Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Anjali Elgire Dhaske

Others

2  

Anjali Elgire Dhaske

Others

एक नाते असेही

एक नाते असेही

5 mins
146


      शाळेचा पहिला दिवस असल्याने मी आनंदात होते. नवीन दप्तर, डबा, गणवेश ... या सगळ्यामुळे अगदी भारी वाटत होतं . आपल्या भावंडांप्रमाणे आता आपल्यालाही शाळेत जायला मिळणार, नवीन गोष्टी शिकायला मिळणार याचा खूप आनंद होता.


(वयाच्या पाचव्या वर्षी) मला प्राथमिक शाळा खापर्डे बगीचा, अमरावती इथे बालवाडीत प्रवेश मिळाला होता. (नशीब चांगल होतं म्हणून आता सारखं वयाच्या दुसऱ्या वर्षीच प्ले ग्रूपला प्रवेश घेणं तेव्हा तरी शक्य नव्हतं .) आज खास मला शाळेत सोडवायला वडील येणार होते. ते आलेही.... मला शाळेच्या फटकापर्यंत सोडलं . शाळेतील (कर्मचारी ) मावशीने वडीलांना घरी जायला सांगितलं..... वडीलांनी मला आवश्यक त्या सूचना देवुन "टाटा" ही केलं. त्या क्षणी..... आता आपण आईच्या मायेच्या पंखाखालून बाहेर पडतोय....आणि दुसऱ्या.... कडक शिस्त असलेल्या जगात प्रवेश करतोय, या भावनेन रडू कोसळलं. वडीलांचा पाय निघेना... माझं रडू अजून वाढलं . आता आमच्या वर्ग शिक्षिका (वारकरी बाई.... मँम, मिस, टीचर हे आत्ताच वळण तेव्हा मात्र मराठी माध्यम असलेल्या शाळेत वर्गशिक्षिकेला आदराने बाईच म्हणायचे .)बाहेर आल्या, मला हाताला धरून प्रेमाने वर्गाकडे नेलं . माझ्या वडीलांना घरी जाण्याची खूण केली. मी मोठ्या मोठ्याने रडायला लागले. वर्गात सगळीच मुल शांत होती. आपापल्या आसनावर बसलेली होती. माझं रडण बघून अनेकांचे चेहरेही रडवेले 😅झाले . मी वर्गातून वडील दिसत होते त्या जाळीकडे धाव घेतली. त्यांना खूप खूप आवाज दिले. बाई त्यांना जायला सांगतच होत्या. शेवटी मनावर दगड ठेवून ते घरी गेले. आता रडून काही फायदा नाही... वेळ झाल्याशिवाय काही घरी जायला मिळणार नाही ह्या जाणीवेतून मी गप्प झाले. इतर मुले रडू नये म्हणून आमच्या बाई छान बडबड गीते म्हणत होत्या... खेळ घेत होत्या... सगळ्यांशी प्रेमाने वागत होत्या... सगळ्यांना नावे विचारत होत्या... काय आवडतं ते जाणून घेत होत्या . धीट मुलांना वर्गापुढे बोलवून आवडीचे गीत किंवा गोष्ट सांगायला देत होत्या. मलाही बोलावण्याचा खूप प्रयत्न केला. मी काही जागचे हलले नाही. सगळ्यांनी अंगत पंगत करून.... "वदनी कवल घेता..." म्हणून डबेही संपवले. मी मात्र एकटीनेच कोपऱ्यात बसून डबा कसातरी संपवण्याचा प्रयत्न केला. आवडीचा मेनू असूनसुद्धा माझं खाण्यात अजिबात लक्ष नव्हतं . शाळा सुटली तसे मी वर्गा बाहेर धाव घेतली. वडील होतेच बाहेर..... ( एक-दोन दिवसात रूळेल शाळेत असं बाई पप्पांना सांगत होत्या ). उद्या शाळेत यायचच नाही असा निर्धार मी पक्का केला होता. लगेच घरी गेलो. आई ने खूप लाड केले. "रडायचं नाही, खूप मजा करायची, नवीन मैत्रिणी बनवायच्या , बाईंच सगळं ऐकायचं " असं समजावलं. माझी आई शिक्षिका होती परंतु आमचा संभाळ करण्यासाठी तिने नोकरी सोडली होती. तिची शिकवण्याची हौस ती आम्हाला शिकवून पूर्ण करायची.


त्यामुळेच की काय उरलेल्या दिवसभरात तिने हजार वेळा तरी.... " उद्या काय देवु डब्यात? ", "पप्पा उद्याही येणार आहे शाळेत ".... " रिक्षा लावल्यावर तर तूला अजून मजा एईल ".... "आता तुलाही लिहायला, वाचायला शिकवणार." अशी निरर्थक बडबड केली. ( उद्या शाळेत जावेच लागणार हेच ती माझ्या मनावर ठसवू पहात होती.) माझा विरोध आणि निर्धार दोन्ही निकालात काढून... पुन्हा दुसऱ्या दिवशीही मला शाळेत सोडण्यात आलं. माझ्यात सुधारणा अजिबात नव्हती. तिसरा दिवसही नको असतांना उगवलाचं. आता मात्र मी माझ्याच निर्धाराला कंटाळले. सगळ्या मुलांमध्ये जावून बसले. गाणी गायीली... खेळ खेळले... वर्गापुढे कविता आणि गोष्टही म्हणून दाखवली. बाईंनी खूप कौतुक केलं . ( शाळा आणि बाई एवढ्याही काही वाईट नसतात असं जाणवलं आणि हायस वाटलं ) दोन-तीन दिवसांनी...आता मुल वर्गात रमली असं बघून बाईंनी बाराखडी शिकवायला सुरुवात केली. मला आईने आधीच शिकवल्यामुळे बाराखडी लिहिण्यात अजिबात रस नव्हता . मला पुढचे शिकण्याची घाई होती.

अचानक डोक्यात शब्द बनवण्याची कल्पना आली. मी फळ्यावर लिहिलेल्या अक्षरांच निरीक्षण केलं. तुटपुंजे ज्ञान आणि बालबुद्धी.... माझं सारं विश्वच ज्या शब्दात होतं.... तोच शब्द सुचला.... " आई ".


   मी पाटीवर बाराखडीतली दोनच अक्षर लिहिली..... "आ ई ". स्वतःवरच खूष झाले. तेवढ्यात बाई आल्या.... थोड्या रागावल्या.... "दोनच काय गं अक्षर काढली? बाराखडी लिहावी. बाकी मुल बघ कसं शहाण्यासारखी लिहितात आहे." माझ्या डोळ्यात पाणी आलं.... मी म्हणाले " हे तुमच्यासाठी मी मुद्दाम लिहिलं आहे." त्यावर त्या म्हणाल्या.... "अग म..... 'ब 'ला काना ' बा' ... आणि ' ई ' .... "बाई" असं लिहायच. पुढे मी काना, मात्रा... अ.. ब... क... शिकवणार आहे. तेव्हा एईल लिहायला. घाई नको करू. बाराखडी लिही आधी." ( लहानपणापासून जिद्दी आहे मी😁.... माझा मुद्दा काही मी सोडला नाही.) मी म्हणाले..... " बाई तुम्ही मला माझ्या आईच वाटता, एक आई घरी काळजी घेते... एक शाळेत... असंच वाटतंय मला.... म्हणून.... हा शब्द तुमच्यासाठीच आहे..... " "आ ई ". " आता मात्र त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं..... त्यांनी माझा पापा घेतला पटकन.... "आपण वर्गात आहोत तेव्हा सगळ्यांसोबत बाराखडी लिहिली पाहिजे " अशी प्रेमळ समजही दिली. पापा मिळाला म्हंटल्यावर मीही पाटीवर बाराखडी गिरवली. इतर मुलं... मी असं काय लिहिलं की मला बाईंचा पापा मिळाला याचा विचार करत होती.... पाटीवर 'आ' आणि 'ई ' ही दोनच तर अक्षर होती. त्यांना आणि मलाही तेव्हा काही कळले नाही की विशेष काय घडलं होतं . कळल होतं ते फक्त आमच्या "बाईंना". चौथी पर्यंत त्याच वर्ग शिक्षिका होत्या. सुदैवाने तेव्हा तशीच पद्धत होती. एकच शिक्षिका सगळे विषय शिकवायच्या आणि एकदाका बालवाडीपासून सुरुवात केली तर चौथीपर्यंत त्याच वर्गशिक्षिका राहायच्या.


       मुळातच त्यांचा स्वभाव प्रेमळ.... मुलांना कधीच मारायच्या नाहीत.... समजत नाही तोपर्यंत समजावून सांगत.... कोणी गैरहजर असल्यास त्याला इतरांच्या बरोबर आणण्याचा प्रयत्न करत.... या आणि अशा अनेक गोष्टींमुळे त्यांच्या बाबतीत माझी असलेली " आई " ही संकल्पना सार्थ ठरली. बोर्डाची परीक्षा होती आणि माझ्या आजीने जगाचा निरोप घेतला. घरचे गावी जायला निघाले तेव्हा माझं वर्ष वाया जावू नये म्हणून बाईंनी मला त्यांच्या घरी ठेवून घेतलं . 

त्यांचे हे ऋण फेडण्यासाठी नाहीच मुळी. मी कायम त्यांच्या ऋणात राहू इच्छिते #धन्यवाद_शिक्षकांनो


त्यांनी अभ्यास तर करून घेतलाच पण परीक्षा ही द्यायला लावली. त्यांच्या घरचेही तितकेच चांगले. शाळा बदलल्यावरही रविवारी आमचा काही मुल-मुलींचा गट त्याच्या घरी जात होतो. नवीन शाळेतील अनुभव त्यांना सांगत होतो. भरपेट गप्पा आणि जेवण दोन्हीचा आस्वाद घेत होतो . आजही त्यांच्याशी फोनवर बोलतांना मन त्यांच्याबद्दल असलेल्या आदराने...... स्नेहाने भरून येतं. माझ्या आयुष्यातील त्यांच्या योगदानासाठी #ThankyouTeacher हे शब्द ही थिटे आहेत.

    

आज मात्र प्रत्येक विषय शिकवायला वेगळ्या शिक्षिका....दर वर्षी वर्गशिक्षिका ही वेगळ्या... एवढं कमी म्हणून की काय.... वर्गातली मुलंही दर वर्षी बदलतात. यामुळे म्हणे 😭मुल सगळ्या परिस्थितीत जुळवून घ्यायला शिकतात. वर्षभरात जेमतेम शिक्षिका आणि मुल एकमेकांना समजून घ्यायला शिकतात तेवढ्यात पुन्हा सगळं बदलतं.

   

वर्षानुवर्षाच्या मैत्रीतील जादू ...... घट्ट होत जाणारी गुरु शिष्य नात्याची वीण.....आपल्या पेक्षा जास्त आपल्याला, आपल्या क्षमतांना ओळखणारे शिक्षक..... शाळेच्या वेळे पुरतेच जिव्हाळ्याचे संबंध मर्यादित नसून शाळेबाहेर ही उपयोगी पडतील असे मार्गदर्शन करणारे शिक्षक..... स्वतःच्या वागणुकीतून आदर्श शिकवणारे शिक्षक..... विद्यार्थ्यांना स्वतःच्या मुलांप्रमाणे जपणारे शिक्षक..... विद्यार्थ्यांच्या मनात प्रेम, आपुलकी... आदर निर्माण करणारे शिक्षक.... आजच्या पिढीला हे सगळे अनुभव दुर्मिळ तर होणार नाहीत न ? अशी शंका मनात घर करून जाते.


Rate this content
Log in