मोगरा फुलला
मोगरा फुलला




सकाळचे पाऊणे नऊ वाजले आणि सोहम डायनिंग टेबलवर जेवायला बसला, जरावेळानं शिल्पानं त्याच्यासाठी डायनिंग टेबलवर जेवणाचं ताट लावलं. तो दोन चपात्या खायचा आणि दोन चपात्या डब्यात न्यायचा, ताटाला नमस्कार करुन त्यानं पहिला घास घेतला आणि तो तिच्यावर ओरडला, "बाप रे किती मीठ घातलंय भाजीत तू..."
“मीठ जास्त झालंय का..." ती हळू आवाजात बोलली.
“नाही तर मग काय मी खोटं बोलतो... हे घे, आणि तुच खा..." म्हणत तो भरल्या ताटाहून उठला.
ती गप्प होती.
“साधा स्वयंपाकसुद्धा तुला धड करता येत नाही, आम्ही तिथे रोज ऑफिसमध्ये राब राब राबायचं आणि घरी सुखानं दोन घाससुद्धा धड खायला मिळायचे नाही, वैताग आलाय मला या सगळ्याचा..."
तो बोलून गेला आणि तिच्या डोळ्यांत आसवं तरळली. आणि तो तसाच न जेवता ऑफिसमध्ये निघून गेला, जेवणाचा डबाही नेला नाही त्यानं.
पाणावलेल्या डोळ्यांनी ती जरावेळ तशीच बसून राहिली.
हल्ली छोट्या छोट्या गोष्टीवरुन तो तिच्यावर चिडायचा, तिला घालून पाडून बोलायचा, ती गप्प असायची, त्याचं मुकाट्यानं ऐकायची, उलट उत्तरं दयायची नाही, मनातल्या मनात कुढायची, आसवं गाळायची, एकांतात खूप रडायची.
सहा महिन्यांपूर्वीच दोघाचं लग्न झालं होतं.
सोहम मंत्रालयात कामाला होता, मामाच्या गावात लग्नासाठी मुली बघायला गेला, दोन-तीन मुली बघितल्या पण त्याला काही त्या मुली पसंत पडल्या नाहीत, तो परत निघताना शिल्पा त्याला विहीरीवर पाणी भरताना दिसली आणि तो तिच्याकडे तो बघतच राहिला. खूप सुंदर होती ती, गोरीपान उंच, सडपातळ, रेखीव चेहरा, बघता क्षणीच त्याला ती पसंत पडली होती. त्यानं लगेच त्याच्या मामाला तिच्याबद्दल विचारलं आणि ही स्वारी मामासहीत लगेच तिच्या घरी गेली आणि त्याचं लग्न शिल्पा सोबत पक्क झालं होतं.
शिल्पाला जरासुद्धा विचार करायला वेळ मिळाला नव्हता. शिल्पा SYB.com होती, आणि तिनं स्वप्नातही विचार केला नव्हता की इतक्यातच तिला तिच्या लग्नाला सामोरं जावं लागेल. तिच्या घरची परिस्थिती बेताचीत होती, मोठा भाऊ ग्रॅज्युएशन करुन बेकारीने रिकामा बसला होता, त्यानंतर शिल्पा आणि आणखी तिच्यापाठी दोन लहान बहिणी, एक बारावीला तर दुसरी दहावीला होती. शिल्पाचे वडील राईस मिलमध्ये कामाला होते, त्यांच्या तुटपुंज्या पगारात घर कसंतरी चालायचं, आई शिलाई काम करुन दोन पैसे जमवायची व हातभार लावायची, तर मोठा भाऊ नोकरी मिळविण्यासाठी धडपड करत होता.
आणि अशातच शिल्पासाठी आयतं स्थळ चालून आल्याने तिचे आई-बाबा सुखावले, काहीही झालं तरी हे स्थळ हातचं जाऊ द्यायचं नाही असं त्यांनी ठरवलं होतं. शिल्पाला आताच लग्न करायचं नव्हतं त्यामुळे ती चेहरा पाडून बसली होती, पण शेवटी तिच्या आईनं तिची समजूत घातली. आणि मनावर दगड ठेवून ती लग्नाला तयार झाली होती.
दोघांचं लग्न झालं आणि शिल्पानं लक्ष्मीच्या पावलानं सोहमच्या घराचा उंबरठा ओलांडला. मुंबईत वन बीएचकेच्या फ्लॅटमध्ये दोघांचा संसार सुरु झाला होता. शिल्पासारखी सुंदर पत्नी लाभल्याने सोहम अगदीच खुश होता. तर एकीकडे मनात नसताना लग्न झाल्याने ती अपसेट होती. घर सोडताना खूप भावूक झाली होती ती आईच्या व बहिणींच्या कुशीत शिरुन खूप रडली होती.
मधुचंद्राच्या रात्रीही ती घाबरलेली होती, मनानं तयार नव्हतीच, तिच्यासोबत हे सगळं काय होतेय हे तिलाही कळतं नव्हतं, खूप रडली होती ती एकांतात, मनात कुढत होती, मनातलं शल्य मनातच दाबून धरलं होतं तिनं, नेहमीच उदास आपल्याच धुंदीत असायची, देवाला दोष द्यायची, त्यानंतर ती माहेरी मांडवपरतणीला गेली तेव्हा आईच्या कुशीत शिरुन खूप रडली होती.
सोहम मात्र खुश होता, तिच्या आवडी निवडी जपण्यासाठी धडपडायचा, तिच्याशी प्रेमानं वागायचा, तिला हवं नको ते विचारायचा, तिच्यासाठी कामाहून येताना रोज मोगऱ्यांच्या फुलांचा गजरा आणायचा. ती मात्र तो तसाच ठेवून द्यायची, केसात माळायला विसरायची, मग सोहमला आठवण झाली की तोच तिच्या केसात माळून द्यायचा, सोहम तिला नेहमी खुश ठेवण्याचे प्रयत्न करत होता, तो तिला ॲडजेस्ट करायला वेळ देत होता, पण लग्नाला सहा महिने उलटूनदेखील परिस्थिती तीच होती, सोहम कधीचाच तिचा झाला होता, तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा पण शिल्पा मनानं त्याची झाली नव्हती. त्याच्यात मिसळली नव्हती.
आणि अलीकडे सोहमच्या लक्षात ही गोष्ट येत चालली होती, तो तिला याबाबत विचारायचाही पण ती वेळ मारुन न्यायची, रात्री काहीतरी बहाणे सांगून त्याच्यापासून वेगळं झोपायची, तो तिला जेव्हा प्रणयाबाबत विचारायचा तेव्हा ती काहीतरी बहाणे सांगायची. तिच्या वाढत चाललेल्या थंडपणाला तो आता वैतागत चालला होता. आणि यासाठीच थोड्या थोड्या गोष्टीसाठी तो तिच्यावर चिडायला लागला होता.
00000
ऑफिसमध्ये आला पण त्याचं लक्ष कशातच लागत नव्हतं, उगाच ओरडला ना तिच्यावर? इतकी काय भाजी खारट झाली होती? आणि झाली तरी, ओरडायला कशाला पाहिजे होतं, तो स्वत:च्या मनाची खरडपट्टी काढत होता, तो तिला बोलला तेव्हा तिचे डोळे पाणावले होते, ते बघितलं होतं त्यानं, त्याच्या मनात आलं होतं, तिला कुशीत घ्यावं आणि सॉरी म्हणावं पण तो तसाच निघाला होता. तिनं भरुन ठेवलेला जेवणाचा डबाही त्यानं सोबत घेतला नव्हता.
00000
असाच डोकं पकडून तो जागेवर बसला होता आणि त्याच्या कानावर शब्द पडले, "हाय..."
त्यानं समोर बघीतलं. त्याच्या ऑफिसमधील कलीग सोनल समोर उभी होती.
“हाय..." सोहम बोलला.
“लुकींग हॅण्डसम..." ती बोलली.
“रियली, थॅन्क्स्..."
“काय झालं, जरा अपसेट दिसतोस..."
“नाही तर..."
“चल आज तुझा मुड फ्रेश करुन देते, आज दुपारचं लंच मला तुझ्यासोबत करायचं आहे..."
सोहम जरावेळ गप्प झाला, त्याचा मुड आधीच ऑफ होता, त्यानं जेवणाचा डबाही आणला नव्हता, त्यामुळे तो सोनलला बोलला, "ठिक आहे, पण जेवण माझ्यातर्फे असणार..."
“आय डोन्ट माईंड..." ती हसत बोलली.
00000
सोहम ऑफिसला न जेवताच गेल्याने शिल्पा अपसेट होती, ती पण जेवली नाही इतक्यात तिचा मोबाईल वाजला, तिनं बघितलं फोन तिच्या कॉलेजमधील मित्र अक्षय याचा होता.
“हाय..." पलीकडून अक्षयचा आवाज आला.
“हाय..."
“कशी आहेस..."
“छान..."
“तू का गेलीस यार कॉलेज सोडून, आम्ही सगळे तुला खूप miss करतो..."
“माझं लग्न झालंय आता अक्षय, विसर आता सगळं..."
“मला माहित आहे तू आपल्या मनाला समजावत आहेस, लग्नात तुझा चेहरा बघितला होता मी, या लग्नाला तू मनापासून तयार नव्हती..."
“अक्षय.. लग्न झालंय आता माझं, या सर्व गोष्टी आता माझ्यासाठी निरर्थक आहेत..."
“नाही, मला नाही वाटतं तू तिथे खुश असणार, शिल्पा तुला माहित आहे मी तुझ्यावर किती प्रेम करत होतो..."
“नाही, अक्षय आता विसर सगळं, मला नाही ऐकायचं काही..."
शिल्पानं फोन कट केला, त्यानंतर अक्षयचे दोन-तीन कॉल आले पण तिनं ते रिसीव्ह केले नाही..."
आणि कॉलेजची मैत्रीण तन्वीला फोन केला, तिची कॉलेजमधील एकच जीवाभावाची मैत्रीण होती.
“हॅलो... तन्वी..."
“हाय... शिल्पा कशी आहेस.."
“ठिक नाही गं मी..."
“काय झालं..."
“आज परत ते रागावले माझ्यावर, न जेवताच गेले ऑफिसला..."
“का रागावले?"
“हल्ली त्यांना माझ्यावर रागवायला काही कारण हवं काय? बोलले की भाजीत मीठ जास्त आहे, तुला धड स्वयंपाक बनवता येत नाही..." ती रडवेल्या स्वरात बोलली, "इतका वाईट स्वयंपाक करते काय गं मी..."
“नाही गं, शिल्पा ते का तुझ्यावर चिडतात, का रागावतात याचा विचार केलाय का गं कधी तू..."
“म्हणजे?”
“तू लग्न झालं तेव्हापासून प्रत्येक गोष्ट मला सांगतेस, त्यावरुन तरी मला असं वाटतयं की तू मनानं अद्याप त्यांची झालीच नाही, कधी प्रेमानं त्यांच्याशी बोलतेस, स्वत:हुन त्यांची विचारपुस करतेस?, त्यांना हवं नको ते विचारतेस, कधी प्रेमानं त्यांच्यासोबत लाडात येतेस?, कधी तुम्हा दोघां नवरा-बायकोमध्ये प्रेमाचे संवाद होतात? नाही ना, अगं तू पत्नी आहे त्यांची आता, तुझ्याकडून त्यांच्या काही अपेक्षा असणार की नाही, आणि कां असू नये, प्रत्येक पुरुषांच्या त्यांच्या बायकांकडून काही ना काही अपेक्षा असतातच, का तू आजपर्यंत याबाबत विचार केलाय कधी?"
शिल्पाला काय बोलावं काही सुचत नव्हतं.
तन्वी पुढे बोलली, "मला एक सांग, सुरुवातीला त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून तुला कधी असं वाटलं की ते तुला दुखावतात, तुझ्या भावनांची पर्वाच नाही आहे त्यांना..."
“नाही आधी खूप छान वागायचे, माझ्याशी खूप बोलायचे, पण मला नाही त्यांच्यासारखं बोलता यायचं त्यामुळे मी गप्पच असायचे..."
“जेव्हा ते तुझ्या जवळ येतात, तेव्हा तुझी रिॲक्शन काय असते..."
“ते जवळ येतात ते मला नकोसं वाटतं..."
“का, नकोसं वाटत? शिल्पा, पत्नी म्हणून तुझी काही कर्तव्य आहेत, तुझ्या दोन महिने आधी माझं लग्न झालं, मी पण तुझ्यासारखी मनानं लग्नाला तयार नव्हते, पण हळूहळू झालं सगळं नीट, त्यांच्या साधेपणानं, आणि प्रेमानं कधी मला जिंकलं, आणि मी कधी त्यांची झाले मलाही कळलं नाही, जीवनाचा हाच मंत्र आहे शिल्पा, आपण प्रेम दिलं तरच आपण दुसऱ्याकडून प्रेमाची अपेक्षा करु शकतो, तुला प्रेम द्यायला जमत नाही तर मग का तू त्यांच्याकडून प्रेमाची अपेक्षा करते, प्रेमानं जगालाही जिंकता येते, आणि तुझ्यासारख्या स्कॉलर मुलीला आतापर्यंत तुझ्या नवऱ्याला प्रेमानं नाही जिंकता आलं? आश्चर्य आहे, शिल्पा प्रेम दे त्यांना, निरपेक्ष प्रेम.... ऐकतेय ना....”
“हो ऐकतेय बोल..."
“मला सांग किती दिवस झाले तुझ्या लग्नाला..."
“सहा महिने..."
“मग या सहा महिन्यात, स्वत:हून तू त्यांच्याजवळ गेलीय कधी? कधी प्रेमानं कुरवाळलं आहे त्यांना, तुझ्या नवऱ्याचं डोकं कधी कुशीत घेतलं आहे तू?"
“नाही, म्हणजे? तू पण असं करतेय कां गं?"
“हो करतेय मी, बालीशपणा सोड आता, लग्न झालंय तुझं..."
“मग मला कधी बोलली नाही याबाबत तू, तू ना अशीच करते, मला काही सांगतच नाही, कॉलेजमध्ये असताना पण असंच करायची..."
“शिल्पा प्रत्येक गोष्टी सांगायच्या नसतात, काही समजून घ्यायच्या पण असतात, तुझा राजकुमार तोच आहे आता, आणि आजपर्यंत तुझ्या स्वप्नातल्या राजकुमारासाठी जे प्रेम राखून ठेवलं आहे ना, त्या प्रेमाचा वापर कर आता, आणि आपलंसं करुन घे तुझ्या नवऱ्याला..."
“तू खरं बोलतेय तनू, खरं तर आजपर्यंत मी कधी मनापासून त्यांची झालीच नाही गं..."
“हो ना... मग आता लाग कामाला, आणि जिंकून घे तुझ्या नवऱ्याला प्रेमानं..."
“हो... आणि हो एक सांगायचं राहिलं तुला..."
“काय..."
“हा अक्षय ना, मला सारखा फोन करतो, बोलतो की तो खूप प्रेम करतोय माझ्यावर, मला नाही आवडत आता हे सगळं, मी त्याला सांगितलं लग्न झालंय माझं, मला फोन करु नको, तो नाही ऐकत..."
“ठिक आहे, माझ्याकडे नंबर आहे त्याचा, बघ त्याला कसा झापते आज, पुन्हा कधी तुला फोन करायच्या भानगडीत पडणारच नाही..."
“तू माझी बेस्ट फ्रेंड आहे, लव यु डार्लींग..."
“लव यु टू डिअर..."
“माझं होईल ना गं सगळं नीट?"
“शिल्पा, ते नीट करणं तुझ्याच हातात आहे, त्यांना तुझं प्रेम नाही मिळालं आणि ते कुठे दुसरीकडे कुण्या स्त्रीच्या नादाला लागले तर मग काय करशील?"
“नको ना अशी बोलू यार..."
“असं नाही होणार, काळजी करु नको, होईल सगळं नीट, ठेवू आता, टेक केअर..."
“हो... यु आल्सो..."
आणि शिल्पा हसली अगदी मनापासून, आज ती लग्नानंतर पहिल्यांदा इतकी दिलखुलास हसली होती.
00000
लंच टाईम झाला आणि सोहम आणि सोनल एका छानश्या हॉटेलमध्ये समोरसमोर बसले होते.
सोनल त्याच्याकडे हसत बोलली, "हल्ली बघतेय मी, खूप उदास असतो..."
“नाही तर..."
“तुझा मुड ठिक करता येतो मला, तुला माहित आहे, तू या ऑफिसमध्ये आलाय तेव्हापासूनच आवडतो मला, पण कधी बोलले नाही तुला..."
सोहम तिच्याकडे बघतच राहिला, ती पुढे बोलली, "सोहम असा उदास नको ना राहू, चल आपण पिक्चरला जावुयात..."
“आत्ता, ऑफिस टाईममध्ये..."
“त्यात काय झालं, चल तुझा मुडही फ्रेश होईल." ती त्याच्या हातावर हात ठेवत बोलली.
तो नाही म्हणू शकला नाही
00000
दोघे आयनॉक्समध्ये शिरले, आणि थिएटरच्या अंधुक प्रकाशात सोनलनं त्याचा हात हातात घेतला, त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले, तिनं आपलं डोकं सोहमच्या खांद्यावर ठेवलं आणि डोळे मिटून घेतले, सोनल त्याला प्रेमानं कुरवाळायाला लागली होती.
00000
सोहम ऑफीसमधून घरी आला, त्याचा मुड आता चांगला होता, दुपारी सोनलसोबत घालवलेले क्षण त्याला आठवायला लागले, त्याला जे प्रेम आतापर्यंत मिळालेलं नव्हतं ते त्याला सोनलकडून मिळायला लागलं होतं.
शिल्पाचा मुडसुद्धा आज चांगला होता, तन्वीसोबत बोलून तिचं मन हलकं झालं होतं, सोहम ऑफिसमधून आल्याबरोबर त्याला ग्लासमध्ये पाणी दिलं आणि त्याच्यासाठी चहा ठेवला, सोहम आज आपल्याच धूनमध्ये होता, त्यालाही जरा शिल्पाच्या वागण्याचं आश्चर्य वाटलं होतं.
आज ती त्याच्याशी अगदीच आपुलकीनं वागत होती. जेवणं आटोपली आणि सोहम बेडवर गेला, सगळं आवरुन शिल्पा, सोहमच्या जवळ आली तेव्हा रात्रीचे अकरा वाजले होते, ती त्याच्या शेजारी बेडवर झोपली, आज तिनं विचार केला होती ती स्वत:च त्याच्याजवळ जाईल, तिनं बघितलं सोहम डोळे मिटून पडला होता, कदाचित तो झोपला होता.
इतक्यात त्याच्या जवळ असलेल्या मोबाईलवर मॅसेजची ट्युन वाजली, तो उठला नाही, शिल्पानं मोबाईल हातात घेतला आणि बघितलं व्हॉटस्ॲपवर कुठल्या तरी सोनलचा एक मॅसेज होता, लिहिलं होतं, "आय लव यु सोहम..."
मॅसेज वाचून तिला धक्काच बसला. तिच्या डोक्यात विचारांचं वादळ उठलं, कोण आहे ही सोनल, आणि सोहम तिच्या प्रेमात आहे. तिच्या डोळ्यात आसवं उभी राहिली, तिनं सोहमकडे एकदा बघितलं तो शांत झोपला होता, तिला अश्रू आवरले नाही व ती उशीला कवटाळून रडू लागली.
जरावेळानं ती उठली किचनमध्ये गेली, सोहम ऑफिसमधून येताना रोज गजरा आणायचा आणि तो फ्रिजवर ठेवायचा आज तिला गजरा तिथं दिसला नाही, तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं, सोहम रोज आणत असलेल्या गजऱ्याचं महत्त्व आज तिला कळलं होतं.
जड पावलांनी ती बेडरुममध्ये आली, तिनं एक नजर परत सोहमवर टाकली आणि परत तिच्या डोळ्यात आसवं तरळली, अश्रुपूर्ण नेत्रांनी ती त्याच्या बाजुला झोपली पण आज तिच्या डोळ्यात झोप कुठे होती.
00000
रात्री शिल्पाची झोप झाली नव्हती तरीही ती सकाळी वेळेवर उठली व सोहमसाठी जेवण तयार केलं, त्याला वेळेवर जेवण दिलं, आणि त्याचा डबाही भरुन दिला. हल्ली तो तिच्याशी जास्त बोलायचा नाही, फक्त कामापुरतं बोलायचा, सोहम जेवला, आणि रोजच्याप्रमाणे डबा घेवून ऑफिसला गेला.
शिल्पा तो ऑफिसला जायचीच वाट बघत होती, आणि तिनं लगेच तन्वीला फोन लावला. तन्वीनं फोन उचलातच ती रडायला लागली.
“अगं अशी रडतेस काय? काय झालं ते सांग तरी..." तन्वी बोलली.
“तनू तू खूप वाईट आहेस..."
“मी काय केलं आता..."
“तू जे काल बोलली तसंच झालं..." शिल्पाचा रडवेला स्वर.
“काय झालं?"
“तू बोलली ना की ते कुठल्या स्त्रीच्या नादाला लागतील..."
“मग?"
“काल रात्री मी त्यांच्या मोबाईलवर मॅसेज बघितला, कुठल्या तरी सोनलचा मॅसेज होता, त्यात लिहिलं होतं, आय लव यु सोहम..."
“काय? तरी मी तुला सांगत होते, कोण आहे ही सटवी सोनल..."
“मला काय माहित?"
“बापरे, मला वाटलं नाही गं तुझा नवरा असं काही करेल..."
“आता काय करायचं, मला रात्रभर झोपही आली नाही..." ती रडवेल्या स्वरात बोलली.
“आता रडू नको काकूबाईसारखी, कॉलेजमध्ये असताना तर खूप डेरींग होतं तुझ्यामध्ये आता कुठं गेलंय ते डेरींग..."
“मला काही सूचत नाही काय करायचं ते... आणि तनू ते रोज माझ्यासाठी गजरा आणायचे, काल माझ्यासाठी गजराही आणला नाही गं..."
“बापरे खूप सिरीयस मॅटर दिसतो, नवरा असा दुसऱ्या बाईच्या नादाला लागला ना, तर असाच घरी चिडचीड करतो, बायकोला जरा जरा गोष्टीवरुन रागावतो, तिला टाकून बोलतो..."
“तू खरं बोलतेय, ते हल्ली माझ्याशी तसेच वागतात..."
“ही सोनल तुझ्या नवऱ्याच्या ऑफिसमधील असेल कदाचित..."
“असू शकते, आता काय करायचं गं..."
“रात्री तुझ्या नवऱ्याला विचार तिच्याबाबत, आणि अशी काकूबाईसारखी विचारु नको, जरा डेरींगनं विचार, बघ काय म्हणतो ते..."
“आणि त्यांनी मलाच उलट विचारलं की, तुला काय करायचं आहे तर मग?"
“नाही विचारणार, तुझा नवरा तसा नाही, तो सांगेल काहीतरी, तो काय बोलतो ते मला सांग, आणि हो रात्री नवरा झोपल्यावर त्याच्या फोनवरुन चॅट कर तिच्याशी..."
“काय चॅटींग करु..."
“आत हेसुद्धा मलाच सांगायला पाहिजे? असं काहीतरी चॅटींग कर की, परत ती तुझ्या नवऱ्याच्या नादालाच लागायला नको..."
“होईल ना गं सगळं ठिक, मला तर जाम टेंशन आलंय..."
“हे तू स्वत: ओढवून घेतलंय..."
“हो माहित आहे मला, चल ठेवते आता..."
00000
सोहम ऑफिसला आपल्या केबिनमध्ये बसला होता, आणि त्याचा ऑफिसमधीला कलीग सुजय तिथे आला. सुजयला बघताच सोहम हसला व बोलला, "आज बरं सकाळी सकाळी दर्शन दिलंस..."
“मॅटर सीरियस आहे म्हणून आलो..."
“काय झालं..."
“तेच तर मी तुला विचारायला आलो, असं काय झालं?"
“कुठे काय?"
“काल दुपारी कुठे गेला होतास, दुपारी लंच टाईममध्ये जेवायलाही नव्हता..."
“मुड ठिक नव्हता बाहेर गेलो होतो..."
“सोनलसोबत गेला होतास ना..."
सोहम जरा वेळ गप्प झाला व बोलला, "तुला कसं कळलं..."
“मलाच नाही ऑफिसमध्ये सगळ्यांना कळलंय..."
“काय..."
“हेच की काल तू सोनलसोबत बाहेर जेवायला गेला आणि नंतर सिनेमाला..."
“काय? सगळ्यांना कसं कळलं?"
“सोहम मांजर जेव्हा डोळे मिटून दूध पिते ना, तिला वाटतं तिला कुणीच बघत नाही..."
सोहम गप्प.
“का गेला होतास तिच्यासोबत बाहेर..."
“कां.. म्हणजे? तीच मला बोलली..."
“ते मला माहित आहे, तिला जेवायला न्यायची, पिक्चरला न्यायची कल्पना तुझ्या डोक्यातली नाही, सोहम इथे ऑफिसमध्ये तुझ्या आणि तिच्या नावाची बोंबाबोंब झालीय काल नुसती..."
“होऊ दे मला नाही फरक पडत..."
“मला फरक पडतो, तुला माहित आहे ती कशी आहे, आधी तुलाच नव्हती आवडत ती, अरे सतरा जणांसोबत फिरली आहे ती, तिला काय नुसतं पैसा आणि स्वत:ची हौस पुरवून घ्यायला याच्या त्याच्यासोबत फिरायची हौस आहे, पण मला हे नकोय की माझ्या मित्राचं नाव अशा स्त्री सोबत जोडल्या जावं, त्यामुळे आजपासून हे सगळं बंद, तू आजपासून तिच्यासोबत कुठेही जाणार नाही..."
“माहित आहे मला, तुला माझी काळजी आहे, पण हल्ली मी काय करु आणि काय नको असं झालंय..."
“वहिनींसोबत बिनसलं आहे का काही? मी बोलू वहिनीशी..."
“नको, त्याची गरज नाही..."
इतक्यात सोहमच्या केबिनचा दरवाजा उघडला आणि सोनल आत आली, तिला बघताच सुजय बोलला, "आम्ही आता कामात आहोत नंतर ये..."
तिनं एक नजर सोहमकडे बघितलं आणि तोंडात काहीतरी बडबडत बाहेर पडली.
ती गेल्यावर सुजय बोलला, "आज दिवसभर तिला इकडे फिरकूही देऊ नकोस, ती तुझ्यावर नाही, तुझ्या पैशावर प्रेम करते, पैसा खतम, प्रेम खतम..."
“बरोबर आहे तुझं चुकलंच माझं, पण सुजय एक प्रॉब्लेम झालाय रे..."
“काय? रात्री माझ्या फोनवर या बयेनं आय लव यु सोहम असा मॅसेज टाकला, आणि तो मॅसेज अनरिड नव्हता..."
“म्हणजे..."
“तेच... तो मॅसेज आला तेव्हा मी झोपलो होतो, शिल्पानं तो मॅसेज बघितला असणार..."
“बापरे.. मग आता, वहिनी काही बोलल्या तुला याबाबत?"
“अद्याप नाही, पण ती विचारेल हे नक्की..."
“हे बघ विचारलं तरी घाबरु नकोस, सांग सगळं व्यवस्थित, गोड बोलून समजाव तिला, तिच्यासाठी छान गजरा वगैरे घेऊन जा..."
“हो ना.. काल या बयेच्या नादात तिला गजराही नेला नाही रे..."
“डोन्ट वरी, मी आहे, काही मदत लागली तर सांग, मी वहिनींना पण सांगेल, तुझ्यात आणि सोनलमध्ये काही नाही ते..."
“पण आता तू गेल्यावर ती परत केबिनमध्ये आली तर मग काय करु..."
“नाही येणार, मी बाहेर गेल्यावर बॉसला सांगून तिला अशा कामात अडकवतो की ती ऑफिस सुटेपर्यंत फ्री होणारच नाही..."
00000
ऑफिस सुटलं आणि सोहम सरळ घरी आला.
रस्त्यात त्याचा मोबाईल फोन सारखा वाजत होता, सोनल त्याला फोन करत होती, अकरा मिस काल होते. पण सोहमनं फोन उचचला नाही.
तो घरी आला, शिल्पा नाराजच होती, सोहमनं गजरा फ्रिजवर ठेवला. त्यानं आंघोळ केली, त्यानंतर दोघेही जेवले, शिल्पासोबत काय बोलावं त्याला काही कळत नव्हतं, आज पहिल्यांदा तो शिल्पासोबत मनमोकळेपणानं बोलायला घाबरत होता. सोनलचे फोन येतील म्हणून त्यानं फोन ऑफ करुन ठेवला होता.
दोघेही मुकाट्यानं जेवले.
रात्री सगळं आटोपून शिल्पा बेडजवळ आली, त्यानं नुकताच फोन ऑन केला होता, त्यावर सोनलचे सतरा मिस कॉल होते.
शिल्पा तिथेच त्याच्या बाजूला बेडवर बसली व रडायला लागली, तिला रडताना बघून तो बोलला, "काय झालं?"
“ही सोनल कोण आहे..." ती रडवेल्या स्वरात बोलली.
“तू मॅसेज बघितला काल रात्री,? बॅड मॅनर्स, ती मैत्रीण आहे माझी..."
“मैत्रीण असली म्हणून काय आय लव यु म्हणायचं? ते ही दुसऱ्याच्या नवऱ्याला..."
“चुकून, मॅसेज केला असेल..."
“असा मॅसेज कुणी चुकून करतं का..."
“मग तुला काय म्हणायचं आहे, माझं लफडं आहे तिच्यासोबत?"
“मला माहित आहे, मी तुम्हाला प्रेम देत नाही म्हणून तुम्ही तिच्या नादाला लागलेत ना..."
“तसं काही नाही..."
“तसं काही नाही तर, मग जरा जरा गोष्टींवरुन माझ्यावर का चिडता, का रागावता..."
“रागावलो म्हणून काय, माझं लफडं आहे तिच्याशी?"
“नाही तर मग ती आय लव यु कशाला बोलेल तुम्हाला..."
“ती मला आय लव यु बोलली, मी तर नाही बोललो ना तिला?"
“ती तुम्हाला बोलली काय आणि तुम्ही तिला बोलले काय, सारखंच झालं ना..."
“कसं सारखंच झालं? आजपर्यंत मी तुला कितीवेळा आय लव यु बोललो, तू बोलली आहेस का एकदा तरी..."
ती गप्प झाली, तिच्या डोळ्यात आसवं दाटली.
“नाही म्हटलं म्हणून काय झालं, याचा अर्थ असा होत नाही की माझं तुमच्यावर प्रेम नाही..." ती रडवेल्या स्वरात बोलली.
“आहे का खरंच?" सोहम तिच्याकडे बघत बोलला.
“सांगा मला कोण आहे ही सोनल..."
“ऑफिसची कलीग आहे..."
“तुमचं खरंच काही आहे का तिच्यासोबत,? आणि खरं सांगा..."
“खरं सांगू, ऐक, काल माझा मुड आधीच बिघडला होता, ऑफिसमध्ये जागेवर बसलो होतो, आणि अचानक ती आली व बोलली माझ्यासोबत दुपारचं जेवणं घ्यायचं आहे, मग दुपारचं जेवण घेतलं तिच्यासोबत, मग की ती बोलली की पिक्चरला जाऊ या..."
“मग?"
“मग काय, गेलो तिच्यासोबत पिक्चरला..."
“हो.. ना वाटलंच मला, तुम्ही दिसता तितके साधे नाहीतच..."
“आता ऐकणार आहेस का..."
“बोला..."
“मग तिनं सिनेमा हॉलमध्ये माझा हात हातात घेतला, आणि माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं..."
“नालायक, हलकट मेली... लाज पण वाटली नाही तिला काही, पुढे?"
“पुढे काही नाही....”
“इतकंच? एवढ्यातच ती तुम्हाला आय लव यु बोलली..."
“आता मला काय माहित, मी आवडलो असेल तिला..."
“आहाहा.. म्हणे आवडलो असेल तिला, तुम्ही ना सगळे पुरुष असेच असतात, याच्यानंतर तिचा असला काही मॅसेज आला ना ऑफिसमध्ये येऊन तिच्या चांगल्या झिंज्याच उपटते..."
सोहम गप्पच.
“अहो बोला काहीतरी..."
तो काहीतरी बोलणार इतक्यात त्याचा फोन वाजला, सोहमनं बघितलं सोनलाचा कॉल होता, तो शिल्पाकडे बघायला लागला आणि फोन तिच्या हातात दिला.
शिल्पा फोन घेऊन बाल्कनीजवळ गेली व फोन ऑन केला.
“हॅलो... सोहम कुठे आहेस तू किती फोन करायचे तुला..." पलीकडनं सोनल बोलली.
“काय गं ये टवळे, पुन्हा जर माझ्या नवऱ्याला फोन केला ना तर मग बघ, नाही तुला ऑफिसात येऊन चांगली बदडली आणि तुझे केस उपटून तुझ्या हातात नाही दिले तर नावाची शिल्पा नाही..." शिल्पा तिला खडसावत बोलली.
पलीकडून काहीच आवाज आला नाही. ऐकून सोनलने फोन ठेवून दिला होता कदाचित.
शिल्पा बेडजवळ आली व फोन त्याच्या जवळ देत बडबडली, "निर्लज्ज मेली, आता बघतेच पुन्हा कशी फोन करते ते..."
“सॉरी..." सोहम खाली मान घालत बोलला.
ती बेडवर बसली व बोलली, "तुम्ही का सॉरी म्हणताय, सॉरी तर मला म्हणायला पाहिजे, हे सगळं माझ्यामुळे झालंय ना..."
“त्यात काही चूक माझीही असेल, टाळी एका हाताने थोडीच वाजते, मीच तुला समजून घेऊ शकलो नसेल कदाचित, मला माहित नव्हतं तू इतकी छान बोलते, इतकी छान रागावतेस, आज पहिल्यांदाच तुझं असं रुप बघितलं..."
“सॉरी, मी रागावले तुमच्यावर..."
“तू रागाव माझ्यावर मला छान वाटतं, आजपर्यंत असं हक्कानं का नाही रागावली माझ्यावर?"
“पुन्हा नाही करणार ना असलं काही..."
“तू अशीच रागावशील तर करेल ही..." तो हसत बोलला.
“मारेल आता तुम्हाला..." ती रडवेल्या स्वरात बोलली.
“तुला मारताही येतं... चला आज एक गोष्ट तर पक्की झालीय..."
“काय..."
“तुझं प्रेम आहे माझ्यावर, पण तू ते मला कधी जाणवू दिलं नाही..."
“सॉरी.. आजपर्यंत नाही समजू शकले मी तुम्हाला..."
“पण मला कधीच समजलं आहे..."
“काय?"
“जेव्हा तुला पहिल्यांदा बघितलं ना तेव्हाच मनात म्हटलं, सोहम हीच आहे तुझ्या स्वप्नातली राणी, खूप प्रेम करेल तुझ्यावर, खूप प्रेम देईल तुला..."
शिल्पाच्या डोळ्यात आसवं तरळली आणि तिनं त्याला मिठी मारली आणि त्याचं डोक उराशी घेवून प्रेमानं कुरवाळू लागली, तन्वीनं तिला सांगितलं होतं अगदी तसं, आणि बोलली, "आय लव यु सोहम..."
00000
सोहम ऑफिसला गेला आणि जरावेळातच तन्वीचा फोन आला.
शिल्पानं हसतच मोबाईल हातात घेतला व कॉल रिसीव्ह केला, "हाय डार्लींग.." शिल्पा बोलली.
“ओे... हो.. डार्लींग काय?, भलतीच खुश आहेस आज..."
“तनू, matter sort out...”
“काय सांगतेस, बडी जीनीयस हो यार..."
“तू सांगितलं ना, अगदी तसंच केलं..."
“तू सांगितल्याप्रमाणे त्याचं डोकं कुशीत घेतलं.. आणि...”
“ओ.. हो..“
“खूप मज्जा आली माहित आहे काल, काल पहिल्यांदा मला नवरा-बायकोच्या प्रेमाचा खरा अर्थ कळला, आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय तनु, लव यु डार्लींग..."
“क्या बात है, आणि ती सोनल?"
“तिचा फोन आला होता काल, यांच्या फोनवर, मग काय झापली तिला चांगली, तिनं फोनच कट केला..."
“मीसुद्धा त्या अक्षयला चांगलाच झापलाय, त्याचा परत फोन तर नाही ना आला तुला?"
“खरंच गं, कालपासून त्याचा फोनच नाही आला मला, थॅन्कस् तनु..."
“थॅन्क्स कसले यार, कॉजेलमध्ये असताना तू मला किती मदत करायची, आणि मी थॅन्क्स बोलले तर मला मारायला धावायची, अशीच आनंदी राहा... miss you यार..."
“मी पण तुला खूप miss करते गं..."
“Take care of your husband, bye dear...”
“बाय..."
तन्वीशी बोलून तिनं मोबाईल फ्रिजवर ठेवला, आणि तिचं लक्ष फ्रिजवर ठेवलेल्या मोगऱ्याच्या गजऱ्याकडे गेलं, हिरव्या पानांमध्ये बांधलेला तो गजरा तिनं अलगद उघडला, तो तसाच टवटवीत होता, तिनं आरशात बघत तो गजरा आपल्या केसांत माळला, आणि तिच्या चेहऱ्यावर कमालीचं हास्य पसरलं....
आणि तिचं हसणं बघून तिच्या केसातला गजरा आणखीच फुलला होता.
00000
समाप्त