हता.
ऑपरेशनला पैसे आणायचे कुठून? अंगावरचे चार मणी डोरलं आधीच मोडून झाले होते. नवऱ्याने अंगावर दुखणं काढलं तरी कामावर जाता येतच नव्हतं. सगळा भार हिच्या एकटीवर येवून पडला. मोठीची दहावी झाली. अभ्यासात हुशार म्हणून तिला डॉक्टर करायचं स्वप्न बघितलं होतं. उत्तम गुणांनी उत्तीर्ण होवूनही घरची परिस्थिती बघता तिने कॉमर्स कॉलेजमधे प्रवेश घेतला. नवऱ्याची तब्येत खूपच बिघडली. उठणं बसणं पूर्ण बंद झालं. होणाऱ्या वेदना सहनशक्तीच्या पलीकडे गेल्या तेव्हा "यंदा दिवाळीला बोनस देवू नका पण नवऱ्याच्या ऑपरेशनसाठी लागणारी रक्कम तेवढी जमा करायला मदत करा" असं सांगून तिने कामावर आगावू रक्कम उचलली. नवऱ्याचं ऑपरेशन करून घेतलं .
ऑपरेशन झाल्यावर सगळं आधी सारखं सुरळीत होईल असं वाटलं होतं पण.... आज डॉक्टर जे बोलले त्याने सगळ्या आशाच संपल्या होत्या. ऑपरेशन झालं तरी वर्षभर कोणतेही काम करायचे नाही फक्त आराम करायचा. तसेच वर्ष झाल्यावर पूर्वीसारखे जड काम तर करायचे नाहीच पण बैठे काम ही खूप वेळ बसून करणे टाळायचे. थोडक्यात जीव जगला होता फक्त.... बाकी पूर्वीसारखे काहीच होणार नव्हते. तिच्या संसाराचे एक चाक कायमचे अधू झाले होते. इथून पुढे संसाराची गाडी तिला एकटीलाच ओढायची होती. तिच्या मनाप्रमाणेच शरीरावरही खूप ताण पडत होता. स्वतःचं दुखणं कुरवाळायला तिला वेळच नव्हता. तिने संकटांनी वेढलेले हे जीवन संपवून टाकण्याचा निर्णय घेतला.
अंगात ताप, डोळ्यात पाणी घेवून ती नवऱ्याचं ऑपरेशन नीट व्हावं म्हणून केलेला नवस फेडण्यासाठी निघाली होती खरी पण डोक्यात विचार वेगळेच सुरू होते. एका क्षणात स्वतःचं आयुष्य संपवून घ्यावं. मोकळं व्हावं या कष्टाच्या जगण्यातून. आपल्या माघारी काही का होईना... आपण सुटावं यातून. हेच विचार घोळत होते. नवरात्रीचे दिवस होते. ती देवीच्या मंदिरात गेली. देवीच्या पायावर डोकं टेकवलं. आता इथून बाहेर पडल्यावर घाटावर जावून जीवन संपवावं असंच तिच्या मनात होतं. मंदिरात दर्शन घेवून बाहेर पडल्यावर तापाने थरथरणाऱ्या शरीराला जरा थंडावा मिळवा म्हणून ती तिथल्याच डेरेदार झाडाखाली असलेल्या रांजणाच पाणी पीत विसावली. तिथे तिला एक भीक मागत असलेलं जोडपं दिसलं. बायको पंगू झाली म्हणून हताश नवरा तिच्या पंगूपणाचे भांडवल करून भीक मागत होता. आपसूकच तिचं लक्ष त्यांचं निरीक्षण करण्यात गुंतलं. येणारे जाणारे त्यांच्यापुढे ठेवलेल्या भांड्यात नाणी टाकत होते. ज्यांनी नाणी टाकली नाही त्यांच्या मागे हा माणूस जात होता आणि बायकोच्या दुखण्याचे रडगाणे गात होता. समोरच्याने कितीही शिव्या हासडल्या, हाकलून लावलं तरी तो मागे हटत नव्हता. उलट त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी स्वतःचे घाणीने भरलेले हात त्यांना लावत होता. पैसे मिळेपर्यंत पिच्छा पुरवत होता. त्याच्या त्या मळकट आवतारापासून सुटका करून घेण्यासाठी लोक नाईलाजाने का होईना पैसे देत होते. रंजना तिते होती तोपर्यंतच त्याने १०० एक रुपये कमावले. ते पाहून शरीराने पंगू असलेल्या त्याच्या बायकोपेक्षा मनाने पंगू असलेल्या त्या नवऱ्याची तिला कीव आली. त्याचवेळी शरीराने धडधाकट असूनही पैसे मिळवण्यासाठी बायकोच्या अधू असण्याचा तो वापर करत होता याची तिला चीडही आली.
देवीचा उत्सव सुरू असताना तिच्याच दारात एका स्त्रीच्या अधूपणाचे भांडवल करून भीक मागितली जात होती. स्त्री शक्तीचा उत्सव असून एक स्त्री शरीरानेच नाही तर विचारानेही पंगू होवून भीक मागत होती. पैसा तर हवाच असतो पण त्यासाठी स्वाभिमान सोडून देणं तिला मान्य नव्हतं. परिस्थितीशी लढण्याची ताकद हातात असताना... ते हात असे लोकांपुढे पसरणे तिला मान्य नव्हते. सृष्टीतल्या शक्तीने अनेकदा वेगवेगळी रूपे घेवून दुष्टांचा संहार केला. तसेच आपल्यालाही आपल्या स्त्री शक्तीचा विसर पडता कामा नये.
त्या भीक मागणाऱ्या जोडप्याला बघून तिने मनातले सगळे वाईट विचार झटकून टाकले. आपल्या जीवाचे काही बरे वाईट झाले तरी आपल्या कुटुंबाने कोणापुढेही भीक मागता कामा नये. मुलांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठीचे लागणारे सगळे शिक्षण, संस्कार द्यायचे. आपण आपल्या संकटांचा सामना करायचा. ताठ मानेने या परिस्थितीतून बाहेर पडायचे. जोपर्यंत हाताला काम मिळतं आहे तोपर्यंत काम करूनच घर चालवायचं. कष्टाचे जीवन जगावे लागले तरी चालेल पण लाचारीचे जीवन आपण आपल्या कुटुंबालाही कधीच जगू द्यायचे नाही. असा निश्चय करूनच ती तिथून उठली. तिच्या शरीरात एक वेगळीच ऊर्जा संचारली. तिने सगळ्यात आधी दवाखान्यात जाऊन स्वतःसाठी औषधं घेतली. घरी गेली. काही दिवसात बरं वाटलं तेव्हा तिने जास्तीची कामे धरली. तिची काम करण्याची इच्छा आणि घर पुन्हा उभं करण्यासाठीची चाललेली धडपड कामावर अनेकांच्या लक्षात आली. त्यांनी मदत देवू केली तेव्हा ती ठाम पणे बोलली ,"काम असेल तर सांगा पण दया म्हणून काही नको."
तिच्या या बोलण्याने प्रभावित होऊन एका ताईंनी तिच्या मोठ्या मुलीसाठी झेपेल आणि जमेल असं कोचिंग क्लासमधे आलेल्या पालकांना माहिती देण्याचं काम दिलं. एका ताईंनी तिच्या नवऱ्याला पेपर बॅग बनवण्याचं प्रशिक्षण दिलं. त्याला जमतील तेवढ्याच पेपर बॅग त्याने बनवायच्या. त्याच्यासाठी लागणारे साहित्य आणि त्यातून मिळणारा मोबदलाही त्याला घरपोच मिळण्याची सोय केली. तिची मुलं लहान होती पण तिच्याकडे पाहून तीही परिस्थितीशी लढायला शिकली. सगळ्यांनी कामालाच देव मानून त्याची अखंड आराधना केली. हळूहळू दिवस बदलले. मोठी मुलगी एका कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करू लागली तर लहानीने डी एड चा अभ्यासक्रम पूर्ण करून शिक्षिकेची नोकरी स्वीकारली. मुलगा ही शिक्षण घेता घेता मिळेल ते काम करायला लागला होता.
आज परिस्थिती बदलली तरी रंजनाचा तिच्या कामावर असलेला विश्वास कायम आहे. आजही तिला कोणी भीक मागितली तर ती न देता काम करायची तयारी असणाऱ्यांना ती काम मिळवून देते.