STORYMIRROR

Anuraag Pune

Horror Thriller

3  

Anuraag Pune

Horror Thriller

मल्हार...

मल्हार...

79 mins
286

हॉस्पिटल अतिशय शांत-शांत होते. लोकांचा वावर कमी झाला होता. काही यंत्रांचा आवाज तेवढा घुमत होता. शांतता चिरत एखादा रुग्ण वेदनेने विव्हळत असे. कुठे राउंड साठी आलेला एखादा डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय फिरत होते. बाकी सगळंच अगदी शांत-शांत होतं. 

एका उघड्या खिडकीबाहेर मल्हार आभाळाकडे दृष्ट लावून उभा होता. सुहासच्या आजच्या स्थितीला त्याचा हट्ट कारणीभूत असल्याची जाणीव त्याला झाली होती. साधारण तीन वर्षभरापूर्वी थाटा-माटात त्यांचं झालेलं लग्न. प्रेमविवाह यशस्वी झाल्याचा आनंद, एक परदेशवारी, नवीन संसार, अशी दोघांनी पाहिलेली खंडीभर स्वप्न डोळ्यांत साठवून बसलेली सुहास आज दवाखान्यात खाटेवर जन्म आणि मृत्यू यात अधांतरी झाली होती. गेली चार वर्ष तिच्या आवाजाने जाग यायची वाट पहाणारा , आज ती झोपेतून उठायची वाट बघतोय. 

त्याला रोज तिच्या आणि त्याच्या भेटी आठवत ! तो लेखक म्हणून करत असलेली धडपड तिनेच जवळून पहिली होती, अनुभवली होती. दहा-दहा च्या खोलीतून एक यशस्वी लेखक होण्यामागे सुहासचा खूप मोठा त्याग होता. त्याने लेखकाच्या भूमिकेतून बाहेर येण्याची दिवसें-न-दिवस ती वाट पहात बसायची. अनेक वर्ष तिने असेच घालवले होते. आपली पात्र, कथा यात सुहासला आपण मागेच कुठेतरी सोडून आल्याची सल मल्हारच्या मनात आज तयार होत होती. तिच्याकडून तिने साथ द्यावी अशी अपेक्षा त्याने वेळोवेळी ठेवली. पण तिच्या सोबत रहाताना, तिच्या सोबत कधी वावरला कधीच नाही ! 

मागून कोणीतरी खांद्यावर हात ठेवला, तसा तो दचकून भानावर आला. तो डॉ.जोसेफ होता. 

" झोप जाऊन...! सगळं व्यवस्थित होईल." जोसेफ त्याचा वर्गमित्र होता. लहानपण एकत्र घालवलं होतं दोघांनी. एकाच चाळीत सुरु झालेला त्यांच्या मैत्रीचा प्रवास आजही अविरत सुरु होता. कदाचित आज फक्त जोसेफ होता, ज्याला कळत होतं, की नेमकं काय घडतंय ! 

" जोस, काही लपवत तर नाहीयेस ना?" मल्हारचाही त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. 

" नाही रे...! विश्वास ठेव जरातरी." तो नुकताच सुहासला तपासून आला होता.

"ती...आहे ना..?" काळीज मधोमध कापून नेणारा हा मल्हारचा प्रश्न सहाजिक होता. 

" हम्म, आहे. श्वास सुरु आहेत, तो पर्यंत तिचा आणि माझा, मृत्यूशी लढा सुरु राहील. And u know, she is stronger than you are !" 

" हो, धाडसी आहे ती. किती काय सहन करून गेलीये माझ्यासाठी ! गेली कित्येक वर्ष, सत्यत्याने. कोणतीही तक्रार न करता..!" 

" मल्हार...ती फक्त आजारी आहे. आणि इलाज सुरु आहे तिचा..! तुला कळतंय का ? शरीराची एक क्षमता असते. मनाचंही तसंच असतं. सहन करण्याची शक्ती क्षीण झाली, की एखादी क्रिया अस्थिर होते." जोसेफ त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होता. 

" तुला अजूनही वाटतं, की हा आजार आहे ?" 

" हो, कारण माझ्याकडे पुरावे आहेत...! तुझ्याकडे आहे का असं काही, सिद्ध करायला, की हा आजार नाहीये !" जोसेफ त्याला पाठ दाखवून निघून गेला. मल्हार सुहासच्या खोलीबाहेर उभा राहिला. पलंगावर निपचित पडलेली सुहास , मनातून खंगली होती. गेले अनेक दिवस तिच्यासोबत घडलेल्या गोष्टींमुळे तिने स्वतःच्या नाशीबाशी तह करून टाकला होता. फक्त तिला येणारा मृत्यू त्रासदायक नसावा. कारण तिचा काहीच दोष नव्हता.

' माझ्यासाठी तू मृत्यूच्या दारात उभी राहिलीस न, सुहास?' मल्हार तिच्याकडे पाहून स्वतःशीच बोलू लागला. ' तुझा काहीही दोष नसताना तुला हे सगळं सोसावं का लागतंय, याचं उत्तर नाहीये गं माझ्याकडे...!' मल्हारच्या डोळ्यात पाणी तरळलं. ' क्षमा मागण्यापूर्ती तरी डोळे उघड !' पण सुहास हलली नाहीच. दार उघडून तो आत आला. शेजारच्या monitor वर तिची स्पंदने सुरु असल्याची जाणीव होत होती. त्याने तिच्या हाताला स्पर्श केला. तिच्या बंद डोळ्यांत नेमकं काय साठलं आहे, काहीच दिसत नव्हतं. एव्हाना तिच्या बोलक्या डोळ्यावर हजारो शब्द तो ओवाळून टाकत असे. हातात असणाऱ्या तिच्या हातातून नाडी लागत होती. जगण्याच्या बऱ्याच खुणा तिच्यात होत्या. पण आयुष्याची एकही खूण दिसत नव्हती. 

अडीच वर्षापूर्वी तिने त्याच्या सोनारीच्या त्या टुमदार फार्महाऊस वर पहिले पाऊल टाकले. शहराच्या गर्दी गोंधळापासून फारच लांब असलेलं हे टुमदार कौलारू घर सुहासला खूप आवडलं. एक-एक वस्तू तिच्या डोळ्यातली चमक वाढवत होती. ती छोटी चूल, पाणी तापवण्यासाठी असलेला बंब, पावसाळ्यात कौलांवर गर्दी करून एकाच धारेत शिस्तीत खाली निथळणारं पाणी ! 

" तुला सांगू, हे सगळं फक्त मी स्वप्नात पाहिलं होतं. तू भेटला नसतास, तर हे सगळं स्वप्नात विरून गेलं असतं. " डोळ्यात एक-एक-एक गोष्ट साठवत ती मल्हारशी बोलत होती. 

" आमचं काम आहे ते, लोकांची स्वप्न पानांवर मांडणे..!" मल्हारचा आतला लेखक बोलला. 

" किती शांतता आहे रे इथे...! कोणाच्याही अंगातील सुप्त गुण इथे क्षणात बाहेर येतील. चित्रकार, लेखक, कवी...सगळेच बाहेर येतील." 

" वर्षातून ३ महिने मी इथे येऊन लिहितो, ते काय वेडा म्हणून का ?" या वाक्यावर सुहास एकदम शांत झाली. ते तीन महिने तो तिच्यापासून लांब रहाणार होता. तिथे ठेवलेला जुना फोन हे एकंच माध्यम होतं.

" फक्त तीन महिने, ९० दिवस...!" 

" मी आलेली चालणार...!" 

"सुहास..." तिला मध्येच तोडत तो म्हणाला. " ही जागा आपल्या घरापासून फक्त शंभर मैल आहे. " 

" मल्हार, आपण लग्न केलं, ते काय अंतर असावं म्हणून का ?" तिच्या या प्रश्नाचं काहीच उत्तर त्याच्याकडे नव्हतं. त्याच्या नवीन कादंबरीची सुरवात त्याला करणं भाग होतं. वर्षाकाठी दोन कादंबऱ्या ठरलेल्या होत्या. आणि त्या तो पूर्ण करत होता. 

'मृत्यूच्या दाढेत तुला एकटं सोडून मी माझा हट्ट पूर्ण करत बसलो सुहास. कधी कळलंच नाही , की याने तुला नकळत वेदना होतायत ते !' 

" तुझ्या कथेच्या पात्रात मला पण एखादी जागा दे ना मल्हार...!" एक दिवशी सकाळी चहा घेताना सहज ती त्याला म्हणाली. 

" तू प्रेरणा आहेस न सुहास ,या सगळ्याची...!" 

" मला वाटतं रे, तू तुझ्या पात्रांच्या इतक्या जवळ आहेस ना...! भीती वाटते, कल्पकतेचा आहारी जाऊन , वास्तवाशी असलेली तुझी विसंगती वाढते आहे." सुहास ला माहिती होतं, की मल्हार ची पात्रं त्याच्या जगण्याचा एक भाग आहेत. पण वास्तवात त्याच्या आजूबाजूला असणारी माणसांची संख्या खूप कमी आहे. 

" एक-एक पात्र मनासारखं जिवंत करायला खूप काही करावं लागतं सुहास." यावर सुहास काही बोलली नाही. 

अचानक रूमचा दरवाजा कोणीतरी उघडला. निशा आली होती. 

" तू...अशी अचानक..?" 

 " तुला काय वाटलं, तुझ्या आयुष्यात वादळं येतील, आणि तुझ्या जवळच्या मित्रांना कळणारही नाही?" 

निशा त्याच्या प्रकाशकाच्या ऑफिस मध्ये होती. त्याने तिला बसायला स्वतःची खुर्ची दिली. 

" काय करून बसलास मल्हार...!" सुहासचा कपाळावर हात ठेवून ती म्हणाली. 

" हो...दोष माझाच आहे, आणि शिक्षा ही भोगते आहे." 

बराच वेळ कुणीही काही बोललं नाही. सुहासला पलंगावर निपचित पडलेलं पाहून निशाच्याही मनाची लाही-लाही झाली होती. 

" काही कारण सांगितलं का डॉक्टर्स नी ?" न राहून शेवटी निशा बोलली. 

" अजून तरी नाही. फक्त मेंदू आणि शरीराचा जेमतेम संपर्क आहे." 

टेबलावर चेक ठेऊन निशा जाऊ लागली. एक भरलेला डबा तिने मल्हारच्या हाती दिला. 

" जेवून घे..! आणि घाबरू नकोस..!" ती दारापाशी पोहोचली. 

" निशा...तुलाही वाटतं, याला मी जवाबदार आहे म्हणून?" 

ती मागे वळली. मल्हारचा उदास चेहरा तिला सहन झाला नाही. 

" मल्हार, जे काही घडलं ,ते तुझं आणि तिचं नशीब असू शकतं रे ! तू स्वतःला दोष देण्यात काहीच अर्थ नाहीये. वाट बघ, सगळं व्यवस्थित होईल. सुहास खूप धाडसी आहे. अंतर्मनातून ती या सगळ्याशी ती लढत असेलच."

दोघे बाहेर पडले. बाहेर येताना मल्हारनी दार लावून घेतलं. मधले दिवे थरथरू लागले. त्या अंधाराच्या थरथरत्या खेळात एक सावली समोरच्या भिंतीवर नाचू लागली. सावलीच ती ! तिची सावली निपचित पडलेल्या सुहासवर पडली.पिंजारलेले केस, अक्राळ-विक्राळ हावभाव. कदाचित सुहासचे उरलेले प्राण जायची आतुरतेने वाट बघत असावी. सुहासला इथपर्यंत आणण्याचं कामही या सावलीचे असावे. बाहेर कोणास सुगावाही लागला नाही. एक मर्यादा होतीच ,या सावलीलाही. ती सुहासचा स्पर्श करू शकत नव्हती. 

....

" हे घर बाबांनी घेऊन ठेवलंय. त्यांच्या रिटायरमेंट नंतर ते इथे येऊन रहातील". लग्नानंतर पहिल्यांदाच सुहास आणि मल्हार सोनारीच्या त्या घरात आले. 

" मालक, आले काय तुम्ही ! मी सकाळपासून वाट बघत होतो." साधारण साठी उलटलेले नानाकाका समोर आले. 

" नानाकाका आणि बाबा एकाच वयाचे ! बाबा शाळेत जायचे, नाना त्यांच्याकडून लिहायला वाचायला शिकायचे. आपल्या घरात वावर असलेली त्यांची ही तिसरी पिढी." सुहास नी त्यांना नमस्कार केला. नानाकाकांनीही तिच्या हातावर दहाची एक नोट ठेवली. "हे काय?" " अहोक्स सुनबाई ना तुम्ही ! पाहिल्यांदा आल्यात न ! " त्यांनी त्यांचं सामान वरच्या खोलीत नेऊन ठेवलं. " संध्याकाळी दिवे जातील, मी कंदील भरून ठेवलेत, पण बाहेरून काही आणायचं असेल, तर लवकर सांगा." वर जाता-जाता नानाकाकांनी बजावलं. " नाही , आजचं होईल काम ! उद्याचं बघू उद्या." सुहासचं बोलणं त्यांनी ऐकलं असावं-नसावं, त्यांनाच माहित. 

" किती शांतात आहे रे इथे...!" रात्री जेवण झाल्यावर दोघ गच्चीत आले. एक-एक करून मोजता येतील, चांदण्या इतक्या स्पष्ट दिसत होत्या. वारा ही खुळा होता. थोड्याश्या अंतरावर रस्त्यावरचे काही दिवे आपल्या उजेडाच्या कुशीत धुकं घेऊन झोपले होते. निरोप घेताना थंडीच्या जीवावर आलं होतं. टोचत होती. गावाकडे हिला बोचरी म्हणत. एखादं कुत्र उगाच माज करत ओरडायचं. 

" कोणाला पाहून ओरडतात रे ...!" मल्हार ला बोलकं करायचं म्हणून तिने विचारलं. 

" एखादा असतो, गावात फिरणारा. अंधारात कुत्र्यांचा संशय बळावतो. बऱ्याचदा माणसाच्या डोळ्याला न दिसणारी वस्तू सुद्धा त्यांना दिसते. ज्यांना देह नाही, असे...!" 

" आणि तुझा विश्वास आहे यावर..?" मागे वळून सुहासने त्याला विचारलं. 

" मी पाहिलं नाही, म्हणून ते नाहीये, असं नाही होत सुहास...!" मल्हार तिच्या शेजारी उभा राहिला.  

" पण काहीतरी पुरावे द्यावे न माणसाने." 

" जगात फार कमी लोकांकडे आहेत असले पूरावे !" 

बोलता-बोलता मध्यरात्र उलटली. त्या टुमदार कौलारू घराचे वासे अंधारात बुडाले. सूर्यास्तानंतर काही तासात गाव सामसूम व्हायचा. दिवसभर धुळीने माखलेले रस्ते हळू-हळू गार पडायचे. रस्त्यावर सरकारनी लावलेले दिवे होते. पण काही ठिकाणी अंधार पाय पसरून बसलेला असायचा. नवीन माणसाला, कुत्र्यांना उगाच संशय यायचा. काळोखात दडलेल्या कहाण्या ऐकायला वाचायला चांगल्या वाटायच्या. पण अंधाराच्या पाहिल्याच पायरीवर बऱ्याच शूर-वीरांनी दम सोडलेला असायचा. 

" उजेडाचे महत्व असते, तशी अंधाराला पण कहाण्या असतात." सकाळी काका लवकर घरी येत असत. " गावाकडे असंच असतं." आणि ते हसू लागले. 

" का, शहरात भुतं नसतात?" मल्हारला काकांचं हे वाक्य बहुदा पटलं नाही. 

" मालक, शहरातल्या लोकांना जगणाऱ्यांकडे बघायला वेळ मिळत नाही. मेलेल्यां...! घ्या, कसं झालंय सांगा.!" गरम-गरम भजी त्यांनी दोघांसमोर ठेवली. 

" मस्तच, वासावरून कळतंय." सुहासने खायला सुरवात केली सुद्धा. 

" मल्हार, तू horror का नाही लिहीत?" तिने सहज मल्हारला विचारलं. "काका तुला मदत करू शकतात ना !" 

" नको गं , एकतर मला त्यातलं काही कळत नाही. आणि नको वाटतं, अश्या गोष्टींवर लिखाण, ज्यावर माझ्या अर्ध्या वाचकांचा विश्वास नाहीये." 

"विश्वास तसा माझाही नाहीये, पण लोक वाचतील, तुला नवीन ट्रेंड मिळेल." 

" नको सुनबाई, मालक लिहितात, ते छान आहे. उगाच त्यांना नको त्या मार्गाला लावलं तर जमायचं नाही. आणि अर्ध्या जगाचा विश्वास नाहीये, ते एक बरंच आहे. भीती जितकी मर्यादित असते ना, तितकी चांगलीच...!" काकांच्या या बोलण्यात तथ्य शोधण्याच्या भानगडीत दोघेही पडले नाहीत. 

ही एक सुप्त सुरवात होती. भीतीला पानावर उतरवणे आणि ती लोकांपर्यंत पोहोचवणे इतके सोपे नाही ,हे मल्हार ला ठाउक होते. सध्या-सरळ कथांमध्ये तो रमला होता. कदाचित त्याच्या प्रकाशकांनी हा नवीन विषय नाकारला असता. भीती सावली सारखी असते. तिच्या अस्तित्वावर संशय असतो. ती दिसते, भासते, पण फक्त अंधारात. आणि जग उजेडाचं पाईक होत चाललं होतं. 

....

मल्हार दिसताच काका धावत त्याच्याकडे आले. मल्हारही त्यांना पाहून गलबलून गेला. त्याने काकांना मिठीच मारली आणि त्याला रडूच फुटले. 

" काय करून बसला मालक." त्याला सावरत काका बोलू लागले. 

" तुमचं ऐकायला हवं होतं काका...!" मल्हार काहीतरी कबूल करत होता. 

" मला वेळीच का नाही बोललात. काहीतरी केलं असतं." 

" काय बोलणार काका ! किती उशीर झालाय..." 

खिडकीतूनच काकांनी सुहासकडे पाहिलं. " एवढीशी पोर...! हे घ्या, कपाळाला लावा तिच्या..." काकांनी गावदेवीच्या अंगारा आठवणीने आणला होता. दार उघडून मल्हार आत गेला. त्याने दोन बोटांत तो अंगारा धरला आणि सुहासचा कपाळाला लावला. जिथे अंगारा पडला, तिथली त्वचा काळी होऊ लागली. दोघही तो प्रकार बघत राहिले.

" या सगळ्यावर जोसेफचा विश्वास नाहीये काका..." हतबल होऊन मल्हार म्हणाला. 

" कसा असेल, त्यांना फक्त आजार आणि आजारी माणूस, एवढंच कळतं. माणूस आहे हे, यंत्र नाही ! बिघडायला नेहमीचीच कारणं लागतात, असंच त्यांना वाटतं." काका डॉक्टरला दोष देत नव्हतेच. 

" हे सगळं कुठवर चालायचं काका? " 

" माहित नाही, पण एक सांगतो, याचा शेवट होतोच कधीतरी. ही पोरगी निष्पाप आहे, कोणाचे कधी वाईट केलं नसेल. देव आहे कुठेतरी...श्वास आहेत सुरु...!" काकांच्या या वाक्याने मल्हारचा धीर वाढला. असाच धीर त्याला जोसेफ आणि निशाही देऊन गेले होते. पण काकांच्या धिरात जीव होता.  

" मोठ्या साहेबांना कळवलं?" 

" नाही, आई उगाच त्रागा करून घेईल. इथे येण्याची घाई करेल. आणि त्यांना सांगू तरी काय?" मल्हार चे आईवडील कोल्हापूरला कामानिमित्त रहात होते. त्यांच्या कानावर तसूभरही काही घडलेलं गेलं नव्हतं. रिटायरमेंट जवळ आली होती. त्यांचं वयही जास्त होतं. आणि या बद्दल घडलेलं काहीही सांगण्यासारखं आत्तातरी काहीच नव्हतं. 

" वेळ आल्यावर सांगूयात..!" 

अति जागरण आणि मानसीक थकवा आल्याने जोसेफने मल्हारला घरी पाठवलं. काका हॉस्पिटल मध्येच थांबले. हळू-हळू एक एक दिवा बंद झाला, तसं काकांनीही एका बाकावर अंथरूण टाकलं. रिसेप्शन च्या वर असलेला दिवा रात्रभर सुरूच असायचा. तिथे रात्री येणारे डॉक्टर बसत. त्या दिव्याकडे बघत थकलेल्या काकांचा डोळा लागला. 

कोणाच्या तरी बोलण्याच्या आवाजाने काकांना थोडी जाग आली. वय झाल्याने त्यांना लांबचं अस्पष्ट दिसायचं. त्यांनी त्या लांबड्या लाकडी बाकाखालचा चष्मा काढून डोळ्यावर चढवला. रिसेप्शन च्या बाकावर एक नर्स बसली होती. एकटीच बडबडत होती. काका उठले. क्षणभर तिच्याकडे बघत बसले. तीच्या कानाला फोनही नव्हता. मध्येच हलकं हसत होती. काकांचा घसा कोरडा पडल्याने त्यांना पाणीही प्यायचे होते. ते उठले आणि तिच्या दिशेने चालू लागले. इतर खोल्यांची दारं अर्धी उघडीच होती. काकांच्या कोल्हापुरी चपलेचा आवाज घुमत होता. 

" बाई, पाणी मिळेल का?" काकांच्या या प्रश्नावर तिने काहीच उत्तर दिले नाही. पण काकांच्या लक्षात आलं ! ती एकटीच, स्वतःशी बोलत होती. 

"बाई...! कोणाशी बोलताय..?" त्या नर्सनी एकदम काकांकडे वळून पाहिले. तिचा पूर्ण चेहरा पांढरा पडला होता. डोळे देखील सामान्य नव्हते. पूर्ण चेहरा सुजला होता आणि त्यावर कोणीतरी ओरबाडल्याचे ओरखडे स्पष्ट दिसत होते. तिने बसल्या जागेवरुन काकांचा गळा पकडला.

" तू वाचवशील तिला...? तू ? तुझंच किती आयुष्य राहीलं आहे ?" असे म्हणत तिने काकांना पूर्ण हलवायला सुरवात केली. काका जिवाच्या आकांताने ओरडू लागले. त्यांना काय करावे, काहीच सुचले नाही. 

" तिचं आयुष्य संपायची वाट बघतेय मी, आणि तुम्ही तिला वाचवायला पहाताय...!" काकांचा श्वास कोंडु लागला. पण तेवढ्यात स्वतःला सावरून त्यांनी पँटच्या खिशातून ती अंगाऱ्याची पुडी बाहेर काढली. हाताला येईल तेवढा अंगारा घेतला आणि तिच्या हाताला लावला. तिचा हात जळू लागला, तशी तिची मगर-मिठी सैल झाली. 

" तुझं अस्तित्वच काय आहे?" हात सोडवत काका तिच्यावर दात-ओठ खाऊ लागले. " तुझ्यात जर तेवढे बळ असते, तर समोर आली असती." मिठी सुटत चालली होती. 

" मी तिला संपवेल, आणि त्या प्रत्येकाला संपवले, जो तिला वाचवायला जाईल."

" काहीही करू शकत नाहीस तू." म्हणत काकांनी तिला दूर लोटलं. वेदनेने कण्हत ती भिंतीला जाऊन पडली. ती जशी खाली पडली, तसा तिचा चेहरा पूर्वरत होऊ लागला. काकांनी तिच्या कपाळाला हात पुसले. काकांनीही दरदरून घाम फुटला होता. 

" तू काहीच नाही करू शकत...! एक चूक आहेस तू...घोडचूक आहेस तू..! वास्तवात कुठेच नाहीयेस तू...!" काका शेजरच्या बाकावर बसले. त्यांना आता कुठे श्वास घेता येत होता. ती नर्स बेशुद्ध पडली होती. थोड्यावेळाने काकांनी तिला उचललं, तिच्या खुर्चीवर बसवलं. तिच्या चेहऱ्यावर पाणी मारलं. ती बाकावर डोकं टेकवून झोपली...

.....

"काहीही काय ! हे बघ, मी सांगते म्हणून तू तुझा कथेचा बाज नको बदलूस." एक दीर्घ भयकथा लिहिण्याचा आपला निर्णय मल्हारनी सुहासला सकाळी-सकाळी सांगितला. 

" त्या रोमँटिक , पारिवारिक कथांचा कंटाळा येतो गं ! तेच-तेच होतंय, सहा वर्ष झाली, मी तेच लिहितोय. काहीतरी बदल हवा न?" सुहासने चहाचा कप त्याच्या समोर आणून ठेवला. त्याच्या शेजारची खुर्ची ओढून ती त्याच्या समोर बसली. 

" मल्हार , तुला कळतंय का ! जेव्हा तू लिहितोस न, कोणाचाच उरत नाहीस. फक्त तुझी पात्र, तुझी कथेतील कल्पनिकता, तो पाऊस, निसर्ग, हिरवळ...! भयकथेत हे सगळं नसणार ना ?"

" नसेल, पण बरंच काही नवीन असेलही ! गूढ, रहस्य...!" 

" खून...रक्त...किळस आणणाऱ्या घटना...!" सुहास ने मध्येच त्याला तोडलं. " आणि तुझे ते वाचक..? त्यांना सहन होईल का ? तुझे प्रकाशक?" 

" हे बघ सुहास, प्रत्येक नवीन गोष्टीची सुरवात थोडीशी जड जातेच. आणि काय सांगता येतं, जे सहा वर्षात मिळालं नाही, ते ही एक कथा देऊन जाईल." चहा संपवून मल्हार उठून निघून गेला. त्याच्या स्वभावात हिस्त्रपणा नव्हता, हे सुहासला माहित होतं. भयकथेच्या हट्टापायी त्याला तो आत्मसात करावा लागणार होता. एखादी कथा लिहीत असताना तास-तासभर पात्र आणि घटनांची होणारी सततची चर्चा तिला ठाऊक होती. त्या बद्दल बोलताना तो पार हरवून जायचा. एक-एक कथा आणि पात्र जमावताना त्याची होणारी तगमग खूप लोभस वाटायची. त्याने लिहिलेल्या निसर्गाचं वर्णन शब्दांनी डोळ्यासमोर उभं करण्याची लकब त्याच्यात होती. पण शेवटी तो लेखक होता. सुहासला त्याचे बदलते मुड्स ही नवीन नव्हते. त्याची एकूण-एक कथा त्याने किती कष्टाने लिहिली होती, हे ती पूर्ण जाणून होती. तिला भीती कथेची वाटत नव्हती. तिला भीती होती, ती कथा संपेपर्यंत मल्हार एका अश्या विश्वात वावरणार होता, ज्याच्याशी त्याचा आजपर्यंत कधी काही संबंध आलाच नव्हता. 

" मी बोलू का त्याच्याशी...?" दुपारी निवांत सुहासने निशाला फोन लावला. दोघांची जुनी आणि जवळची मैत्रीण असल्याचा हा फायदा तिला नक्कीच होतं होता. शिवाय ती याच क्षेत्रात असल्याने तिचा अनुभवही बोलका होता. 

" तुला वाटतं का, याने काही फायदा होईल?" 

" लिहू दे त्याला, थोडा वेळ आणि कष्ट वाया जातील. पण तो फार काळ नाही लिहू शकणार..! त्याच्याकडे तसलं काहीच मटेरियल किंवा अनुभव नाहीये गं...!" सुहासने फोन ठेवला. 

....

रात्रीच्या अंधारात घडलेला प्रकार सकाळी कोणाच्या लक्षात सुद्धा आला नाही. बाकावर झोपलेली नर्स एक डोकेदुखीची गोळी घेऊन निघून गेली. कुठे काहीच बदल घडला नव्हता. जे घडले, ते मल्हारच्या कानावर घालणे गरजेचे होते. काका त्याची वाट पहात खोलीबाहेर बसले होते. बोटांना लावलेली हळद न्याहाळत त्यांना स्वतः बद्दल मोठी चीड येत होती. आपण नको त्या आज दवाखान्याच्या या मजल्यावर अजून दोन अपघाताचे पेशंट आले होते. 

" माझंच चुकलं...!" घडलेलं सगळं मल्हारच्या कानावर काकांनी टाकलं आणि या वाक्याने शेवट केला. 

" काका....!" 

" काही बोलू नका मालक. जे घडलं ते घडून गेलं." 

सुहासचा आजच्या स्थितीला काका स्वतःलाही जवाबदार धरत होते. त्यांच्यासमोर काही अनिष्ट घटना घडत होत्या. पण त्यावर नाईलाज होता. एका तीरावर जिव मुठीत धरून झोपलेली सुहास होती, तर दुसऱ्या तीरावर तिला वाचवण्याची धडपड करत असलेला मल्हार. मध्ये काळाच्या प्रवाहात घडलेलं बरंच काही नियतीनर लिहून अधोरेखित करून ठेवलं होतं. गेले तीन वर्षात काळाने सुहास आणि मल्हारला आपल्या पाशात इतकं गुंतवून ठेवलं होतं की आता परिणाम समोर होता, आणि इलाज मात्र कोणाकडेच नव्हता. प्रत्येक तासागणिक क्षीण होतं चाललेली सुहासची स्थिती आणि मल्हारचे धैर्य समांतर चालत होते. अगदी एकमेकांवर सर्वस्वी अवलंबून असल्यासारखे. 

....

मल्हारची बॅग भरताना सुहासच्या जीवावर आले होते. लग्नानंतर पाहिल्यांदा तो इतक्या काळासाठी सोनारीला जाणार होता. 

" तुला माहिती आहे न, मी लिहिण्यासाठी जातो म्हणून...!" मल्हार तिची समजूत काढू लागला. 

" हो, म्हणून मी तुला अडवत नाहीये.." हे वाक्य तिच्या मनावर एखाद्या दगडासारखे होते. "गेले सहा महिने , एकटं रहाण्याची सवय मोडली रे...!" 

मल्हार ने तिला बसवलं. स्वतः तिच्या समोर बसला. " तीन महिने फार कमी असतात सुहास. बघता-बघता निघून जातील.आणि तुला यायचं तर तू येऊ शकतेस. "

" नाही, नको ! तूला तुझ्या लिखाणात त्रास देणे, मला नाही आवडणार. आणि येऊन मी करू काय तिथे...!" 

गाडी नजरेआड जाईपर्यंत सुहास त्याच्याकडे बघत राहिली. मनात खूप काही दाटून आले होते. यापुढे तीन महिने तिला एकटीला काढायचे होते. या विचाराने मल्हारलाही त्रास झालाच होता. पण लिखाणासाठी असलेले नियम तो कधीच मोडत नव्हता. गाडीवरून दृष्ट काढत सुहास वर जायला निघाली तोच तिची दृष्ट जमिनीवर गेली. गाडीच्या पुढच्या चाकाखाली चिरडलं गेलेलं गुलाबाचं एक मोठं फुल तिला दिसलं. ते अर्ध काळं झालं होतं. सुहासनी थोडं वाकून ते उचललं. खाली ओलं काहीतरी होतं. रक्तासारखं...! सुहासनी ते फुल कडेला टाकून दिलं. पण जात्या सुहासकडे ते फुल बघत असल्याचा भास तिला झाला. 

संध्याकाळी मल्हारची गाडी सोनारीच्या त्या घराच्या समोर लागली. काका समान घ्यायला बाहेर आले. मल्हार त्यांच्याशी जुजबीच बोलला. 

" सुनबाईला आणायला हवं होतं." बॅग हातात घेत काका म्हणाले. 

" म्हणालो मी, ती नाही म्हणाली." आणि मल्हार वर चालून आला. 

ते घर होतंही तसंच ! गावापासून थोड्याश्या अंतरावर. मुख्य रस्त्यातून आत येणारा एक अरुंद रस्ता, जेमतेम एक गाडी जाईल इतका. आजूबाजूला दाट झाडी. आंबा, वड, लिंब, अशी नेमकं वय माहित नसलेली झाडं वर्षानुवर्ष एकमेकांमध्ये गुंतून निवांत पडली होती. वाट थोडक्यात उजळून निघेल, इतका सूर्यप्रकाश रस्त्यावर पडत असे. भर उन्हाळ्यात सुद्धा गारठा आपली जागा करून होता. भारद्वाज, जंगली पोपट, कोकीळ, अश्या अनेक गर्दीतून पळून आलेल्या पाखरांनी आपली घरटी थाटली होती. सकाळी आणि संध्याकाळी त्यांचा कोलाहल कानाला तृप्त करून जात असे. पावसाळ्यात साचणारा चिखल थोडा त्रासदायक होता. पण बागेला येणारा बहर मात्र लोभस होता. मल्हारच्या कानाला नको असलेला कोणताच आवाज इथे नव्हता. त्याच्या मनात घर करून असलेली शांतात, इथे सत्यात उतरत होती. निसर्गाच्या प्रत्येक रंगात आणि आवाजात त्याला नवीन शब्द सुचत होते. झाडातून आणि बागेतून येणारा सुगंध त्याच्यात ऊर्जा भरत असे. 

पानांचा मोठा गठ्ठा बाहेर आला. रात्री जेवून मल्हार आपल्या नेहमीच्या जागी लिहायला बसला. त्याला पहिल्या दिवशी काहीच सुचत नव्हते आणि हे नेहमीचे होते. उघड्या खिडकीतून वारा डोलत होता. एकदम खाली त्याचा जुना फोन खणखणला. काकांनी तो उचलला.

" मालक , सूनबाईंचा फोन आहे." मल्हारने वरून फोन उचलला. 

" व्यत्यय आणला का रे ?" सुहासचा आवाज खूप खोल गेला होता. 

" वेडी, तुझा कधी मला त्रास होतो का?" 

" खूप एकटं-एकटं वाटतंय रे..!" दोघे क्षणभर शांत बसले. 

" सुहास...!" तिच्या एकटेपणाला समज द्यायला शब्द कमी पडणार होते. 

" सहज बोलले...! एकटं वाटतंय, पण मॅनेज करू शकते मी. लेखकाशी संसार करायचा आहे. निभावून नेईन ! इतकी कमजोर नाहीये मी.." सुहासच्या हसण्याने मल्हारला खूप धीर आला. 

" माझ्या कथेच्या मुख्य पात्राचं नाव सुचत नाहीये...!" मल्हारही थोडा शांत झाला. 

" अरे देवा, भुतांनाही नावं असतात का..? मला वाटलं त्यांना फक्त मोठी नखं, मोठे दात, अक्राळ-विक्राळ आवाज, एवढंच असतं...!" सुहासने त्याला हसवायची संधी सोडली नाही. 

" सुहास...! मी तुला दहा मिनिटात फोन करतो." मल्हारच्या आवाजात बदल झाला. 

" का रे, काय झालं..?" 

" काही नाही, मी करतो तुला फोन...!" फोन ठेऊन मल्हार खिडकीपाशी आला. अंधार पडल्यानंतर नेहमीच शांत निजणारी 


पाखरं अचानक जागी झाली. खिडकीतून येणारा वारा ही थोडा उष्ण झाला. झाडीत काहीतरी हालचाल होत होती. मल्हार ने खिडकीतुन बाहेर पहिले. घराच्या अंगणात असलेल्या मोठ्या दिव्याच्या व्यासात त्याला काहीच दिसले नाही. चप्पल घालून तो लाकडी जिना उतरू लागला. काकांना एवढ्याश्या कारणासाठी कशाला उठवावं, म्हणून तो एकटाच बाहेर निघाला. दाराची किवाडं , आडवेळी उघडली, म्हणून कर-कर करू लागली. 

" कोण आहे...!" त्याच्या हाकेला वाऱ्याने सुद्धा उत्तर दिले नाही. चार पायऱ्या उतरून तो खाली गेला. वाळलेल्या पाचोळा मोडल्याने आवाज झाला, आणि ओरडणारी पाखरं एकदम गप्प झाली. चोरांची तिथे अजिबात भीती नव्हती. थोडं पूढे जाऊन मल्हार उभा राहिला. वाऱ्याची एक झुळूक एक गुलाबी रुमाल हवेत उडवत होती. अर्थात, जमिनीपासून थोड्याच अंतरावर...! मल्हारने जाऊन तो रुमाल हातात घेतला. मागून येणारा उजेड पूरेसा होता. 

" अनंतकाळा पासून मनात झालेली भावनांची कोंडी, 

एखाद्याच्या येण्याने अचानक सुटते. 

त्याच्याशी बोलावे खूप वाटते, 

पण न स्पर्श, न कानाला ऐकू येईल इतका आवाज...!

 एखाद्याने नकळत व्यक्त व्हावे, ते तरी कसे...!" 

......


एक अज्ञात हवा तिथे वहात होती. कोणीतरी असल्याचा भास त्याला तिथे जाणवत होता. छानसा सुवास होता. मल्हार तो रुमाल हातात धरून बराच वेळ उभा राहिला. पण समोर कोणीही नाही आलं. एव्हाना पाखरांचा ओरडा ही शांत झाला होता. 

" काय झालं...?" मागून घराच्या ओट्यावर काका उभे होते. मल्हार भानावर आला. रुमाल घेऊन तो आत येऊ लागला. काकांशी काहीही न बोलता वर निघून गेला. त्या मंद दिव्यातच त्याला लिहायला सुचायचे. कागद समोर ठेऊन त्याने लिहायला सुरवात केली. 

" काका, आपल्या बागेत लोक येतात का हो..?" सकाळी काका बागेत झाडांना पाणी घालत होते. 

"नाहीतर...! गावात भरपूर फुलं मिळतात, आणि इतक्या लांब कोण येणार ए...!" 

" मग...रात्री चोर...?" 

काका एकदम थांबले. काल रात्री त्यांना बागेत सहज फिरताना दिसलेला मल्हार सहज फिरत नसावा, हा अंदाज त्यांना आलाच. 

" मालक, गावात सूर्यास्तानंतर सहसा बाहेर निघत नाही कोणीच. आणि हे घर घेतक्यापासून इथे कुठे चोरी झाल्याचं ऐकलं नाहीये." काका हात धुवायला आत गेले. 

इथे आल्यावर सहसा मल्हार गावात जात नसे. पण आज तो बाहेर निघाला. जाताना गाडीवर साचलेला रातराणीच्या सुकलेल्या फुलांचा थर त्याने हाताने खाली ढकलले. 

सकाळी गाव कसा शांत आणि गार होता. घरो-घरी दूध घेऊन जाणारी, जनावरं चरायला नेणारी माणसं कामावर निघाली होती. बऱ्याचश्या घरांच्या बाहेर चुली धूर ओकत होत्या. धुराची एक तलम तार तयार होऊन आभाळाकडे हळू-हळू सरकत होती. जवळचं दिसत होतं. पण लांबच मात्र थोडंसं धुक्यात मिसळत होतं. 

त्याच्या कानावर घंटेची बारीकशी किणकिण ऐकू आली. आवाजावरून हा घंटा मंदिराचाच असावा , म्हणून मल्हार नी एका जात्या माणसाला अडवलं. 

" हा आवाज कुठून येतोय, घंटेचा?"

" महादेवाचं मंदिर आहे. या रस्त्याने पुढे जा...! गावात नाविन आलात का?" त्या माणसाचा प्रश्न सहाजिक होता. 

" नाही , त्या झाडीत घर आहे माझं." मल्हार उत्तर देऊन पुढे सरकला. 

छान होतं मंदिर. आवार जवळ-जवळ त्याच्या घरासारखाच होता. खुपश्या झाडीत लपलेलं. मल्हारला जागा आवडली. बरीचशी वर्ष वय असलेल्या अनेक गोष्टी तिथे होत्या. एका नदीच्या शिल्पावर हात लावुन तो पाहू लागला. 

" पाषाणात जीव ओतण्याची कला होती त्या लोकांत...!" एक खूप छान , कानाला हेलावून तृप्त करणारा आवाज त्याच्या कानी पडला. ती समोर उभी होती. एका क्षणासाठी मल्हार ही गांगरला. त्यांने आजपर्यंत कुठेही पहिला नव्हता, असा तिचा रंग होता. सावळा आणि गोरा, यात शांतपणे उभा असलेला. डोळ्याच्या कडांना काजळाची धार नव्हती, पण तरीही ते स्पष्ट बोलत होते. काही प्रश्न आणि उत्तरं होती त्यात. पापणी किंचितजरी बंद केली तरी ती समोरून नाहीशी होईल या भीतीने मल्हारने डोळे सुद्धा बंद केले नव्हते. संपूर्ण कोरीव बांधा ! एखाद्या कलाकाराने सहज प्रवृत्तीतून घडवले, आणि जे घडले, ते अप्रतिम होते. 

"खरंय तुमचं, पाषाणात जीव ओतण्याचे कसब प्रत्येकात नसतेच...!" घसा कोरडा पडला असतानाही मल्हारच्या तोंडून आपोआप हे वाक्य बाहेर पडले. 

" पहिल्यांदा आला की माणूस असाच तासनतास न्याहाळत बसतो या दगडांना." तिने बोलायला सुरुवात केली.

" दगडं नाहीयेत हे, एक एक श्वास ओतून त्यांनी ही कला उभी केली आहे...! तुम्ही...!" 

" मानसी...इथेच असते." 

" मी मल्हार...! गावाच्या उत्तरेला माझं घर आहे."

"माहितेय मला...!" या उत्तरावर मल्हार चकित झाला. 

" घर माहितेय, ते तुमचं आहे, हे आत्ता कळलं." तिने स्पष्ट केलं. 

" तुम्ही आला आहात का कधी..?" 

" हो, काल वाट चुकले होते, तेव्हा रस्त्यावरून तुमच्या घराचा दिवा दिसला. पण तुम्ही बाहेर आलात, म्हणून मी तिथून निघाले."

" आणि तुमचा रुमाल राहिला तिथेच, झुडपात अडकून..!" 

" हो, सापडला का तुम्हाला, मी स्वतः विणला आहे."

" हो, पण आणला नाहीये, तुम्ही त्या निमित्ते माझं घर तरी बघायला याल...!" 

ती काहीही न बोलता गालात हसून निघून गेली. देवाला बाहेरून नमस्कार करून मल्हारही घरी परतला. येऊन त्याने काल लिहिलेलं सगळं पुन्हा वाचून काढलं. त्याच्या त्या पात्राचा वर्णन जवळपास मानसीच्या रुपाशी मेळ खात होतं. 

' हे साम्य ,इतकं कसं...?' त्याने पानं झाकून ठेवली. 

.........

" हे बघ मल्हार, तुझी तिला वाचवण्याची धडपड मला कळते. पण हे बघ...!" जोसेफने सुहासचे बरेचशे रिपोर्ट्स त्याच्यासमोर मांडले. 

" MRI आहे, Scan आहे, रक्तातही काही दोष नाहीये. ह्रदयही चांगलं आहे. "

" मग ती शुद्धीत का नाहीये...?" त्या रिपोर्ट्स मधलं मल्हारला एक अक्षरही कळलं नव्हतं. 

" हाच प्रश्न आम्हाला पडला आहे. तिच्या शरीराच्या सगळ्या क्रिया अगदी व्यवस्थित सुरु आहेत. इलाज आजाराचा होतो, आणि आजार म्हणजे शरीराचा एखादा भाग, किंवा एखादी क्रिया अव्यवस्थित असणं." 

" मग...पुढे?" 

" ऐक माझं...! एखाद दोन दिवसात मी अजून काही स्पेशालिस्ट शी ही केस बोलून बघतो. बघुयात ते काय म्हणतायत. पण...!" 

" पण काय...?" मल्हार अस्वस्थ होत होता. 

" आपल्याला तिचा इलाज बहुदा थांबवावा लागेल. बऱ्याचदा खूप जास्त औषधं घेतल्याने...!" 

" ठिक आहे...! तू तुझ्या पद्धतीने ...!" वाक्य पूर्ण न करताच मल्हार तिथून निघून गेला. 

.....

"मानसी...!" मल्हारला त्याच्या कथेच्या पात्राचं नाव आणि वर्णन सापडलं. लिहिण्यास सुरवात झाली. पण या लिखाणात काहीतरी वेगळं होतं. सकाळी सुर्योदयास सुरु होत नव्हत. ते सुरु होत होतं सुर्यास्तानंतर ! रात्रीच्या घोंगावणाऱ्या वाऱ्यात, घराच्या खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या त्या अंधारात. पहिल्या दिवशी अर्धी रात्र अशीच उलटली. दुसऱ्यादिवशी सहाजिक जाग उशिरा आली. 

" कथा सापडलेली दिसतेय!" काकांनी सकाळचा चहा आणून दिला.

" हो, सुरवात झालीये" मल्हारने उत्तर दिलं. 

" पण तुमचा नियम मोड्तोय. सकाळी लवकर उठून लिहायचा." 

"हो, कदाचित भयकथा आहे ना, म्हणून होत असेल." मल्हारने उत्तर देण्याचे टाळले. 

"काय करतेस तू?" मंदिरात जायचा नवीन नेम आता पाळला जाऊ लागला. 

" काहीच नाही ! " हसत ती म्हणाली. 

" म्हणजे...!" मल्हारला उत्तर नीटसं उमगलं नाहीच.

" म्हणजे...काहीच नाही. माझ्या काही गरजाच नाहीयेत. काही इच्छा होत्या, पण काळाच्या ओघात त्या नाहिश्या झाल्यात. घराची थोडीफार शेती आहे. वाडीवर काही लोक आहेत." 

" आणि...घरचे." 

" नाहीयेत...!" 

" सॉरी, मला माहित नव्हतं!" हे उगाच विचारलं असं मल्हारला झालं. 

" आयुष्याची काही पानं उघडली, की त्यात दडलेली एखादी जखम दिसते. ती वाचू नाहीत, कोणाला वाचून दाखवू ही नाहीत..!" तिच्या या शब्दात कित्येक गुपितं दडून होती. 

" आणि एखाद्याला ती स्वतःहून वाचायची असतील तर...?" 

" मी माझ्या वेदना सांगून लोकांना त्यात मिसळू देत नाही. आपल्या दुःखाची खोली आपल्याला माहित असते. एखाद्या अनोळखी माणसाला ती नाही कळली, तर उगाच त्या वाया जातात." मानसी त्याच्याकडे पहात म्हणाली. 

" माझ्या नव्या कथेचं पाहिलं पात्र म्हणून तुझं नाव घेतलंय...! चालेल का तुला?" विषय बदलावा म्हणून मल्हार म्हणाला.

" फक्त नाव घ्या...बाकी काही लिहिण्यासारखं नाहीये." एवढं बोलून मानसी निघून गेली. 

........

संध्याकाळी घरी येताना सुहासला आज जरा उशीर झाला. मोबाईलची बॅटरी ही संपली होती. रस्त्यावर रहदारी कमी झाली होती. घराचे कुलूप काढताना मागे कोणीतरी उभं असल्याचा भास तिला झाला. तिने मागे वळून पाहिलं. कोणीच नव्हतं. दार उघडून आत आल्यावर क्षणभर दाराशी उभी राहिली. भास असल्याची खात्री करून ती आत आली. 

मध्यरात्री कोणाच्या तरी बोलण्याने तिला जाग आली. बाहेरच्या खोलीत कोणीतरी एकटेच बडबडत असल्याचा आवाज स्पष्ट येत होता. ती होती तशी धाडसी, पण एकटी असल्याने असले धाडस परवडणारे नव्हते. बाजूच्या फोन वरून तिने खाली वॉचमन ला फोन केला. 

" नाही मॅडम, एवढ्या रात्री कोण येणार वर..?" तिने या उत्तरावर धाडकन फोन खाली आदळला. दार उघडून ती बाहेर आली. हातात एक फुलदाणी तिने घेतली. पाच-सात पाऊलं पूढे गेल्यावर मागून एक सावली आत झोपण्याच्या खोलीत गेली. मागे बघताच खोलीचे दार धाडकन बंद झाले. सुहासला प्रचंड घाम फुटला. तिला क्षणभर सुचले नाही, काय करायचे ते. घराच्या बाहेरच्या उजेडात एक वेगळी सावली तिला खालच्या फटीतून दिसली. कोणती खरी होती, आत गेलेली, की दाराबाहेर असलेली. थोडेसे धैर्य एकवतुन ती दारापाशी आली. बाहेर खरंच कोणीतरी होतं. ती वाकून खाली पाहण्याच्या फंदात पडली नाहीच. कोणतीही चाहूल न देता ती तशीच हात उगारून उभी राहिली. तेवढ्यात दारावर धाडकन थाप पडली. बाहेरून कोणीतरी जोर-जोरात दार वाजवत होते. आता मात्र ती पूरती घाबरली. एवढ्या रात्रीचं कोण असू शकेल, याचा विचार करण्याची वेळ नव्हतीच. काही कळायच्या आत खाडकन बाहेरून दाराला धक्का बसला आणि वॉचमन आणि एक शेजारी रहाणारे काका समोर दिसले. 

" सुहास, काय झालं ? केव्हापासून दार वाजवतोय. हा म्हणाला घरात कोणीतरी शिरलंय?" समोर आपलीच माणसं दिसल्यावर सुहास थोडी भानावर आली. " नाही, तसं नाही, मला वाटलं, घरात कोणीतरी येऊन...!" 

" तुम्ही आत जाऊन बघा, मानेकाकांनी वॉचमनला हुकूम केला. 

" बैस, अगं , किती घाबरली आहेस. हे घे..!" मानेकाकांनी तिला सोफ्यावर बसवलं आणि पाणी दिलं. 

" साहेब, पाहिलं सगळं, नाहीये कुणी...!" वॉचमन सगळं घर पाहून आला. " जा तुम्ही...!"

"सुहास, जास्त थकव्यामुळे होतं असं, आराम कर, आणि काही लागलं तर सांग. 

.....

" तुला आधीच बोललो होतो न, आईला बोलावून घे काही दिवस. तु एकटी राहिली नाहीयेस न अजून." घडलेलं सगळं तिने सकाळी मल्हार ला सांगितलं. 

" नाही, तसं मी घाबरलेही नसते. पण एकटी होते न ! " सुहास ला भरून आलं. 

" कळतंय मला...!" 

फोनवर बोलत असताना सुहास ला कपाटातून कोणीतरी बघत होतं. तिच्या बोलण्यावर बारीक लक्ष होतं. 

"चल, मी ठेवतो, थोडं बाहेर जायचं आहे. संध्याकाळी आईला बोलावून घे."

" बाहेर...? तू फिरतोय की काय गावात ?"

" आत्ताच सुरु केलंय. गावात आहेत अश्या काही जागा ज्याचं वर्णन थोडं गूढ आहे. फक्त टक लावून बघायचं, आपोआप भीती वाटते. तू आलीस, की तुलाही बघायला मिळेलच..!" 

" नको, असू दे! तुझं वर्णन तुलाच लख-लाभ असो. ठेवते मी." 

फोन ठेवून मल्हार खाली आला. काका काहीतरी चिरत होते.

" मालक, तो गण्या आला होता, मंदिराजवळ दुकान ए त्याचं ! तो सांगत होता, तुम्ही कोणाशी तरी गप्पा मारत होता..?" 

" लोकांना कशाला हव्यात चांभार चौकश्या, कामं नाहीयेत का त्याला..!" मल्हार ने त्यांना वरचेवर उडवून लावलं. 

" नाही, बोलता तें ठीकंच आहे, पण...!" मागे वळून बघतात, तोवर मल्हार घराबाहेर निघून गेला होता. 

त्या रस्त्यावरून तो रोज जात असे. येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या खूप कमी होती. मंदिरात जाण्यासाठी गावकऱ्यांनी एक पक्का रस्ता बांधून ठेवला होता. होता जरा लांबचा, पण बरेचशे त्या वाटेने जात. या वाटेवर रस्त्याच्या दोन्ही बाजूनी बाभळी, बोरीची झाडं आणि गुडघाभर उंचीची काही काटेरी झुडपं होती. बाजूने वहात असलेला ओढाही तसा सुकलेला होता. सगळे काही एकदम रुक्ष होते. पण मल्हारला ही वाट आता आवडू लागली होती. सहसा कोणी दिसायचं नाही, त्यामुळे त्याला कोणी बघायचं नाही. 

" एक सांगू...?" रोजच्याच झाडाखाली मानसी बसली होती. 

" हा..!" 

" तुम्ही लिहीत असलेल्या कादंबरी बद्दल इतक्यात कोणाला सांगू नका." एकदम कादंबरीचा विषय निघाला. 

" नाही, सहसा मी कुणाला सांगत नाही, वण एकदम...!" 

" नाही, लोकांचा विश्वास नसतो. लोकांना डोळ्याला दिसणारं, ऐकू येणारं, स्पर्श होणारंच खरं वाटतं."

" हो , त्या व्यतिरिक्त घडलेल्यावर लोक जास्त विश्वास नाही ठेवत."

" म्हणून ते कधी घडलं नाही, किंवा ते अस्तित्वात नाही, असे तर नाही न होतं !" 

" लोकांना खात्री पटली पाहिजे. इथे सिद्ध करून दाखवावं लागतं. लिखाणाचे काही अधिरेखित नियम आहेत, त्यातला हा एक. तुमची कल्पनाशक्ती वास्तवाच्या वर जाऊन लोकांना पटवून द्यावी लागते." 

" मग...काय करता तुम्ही, पटवून द्यायला?" मानसीने हसत विचारले. 

" त्याचं वर्णन तसे करावे लागते. वास्तवातली एखादी घटना, एखादं पात्र त्याच्या सोबतीला जोडावं लागतं."

" आणि मानसीला कसं पटवून देणार आहात, लोकांना..?" या प्रश्नाचे उत्तर मल्हार कडे नव्हते.  

........

" भास होतात सुहास , एकट्याने असलं की !" सुहासने तिच्या आईला काही दिवसांसाठी तिच्या सोबत रहायला बोलावले. 

"आणि काय गं, मी मागे आले होते, तेव्हाच बोलले होते. घरात कोणत्याही देवाचा साधा फोटो पण नाहीये." आईने आल्या-आल्या घराचे निरीक्षण सुरु केले. 

" आई, देव मनात असावा लागतो." सुहासने स्पष्टीकरण दिलेच. 

" गप्प बस, मनातली भीती पण मनातच असते. समोर हात जोडायला, गाऱ्हाणी सांगायला, अगदीच काही नाही तर संध्याकाळी थोडं निवांत बसायला घरात देव हवेच ! ती एक सकारात्मक शक्ती असते, ती घरात कुठेही असली, तरी पूर्ण घरावर लक्ष असतं." 

" बरं , आता तू आली आहेस ना !" सुहासनी विषय आईच्या खांद्यावर टाकून निघून गेली. 

आई यायची तेव्हा आल्या-आल्या पूर्ण घर फिरायची. सुहासच्या खोलीचं दार उघडताच एक उर्ग दर्प आला. या आधी कधीही हा वास तिच्या अनुभवात नव्हताच. पलंगाखाली, वॉर्डरोबखाली, बाल्कनीत, कुठेच काही नव्हते. तिच्या बॅगेतून कापूर काढून तिने तो जाळला. थोडा वास कमी झाला पण अस्वस्थता जन्माला आली. 

" मालक, एक विचारायचं होतं !" रात्री मल्हार खोलीत बसून लिहीत असताना काका पायऱ्या चढून आले. 

" बोला न काका ? 

" तुम्ही रोज मंदिरात जाता ! जा, जाण्याबद्दल नाही काही दुमत, पण...! " 

"पण काय काका ?" मल्हारने लॅपटॉप थोडा झाकला. 

" मागच्या रस्त्याने नका जात जाऊ, तो रस्ता चांगला नाहीये...!" 

" म्हणजे...?" मल्हारला कळले होते, पण त्याला काकांच्या तोंडून ऐकायचे होते. 

" एकट्या माणसाने जाण्यासारखा रस्ता नाहीये तो...!" हातातला पाण्याचा तांब्या ठेऊन काका मागे फिरून जाऊ लागले. एकदम दाराशी थांबले. 

" शहरात आणि गावात हाच फरक असतो मालक. शहरात वाट चुकली, की सहसा कोणाला कळत नाही, कोणाला काही घेणं-देणं ही नसतं. पण गावात लोकांना कळतं मालक." 

मल्हारने याकडे जास्त लक्ष दिलं नाही. त्याच्या कथेला आता गती मिळाली होती. एक-एक पात्र जन्माला येऊ लागली होती. जागा , स्थळं, घटना घडू लागल्या होत्या. कल्पकता नवीन शब्द शोधून पानांवर येऊ लागली. 

"तूला या गावात कोणीच ओळखत नाही का ?" दुसऱ्या दिवशी मल्हारने मानसीला विचारलं. 

"नाही." तिचे उत्तर अगदी सहज होते. 

"का?" 

"गरजच भासत नाही. आजूबाजूला निरर्थक लोकांचे घोळके जमा करून ठेवण्याचा छंद माणसांना असतो. लोकांमध्ये गुंतून रहातो तो. इतका, की त्याला स्वतःपेक्षा काही लोक महत्वाचे वाटू लागतात.यात तो स्वातंव्हे महत्व कमी करून घेतो. तुम्ही पण तर जास्त कोणात मिसळत नाही. मित्र नाहीत, कोणी बोलायला नाही..!" 

"कदाचित मलाही गरज भासत नाहीच." 

मल्हार आणि मानसीची प्रत्येक भेट मल्हारला कोड्यात टाकणारी होती. तिच्या बोलण्यात असणारी गूढता एक आभास निर्माण करणारी होती. आणि हाच आभास तो रोज घरी जाऊन लिहीत असे. तिचे हसणे, बोलणे, एखाद्या गोष्टीबद्दल तिचे मत, अश्या बऱ्याच गोष्टी मल्हारला खोलवर जाऊन तिच्याबद्दल जास्त विचार करायला भाग पाडत होत्या. त्यांच्या भेटीबद्दल इतर कोणाशीही काहीच वाच्यता करायची नव्हती. मल्हार कोणालाही काहीच सांगू शकत नव्हता. कोण्या तिसऱ्या माणसाकडून तिच्याबद्दल अधिक जाणून घेण्याचाही प्रश्न नव्हताच. 

"येते मी...!" 

" मानसी...!" त्याने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. "मला तुझ्याबद्दल काहीच माहित नाहीये, कुठून येतेस, कुठे रहातेस, काहीच नाही." त्याने आज शेवटी तिला विचारलेच.

" वेळ आल्यावर सगळं सांगेन मी. माणसाच्या अतिता पेक्षा त्याच्या सहवासात मिळणारी शांतता महत्वाची असते." मागे न बघताच ती निघून गेली. 

घरी परतल्यावर मल्हारला काका कोणाशी तरी बोलताना दिसले. असेल कोणी म्हणून तो सरळ वर गेला आणि सरळ लिहायला बसला. 

.......

" तुम्ही ? " 

" काय वाटलं तुला, तू कळवलं नाहीस, म्हणून मला काही कळणार नाही का ? " सकाळी अचानक सुहासची आई दवाखान्यात आलेली पाहून मल्हारला आश्चर्य वाटलं. 

" एकुलती-एक मुलगी आहे माझी ती..! तिला असं मरणाच्या दारात कशी सोडून देऊ?" मल्हार यावर काहीच बोलला नाही. आपल्या मुलीची अशी दैना पाहून त्या आईचेही हृदय पिळवटून निघाले. पण ती धाडसी होती. 

" तिला सारखी सांगत होते मी, मल्हारला कळव, सांग काय त्रास होतोय. रोजच्या-रोज एक मृत्यू तिला वेगवेगळ्या नावाने आणि रूपाने भेटायला येत होता. पण तिने कधी कोणाला सांगितलं नाहीच. घरात, मनात, बाहेर, पावलो-पावली ती भीतीच्या सावटाखाली वापरली. एकट्याने सहन केलं सगळं.काय दोष हिचा ? हिने कोणाचं काही वाईट नाही न केलं...!" मल्हार उभ्याने सगळं काही शांतपणे ऐकत होता. 

" आई, मला कळतंय तुमचं दुःख...!" काका मोठे म्हणून बोलले. 

" नाही, अजूनही तुम्हाला कळत नाहीये. कळत असतं, तर तुम्ही इलाज केला असता." तिची आई काकांवर राग काढू लागली.

" हा इलाजच सुरु..." 

" नाही, हा आजारच तुम्हाला कळला नाहीये, इलाज काय करणार तुम्ही? सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आलेत, आणि तरीही तुम्हाला वाटतं, की तुम्ही इलाज करताय?" 

" तिने मला कधीच काही सांगितले नाही, निदान तुम्ही तरी काही बोलायला हवं होतं." शेवटी मल्हार बोलला. 

" तुम्हाला खरंच जाणून घ्यायचं आहे ?" 

"हो...!" 

काकांना दवाखान्यात थांबवून सुहासची आई आणि मल्हार घरी आले. घराचे दार उघडून दोघे आत गेले. हॉल च्या मध्यभागी तिने मल्हारला उभं केलं आणि स्वतः जाऊन देवाजवळ जाऊन कापराची डबी घेऊन आली. सगळी डबी तिने जमिनीवर ओतली. एका वडीने सगळे कापूर तिने पेटवले. कापराचा धूर कोपऱ्या-कोपऱ्यात जाऊ लागला. प्रत्येक खोलीत एकसारख्या काळ्या सावल्या इकडून-तिकडे धावू लागल्या. वासाने झालेला त्रास त्यांना असाह्य होऊ लागल्याने त्या फडफडू लागल्या. समोर घडणारं हे दृश्य पाहून मल्हारला धडकी भरली. 

" हे सगळं काय आहे ?" 

" मल्हार, अश्या अनेक सावल्या तिच्या मागे कित्येक दिवसापासून फिरत होत्या. कोण आहेत, कुठून आल्या आहेत , काहीच कळलं नाही, न तुम्हाला, न मला आणि तिला तर अजिबात नाही. कोणी विश्वास ठेवणार नाही, म्हणून तिने कोणाला काही सांगितलं नाही. मुकाट्याने या सावल्या खेळवत असलेले खेळ ती खेळत गेली. आणि शेवटी आज....!" सुहासच्या आईला रडू कोसळले. ती जमिनीवर बसली.

" आपण वास्तवात इतके हरवले असतो, की आजूबाजूला घडणारं बरंच काही आपल्याला दिसत नाही.पण, ते असतं ! स्वतःला सिद्ध करत ते माणसाच्या सामान्य आयुष्यात कोलाहल माजवत असतं." 

" पण हे आहेत कोण...?" आता सावल्या नाहीश्या झाल्या होत्या. कापराच्या वड्या विझल्या होत्या.

" माहित नाही...! कोणाच्या तरी अतृप्त इच्छा राहिल्या असतील. कोणाचे तरी भोग भोगायचे राहिले असतील. कोणाचं तरी पाप या सावल्या उघडकीला आणत असतील ! कोणाचे तरी अतित , वर्तमानात येऊन स्वतःला स्थिर करण्याचा प्रयत्न करत असेल." 

मल्हार काहीच बोलला नाही. काळ्या झालेल्या जमिनीवरून तो त्याच्या खोलीत गेला. भिंतीवर असलेला त्याचा आणि सुहासचा मोठा फोटो होता. त्यावर साचलेली धूळ त्याने बाजूला केली. तिचे बोलके डोळे, तिची नेहमीची बडबड, चेहऱ्यावरचे हावभाव...! सगळं-सगळं आज अधांतरी होतं. 

" तिला इथून लांब घेऊन जावं लागेल..!" आई मागून आली. 

"कुठे...! आहे का एखादी अशी जागा, जिथे तिला तिचं गमावलेलं सगळं काही परत मिळेल?" 

" आहे...!" मल्हार एकदम मागे वळला. एक जागा अजूनही आहे, जिथे त्याला त्याची सुहास परत, होती तशी मिळू शकेल.

" रेणापूर...!" तिची आई म्हणाली. 

" पण...?" 

" थोडं अवघड आहे मल्हार, पण मी गुरुजींना सांगू शकते. काही नाही, तर निदान या भयाच्या सावटातून तरी तिची सुटका होईल. 

ज्या सवाल्यांपासून सुहासला लांब नेण्याची धडपड तिची आई करणार होती. ती वास्तविक जगात एक कथा होती. तिची सुटका करण्यासाठी मल्हार वाटेल ते करायला तयार होता. 

.....

" रेणापूर, कोण असतं तिथे ?" 

" आईचे गुरु असतात." 

" सुहास...!" त्याच्या आतला लेखक थोडा जिद्दीही होताच. 

" अगं, हे असले बाबा, बुवा..!"

" अरे, आई जातेय गुरुजींना भेटायला. मी फक्त सोबत चाललीये." 

अचानक सकाळी-सकाळी सुहास आणि तिच्या आईने रेणापूरला जायचं ठरवलं. सुहासला तिथे जायला खूप आवडायचं. मोठा नदीकाठ, आजूबाजूला हिरवळ, जंगल, वाहनंही जास्त नाही. कुठलाच गोंगाट नसायचा. पूर्ण आश्रम मातीत बांधला होता. तिथे येणाऱ्या पाहुण्यांसाठी छोट्या-छोट्या झोपड्या होत्या. चार दिवस तिथे राहिलं, की तिचाही उत्साह वाढायचा. लग्न झाल्यावर पाहिल्यांदाच ती आईसोबत निघाली होती. 

सूर्यास्ताच्या वेळी दोघी आश्रमात पोहोचल्या. चहापाणी झाल्यावर गुरुजींचा निरोप आला. मल्हार गेल्यापासून घडलेलं सगळं काही आईने घडाघडा गुरुजींना सांगितलं. 

" उद्या सकाळी दोघीही महादेवाच्या मंदिरात या...! " 

आई मंदिरात गेली. गुरुजी काहीतरी सांगत होते. सुहासला मात्र बाहेर थांबायला सांगितलं होतं. बोलणं झाल्यावर गुरुजींनी हवनकुंडातली विभूती तिच्या हातात ठेवली. दुपारी जेवणं करून दोघी घरी यायला निघाल्या. 

" सुहास, तुला जपायला हवंय...!" आई गाडीत बसल्यापासून अत्यंत गंभीर झाली होती. 

" काय म्हणाले काय गुरुजी ?" आता सुहासचाही संशय बळावत चालला होता. 

" माझ्या मते, मल्हारला परत बोलावून घ्यावं." 

" अगं, पण इतकं झालंय तरी काय ?" 

" सुहास, तुला आलेले अनुभव भास नव्हते..!" यावर सुहासही थोडी घाबरली. 

" ते घडलं होतं. कोणीतरी तुझ्या घरात शिरायचा प्रयत्न करतंय." 

" कोण, आणि माझ्या घरात ?" 

" माहित नाही. मी थोडे दिवस राहीन...! बघुयात...!" 

घरी पोहोचले तेव्हा अंधार झाला होता. 

आज सकाळी गाडी खराब झाली. आधीच उशीर झाल्याने सुहासने नेहमीच्या रिक्षावाल्याला बोलावलं.काहीवेळाने तो आला. गुरुजींकडे जाऊन आल्यापासून सुहास थोडीशी भयभीत झालीच होती. पण ती प्रमाणाची वाट बघत होती. त्यादिवशी घरी आलेला अनुभव हा भास असू शकतो. 

सकाळी एवढी रहदारी नव्हती. रिक्षावाला सारखा आरश्यातून मागे बघत होता. आधी सुहासनी त्याकडे लक्ष दिलं नाही. पण सुहासची नजर टाळून तो सारखंच बघू लागला. 

" काय झालं दादा,काही प्रॉब्लेम आहे का ?" शेवटी सुहासने त्याला विचारलं. 

" नाही ताई, काही नाही." 

ऑफिसच्या खाली रिक्षा थांबली. सुहासने पैसे काढले आणि खाली उतरली. त्याने पून्हा मागे पाहिलं. तोही पैसे परत करायला खाली उतरला. 

" मॅडम...!" सुहासने पाठ वळवली आणि त्याचा आवाज आला. 

" सॉरी मॅडम, मी सारखा मागे बघत होतो. पण...तुम्ही बसला होतात, तेव्हा तुमच्या शेजारी एक काळी सावली दिसत होती मला...!" यावर सुहासला घाम फुटला. तिने परत येऊन रिक्षात पाहिले. काहीच नव्हतं. 

" कुठे काय ?" तिने त्याला विचारलं. 

" मी रस्त्यात बोललो असतो, तर तुम्ही घाबरल्या असत्या. म्हणून मी विचार केला , पोहोचल्यावर सांगू." आणि तो रिक्षा घेऊन निघून गेला. क्षणभर सुहास तशीच रस्त्यावर उभी राहिली. तिला काहीही सुचलं नाही. तिचं धाडस थोडं कमजोर पडायला लागलं होतं. तिने मल्हारला फोन केला. फोन काकांनी उचलला. 

" मालक मंदिरात गेलेत...!" उत्तर ऐकून सुहास चाट पडली. 

" माहित नाही, पण हल्ली रोज सकाळी मंदिरात जायला लागलेत." यावर सुहास काहीच बोलली नाही. 

"आल्यावर सांगतो मी फोन करायला, काही निरोप आहे का सुनबाई..?" काकांनी विचारलं. 

" नाही, मी करते फोन रात्री...!" 

लग्नाच्या विधी सुद्धा नाकारणारा मल्हार रोज सकाळी मंदिरात जातोय हे सुहासला न पटण्यासारखं होतं. रेणापूरला आश्रमात जायला देखील त्याने नेहमी विरोध केला. त्याच्या नास्तिक असण्यावर कधी सुहासने आक्षेप घेतला नव्हता. पण त्याचात अचानक कुठुन आली ही अस्तिकता. विचार करत असतानाच मागून मेघाने तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती दचकली. इतकी की, जोरात किंचाळली. 

" काय गं, इतका कसला विचार करत होती." 

" काही नाही..!" म्हणत दोघी आत चालत गेल्या. 

कथा वाढत चालली होती. मल्हारचे बोलणे कमी होत असलेले काकांना जाणवले. पण ते काहीही बोलले नाहीत. या आधीही तो असंच माहिनोंमहिने लिहायचा. पण या वेळेला त्याच्या स्वभावात आणि दैनंदिनीत प्रचंड बदल घडत होता. रात्र उलटून जायची तरी खोलीत दिवा सुरु असायचा. त्याच्या खोलीत प्रवेश करण्याची मुभाही त्याने आता काकांना नाकारली होती. तो मंदिरात जाताना कुलूप लावून जात असे. गेल्यावर काका खालून खोलीच्या बंद दाराकडे बघायचे. आत काहीतरी वेगळी हालचाल त्यांना जाणवू लागली होती. पण त्यांनी विचारायचं धाडस मात्र कधीच केलं नाही. घरात असलेल्या देव्हाऱ्यात मात्र नित्य-नियमाने ते दिवे लावत. 

" आज पर्यंत मंदिरात पाय ठेवला नाहीस...?" 

सहज मल्हारने झाडाला टेकून बसलेल्या मानसीला विचारले. 

" नाही माझा देवावर विश्वास." तिने सरळ उत्तर दिले. 

" माझाही नाहीये, पण आपण भेटतोय न मंदिरात !" 

" योगायोग असेल...! दुसरी जागा नाहीये." तिची उत्तरं खूप सरळ पण सालस होती. 

"कथा कुठपर्यँत आली तुझी ?" 

अहो-जाहोपासून सुरु झालेली मैत्री एकेरीवर आली होती. मल्हारला तिची सोबत हवी-हवीशी झाली होती. सकाळ होण्याची वाट तो रात्रभर बघत असायचा. तिच्याआजूबाजूला त्याचे एक वेगळे भाव विश्व तयार होत होते. कदाचित, त्याच्या मनात साठलेलं सगळं ती ऐकून घ्यायची. ती मात्र खूप जुजबी बोलत होती. तिला त्याची सोबत होती, पण तिचे मापदंड काहीशे वेगळे वाटायचे. कधीही घरचे विषय निघाले नव्हते. मल्हारनेही सुहासचा विषय काढला नव्हता. 

बाहेरून आल्या-आल्या मल्हार वर निघून गेला. काकांनी त्याला वर जाताना पाहिलं सुद्धा. 

" मी बाजारात जाऊन येतो." काका खालूनच ओरडले. दार बाहेरून फक्त लोटून ते तडक चालत निघाले. मंदिराच्या रस्त्याने झपझप चालत ते मंदिराच्या मागील भागात पोहीचले. शिवा तिथे त्यांची वाट पहात होता. भेटल्या-भेटल्या शिवाने त्यांना एका माणसाकडे नेलं. 

" हे काका आहेत, कामाला आहेत त्यांच्याकडे." शिवाने काकांची ओळख करून दिली. 

त्या अनोळखी माणसाने काकांची साधारण तासभर कानउघाडणी केली. काका शांतपणे ऐकत होते. तिथून निघताना त्यांना घाम आला होता. दिवसभर घरात काकांचा कामाचा वेग कमी झाला होता. रात्री जेवणं झाल्यावर मल्हार वर जाऊ लागला. काका शांतपणे बाहेरच्या पायऱ्यांवर बसले होते. आपल्या वागण्यात होत असलेला बदल मल्हारही जाणवत होता. आज थोडा वेळ काकांना द्यावा, म्हणून तो पायऱ्या उतरून खाली आला. 

"काका." काका थोडे उदास होऊन बसले होते. 

"काही बोलायचंय का ? " 

" मालक, कोणाला भेटायला जाताय सकाळी?" एवढ्या स्पष्ट प्रश्नाने मल्हार चपापला. 

" काका, तुम्हाला सांगणार होतो...!"

" काय ? " काका अधिकाराने विचारत होते. मल्हार काहीच बोलला नाही. 

"मालक, तुम्ही वयानी आणि अनुभवानी लहान आहात. खेड्यांमध्ये चरित्र कोरड्या चाऱ्यासारखं असतं. एखाद्याची करडी नजर त्यात तेलाचं काम करते आणि आपला हट्ट आगीचं ! गावभर वणवा पेटत रहातो, संसाराची राख होते...!" काहीही न बोलता मल्हार वर निघून गेला. 

कथा आता फक्त कथा उरली नव्हती. तिच्या बोलण्या-वागण्यातून दिसणारी व्यथा त्यात होती. मल्हार वर आला आणि फोन वाजला. 

" तू मंदिरात जाऊ लागलास, बोलला नाहीस."

" जागा छान आहे. परिसर सुदंर आहे."

" एक गोष्ट चांगली झाली. निदान देव दिसायला तरी लागला."

" तसं नाहीये, मी बसतो, तिथून देव दिसत नाही." 

मोजक्या शब्दांनी संभाषण संपलं. सुहासला आता काळजी नव्हती. घडलेलं एकदा त्याच्या कानावर घालावं, असं तिला मनोमन वाटत होतं. पण ती स्वतःवर प्रयोग करू पहात होती. हा प्रयोग जीवघेणा नाहीये, याची खात्री तिला पटत होती. 

गाडी सुसाट वेगाने रेणापूरकडे धावत होती. मागे सुहास बेशुद्ध अवस्थेत होती. तिच्या आईला आणि मल्हारला , रेणापूर हे एकच ठिकाण होते. काचेवर हळू-हळू पावसाचे थेंब पडू लागले होते. पल्ला लांबचा होता. धोकेदायक होता. अचानक एका ठिकाणी गाडी थांबली. पोलिसांनी एक नाका लावला होता. पुढे जास्त गाड्या नव्हत्या. एका शिपायाने येऊन काच खाली घ्यायला लावली. 

" पूढे मोठा अपघात झालाय, चार-सहा तास लागतील." त्याची नजर मागे गेली. 

" या कोण ?" पोलिसाला थोडासा संशय येणं सहाजिक होतं. 

" बायको आणि सासूबाई आहेत. बरं नाहीये, रेणापूरला चाललोय आम्ही." 

" झोपल्या आहेत का ?" त्यांनी विचारले. 

" हो, मल्हार म्हणाला."

" उशीर होईल साहेब, तुम्ही एक काम करा. इथे जवळ एक जुनं रेल्वे स्टेशन आहे. तिथे यांच्या आरामाची व्यवस्था होईल. बरेच लोक तिकडे पाठवले आहेत. तुमचं नाव आणि फोन नंबर द्या, आम्ही त्यांना कळवतो. व्यवस्था होईल तुमची."

मल्हारने आपली, सुहास, काका आणि सासूबाईंची माहिती दिली. पोलिसाने दाखवलेल्या रस्त्याने मल्हारने गाडी वळवली. 

" मालक, माझ्या माहितीत हा रस्ता नाहीये." काका एकदम बोलले. 

" असू शकतो काका, त्यांनी सांगितलं ना !" 

थोडा वेळाने खरंच एक जून रेल्वे स्टेशन दिसलं. बाहेर काही गाड्या लागलेल्या पाहून तिघांना बरं वाटलं. आई आणि काका खाली उतरले. मल्हारने सुहासला उचलून घेतले. स्टेशन बंद होतं. एका बाकावर सुहास आणि आईला बसवलं. 

" काका, मी काहीतरी खायची व्यवस्था पहातो." तिघांना बसवून तो स्टेशनच्या बाहेर जाऊ लागला. 

" थांब" एकदम आईने त्याला थांबवले. " हे असू दे जवळ." महादेवाची होमाची रक्षा तिने मल्हारच्या हातावर ठेवली. शर्टाच्या खिशात टाकून तो निघाला.

बाहेर सगळं सुनसान होतं. तीन-चार गाड्या होत्या. पण माणसं कुठेही नव्हती. एका ठिकाणी एक झोपडी सारखं त्याला दिसलं. थोडासा पाऊस सुरु होत होता.

" आहे का कुणी..?" त्या झोपडीच्या दारावर त्याने थाप मारली. आतून काहीच आवाज आला नाही. बाजूला भिंतीत एक खिडकी होती. त्याने तिचे दार थोडे आत ढकलले. " कुणी आहे का ?"

" काय हवंय?" आतून एक खर्जा आवाज आला. 

" स्टेशन वर आलो आहे, काही खायला मिळेल का ? बनवून दिलं तरी चालेल, पैसे देतो !" 

" मिळेल...आत या." 

थोडं घाबरून मल्हारने झोपडचे दार आत लोटलं. आत चुलीपाशी एक दिवा होता. एक म्हातारा उठून त्याच्या जवळ आला.

" इकडं कुठं ?" 

" रेणापूरला जातोय, चार माणसं आहोत." 

" कुठून आलात ?" 

"पुण्याहून." 

" या स्टेशनचा पत्ता कुणी दिला." 

" पोलिसांनी." 

ते आजोबा हसू लागले. डब्यात हात घालून समान बाहेर काढू लागले. 

" त्यांचं काय जातंय, त्यांना कुठे काय माहित असतं !" आजोबा कुत्सित हसत म्हणाले.

" म्हणजे ?" 

" ५० वर्षाहून जास्त काळ झाला. एक गाडी धावली नाही इथून..!" 

" पण आता तर तिथे आहेत , पुढे अपघात झालाय, लोक थांबले आहेत." 

" हो, थांबले आहेत लोक." आजोबा खूप कोड्यात बोलत होते. 

" स्वयंपाक होतो, तो पर्यंत एक काम करा. तुमच्या मंडळींना इकडे बोलावून घ्या." 

" का ? "

" का म्हणजे, जागा चांगली नाहीये ती..! जुनं बांधकाम आहे. रात्रीचा भरवसा नसतो. कोण, कुठून, कसा येईल, सांगता नाही येत. तिथे त्यांचा मुक्त संचार आहे. त्यांचीच जागा आहे ती. त्यांना आणा आधी...! " 

मल्हार पळत स्टेशनवर आला. आई आणि सुहास तसेच बसले होते. काका मात्र दिसत नव्हते. मल्हारचा घसाच कोरडा पडला. 

" आई, काका कुठे आहेत." 

"आत्ता होते, पाणी प्यायला जातो म्हणाले."

" उठा इथून, ही जागा चांगली नाहीये, चला पटकन." सुहासला उचलून मल्हार बाहेर धावू लागला. आई मागे होतीच. एकदम समोर काका त्याला दिसले. 

" काका, चला, ही जागा चांगली नाहीये ! आपल्याला निघायला हवं..! "

" कुठं..!" एकदम काकांचा आवाज बदलला. मल्हारची भीतीने गाळण उडाली.

" तुला काय वाटलं, इतक्या सहजासहजी हिला घेऊन जाऊ देईन मी तुला.!" मागे उभ्या असलेल्या आईला काकांचे बदलले रूप पाहून रडू कोसळले. त्यांच्या डोळ्यात रक्त उतरले होते. त्यांचे कपडेही फाटले होते. 

" काका...!" मल्हार एकदम ओरडला.

" हिला इथेच ठेव, तुम्ही दोघ जिवंत जाल." काका एक-एक पाऊल पुढे सरकू लागले. अचानक स्टेशनचे दिवे थरथरू लागले. मल्हार सुहासला घेऊन पळू लागला. आईही मागे पळत होती. पण काकांचा वेग कित्येक पटीने जास्त होता...!

....

सकाळ झाली तेव्हा मल्हार गाडीतच झोपून होता. आजूबाजूला कुणीच दिसलं नाही. घाई-घाईने उठून तो समोरच्या झोपडीत शिरला. 

"तुम्हाला अजून वाटतं, तुम्ही यांना सुखरूप नेऊन, परत घरी घेऊन जाऊ शकता ?" आजोबा एकदम त्याला समोर दिसले. " ती एका अश्या शक्तीच्या विळख्यात आहे, जी तुम्हाला दिसत नाही, तुम्हाला ठाउकही नाही ती कुठून आली, कशी आली." त्यांनी चहाचा कप मल्हारच्या हातात ठेवला."

" काय झालं काल रात्री..?" मल्हारनी त्यांना विचारलं. 

" तेच, जे इथे नेहमी होत आलं आहे ! कुणीतरी चुकून-माकून आत जातं ! मनाने ,शरीराने कमकुवत असलेल्यांना ते आपल्या अधीन करून घेतात. मला कळलं तर मी जातो, नाही कळलं, तर दुसऱ्या दिवशी सकाळी कळतंच. उरलेले लोक ,घाबरलेले, बिथरलेले, रडके चेहरे घेऊन आपल्या व्यक्तीच्या जाण्याचा आक्रोश करत बसलेले असतात." 

" आणि हे बंद का नाही होत." मल्हार चहा पित आपल्या लोकांना शोधत होता.

" वाढतायत ते, अशे शेकडो हिंस्त्र आत्मे आत आहेत. कोणाला अडवाल ?" आजोबांनी एका खोलीचं दार उघडलं. आत आई, काका आणि सुहास होते. त्याला पाहून हायसं वाटलं."

" बराच वेळ तुम्ही परत आला नाहीत, तेव्हा मला संशय आला. तुमच्या बायकोचा जीव धोक्यात होता. तुम्ही अर्ध-बेशुद्ध अवस्थेत होता." समोरचं दृश्य आणि काल रात्री काय घडलं असेल याचा अंदाज मल्हारला आला. खोलीचे दार लावून तो बाहेर आला. 

" आम्हाला इथुन लवकर गेलं पाहिजे." 

" या पूढे सूर्यास्तानंतर त्यांना घेऊन प्रवास टाळा..!" 

....

" मी रोज पहातो, संध्याकाळी येत नाहीस. किती सुंदर वाटत असेल इथे संध्याकाळी." न राहून मल्हार मानसीला बोललाच. 

" हो, असतं सुंदर इथे संध्याकाळी. पण प्रत्येकाला नाही. माझ्यासाठी दिवसाचे सगळे प्रहर सारखेच आहेत."

" मानसी...!" त्याने तिच्या हातावर हात ठेवला. तिनेही नकार दिला नाही. तिचा स्पर्श अत्यंत गार होता. पहाटे झालेल्या त्या पावसासारखा. अनेक रंगाची फुलं त्या काळ्या रस्त्यावर पसरून पडली होती. त्यात नेमका कोणता रंग कोणाचा होता, हे सांगणं कठीण होतं. वाऱ्यावर सैरा-वैरा उडणाऱ्या पाचोळ्यासारख्या भावना ही ,कशाचीच तमा न बाळगता उडत चालल्या होत्या. न घर, न लिखाण, न उरलेलं जग. हा नित्याचा सहवास आता व्यसनाधिनतेकडे वळत चालला होता. 

तिच्या बोलण्याचा, वागण्याचा एक विचित्र प्रभाव त्याच्यावर होत होता. सहसा तो कुणाशी बोलत नव्हता. आता तो कुणाकडे बघतही नव्हता. येताना आणि जाताना त्याचे लक्ष फक्त रस्त्यावर होते. त्यालाही कळत होते, की त्याचा हा अट्टाहास पुढे जाऊन त्याच्या आणि सुहासमध्ये काहीतरी अघटित घडून आणू शकत होता. पण तो फक्त आजचा विचार करत होता. 

" मालक, निशाताईंचा फोन आला होता." काकांनी निरोप देताच त्याने निशाला फोन केला.

" वाचलं मी , तू पाठवलेलं. ग्रीप आहे रे कथेला. कुणाची तरी वेदना तू अतिशय खोलवर जाऊन मांडली आहेस. अगदी डोळ्यासमोर चित्र उभं रहातं."

" थँक्स !" त्याने अत्यंत गंभीर आवाजात तिला उत्तर दिलं. 

" मल्हार, एक विचारू?" 

" हा " 

" तू पहिल्यांदा लिहितोयस असं वाटत नाहीये."

" म्हणजे ?" मल्हारला तिच्या बोलण्याचा रोख कळला होता. 

" अगदी हुबेहूब वाटावं, असं कसं लिहू शकतोस तू ?" ती थोडीशी थांबली. तिला आलेला संशय तिला शब्दांत मांडता येत नव्हता. " कोणी आहे का ? मानसी...!" 

" नाही, तुला उगाच संशय येतोय..!" 

" हा उगाच असेल तर ठीक आहे मल्हार, खरा नसावा हीच इच्छा ! मला माहितेय तुझ्या पात्रांची वावर तुझ्या कल्पनाविश्वात अगदी खोलवर असतो. पण इथे काहीतरी वेगळं लिहितोयस तू...!" 

तिचा संशय रास्त होता. कथा तशीच होत चालली होती. जगाला माहित नसलेल्या गावात एक काल्पनिक पात्र एका साधारण माणसाच्या आयुष्यात कोल्हाळ माजवतं.या कथेची सुरवात चांगली होती. पण मुख्य पात्रांची एकमेकांत वाढत चाललेली गुंतागुंत अतिशय क्लेशदायक होती. तिच्या न दिसणाऱ्या वेदनेत, तो स्वतःला गुंडाळून ठेवत होता. तिच्या धूसर असणाऱ्या अस्तित्वात, तो स्वतःच्या काही खुणा ठेऊ इच्छित होता. सहवास सुखद होता, पण त्या मागचं वलय मात्र खूप त्रासदायक होतं. 

"मालक" रात्री अचानक काकांनी खोलीचं दार वाजवलं. दार उघडल्यावर ते आत आलेच नाहीत. पण त्यांच्या चेहऱ्यावर मात्र कसला तरी त्रागा स्पष्ट दिसत होता. 

" त्या दिवशी तो पुजारी म्हणाला ते खरंय का?" 

" काय?" 

" तुम्ही त्या मुलीला...!" 

" कोण मुलगी ? " यावर मल्हारची चोरटी नजर काकांनी हेरली.

" मालक, लपवायचं तर खुशाल लपवा ! पण आधी त्याबद्दलचा मागचा पुढचा विचार करून घ्या." 

" काका, तुम्हाला सांगणारे लोक नेमके आहेत तरी कोण ? आणि त्यांचा माझ्या वयक्तिक आयुष्याशी संबंध तो काय ?" मल्हारही आता स्पष्ट बोलू लागला होता. 

" तुमच्या आयुष्याशी नाहीये, तिच्या आयुष्याशी खूप जवळचा आहे. ती जागा, तिथली झाडं, ते मंदिर, तो आवार, सगळं त्यांचं आहे. तिथे होणाऱ्या किरकोळ हालचाली सुद्धा ते गांभीर्याने घेतात. माझी फक्त एक इच्छा आहे. घरापर्यंत काही येऊ देऊ नका. हे सगळं खूप सुंदर आहे. याला कुठेही गालबोट लागलं तर...!" काकांनी बाहेरून दार लावून घेतलं. 

काही केल्या सुहासला रात्रीची झोप नीटशी लागत नव्हती. हवेशी असणारा सलोखाही थोडा कमी झाला होता. रात्री तिच्या खोलीचे पडदे हलले, की तिच्या मनात संशय घर करायचा. ती घरात एकटी होती, हा तिचा समज वेळोवेळी पुसला जाऊ लागला होता. आईने दिलेकी रक्षा तिच्या सोबत होती. पण ती निर्जीव होती. तिची मनःस्थिती वाटून घ्यायला मल्हार सोबत असणं गरजेचं होतं. पण त्याला यातलं ती सांगू इच्छित नव्हती. तिच्या मनातली भीती ,तिच्यातील धैर्यावर हळू-हळू हावी होत चालली होती. रात्री छोट्याश्या चाहुलीने तिला जाग यायची. घरातील एखाद्या अंधाऱ्या कोपऱ्यात उगाच नजर जायची. तिथे नसायचं कुणी, पण तिला भास होऊ लागले होते. कित्येकदा तिने उघड्या डोळ्यांनी सूर्य उगवलेला पहिला होता. स्वतःला आरश्यात बघताना डोळ्याभवती तयार झालेली काळी वलंयं तिच्या भवती वाढत असलेलं नैराश्येचा वाढता विळखा अधोरखीत करत होती. 

.....


मल्हार पहिल्यांदाच रेणापूरला आला होता. का, पण त्याला आश्रमाच्या आवारात येताच मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटत होतं. एखाद्या जागेचा गुणही असतो तसा. तिथे पाऊल पडताच विचारातुन त्या जागेच्याच स्वभावाच्या लहरी बाहेर पडू लागतात. प्रश्नांची उत्तरं सापडू लागतात. मार्ग सुकर होत जातो. कदाचित त्या जागेची ठेवणं, तिथला निसर्ग , तिथे चालत असलेलं कार्य याला कारणीभूत असतं. इथे गुरुजींनी ते सगळं मांडून ठेवलं होतं. माणसाच्या विवंचनेला समाधान मिळो न मिळो, इथे त्याला शांत चित्ताने विचार करता यावा, यासाठीच हा आश्रम होता. पहाटेच्या गार वाऱ्यात सुहासच्या बेशुद्ध चेहऱ्यावरचा शीण थोडा निवळलेला दिसत होता. तिच्या आतल्या एका अज्ञात मनाला ही जागा आणि तिचे वैशिष्ट्ये ठाऊक होते. इथे आपण सुखरूप असू, हा भास तिच्या अंतर्मनालाही झाला असावा. तिच्या अंगात थोडेच उरलेले त्राण सक्रिय होऊ लागले होते. तिला उचलताना मल्हारला हे जाणवले. गेल्या बऱ्याचदिवसांपासूनचा रक्तप्रवाह थोडासा स्थिर होऊ लागला होता. 

" गुरुजींनी तुमची व्यवस्था आधीच केली आहे." तिथला एक सेवक त्यांना बघताच धावत आला. "तुम्ही तयार होऊन बसा, गुरुजींची पूजा आटोपली, की मी बोलवायला येतो.

वाळ्याचा लेप असलेली ती छानशी कुटीर होती. सूर्योदय स्वच्छ दिसत होता. काका आणि मल्हार बाहेर आले. आजूबाजूचा परिसर पावसामुळे फार लोभस वाटत होता. जागोजागी लावलेले धूप, कानाला ऐकू येणारा बारीक टाळ , वेग-वेगळे पक्षी , यातूनच तिथे एक शांत आणि स्थायी ऊर्जानिर्मिती झाली होती. 

"झालीये पूजा, तुम्हाला बोलावलं आहे." आई आणि मल्हार यायला निघाले. 

" तुम्ही नाही, फक्त यांनाच बोलावलं आहे.तुम्ही सुहासपाशी थांबा." गुरुजींनी फक्त मल्हारला बोलावले होते. याने आई मात्र कोड्यात पडली. 

हातात मोठे धुपाचे ताट घेऊन गुरुजी प्रत्येकाला धूप देत होते. त्यांना मल्हार लांबून येताना दिसला. त्याच्याकडे चालत येऊन त्याला सुद्धा त्यांनी धूप दिला.

" मला ठाऊक आहे, तुझा यावरचा विश्वास थोडा डळमळीत आहे. पण घे...!" गुरुजींनी सांगितले तसे त्याने केले. त्यांच्या स्थानावर त्यांनी त्याला बसवले. 

" या ठिकाणी सगळेच सारखे आहेत मल्हार. आस्तिक-नास्तिक, भूत-वर्तमान-भविष्य , प्रश्न-उत्तरं, विवंचना आणि त्यांची तोडगी. सगळं एका ठिकाणी स्थिर-स्थावर आहे. भीती, नैराश्य हे सुद्धा इथे आहेत, पण ते फक्त मनात आणि डोक्यात. इथली सृष्टी काही वेगळी नाहीये, पण इथे नसणाऱ्या गोष्टींमुळे लोकांना हे ठिकाण जरा शांत वाटतं." शहरी आयुष्याला गुरुजींनी मारलेला हा टोला मल्हारच्या लक्षात आला. 

" कधी-कधी माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना ,त्याच्या कर्माची फळं असतात, तर कधी त्याच्या प्रारब्धात ते लिहिलं असतं. आपल्याला कळत नाही, हे सगळं का होतंय, याची काय कारणे आहेत, किंवा याला जवाबदार कोण ? आपण या शंका घेऊन जगभर फिरत असतो. पण आपण स्वतःच्या मनात कधी याची उत्तरं शोधत नाहीच !" 

"मग सुहासची अशी...!" मल्हारने मुद्याला हात घातला. 

" तुला काय वाटतं मल्हार ? डोळ्यांना दिसणारे, स्पर्श करता येणार, ऐकू येणारेच विश्व आहे का?" गुरुजींच्या डोळ्यातलं तेज मल्हारला असाह्य होत होतं. "स्थावर विश्वाच्या पलीकडे सुद्धा एक शक्ती असते. जगाला नियंत्रित ठेवणारी, चालना देणारी, गती देणारी एक शक्ती ,जिला आपण देव म्हणतो...!" गुरुजींनी त्याच्या हातात एक पांढरा शुभ्र दगड ठेवला. " आणि या व्यतिरिक्त, न दिसणाऱ्या , भासात आणि जाणिवांमध्ये वावरणाऱ्या , नेहमीच अवती-भवती असणाऱ्या, पण प्रत्येकाच्या भाळी नसणाऱ्या काही शक्तीही आहेत. त्याला तुम्ही ओळखत नाहीत, कारण त्या कधी तुम्ही पहिल्या नाहीत, अनुभवल्या नाहीत. प्रत्येकाला त्या दिसत नाहीत, काहींना त्या दिसतात, पण काही त्रास होत नाहीत. आणि काहींना मात्र...!" गुरुजींनी त्याचा हात उघडला. तो दगड ठेवलेल्या ठिकाणी, तळहातावर एक मोठा काळा डाग पडला होता. मल्हार त्याकडे बघतच राहिला.

" पाहिलंस ? कोणतीही वेदना नाही, कोणताही त्रास नाही, कोणताही प्रभाव नाही, पण परिणाम मात्र झाला." 

"हे...हे काय ए?" त्या काळ्या डागाकडे बघून मल्हारही घाबरला.

" माणसाचं शरीर कितीही सुदृढ असलं, तरी त्याच्या अंतर्मनातील विचार असल्या शक्तीला जन्म घालतात, पोसतात. एकदा का यांनी मनात घर केलं, की बाहेर येणं अवघड." तो दगड गुरुजींनी बाजूच्या पाण्यात टाकला. 

" मल्हार, सुहासला वाचवायचं असेल, तर आधी मनातील भीती आणि शंका काढाव्या लागतील तुला. विश्वास ठेवावा लागेल ! दृढ व्हावे लागेल. खंबीर व्हावे लागेल." मल्हारची मान खाली गेली. आज पर्यँत त्याच्या मनात रेणापूर, आश्रम, गुरुजी, त्यांचे सामर्थ्य, या बद्दल नेहमीच एक संशय होता. त्यामुळे कित्येकदा त्याने इथे येण्याचे टाळले होते. आज सुहासला वाचवण्यासाठी इतरत्र कुठेही काही पर्याय उरले नव्हते, म्हणून तो इथे आला होता. आणि निघताना सुद्धा त्याच्या मनात अनेक किंतु होतेच. 

" या नदीच्या प्रवाहात मनातलं सगळं विष व्हावता आलं तर बघ !" गुरुजींना त्याला नेसायला एक पंचा दिला. 

त्या शांत, सुंदर नदीकाठावर आल्या-आल्या मल्हारच्या आतला कोल्हाळ शांत झाला. आपण सुहासशी गेल्या काही दिवसात किती वेगळं वागलो, याची जाणीव त्याला हळू-हळू व्हायला लागली होती. तिने वेळीच आपल्याला सगळं सांगितलं असतं, तर कदाचित आपण तिच्याकडे आलोही असतो, या विचाराने तो जास्तच खच्ची होत राहिला. अंगावरचे कपडे काढून तो डोहात उतरला. कमरेपर्यंत तो आत गेला. पायाखाली गुळगुळीत जमीन लागली आणि अचानक त्याला त्या डोहात कोणीतरी ओढले. मिळालेल्या वेळात ,जमेल तेवढा श्वास घेऊन तो पाण्यात शिरला. डोळे उघडल्यावर त्याला समोर पाण्यात निवांत बसलेली सुहास दिसू लागली. तिच्या चेहऱ्यावर नेहमीपेक्षा जास्त तेज होते. तिच्याभवती एक सुंदर वलय तयार झालेलेही त्याला दिसले. ती त्याला बोलवत होती. मल्हार पोहत-पोहत तिच्यापाशी पोहोचला, तोच ते वलय काळे होत गेले. मागून एक मोठा पाण्याचा लोट आला आणि मल्हारकडे बघत, हसत सुहास त्या डोहात नाहीशी झाली. कुठूनतरी एक मोठी लाट आली आणि मल्हार पाण्याच्या वर फेकला गेला. पाण्यातूनच त्याने वर उगवत्या सूर्याकडे पहिले. आता त्याच्यासमोर सगळे दृश्य स्वच्छ तरळत होते. हसत-खेळत सुहास त्याच्यापासून लांब जात होती. 

" मल्हार, सुहासला जे काही होतंय, त्याला एकमेव तू जवाबदार नाहीयेस. तुला कळतंय का ? हे सगळं कुठून सुरु झालं, हे सगळं का सुरु झालं ?"

" नाही , तितकंसं स्पष्ट काही कळत नाहीये !" 

" मी लेखक नाही, साहित्य धर्माशी माझा तितकासा जवळचा संबंधही नाही. पण मला कळतं, तुम्ही जेव्हा एखादी कथा सुरु करता, तेव्हा त्यात इतके गुंतून जाता, की सभोवताली काय सुरु आहे, याचे भान हळू-हळू कमी होत जाते. त्या कथेभवती तुमचे वयक्तिक आयुष्य दम तोडत जाते. तुमची व्याप्ती, विचार सगळं फक्त आणि फक्त त्या कथेपूर्ती उरतं. वास्तवात असलेले तुमचे सोबती, डोळ्याला दिसणाऱ्या जागा, यांच्यात आणि तुमच्यात एक अज्ञात अंतर पडत जाते.तुम्ही त्या कथेच्या आजूबाजूला आपलं एक विश्व तयार करून, त्यातच जगायला सुरवात करता खरे, पण जसजशी कथा संपत येते तसं एक-एका पात्राला गती मिळत जाते. काही पात्रं अजरामर होतात, तर काही काळाच्या ओघात नाहिशे होतात. लोक त्यांना विसरतात."

"हो, बरोबर आहे." मल्हारला हे पटलं होतं. 

"पण काही पात्र तुमच्या काल्पनिक विश्वातून अज्ञातपणे तुमच्या वास्तवात दाखल झाले तर...?" 

"कसं शक्य आहे, कल्पना वास्तवात यायला कुठेतरी एक दुवा लागतो, एक पुल लागतो." 

" तो आपणच देतो त्यांना...!" गुरुजींनी मध्येच मल्हारचे वाक्य कापले. 

"म्हणजे...?" गुरुजींची वाढत जाणारी कोडी मल्हारच्या डोक्यावरून जात होती. 

"मल्हार, मी आधीच बोललो, आपल्याला दिसतं, स्पर्श करता येतं, ऐकू येतं,तेच विश्व नसतं. यात अश्या हजारो गोष्टी आहेत, ज्या तुझ्या-माझ्याच काय, पण जगातील हजारो रहस्याचा समजुतीपालिकडे आहेत. आपण विचारही करू शकत नाहीत, ते आपल्या आजूबाजूला, डोळ्यादेखत घडतंय. फरक फक्त एवढाच आहे, की आपल्याला परिणाम दिसू लागल्यावर त्याची सत्यता आणि गांभीर्य कळतं." 

" परिणाम तर आहेत न समोर गुरूजी...! सुहास." 

" हो, पण या आधीच आपण जागे व्हायला हवं होतं." 

दोघजण सुहास झोपली होती त्या कुटीरात आले. तिला खूप गाढ झोप लागली होती. कदाचित गेले अनेक दिवसात तिची हीच झोप सुखकर होती. गुरुजींनी सगळ्यांना बसायला सांगितले. त्यांचा एक सेवक गंगाजल घेऊन आला. एक हवनपात्रही होते. त्यात गाईच्या शेणाने बनवलेल्या गौऱ्या होत्या. गुरुजींनी गंगाजल हातानेच सगळीकडे टाकले. एका कोपऱ्यात धूप करून ते बाजूला झाले. पूर्ण खोली हळू-हळू धुराने भरून गेली. त्या कुटीराची जमीन सुद्धा शेणाची होती. सगळे काही नैसर्गिक होते. जमिनीतून ओल्या शेणाचा वास येताच गुरुजींनी सगळ्यांना बाहेर काढले. 

"मल्हार, आता मी काय सांगतो, ते नीट ऐक. सुहासचा इलाज हा कोणत्याच पूजा-विधीत, मंत्र-तंत्रात नाहीये. तो इलाज तुलाच करावा लागणार आहे. तिच्या अवती-भवती तयार झालेली ही वलये खूप गूढ तर आहेतच, पण सगळ्यात घातक गोष्ट म्हणजे, ती काल्पनिक आहेत." सगळे एका ठिकाणी बसले. 

" तुझ्या कथेतून जन्माला आलेल्या पात्रांचा प्रभाव तुझ्यावर झाला आहे. तू त्यांना कथेत जिवंत करतोस खरा, पण इथे ते स्वतःहून जिवंत होतायत.शास्त्रात याला तोडगा नाहीये. कारण शास्त्रात फक्त वाईटवर चांगल्याने करावयाची मात असते."

" म्हणजे...माझी कथा..?" आता हळू-हळू मल्हारच्या लक्षात सगळं येऊ लागलं होतं. 

"हो, तू लिहिलेलं 'ते' पात्र तुझ्या वास्तवावर हावी होतंय. तू कथेत त्या पात्राचं केलेलं वर्णन, त्याला दिलेला भावनिक आधार, त्याची प्रशंसा आणि त्या पात्राशी तुझी वाढलेली जवळीक, यातून त्याला बळ मिळत गेले आणि त्याने तुझ्या दिसणाऱ्या विश्वात प्रवेश केला."

" पण, ते सगळं काल्पनिक आहे ! कसं शक्य आहे ? " मल्हारला घाम फुटला. 

" आहे, शक्य आहे. कथा तुझ्या डोक्यात आहे, मनात आहे, पानावर तू ती लिहितो आहेस. त्या पात्राचे एक अस्तित्व आहे. त्याला भाषा, देह, भावना आहेत...! तुझ्या विवेकाला, तुझ्या बुद्धीला आणि पर्यायाने तुझ्या दिनचारियेत या पात्राचा एक मोठा वाटा आहे. तू कथेत लिहिल्याप्रमाणेच त्याचा स्वभाव आहे ! तू जे लिहितोस, तेच ते पात्र जगायचा प्रयत्न करतंय. कदाचित, तुझी आणि त्याची नाळ आज इतकी घट्ट झालीये, की तुझ्या आजू-बाजूला असणाऱ्या प्रत्येक गोष्टीत आता ते वाटा मागतंय." 

" पण गुरुजी, याआधी मी असं कधीच कुठेही ऐकलं नाहीये." 

"मी ही नाही ऐकलंय ! पण सुहासला आलेले अनुभव खोटे नाहीयेत...! सुहास इथेच राहील. मल्हार आणि काकांना परत पाठवले तरी चालेल. तिचा इलाज , तिच्या दुर्दशेच्या उगमात आहे." एवढे बोलून गुरुजी चालायला लागले. सगळे हतबल होऊन बघू लागले. ते थांबले...! 

"हो, तिच्या जीवाला इथे कोणताही धोका नाहीये. ही खात्री मी देतो..!" त्यांचे हे वाक्य खूप दिलासा देणारे होते. 

एकट्यानेच घरात खंगत चाललेली सुहासच्या मनालाही वाळवी लागत चालली होती. आता तर झोपेच्या गोळ्याही थकल्या होत्या. ती कोणासही घरी बोलावून ,कोणाचाही जीव धोक्यात घालू इच्छित नव्हती. संध्याकाळी घरी आल्यावर दार उघडताच येणाऱ्या उग्र द्रपाची आता तिला सवय झाली होती. धूप, अगरबत्ती, रूम फ्रेशनर्स सगळं-सगळं डोकं फोडून झालं होतं. कित्येकदा त्या वासाचा माग काढत कपाटातला पसारा बाहेर येत होता. बेडरूम मध्ये पाण्याच्या बादल्या-बादल्या ओतत असताना तिच्या मागवून तिच्या परिस्थतीला कोणीतरी हसून उडवून लावत होते. कधीतरी मनात यायचे, अख्ख्या घराला आग लावावी, पण त्याने काहीच होणार नव्हते.रात्री तोंडावर पांघरूण घेतल्यावर घरातल्या दिव्यांवर, निर्जीव वस्तूंवर कोणीतरी येऊन हक्काने राज्य करत असे. तिच्या पलंगावरुन,लपून, तिने असंख्य वेळा ,काही सावल्या इकडून तिकडे धावताना पहिल्या होत्या. आपण झोपल्यावर कोणीतरी श्वास घोटून आपला जीव घेईल, ही शंकाही आता मरून गेली होती. रात्री केव्हातरी झोप लागायची. सकाळी लवकर उडून जायची. घरातल्या वस्तू पसरलेल्या असायच्या ! बाथरूम मधलं पाणी बाहेर यायचं. दारांवर नखाने कुणीच्या तरी हिंस्त्र हातांचे ओरखडे असायचे. देवाच्या समोर जमिनीवर अजब खुणा असायच्या. रोज ती घर पुसत होती.

" हॅलो, हॅपी बर्थडे...!" इतक्या पहाटे मल्हारचा फोन आला. आज तिचा वाढदिवसही ती विसरली होती. 

" थँक्स...!" 

" अरे वाह, आम्ही इतक्या सकाळी फोन करून विश केलं, आणि त्याला इतकं थंड उत्तर ?" 

ती काहीच नाही बोलली. 

" सुहास, काय झालंय ? फोनवरही तू खूप मोजकं बोलतेस. आवाजही खूप खोल जातोय दिवसेंदिवस !" काहीतरी बिनसलं आहे, हे मल्हारने ओळखलं होतं. 

" काही नाही ! कामाचं ओझं आहे थोडं." एवढ्यावर संपलं होतं. 

ऑफिस मध्ये गेल्यावर तिच्या वाढदिवसाची मोठी तयारी झाली होती. तिलाही खूप बरं वाटलं. बुके आणि मिळालेले सगळे gifts तिने तिथेच ठेवले. आज थोडा उशीर झाला होता. थोड्या अंतरावर रिक्षा थांबवून पुढे तिने पायीच जाण्याचं ठरवलं. नाहीतरी घरी जाऊन तिला पुन्हा स्वतःला त्या भयाच्या समोर उभं रहायचं होतं. त्या अर्धवट अंधारलेल्या रस्त्यावर तिला भीती नव्हती वाटत. भय घरात होते. 

करर्कन आवाज करत फ्लॅट चे दार तिने उघडले. हातात असलेले मोजके बुके तिने टेबलावर ठेवले आणि ती आत गेली. फ्रेश होऊन बाहेर आली तेव्हा समोर खूप काही बदलले होते. बुक्यातील एक-एक फुल वेगळे होऊन जमिनीवर विखुरले होते. तिच्या थोड्याश्या आनंदावर विरजण घालत कोणीतरी सगळेच पालथे केले होते. 

" तू जो कुणी आहेस, ...!" अंगातील सगळे धैर्य एकत्रित करून सुहास बोलली. काहीच उत्तर आले नाही. 

"तू हे सगळं का करतोयस, कशासाठी करतोयस, हे समोर येऊन सांगण्याची तुझ्यात हिमंत नसावी !" ती मध्यावर उभी राहून सगळीकडे पाहू लागली. 

" माझ्या पेक्षा जास्त तर तू कमकुवत आहेस...! कळतंय न तुला. पाहिल्यादिवसापासून मी लढतेय तुझ्याशी, तुझ्या प्रत्येक क्रियेला एक सुप्त प्रतिक्रिया मिळतेय न तुला ? " तरीही काही हालचाल दिसली नाही. 

"पण आता मी ठरवलंय, तुझा सामना करायचा ! अगदी शेवटच्या श्वासापर्यंत." सुहासने विखुरलेली फुलं गोळा करून नीट लावून ठेवली. काहीही गंभीर घडलेच नाही, या अविर्भावात तिने आपले काम सुरु केले. आपल्या व्यतिरिक्त कुणीतरी आपल्या सोबत रहातंय, हे आता तिला कळून चुकले होते. त्याची काय इच्छा आहे, कितपत तयारी आहे, हे तिला माहित नव्हते. पण तिची तयारी मात्र अद्भुत होती. मनातून भीती जाईपर्यंत प्रतिकार करता येणं शक्य नव्हतं. 

मध्यरात्र उलटली. सुहास अजून जागीच होती. एक छोटासा दिवा तिथे सुरु होता. एकदम बाहेर काहीतरी फुटल्याचा आवाज आला. एक मोठी काच फुटली होती. कशाची होती, हे जाऊन बघणे भाग होते. सुहास उठली. तिने मोठा दिवा लावण्याचा प्रयत्न केला. तो लागला, पण खूप मिणमिणता. तो ठेवलेला छोटा दिवा ही थरथरत होता. त्याचा नाद सोडून सुहास दारापाशी आली. दर उघडायचा प्रयत्न फोल ठरला. कुणीतरी बाहेरून लावले होते. दाराच्या खालच्या फटीतून एक सावली बाहेर फिरत होती. स्वतःचं घर असल्यासारखं वावरत होती. प्रत्येक वस्तू आपल्या जागेवरून हलवत होती, जमिनीवर टाकत होती. आता मात्र सुहासला घाम फुटला. ती सावली म्हणजे तिच्या समोर साक्षात तिचा संशय खरा होऊन घरभर हिंडत होता. सुहासने पुन्हा दाराचा लॅच ओढला. दार घट्ट लागले होते. ती दोन पावलं मागे सरकली. हतोडीने दार तोडावे असे क्षणभर तिला वाटले. पण वाट बघावी, हे ही वाटले. तिचा घसा कोरडा पडला. प्यायला आसपास पाणीही नव्हते. सुहासला आता भोवळ येऊ लागली होती. बाजूच्या भिंतीचा आधार घेत ती तशीच उभी राहिली. बाहेर चाललेलं थरारनाट्य आणि आत ती ! हे केव्हा संपेल, याची वाट बघत होती. एकदम दारात एक फट तयार झाली. आधार घेतंच सुहासने हळूच दार उघडले. बाहेर पडण्याची तिची हिमंत अजून होत नव्हती. फटीतून तिने पहिले. सगळाच हॉल पूर्ण अस्ताव्यस्त झाला होता. फक्त जड वस्तू जागेवर होत्या. काही अंतरावर काचेचे तुकडे पसरले होते. सुहासने ते पहिले आणि तिच्या अंगावर काटाच आला. तिचा आणि मल्हारचा फोटो तुकडे-तुकडे झाला होता. हिमंत करून ती बाहेर आली. पाहिले पाऊल पडले, तेच मुळी काचेच्या तुकड्यावर. तळपायात काच खोलवर रुतली. सुहास एकदम कळवळली. पायातून रक्ताची धार लागली. दुसरा पाय ही उचलला जात नव्हता. तिथेच एका कपाटाला हात लावून सुहास कशी-बशी खाली बसली. तिला काहीच सुचले नाही. रक्त बघून ती आधीच अर्धी खचली होती. समोरचा हॉल हळू-हळू धूसर व्हायला लागला होता. तिची दृष्टी कमजोर होत होती. टेकलेल्या कपाटातुन एक कापडाचा तुकडा तिने बाहेर ओढला. पायातील काच काढणे गरजेचे होते. तिने ते केले. पाय बांधला. पण उठून पाणी पिण्याची हिमंत तिच्यात उरलीच नव्हती. कपाटावर ठेवलेल्या फुलदाणीला तिने खाली घेतले. त्यात थोडे पाणी होते. तिने थोडे बांधलेल्या पायावर ओतले आणि थोडे ती प्यायली. डोळ्यासमोर अंधारी आली. नकळत ती कपाटाच्या बाजूला कोसळली. 

सकाळी दाराची बेल सारखीच वाजत होती. खाडकन सुहासला जाग आली. आता तिच्यात थोडी शक्ती आली होती. तिने पायाकडे पाहिलं. रक्त रात्रीतून थांबलं होतं. जमीनीवर एक मोठे थारोळे साचले होते. पण त्याकडे दुर्लक्ष करत ती उठली. हिमतीने चालत दारापाशी गेली. चैन लावली होती. 

" कोण ए ?" जेमतेम उघडलेल्या दारातून तिने विचारले. 

" मॅडम, सकाळी दूधवाला आला होता. बराच वेळ बेल वाजवली. तुम्ही उघडली नाहीत. म्हणून मीच वर आलो. काही झालंय का ? बरं नाहीये का ?"

"नाही, झोप लागली होती." वॉचमन नी दुधाची पिशवी आणि वर्तमानपत्र त्या खोलीतून आत टाकले.

"हे कुरिअर आलं होतं काल. रात्री तुम्हाला यायला उशीर झाला."

सुहासने ते पाकीट घेतलं आणि दार लावलं. ते मल्हारचे होते. त्यावर 'साभार परत' लिहिलेले होते. सुहासने ते फोडले आणि एका खुर्चीवर बसून ते वाचू लागली. ८-१० पानं होती. 

आणि वाचता-वाचता तिला प्रचंड घाम फुटला. मल्हार गावी गेल्यापासून, आज पर्यंत जे काही तिच्या आयुष्यात घडत होते, ते तंतोतंत त्या पानांमध्ये मांडले होते. अगदी मागच्या काही दिवसातला भयावह मागोवा त्यात होता. सुहासला क्षणभर स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसलाच नाही. तिचे भास, तिला आलेले छोटे-मोठे अनुभव, सगळं-सगळं त्यात शब्दशाह मांडलं होतं. शेवटची काही पानं राहिली होती. ती थोडी थांबली. चहासाठी स्वयंपाक घरात गेली. चहाचा कप घेऊन ती पुन्हा वाचायला बाहेर आली. आता मात्र तिला भीती वाटू लागली होती. पण वाचणे भाग होते. काल घडलेला प्रसंग ही तंतोतंत मांडला होता. 

"हे कसं शक्य आहे..?" सुहासच्या मनात आता भीतीच्या जागी संशय भरला. 

"इतकं तंतोतंत तो कसा लिहू शकतो...? की तो जे लिहितो आहे, तेच...! " सगळी कागदं जामिनावर फेकून ती उभी राहिली. अजून जामिनिवर पडलेला तो फोटो तिने काचा झटकून हातात घेतला. तिला रडूच कोसळले. अर्धवट का होईना, लक्षात आलेला प्रकार भयावह होता. तिने आजूबाजूचा पसारा पहिला. फोटो त्याच्या जागेवर ठेऊन ती फोनकडे वळली. पहिला फोन राजेचा केला आणि दुसरा फोन गावी. 

" कोण, सुनबाई...!" काकांनी फोन उचलला. 

" ते बाहेर गेलेत, फिरायला." काकांचा आवाज थोडा खोल गेला. 

" काका, तिकडे काही घडतंय का?" सुहासने दबक्या आवाजात प्रश्न केला. 

" म्हणजे...?" काकांना प्रश्न तर कळला, पण त्यांच्याकडे द्यायला उत्तरं नव्हती. 

" नाही, काही नाही..! मी रात्री फोन करते." सुहासने फोन ठेवला. 

संध्याकाळी सुहासने मल्हारला काहीही विचारायचा विचार रद्द केला. आठ ते नऊ पानांचा सगळा हिशोब लावणे अवघड होतं. आणि सहज यावर विश्वास ठेवणाऱ्यांमधला मल्हार तरी नव्हता. 

आधी आणि नंतर यातला हा वाद होता. मल्हारने लिहिलेला शब्द-शब्द खरा होत होता. नकळत त्याचं लिखाण पानातून बाहेर येत होतं. सुहासच्या आजूबाजूला फिरत होतं. दोघांनाही याची तसूभरही चुणूक लागली नव्हती. मल्हारने नेहमीप्रमाणे त्याची कथा कधीही लिहिण्या आधी कोणाला सांगितली नव्हती. त्याची पुसटशी रूपरेषा देखील मांडली नव्हती. मग, घडणाऱ्या गोष्टींमध्ये आणि त्या पानांमध्ये इतकं साम्य आलंच कुठून. 

अर्धा दिवस आवरता-आवरता सुहास याचाच विचार करत राहिली. आपल्या घरात असलेलं अज्ञात आता अज्ञात उरलं नव्हतं. पण ते हेच आहे, याचे पुरावे तिला कधीच मिळणार नव्हते. पण घडत्या पुढे हात टेकून उपयोग नव्हता. जर हे लिहिलेले असेच पुढेही घडत गेले, तर या कथेच्या अंतापर्यंत खूप काही गमवावे लागेल, हे सत्य सुहासला राहून-राहून छळत होते. याला काही काळापूर्ती तरी सामोरे जाणे भाग होते. आज पर्यंत घडलेल्या घटनांमध्ये झालेले अतोनात नुकसान जिव्हारी लागणारे होते. यापूढे हे किती रौद्र रूप धारण करू शकेल, हे मल्हारची लेखणी ठरवणार होते. 

" काय करते आहेस हे...!" सुहासला अचानक तिचाच आवाज आला. क्षणभरासाठी तिचा तोल गेला. 

" तुला कळतंय का ?"

तिने समोरच्या आरश्यात पाहिलं. 

" हो...कळतंय मला !" स्वतःलाच उत्तर देताना तिच्यात अतोनात हिमंत आली. 

" एक पात्र, जे मुळात अस्तित्वात नाहीये, ते तुझ्या आयुष्यात येऊन तुझा छळ मंडतंय, आणि तू त्याला थांबवायचं सोडून त्याच्याशी दोन हात करायला निघाली आहेस ? " 

" मग, काय करू मी ? कोणाला जाऊन सांगू, की या पानांत जे लिहिलंय, ते माझ्या आयुष्यात घडलंय, घडतंय ?" 

" मल्हारला सांग...! त्याला त्याची लेखणी थांबवू दे ! "

" त्याने हे सगळं थांबेल, असं तुला वाटतं ?" सुहासच्या या प्रश्नात खूप मोठं तथ्य आणि पुढचा विचार दडलेला होता. 

" या घटनांनी माझ्या आयुष्यात प्रवेश केलाय." 

" मग, त्यांना रोखलं पाहिजे. पूढे काय आणि कसं घडेल, याची तुला काय किंमत मोजावी लागेल, याचा काही विचार केलायस का?" 

" आणि हे सत्य ? जे फक्त तुला आणि मला माहिती आहे. यावर मल्हार तरी विश्वास ठेवेल का ? आणि क्षणभर त्याने ठेवला, तरी याचा अंत त्याला सुचला पाहिजे." सुहासची अंतरात्मा काहीही न बोलता आरश्यात लुप्त झाली. 

त्या रात्री मल्हारला काहीच सुचत नव्हते. कथा मूळ मध्यावर आली होती. त्याला जशी हवी होती, तशी मानसी तो घडवत होता. आजचे प्रसंग पानावर उतरत होते. पण दोघांचे नाते काय आणि कसे रंगवावे, हे त्याला कळत नव्हते. बाहेर पावसाळी हवेने कहर केला होता. अंगणात उतरलेले पाणी बागेत ओल पसरवत गारठा वाढवत होते. चांदणे तर कुठेच नव्हते. खालच्या दिव्याच्या उजेडात त्याला बागेत एक सळ-सळ जाणवली. तो उठून खिडकीपाशी गेला. तशीच चप्पल चढवुन खाली उतरून आला. काकांना पावलांचा आवाज आला. पण ते उठले नाहीत. दाराच्या आवाजाची वाट बघत त्यांच्या जागी पडून राहिले. 

" तू...आत्ता ? या वेळी ?" बागेत वेलींशी खेळणारी मानसी त्याला वरूनच दिसली होती. 

" वेळ नव्हता जात !" तिने शांतपणे उत्तर दिलं. 

"पण, असं वातावरण, त्यात बाहेर अंधार आहे. अश्यात तू एखाद्या अज्ञातासारखं ...!"

" अंधार हा प्रकाशासारखाच एक रंगाचा खेळ असतो. त्यात सावल्याही पडतात, जश्या उजेडात असतात तश्याच." 

" लेखक मी आहे, शब्दाचे खेळ तू का खेळते आहेस?" 

" एकांत हवा होता, आणि या बागे व्यतिरिक्त कुठलीच जागा नाहीये. इथे सगळे मला ओळखतात. सजीव-निर्जीव."

तिच्या उत्तरामध्ये एक अधिकार मल्हारला दिसला. 

" आज मलाही काही लिहायला सुचलं नाही." 

बागेत असलेल्या एका शांत ठिकाणी दोघे जाऊन बसले. 

" तू माझ्या कथेत आहेस...फक्त !" मल्हार बोलला. 

" ही खंत आहे का तुला?" 

" नाही, पण एक सल आहे." 

" ती तशीच असू दे, हे जे आहे, ते क्षणांपुर्ती चांगले वाटेल. वास्तव याची परवानगी देईल की नाही, मलाही शंका आहे." 

" वास्तव आणि कल्पकता, याला समांतर एक जग असावे न मानसी ?" मल्हारचा हळू-हळू वास्तवावरून ताबा सुटत चालला होता. 

" असावे, पण नाहीये ! कारण यात समाज येतो. प्रश्न-उत्तरं येतात. समज-गैरसमज येतात. बंधनं येतात."

"का येतात?" 

"माहित नाही...!" 

वरती छतावरून पावसाचे पाणी खाली उतरू लागले. निसर्गानेच मानसी इथे रात्रभर थांबावी, म्हणून हे केले असावे , असे मल्हारला मनोमन वाटू लागले. स्वतःला झाकून चांदणं केव्हाच ढगाआड लपले होते. मानसीबद्दल काहीच कळले नव्हते. पण त्या क्षणी मल्हार मात्र स्वतःला विसरत चालला होता. 

ओल्या अंगणात पावलांचे ठसे उमटवत मल्हार आत आला. पायरीपाशी काका उभे होते. 

" काल रात्रीपासून बाहेर होता. काय झालंय मालक...!" काहीही उत्तर न देता मल्हार आत गेला. काकांनी त्याला वर जाऊ दिले आणि सरळ बागेत आले. त्यांनी रात्री खिडकीतून आवाज ऐकला होता. त्या ठिकाणी त्यांना काहीच नाही सापडले. पण बागेतली झाडं खूप शांत होती. एकालाही फुलं लागलेली नव्हती. त्यांचा उत्साहही मावळला होता. मल्हार रात्री एकटा नव्हता, याचे काहीच पूरावे नव्हते. ते परत निघाले. अचानक ते थांबले. झटकन उठून त्यांनी मागे पाहिलं...! काही जात्या पावलांच्या ओल्या खुणा त्यांना दिसल्या. कोणाच्या आहेत या खुणा ? कोण आलं होतं...? ....

रेणापूरहुन निघाल्यापासून काका आणि मल्हार एकमेकांशी बोलले नव्हते. गाडीला वेग बऱ्यापैकी होता. मागच्या काही काळात घडलेलं आपल्याला कळलं, पण आपण थांबवू शकलो नाही. याची खंत काका उराशी बाळगून होते. डोळ्यासमोर घडून गेलं, आणि आपल्याला काही दिसलं नाही, याचेही त्यांना विशेष वाटत होते. अंधार पडला होता. कालचे जागरण आज दिवसभर आश्रमातला प्रकार, याने मल्हारचा ताण वाढला होता. रस्त्याच्या कडेला एक छोटं हॉटेल बघून त्याने गाडी आत घेतली. 

" काय करायचं पूढे?" हा प्रश्न काकांनी केल्यावर मल्हारच्या कपाळावर आठ्या येणं सहाजिक होतं. 

"काही कळत नाहीये ! "

" आपण ज्याला सामोरे जाणार आहोत, तो एक जिवंत आभास आहे. त्याला काही आकार नाहिये, त्याचा प्रकार माहित नाही , त्याचे विचारही कळत नाहीयेत." मल्हारच्या या उत्तरात हतबलता होती. पण ती चुकीच्या वेळेची होती. चहाच्या पेल्यातली वाफ हवेत विरावी, तशी जिंकण्याची शक्यता, अश्या बऱ्याचश्या प्रश्नांच्या जाळात विरत होती. 

पहाटे गाडी बंगल्याच्या आवारात शिरली. सर्वत्र भयाण शांतता होती. काकांनी पुढे जाऊन कुलूप उघडलं. मल्हार गाडीतुन त्याचं सामान काढू लागला. सहज त्याची नजर वरच्या त्याच्या खोलीकडे गेली. त्या खिडकीचे एक दार थोडे उघडे होते. गाडी तशीच उघडी ठेऊन तो बंगल्याकडे धावत सुटला. काकांनी कुलूप उघडले होते. विजेचा जोरात धक्का बसून फेकले जावे, तसे जोरात काका आणि मल्हार बाहेर अंगणात फेकले गेले. काकांना क्षणभर काहीच सुचले नाही. त्यांचा श्वासच अडकला. दोघेही बंगल्याकडे बघतच राहिले. पण आधी सावध झालेल्या मल्हारने जवळच्या नळावरुन काकांना पाणी आणून दिले. ते अजून खोकत होते. त्यांना थोडं लागलंही होतं. पण तेवढ्यात ते हसायला लागले. 

" काका...?" मल्हार गोंधळला. काका अजून जोरात हसले. 

" तुम्हाला काही कळलं का?" काका सावध होऊन म्हणाले. 

" नाही, तुम्ही आधी नीट बसा." मल्हारने त्यांना आधार देऊन बसवलं. 

" उत्तरं इथेच आहेत...!" 

" काय बोलता आहात काका...!" काकांनी वरच्या खोलीकडे बोट दाखवलं. 

"ते बघा...! तिथेच आहे उत्तर. आपण कशासाठी आलोय, हे कळलंय तिला...!" 

"तिला...?" मल्हार एकदम चपापला. 

"हो...तिला...!" 

"कोणाला काका...?" 

" तुमच्या त्या, नायिकेला...!"

"म्हणजे...मानसी...!" मल्हारला स्वतःच्या कानावर विश्वास बसेना.

" हो, तीच."

" पण काका, ती तर...!" 

काका एका झाडाच्या बुंध्याला टेकून बसले. 

" मालक, तीच ए, दुसरं कोणीही नाहीये."

" याला काय पुरावा आहे ? कसं शक्य आहे ?" 

" सांगतो...आत चला..!" 

दोघेही दबक्या पावलाने आत आले. अंधार होता. काकांनी लंगडत जाऊन देवासमोर दिवा लावला आणि बाजूची चिमणी घेऊन ते मल्हार जवळ आले. 

" तुम्ही तिला जन्माला घातलं, तिला घडवलं. प्रेम दिलं, आधार दिला. तिला तुमच्या आयुष्यात एक अनन्यसाधारण महत्व दिलं. आणि इथेच घोळ झाला." 

"काका, मला नीटसं कळलं नाहीये." त्याने काकांना समोर खुर्चीत बसवलं. 

" तुमच्या कथेतील पात्र , नकळत जिवंत झालंय मालक...! ही तीच आहे, जी सूनबाईच्या..!" 

" काहीही नका बोलू काका, कसं शक्य आहे."

"मालक, हे तुम्हालाही माहित आहे. आता तरी वेड पांघरू नका. घडली आहे, तुमच्या हातून एक चूक....! "

मागच्या काही दिवसात घडलेल्या सगळ्या घडामोडी मल्हार समोर जसाच्या तश्या उभ्या राहिल्या. मानसीची पहिली भेट, कथेला झालेली सुरवात ! त्यांच्यात वाढत गेलेला जिव्हाळा आणि आपुलकी, फुलत गेलेली कथा. फुलत गेलेल्या कथेतील प्रसंग सुहासच्या जीवनात वास्तव म्हणून उतरत गेले, पण मल्हारला याबद्दल काहीही कळले नाही. तो कथा तशीच लिहीत गेला. हळू-हळू त्याचे मानसीच्या पूर्ण आहारी जाणे, हे कथेप्रमाणेच सुरु झाले. आणि कथा आज त्याला आयुष्याच्या अश्या वळणावर घेऊन आली होती, की ती पूर्ण करणे ही धोक्याचे होते, आणि अपूर्ण ठेवणेही धोक्याचे होते. तो धावत वर गेला. खोलीचे दार उघडले. बंद खिडकी उघडली होती. वाऱ्याने कथेची पानं खोलीभर उडाली होती. बाकीच्या सगळ्या गोष्टी जागेवर होत्या. आपल्या कथेतील एक पात्र, इतके जिवंत झाले होते, की सुहासच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला होता. सुहास काहीच करू शकत नव्हती. ती फक्त सुन्न मनाने आणि खंगलेल्या शरीराने त्या कथेचा शेवट कसा होतो, याची वाट पहात होती.





पसरलेली पानं जमिनीवर बरेच पुरावे सोडून गेली होती. पहिले, दुसरे, तिसरे, अशी कित्येक पानं गोळा करून ती एकामागे एक लावून ठेवणं गरजेचं होतं. मल्हार समोर जटीलता आ वासून उभी होती. हे सगळं गोळा करून नेमकं काय मिळणार होतं. एखादी दीर्घ कथा लिहून, ती जाळून टाकणं सोपं नसतं. आणि जाळल्यावरही त्याचा काही विपरीत परिणाम होऊ शकत होता. त्याने शेवटी एक-एक पान गोळा करायला सुरुवात केली. त्याची नजर सारखीच खिडकीकडे जात होती. दिवस उजडायची तो वाट बघत होता. त्याला पडलेल्या प्रश्नांची, उदभवलेल्या परिस्थितीची, सगळीच उत्तरं फक्त मानसी देऊ शकत होती. पानं एकत्र करून त्याने सारखी केली आणि टेबलावर ठेवली. सूर्योदयाला अजून वेळ होता. तो खुर्चीत मागे टेकुन बसला आणि त्याचा डोळा लागला. 

"मालक...!" हातात चहाचा कप घेऊन काका वर आले. मल्हार खडबडून जागा झाला. 

" काका, चहा राहुद्या. मला जायला हवं." तो घाईतच उठला आणि बाहेर पडला. 

मंदिराचा पूर्ण परिसर त्याने पालथा घातला. मानसी कुठेही दिसली नाही. येणाऱ्या-जाणाऱ्यांना विचारायची काही सोय नव्हती. उगाच संशयाला जागा व्हायची. बराच वेळ तिथे तसाच थांबून तो खिन्न मनाने घराकडे जायला निघाला. एक-एक पाऊल त्याला जड झाले होते. 

" कोणाला शोधतोयस?" अचानक एक धीर-गंभीर आवाज त्याच्या कानी पडला. तो क्षणभर थांबला. एक वयाने वृद्ध ,भगवी वस्त्र धारण केलेला एक योगी रस्त्याच्या एका कोपऱ्याला उभा राहिला होता. मल्हार त्याच्याकडे पहाताच राहिला. 

"तुम्ही...?" तो त्या योग्याला ओळखत होता. 

"हो, मीच ! इतकं घाबरायला काय झालं ? हे बघ, सगळं आहे माझ्याकडे, कमंडलू, कपाळावर भास्म, अंगावर स्मशानातील राख, स्वभावही तापट...! काही राहिलं तर नाही ना ?" तो योगी अत्यंत शांतपणे म्हणाला. 

" हे कसं शक्य आहे, तुम्ही..?" मल्हार दोन पाऊलं मागे सरकला. 

" का शक्य नाहीये ? आणि अजूनही तू शक्य-अशक्यांच्या गणितात अडकला आहेस ? इतकं होऊन देखील..?" 

" हे मानवी नियमांचं सपशेल उल्लंघन आहे." मल्हार त्याच्या अंगावर जवळ-जवळ ओरडलाच. 

" कोणी केलं ? तूच न ? हे परमेश्वराने घडवलं नाहीये. त्याच्याकडे काहीही मागणं व्यर्थ आहे, हे तूच लिहिलं होतंस ना...!" 

"हो...!" मल्हारला आठवलं. 

"मग, तो देव कसा धावून येणार तुझ्यासाठी ?" 

"मी देवाला शोधायला आलोच नाहीये." मल्हार अजूनही त्याच्याच विचारांवर खंबीर होता. त्याच्या कथेतही तो खंबीर होताच. " जे डोळ्यांनी पहिले नाही, कधी अनुभवले नाही, त्याचे असणे-नसणे मान्य तरी कसे करायचे ? "

" खरंय, जे डोळ्यांना दिसलं, ते कुठे खरं होतं ?" आता योग्याने मुद्याला हात घातला. 

" तू बघत आलास न तिला, बोलत होतास तिच्याशी, तिचं ऐकून घेत होतास...! आता कुठे आहे ती ?" 

मल्हार त्याच्या समोर खिन्न उभा होता. त्याला या योग्याकडून अपेक्षा होती. पण तो योगी काही करू शकत नव्हता. कारण मल्हारच्या कथेत त्याचे स्थान संशयाच्या भोवऱ्यात होते. देवावर, अध्यात्मावर नसलेला विश्वास इथे अडवा आला होता. त्याला काय करावे काहीच कळेना. 

" मला मान्य आहे, तुझ्या विश्वासावर या गोष्टी येऊन थांबतात. पण आज तुला कुणीही माणूस मदत करू शकणार नाहीये. हे मानवी विचारांच्या वर आहे. तुला आता एकच पर्याय...!" तेवढ्यात मंदिराची घंटा वाजली. योग्याने त्याकडे पाहिले. मल्हारही क्षणभर आवाजाच्या दिशेने पाहू लागला. त्याने डोळे बंद केले. त्याच्या कथेत त्या योग्याला निर्णायक स्थान देणे गरजेचे होते. तो देवाचा माणूस होता. हे सगळं जितकं स्वंयरचीत होतं, तितकंच ते शाश्वतही होतं आणि आटोक्यातही होतं. फक्त योग्य मार्ग सापडणे गरजेचे होते. 

मल्हार तसाच माघारी फिरला. बरोबर गाभाऱ्याच्या समोर जाऊन उभा राहिला. चार पायऱ्या चालून जाणे त्याला थोडे जड झाले होते. पण सुहासच्या जगण्याचा प्रश्न होता. तिच्या नाशीबात नकळत एक शिक्षा आली होती. पुढचा-मागचा काहीही विचार न करता, मल्हार मंदिरात गेला. नंदीला नमस्कार करून तो गाभाऱ्यात गेला. पिंडीसमोर मांडी घालून बसला आणि त्याने हात जोडले...! बराच वेळ झाला. तिथे काहीही चमत्कार घडणे अपेक्षित नव्हते. तो उठून बाहेर आला. मंदिराबाहेरची भिंत रंगवण्यात एक माणूस दंग होता. त्याच्या बाजूने जात असताना तो मल्हारला ला सहज म्हणाला, 

"साहेब, नवीन रंग द्यायचा, म्हणजे जुना रंग पुसावा लागतो." त्याकडे फारसे लक्ष न देता मल्हार घराकडे चालता झाला. 

त्या दिवसापासून पावसाचाही रंगारंग बदलला. एरवी सुखद वाटणाऱ्या धारा आता जोरात बरसू लागल्या होत्या. वाऱ्यानेही आपले भाबडे रूप बद्दलले होते. वाहताना झाडांच्या उंच फांद्यावरची घरटी धडाधड जमिनीवर कोसळत होती. विजेचे लपंडाव सुरु होतेच. अभाळातूनही एखादी वीज दूर शेतात पडत होती. वाऱ्यामुळे बंगल्याच्या दारं-खिडक्यांची आदळ-आपट सुरु झाली होती. 

" हे एकदम कसं सगळं बदललं?" काका खिडक्या लावत असताना मल्हार एकदम अंधारात खाली आला. 

"या दिवसात असं व्हायचंच.तुम्ही वरची दारं खिडक्या लावून झोपा."आपल्या विखुरलेल्या कागदांचा गठ्ठा मल्हारने नीट जपून ठेवला होता. फडफडत्या चिमणीच्या उजेडात काहीही लिहिणे आज तरी शक्य नव्हते. गेले दोन दिवसांचा थकवा अंगात होता. तो पलंगावर जाऊन बसला. 

अचानक मध्यरात्री त्याला खाली कसलातरी आवाज आला. काहीतरी जड वस्तू भिंतीवर आदळली होती. तो एकदम उठला आणि दार उघडून खाली येऊ लागला. 

"काका ? पडलात का ? " अंधारात काका कुठेतरी पडले असतील, म्हणून तो चार पायऱ्या खाली उतरला. 

"मी नाही, माजघरातली पोती पडली असतील. सकाळी बघू." निश्वास टाकत मल्हार वर जाऊ लागला. तेवढ्यात त्याची नजर खिडकीतून दिसणाऱ्या बागेकडे गेली. त्याला समोर पाहून घाम फुटला. झपझप खाली उतरून तो बाहेरच्या दाराकडे गेला. 

"नका जाऊ बाहेर, वातावरण चांगलं नाहीये...!" काकांच्या या इशाऱ्याकडे त्याने पार दुर्लक्ष केलं. 

"तू...? इथे काय करते आहेस ?" त्याच्याकडे पाठ करून उभ्या असलेल्या मानसीला त्याने विचारले. 

" तुलाही माहिती आहे, मला दुसरी जागा नाहीये !" तिने एकदम शांतपणे उत्तर दिलं. पण या वेळी तिच्या आवाजाला धार होती. 

" जागा...! अजून तुला वाटतं, की तुझी काही जागा असेल ?"

" तूच दिली आहेस न ?" या उत्तरावर मल्हार चपापला. 

" तूच लिहिलंस न , तुझ्या आयुष्यात मला तू सामील करून घेतलंस !" 

" ती एक कथा आहे मानसी ?" 

" कोणतीही कथा, कविता हे मानवी जीवनाचं एक सुप्त प्रतिबिंब असतं. काहींच्या फक्त मनात गोष्टी दडलेल्या रहातात, पण काही लोक त्या लिहून काढतात, रंगवतात, व्यक्त होतात." 

" हो, पण व्यक्त होताना ती काल्पनिक पात्र सत्यात उतरून यावीत, अशी कोणाचीच इच्छा नसावी."

" मग लिहावी तरी कशाला ?" यावर मल्हारकडे काहीही उत्तर नव्हते. 

"लोकांना आवडतात म्हणून...!" खूप अडखळत त्याने एक मोघम उत्तर दिले. 

" नाही, तुम्ही लिहिता, कारण त्या पात्रांनी कल्पकतेत तरी तुमची सोबत करावी म्हणून...! तुम्ही लिहिता, कारण तुम्हाला वास्तवातून बाहेर येऊन तुमचं एक वेगळं विश्व वासवायचं असतं म्हणून ! तुम्ही लिहिता, कारण तुम्हाला तुमच्या आजचा कंटाळा घालवायचा असतो." तिच्या बोलण्यातली धार वाढू लागली होती. 

" हो, पण तरीही ते काल्पनिक आहे. वास्तवात त्याला स्थान नाहीये." 

तिने मागे वळून मल्हारकडे पाहिलं. त्या अंधारात सुद्धा ती त्याला स्पष्ट दिसत होती. पहिल्यांदा तिला पाहून त्याच्या कपाळावर अनंत आठ्या आल्यात. 

"तुला अजूनही माझ्या काल्पनिक असण्यावर शंका आहे ? तुझ्या समोर आहे मी ! तुझ्या आयुष्यात, तुझ्या बायकोच्या आयुष्यात, तुझ्या कथेने मला तिच्यापर्यंत पोहोचवलं मल्हार...!" क्षणभर मल्हारला वाटलं, की तिच्यासमोर शरणागती पत्करल्यावाचून दुसरे गत्यंतर नाहीये. पण त्याने परिणाम विपरीत देखील झाला असता. 

"हे बघ मानसी...!" त्याने शांततेचा मार्ग अवलंबला. "हे सगळं नियतीच्या विरुद्ध आहे. मला त्याच्या विरोधात जाता येणार नाही."

"मलाही नाही...! तशी तरतूद नाहीये कुठेच." 

" असेल...!" 

" का नाही जाता येणार तुला त्या नियतीच्या विरुद्ध ? पहिल्या दिवसापासून ते अगदी काल-परवा पर्यंत तुला नियती आठवली नाही ? आपल्या भेटी लिहिताना, ते सगळं रंगवताना तुला नियती आठवली नाही ? "

" नाही, नाही आठवली तेव्हा. आणि आज आठवली, कारण सुहासचा जीव धोक्यात आलाय. तुझ्यामुळे ! तिला मरणाच्या दारात उभं करून, तू काय साध्य करून घेणार आहेस. तिचा जीव घेऊन तुला काय मिळणार आहे ?"

" तू...!" हे अपेक्षित उत्तर होतं. 

" मी तर कुठेच नव्हते मल्हार. मला तू घडवलं आहेस. तुझ्या आयुष्यात एक महत्वाची जागा, तू दिलीस मला. अजाणतेपणाने का होईना, माझ्यामध्ये आणि सुहास मध्ये जे काही सुरु झाले, त्याला तूच कारणीभूत आहेस."

तिने झाडाच्या वरच्या फंदीकडे पाहिले. सळ-सळ करत फांदी खाली आली. त्यावर निवांत झोपलेली काही पाखरे घाबरून सैरवैरा उडून गेली. तिच्या चेहऱ्यावरची बदलत चाललेली छटा मल्हारने ओळखली. 

" नाही, तुला मी घडवलं आहे, मी निर्माण केलं आहे. तसाच तुझा अंतही माझ्याहातून घडेल." आता मल्हारनेही हिमंत बांधायला सुरवात केली होती. मानसी त्याच्याकडे बघून जोर-जोरात हसू लागली. 

"वर जा, आणि तुझी कथा नीट वाच...! चुकून कल्पनेच्या आहारी जाऊन तू मलाच बळ देत गेला आहेस." अचानक मल्हार हवेत उडाला आणि उडत धाडकन त्या पडलेल्या फांदीवर येऊन पडला. क्षणात मानसी सुद्धा त्याच्या समोर आली. 

" तू कथेला सुरवात तर केलीस, पण मला त्यात एक अढळ स्थान देऊन बसलास. मला ध्येयही दिलंस आणि ते पूर्ण करण्यासाठी वाट ही तूच दाखवलीस. या पुढची कथा मी लिहिणार. आणि पात्र तशीच वागणार, जसं मी सांगेन...!" 

सकाळी मल्हारला उठता ही येत नव्हते. कसाबसा तो शुद्धीवर आला. 

"पडून रहा, पूर्ण पाठीवर जखमा आहेत." काका त्याच्या शेजारीच बसले होते. 

"तुम्ही ?"

"मीच आणलं उचलून, काल रात्री आलेल्या वादळात जांभळाच्या फांद्या पडल्या. त्यात तुम्ही अडकलात आणि बेशुद्ध झालात."

" काका...!" मल्हारची नजर त्यांच्यावर खिळून राहिली. 

" बोलू नका काहीच. मी सगळं पाहिलं. फक्त तुम्हीच दिसलात, पण लक्षात सगळं आलं...!" काकांच्या डोळ्यात पाणी आलं. 

"म्हणजे...तुम्ही ?" 

" हो, तुम्ही बाहेर पडताच...!" मल्हारच्या डोळ्यात एकदम पाणी आलं. 

" घाबरू नका, सगळं व्यवस्थित होईल. मी चहा आणतो." म्हणत काका बाहेर गेले. 

रेणापूरलाही वादळं येत-जात होती. सुहासला मधून येणारी शुद्ध फारशी टिकत नव्हती. तिच्या अंगातील प्रतिकारशक्ती बऱ्यापैकी वाढली होती. पण अंगात बळ उरले नव्हते. सकाळी गुरुजी ध्यानस्थ असताना एक सेवक घाई-घाईने आला. त्याने गुरिजींच्या कानात काहीतरी सांगितले. कधीही ध्यानातून न उठणारे गुरुजी ताडकन उठले आणि आश्रमाच्या बाहेर आले. बाहेर काही गावकरी उभे होते. बाजूलाच कोणाचे तरी प्रेत झाकून ठेवले होते. 

" रात्री गावात आले होते. खूप घाबरले होते म्हणून आम्ही त्यांना बोललो, पावसा-पाण्याचं इथेच ,गावात थांबा, सकाळी जा.पण त्यांनी ऐकलं नाही. सकाळी आम्ही गुरं घेऊन निघालो, तेव्हा हे...!" प्रेताच्या हातात गुरुजींचा पत्ता होता. गुरुजी त्या कृश प्रेतांकडे पाहत राहिले. एका सेवकाला सांगून त्यांनी सुहासच्या आईला बोलावून घेतलं. ते प्रेत पहाताच आईनी त्यांना ओळखले. 

" स्टेशनवर यांनीच आम्हाला वाचवलं होतं...!" 

गुरुजी एकदम सावध झाले. 

" मल्हारने तिला इथला पत्ता नको होता द्यायला...! एखादे ठिकाण तरी त्याने स्वतः कडे गुपित ठेवायला हवे होते. सगळ्यांनी मिळून त्या प्रेतावर अंत्यविधी पार पडला. आश्रमाच्या चारी बाजूंनी होम सुरु झाले.







हे सगळं थांबवावं लागणार होतं. पण खूप सावधरित्या ! याचा अंत फार काही बदलून जाणारा होता. मल्हार नकळत का होईना, सुहासपासून थोडासा विचलित झालेला होता. त्याच्या हातून त्याच्या सुखी संसाराची दोरी काही काळ सुटली होती. तो स्वतःवरचा ताबा गमावून बसला होता. त्यात म्हणावी तशी मानसीची चूकही नव्हती. एक लेखक म्हणून त्याच्या मनातली एकाग्रता ही आपल्या जागी बरोबर होती. 

"आपल्या पात्रांशी एकरूप होणे, हा प्रत्येक लेखकाचा हक्क आहे. असे नाही झाले, तर त्या पात्राच्या असण्याला न्याय मिळत नाही. " खाली स्वयंपाकघरात आपली कामं उरकत काका मल्हारशी बोलत होते. 

"एक पात्र तयार करणे, ते लिहून काढणे, त्याला वाव देऊन कथेत त्याला जागा करून देणे हे सगळे तुमच्या कामाचा एक भाग आहे." 

"हो, आणि वेळ आली की ते संपवणे, हे सुद्धा तितकंच महत्वाचे आहे न काका !" कालच्या जखमा अजूनही थोड्या ठसठसत होत्या. 

" मालक, इथे ते थोडं अवघड आहे." हळदीचं दूध समोर ठेवत काका म्हणाले. 

दिवसभर मल्हार याचाच विचार करत होता. त्याच्यासमोर एकही पर्याय असा नव्हता, जो प्रयोग म्हणून तो करू शकला असता. बराच वेळ त्या लिहिलेल्या पानांमध्ये त्याने स्वतःला शोधण्याचा प्रयत्न केला. कथा जरी त्याने लिहिलेली असली, तरी त्यात त्याला काय स्थान होते ? एक असे पात्र, जे हवेने आपल्याकडे ओढून नेले, आपल्या ताब्यात ठेवले ! 

" हॅलो, निशा...!" कंटाळून मल्हारने निशाला फोन केला. 

" कोण ? मल्हार ! अरे, आहात कुठे तुम्ही ? जोसेफलाही काही सांगितलं नाहीस. आणि सुहास कुठे आहे ? "

" आम्ही दोघे व्यवस्थित आहोत, तुला माझं एक काम करायचं आहे...करशील?" मल्हारच्या डोक्यात काहीतरी वेगळं सुरु झालं होतं. 

"मला माहित नाही, हे मी करू शकेल की नाही, पण तुम्हा दोघांसाठी मी हे नक्की करेल !" एक खात्री देऊन तिने फोन ठेवला. 

रात्रीचे दहा वाजले होते. मल्हार रहात असलेल्या बिल्डिंग मध्ये देखील झालेल्या प्रकाराची सुप्त चर्चा सुरु झाली होती. आजूबाजूला रहाणाऱ्या लोकांमध्ये एक भीती तयार झाली होती. हातात एक मोठी फाईल घेईन निशा आणि जोसेफ आत गेले. त्यांनी तिथल्या वॉचमन ला गाठलं. 

" मॅडम, आम्हाला काहीही माहित नाही, आणि तुम्ही विचारूही नका. आम्हाला काहीही सांगण्याची परवानगी नाहीये." त्याने दोघांना सरळ उडवून लावलं. 

"हे बघा, हा कोणाच्यातरी जगण्या-मारण्याचा प्रश्न आहे, जे काही माहित असेल, ते प्लिज सांगा..!" जोसेफनेही त्याला विनंती केली. पण काहीच उत्तर मिळालं नाही. 

"आम्ही वर जातोय...!" निशाने त्याला सांगितलं. 

"परवानगी लागेल मॅडम,फ्लॅटचे मालक नसताना आम्ही तुम्हाला वर नाही जाऊ देणार." 

"कोणाशी बोलावं लागेल?" 

"एक मिनिट...!" 

वॉचमन कोणाशी तरी फोनवर बोलला. थोड्या वेळाने एक म्हातारे काका तिथे चालत आले. 

"कोण आपण ?" त्यांनी दोघांना कधीच पहिले नव्हते. 

" आम्ही मल्हार आणि सुहासचे मित्र!" जोसेफ त्यांना म्हणाला. 

"मी राणे, सेक्रेटरी. या माझ्यासोबत." 

" घडले ते खूप वाईट घडले. सुहास खूप मनमिळावू आणि शांत प्रवृत्तीची होती...!" राणेंनी सांगायला सुरुवात केली. 

"आहे...ती आहे ! मी आज मल्हारशी बोललिय,दोघे सुखरूप आहेत आणि त्यानेच मला...!" 

" मल्हार गेल्यापासून ती खूप एकटी पडली होती. तो गावी कुठेतरी त्याच्या कामानिमित्त गेलाय असं ती सारखं म्हणायची. रोज सकाळी माझी बाहेर जायची वेळ आणि तिची कामावर जायची एकच वेळ होती. तिच्या चेहऱ्यावरचा वाढता ताण मी रोज बघायचो." राण्यांची बायको हातात चहाचे कप घेऊन आली. "तिचा एकटेपणा पाहून, एखाद दोन वेळा मी तिला घरी जेवायलाही बोलावले होते. आली होती ती...भरभरून बोलायची, मल्हार, त्याचं लिखाण, गावाकडचं घर...!" काकांनी चहाचे कप त्यांच्या हातात दिले. 

"पण नंतर मात्र हळू-हळू खूप काही बद्दलं."

"म्हणजे ?" जोसेफ ने विचारलं. 

" तिच्या वाढदिवसानंतर ती खूपच जास्त एकटी-एकटी राहू लागली. आमच्याशी बोलणे सुद्धा कमी झाले. समोरून चालत जायची, पण फक्त तोंड-ओळख असल्यासारखं होतं सगळं." त्यांनी त्यांच्या बायकोकडे पाहिलं. उठून ते बाल्कनीत आले. 

"ही त्यांची बाल्कनी. रोज सकाळी स विसरता चहाचा कप घेऊन आम्ही सगळे जमायचो. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या. नंतरहून त्यातही अंतर पडत गेलं. दार बंद-बंद राहू लागलं. धूळ साचली. झाडं वाळली. सुरवातीला आम्हाला वाटलं, की मल्हारच्या जाण्याचा तिला एकटेपणा आला असेल.पण...!" काका एकदम थांबले. 

"पण काय काका...?" 

" रात्री बेरात्री तिच्या खोलीतून आवाज यायला लागले. आजूबाजूला शांतात असायची, त्यामुळे आम्हाला ते स्पष्ट ऐकू यायचे. कोणाशीतरी भांडत बसायची. दुसरा कोणताच आवाज नसायचा, म्हणून आम्ही ते फोनवरचं संभाषण म्हणून सोडून द्यायचो."

"ती कधीच असं वागली नाहीच." काकु मध्येच बोलल्या. 

"तब्बल दोन दिवस आम्ही तिच्या फ्लॅट मधून काहीच आवाज ऐकला नाही. ती खालीही दिसली नाही. यांच्याकडे असलेल्या चवीने आम्ही चार लोकं आणि पोलीस बोलावून फ्लॅट उघडला...! हे दुसऱ्यांदा झाले होते. ती हॉल मध्येच निपचित पडून होती. श्वास सुरु होता. टेबलावर पडलेल्या डायरीतून आम्ही त्या दवाखान्यात फोन करून गाडी मागवली. 

" मीच पाठवली होती. मी डॉक्टर आहे...!" जोसेफ बोलला. 

"काका, फ्लॅट मध्ये काही वेगळं...म्हणजे अनियमित !" निशाने हे विचारताच काका उठले. 

" हे घ्या, तुम्ही जाऊन पाहू शकता." काकांनी त्यांच्या हातात चावी दिली. 

"पण जरा जपून ! मल्हारला आम्ही सगळं कळवलं, तो आला होता. पण व्यवस्थित काही बोलला नाही."

"त्याच्याच सांगण्यावरून आम्ही आलो आहोत." निशाने चावी ताब्यात घेतली. 


दार उघडताच आतून एक उग्र दर्प आला. जोसेफने लाईट लावला. आतून एक उग्र दर्प येत होता. तो इतका जहाल नव्हता. पण जाणवत होता. 

"त्याने बरंच आवरलं आहे." जोसेफ म्हणाला. तो पर्यंत निशा आतल्या खोलीच्या दारापाशी पोहोचली. तिने अंधारात चाचपडत दिवा लावला आणि समोरचं दृश्य पाहून तिची वाचाच बसली. तिला समोर ,मल्हार आणि सुहासच्या पलंगावर एक काळी सावली निवांत पहुडलेली दिसली. ती वेळीच सावध झाली. पटकन बाहेर येऊन तिने दार लावून घेतले. तिला दरदरून घाम फुटला. तिला तसं पाहून जोसेफ धावत तिच्या जवळ आला. 

" काय झालं, तू एकदम...!" तिने त्याला गप्प रहाण्याचा इशारा केला. दुसरा इशारा आत कुणीतरी असल्याचा होता. 

"मला पाहू दे." तिने त्याला अडवायचा विफल प्रयत्न केला. त्याने दार उघडले. 

"कुठे कोण आहे, भास झाला असेल तुला...!" घाबरत निशाने आत पहिले. आत कुणीही नव्हते. पण त्या जागी काही कागदं उडत होती. एक कागद उडत निशाच्या पायाशी आला. तिने तो उचलला. 

" ही त्याची कथा आहे...! हे सगळं मी त्याला परत पाठवलं होतं." जोसेफने घाईघाईने सगळी कागदं गोळा केली. निशानी त्याची घडी करून ती आपल्या बॅगेत कोंबली. 

त्या सगळ्याच वास्तूला एक अज्ञात सावलीने घेतले होते. कुणीतरी सारखं आपल्याकडे बघतंय, हे दोघांनाही वाटत होतं. तेवढ्यात निशाचा फोन वाजला. मल्हारचा फोन होता. 

" मल्हार, इथे आहे रे कुणीतरी. सुहास एकटी नव्हती. तिच्यावर कुणीतरी नजर ठेवून होतं." निशाच्या या शब्दांनी मल्हारचा संशय बळावला. 

" माहितेय मला, ती कोण आहे ! तुम्ही ते काम करा...!" 

फोन कट झाला. दोघेही हॉल मध्ये आले. निशाला हॉल मध्ये सोडून जोसेफ स्वयंपाकघरात गेला. निशाची भीती थोडी कमी झाली होती. ते जे काही आहे, ते आपल्या मागे नाहीये, याची तिला खात्री पटत चालली होती. तिने सगळी कागदं बाहेर काढली. एकसारखी केली. तिला डोळ्याच्या कोपऱ्यातून जोसेफ येताना दिसला. तिने वर पाहिले आणि जोरात किंचाळत बाजूला सरकली. 

" तुम्ही संपवाल मला...!" जोसेफचा आवाजात बदल झाला होता. आतून त्याच्या आवाजासोबत एका प्रतिशोधाने पेटलेल्या स्त्रीचा आवाजही येत होता. विजेच्या वेगाने निशा बाजूला झाली, नाहीतर त्याने आतून आणलेली हातोडी तिच्या डोक्यात पडली असती. 

" जोसेफ, काय करतोयस हे ! काय झालंय तुला." 

तो पूर्ण देहभान विसरला होता. त्याच्या डोळ्यात रक्त उतरले होते. निशाकडे अत्यंत क्रूर भावनेने तो पहात होता. त्याचा श्वास दुप्पट वेगाने सुरु झाला होता.

"त्याने पाठवलं न तुम्हाला...!" हातातली हातोडी त्याने निशाला मारून फेकली. 

"मूर्ख आहात तुम्ही." हातोडीचा नेम पून्हा चुकला होता. निशा त्याच्या हातून निसटली होती. 

तेवढ्यात दिवे गेले. सर्वत्र अंधार झाला. पडदे बंद झाल्याने बाहेरून पण उजेड येत नव्हता. जोसेफने भिंतीकडे पहिले. एक मोठे काचेचे घड्याळ जमिनीवर पडले. त्याचे तुकडे पायात जातील आणि निशा ओरडेल, हा क्रूर हेतू त्याच्या डोक्यात होता. मुळात तो आता जोसेफ राहिला नव्हताच. घामे-घुम झालेली निशा सोफ्याच्या मागे दडून बसली. त्याच्या पावलांच्या हालचालीकडे तिचे बारीक लक्ष होते. पण फक्त आवाज येत होता. तो सोफ्यावर चढला. 

"तुला मी ओळ्खतही नाही, त्या कथेत तू नाहीयेस. उगाच याचा भाग नको होऊ.निष्कारण जीव जाईल." श्वास रोखून बसलेल्या निशाकडे काहीच पर्याय उरला नव्हता. सगळी कागदं जमिनीवर पडली होती. तिला काहीच सुचत नव्हते. जोसेफला ती मारुही शकत नव्हती. तिने आजूबाजूला पहिले. जमिनीवर अडवा पडलेला एक लॅम्प तिच्या हाताला लागला. तो घट्ट पकडून तिने पूर्ण ताकदीनिशी सोफ्यावर उभा असलेल्या जोसेफच्या पायात घुसवला. शरीर जखमी झाल्याने जोसेफ जोरात ओरडला. तो जमिनीवर कोसळला. निशाने पून्हा तोच लॅम्प त्याच्या दुसऱ्या पायात घातला. एवढे बळ तिच्यात आहे, याचा प्रत्यय तिला आत्ता होत होता. जोसेफ शुद्धीवर होता. पण पायातून रक्त वाहू लागले. अंधारात चाचपडत निशा स्वयंपाक घरात गेली. तिथून कडीपेटी आणली. सगळी कागदं गोळा करून तिने ती पेटवली. आगीचा लोण उठला. आरडा-ओरडा करत जोसेफ तडफडू लागला. कागदाची राख होत गेली. तसं त्याच्या डोळ्यातून , नाका-तोंडातून धुराचे काळे लोण बाहेर पडू लागले. बंद काचेला धडकून हॉल मध्ये सर्वत्र फिरू लागले. सर्वत्र काळ्या सावल्या पसरल्या. बाल्कनीच्या काचेतून चंद्राचा थोडा उजेड येत होता. हातातल्या त्या लॅम्पचा दांडा निशाने त्या काचेकडे भिरकवला. धाडकन आवाज करत काच फुटली. त्या काळ्या सावल्या त्या काचेतून बाहेर गेल्या. 

क्षणभरात संपलेल्या या चकमकीत बरेच खुलासे झाले. मल्हारला ते सांगणे गरजेचे होते. धडपडत निशा दारापाशी आली. जाताना दार मात्र उघडे ठेवलं. रानेकाकांच्या दारावर थापा पडू लागल्या, तसे दोघे धावत दार उघडायला धावले. 

" तो आत पाडलाय...! अजून शुद्ध आहे त्याला." घसा कोरडा पडल्याने ती त्यांच्या दारातच निपचित पडून राहिली. 

आई धावत गुरुजींना शोधायला गेली. तिच्या चेहऱ्यावर बऱ्याच दिवसांनी आनंद वाहताना दिसत होता. आपल्या सेवकांशी बोलण्यात गर्क असलेल्या गुरुजींनी लांबूनच हे ओळखले. 

" मी बोललो होतो त्याला...! विश्वास ठेव !" गुरुजी धावत कुटीरात आले. सुहास ने डोळे उघडले होते. त्यांनी मनोमन हात जोडले. बाजूच्या भांड्यात असलेलं गंगाजल त्यांनी सुहासच्या डोळ्यात ओतलं. 

"सुहास, खूप भोगलंयस तू..! " नकळत त्यांच्याही डोळ्याच्या कडा पाणावल्या. 

" कधी स्वप्नातही न घडलेल्या गुन्ह्यांची शिक्षा भोगलीस. तुझ्या इतकं धैर्य आज संयम माझ्यातही नाहीये." ते आईकडे वळले. 

"हे एक पर्व संपलं आहे. सुहासच्या सभोवतालातून ती गेली आहे. तिच्या आयुष्यातून ती अजून गेली नाहीये." एवढं सांगून गुरुजी बाहेर निघून गेले. सुहासने उघड्या डोळ्यांनी कुटीराचे छप्पर पहिले. तिची दृष्टी फक्त शुद्धीवर आली होती. उर्वरित शरीरात अजूनही काहीच हालचाल नव्हती. 

संध्याकाळी काकांनी देवासमोर दिवा लावला. त्या दिव्याच्या इवल्याश्या प्रभावाने बरेचशे घर उजळून निघाले. काका एक दिवा घेऊन बाहेर निघाले. 

" काका, बाहेर नका लावू दिवा...!" 

" पण...!" काकांना मल्हारचे हे अडवणे कळले नाही. 

" ती फक्त घराबाहेर गेली आहे काका..! आमच्या आयुष्यातून ती अजून गेलेली नाहीये. तिची एक जागा कमी झालीये. एक जागा अजूनही तशीच आहे." 

" तिथूनही तिला जावे लागेल मालक...! या जगातून तिला जावे लागेल. तिचा हट्ट तुम्हाला परवडणारा नाहीये !" 

" तुम्हाला वाटते तितकी ती क्रूरही नाहीये. मी लिहीत असताना तिने कधीही माझ्या अंतरंगात दडून रहाण्याचा हट्ट धरला नाही. ती नेहमीच एक अंतर ठेवून होती. माझीच पाऊलं आधी तिच्याकडे वळली...!" बाहेरून गार वारा आत येत होता. पण आज कोणतेही नवे वादळ उभं करण्याचा हेतू नव्हता. 

"ती खूप भोळी आहे. मी लिहिले, कदाचित त्यापेक्षाही जास्त भोळी, सालस, मऊ..! कोणीही प्रेमात पडेल अशीच आहे. तिचा हट्ट म्हणजे मानवी हट्ट आहे. प्रत्येकाला कोणाच्या तरी आयुष्यात एक अढळ स्थान हवं असतं. तिलाही हे वाटणं सहाजिक आहेच ना ? " चालत-चालत मल्हार दारात येऊन उभा राहिला. काकांनी हातातला दिवा देवापाशी ठेवला. 

" तिची एवढीच चूक...की नियतीने तिला वास्तवात स्थान दिले नाही. आणि माझा हट्ट तिच्या जिव्हारी लागला. मी नसतं लिहिलं, तर कदाचित तीची निर्मिती झाली नसती. नसती आली, ती या जगात...! पण ती आली. काही काळ माझ्या सोबत राहिली. जिवंत झाली. जगणं पाहिलं."

" खरंय तुमचं...!" मल्हारच्या विचाराने काकानाही हळवं करून सोडलं. 

" काका...मी सोडलं, तर कोण आहे तिला ? कुठे जावं तिने ? कोणाच्या आधारावर जगावं तिने ? कोणाकडे पहावं तिने.…? वास्तवात स्थान नाही, म्हणून तिचे अस्तित्व नाही, हे खरंय...! पण तिचे अस्तित्व आहे. वाचणाऱ्यांच्या मनात असेल, नसेल, हे त्यांचं त्यांनी ठरवायचं. पण मी तिला असं, अपराध्यासारखं जाऊ देणार नाही...!" 

" काय ठरवलंय...?" मल्हारचा पुढचा विचार अजूनही स्पष्ट नव्हता. 

" काका, तिचं तिला ठरवू द्या...!" मल्हार पायऱ्या उतरून खाली आला. ते नेहमी बसायचे, बागेतल्या त्या जागेवर जाऊन बसला. नकळत त्याचे डोळे पाणावले. 

" पूर्ण कथेत नायिका म्हणून राहिलीस ! कुठून आलीस, कुठे राहिलीस, काहीच कळले नाही. पण कथा पूर्ण केलीस...! जी कथा तुझ्यामुळे घडली, त्या कथेच्या शेवटी सगळ्या दुर्दैवाचं खापर तुझ्यावर फोडून, तुला वाचणाऱ्यांच्या दृष्टीत कसा पडू देऊ...! तुझं तुला ठरवावं लागेल. या कथेला स्वतःच्या स्मारकाचा स्वरूप देऊन अनंतकाळ जगायचं, की वास्तवात कधीही पूर्ण न होणारा हट्ट पूर्ण करण्याच्या नादात, स्वतःची निरमोह छबी ,एका क्रूर सावलीत बांधून ठेवायची...! तुझं तुला ठरवायचं आहे. 

त्या रात्री काहीही हालचाल झाली नाही. झाडं उन्मळून पडली नाहीत. वादळ आलं नाही. वाराही संथ वहात झाडांचे शेंडे डोलवत हिंडत होता. सगळं काही शांत-शांत होतं. मल्हारलाही खात्री पटली. तिने त्याचं ऐकलं होतं. टेबलाजवळची खिडकी उघडून तो कथेचं शेवटचं पान लिहायला बसला...!








" सरते शेवटी काय उरले, याचा हिशोब नियतीला लावायचा असतो. घडणाऱ्या घटनांना वेळीच थांबवायची कसब अजून माणसात आलेली नाहीये. फळं कर्माची असतात,पाप-पुण्य, नीती-अनीती, याची गणितं कळायला माणसाला खूप वेळ द्यावा लागतो." गुरुजी सकाळीच सुहासपाशी येऊन बसले. तिचा श्वास रात्रीतून पूर्वरत झाला होता. 

" जे काही घडले, ते अनाहूतपणे. क्षणभर तुला त्याने अंतर दिले, हे खरे आहे ! पण तो एक लेखक आहे. त्याचे आणि त्याच्या पात्रांचे नाते खूप वेगळे आणि आपल्यासारख्याला न कळणारे आहे." सुहासला कळत होते. पण आतातरी ती फक्त डोळ्यांनीच उत्तरं देऊ शकत होती. 

"त्या एकांतात तो वाहून गेला. पण वेळ आली, तेव्हा तो जागा होऊन तुझ्यासाठी ही धावला. त्याचे कर्तव्य होते ते ! त्याने घेतलेली विषाची परीक्षा सुद्धा खूप भयावह होती. एक पात्र जिवंत होत असताना , त्याच्या असित्वात विरघळून जाणे सोपे असते. पण त्यानंतर त्याला आणि तुला, आणि त्या पात्राला झालेला त्रास सुद्धा अत्यंत जटील होता. ती बाधा नव्हती, कोणी केलेला टोणा नव्हता, जन्म आणि मृत्यच्या दारात उभं राहून आपल्या इच्छांना आणि प्रतिशोधाला पूर्ण करण्याच्या अट्टहासात निष्कारण निरापरध्यांचे बळी ही नव्हते, रात्रीच्या आरंभापासून ते ब्राम्हमुहूर्तापर्यंत चालणारे भयनाट्यही नव्हते. सजीवापासून ते निर्जीवापर्यंत ,प्रत्येक गोष्टींवर निर्विवाद अधिराज्य गाजवत असंख्य मृतात्मे, प्रेतात्मे, विविध रुपात आपल्या आजूबाजूला वावरत असतात. त्यांच्या भूत, वर्तमान आणि भविष्याशी आपला काहीही संबध नसताना देखील ते आपल्या सुखी जीवनात घोळ घालतात. एखाद्या अनोळखी , किंवा रोजच्या दिसण्यातल्या एकाद्या व्यक्तिरूपात, वस्तूरूपात घरात शिरतात. भंडावून सोडतात. त्यांच्या सूडाच्या एक-एक कथा ऐकताना अंगावर काटा येतो. त्यांच्या पाशातून मुक्ती मिळवताना अनेकांचे प्राण पणाला लागतात. अनेकांना बराच काळ आपला जीव मुठीत धरून जगावं लागतात. काही सुटतात आणि मार्गी लागतात. पण काही त्यांच्या विळख्यात कायमचे अडकून रहातात. तुझ्या बाबतीत यातलं बरंच काही खरं ठरलं. जे घडलं, ते भयानक होतं. तुझ्या जागी जर एखादी कमकुवत मुलगी असती, तर तिने केव्हाच शरणागती पत्करली असती. याहूनही विचलित करणाऱ्या गोष्टी घडल्या असत्या. पण नाही घडल्या. आणि ज्या घडल्या नाहीत, किंवा जे काही घडून गेलंय, याचा विचार करून ,हातात असलेली वेळ वाया घालवायची नसते. पुढे चालत रहावं लागतं." निपचित पडलेल्या सुहासच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. गुरुजींनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. 

"सुहास, तुझा अपराधी मल्हारही नाही, आणि ते पात्रही नाही. जे घडले, ते नशीब समजून जितक्या लवकर विसरशील, तितक्या लवकर आयुष्याला नव्याने सुरवात करता येईल." 

ते उठले आणि आईकडे वळले. 

" याचा इलाज जरी देवाकडे नव्हता, तरी मार्ग मात्र त्यानेच दाखवला आहे." गुरुजी बाहेर निघून गेले. सुहासने नजर वळवली आणि कुटीराच्या दाराकडे पहिले. मल्हार तिला घ्यायला येईपर्यंत तिला काहीच सुचणार नव्हते...! 

कथेची शेवटची पानं लिहून झालीत. मल्हारने वाचून सुद्धा पहिली नाहीत. त्याने लिहिलेल्या पात्रावर त्याचा पूर्ण विश्वास होता. आता फक्त वाट बघणे होते. दिवसभर तो खोलीच्या बाहेर आला नाही. काकाही वर आले नाही. पण दिवसभर त्यांचे चित्त थाऱ्यावर नव्हते. काकांच्या मनात काही किंतु आणि शंकांना अजूनही वाव होता. ते त्यातले नव्हते, कथेतही नव्हते ! म्हणून कदाचित त्यांच्या मनात शंका असाव्यात. 

सूर्यास्त झाला. बागेतही शांतता झाली. दिवसभरातून कुठेही काहीही विपरीत घडले नाही. काहीच घडले नाही, म्हणून देखील मल्हार आणि काका काळजीत पडले. मल्हार बाहेर येऊन बसला. तिच्या वाटेकडे डोळे लावून...! 

" ती येईल असं वाटतं तुम्हाला ?" 

" हो...आज यावं लागेल तिला !"

"आणि...नाही आली तर !" 

काहीही न बोलता मल्हार बाहेर येऊन बसला. झुडुपांमधली सळसळ शांत होती, तिची कोणतीच खूण दिसत नव्हती. वाराही शांत होता. तो तसाच बसून राहिला. काकांनी बाहेरचे दार लावून घेतले. बराच वेळ झाल्यावर मल्हार काहीतरी ठरवून बाहेर निघाला. लोखंडी फाटकाचा आवाज आल्याने काकांनी बाहेर येऊन पहिले. हलक्या पावसाच्या सरी सुरु झाल्या होत्या. मल्हार बाहेर पडून त्याच्या रोजच्या वाटेवर आला. रस्ता सुनसान होता. पावसा-पाण्याचं लोक आप-आपल्या घरी परतले होते. शीणलेला मल्हार तिच्या नेहमीच्या जागी आला. एका झाडामागे ती बसलेली दिसली. 

"तू आली नाहीस ? मला वाटलं तुला...!" तिने मल्हारकडे वळून पाहिलं. तिचा उदास चेहरा त्याने पटकन ओळखला. 

" तू जरी ठरवलं, मी जरी ठरवलं, तरी मला इतक्या सहजा-सहजी जाता येणार नाहीये ! " 

"का ?" मल्हारच्या पायाखालची जमीन सरकली. 

"मल्हार, तू लिहिण्याने माझी एक सुप्त ओळख तयार झाली आहे. कोणत्यातरी जगात, जगाच्या पाठीवर कुठेतरी माझा जन्म झाला आहे. त्या जगाचे नियम मोडून मला जाता येणार नाही."

"कोणतं जग, कसले नियम ! मानसी, तू माझ्यामुळे तयार झालेली आहेस. तुझं नशीब मी...! "मल्हारला आपली चूक लक्षात आली. आपणच हिचे प्रारब्ध लिहिले आहे ! आपणच हिची ओळख लिहिली आहे. 

"मल्हार, तू लिहिलंय, तसंच, मी मानव नाही ! पूर्ण जन्म घेऊन माझा मृत्यूही झाला नाहीये. माझ्यात धड मानवाचेही गुण नाबियेत , धड मी मृतही नाहीये. मला नष्ट करून तू पाठवशील तरी कुठे...?" 

"मग आता...?" 

"माझे नाव...!" 

"म्हणजे...!" 

दोघे खाली बसले. मानसीने त्याला काहीतरी सांगितले. बऱ्याच वेळाने तो उठला. 

" तू माझी कथा आहेस मानसी...! तुझा असा त्याग करणं माझ्या जीवावर आलंय."

" त्याला इलाज नाहीये ! मला असंच जावं लागेल...!" 

काहीही न बोलता मल्हार तिथून निघून आला. तो दृष्टीआड होईपर्यंत मानसी त्याला एकटक बघत राहिली. वेगळं होताना दोघांनाही खूप भरून आलं. प्रेमाची एक नवी परिभाषा मानसीने त्याला सांगितली होती. तिचा त्याग मोठा होता. मल्हारच्या कथेत का होईना, तिला एक जिवंत जग बघण्याची संधी मिळाली होती. पण तिला अजरामर करण्याचे मल्हारचे स्वप्न भंगणार होते. 

मल्हार मुख्य रस्त्यावर आला. त्याची पाऊले अत्यंत सावध पडत होती. मानसीने सांगितल्याप्रमाणे, तिच्या जगातील काही नियम अतिशय घातक होते. ते जीव-सजीव, मृत्यू आणि मोक्षाच्या किंवा पुनर्जन्माच्या मधल्या अवस्थेचे नियम होते. आणि ते नियम सहज मानसीला मल्हारपासून विलग होऊ देणारे नव्हते. विजेच्या एका तारेवर ठिणग्या उडत होत्या. झाडांची सळ-सळ एका अज्ञाताच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होते. मल्हारची गती मंदावत होती. अचानक कुठुनशी एक वीज आली आणि समोरच्या खांबाने पेट घेतला. मल्हारला कळून चुकले, की त्याचे घरी जाणे इतके सोपे नाहीये. समोर जळणाऱ्या खांबाकडे तो एकटक बघू लागला. 

"तुला काय वाटलं ? तू सहज तिचा त्याग करशील, आणि ती निघून जाईल ?" त्याच्या कानावर एक कर्णकर्कश: आवाज येऊन आदळला. मल्हार क्षणभर विचलित झाला. तो आवाज चाहुबाजूनी येत होता. 

"नाही, तसं होणार नाही. हा तिच्यावर अन्याय आहे." एकदम मल्हारचे पाय कोणीतरी ओढले. 

"मी लिहिलं आहे तिला...! तिच्यावर संपूर्ण हक्क माझा आहे." जमिनीवर धाडकन पडला, तरीही मल्हारमध्ये उत्तर द्यायचे धाडस आले. 

"तुम्हा माणसांमध्ये हा एक दुर्गुण आहेच म्हणा...!" मल्हार त्या जळक्या खांबाकडे हळू-हळू ओढला जाऊ लागला. 

"कथा संपली की पात्रांना विसरून जायचे...! कथा पूर्ण नाही झाली, की अर्धवट सोडून द्यायची ! पण आमचं तसं नाहीये. आम्ही प्रत्येकाचे असित्व जपतो."

" तिला जावं लागेल. तू जो कुणी आहेस, तू काहीही केलं तरी...!" खांब अतिशय जवळ आल्याने मल्हारला चटके बसू लागले. संपूर्ण शक्तीनिशी तो उठला आणि खांबाच्या विरुद्ध दिशेने पळू लागला. त्याच्या पाठीला खूप दुखापत झाली होती. पाळताना एकदम त्याच्या पायात काहीतरी जोरात घुसले. त्या अंधारात सुद्धा त्याने पायात रुतलेली मोठी झाडाची काटेरी फांदी ओढून काढली. थोडंसं अंतर पळत त्याने पार केले आणि अचानक तो थांबला...! त्याने आजूबाजूला पहिले. एकही रस्ता, रस्त्यावरची एकही खूण त्याला ओळखीची वाटली नाही. त्याला आश्चर्य वाटले. ही कोणती वाट आहे ? आपली रोजची वाट...?" 

"कळलं ना...?" पुन्हा तोच आवाज येऊ लागला. 

" वास्तव आणि कल्पकतेमधला फरक...?" आणि तो जोर-जोरात हसू लागला. 

"तू ज्या वाटेवरून रोज चालत यायचास, ती वाट तुझ्या कथेतली होती.खरा रस्ता हा आहे. वास्तवात...!" पून्हा तो हसू लागला. 

अर्धी रात्र उलटून गेली होती. काकांना काळजी वाटू लागली होती.मल्हार डोळ्याला दिसला नव्हता. त्यांच्या सारख्या आत-बाहेर चकरा सुरु होत्या. मध्येच ते देवाला हात जोडून येत होते. बाहेरचे वातावरणही बदलू लागले होते. हवेत झालेला हा बदल काकांना रुचला नव्हता. त्यांनी खिडकीतून बागेकडे पाहिलं. बाहेर सर्वत्र अंधार होता. खिडकी तशीच उघडी ठेऊन ते जिन्यापाशी आले. घाई-घाईत मल्हारच्या खोलीचे दार उघडे राहिले होते. ते लावावे, म्हणून ते पायऱ्या चढू लागले. दार हळू-हळू हलत होते. पण ते वाऱ्याने हलत नव्हते. ते समजण्याइतपत काका समजदार होते. घरात मल्हार नव्हता. 

काका दारापाशी आले. मल्हारच्या टेबलावर कथा फडफडत होती. खिडकीही थोडी उघडी होती. ती कथा आत कुठेतरी ठेवावी, म्हणून काका आत येऊ लागले. आपल्या व्यतिरिक्त कोणाचा तरी भास त्यांना झाला. एक-एक पाऊल खूप सावधगिरीने ते उचलत होते. पानं अजूनही फडफडत होती. 

"कोण आहे ?" काकांनी दबक्या आवाजात विचारले. पानं उडायची थांबली. एकदम स्तब्ध झाली. एकदम शांतता झाली. काका एक पाऊल पुढे सरकले, तसे एकदम वर शांतपणे लटकत असलेला पंखा त्यांच्या डोक्यावर सुटला. पण आवाजाचा अचूक अंदाज आल्याने काका झटकन मागे सरकले. एकदम त्यांना कपाटाचा आधार मिळाला. काकांना आता कळून चुकले होते. कुणीतरी मल्हारची कथा वाचण्याचा प्रयत्न करत होतं. 

" कोण ए ? समोर ये...!" धाडस एकवटून काकानी त्याला आव्हान दिले. 

काहीही उत्तर आले नाही. कपाटात थोडी हालचाल झाली. काका पूढे सरकले आणि कपाट त्यांच्या पाठीवर पडू लागले. वयाने आधीच जास्त असलेले काका हा भार सहन करू शकले नाहीत. कपाट त्यांच्या पाठीवर पडले. वजन खूप होते. काका सरकू लागले. त्यांची सहज नजर वर गेली. कथा अजूनही जागेवर होती. 

"काय हवंय तुला ? सांग तरी...!" 

"कथा...!" हा तोच आवाज होता. 

"कशाला, काय करणार आहेस तिचे...!" 

" शोधतोय...?" 

" काय...?" 

" ते, शेवटचे पान, ज्यात मुक्ती आहे."

" मुक्ती आहे न, मग कशाला शोधतोय...? मिळेल ना मुक्ती तिला !" पाठीवर कपाटाचे वजन वाढू लागले. काकांचा श्वास कोंडु लागला. 

"तीच तर नकोय !" आता काकांची खात्री पटली, की ही मानसी नाहीये. 

"तुम्हाला ठाऊक असेल न, ते शेवटचं पान ? ज्यात त्याने तिला मुक्त करण्यासाठी रिक्त ठेवलंय...!" 

काका काहीच बोलले नाही. त्यांची वाचाच गेली. क्षणभर सगळं संपलं असं त्यांना वाटलं. या वेळी मल्हार घरी असायला हवा होता. पण तो कुठे होता, हे त्यालाही माहित नव्हतं. 

रात्रीच्या अंधारात सुहासच्या पलंगावर काही हालचाल दिसत होती. बाजूलाच झोपलेल्या आईला जाग आली. तिने डोळे उघडले आणि वर पाहिले. सुहासकडे पाहुन तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. सुहास झोपल्या-झोपल्या ताड-ताड उडत होती. एखाद्या तापाने फणफणणाऱ्या माणसाला एकदम थंडीचा झटका यावा तसा तिचा देह पलंगावरून वर खाली उडत होता. एकदम हा प्रकार पाहून घाबरलेली तिची आई तडक कुटीरा बाहेर पडली. झोपलेल्या गुरुजींच्या दारावर एकदम थाप पडली. 

" काहीतरी चुकलं...!" तिच्याकडे बघताच गुरुजींना संशय आला. " कुणीतरी कडवं आव्हान देतंय...!" गुरुजी तसेच बाहेर आले आणि त्यांनी आभाळाकडे पहिले. दूरवर अत्यंत क्रूर विजा चमकत होत्या. 

"हे काय आहे. तुम्ही म्हणालात, सगळं काही ठीक होईल म्हणून." आई पूरती घाबरली होती. 

" हे मलाही सांगता येणार नाही. काहीतरी चुकलंय हे मात्र खरं...!" गुरुजी पुन्हा आत आले. त्यांनी समोर ठाण मांडले आणि मृत्युंजयाचा जप सुरु केला. 

बरीचशी शुद्ध हरपलेला मल्हार जमिनीवर निपचित पडून होता. त्याला त्याच्या शेजारी धुसरशी पाऊले दिसली. ती मानसी होती. हतबल, दुःखी...! 

" उठ, तुला उठावं लागेल. माझ्या मुक्तीसाठी...! तुला हवा असलेला अंत तुला लिहावा लागेल मल्हार...!" हा भास होता. मल्हार शांतपणे पडून राहिला. पहिल्यापानापासून ते अगदी शेवटून दुसऱ्या पानापर्यंत जितकी आठवेल, तितकी कथा त्याने आयहवायचा प्रयत्न केला. मानसीला भेटण्यासाठी त्यांनी रेखाटलेले रस्ते, त्या वरचं एक-एक ठिकाण त्याने मनात साठवलं. त्याने उरलेल्या बळात डोळे उघडले. पूर्ण शक्तीनिशी तो उठला आणि चालायला लागला. चालताना जराही वास्तवाचा विचार त्याने केला नाही. विचार होता, ते फक्त कथेचाच. कारण ज्या वास्तवात तो आज शिरला होता, त्यात मानसीला मुक्त करणं शक्य नव्हतं. ते वास्तव कथेत कुठेही नव्हतं. कथेत मात्र सगळं होतं. त्याची आणि मानसीची भेट, त्यांची जागा, त्यांचं बोलणं ! सगळं-सगळं तिथे होतं. कथेत वर्णन होते, अगदी तसेच मल्हार चालू लागला. जिथे त्याने वास्तवात प्रवेश केला, अगदी तिथेच तो उभा होता. मंदिराच्या मागच्या बाजूला. धीर एकवटून तो चालू लागला. चालताना त्याला त्याचे आणि मानसीचे सगळेच बोल आणि संवाद आठवत होते. अगदी त्याने लिहिले होते, तसेच. अंधारातही त्याची पाऊले खंबीर पडू लागली. तो सावरला. शरीराला झालेल्या जखमा आता त्याला किरकोळ वाटू लागल्या...! 

अडखळत तो घरी पोहोचला. तिथेही अंधार होता. पण त्याची अंतर्दृष्टी त्याचा मार्ग सोपा करत होती. दार उघडून तो वर जाऊ लागला. आपल्या खोलीचं उघडं दार बघून त्याला अंदाज आलाच. बाजूला बेशुद्ध पडलेले काका त्याला दिसले. पूर्ण शक्तीनिशी त्याने कपाट उचलून काकांना बाहेर काढले आणि बाजूला सरकवले. त्याची खुर्ची सरळ केली. ड्रॉवर मधून काही कोरी कागदं बाहेर आली. त्यावेळी त्याला न सुचलेलं शेवटचं पान, त्याने आज लिहिलं. 

" मानसी...! तूला-मला हवा, अगदी तसाच आपल्या कथेचा शेवट झाला ! तू माझ्या आयुष्यात नसून देखील उरलीस. आपल्या भेटी, आपले संवाद, काही-काही वगळलं नाहीये. वाचणाऱ्याला काहीही वाटो, पण तुझे आणि माझे सगळे ऋणानुबंध या कथेच्या पानांत ,अगदी शेवटच्या श्वासापर्यंत रहातील ! तुला माझ्यापासून वेगळं करणे गरजेचे आहे. वास्तवात तुला काहीच स्थान नसलं, तरी शब्दांत तुझं असणं खूप लोभस आहे. तुला जा संगण्याइतपत माझ्या भावनांमध्ये बळ नाहीये. तुला रहा म्हणलं, तरी तुला जाणीव आहे, की तुझं असणं, तुझ्यासाठी सोपे नाहीये. पण प्रत्येक कथेला शेवट असतो, प्रत्येक पात्राला त्याच्या गतिकडे हळू-हळू जावेच लागते.

कथा संपते, पण पात्र कधीच नाही. कथा कधीही जुनी होत नसते...! त्यातलं काहींतरी कथेला नाविन्य देत असतं. या कथेचं नाविन्य तू आहेस ! आणि म्हणून, तु इथे रहाशील. आणि एका नायिकेच्या रूपातच ! " 

पहाट झाली. ती निघून गेली. मल्हारचे डोळे उघडले, तेव्हा तो तसाच टेबलावर पडून होता. आजूबाजूचा पसाराही तसाच होता. काका अजूनही शुद्धीवर आले नव्हते. त्याने खिडकी उघडली. स्वच्छ सूर्यप्रकाश पसरला होता. आज कुणास ठाऊक, तो अंगणातल्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचलेला मल्हारला जाणवला. त्याचे लक्ष त्या एका कोपऱ्याकडे गेले, जिथे त्याला पहिल्यांदा मानसीच्या खुणा सापडल्या होत्या. त्याचे डोळे भरून आले. ती पुन्हा कधीही त्याला दिसणार नव्हती, भेटणार नव्हती. तिच्या जाणिवा मात्र खूप काळ तिथंच रहाणार होत्या. 

दोन दिवसांनी सुहास पूर्ण शुद्धीवर आली. समोर मल्हार बसला होता. चेहऱ्यावर काही दिवसापूर्वीच्या खुणा आता भरत होत्या. तिने त्याच्या हातावर आपला हात ठेवला. जे काही घडलं, त्यावर बोलायला दोघांकडे पूर्ण आयुष्य होतं. पण या क्षणी दोघांकडे एकही शब्द नव्हता. सुहासच्या काही तक्रार नव्हती. आणि कशावर तक्रार करणार होती ? 



समाप्त....


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror