STORYMIRROR

Anuraag Pune

Horror Fantasy Thriller

3  

Anuraag Pune

Horror Fantasy Thriller

माया

माया

167 mins
214

माया...


 आषाढ अंगावर येऊ लागला होता. सरींनी खूप आधीच रौद्र धारण केले होते. संध्याकाळी दिवे लागायची वेळ झाली, की वारा अंगात आल्यासारखं सगळं उडवत गावभर हिंडायचा. त्याच्या पाठोपाठ गडगडत येणारे काळे ढग, त्या काळ्या अभाळावर उठून दिसतील, इतके काळे होते. हवेचा श्वास क्षणभर गुडमरत ठेऊन, पावसाचा खेळ सुरू होई. तास-दिडतास आपटून झाले की गावाच्या पाठीमागून सरी निघून जात. अंगणात चिखल, एखाद्या आंब्याची, लिंबाची खाली आलेली फांदी, कौलांवरून येणारा निथळ हे सगळं मागे सोडून...! सरींचा तांडव पहाता जीव असलेलं कुणीही बाहेर सहसा दिसत नव्हतं. अंगावर एखादं झाड पडण्याची भीती होतीच, पाय घसरून पडण्याची भीती पण होतीच. 

" काही कळत नाहीये हो !" सुमन पणतीची वात सरळ करत म्हणाली. 

" काशातलं ?" 

" आजही काही निरोप नाही आला !"

" तुम्ही उगाच काळजी करताय !" 

एवढं बोललं म्हणजे झालं ! विष्णूपंतांचे हे असे बेफिकीर वागणे. स्वतःचा मुलगा तीन दिवसापासून मुंबईहुन निघाला होता. अजून काहीच पत्ता, तार, काही काही नव्हतं! सुमनला काळजी वाटणे सहाजिक होते. पावसाने घेतलेलं हे रूप, प्रवास करणाऱ्यांसाठी काळ होते. बेभरवाश्याची वाहने, अंधारलेल्या वाटा, मुक्कामाची सोय नाही ! 

" तुम्हा बायकांची काळजी आणि आम्हा पुरुषांचं धैर्य..!" एकाच वाक्याने पंतांनी बोलण्याला पूर्णविराम लावला. 

"लहान आहे तो. रस्त्यांची, लोकांची अजून व्ह्याला हवी तशी ओळख नाहीये त्याला."

" तुम्ही उगाच काळजी करता ! अहो, वेळ आली, की माणूस लढतो, झुंजतो, मार्गही काढतो."

आईचे समाधान या पोकळ अश्वासनांनी होत नसतं. वाऱ्याने अर्धवट उघडलेल्या खिडकीतून तिने बाहेर पहिलं. अंधारव्यतिरिक्त काहीच नव्हतं. हुरहूर होती, पण ती अंधार विरून जाई पर्यंत ! वाड्याचा बाहेरून ओल्या कंदिलाच्या उजेडात थोडीफार पुढे जाऊन संपणारी पायवाट हरवलेली भासत होती.

.....

काळी ,मोठी लेदरची बॅग दिगंबर ने टांग्याच्या पायरीवर अडकवली. साहेबांच्या हातातली छोटी बॅग घ्यायला तो त्यांच्या जवळ गेला.

"असू दे ही माझ्या जवळ !" शेखर नी टांग्याकडे एक कटाक्ष टाकला. 

"कोणाचा आहे हो, हा टांगा ? "

" आमचाच ए सायब, भाऊ चालवतो."

" अरे वा ! घोडे छान आहेत." वर चढता-चढता शेखर चं लक्ष एकदम त्या डौलदार घोड्याकडे गेलं. 

" हा, जवान आहे हा आमचा. यांच्याच जीवावर चाललंय सगळं !" 

"कसं आहे वातावरण इथे ?"

अचानक आलेल्या अश्या प्रश्नाला उत्तर द्यायला दिगंबर तयार नव्हता. 

" काही नाही साहेब, सहा-सात दिवसात, एखादी घटना घडते. लोकांना कामं अस्त्यात. शेती, जनावरं, यातून वेळ मिळाला तर मोर्चे, आंदोलनं, लढा सुचतो. प्रत्येकाला प्रपंच आहे."

" किती लोकसंख्या?"

" चार-पाच हजार असेल...!"

" आणि एकही क्रांतिकारक नाही !!" 

टांगा पुढे सरकू लागला. रात्रभर प्रवासाचा शीण , त्या सकाळच्या गारव्याने कधीच निघून गेला होता. शेखरचं इतक्या लहान गावात पाहिलंच स्वतंत्र पोस्टिंग होतं. रहायला स्वतंत्र बंगला, पगारवाढही मिळाली होती. शिवाय, शिवपुरी सारख्या एका निसर्गरम्य ठिकाणी झालं होतं पोस्टिंग. नजर जाईल तिथपर्यंत हिरवळ, त्यातून वाट काढत पाळणारे कच्चे रस्ते. रस्त्यांना दोन्ही बाजूने वळण लावणारी दाट झाडी. टांग्याकडे अचंब्याने पहाणाऱ्या लोकांकडे पाहून त्यांची साधी रहाणि स्पष्ट दिसत होती. शेखर ऐकूनही होताच, की शिवपुरी अत्यंत शांत परिक्षेत्र आहे. उत्तर भारतात, इतरत्र भारतात असलेली स्वातंत्र्य लढ्याची लाट अजून इथे पोहोचली नव्हती. १८५७ साली झाली, तेवढीच क्रांती इथे झाली. मोर्चे, निषेध होतात पण शिस्तीत आणि शांततेत. 

" अरे वा, मस्तच..! फळबागा सुद्धा आहेत का इथे ?" एका आमराईकडे अचानक त्याचे लक्ष गेले. 

" होय साहेब, आंबे, पेरू, डाळींब, पेरू, चिक्कू, चिंच, केळी...बरंच आहे ! आता परवा बाजार आहे, घेऊन जाईल तुम्हाला." 

"थांब जरा" अचानक डावीकडे जाणारी एक पायवाट शेखरला दिसली तसा त्यांने दिगंबरच्या हातातील लगाम ओढला. मुख्य रस्त्याहून आत , आठ दहा फुटावर , एका मोठ्या लोखंडी फटकातुन शिरत, ती दगडी पायवाट खोलवर झाडीत जात होती. शेखर टांग्यातून खाली आला. झाडावरून कित्येक वर्षापूर्वी विभक्त झालेल्या पाचोळ्यावर त्याचे पाऊल पडतात, पाचोळा शहरला. फक्त वाऱ्याच्या भरवाश्यावर तो जगत होता...! पुढे-पुढे जाणाऱ्या शेखरला पाहून दिगंबरही खाली आला. 

"काय आहे हे ?" त्या मोठ्या लोखंडी फाटका बाहेर शेखर उभा राहिला. आत, बाहेरच्या रस्त्याला जोडून जाणारी एक दगडी पायवाट होती. विरून गेलेली हिरवळ होती. एक छोटी टुमदार बाग, पण अर्धी वाळलेली. आताशा पडू लागल्या पावसामुळे थोडीफार जीवणी मिळालेली झाडं होती. त्यांना बिलगून उभ्या, काही अनोळखी रानवेली ! प्रत्येक सजीव-निर्जीव वस्तू मधून जिवंत असल्याच्या काही शेवटच्या खुणा होत्या. पायवाट संपली, तिथे एक जुनाट मोठा चुन्यातून उभा केलेला बंगला उभा होता. खूप उदास, केविलवाणा, एकटा...! 

" कोण रहातं इथे ?" शेखरनी लोखंडी फाटकाला हात लावला, पण तो आत गेला नाही. 

"नाही, कोणी नाही ! पहातोय तसा बंद आहे बंगला. 

" किती सुंदर वास्तू आहे. घडवणार्यांनी आयुष्यभराची सगळी स्वप्न एकवटून , एकाच पाषाणात कोरून ठेवल्यासारखी वाटतायत." तिथली निरव शांतात चिरत लोखंडी दाराची जड कडी खाली पडली. शेखर नी आत पाऊल टाकले. कदाचित एखाद्या युगानंतर तिथे एखादे पाऊल पडले असावे. 

"इतकी सुदंर जागा, इतकी एकटी कशी असू शकते." 

" साहेब, प्रत्येक गुण स्वतःभवती काही अवगुण घेऊन येतोच ना ! तसंच असेल काहीतरी." दिगंबरकडून असलं काही उत्तर अपेक्षित नव्हतं. 

" अरे, तुम्ही तर कवी आहात." 

तुटलेल्या खिडकीच्या रंगबिरंगी, न पुसलेल्या काचा होत्या. कधी काळी शुभ्र पांढरा असलेला हा इमला काळानुरूप काळवंडला होता. आजूबाजूची उजाड झालेली बाग आपल्या कुशीत एक भय घेऊन जशीच्या तशी उभी होती.अनोळखी चाहूल होती. चांगली-वाईट , कोणाला माहीत !!

" तुम्ही किती दिवसापासून आहात इथे ? " 

एक दगडी पाटी पुसत असलेला दिगंबर एकदम भानावर आला. 

" जन्म याच गावातला आहे माझा. पण मी जुन्या गावात वाढलेलो आहे ना ! "

" हा...!" 

एका खिडकीच्या काचेतून शेखरने आत पाहिले. प्रत्येक खिडकीतून आत पोहचू पहाणारा सूर्यप्रकाश , फुटा-दोन फुटावर अडत होता. आतलं सगळं अस्पष्ट दिसत होतं. पांढऱ्या चादरीने आतलं लाकडी समान कित्येक वर्षापासून झाकून ठेवलं होतं. कोणीही वाली नसल्यासारखी, प्रत्येक गोष्ट पसरलेली होती. पण आत, एक ऊर्जा होती. कोणाचे तरी हे घर होते, जे आज या गावाच्या एका कोपऱ्यात, स्वतःच्या काही सुदैवी-दुर्दैवी आठवणीत उभे होते. खिडकीच्या एका दाराला हात लावून शेखरनी ते उघडण्याचा प्रयत्न केला.

"साहेब" दिगंबरनी त्याला आवाज दिला. ती नाव असलेली फरशी , जरा स्वच्छ झाली होती. खिडकी तशीच ठेवून शेखर तिकडे आला. त्यावर नाव होते...! 

" माया" 

" बंगल्याचे नाव दिसते." दिगंबरनी अंदाज लावला. 

" मालकीणीचे पण असू शकते..!" 

"साहेब, निघायला हवं..! उशीर होईल." फरशी तशीच सोडून दिगंबर टांग्याकडे चालू लागला. शेखरनेही बंगल्याकडे पाठ फिरवली. काही पावलं पुढे चालत गेल्यावर अचानक त्याला आतून कोणीतरी त्याच्याकडे बघत असल्याचा भास झाला. क्षणभर थांबून त्याने मागे पहिले. 

"चला साहेब..!" दिगंबर टांग्यात जाऊन बसला सुद्धा. 


पहाट झाली तीच मुळात एक सकारात्मकता घेऊन. आज वारं उदास नव्हतं. दमटपणा अर्ध्यारात्रीच्या गारठ्यात विरला होता. अंगणात चिखल होता, पण निपचित पडला होता. वाड्यात सकाळची कोवळी किरणे आरपार फिरत. घरातील प्रत्येक कोपरा ऊर्जेने उजळून निघायचा. विष्णूपंतांच्या पंजोबांनी हा १५ खोल्यांचा वाडा बांधला होता. सुमारे १०० एकर जमीन वाड्याला घेरून वसली होती. लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदत. वाड्यातच एका खोलीत पंतांनी वाडीतल्या लहान पोरांना शिकवणीची सोय करून ठेवली होती. सुमनने त्यांच्या पाठीशी गेली ३० वर्ष अगदी सावली सारखी उभी होती. दोघांच्या सोन्यासारख्या संसारात अजून झळाळी आली, ती आनंद मुळे. गेले ४ वर्ष विधीशिक्षण घेण्यास परदेशी गेलेला आनंद, मुंबईला येऊन पोहोचला होता. 

"रुक्मि, अगं डाळ काढलीस ना ?" आज सकाळपासून सुमनला अजिबात उसंत नव्हती. मध्यरात्रीनंतर केव्हातरी पाऊस थांबला, तेव्हाच तिला आनंदच्या येण्याचे वेध लागले. चार वर्षे झालीत, पोराचा जाता चेहरा डोळ्यात साठवून सुमन बसली होती. त्यानी विलायतेहून पाठवलेली पत्रं, तिने एका मोत्याच्या पेटीत जपून ठेवली होती. नाही म्हणलं, तरी पंतांनाही मुलाच्या येण्याचे आज वेध लागले होते. 

" अहो, चार वर्षाच्या पुरण-पोळ्या आजच नका करून खाऊ घालू !" 

" तुम्ही तुमची कामं करा बघू, बायकांच्या कामात कशाला लुडबुड करायची ?" लांबून पंत तिची लागभग बघत होते. कित्येक दिवसांनी तिच्या चेहऱ्यावर आज आनंद दिसत होता. चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमध्ये तिने लपवलेले स्मितहास्य आज लकाकूंन बाहेर येत होते. 

" एक सांगू का ?"

" बोला न, मला नाही मग काय या भिंतींना ऐकवणार आहात का?"

"लग्नात सुद्धा एवढ्या सुदंर दिसल्या नाहीत."

" उगाच काय हे, पोरगं झालं लग्नाचं,तरी अजून तुमच्या अंगातला आगाऊपणा जात नाही."

" पोरगं आमच्याचकडून शिकेल ना..!"

तेवढ्यात विठोबाच्या दाराची कडी वाजवली. 

" नाही, म्हनलं, जावं का मी चौकाकडे, मालक यायची वेळ झालिया."

" म्हणजे, अजून इथेच का तुम्ही, विठोबा, किती हो तुम्हाला सांगायचं, वेळ पाळत चला जरा." 

पंत उगाच त्याच्यावर डाफरले. 

" त्यांना आहे भान, तुम्हीच ठेवा म्हणजे झालं." सुमनने लगेच डाव साधला.आनंदच्या येण्याच्या चाहुलीने, वाड्याची गेलेली कळा परत येत होती. इतके दिवस निरव शांततेत वावरणारा पंतांचा वाडा आज खुलून हसायला लागला होता. चार वर्षे त्यावर साचलेली धूळ आज आनंदच्या येण्याने पार धुतली गेली. 

विठोबाने जसे वाड्याबाहेर पाय काढले, तसे पंत उठले. आपल्या खोलीत गेले.त्यांच्या त्या शाही कपाटावरून एक मोठी संदुक फरफटत खाली आली. वरचे काही जुने कपडे बाजूला काढून त्यांनी ते पलंगावर फेकले. 

" काय बघताय?" मागून अचानक सुमन आल्याने ते दचकले. सुमनला त्यांच्या वेगानेच कळले ,की ते कशासाठी खोलीत आले. 

"सुमन...! त्याला सांगून टाकूया." अचानक दोघांच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. 

पंतांच्या हातात आनंदाची कुंडली होती. थरथरत्या हातांनी त्यांनी ती डोळ्यासमोर धरली. 

"नाही, अजिबात नाही."

" ऐक माझं सुमन..!" 

"नाही म्हणते न, माझंच चुकलं, ती पत्रिका मी जाळायला..!"

" सुमन.."

"हे बघा, खूप दिवसांनी वाड्यात सुख चालत येतंय. त्याला नका नजर लावू."

" पण त्याला सांगावं लागेल सुमन, उद्या जर त्याचं काही बरं-वाईट झालं तर...!"

" गप्प बसा, मी नाही होऊ देणार असं काहीच. आजपर्यंत आपण प्रत्येक गोष्टीला तोंड देत आलेला आहात, मग आजच का ढासळता आहात..?" 

" मी नाही सुमन, हे ग्रह, तारे, नक्षत्र, हे योग मला गप्प बसू देत नाहीयेत..! झोप येत नाही रात्री."

पंतांची शून्यात हरवलेली नजर सुमनला अस्वस्थ करून गेली. 

"ऐका माझं, आपण त्याला घेऊन एकदा किर्तीकरांकडे जाऊन येऊ. बघुयात, काही उपाय आहे का ?"

" उपाय काळाला कधीच नसतो सुमन." पंत स्वतः बनवलेल्या कुंडलीवर ठाम होते. "जे मला दिसतंय, ते तुला कदाचित दिसत नसावं. उदास चेहऱ्याने सुमन बाहेर निघून गेली. पंत तसेच खिडकीबाहेर काहीतरी बघत बसले. त्यांच्या खिडकीच्या बाहेर उभ्या पिंपळाची आज पासून सावली पडणार नव्हती. आनंदने गावात पाऊल टाकताच ,त्याच्या मागे लागणारा काळ अटळ होता. त्याला कितपत रोखावें...! 


अचानक दारावर पडलेल्या थापेने शेखर भानावर आला. अंधार झाल्याचे सुद्धा त्याला कळले नाही. नवीन सरकारी घर तसं छान, मोठं होतं. पण त्यात रहाणार शेखर एकटाच होता. आई-वडील, बहीण असे छोटेसे कुटुंब त्याने गावीच ठेवले होते. एकततर देशभर पसरलेले क्रांतीचे लोण, त्यात इंग्रज सरकारची पोलीस खात्यातली नोकरी. एकदा उत्तरेत असताना काही क्रांतिकार्यानी अख्खी वसाहत पेटवली होती. मूळ इग्रजांपेक्षा, त्यांच्या चाकरीत असलेल्या शेखरसारख्या चाकरमान्यांवर हल्ले वाढत होते. 

दोन किवाडी दरवाजा उघडला तर समोर पितळी डबा घेऊन दिगंबर उभा होता. 

" साहेब, हाक नाही का मारायची?"

"नाही लक्षात राहिलं, आणि हे काय ? "

" डबा, आज तुम्ही येणार म्हणून आमच्या मंडळींनी खास पुरण-पोळ्या करून पाठवल्या आहेत, आणि ताकीद दिली. तुमचं होई पर्यंत इथून हलायचं नाही. "

" अरे, हे काय ?"

" तुम्ही हात धुवून घ्या, मी टेबलावर जेवण लावतो. 

हातात कंदील घेऊन शेखर न्हाणीघरात शिरला. तिथे आधीच तयारी बघून त्याला दिगंबरचे कौतुक करावे वाटले. काय माणसं असतात. खाली वाकून त्यांने हाय-पाय धुतले. वर असलेला पंचा त्याने खाली ओढला आणि समोरच्या आरश्यात त्याला एक म्हातारा दिसला....! ७० वर्ष वय असलेला एक जक्खड म्हातारा ! खांद्यावर घोंगडी, हातात घुगरांची काठी. भरदार मिशी पिळत उभा असलेला तो एकदम समोर आला आणि नाहीसा झाला. शेखरला दरदरून घाम फुटला आणि धक्क्याने त्याचा तोल गेला. " दिगंबर...!" जिवाच्या आकांताने तो ओरडला. साहेबांचा आवाज ऐकून दिगंबर धावत आला. खाडकन न्हानिघराचे दार त्याने उघडले. घाबरलेला शेखर जमिनीवर कोसळला होता. 

" काय झालं साहेब?" त्यांने बोलता-बोलता शेखरला सावरलं. 

" तो म्हातारा..!" 

" कुठे?" शेखरने खिडकीकडे बोट दाखवले. दिगंबरने कपडे बाजूला करून पाहिले. तिथे कोणीच नव्हते. खिडकीतून बाहेर फक्त अंधार होता. 

' काय होतं ते ? ' मुरगळलेला पाय घेउन दिगंबरने शेखरला खुर्चीवर बसवले. 

" एक म्हातारा होता...सत्तरीतला, अचानक समोर आला." घामाघूम झालेला शेखर स्वतःला सावरत होता. 

" साहेब, काही नाहीये तिथे!" दिगंबर त्याला धीर देत होता." भास असेल साहेब, थकवा असेल प्रवासाचा..! दोन घास खाऊन घ्या, आणि निवांत झोपा...! 

"हो !" 


चार वर्षांनी समोर मुलगा उभा राहिला. सुमनच्या डोळ्यातून पाण्याचा ओघ थांबत नव्हता. नजर त्याच्या निरागस गोऱ्या चेहऱ्यावर खिळून होती. आधीच भाबडा दिसणारा चेहरा, थकल्याने जरा मलूल झाला होता. 

"दृष्ट लागली पोराला !" 

" व्हय, थांबा, संध्याकाळी मीठ-मोहरीने काढते. आणि परवा अमोशेला कोंबडं ववाळून टाकूया!"

रुक्मिने आपले जालीम उपाय सांगितले. 

" कोंबडं कशाला ! उगाच मुक्या जीवांचे बळी नाही घ्यायचे. त्यांने नाही होत काही..!" खाता-खाताच आनंद म्हणाला. 

" तुला नाही माहित, बघणाऱ्या प्रत्येकाची नजर चांगलीच असते असं नाहीये." सुमन मधली आई बोलली. 

" अगं आई...!" 

" मोठी मांन्स सांगतायत ते ऐकायचं ! छान बुक शिकून आला आहेस विलायतेहून, ते ठीकए सगळं, पण इथे नाहीये तसं..!" 

आईपुढे आनंदाची मात्रा चालेना झाली. 

दुपारी सगळेच आनंदच्या खोलीत जमले. आपण सोडून गेलो होतो, तशीच खोली ठेवलेली पाहून त्यालाही बरं वाटलं. त्याच्या अत्यंत खासगी बाबींपैकी एक त्याची खोली होती. आज सकाळीच ती रुक्मिने झाडून पुसून ठेवली होती. 

" हे घ्या, पंत, हे तुम्हाला ! " 

चांदीच्या मुठीची एक सागाची काठी आनंदनी त्यांच्या हातात ठेवली. 

"छान ए, नाहीतरी माझी जुनी झालीच आहे." 

"हो, ही handmade आहे, एकही यंत्र लागलेलं नाहीये !" 

"अरे वा ! सुरेख नक्षीकाम आहे रे..!" 

सुमन पोरानं तिला आणलेली मऊ गादी , उशी आणि पांघरूण बघत होती. 

तिघांमध्ये असलेल्या संवादात एक अपूर्णता होती. पंत आणि सुमन अंतरंगात गुपितं दडवून थकली होती. नियातीपेक्षा वेळंच भलते-सलते खेळ खेळत होती. ताऱ्यांचा खेळ खूप वेगळा आणि विक्षिप्त होता. पण आनंद अनभिज्ञ होता. एखाद्याने मन लावून एखादी नक्षी तयार करावी तशी आनंदची ठेवण होती. आनंद कसा असतो, हे त्याच्याकडे पाहून सहज कळले असते. निरागस चेहरा , आवाजही तितकाच लोभस. प्रथमदर्शी पहावं आणि सरळ प्रेमात पडावं असाच शांत. एखाद्या उगवत्या झर्यासारखं स्वच्छ वागणं. कोणताही भेदभाव नाही, कोणाविषयी कपट नाही, छ्ल नाही. त्याला दीर्घकाळापासून ओळखणारे, त्याला ओळखण्यात मोठी धन्यता मानत. देवानेच स्वतःहून घडवलेली ही मूर्ती, नियतीने नशीब लिहिताना विदारक झाली होती. 

"प्रिय लेखास, 

सुखरूप पोहोचलो. काळजी करू नकोस. वाड्यात सगळं काही ठीक आहे. आई माझ्या येण्याची आतुरतेने वाट पहात होती. मला ४ वर्षांनी पाहिल्यावर तिची झालेली घालमेल बघायला तू समोर हवी होतीस. ते शब्दात सांगता येणे शक्य नाही. पंत ही ठीक आहेत. म्हातारपणाच्या खुणा दिसू लागल्या आहेत. मी जसा सोडून लंडन ला गेलो होतो, अगदी तसाच वाडा त्यांनी ठेवला आहे. रंग सुद्धा बदलला नाहीये. आज दुपारी दोघही माझ्या खोलीत आले होते. इतकं खुलून काहीही बोलले नाहीत. मी ही त्यांना काहीही बोललो नाहीये. जे काही घडले, घडेल त्याच्यासमोर खंबीरपणे उभं रहायला मी तयार आहे. पण या वयात त्या दोघांना याचा मनस्ताप खूप होईल. 

तू नेहमी म्हणतेस, भय ही एक मनाची स्थिती आहे. एखादी अनपेक्षित, कधीही समोर न आलेली गोष्ट घडायला लागली, की त्यातून भय निर्माण होतो. पण इथे काहीतरी वेगळं आहे. इथे भय भविष्याचं आहे. जे घडणार आहे, ते घडेल की नाही, याची शंका असून सुद्धा त्याचे भय मात्र खूप गहिरे आहे. येऊन काही तास झाले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद उगवला आणि नकळत मावळलाही. ते दोघे एखाद्या हतबळासारखे हात बांधून येणाऱ्या काळासमोर उभे असलेले मला दिसले. 

असो, आपल्याबद्दल यथावकाश मी दोघांना सांगेन. ते नाही म्हणणार नाही. खाली पत्ता लिहिला आहे. पत्र पाठवत रहा. मी ही कळवीन. 


तुझाच

आनंद..! 

" चला..!"

मागून विठोबा बोलवायला आला. आनंदने न विसरता त्याच्यासाठी आणि रुक्मिणी साठी एक-एक स्वेटर आणले होते. 

" जाऊया...! हे घालून दाखवा आधी."

" मालक, हे काय ए, अहो आम्ही गडी-माणसं. उगाच जीव लावून आम्हाला उपकारात नका टाकू. ! "

" उगाच मनाला येईल ते नका बोलू. तुम्ही जे काही माझ्यासाठी आणि या घरासाठी केलं आहे, ते करायला काळीज लागतं!"

विठोबाच्या डोळ्यात एकदम पाणी तरळलं. कदाचित भूतकाळातले काहीतरी त्याला आठवले असावे. आनंदने त्याला मारलेल्या मिठीत त्यावेळी सगळेच भरून आले. दोघेही खोलीचे दार लावून निघून गेले. खिडकीच्या वाऱ्यावर लेखाला लिहिलेलं पत्र उडत राहिलं, आणि अचानक थांबलं. एका पाकिटावर तिचा मुंबईचा पत्ता लिहिला होता. कोणीतरी तो खूप सावधरित्या तो वाचला होता...! 

आज कीर्तिकर पहाटेपासून जागे होते. नंदाला काही कळेनासे झाले होते. त्यांनी सांगितले, तसे तिने त्यांना पहाटे चहा करून दिला. त्यावेळीही ते अस्वस्थ होते.

" काय झालंय तरी काय? तास झाला, झुलता आहात झोपाळ्यावर!"

त्यांनी न ऐकल्यासारखं केलं. 

"अहो..! बरे नाही का, वैद्यबोवांना बोलावणे धाडू का ? "

" नंदा, तू थोडं गप्प बस, मी कोणाची तरी वाट पहातोय."

" कोणाची..?" 

" कळेल, पण तो पर्यंत जरा गप्प बस." नंदा खिन्न होऊन आत गेली. तिने बऱ्याचदा त्यांना उगाच असवस्थ झालेलं पाहिलं होतं. थोडावेळ अस्वस्थ झाले, की बरे व्हायचे. इतक्या दीर्घकाळ अस्वस्थ रहाणे, त्यांना देखील आवडत नसे. 

मुख्य दरवाजाची कडी वाजली. कोपरी, पागोटे घातलेला एक मध्यवयीन इसम चालत आत आला. कीर्तिकर अजूनही झुलत होते. पण त्याला पहाताच ते लगबगीने उठून खाली आले. 

"काय रे, किती उशीर..!" 

" पावसामुळे वाटा नीट सापडत नाही. रात्रीचा प्रवास धोक्याचा आहे." बोलता-बोलता त्याने कमरेला असलेली एका मळक्या कागदाची गुंडाळी त्यांच्या हातात दिली. बाहेर तिसरा आवाज ऐकल्यावर नंदा ही काम टाकून बाहेर आली. किर्तीकरांनी गुंडाळी उघडली. तिथेच पायरीवर बसले. 

" अनावधाने झालेल्या पापाची परतफेड करण्यासाठी दोषी जमा होतायत. त्यांचा दोष माहित नसताना सुद्धा, त्यांना बळी जावे लागेल. त्यांच्या चिकित्सेला आणि प्रश्नांना काय उत्तर द्यावे ? आल्या-आल्या अकस्मात त्यांना काळाने अघोरी दर्शन दिले. मी तिथेच होतो. फार काळ सत्य लपून रहाणार नाही, या न त्या मार्गाने ते अक्राळ रुपात समोर येईलच. आपल्या आज्ञेप्रमाणे त्यांना सावध करेन. "

किर्तीकरांचे एकदम डोळे गरगर फिरायला लागले. 

" थांब तू इथेच. नंदा, याला पाणी दे, मी आलोच !" आणि ते देवघरात गेले. एका कापडी पुरचुंडीत महाकाळाची रक्षा त्यांनी बांधली. 

" कळतंय मला, निरोप मिळाला. रक्षा पाठवली आहे. पिण्याच्या पाण्याच्या भांड्यात टाकून ठेवावी. घरात महादेवाचे एखादे स्थान करून ठेवावे. घरात देव नसणे ,जीवावर बेतू शकते." थोडावेळ थांबून तो निरोप्या निघून गेला. 


पावसाने क्षणभर विश्रांती नंतर पून्हा पाय पसरायला सुरवात केली. आपल्या खोलीत जवळपास चार वर्षांनी आनंद निवांत झोपला होता. कितीही सांगितलं, तरी तो खिडक्या बंद करत नसे. अचानक कसल्याशा चाहुलीने त्याला जाग आले. खिडकीच्या बाहेरून कोणीतरी आत डोकावून बघत असल्याची पूर्ण जाणीव त्याला झाली. 

"कोण ए?" त्याने पलंगावरून हाक मारली.डाव्या हाताने चिंमणीची वात वर केली. त्याच्यापुरती उजेड झाला होता. 

" विठोबा, तुम्ही आहात का ?" तरीही काही हालचाल झाली नाही. पलंगावरून त्याने दोन्ही पाय खाली ठेवले. वहाणा घालून तो उघड्या खिडकीकडे चालू लागला. बाहेर आडोश्याला ठेवलेल्या मशालीत फारसे दिसत नव्हते. खिडकीची दारं मंद वाऱ्याच्या सुरांवर डोलत होती. एक एक पाऊल पुढे टाकत आनंद खिडकीपाशी आला. गजांना हात लावून तो बाहेर पाहू लागला. कोणीच नव्हते. त्याने नजरेच्या विळख्यात येईल ते दोनदा पहिले. हात बाहेर काढून दार ओढणार तितक्यात कुठुनशे एक वटवाघूळ उडत येऊन त्याच्या हातात अडकले. जिवाच्या आकांताने आनंद मागे सरकला. वटवाघूळाने त्याचा डावा हात आपल्या दोन्ही पंजात पूर्ण अडकवला.तो चोचीने त्याला टोचू लागला. उजव्या हाताने आनंदने त्याला ओढायचा प्रयत्न केला, पण त्या पक्षाचे पंख त्याच्या डोळ्यावर फडफडू लागले. आनंद खाली पडला. बाजूच्या मेजाला धक्का लागल्याने पाण्याने भरलेले तांब्या-पेला खाली पडले. आवाज झाल्याने बाहेर पाहऱ्याला असणारा विठोबा खाडकन दार उघडून आत आला. अजस्त्र वटवाघूळाची आणि आनंदाची झटापट पाहून त्याला क्षणभर काय होतंय, हे कळलेच नाही. सावरून त्याने दोन्ही हाताने ते पाखरू ओरबाडले आणि भिंतीवर आदळले. आपल्या बलदंड दांडूक्याने त्याच्या डोक्यावर वार केला. ते तिथेच तडफडत गेले. आनंद जमिनीवर पडला होता. एव्हाना धावत पंत आणि सुमनही वर आले. आनंदचा डावा हात रक्तबंबाळ झाला होता. डोळा थोडक्यात वाचला होता. पुढच्या दारावर पाहऱ्याला असणारी गडी माणसं मशाली घेऊन धावत सुटले.कोणास काहीच सापडले नाही. अचानक झालेल्या या हल्ल्याने आनंद पूरता घामाघूम झाला. ते काय होते, आले कुठून, घरात कसे शिरले...!!! गतप्राण झालेले तर पाखरू, निपचित, निरुत्तर, पडून राहिले. त्याचा आत्मा डोळ्याने गेला होता. आनंदला पुन्हा जागेवर बसून विठोबा त्या वटवाघूळाकडे आला. त्याने त्याच्या डोळ्यात पहिले. अत्यंत केविलवाणे डोळे होते. सांगत होते, मी फक्त सावध करायला , खूप लांबून आलो होते...! 


पावसाचे रौद्र वाढत जात होते. परिसरात ओढे, नदी-नाल्यांमध्ये वाढतं पाणी दळण-वळण विस्कळीत करून जात होते. शेखर काही पत्रांची उत्तर लिहून गाढ झोपला होता. त्या घटनेनंतर विचलित होण्यासारखं काहीही न घडल्याने, तो एक भास समजून शेखर सगळं विसरला. 

अचानक कोणीतरी जोरात थाप मारली. कोणीतरी खूप घाबरले असावे, किंवा आतातायी झालेले असावे. एकदम त्याची गाढ झोप कुठल्या-कुठे उडून गेली. त्याने घाईने जाऊन दाराची कडी काढली. 

" बाजी, काय झालं, इतक्या रात्रीचं?"

" साहेब, लवकर चला, चावडीपाशी ! " त्यांच्याच ठाण्यात काम करणारा एक हवालदार निरोप सांगायला आला होता. बाहेर चिखल बघून ते पायीच निघाले. आभाळ भरलेलं असल्याने चांदण्याचा काही उपयोग नव्हताच. रस्त्यावरचे दिवे केव्हाच विझले होते. बाजीच्या हातातल्या कंदिलाच्या वाटेने दोघे चालत होते. 

चावडी चौकापासून काही अंतरात झुडपे होती. तिथे दोन शिपाई उभेच होते. दोघेही घाबरलेले होते. शेखर आणि बाजी त्यांच्याजवळ जाताच, त्यातील एकाने डोळ्यानेच शेखरला इशारा केला. शेखर ने उजवीकडे पाहिले. काही अंतरावर दोन प्रेतं 5पडलेली होती. शेखर जवळ जाऊ लागला. " नका जाऊ साहेब ! उद्या सकाळी बघा. बेकार हालत ए !!" थोडासा सावध होत शेखर एक एक पाऊल पुढे टाकू लागला. तिघांपैकी एकही हवालदार त्याच्यासोबत पूढे आला नाही. एका झुडपा मागे त्याने पहिले. त्याचा स्वतःवरच विश्वास बसला नाही. प्रेतं अत्यंत क्रूर अवस्थेत होती. एकाचा डावा पाय मागे पूर्ण वाकवून तो कमरेपासून वेगळा केला होता. दुसऱ्याची मान पूर्ण वाळवून त्याचा जिव घेतला होता. वय २८-२९ वर्ष असलेल्या शेखरने आज पर्यंत एवढा भयंकर प्रकार पहिला नव्हता. बाजूला, अजून थोडं पुढे, कोणीतरी घोंगडी पांघरून रडत होतं. पावसाने त्याची घोंगडी पार ओली झाली होती. शेखर दबकत त्याच्या जवळ गेला. प्रेतांची छिन्न-विच्छिन्न अवस्था पाहून आता शेखरलाही भीती वाटू लागली होती. वातावरणामुळे घटना अधिकच भयानक भासत होती. 

"बाबा..!" घोंगडीतल्या माणसाने काहीच उत्तर दिले नाही. 

" कसं झालं हे ? आणि तुम्ही..?" शेखरनी आपलं काम सुरु केलं. 

" बोललो होतो मी त्यांना..!" त्या माणसाने एकंच टाहो फोडला. त्यांच्या त्या ओरडण्याने तिथल्या झुडपांना सुद्धा कापरं भरलं असेल. 

"बोललो होतो, नका जाऊ, नाहीये तिथे काहीच...!" शेखर गुपचूप ऐकत होता. घोंगडीत असलेला माणूस बोलायला लागलेला पाहून अत्तपर्यंत बाजूला उभे असलेले शिपाई जवळ यायला लागले. 

"आम्ही तीन जण होतो. चोरी वाटमारी करत पोट भरायचो. बरेच दिवस इथे कोणी नाही पाहून आम्ही आज आलो. पण मला शंका आली ! मी या दोघांना म्हणालो, नका जाऊ ! नाही ऐकलं साहेब यांनी.!" त्याचं रडणं थांबत नव्हतं. " मला शिव्या देऊन ,दोघ निघून गेले. बराच वेळ त्यांचा काहीच आवाज आला नाही. मी जागचा हललो नाहीच..! बऱ्याच वेळाने दोघांच्या किंकाळ्या ऐकू आल्या." 

"त्यांना इथे आणलं कोणी ?" 

"मी आणलं ओढून, एक एक करत..! " शेखर ने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. वाऱ्याचा एक जोरकस मारा झाला आणि त्या माणसाची घोंगडी त्याच्या डोक्यावरून खाली सरकली. समोरचं दृश्य पाहून शेखर भीतीने लांब फेकला गेला. त्या माणसाचे दोन्ही डोळे कोणीतरी अत्यंत क्रूरपणे फोडले होते. दोन्ही डोळ्यांमधून रक्त वहात होतं. शेखर लांब पडलेला पाहून शिपाई धावत आले. त्यांनी ही ते दृश्य पाहिलं. दोघांनी चिखलात पडलेल्या शेखरला उचललं, तिसऱ्याने ती चिखलाने माखलेली घोंगडी त्या माणसावर टाकण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांचीच भीतीने गाळण उडाली होती. कसंबसं सावरत ते तिथून जाऊ लागले. 

" त्या माणसाला सरकारी दवाखान्यात न्या. उद्या सकाळी पून्हा येऊ तपासाला." शेखरला सुद्धा आता तिथून लांब पळायचे होते. दोन शिपाई मोठ्या हिमतीने त्या माणसाजवळ गेले. त्याला उभं करून सोबत चालतं केलं. 

शेखर रात्री पोलीस ठाण्यातच झोपला. सकाळी लवकर बाजी सोबत कालच्या घटना स्थळी आला. काही माणसं सोबत होती. त्यांनी बैलगाडीत भिजलेली प्रेतं ठेवली. 

"साहेब, हे माणसाचं काम नाहीये !" बाजी प्रेतांकडे पाहून बोलला. शेखर शांत होता. घटना घडली ते ठिकाण पाहून त्याच्या मनात कापरं दाटून आलं. तो तोच बंगला होता. कालच्या घटनेला मुक्याने दुजोरा देत तसाच शांत, निपचित उभा होता. 

" मग...कोणाचं काम आहे.!" शेखरने खूप वेळाने बाजीला विचारलं. बाजीने बंगल्याकडे बोट दाखवलं. 

तास-दोन तास अख्खा परिसर पिंजून काढला. कोणाला काहीही सापडलं नाही. दिगंबर सुद्धा सोबत आला होता. सोबत असलेली ती माणसं निघून गेली होती. हतबल शिपाई शेखर च्या आजूबाजूला गोळा झाली. 

" साहेब, एक इंचभर सुद्धा पुरावा सापडला नाहीये. आता काय करायचं?" 

"काही नाही." अजुंनही शेखर शांत होता. चालत-चालत तो बंगल्याच्या मुख्य दारापाशी गेला. त्याने कुलुपाला हात लावला. खूप जुनं कुलूप होतं. अर्ध्याहून अधिक गँजलेलें. दाराची कडीही जड झाली होती.

" डाव्याबाजूच्या खिडकीची काच तोडून आत गेले." बाजी म्हणाला. " जे काही घडलंय, ते आत घडलंय. कुणी बाहेरून आलंच नाहीये. त्या बाबानी या दोघांना ओढून कसं आणलं ?" शेखरचा प्रश्न वाजवी होता. "घराला लावलेलं कुलूप , बंद दारं खिडक्या...?" शेखर डाव्या बाजूला गेला. एक खिडकी अर्धी उघडी होती. एक माणूस सहज आत जाईल, इतकी ती मोठी होती. आतलं ही बऱ्यापैकी दिसत होतं. बाजी आणि शेखरनी आत पाहिलं. आतलं सगळं समान, जसंच्या तसं होतं. झटपटीची साधी खुणही तिथे नव्हती. आतून जन्मलेले प्रश्न , त्याची उत्तरंही आतंच होती. आत काहीतरी होते , जे श्वास घेत होते...!


" अगं, पत्र झिजेल आता..!" अचानक बाबा खोलीत आलेले पाहून लेखा बावरली. आल्यापासून कित्येकदा तिने त्याचे पत्र वाचले होते. "बोलवायचं नाही का त्याला घरी ?" बाबा पलंगावर येऊन बसले. 

" बाबा, तो इथे मुंबईला येऊनच प्रॅक्टिस करेल. एकदा सगळं सुरळीत झालं, की पुढंच !" 

" चांगलं आहे. पण एकदा त्याला आणि त्याच्या आई-वडिलांना मुंबईला बोलवून घेऊ. मुंबई आणि माणसं, दोन्ही बघता येतील त्यांना." चांदेकरांनी लेकीला अत्यंत लाडात वाढवले होते. लेखा सुद्धा अत्यंत हुशार, आज्ञाधारक मुलगी होती. आनंद भेटल्यापासून, ते आजपर्यंत घडलेल्या सगळ्या गोष्टी तिने त्यांना सांगितल्या होत्या. बाप-लेकीचा एकमेकांवर खूप विश्वास होता. तिच्या डोक्यावर हात फिरवून ते उठले आणि चालायला लागले. दारापाशी येऊन कसलासा प्रश्न आला, म्हणून ते थांबले. 

" लेखा..!"

"काय बाबा?" 

" ते खरं होतं ? जे तू मला इंग्लंड ला असताना पत्राने लिहून कळवलं होतंस ! " लेखा पलंगावरून उठली. 

"हो..! माझ्यासमोर घडलं नव्हतं, पण खोटं नव्हतं..! का बाबा, काय झालं?"

" नाही, सहज विचारलं."

लेखा पून्हा मागे आली. बाबा बाहेर निघून गेले. 

ब्रिस्टल च्या विधीशाळेत दोघांची भेट झाली. भारतातील मोजके, त्यातही मराठी भाषिकांची संख्या कमीच! आनंद कॉलेज जवळ एका गर्भश्रीमंत वृद्ध जोडप्याने त्याला भाड्याने दिलेल्या छोट्या टुमदार घरात एकटाच रहात होता. घरात स्वयंपाक ही तोच करायचा. लेखा तिच्या काकांकडे रहात असे. एकाच वर्गात असल्याने दोघे जवळ आले आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. लेखाच्या घरून काहीही हरकत नव्हती. आणि इकडे पंतांना आणि सुमनला हे कळलं, तेव्हा त्यांच्या पाचावर धारण बसली. 


संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावून नंदा पायऱ्या चढत होती. 

" बोलायचंय तुमच्याशी..!" एकदम कीर्तिकर तिच्यासमोर उभे राहिले. 

" काय झालं ?" हे नेहमीचं होतं, पण आज ती ही गोंधळली. 

" या..!"

देवघरातील एका जुन्या कपटावरची लोखंडी पेटी खरखरत खाली आली. त्यातील धूळ साचलेल्या काही कुंडल्या बाहेर आल्या. 

" अहो , तिन्हीसांजा झाल्या आहेत, आता कुठे कुंडल्या बघताय !" 

" ही कुंडली सुर्यास्तानंतरच बघता येईल." बाकीची पेटी अत्यंत काळजीपूर्वक त्यांनी जागेवर ठेवली. 

ती कुंडली घेऊन कीर्तिकर देवापाशी आले. देवाजवळ तेलाचा दिवा लागला होता. किर्तीकरांनी ती कुंडली दिव्यावर धरली. नंदाला यात बरेच काही कळाले. दिव्याच्या उजेडात कुंडलीच्या पानांवर कोणाचे तरी काळे हात उमटलेले दिसले. 

"म्हणजे..ही कुंडली!"

"हो."

कुंडली खाली ठेऊन कीर्तिकर खिन्न देवासमोर बसून राहिले. 

" ब्रह्मदेवाने असुरांपैकी एका असुराला प्रत्येक अमावास्येला जन्माला येणाऱ्या मानवाची कुंडली लिहिण्याची मुभा दिली होती. कपटाने ती प्रथा आणि विद्या ते असुर कलियुगात घेऊन आले. आपल्या मर्जीने त्या नवजात शिशूच्या प्रारब्धाचे ग्रह, तारे, नक्षत्रांची व्यवस्था ते करू लागले. एखाद्याला अनिष्ट समयी जन्माला घालायचे ! त्याच्या नाशीबाशी वाटेल तसं खेळायचं आणि त्याचा दुर्दैवी शेवट करून मोकळं व्हायचं, एवढाच य सगळ्याचा उद्देश्य आहे."

नंदा शांतपणे ऐकत होती. 

" माझ्या आयुष्यात, मी अशी एक कुंडली मांडलीये !" नंदाने नावाऱ्याकडे आश्चर्याने पाहिले. 

" हो, आपण फक्त निमित्तमात्र असतो नंदा. आणि इथे करता-करविता एक दानव आहे. स्वतःच्या प्रजातीचा, स्वभावाचा , घृणेचा, मानवाशी आणि देवाशी असलेल्या वैराचा वारसा अखंडित सुरु असावा, म्हणून असुरांना ही विद्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देण्यास सुरुवात केली. आजही अमावास्येला जन्म घेतलेल्या बालकांचे प्रारब्ध असुर ठरवत असतात."

"आणि ही अशीच एक कुंडली ...!" त्या कुंडलीत पाहिलेल्या तळव्याची सावली नंदाच्या डोळ्यासमोर आली. "आपण काही करत का नाहीत..?" 

"इच्छा असूनही काही करता येण्यासारखं नाहीये. नक्षत्रांच्या या खेळात आपण मानव हस्तक्षेप नाही करू शकत. ज्याला त्याला ते भोगावे लागतेच. " देव्हाऱ्या खाली त्यांनी हात घातला. काही रंगीत दगडं असलेली टोपली त्यांनी बाहेर काढली. फरशीवर असणाऱ्या चौकटीत त्यांनी ती मांडली. मधोमध कुंडली ठेवली. त्यावर हळद लावली. 

"ज्या दिवशी ही हळद लाल होईल, त्यादिवशी पासून नियती आपला खेळ सुरू करेल. तो पर्यंत आपण गप्प रहाणे इष्ट."

"ग्रहशांती..?"

" आहे शक्य, पण जो पर्यंत हे ग्रह, त्या असुरांच्या तालावर आपली स्थिती बदलत राहतील, तो पर्यंत नाहीच."

"ही कोणाची कुंडली आहे?"

काहीही न बोलता कीर्तिकर बाहेर निघून गेले. 

" तुम्ही स्वतःला जवाबदार धरू नये. शेवटी हा प्रारब्धाचा खेळ आहे." नंदाही त्यांच्या मागोमाग गेली. 

.....

आनंदने लेखाबद्दल पंतांना संगीतल्यापासून पंतांचे चित्त थाऱ्यावर नव्हते. सुमनही चिंतेत होती.

" स्थळ चांगलं आहे, आणि पूढे मागे तो ही म्हणालाच ना ! मुंबईला जायचं म्हणून!" 

"तसं नाहीये सुमन..! त्याच्या मागे आपण त्या पोरीच्या आयुष्याची माती नाही करू शकत. पाप आहे ते."

आनंद आत आला. 

" मी गावात जाऊन येतो." दोघांच्या कपाळाला आठ्या आल्या. 

" गाव आपलं आहे पंत..! त्यादिवशी घडला, तो अपघात होता. मला असं घरात डांबून काय होणार आहे ?"

"विठोबाला ने सोबत." पंतांनी परवानगी दिली. 

बाहेर वाड्यात विठोबा कुठेच दिसला नाही. आनंद एकटाच पायी निघाला. हातात तीन-चार पत्र होतीच. गाव लहान आणि टुमदार होतं. पांढऱ्या चुन्यानी बांधलेल्या माड्या खूप कमी होत्या. सकाळी लवकर उठून अर्ध्याहून अधिक गाव पोरा-बाळांना घेऊन शेताकडे निघून जाई. सुर्यास्तापर्यँत बराचसा गाव ओस पडला असे. मातीची घरं जास्त असल्याने धुळीचे लोण उठत. पण आता पावसाळा असल्याने ते कमी होते. एखाद्या झोपडीपाशी बांधलेले एखादे जनावर दिसायचे, कुठे खाटेवर पहुडलेले म्हातारे. निमुळत्या गल्ल्या, मोठं-मोठाली झाडं. उन्हाचा ताप तसा कमी होता. गावात प्रत्येकजण पंतांना आणि सुमनला ओळखत होतं. आनंदलाही काही लोक ओळखत होते. अत्यंत सध्या कपड्यात बाहेर आलेला आनंद पाहून म्हाताऱ्या-कोताऱ्यांना आश्चर्य वाटत होते. आनंदलाही ते नवल वाटले. 

"येऊ देता का बाहेर तुम्हाला ?" जाता-जाता एका झोपडीतून त्याला आवाज आला. 

"होय, तुम्हीच !" पूढे सरकायच्या नादात असलेल्या आनंदला पुन्हा त्या आवाजाने रोखले. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झोपडीतून आवाज येत होता. आधीच वाढत चाललेल्या संशयात ही अजून एक भर...! आनंद त्या आवाजाच्या दिशेने चालत गेला. झोपडीला असणारा वाळ्याचा पडदा त्याने सरकवला. पण आत गेला नाही.

" यायचं तर आत या, इथे घाबरण्यासारखं नाहीये काहीच." आतला आवाज एखाद्या ५०-५५ वर्षाच्या म्हातारीचा होता. तरीही आनंद आत गेला नाही. आत देव्हारा होता. देवध्यानी माणसाचं घर होतं. आतून चंदनाचा एक छानसा सुगंध येत होता. कपाळावर भलं मोठं मळवट असणारी एक बाई बाहेर आली.प्रथमदर्शी कोणालाही धडकी भरेल, असाच तिचा अवतार होता. हिरवं नऊवारी पातळ, जागोजागी ठिगळ असलेलं ! त्वचा वयोमानानुसार कृश झालेली. पण डोळ्यात प्रचंड तेज. पायात जोडवी आणि गळ्यात पोत होती. 

" हाच विचार करताय ना, गावातले लोक तुमच्याकडे नवख्यासारखे का बघतायत ते ?" तिने आनंदच्या मनातलं ओळखलं. 

" प्रवृत्ती आहे ती माणसाची ! पूर्ण माहिती नसताना एखाद्याचे चरित्र, वर्तमान, स्वभाव आणि वागणं ठरवण्याची घाण सवय असते लोकांना. बसा." तिने आनंदला बसायला एक घोंगडी टाकून दिली. 

" कोण तुम्ही !" 

" माणसाचा भूतकाळ फक्त काल नसतो. काळ असतो. परमेश्वराने निर्माण केल्यापासून, त्याच्या प्रत्येक जन्माचं कर्म त्याच्या वर्तमानात त्याच्या मागे उभं असतं. कधी-कधी भविष्यात सुद्धा घात लावून बसलं असतं. "

"काही कळलं नाही मला !" आनंद अजून गोंधळला. त्याला पाणी देऊन ती आत गेली. येताना मुठीत हळद घेऊन आली.

" पंतांना मी आधीच बोलले होते. काहीही लपवू नका..! तरीही त्यांनी संकट दाराशी येईपर्यंत गुपितं दडवली." त्याच्या दोन्ही हाताने तिने तिच्या कडची हळद लावली. हाताला स्पर्श होताच हळद काळी झाली. आनंदला प्रचंड घाम फुटला. "त्या पोरीला तुम्ही सगळं सांगितलं, ते एक बरं केलं. तिने दुसऱ्या हाताने आनंदच्या हाताला स्पर्श करताच त्याच्या हाताला चंदनाचा वास येऊन वेदना नाहीशी झाली. 

" कोण आहात तुम्ही...! तुम्हाला कसं माहिती हे सगळं. पंत आणि आई..?" 

" धीर धरा. इतक्यात डोक्यात एवढे प्रश्न नका येऊ देऊ ! उत्तरं आत्ता मिळणार नाही. आत्ता फक्त एवढं लक्षात असू द्या. येत्या १५ दिवसात तुम्ही गावची वेस ओलांडू नका ! माझं नाव नर्मदा..! घरी पंतांना माझं नाव सांगा...!

अंतरात दडलेले हजारो प्रश्न वर मान काढून उभे होते. घरी जाऊन आधी पंतांना आणि आईला गाठणे भाग होते.तिच्याशी काहीही न बोलता आनंद तिथून निघाला.

" काही होणार नाही तुम्हाला, माणसं ओळखा आनंदराव ! गावाची वेस ओलांडू नका...! मी गावात आहे...!" 

हे आनंदनी ऐकलं की नाही, माहित नाही.पण गावची वेस ओलांडायची नाही, हे तो ठरवून निघाला होता...


सुखी स्वप्नांची चादर ओढून लेखा झोपून गेली. पुढचा विचार तिने बाबांवर टाकला होता. ते कोणताही निर्णय अविचाराने घेणार नाहीत याची तिला खात्री होती. दोघांमध्ये नातेही तसे घट्ट होते. पहिल्या भेटीत झालेलं प्रेम असाही प्रकार नव्हता. खुपश्या भेटी-गाठी झाल्याने आज हे वळण लागले होते. 

लेखाच्या आजूबाजूला अचानक काही विभत्स जिव नाचू लागले. एकाचे डोळ्यांच्या जागी फक्त खाचा होता. एकाचे दात एखादे श्वापद खाऊन आल्यासारखे रक्ताळलेले होते. एकाचे हात खांद्याच्या खाली तुटून लोंबत होते, तर एकाचे पाय नसल्याने ते जमिनीवर फरफटत होते. प्रत्येकाच्या स्वभावात कमालीचा अधाशीपणा होता. ज्या जागी, संपूर्ण जीव असलेली फक्त लेखा होती. जिवाच्या आकांताने ती सैरावैरा धावत होती. कपडे फाटलेले, चेहऱ्यावर त्या श्वापादांनी बोचकल्याच्या खुणांमधून सुरु असलेला रक्तस्त्राव ! पळत असलेल्या रस्त्यावर फक्त काचा, काटे आणि पायाला घायाळ करू शकतील असे मोठे दगड होते. अचानक मागे पाहून पळताना ,ती कोणाला तरी धडकली. समोर पहाताच तिला एक अनोळखी इसम दिसला. " आमच्या जगात यायचा प्रयत्न करू नकोस. जगणे नरकाहून बत्तर होईल तुझं !" तो इसम सांगू लागला. त्याने आपले हात तिच्या गळ्याभवती आवळले आणि तिचा गळा दाबू लागला. तिचा जीव कासावीस होऊ लागला. शेवटचा पर्याय म्हणून तिने अत्यंत क्रूरपणे त्याच्या दोन्ही डोळ्यात बोटं घातली. त्याने झटक्यात तिला सोडले. लेखा त्याच्या तावडीतून सुटून पुन्हा जिवाच्या भितींने पळू लागली. काही अंतरावर तिला काही म्हातारी माणसं दिसली. त्यांचे चेहरे पूर्ण पांढरे पडले होते. त्यांच्यात आणि लेखातलं अंतर खरं आणि भासाइतकं सत्य होतं. 

" वाटतं तितकं हे सोप्प नाहीये..!"

" यातून बाहेर पड लवकर, नाहीतर सगळं संपेल !" 

" आम्ही सगळे तुझेच आहोत, या सगळ्याचा अंत फार विदारक आहे, पोरी..!" 

लेखाला खाडकन जाग आली. ते स्वप्न होतं !" इतकं भयानक ? कोण होते ते लोक, इतके विभत्स, इतके करुण..! " ती पलंगाच्या खाली आली. जाता-जाता तिचे लक्ष, तिच्या खोलीतल्या मोठ्या अरश्याकडे गेलं. त्याला मधोमध एक मोठा तडा गेला होता. लेखाला तो सामान्य तडा वाटला नाहीच. खोलीचं दार उघडून ती बाहेर आली. बाहेर लांब पोर्च मध्ये एकच दिवा सुरु होता. तिने खोलीबाहेर पाऊल टाकलं. आपल्या बाबांच्या खोलीकडे ती जाऊ लागली. तिला तिच्या मागे कोणीतरी उभं असल्याचा भास झाला. पण मागे वळून तिने पाहिलं नाहीच.तेवढे बळ तिच्यात नव्हते. कपाळाच्या कडेतून घामाच्या धारा लागल्या. कोणाचे तरी श्वास तिला स्पष्ट ऐकू येत होता. 

"बाबा...!" तिने जोरात आरोळी मारली. ते कोणाला ऐकू गेलेच नाही. तिच्या आजूबाजूला एक पोकळी तयार झाली होती. ज्यात ती आणि तिच्याआजूबाजूला होणारे प्रसंग घडत होते. तो श्वास तिला सोडत नव्हता. कदाचित कुठेतरी तो तिला नेण्याचा प्रयत्न करत होता. घराच्या मुख्य दारातून ती बाहेर आली. सगळी दारं आपोआप उघडत होती. श्वास लागल्याने ती कोसळली. हळू-हळू डोळे बंद होत होते, तेव्हा तिने दोन्ही पायात चांदीच्या जाडसर बेड्या असणारे पाय तिच्याकडे येताना पहिले. 


" नाही, तसला काहीच त्रास नाहीये तिला !"

सकाळी काशी ने सगळा प्रकार पहिला. डॉक्टर घरी आले. लेखा अजूनही बेशुद्ध होती.

" चक्कर वगैरे तिला कधीच नाही आली, आणि ती एवढ्या रात्री काय करणार होती बाहेर ?" बाबांनी स्पष्ट केलं. सकाळी तिला आत उचलून आणणारी काशी एका कोपऱ्यात उभी होती. लेखाला सकाळी तिने पाहिलं होतं. 

" साहेब, हे लक्षण आजारपणाचं नाहीये !"

डॉक्टर आणि बाबांनी तिच्याकडे पाहिलं. 

" ताई जश्या पडल्या होत्या, हे लक्षण आजारी माणसाचं नाहीये !"

"मग..? काशाचं आहे ?" डॉक्टरांनी विचारलं. 

" वेगळं आहे काहीतरी..!" काशी जवळ आली. लेखाच्या मानेवर असलेला गाऊनचा कोपरा तिने बाजूला केला. तिच्या मानेवर एक लालसर वळ उमटला होता. "हे सकाळीच पाहिलं मी !" 

"हे पाळताना देखील लागू शकतात काशी."

" पाळताना , ज्या बाजूने माणसाला एखादी वस्तू लागते, त्याच ठिकाणी खूण उमटते न साहेब...? नीट बघा.." ती खूण पाहून बाबा आणि डॉक्टर, दोन्ही चपापले. 

" काल बंगल्यात कोणीतरी शिरलंय, एखादा चोर, भामटा ? चांदेकर साहेब, मला वाटतंय तुम्ही एकदा पोलिसांना बोलवावं."

आपली बघ घेऊन, डॉक्टरांनी काही औषधं बाबांच्या हातात दिली. "मी उद्या सकाळी येऊन जाईन, काळजी घ्या." 

आपलं काम करून डॉक्टर निघून गेले. बाबा आणि काशी पूर्ण घरात फिरले. साधी सुई सुद्धा जागची हलली नव्हती. दोघ पुन्हा खोलीत आले. लेखाचा चेहरा थोडासा काळवंडलेला त्यांनी पहिला. त्यांनी तिच्या हाताला हात लावला. अत्यंत थंड होता तिचा हात. खिडकीतून वाहणाऱ्या वाऱ्याने आनंदचं पत्र खोलीभर उडवायला सुरवात केली. बाबांना उगाच शंका आली.

.....

" काका, तुम्ही असं गप्प बसलात, तर मला काहीच नाही करता येणार." आठवडाभर दवाखान्यात उपचार घेतल्यावर , तिसऱ्या चोराची रवानगी शेखरच्या पोलीस ठाण्यावर झाली. 

" काय बोलावं साहेब ? समोर सगळा अंधार आहे." अशीच मोघम उत्तर त्याच्याकडून येत होती. 

"घरी कोण-कोण असतं तुमच्या ?" विषय बदलावा म्हणून शेखरनी विचारलं. 

" पोरगी आहे, वाट बघत असंल घरी माझी..!" त्याच्या जखमी डोळ्यातून पाणी यायला लागलं. " सरकारचा सारा भरू-भरू शेती करायची इच्छाच मेली आमची. खायची ददात झाली, गावाकडे मी आणि पोरगी एकटेच ! तुमची माणसं यायची.पोरीला एकटं ठेवणं अवघड झालं." शेखर सगळं ऐकत होता. दिगंबर तिघांचं जेवणाचं घेऊन आला.

" चोऱ्या करायचं ठरवलं नव्हतं. पण इथे काही काम मिळेना. ते दोघ पण माझ्यासारखेच..!"

"त्या दिवशी रात्री काय...?" शेखरनी मुद्द्याला हात घातला. 

"खूप दिवसांपासून आमची त्यावर नजर होती. बाळा, माझा एक जोडीदार एकदा येऊन बघून गेला होता. आतल्या महागड्या वस्तू, सोनं-चांदी, पितळ, जे सापडेल ते घ्यायचं आणि गावाकडं निघायचं. चोरीच्या रात्री आम्ही तिघं त्या बागेत जमलो. मला लांबून तो बंगला काही बरा नाही वाटला ! मी बोललो, नकोय जायला आत ! बाळा आणि शिवाने मला वेड्यात काढलं. पाळत ठेवायचं निमित्त करून मी बाहेर थांबलो. मिळाला, तर थोडासा कमी वाटा घेण्याच्या बोलीवर."

सगळं पोलीस ठाणं एव्हाना पिंजऱ्याच्या आजूबाजूला गोळा झालं. प्रत्येकाच्याच माथ्यावर आठ्या होत्या. 

" बराच वेळ आतून काहीच आवाज आला नाही. मोठी हिमंत करून मी डाव्या अंगाच्या खिडकीपाशी गेलो. चढून आत गेलो. आत शांत होतं सगळं. महाल होता जणू, एखाद्या राजाचा. मोठ्या खुर्च्या, तांब्या-पितल्याच्या फुल दाण्या, नकक्षीदार कालीन...! बाळा आणि शिवा कुठे घावले नाही. मला भीती वाटू लागली. एक एक पाऊल टाकत मी अंधारात पूढे सरकू लागलो. एकदम मला शिवाचा किंचाळल्याचा आवाज आला. मला घाम फुटला. आवाज आला तिकडे माझी कुऱ्हाड सरसावून निघालो. पायाला एकदम काहीतरी लागलं. मी खाली पाहिलं...!" एकदम तो शांत झाला.

" काय होतं... खाली?" बाजी ने विचारलं. 

" शिवा... मरून पडला होता." प्रत्येकाच्या अंगावर सरसरून काटा आला. " मान वर आणि शरीर खाली...!" बाजीच्या हातून पेला सुटला, तसा आवाजानेच सगळे घाबरले..! 

"गेलाच होता, त्याला काय विचारायचं?" 

"मग...पूढे..!" आता शेखरही घाबरू लागला होता. "त्याला असं कसं सोडायचं, म्हणून मी ओढून बाहेर आणलं. बाळाला आवाज द्यायचे धाडस माझ्यात नव्हतेच. बाजूच्या लाकडी खोलीतून काहीतरी सरकण्याचा आवाज आला. शिवाच्या प्रेतापाशी मी दबा धरून बसलो. जवळ काडीपीटी होती. सरकण्याचा आवाज जवळ आला, तसा एक काडी मोठ्या हिमतीने ओढली...! बाळ्या सरकत सरकत येत होता. ते पाहून माझी उरली-सुरली हिमंतही गेली. मी उठून त्याच्या जवळ गेलो. ' बाबा, मला वाचीव रे..! मला नाही मरायचं..!' बाळा ओरडू लागला, त्याला वाचवायचा म्हणून त्याच्या जवळ गेलो. त्याचे दोन्ही पाय, हात मोडलेले होते. तसा त्याला खांद्यावर टाकला, खिडकीबाहेर नेऊन ठेवला. ' शिवाला मरू दे, आत चांगलं नाहीये, जीव घेईल ते..! ' बाळा ओरडू लागला. पण मी पुन्हा आत गेलो. शिवा मेल्याचं बाळाला सांगितलं नाही. प्रेत असं वाऱ्यावर सोडणं बरं नाही वाटलं. ते उचललं आणि खिडकी बाहेर टाकलं. तेवढ्यात मला कोणीतरी आत ओढलं. माझ्या गल्याभवती फास पडला. मला मृत्यू जवळ भासू लागला. पोरीच्या आठवणीत काळवळलो. एकदम कानापाशी कोणीतरी ओरडलं 'पोरीची काळजी घे..!' माझं एक डोळा मात्र घेऊन गेलं..!"

सगळे थंडगार उभे होते. कोणी काहीही बोललं नाही. 

" आवाज माणसाचा होता की बाईचा ?" दिगंबरनी विचारलं. "साहेब, जीवावरचं एका डोळ्यावर भागलं, इतकंच सांगतो...! जास्त तपास काढायचा भानगडीत नका पडु. तुम्ही साहेब लोकं, पण चार पावसाळे मी पहिले आहेत...!" एवढं बोलून बाबानी पहिला घास चाचपडत पोटात ढकलला. 

चार पावसाळे कसे पाहिले, याचा अंदाज शेखरला आला. हा पावसाळा मात्र म्हातारा कधीच विसरणार नव्हता. बाहेर विजा कडकडत होत्या. सगळे एकत्र जेवले. झोपलं मात्र कुणीच नाही...!


पहाटे एकदम नर्मदेच्या झोप खाडकन उडाली. कसलंस दुर्दैवी स्वप्न आडवं आलं. बाहेर अंधार होता. मध्यरात्रीनंतर पावसाची रिपरिप पुन्हा सुरु झाली होती. ती तशीच उठली. खुंटीवर टांगलेला कंदील लावला आणि बाहेर पडली. बाहेर प्रचंड अंधार होता. दाराची कडी लावली आणि आपली चप्पल हातात घेऊन निघाली, थेट वाड्यावर आली. 

"उठवता का पंतांना?" देवडीवरच्या सदाला तिने जागं केलं. 

"आत्ता ? काय झालं माय ?" सदाही तिला पाहून चपापला. " तुला नाही सांगता येणार !" नर्मदेला कोणी नाही म्हणत नव्हतं. ती तशीच देवडीवर उभी राहिली. पंत पेटला कंदील घेऊन बाहेर आले. 

" काय गं ? एवढ्या अंधारात !"

" पंत, आनंदराव कुठे आहेत?" 

"झोपला आहे. काय झालं काय ?" देवडीवर उजेड पाहून सुमनही बाहेर आली. 

" त्यांना बोलावतील, पण त्यांना वेस सोडून जाऊ देऊ नका."

" नर्मदे , अगं झालंय तरी काय ? सांगशील का ? कोण बोलवतयं ?" 

"पंत, त्या पोरीला त्रास व्हायला लागलाय...!" पंत एकदम चपापले. 

"म्हणजे...!" त्यांना लेखाचा अंदाज आला. 

" हो, तीच ! पंत, आपल्याला जपायला पाहिजे. थोडा उजेड झाल्यावर मी येईल." 

पंत आणि सुमनला अस्वस्थ करून नर्मदा निघून गेली. अजूनही आभाळात, एका कोपऱ्यात विजा होत होत्या. 

"कसं असतं बघ सुमन ! आपल्या डोळ्यासमोर काहीतरी घडतंय, घडणार ए, आणि आपण हतबल होण्याखेरीज काहीच नाही करू शकत." पंत आत येऊन पायरीवरच बसले. "यालाच नशीब म्हणतात..." सुमनचेही अवसान गळायला लागले होते. " ज्या गोष्टी डोळ्याला दिसत नाही, आपण त्यावर विश्वास ठेवत नाही. ज्या गोष्टी डोळ्यासमोर घडतात, त्या गोष्टी सुद्धा आपण निव्वळ विश्वास नाही म्हणून टाळतो, किंवा पर्यायी , सोयीस्कर कारणं शोधतो. पण जे सत्य आहे, ते दर्पासारखं गावभर पसरतं !" 

" उद्या आनंद ने विचारल्यावर त्याला काय सांगायचं ?" सुमन च्या डोक्यात वेगळी चक्र फिरू लागली.

" उद्या नाही, आजच ! पहाट झालीये सुमन, उजाडेल थोड्या वेळात...! "दोघ आत गेले ,कडी लागक्याचा उदास आवाज पहाट अधिक भयावह करून गेला. 

....

काशीने चहा चा कप हातात घेतला. लेखाच्या खोलीकडे येता-येता तिच्या कानावर एक वेगळाच आवाज पडला. कोणीतरी अतिशय उद्विग्नतेने काहितरी खरडत होते. तिने चालता-चालता तिच्या मालकांना आवाज दिला. दोघही दबक्या पावलांनी आवाजाच्या दिशेने निघाले. लेखाच्या खोलीच्या खिडकीतून त्यांनी तिच्याकडे पाहिले. मेजावर कागद ठेऊन ती त्यावर काहितरी खरडत होती. याआधी त्यांनी लेखाला कधीही असं पाहिलं नव्हतं. खोलीचे दार, खिडक्या सगळंच बंद होतं. चहाचा कप बाबांच्या हाती देऊन ती आत यायला निघाली. तिने धाडकन दार उघडलं. लेखाचं अजूनही तिच्याकडे लक्ष गेलं नाहीच. ती आपल्या कामात व्यस्त होती. काशीने खिडकीचे पडदे बाजूला केले, तशी ती बसल्याजगीच बेशुद्ध झाली. काशीने मेजावर ठेवलेला कागद पाहिला. आनंदचा एक फोटो लेखाने कात्रीने पार खरडून काढला होता. बाबाही एव्हाना मध्ये आले होते. 

" मी बोलले होते न, हा प्रकार डाक्टर ने बरा होणारा नाहीये !" चांदेकर काहीही बोलले नाही. त्यांनी आनंदचा फोटो हातात घेतला. क्षणभर विचार करत ते तिच्या कपाटाकडे गेले. काही कागडपत्रांमध्ये त्यांना आनंदचे पत्र सापडले. त्यावरचं लिखाण पुसट झालं होतं. काही वाचता येतं आहे का, हे पाहण्यासाठी त्यांनी ते पत्र उन्हात धरलं. काशीही त्यांच्या जवळ आली. पत्राला ऊन लागताच त्यावर जुने हात उमटले. 

चांदेकर कपाळाला हात लावून खाली बसले. 

" काशी, माझं डोकं चालेनासं झालाय...!" चांदेकर अत्यंत हतबल दिसत होते. " या पोरीचा काय दोष या सगळ्यात?"

" साहेब, या जन्मी नाशीबात आलेलं, बऱ्याचदा मागच्या जन्मीचं कर्म पण असतं !" काशीलाही भरून आलं. " कधी-कधी माणसाच्या हातून घडलेलं पाप त्याच्या पूर्ण घरादाराला भोगावं लागत. माझं ऐका...!" काशीने त्यांच्या कानात काहीतरी संगीतलं, ज्याने त्यांना थोडासा दिलासा मिळाला. त्यांनी ते पत्र हातात घेतलं आणि दोघ खोलीच्या बाहेर पडले. 

......

ग्रहांचा खेळ मोठा अजब होत चालला होता. कोणाला काहीही संदर्भ लागत नव्हता. शिवपुरीला अचानक बदली होऊन आलेला शेखर, त्याचवेळी शिक्षण संपवून गावात आलेला आनंद आणि लेखा ! कीर्तिकर आणि नर्मदाला माहित असलेले , पण ज्याबद्दल ते काहीही करू शकत नव्हते, असे सत्य ! पंत, सुमन आणि चांदेकर यांच्याभवती वाढत चाललेलं कोडं, आणि त्यांच्या पोरांभवती वाढत चाललेला एक अज्ञात विळखा ! दिगंबर, विठोबा, रुक्मि हे साक्ष होत होते एका अश्या नियतीला, जी कोणी लिहिली हे माहिती देखील नव्हतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भय थैमान घालत होते. त्या भुरट्या चोराचा काय दोष ? अश्यात ,आतल्याआत गुपितं दडवून निवांत बसला होता, ते बंगला..." माया" 

प्रतिशोध एखाद्या वणव्यासारखा असतो. जितका तो दीर्घ होतो, तितकी त्याची व्याप्ती वाढत जाते. कालानुरूप, त्याच्या विळख्यात येणाऱ्यांची गणती ही जळत जाते. दोष असो नसो, एखाद्या मोठ्या वृक्षाच्या छायेत येणारी पाखरे निष्कारण भसमसात व्हावी, तसंच असतं. अकाल, अनैसर्गिक, अनैच्छीक मृत्यू आत्म्याला उर्वरित कार्य सिद्धीस नेण्यासाठी या भूतलावर अडकवून ठेवतो. मनुष्ययोनी, प्रेतयोनी यामध्ये येणारी पिशाच्च योनी , आणि त्यात येणारा प्रतिशोध, हा दांडीताला पुनर्जन्मात येण्यास भाग पाडतो. 

जुळून आलेले अनिष्ट योग आहेत हे ! यांचे प्रारब्ध, यांच्या ग्रहांच्या दशा आणि दिशा, थोडक्यात यांच्या कुंडल्यांमध्ये असलेलं दोष, हे यांनी कधीकाळी केलेल्या पापांची एक काळी सावली आहे. ती आज जरी, धूसर आणि निष्कारण दिसत असली, तरी ती पुढे येणाऱ्या काळात नियती त्यांना सगळं काही आठवण्यास भाग पाडेल...!


१८५७ च्या उठवानंतर चा उजागर झालेला हिंदुस्थान खूप वेगळा होता. आज पर्यंत झालेल्या कोणत्याच परकीय आक्रमणात इतकी एकता दिसली नव्हती. मेरठला पेटलेली ही क्रांतीज्योती अख्या देशभर वणवा होऊन प्रत्येक देशवासियास जागृत करून गेली. घरा-घरात क्रांतिकारी जन्म घेऊ लागले.इंग्रजसरकारनी जबरदस्तीने वंतनं खालसा केली. वतनदार आणि जनतेमध्ये फूट पडण्याचा हा कुटील डाव त्यांच्या अधिकारी लोकांनी आपल्या स्तरावर अत्यंत घृणास्पद खेळला होता. बांदलांकडील शस्त्रसाठा, घोडे, तीन हत्ती, बरीचशी मौल्यवान चीजवस्तू ते उचलून घेऊन गेले. ८ वर्षाच्या मायेला, आपल्या मेघ नावाचा हत्ती ही मुकावा लागला होता. याची सल रावांच्या मनात खूप खोलवर होती. 

आज पहाटे अंधारातच ते वरच्या गच्चीत आले. बंगल्याच्या मागच्या बाजूला असलेल्या टेकडीवर सारखे त्यांचे लक्ष जात होते. त्यांचा अत्यंत जवळचा ,त्यांचा रक्षक खंडेराव ही त्यांच्या सोबत वर होताच. 

" राव, काही बातमी आहे का ?" 

"हो, काल संध्याकाळी पवारांची सून आली होती. सर्जा येईल म्हणून बोलली."

" काय सांगता..!" खंडेराव एकदम चमकले. 

" चार वर्ष झाली, खंडेराव ! पोरगं कुठं गेलंय, काही पत्ता नाही! आला तर चांगलंच आहे." अचानक रावसाहेबांसमोर तो दिवस जसाच्या तसा उभा राहिला. 

शिवपुरीत नव्याने पोलीस-चौकी झाली होती. उठावानंतर सरकारने देशभरात हजारो नवीन चौक्या लावल्या होत्या. त्यातली ही एक ! बांदलांची एकहाती सत्ता असलेल्या शिवपुरीत विल्सन साहेबांचं कोणी ऐकत नव्हतं.याचा बदला त्यांनी गावकाऱ्यांकडून घेतला होता. 

" सर्जा, बा कुटं हाय तुजा?" विल्सनने गावात पाळलेलं हे दोन पायाचं गांडूळ, सूर्याजी सकाळीच शेतावर येऊन उभा राहिला. 

" रानात ए, पाणी द्यायला गेलंय..!" पिळदार मिश्या, राकट, कोणालाही पाहून पहिल्यांदाच किळस निर्माण होईल, असा घाणेरडा चेहरा, तितकीच घाण प्रवृत्ती असलेला सूर्याजी घोड्याखाली उतरला. गोठयात बांधलेली बैलांची जोडी दिसली त्याला ! " हरामयांनो, बैलं घ्यायला पैसा असतोय, सरकारचा सारा द्यायला जीवावर येतीय व्हय रं !" त्याचा एक-एक पाय गोठ्याकडे सरकू लागला. तेवढ्यात एक गूळगुळीत गोटा सनसन करत त्याच्या फेटा टाळून कपाळावर बसला. क्षणभर सुर्याजीला कळलं नाहीच काय झालं. पण रक्ताची लागलेली धार पाहून तो घाबरला. गोठ्याकडे वाळलेले पाय त्याच्याकडे धारदार नजर रोखून उभ्या असलेल्या सर्जाकडे गेली.

"तुज्यायला...!" कंबरेचा पट्टा उपसत सूर्याजी सर्जाकडे चाल करून गेला. " थांब तितंच भाड्या..! पोराकडे एकजरी पाऊल टाकलं, तर हा तिर माणेतून आरपार करीन." सर्जचा बाप भीमा धावत आल्याने पुढचा अनर्थ आटोक्यात आला. पण तोवर सर्ज्याच्या पाठीवर चामडी पट्याचा एक वार बसला. १४-१५ वर्षाचं कोवळं पोर ते ! जागेवर जमिनीवर कोसळलं. भिमाचा तिर पंचक्रोशीत प्रसिद्ध होता. कोल्हे, लांडगे, रानडुकरं अचूक टिपत असे. दिवसा शेती आणि रात्री रावसाहेबांकडे दोघ बाप-बेटे राखण करायला जात होती. 

" सुर्या, आल्या पाऊली माघारी जा, नाहीतर तुझं मढं बांबूला टांगून सायबकडे धाडलं म्हणून समज..!" भीमाने तार ओढला. " लैच जोर हाय की, रावसाहेबांच्या कुत्र्यांना.!" सुर्याजीलाही चेव चढला. "वाघ हाईत वाघ, तुज्या सारखी स्वतःची इभ्रत नाही बांधली सायबाच्या दावणीला! " भीमाचा आवाज वाढत होता. सुर्याजीने गुमान घोडा हाती धरला. 

" किती दिवस रग धरशील, अरे, ते सायब ए सायब ! तुझ्या सकट रावसाहेबांना नाही जमीन चाटायला लावली...!" तारेत फसलेला तिर सनकन सुटला. सुर्याजीच्या डोळ्यासमोरून गेला. त्याने घोड्याला टाच मारली आणि क्षणात दिसेनासा झाला. 

"माया बेटा, सर्जाला हळद लावा पाठीला..!" भीमा लगेच पोराला रावसाहेबांकडे घेऊन आला. " धनी, कशाला, झाड-पाला लावून होतंय की बरं !"

" भीमा, तू घरचा माणूस आहेस, सर्जा आम्हाला पोरासारखा आहे. बहाद्दूर आहे !" रावसाहेबांच्या लेखी माणूस हा फक्त माणूस होता. जात,कुल,त्याचे काम , पैसा याची काहीच गणती नव्हती. आणि त्यामुळे अख्खा गाव त्यांना देव मानीत. बंगल्यासमोरून जाताना हात जोडीत. 

" फारच बहाद्दूर म्हणायचं की..!" सर्जाच्या पाठीवर हळद लावत माया त्याला छेडू लागली." एखादा पट्टा जोरात लागला असता तर..?" 

" असा कसा लागेल, त्या भाड्याचा डोलाच काढला असता बा न.! " 

" काय बाई भाषा...!" माया ला त्याचा रांगडा स्वभाव आवडायचा. 

" भीमा, आमच्या मनात एक विचार येतोय..!"

" धनी, तुमचा विचार आमच्यासाठी हुकूम आहे.!"

" भीमा...!" रावसाहेब एकदम जागेवरून उठले. "सर्जाला आजपासून बंगल्यावर असू दे."

" धनी...!" भीमाला एकदम गहिवरून आले. 

" त्याला हत्यार चालवणे, अभ्यास, बंदूक, घोडा चालवणे, हे सगळं आम्ही शिकवतो. पुढचा काळ काय घेऊन येणार आहे, कोणास माहित. त्याने स्वतःसाठी आणि आपल्यासाठी तयार असलेलं बरं ! कदाचित आम्हाला शिवपुरी सोडण्याची वेळ आली. तर मायासोबत कोणीतरी विश्वासू...!" भीमा एकदम धन्याच्या पायावर पडला. "धनी, आमचा अख्खा जलम तुमच्यासाठी आहे, वाटेल ते करा...!" 

सकाळी उठून सर्जा जाण्यास सज्ज झाला. " बाळा, बा इथंच हाये ! पण धनी आपलं देवमाणूस ! अंगात रंगात हाय, तो पावोत त्याची जीव देऊन रक्षा करायचा आपला धर्म नाही सोडायचा...! " पोरानं नशिब काढलं, बापानं त्याला छातीशी धरलं. रोज सकाळी उठून सूर्य नमस्कार, नंतर शस्त्रविद्या, माया कडून अक्षर ओळख, असा अभ्यासाचा नित्यक्रम सुरु झाला. सर्जाही शिकण्यात तरबेज होता. दिवसातून दोनदा घोड्यावरून बापाला भेटायला यायचा. अश्याच एका दुपारी त्याला लांबूनच त्याच्या शेतावर धूर दिसला. तो टाचेवर शेताकडे पळत सुटला. त्याचा वेग पाहून रावसाहेबही त्याच्या मागे घोड्यावर धावत सुटले. पण सर्जाचा आजचा वेग घोड्यालाही आवरत नव्हता. 

शेतावर आल्या-आल्या त्याला भयानक चित्र दिसलं. अख्खं शेत जळून राख होत होतं. आगीचे मोठे लोण पसरत, सापडेल त्याला कवेत घेत होते. ज्या मातीत त्याला बापाने चालायला-पळायला शिकवलं, ती माती राखेने पार काळी झाली होती. मागून रावसाहेब आणि खंडेरावही आले. 

सगळंच रान आगीत धगधगत होतं. गोठ्यात जनावरंही नव्हती. "बाबा" सर्जा एकदम सगळं बळ एकवटून ओरडला आणि सैरावैरा धावत सुटला. त्याचा बाबा त्याला कुठंही सापडत नव्हता. त्या तापलेल्या जमिनीने त्यच्या पायाची सालं निघायला लागली. त्याची तडफड पाहून कोणाला काहीच सुचत नव्हतं. 

"बाबा" , रानातल्या मैदानात अर्धमेल्या अवस्थेत भीमा आपल्या पोराच्या किंचाळ्या ऐकत पडला होता. कदाचित नजर भरून पोराला बघण्यासाठीच थोडा वेळ त्याने मृत्यूकडून मागून घेतला असावा. अंगभर तलवारी आणि कोयत्याचे वार होते. आजूबाजूची जमीनसुद्धा सांडलेल्या रक्ताने लालबुंद झाली होती. सगळेच त्याच्यापाशी पळत गेले. सर्जाने बापाला कवटाळले.

"बाबा, काय झालं,"

" सर्जा, लेकरा...!" रक्ताने माखलेले हात आपल्या पोराच्या चेहऱ्यावर फिरवता-फिरवता भिमाचे प्राण डोळ्यातूनच बाहेर पडले. 

"बाबा...!" सर्ज्याच्या त्या हंबड्याने अख्ख्या रानातलं रोम-रोम हादरले. रावसाहेबांना त्याला जवळ घेण्याचा प्रयत्न केला. पण तो बापाचं प्रेत सोडायला तयारच नव्हता. तिथे असलेल्या दगडालाही पाझर फुटेल असा तो प्रसंग होता. सूर्य अस्ताला आला होता. रानातंच भीमाच्या उरल्या शरीराला अग्नी देण्यात आला. त्या चितेच्या सावलीत रावसाहेब सर्जाला हात धरून आपल्या सोबत नेऊ लागले, ते पाहून कदाचित भीमाच्या आत्म्याला शांती मिळणार होती. 

"धनी, अस्तनातलाच साप आहे..!" खंडेराव दुसऱ्यादिवशी सकाळी एका हातात सुर्याजीच्या अर्धवट जळलेला पट्टा घेऊन आला. तिथेच कोपऱ्यात बसलेल्या सर्जाला जगण्याचे एक ध्येय मिळाले. कोवळ्या वयात एकुलतेएक छत्र हरपलेल्या सर्जाला माया हा एकमेव आधार उरला होता. उरले-सुरले आयुष्य धन्यासाठी द्यायचे, या निश्चयाने सर्जा दुपटीने सराव करू लागला. कधी-कधी रावसाहेबांना सुद्धा त्याची तलवारबाजी पाहून धडकी भरायची. बापाने दिलेल्या तिर-कामटा तर त्याच्या सवयीचा झाला होता. त्याच्यासोबत माया सुद्धा तयार होत होती. वाढत्या वयासोबत बदलत जाणारे ऋतू नात्याची नवी पालवी घेऊन येत होत्या खऱ्या ! पण जुन्या जखमां तश्याच ताज्या रहात होत्या. 

दिवसांमागून दिवस जात होते. विल्सन नावाच्या नराधमाचा वरदहस्त डोक्याखाली घेऊन तो शांत झोपी जात असे. विल्सन आहे तोपर्यंत आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाहीये, असा भास त्याला असला, तरी दारापाशी दोन पहारेकरी जागे ठेवूनच तो झोपायचा. त्या रात्री सुद्धा तो निवांत झोपला होता. विल्सन नी त्याला एक विदेशी मद्याची बारकी बाटली दिली होती. तिचा परिणाम जरा बरा होता. डोक्या व्यतिरिक्त इतर सगळे अवयव शुद्धीत असायचे. 

बाहेरच्या वाड्याच्या भिंतीवर काळ घात लावून बसला होता. अंधार झाला होता, पण थोडा अजून गडद व्हावा म्हणून त्याने सर्वांगाला राख फासली होती. उगाच गोंधळ नको, म्हणून शेजारच्या पवारांची कुत्री आणि कोंबड्या आज संध्याकाळीच रानाकडे रवाना झाल्या होत्या. सुमारे दीड तास तो निपचित , अल्प श्वासावर दबा धरून बसला होता. सुर्याजीच्या घरात झोपाझोप झाली. त्याची बायको आणि पोरगं वरच्या मजल्यावर जाऊन केव्हाच दिवे घालवून बसले होते.

तो अतिशय शांत डोक्याने खाली उतरला. कमरेला विषारी कट्यार, पाठीवर बापाच्या भात्यातले काही विषारी तिर त्याने आधीच चढवले होते. घसरताना आवाज नव्हता होऊ द्यायचा, पडताना हत्यारं नव्हती मोडू द्यायची. गडद झाडीत वाडा निवांत लपलेला होता. आवाज नको, म्हणून वहाणा सुद्धा नव्हत्या. त्याने भिंतीचा अंदाज घेऊन, स्वतःला अंगणात सोडले. सुमारे ५० फूट चालत जायचे आणि दारावरच्या दोघांना मारायचे एक आव्हान त्याने सोप्पे केले. हाताला आलेली झाडाची फांदी त्याने हलवली.

"कोण ए रे !" एकाला संशय आला. 

" कोण येतंय मरायला इथे ? " दुसऱ्याने फेटाळून लावला. हे नव्हतं व्हायला. त्याने पून्हा फांदी, पाहिले पेक्षा अधिक जोरात हलवली. या वेळी, ही हालचाल माणसाने केलीये असे भासले पाहिजे, याचे भान ठेवून ! संशयाचा अंदाज खरा करत, एक पहारेकरी त्याच्याकडे येऊ लागला. हाताच्या अंदाजाला आल्यावर त्याने त्याचा चेहरा हातात घेतला आणि खरकन आत झाडीत ओढला. काही कळायच्या आत, त्याच्या मानेवर धारदार विषारी सुरा फिरला ! त्याचा शेवटचा श्वास बाहेर निघाला, आणि तो जमिनीवर कोसळला. ठरलेल्या वेळेत पहिला न आल्याने, दुसरा ही त्याच मार्गाने निघाला आणि यमसदनी पोहोचला.

पुढचा मार्ग सोप्पा होता. पण त्याला स्वतःला लापावणं भाग होतं. सुर्याजीच्या दाराला लाथ मारून उघडल्यावर तो अंधारात गडप झाला. आधीच नशेत असलेला सूर्याजी जरा बावरून उठला. त्याची बायको आणि मुलगाही आवाजाने सचेत झाले, पण खाली नाही आले. सूर्याजी टप्यात आल्यावर त्याने त्याच्याकडिल भात्यातल्या एक बाण काढून त्याच्या मानेत खोचला. 

" कोण ए, भाड्या, समोर ये !" सूर्याजी चेकाळला. 

" बघ, बघ नीट..!" अंधारातही त्याला सर्जाचा चेहरा स्पष्ट दिसला. आता आपली घटका भरली हे सुर्याजीला कळून चुकले. क्षमा मागण्यात काहीच अर्थ नव्हता. खालचा आवाज ऐकून सुर्याजीचा मुलगा खाली आला. त्याला अंधारात काहीच दिसलं नाही. " सरड्याची जात ए तुझी ! एकवेळ सापाला जितं सोडावं, पण तुझ्यासारख्याला नाहीच नाही..!" आणि आधीच गड्याच्या रक्ताने लाल झालेला सुरा मालकाच्या मानेवर थंड डोक्याने फिरला...! 

......

सकाळी सकाळी घोड्यावर बसून विल्यम आणि त्याचे शिपाई बंगल्यावर येताना पाहून रावसाहेबांना संशय आलाच. सकाळपासून कुठेच दिसला नव्हता. 

" कुठंय तो?" इंग्रजाळलेल्या मराठीत विल्यमने सरळ रावसाहेबांना प्रश्न केला. 

" कोण?"

" तोच, काल रात्री सुर्याजीला मारून पळालेला!!"

" तुंम्हीच सांगताय साहेब, पळाला म्हणून..!" 

" रावसाहेब, त्याला जितकं लपवाल, तितका तडफडून मरेल तो..!"

" ते नंतर बघू, आधी इथून चालत व्हायचं." रावसाहेबांनी त्याला घरात सुद्धा घेतला नाही. 

विल्यम तिथून गेला खरा, पण त्याने अख्ख्या शिवपुरी बेचिराख केली. सर्जाचा काका, त्याचे भाऊबंद त्याने क्रांतिकारी ठरवून भर वस्तीत फासावर दिले. त्याच्या वस्तीला आग लावून सगळेच लोक त्याने गावातून हाकलून लावले. 

एक दिवस रात्री रावसाहेबांची भिंत लांघून सर्जा वर आला. 

" कुठे जाशील, काय खाशील..!"

" इथे राहिलो, तर तो सायब सगळ्यांना असाच त्रास देत राहील."

"देऊ देत, करू आम्ही त्रास सहन, पण तू गेलास, तर आबांचं काय होईल, माझं काय होईल...!" 

" मी येईल, पण केव्हा, ते नाही सांगत ! ते माझ्या नशीबालाच माहिती आहे...!" तिच्या हातावर हात ठेवून त्याने मोठ्या धैर्याने तिला विचारलं-" एक काम कराल का माझं...?" 

"काय?" तिच्या डोळ्यांत हजारो प्रश्न दाटून आले. 

" आबांना सांगून उद्या माझ्या प्रेताला गावसमोर अग्निडाग द्या...!" 

" काय..?" तिला एकदम धक्का बसला. 

त्याने तिला वाकून भिंती खाली दाखवले. त्याचे नेहमीचे कपडे घातलेले एक प्रेत तिला दिसले. बाजूला काही बाण पडले होते. चेहरा मात्र दगडाने पूर्ण ठेचलेला होता. काही कळायच्या आत, भावनांनी त्याची वाट अडवायच्या आत त्याने भिंतीवरून उडी मारली आणि मागच्या टेकडीवर तो चालून गेला. माया झाडीतली हालचाल बंद होईपर्यँत बघत राहिली. लहानपाणीपासून एक क्षणही त्याच्या शिवाय न घालवू शकणाऱ्या मायेच्या नशिबाला , त्याचा अनिश्चित विरह आला...!


अगदी काल घडल्यासारखं रावसाहेबांना सगळं आठवलं. गेल्या चार वर्षांत त्यांनी मायाला खुलून हसलेलं पाहिलं नव्हतं. तिच्या मनाची तगमग ते जाणून होते. आपल्या मागे तोच होता, जो तिचा सांभाळ करू शकत होता. त्याच्या अश्या जाण्याने ते पूर्णतः हतबल झाले होते. पण काल आलेला निरोप त्यांच्यासाठी आशेचा एक किरण घेऊन आला होता. 

"खंडेराव, मनात एखाद्या गोष्टीचा सारखा विचार आला, की ती होतेच!"

"खरंय धनी..!"

"देवाची , एखाद्याच्या दृढ इच्छाशक्तीची पण..!"

बराच वेळ झाला. ऊन अंगावर येऊ लागलं. दोघांची काळजी वाढू लागली. " धनी, निरोप खात्रीचा होता न..!"

खंडेरावला संशय आला. रावसाहेब काहीही बोलले नाही. काही वेळानंतर टेकडीवरच्या झुडुपात हालचाली झाल्या. दोघांच्या भुवया उंचावल्या. खंडेराव खाली गेले आणि दुर्बीण घेऊन आले. रावसाहेबांनी त्यातून पाहिले, तसे त्यांचे डोळे चमकले. 

" तोच ए, तोच आहे खंडेराव...!" त्यांनी दुर्बीण खंडेरावांकडे दिली. 

" हो, तोच ए धनी..!" पण काही क्षणात त्यांचा चेहरा पार पडला. रावसाहेबांना संशय आला. त्यांनी दुर्बीण त्याच्याकडून हिसकावली. त्यांचा घसाच कोरडा पडला. घोड्यावरून येणाऱ्या सर्जाचा अंगरखा पूर्ण रक्ताने माखला होता. तो घोड्यावर निपचित बसला होता. पाठीत रुतलेली बाणाची टोकं छातीतून बाहेर आलेली होती. तो अत्यंत करुणतेने बंगल्याकडे बघत होता. कदाचित तिथे पोहोचण्याची त्याची स्वप्ने, त्या बाणांनी छेडली होती. रावसाहेब आणि खंडेराव घाईघाईने खाली उतरले. दिसेल त्या घोड्यावर मांड टाकून ते टेकडीच्या दिशेने निघाले. मायेने त्यांना बाहेर जाताना पाहिले, तिच्या प्रश्नांना कोणी काहीच उत्तरं दिली नाहीत. 

टेकडी येईपर्यँत विल्सन चे शिपाई सर्जाला पार पुढे घेऊन गेले. तो गावात आल्याची खबर, तो येण्याआधी फुटली होती. जीवावर उदार होऊन रावसाहेब आणि खंडेराव गावाकडे निघाले. काहीतरी अघटित घडणार, हे वेधून मायाही एका घोड्यावर गावाकडे निघाली. 

गावाच्या मध्यभागी विल्सन आपल्या फैजफाट्यासह आधीच तैनात होता. जखमी अवस्थेत सर्जाला त्या चैकाकडे आणलं गेलं. पाण्याच्या एका-एका थेंबासाठी तो आसुसलेला होता. पाठीवर रुतलेले बाण काहीतरी वेगळी कहाणी सांगत होते. आणि त्याच्या मागच्या काळ्या घोड्यावर सुर्याजीच्या मुलगा सुभान होता. एका विराच्या पाठीवर वार करण्याचे भ्याड कृत्य करून मिशिवर ताव मारत तो हसत होता. 

" लटकवा त्याला!" विल्सननी हुकूम सोडला. 

" का रे भाड्या, छातीवर वार करण्याची हिमंत नव्हती का ? " तो पर्यंत रावसाहेब देखील तिथे दाखल झाले. ते नि:शस्त्र होते. तरी घोड्याच्या पुढच्या टाचेने त्यांनी ५-६ शिपाई जमिनीवर पाडले. विल्सन नी घोड्यास गोळी घातली. रावसाहेब पडले. त्यांना जबर मार लागला. खंडेराव त्यांना घेरून उभे राहिले. 

चौकाच्या मध्यभागी असलेल्या फासाच्या मनोऱ्यावर जखमी सर्जाला टांगले. विल्सन आणि सुभानाच्या या क्रौर्याचा खेळ अख्खा गाव बघत होता. 

" काय वाटलं तुला...? माझ्या बापाला भ्याडासारखा मारून गावातून पळून गेला...सुटला..?" सुभानाच्या अंगात आता पळपुटे बळ संचारले होते. पवाराच्या सुनेचे तोडलेले हाताचे पंजे दाखवत तो समोर आला." हे बघ, तुला लपवण्याचा धाडस कसं हिच्या अंगाशी आला...!" 

'असं प्रत्येकाचं हुनार." असं म्हणत त्याने विल्सन च्या हातातली बंदूक घेतली आणि रावसाहेबांच्या मस्तकात गोळी घातली. तडफडत रावसाहेबांनी खंडेरावच्या मांडीवर जीव सोडला..! सर्जा सगळं बघत होता. त्याच्या अंगात ओरडण्याचे सुद्धा त्राण नव्हते. पुढे येऊन सुभानने फासाच्या चाप ओढला...! पायांची लटपट झाली. सर्जाच्या बोलक्या डोळ्यातून त्याचे प्राण उडाले. राक्षसी हास्य करीत सुभान आणि विल्सन तिथुन चालते झाले. 

घोड्याचा पाय घसरल्याने मायाला यायला खूप उशीर झाला. गावकऱ्यानी रावसाहेब आणि सर्जाचे पार्थिव एका ठिकाणि आणून ठेवले. जिवापलीकडे जपलेल्या माणसांची प्रेतं पाहून मायाचा हुंदका आतल्याआत राहिला. तिला सर्जा चार वर्षांनी असा अपेक्षित नव्हता...! ती दोघांच्या मध्ये जाऊन बसली. बाजूला खंडेराव धाय मोकलून रडत होते. मायाच्या या स्थितीकडे त्यांनाही बघवलं नाहीच. ती काहीच बोलत नव्हती. तिचे दुःख अश्रूंच्या पलीकडे गेले होते. त्याचा वेग आणि आवेग सामान्य नव्हता. 

....

" दोन दिवसापासून पोटात अन्नाचा कण नाही, ऐका माझं..! खाऊन घ्या काहीतरी..!" अंतविधी करून आली, तशी माया आपल्या खोलीच्या गच्चीतून खाली आलीच नव्हती. खंडेराव ही त्यांच्या दुःखा पूढे नतमस्तक झाले होते.

 

दिवस लोटले. लोकांच्या येण्याजाण्यानी भरून पावत असलेला बंगला हळू-हळू ओस पडू लागला. तासनतास उघड्या दारातून फक्त उदासीनता आत येत असे. कधीकाळी जगाची सगळी सुखे घेऊन इवल्याश्या पावलांनी घरात, बाहेरच्या अंगणात बागडणारी माया, आता त्या उंच भिंतीमध्ये बंदिस्त होऊन राहिली होती. सर्जाचं आणि तिचं बालपण तिच्या आठवणीत फेर धरून नाचू लागलं, की तिचा जीव गलबळायचा. रात्र-रात्र कंदिलाच्या त्या वातीची एकटीच सोबत तिला होती. बदलत्या ऋतूचे भान आणि उपयोग, दोन्ही तिला जाणवतही नव्हते. संध्याकाळी येऊन दोन कोसावर असलेल्या गावाकडे ती शून्याच्या नजरेने बघत बसायची. अश्यातच एक दिवस विल्यम आला.

" सरकारने या बंगल्याचा ताबा घेण्याचे ठरवलं आहे." तिच्यापुढे एक सरकारी कागद ठेवत तो म्हणाला. " कोणाला विचारून..?" मायाने देखील तितक्याच बाणेदारपणे त्याला विचारले. 

"म्हणजे, हे तुम्ही नाही, सरकार ठरवतं."

" तुम्हाला आत येऊ दिलं, हे उपकार समजा..!" मायेच्या या उत्तराने बाजूला उभे असलेल्या खंडेरावनी तलवार उपसली. " आल्या पाऊली चालत जा, आणि त्या सुभानलाही सांग. चार पैश्याचा मोहापायी वाड-वडिलांनी कष्टाने कमावलेल्या जयदादी तुमच्या पायावर घालणारी आमची औलाद नाही ! जीवात जीव असे पर्यंत इथलं एक पान सुद्धा तुझ्या हाती लागणार नाही." 

" उगाच चिडता तुम्ही..!" विल्सन एक पाऊल पुढे सरकला. 

" तुम्ही एकट्या, आम्ही एकटे..! या वयात..." एवढं वाक्य पूर्ण होत नाही, तोच मायाने तिच्या कुपीत लपवलेलं सर्जाचं खंजीर बाहेर काढलं आणि सपकन हवेत फिरवलं. विल्सन च्या डोळ्याखालून खंजीर फिरला. त्याला अंदाज सुद्धा आला नाही. पण स्वतःच्या जखमेतून भळाभळा वाहणारं रक्त पाहून त्याचा घसा कोरडा पडला. 

" भाड्या, गप गुमानं निघायचं, नाहीतर या तुझ्या कुत्र्यांच्या हातात तुझे हातपाय आणि मुंडकं धाडालं जाईल." खंडेरावनी तलवार त्याच्या मानेला लावली. 

बंगल्यातले दिवे विझले. माया आपल्या खोलीत बसून होती. पुढचा अंधार तिला स्पष्ट दिसत होता. खिडकीतून नेहमी सुंदर होऊन वाहणारा वारा, आज जहाल वाटत होता. अशीही आज अमावस्या होती. बाहेरच्या मशाली केव्हाच शांत होऊन बसल्या होत्या. अचानक तिला काहीतरी वजनदार वस्तू जमिनीवर पडल्याचा भास झाला. असला आवाज तिने आधी नव्हता ऐकला. बंगल्यात ती आणि खंडेराव दोघ, आणि बाहेर दोन पहारेकरी होते. कुठे काहीच हालचाल नव्हती. तिने खिडकीच्या बाहेर पाहिलं. अंधाराशिवाय काहीच नव्हतं. 

बंगल्याच्या खालच्या बाजूला एक मोठं भांडं गडगडायचा आवाज झाला. दारापाशी लावून ठेवलेलं पितळ्याचं गंगाळ गडगडलं. खडेराव ते भांडं मुद्दाम रात्री लावून ठेवत असत. 

" खंडेराव..!" मायाने वरूनच त्यांना आवाज दिला.काहीही प्रतिउत्तर आले नाही. सावध होऊन तिने उशी खालचा खंजीर बाहेर काढला. आवाज न करता तिने दाराची कडी काढली आणि एक पाऊल बाहेर काढले. आवाqलेली व्यक्ती निश्चितच नवीन असल्याने कशाला तरी धडकणार होती. अचानक तिच्या अंगावर समोरून काहीतरी पडले. कोणाचे तरी शरीर होते. जिवाच्या आकांताने ती ओरडली. चाचपडून पहाताच तिला कळले, की ते खंडेराव होते. तिने त्यांच्या हाताला हात लावला. तिला लहानपणापासून अंगाखांद्यावर खेळवणारे त्यांचे ते राठ हात...! मायेने तिला कडेवर उचलून घेणारे, रानात हात धरून फिरवणारे ते हात ! तिचा इवला हात हातात घेऊन तिला गिरवायला शिकवणारे हात. तिने आपला हंबरडा आतल्याआत दाबला. पण चूक आधीच झाली होती. आवाज आधीच झाला होता. तरीही ती स्थिर राहिली. काळ किती अंतरावर आहे, हे तिला अजूनही माहिती नव्हते. खंडेरावांच्या जखमांमधून वाहणारे रक्त , त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची तीव्रता सांगत होते. 

अचानक तिच्या मागून कोणीतरी तिचे केस धरले. भीतीने आणि वेदनेने ती जोरात किंचाळली. तिचे केस धरणारे दोन हात होते, आणि इतर दोन हातांनी तिला उचलण्याचा प्रयत्न होत होता. एका हातातलं खंजीर तिने अंदाजाने वर फिरवलं. एकाच्या खांद्यावर ते फिरलं. त्याच्या कण्हन्यातून तो आपलाच पहारेकरी असल्याचं तिला कळलं. 

दुःख आणि प्रतिकार एकत्र करता येत नसतो. मायाचं इथेच चुकलं, आणि हाच डाव त्या दोघांनी साधला.आपलेच विश्वासातले शिलेदार ,आपल्या जीवावर उठल्याचे दुःख मायेला पहिले झाले. त्यांनी तिला ओढत बंगल्याच्या बाहेर आणलं..!

पहाट झाली. बंगल्याच्या दारावर मायेचं निपचित पडलेलं शरीर उगवत्या सूर्याला बेरात्री घडलेलं सारं काही सांगत होतं. आधीच मनावर असलेले घाव भरता भरत नव्हते. त्यात त्या अंधाराने शरीरावर सुद्धा कौर्याचे आसूड ओढले. आजपर्यंत शौर्याची कथा सांगून तिला झोपवणारं तिचं अंगण, आज तिचं पाशवाने तोडलेले शरीर कवेत घेऊन रडत होतं. संगमरवरी पायऱ्या रक्ताने लाल होऊन पडल्या होत्या. बंगल्यातील प्रत्येक खांब, आज आपल्या निर्जीव असल्यावर टाहो फोडत होता. झाडं-झुडपं मुक्याने साक्ष द्यायला तयार होती. पण ऐकणारं आणि शिक्षा देणारं कोणी नव्हतं. रावसाहेब नाही, खंडेराव नाही, आणि फक्त तिच्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शिवपुरीत आलेला सर्जाही नाही ! अत्यंत जड अंतःकरणाने गावकऱ्यांनी शरीरं चितेवर ठेवले. खडेरावांना झालेल्या जखमा, त्या भ्याडाचं नाव कोरून गेल्या होत्या. आणि मायेच्या वेदनांनी माणसातील उरल्या-सुरल्या माणुसकीची तमाही सोडली होती. 

वर्षे उलटली. गाव वाढू लागले. जमेल ते उपाय करून झाले. सुभान शेवटच्या काही दिवसांत एका दुर्धर आजाराने त्रस्त झाला. ज्वराने अंगाची लाही-लाही होत असे. इतकी की, अंगावरचे कपडे त्याला नकोसे होत. रात्री बेरात्री कुठल्याश्या चाहुलीने, आवाजाने तो आकांत करत सुटत होता. संपूर्ण कातडी हिरवी-निळी पडल्याने त्याच्या जवळ कोणी जात नसे. त्याच्या पापाची हीच शिक्षा, म्हणून त्याला गावकाऱ्यांनीही वाळीत टाकले. विल्सनही एकदा शिकारीला गेला, तो परत आलाच नाही. तीन दिवसांनी त्याचे प्रेत गावाच्या बाहेर, एका वडाला टांगलेले आढळले. विशेष म्हणजे, ते झाड बंगल्याच्या अगदी जवळ होते. 


लेखाची परिस्थिती काही ताळ्यावर येत नव्हती. चांदेकरांनी ३ डॉक्टर बदलून पाहिले. आज साधारण आठवडा झाला असेल, अन्न-पाण्याला तोड दाखवून. 

" साहेब, एकदा त्यांना बोलवायचं का ?" काशीने उपाय सुचवला. 

" मनात येतं माझ्या बाई, पण हिमंत नाही होत." 

" कधी-कधी आपण विचार करतो, तसं काहीच नसतं. आपण न घडलेल्या गोष्टीचा धाक मनात बाळगून असतो, त्यामुळे आहे त्याचा विचार पण नीट नाही करता येत !" 

चांदेकरांनी बाजूची कागदं काढली आणि आनंदच्या नावाने पत्र निघाले. संध्याकाळी भर पावसात एक टांगा किर्तीकरांच्या दाराशी येऊन थांबला. 

"हे बघा..!" पंतांनी ते पत्र किर्तीकरांच्या समोर ठेवलं. ते नेमके देवासमोर होते. देव्हाऱ्यासमोरची हळद उचलून त्यांनी पत्रावर टाकली. पत्र हळू-हळू लाल होऊन त्यावर काळे हात, अगदी तसेच उमटले. ते पाहून पंतांना घाम फुटला. 

" बुवा, हे काय आहे ?"

" नशीब..!" कीर्तिकर या पूढे काहीच बोलले नाही.  

"म्हणजे?" 

" पंत, तुम्हाला मी आधीच बोललो होतो, वेळेवर सांगा त्याला. तुम्ही आणि सुमननी माझं नाही ऐकलं..! आता जेव्हा कुंडलीनुरूप हालचाली सुरु झाल्या, तेव्हा तुम्हाला जाग येते आहे...!" त्यांचा वाढलेला आवाज ऐकून नंदा बाहेर आली. 

" हा त्याचा पूर्वजन्म आहे, ज्याचा उत्तरार्ध या जन्मी पदरी आला आहे." 

पंत काही काळ त्यांच्यासमोर खिन्न बसले. 

"एक करता येण्यासारखे आहे...पण ते यथोचित झाले पाहिजे."

" काय? वाटेल ते करायला मी तयार आहे, तूम्ही फक्त सांगा." एक आशेचा किरण दिसला, तरी माणसाचा जीव भांड्यात पडतो. 

थोडेसे समाधान घेऊन पंत घरी परतले. 

" काय होते हे सगळे, कसला एवढा आगडोंब उठला आहे. काही कळेल का ?" न राहून नंदाने किर्तीकरांनी विचारलेच.

" आमचे सामान बांधा...आम्ही उद्या पहाटे मुंबईला निघणार." 

......

"कसला एवढा विचार करता साहेब..?" 

जेवणात लक्ष नसलेल्या शेखरला दिगंबरनं टोकलं. 

" तो बंगला..! त्यात घडलेलं ते सगळं काही...खरं सांगत असेल का तो म्हातारा..?"

" जीवावर बेतलेला आहे त्याच्या. तो नाही खोटं बोलायचा." 

" काहीही असो दिगंबरराव, आपल्याला त्याचा छडा लावावाच लागेल." 

" साहेब, होणारं होऊन गेलं. आता त्याचा तपास करून काय मिळणार आहे?"

शेखर ताटावरून उठला. सरळ खिडकीकडे चालत गेला. 

" मी आल्यापासून बघतोय. त्या बंगल्याच्या आवारात गेलं, की अंगात कापरं भरतं. इतरांना वाटते तशी भीती ही वाटते, पण तिथे खूप विचलित करणारे काहीतरी घडले असावे ! त्या बंगल्याच्या आवारातली एक एक सजीव-निर्जीव गोष्ट, एक दारुण सत्य लपवत अनंतकाळापासून जशीच्या तशी, स्तब्ध उभी आहे, असंच वाटतं. आपण उघडुयात का तो बंगला..?" 

" साहेब, माझा जन्म गेलाय या गावात, नका उगाच विंचवाच्या नांगीवर बोट ठेऊ..!" दिगंबरनी त्याला वडीलकीचा सल्ला दिला. त्या रात्री शेखरला झोप आलीच नाही. सारखंच तो बंगला त्याला डोळ्यासमोर दिसू लागला. शेवटी तो ब्राह्मसमयी उठला, अंघोळ केली आणि बाहेर पडला. 

त्या काळोखात सुद्धा त्याला तो बंगला स्पष्ट दिसला. आज त्याच्या अंगात एवढे धाडस कुठून आले, हे त्यालाही कळले नाही. त्याच्या चामडी बुटांच्या चर्मराटीखाली पाचोळा कोलाहल करत होता. वारा अजिबात नव्हता, तरी मोठ्या झाडांच्या फांद्या उगाच त्याला भीती दाखवत होत्या. आपल्याला कोणीतरी चहूबाजूंनी पहात असल्याची जाणीव त्याला पावलो पावली होत होती. पण त्याच्या अंगात आज खूप धीर भरला होता. त्याला भास झाला, की तो नाही, तर तो बंगला एक-एक पाऊल त्याच्याकडे सरकतो आहे. किती पावले तो चालला, हे कळलं नाही, पण आता त्याच्या दोन्ही डोळ्यांच्या विरुद्ध टोकांत, फक्त तो बंगला दिसत होता. त्याचा श्वास फुलला, रक्त प्रवाह दुपटीने वाढू लागला. नजर धूसर व्हायला लागली आणि अचानक त्याला चक्कर आली. कोणीतरी जोरात त्याच्या डोक्यावर काहीतरी जड वस्तूने वार केला. मागे वळून बघताना त्याला तोच म्हातारा दिसला...! पहिल्यांदा त्याच्या घरातल्या न्हाणीघरात दिसला होता, तोच. शेखरची वाचाच गेली. तो धाडकन जमिनीवर कोसळला. काही कळायच्या आत त्याचे डोळे बंद झाले. एका गोष्टीचे समाधान मात्र त्याला होते, की गुपित बाहेर येणार होते...! 

पावसाची रिप-रिप चेहऱ्यावर पडली, तशी शेखरला शुद्ध आली. त्याचा उजवा हात जड झाला होता. त्याने कशी-बशी मान वळवून उजव्या हाताकडे पाहिलं, तेव्हा त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला...! त्याच्या हातात एक खंजीर होतं..! कोणाचं आहे हे, कुठून आलं, कोणी ठेवलं, का ठेवलं ? असे अनेक प्रश्न त्याला पडले. तो कसाबसा उठला. त्याला आठवत होता, तो म्हातारा ! त्याच्या अंगात अजिबात त्राण उरले नव्हते. पण त्याला उठून उभं राहणं भाग होतं. तसाच चालत तो बंगल्याच्या लोखंडी फाटकाजवळ आला. ते लावलेले होते. ते उघडून तो बाहेर आला आणि पून्हा पडला...!

शेखरने डोळे उघडले ते सरकारी दवाखान्यातच ! बाजूला दिगंबर, त्याची बायको ही होते. 

" केव्हा उठून गेले कळलंच नाही, मला तरी न्यायचं..!" 

तो खडबडून उठला. " माझ्या हातात...?" 

" हे होतं साहेब..." दिगंबरच्या बायकोने तो सुरा त्याच्यासमोर धरला. 

" कोणाचं असेल हे ?" शेखरने विचारलं.

" जुनं आहे, आणि ज्याचं असेल, त्याला याचा पूर्ण सराव झाला असेल." मागून एक राठ, पण प्रेमळ आवाज आला. 

" मी दामोदर, कदाचित गावातला दुसरा माणूस, ज्याला त्या बंगल्याबद्दल काहीतरी वाटतं."

त्याने तो सुरा शेखरच्या हातातून घेतला. त्याचे लोह अजूनही गंजले नव्हते. पण मुठीवर असलेली झीज लपत नव्हती. 

" तो तुमच्या हातात कसा आला, प्रश्न हा आहे!" दामोदर नी आपल्या पिशवीतून एक वही बाहेर काढली. काही पानं चाळळ्यावर एक चित्र त्याने शेखर समोर धरलं. ते रावसाहेबांचं चित्र होतं. 

" यांना पाहिलं आहे कधी तुम्ही ? "

" नाही...!" 

" यांना" दुसरं चित्र विल्सन चं होतं. 

" हे तर..." शेखरला विल्सन चा इतिहास माहित नव्हता, पण विल्सन माहित होता. 

" हा तुमचाच अधिकारी, विल्सन. एकेकाळी त्यांनी या गावात जो कौर्याचा इतिहास रचला, तो ही माती कधीच विसरली नाहीये." 

शेखर त्या चित्राकडे बघत होता. दामोदर नी पान मोडलं. त्यावरचं चित्र पाहून शेखर खाडकन उठून बसला. 

" हा, हाच तो, बघा, मी बोललो होतो ना ! खरा आहे हा..!" 

सगळ्यांनी त्या फोटोकडे निरखून पाहिलं. ते चित्र भीमाचं होतं. क्षणभर दामोदर ही स्तंभित झाला. 

" कोण हे...तुम्हाला कसं माहित..!" 

" मला दिसले, आणि यांनीच मला काळ रात्री डोक्यावर...!" 

" साहेब, मी दोन-तीन वर्षे झाली, या भागातल्या जुन्या हवेल्या, बंगले,त्यांचा इतिहास, यावर संशोधन करतोय. जुन्या लोकांना विचारून, काही कथांचे संदर्भ, काही लोकांची असलेली वर्णने, यातून हे चित्र मी काढून घेतले आहे. याचं नाव भीमा आहे...! इथला एक शेतकरी...!" दामोदर नी त्याला असलेली माहिती सांगितली. शेखरनी ते चित्र पुन्हा हातात घेतलं. बाकीची चित्रंही त्याने आलटून पालटून पहिली. त्याला त्यापैकी कोणीच ओळखीचं किंवा या आधी पाहिलेलं आठवलं नाही.पण काहीतरी दडलं आहे, ही खात्री त्याला होती. 

" पण या सगळ्यांशी माझा काय संबंध?" 

" साहेब, या जगातल्या प्रत्येक राहास्यामागे, एक चांगलं किंवा वाईट कर्म लपलेलं असतं, तसंच प्रत्येक प्रसंगाशी एक किंवा अनेक व्यक्ती जोडल्या गेल्या असतात. प्रत्येक घटना काही पडसाद सोडून जात असते. काही परिणाम, आधीच्या कर्माचे ! कदाचित जगासाठी अनुरात्तीत असणारा तो बंगला, तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असेल. इतके दिवस, इतर कोणालाही तिथे काहीच अनुभव आले नाहीत. तुम्ही मात्र आपुलकीने तिथपर्यँत चालत गेलात, शोध घेण्याचा प्रयत्न केलाय..!"

" ते जीवावर सुद्धा बेतलं असतं साहेबांच्या..!" दिगंबरची बायको म्हणाली.

" जर तसं असतं, तर आत्तापर्यंत..!" 

दामोदर आपली पिशवी आवरू लागला. "काही मदत लागली तर सांगा. यांना माझं गजर माहिती आहे." दिगंबरकडे बोट दाखवत दामोदर तिथून निघून गेला. 


" आपण पहिल्यांदा भेटतो आहोत. मी तुमच्यावर विश्वास का ठेवावा ?" चांदेकरांच्या घरी कीर्तिकर सकाळीच येऊन धडकले. 

"खरंय, माणसाचा ज्यावर विश्वास नसतो, ते डोळ्यासमोर सिद्ध झाल्याशिवाय त्याचा विश्वास नाही बसत. पण हे सिद्ध करण्याच्या प्रक्रियेत एखाद्याचा जीव धोक्यात येऊ शकतो. ही तुमच्याच मुलीची कुंडली न ?" त्यांनी आल्या-आल्या लेखाची कुंडली मागवली होती. "हो!"

"ती तेरा वर्षाची असताना तिला एक मोठा अपघात झाला होता. थोडक्यात वाचली होती."

" हो , पण हे कोणीही सांगू शकेल, कुंडली बघून.!" 

" साहेब, मी इथेच थांबतो. ही हळद तिच्या कपाळावर लावून, तुम्ही खाली परत या..!" किर्तीकरांनी हळद त्यांच्या हातात दिली, आणि उजव्या हाताने थोडी त्यांच्याही कपाळाला लावली. 

चांदेकर तिच्या खोलीत गेले. ती शांत झोपलेली होती. हळदीचा वास तिच्या नाकापर्यंत पोहोचला, तसे तिने एकदम डोळे उघडले. 

" काय ए हे..?" तिने बाबांना विचारले. 

" हळद ए बेटा !" 

" त्या खाली बसलेल्या म्हाताऱ्याने दिली न !" चांदेकर एकदम चमकले...!

"हो." त्यांना जरा धक्काच बसला. 

" त्याला सांगा, हे बालिशधंदे बंद करा. उगाच जीवाला मुकाल..!"

" लेखा..!" हे चांदेकरांसाठी अगदीच नवीन होतं. 

" अजून जिवंत आहे, आणि तिचा जीव परत हवा असेल, तर खालच्या म्हाताऱ्याला सांगा, त्याला माहितेय मला काय हवंय..!"

चांदेकर एकदम धावत खाली आले. जायच्या आधी त्यांनी ती हळद लेखाच्या डोक्यावर अक्षरश: फेकली. झप-झप पायऱ्या उतरून ते किर्तीकरांसमोर उभे राहिले. 

" त्या पोराचे वडील माझ्याकडे आले होते. पत्रावरूनच मला कळले, की तुमच्या मुलीचा जीव धोक्यात आहे. पण घाबरू नका. तिच्या या सगळ्याशी काडीमात्र संबंध नाहीये. तिचा केस सुद्धा वाकडा होणार नाही. मी इथेच मारुतीच्या धर्मशाळेत राहील दोन दिवस. " चांदेकर बसल्याजागी गार पडले. बागेतूनच त्यांनी वर , लेखाच्या खोलीकडे पहिले. जेव्हाही तिच्या खोलीत जायचे...हळद डोक्याला लावूनच, असे कीर्तिकर बजावून गेले होते. वादळात उडणाऱ्या पाचोळ्यासारखी स्थिती होती. कोणास काहीच कळत नव्हते. पूर्व जन्मीचं कर्म, या जन्मी फेडायचे होते, चांगले, वाईट दोन्ही.

वाड्याच्या बाहेरच्या खोलीत नर्मदाच्या रहाण्याची पंतांनी केली. अगदी विठोबा-रुक्मिच्या झोपडी शेजारीच. एक बैलगाडी भरून समान तिने येताना आणलं होतं. आजची रात्र जरा अवघड होती. आनंदला बाहेरचे दरवाजे बंद केले होते. 

" काय ए हे सगळं पंत..? अजून तुम्ही या सगळ्यातून बाहेर कसे येत नाही. " मध्यरात्री चिडून त्याने पंतांना प्रश्न केलाच. सुमन तिथेच होती.

 " बाहेर जायचंय मला...आत्ता !!" अचानक दारातून नर्मदा बाहेर आली. 

" अमोशा आहे म्हणून जायचं न तुला बाहेर...!" तिच्या या बोलण्याने आनंद चपापला. " तुझ्यासारखे छप्पन लावलेत मी कडेला...!" असे म्हणून तिने गंगेचं थोडं पाणी त्याच्या अंगावर शिंपडलं. अंगावर तेजाब फेकल्यासारखा आनंद तिथून उडाला. बाजूच्या भिंतीवर जाऊन आदळला. 

" तुला काय वाटलं, लपून राहशील, कोणाला कळणार नाही..!" नर्मदा पूर्ण तयारी निशी आली होती. तिने तिच्या बोटातली एक अंगठी काढली आणि बळजबरीने आनंदचा हात हातात घेऊन, तळव्यावर ठेवली. त्याचा तळवा भाजू लागला. 

" कोण आहेस, कुठून आलाय, सांग, या पोराने काय वाईट केलंय रे तुझं..?" नर्मदेनी त्याचा हात घट्ट धरून ठेवला होता. आनंद जागच्या जागी जोर-जोरात ओरडत होता.

"पंत, आई, कोण ए ही बाई ?" आनंदचा हा थयथयाट सुमन आणि पंत बघत होते. 

" ए भाड्या, कोणाला गुंडाळतोय ? तू माणसात असता, तर अशी कातडी जळाली नसती...! गुमान सांग, कोण, कुठून आलाय..?" 

आता एकदम पारडं बदलू लागलं. आत्तापर्यंत किंकाळ्या मारणारा आनंद, आता रूप बदलू लागला. त्याचे डोळे लाल होऊ लागले होते. ते पाहून मात्र सुमनला गरगरायला झालं. 

" मी....शोध न, शोध मी कोण ए ते !" त्याच्या आवाजात आता एक कानठळ्या बसणारा, घोगरा आणि चिचिरणारा आवाज घोळू लागला. " माझं काम होऊ दे, माझ्या रस्त्यात येशील, तर तुझ्यासकट यांनाही घेऊन जाईन मी." आणि त्याने जोरात हात झटकला. तरी नर्मदाने त्याचा हात सोडला नाही. त्याने मग त्याचा पाशवी जोर लावायला सुरवात केली. दोन्ही हाताने त्याने नर्मदाला उचलले आणि भिंतीकडे फेकले. वयाने क्षिण झालेली नर्मदा आदळताच थोडी मूर्च्छित झाली. तोच आनंद पूर्ण जोरानीशी दाराकडे धावला. दाराची एक फळी तोडून तो गच्चीकडे धावू लागला. पंत ही मोठ्या हिंमतीने त्याच्यामागे धावले. गच्चीवर पोहोचताच आकाशाकडे बघून तो ओरडू लागला. 

" अरे मूर्खानो, मी कुणी बाहेरचा नाहीये, हे माझंच शरीर आहे..! माझंच शरीर आहे..!" आणि जोरजोरात हसू लागला. पंतांना क्षणभर काही सुचलेच नाही. पण त्यांना ठाऊक होतं, काय करायचंय. त्यांनी कुपीत लपवलेला शंख बाहेर काढला आणि फुंकला. त्याचा आवाज होताच आनंद जमिनीवर कोसळला...!


दामोदर रात्री उशिरा पर्यंत लिहीत बसला होता. शेखरला शिवपुरीत आल्यापासून आलेले अनुभव देखील त्याने लिहून ठेवले होते. बंगल्याचे विस्तारित वर्णन, गावातल्या काही जुन्या जाणत्या लोकांनी सांगितलेल्या कथा, काही प्रसंग ! गेली दोन वर्षे तो त्या बंगल्याच्या आजूबाजूला जात होता. पण फाटक उघडून आत जायची त्याची हिमंत होत नव्हती. पुढंच कोडं आत जाऊनच सुटणार होतं. पण तिकडे पोहोचणे, इतके सोप्पे नव्हते. त्याच्या इतक्या वर्षाच्या अनुभवात, त्याने अनेक हवेल्या, बंगले, जुने राजवाडे, किल्ले पाहिले होते. पण आज त्याच्यासमोर उभा असलेला पेच, हा आधीपेक्षा जास्त गूढ होता. अखेरीस त्याने सगळे काही बंद केले आणि तो झोपायला निघाला. 

अर्धी रात्री उलटून गेली. गाई वारा सुटला होता. दामोदरला गाढ झोप लागली होती. अचानक त्याच्या समोरची खिडकी जोर-जोरात वाजू लागली. त्याने डोळे उघडले. त्याचा त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. खिडकीच्या गजांमध्ये काहीतरी अडकले होते. त्याने पळत जाऊन ते आत ओढले. ते एक पांढरे कापड होते. त्यावर लाल अक्षरात काहीतरी लिहिले होते. अंधारात त्याला काहीच दिसले नाही. घाई-घाईने दामोदरने तेलाचा दिवा लावला. त्यात त्याने तो कापडी तुकडा धरला. त्यावर लिहिलेली अक्षरं मळलेली होती. त्यावर मोडी मध्ये काहीतरी लिहिलं होतं. ते कापड एका खलित्याचं होतं. दामोदरने घाई-घाईने पलंगाखालच्या पेटीतून एक जुनं पुस्तक बाहेर काढलं. ते मोडी भाषेचं संदर्भ पुस्तक होतं. त्याला कळून चुकलं, की आपली पूर्ण रात्र यात जाणार आहे. पण हे त्याला करणं भाग होतं. 

धर्मशाळेत किर्तीकरांची स्नान-संध्या आटोपली होती. बाहेर चांदेकर येऊन उभे होतेच. पोरीवर ओढवलेलं संकट त्यांना चैन पडू देत नव्हतं. 

" तुम्ही खरं-खरं का सांगत नाही आम्हाला ? माझ्या मुलीच्या स्थतीवे तुम्हाला दया येतंच नाहीये का ?" 

" मी बोललो ना, जे घडतंय त्याच्याशी तिचा कडीमात्रही संबंध नाहीये. आणि त्याचा इलाज माझ्याकडे नाहीये !" 

" मग , कोणाकडे आहे?" 

" नियती आणि काळाकडे..!"

" हे बघा, उगाच शब्दात गुंतवू नका. जे काही आहे, ते स्पष्ट सांगा..!" 

" हा त्या मुलाच्या पूर्वजन्माच्या कर्माचा शेष भाग आहे." कीर्तिकर त्यांच्या शेजारी बसले. " आणि तुमची मुलगी त्याच्याशी निगडीत आहे, म्हणून हा त्रास तिला होतो आहे. याचा निश्चित उपाय फक्त तेव्हाच सापडू शकेल, जेव्हा आपल्याला पूर्णतः कळेल की घडलं काय आहे." 

" आपण मला त्या मुलाकडे घेऊन चला. मी विचारीन त्याला !" 

" विलायतेत त्याला असाच त्रास झाला होता, त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी...! तेव्हाही त्याला काही कळले नाहीच." 

" बुवा, असे कोडे घालू नका..!" चांदेकर अत्यंत बिकट परिस्थितीत त्यांना विनवण्या करू लागले.

" एक इलाज आहे, पण तो जीवावर बेतू शकतो, म्हणून करायला मी धजावत नाही...!" 

" कोणता...?" चांदेकरांना एक आशेचा किरण पुन्हा दिसला. 

" तुमच्या पूर्वजांपैकी एखाद्याला अकाली मृत्यू आला आहे ?" 

" बघावे लागेल." 

" सांगा मला, तुमच्याच घरात हा विधी, अत्यंत काळजीपूर्वक करावा लागेल." 

जुन्या नोंदी समोर आल्यात. चांदेकरांच्या मागच्या चौथ्या पिढीत , एक लहान मुल जन्मताच मृत्यू पावले होते. पण त्याचे बारसे झाले नव्हते. किर्तीकरांनी सांगितलेल्या नियमानुसार, हा एकच असा मृत्यू होता, ज्याचे नंतरचे काही कर्म झाल्याची नोंद नव्हती. 

" याला कारण आहे. मृत्यूनंतर पाहिले १० दिवस, आत्मा हा त्याच्याच गोतावळ्यात वावरत असतो. त्यानंतर च्या यथाविधीनुसार त्याला उचित लोक प्राप्त होते. दशक्रिया नंतरच्या प्रत्येक विधीनंतर आत्म्याचे लोक आणि योनी बदलत जातात. याच क्रियाक्रमात, त्याचा भूलोकाशी असलेला मोह सुटतो, त्याची त्याच्या पूर्वजाच्या आत्म्यांशी गाठ होते, त्याला मोक्ष, अथवा कर्मानुसार गती, अथवा पुढचा जन्म मिळतो." बोलता-बोलता किर्तीकरांची तयारी सुरु होतीच." आत्मा कधीही मृत नसते. ती या न त्या रुपात , कुठेतरी वावरत असते. आपण मृत्युलोकात असतो, त्यामुळे आपल्याला , आपल्या मर्यादित शक्तींमुळे हे दिसत नाही. पण अश्या आत्म्यांना आपल्या लोकांत काय सुरु आहे, हे माहिती असते." किर्तीकरांनी चांदेकरांच्या गच्चीवर विधी सुरु केला. सुमारे दोन तास हा विधी चालला. काशी खालीच होती. 

दुसऱ्या दिवशी सकाळी कुठून तरी एक पोपट उडत चांदेकरांच्या अंगणातल्या झाडावर बसला. किर्तीकरांच्या तल्लख बुद्धीने त्यास ओळखले. त्यास कोणीही न अडवण्याची सूचना करण्यात आली. अंगणात एक बेलाचे झाड होते. पोपटाने त्या झाडावर बसून बिल्वपत्र खाली टाकायला सुरवात केली. हा संकेत होता. पण हा सहजासहजी लक्षात येण्यासारखा नव्हता. किर्तीकरही बुचकळ्यात पडले. पोपट उडून गेला. चांदेकर निराशेने किर्तीकरांकडे पाहू लागले. तिथेच बाजूला असलेल्या लाल जास्वंदाची फुलं तोडताना काशी दिसली. 

" आज चतुर्थी ना...?" किर्तीकरांचा चेहरा एकदम उजळला. 

" शिव...!" ते एकदम ओरडले...!

"होय...शिव..!" चांदेकरांचा गोंधळ वाढत चालला होता. 

" संकेताचा महादेवाशी काहीतरी संबंध असावा. एखादे स्तोत्र...स्तुती...! एखादे ज्योतिर्लीगाचे स्थान...! " चांदेकरांना आत्ता कुठे काहीतरी कळायला लागले होते.  

..........

आनंदला त्याच्याच खोलीत बंद ठेवले होते. त्याच्यावर काही उपचार होतील, असे काहीही चिन्ह दिसत नव्हती. वाड्यातली खासगी बाब होती, ती वाड्यात रहाणे गरजेचे होते. त्यामुळेच नर्मदेलाही वाड्यात राहणे गरजेचे होते. त्याच्या हालचाली खूप वेगाने बदलत होत्या. आपल्याच खोलीत तो कधी गादी फाडून टाकी, तर कधी बसल्या-बसल्या फक्त नजरेने कागदं पेटत होती. वाड्यात सर्वत्र घंटा, धूप, अगरबत्ती चा वावर नित्य करण्यात आला. त्यामुळे तो शांत असे. त्याच्यावर हावी असलेली आत्मा त्याच्या सवयीशी बरीचशी जुळती होती. आनंदच्या शरीरावर काहीही विपरीत परिमाण होत नव्हता. एक तेवढीच बाब लक्षणीय सकारात्मक होती. बऱ्याचदा एखाद्या शरीराची गरज असली, की त्याची निगा राखावी लागते, हे त्या आत्म्याला माहित होते.  

" आता बुवा येईपर्यंत काहीच पत्ता लागायचा नाही." रात्री ओट्यावर रोज काहीतरी चर्चा होत असे. असाच आठवडा गेला. एका रात्री अचानक वाड्याचा मुख्य दरवाजा वाजला. विठोबा सावधपणे उठला, कंदील घेऊन बाहेर आला. कमरेला लावलेली छोटी कुऱ्हाड होतीच सोबतीला. 

" कोण ए..?" 

" बुवांनी पाठवलंय , पंतांना हे द्या.!" तो माणूस आल्यापाऊली माघारी फिरला. विठोबाने त्याने दिलेला कापडी लखोटा हातात घेतला आणि तसाच आत पळत गेला. अर्धवट झोपेत असलेल्या पंतांनी चिमणित लखोटा वाचला. तो संपे पर्यंत कोणाशी काहीच ते बोलले नाहीत. 

" कोणाचा निरोप आलाय एवढ्या आडवेळी..?" सुमनलाही जाग आली. 

" किर्तीकरांचा." पंत एकदम बाजूच्या गादीवर बसले. 


सप्रेम नमस्कार, 

विधीच्या नियमानुसार सगळ्यांना वागणे भाग असते. प्रारब्धात जे काही लिहिले असते, ते यथावकाश , त्या-त्या ठिकाणी जाऊन भोगावेच लागते. चांदेकरांच्या पत्रास अनुसरून, आणि आपल्या आज्ञेखातर मी मुंबईस आलो, हे एक बरेच झाले. इथे परिस्थिती शब्दांपेक्षा कित्येक जास्तपटीने बेभरवश्याची आणि हाताबाहेरची आहे. तीस होणारा त्रास हा वैद्यकीय नाही, हे कळले ! पण त्या त्रासाचा तिच्याशी काहीही संबंध नाही, हे देखील कळते. कोणाच्या पूर्व जन्माची फळे तिच्या नशिबी आली आहेत, देवालाच ठाऊक. 

विधिवत येथे पूजा झाली. संकेतांनी दिसून आले, की या सगळ्याचा उगम शिवपुरी नामक स्थानातून झालेला आहे. आपण पुढे सुचवावे, तसे आम्ही करावे. 

आपलाच

कीर्तिकर...

पात्र 

आनंद - पंतांचा मुलगा. विलायतेहून शिकून आलेला. तिथेच तो लेखाच्या प्रेमात पडतो. एकदा विलायतेत घडलेल्या एका घटनेने या सगळ्याची सुरवात होते. 

पंत - आनंदचे वडील

सुमन - आनंदची आई

विठोबा - पंतांच्या घरातील विश्वासू गडी. 

रुक्मि - पंतांच्या घरातील मोलकरीण, विठोबाची बायको

नर्मदा - गावातील एक जुनी जोगतीण. आनंदच्या जन्मापासून ते आजपर्यंतचा सगळं इतिहास तिला माहिती आहे. 

कीर्तिकर - पंतांच्या विश्वासातील एक जुने पंडित. आनंदची कुंडली बनवतानाच यांच्या लक्षात आले की पुढे जाऊन आनंदला काही अघोरी संकटांना तोंड द्यावे लागणार आहे. तशी ताकीदही त्यांनी पंतांना आणि सुमनला दिली असते. 

नंदा- किर्तीकरांची बायको. 

लेखा - आनंदला विलायतेत भेटते. दोघेही मायदेशी आल्यावर लग्न करायचं ठरवतात. आनंदला विलायतेत झालेल्या त्रासाबद्दल तिने आपल्या वडिलांना सांगितले असते. 

चांदेकर - लेखाचे वडील. 

काशी - चांदेकरांची मोलकरीण. 

शेखर - इंग्रज सरकारच्या पोलीस दलातील एक अधिकारी. नुकतीच याची बदली शिवपुरीत झालेली असते. 

दिगंबर - शेखरच्या पोलीस ठाण्यातील हवालदार.

बाजी - शेखरच्या पोलीस ठाण्यातील हवालदार.

दामोदर - एक पुरातन वास्तू आणि घटना अभ्यासक. 

रावसाहेब - शिवपुरीतील एक बडे प्रस्थ. 

माया - रावसाहेबांची एकुलती-एक मुलगी. 

खंडेराव - रावसाहेबांचा विश्वासू रक्षक

भीमा - रावसाहेबांच्या बंगल्याचा रखवालदार

सर्जा - भीमाचा मुलगा. 

सूर्याजी - इंग्रज अधिकारी विल्सन चा एक हस्तक, गावगुंड. 

विल्सन - इंग्रज अधिकारी. अत्यंत क्रूर आणि कपटी. सुर्याजीला हाताशी धरून गावात अनेक काळे कृत्य करणारा. 


ते पत्र आणि पुढचं सगळंच कसं विस्कटलेलं भासत होतं. शत्रू डोळ्याला दिसला, तर त्याची व्याप्ती कळते. त्याच्याशी लढण्याचे मनसुबे तयार करता येतात. पण इथे तसं नाहीये, इथे शत्रू नेमका कोणावर हावी आहे ,हे समजायला मार्ग नव्हता. त्यांच्या गुरूने शिकवलेल्या, आणि त्यांनी पर्याय म्हणून शिकलेल्या विद्येच्या आधारावर किर्तीकरांनी शिवपुरी हे नाव शोधून काढले खरे, पण पुढे काय ? तिथे आयुष्यात कधी जाण्याचा संबंध आला नाही. तिथे कोणी ओळखीचं नाही, तिथे जाऊन करायचंय काय? हे सगळे प्रश्न होतेच. नर्मदेला तर वाचता सुद्धा येत नव्हते, पण पंतांच्या चेहऱ्यावरून तिला कळले, की एक धागा हाती लागलाय. त्यावरून पुढचा माग काढायचा, तर वेस ओलांडावी लागणार. 

" जावं तर लागेल न पंत!!?" तिने पंतांना विचारले. 

" काय करावे काही कळत नाहीये !" तरीही पंतांनी गाडी भरायला लावली. प्रवास होता एक दिवसाचा, पण तिथे किती दिवस रहावे लागेल, हे त्यांना माहित नव्हते. पाठीशी कीर्तिकर आणि त्यांच्या पाठीशी भगवंत ,यावर विश्वास ठेवून त्यांनी तयारी सुरु केली. 

.....

" पाहुणे येतील...?" 

दामोदरने त्या कापडी शब्दांचा अर्थ लावला. आणि काहीही न सापडल्याने तो तुकडा त्याने घडी घालून ठेवून दिला. दवाखान्यात जाऊन शेखरला भेटायचं त्याच्या मनात आलं. एकदा पुन्हा बंगल्यात जाऊन बघणे भाग होतं. तिथून काहीतरी पुढचा अर्थ उमगला असता. 

" तुम्हाला वाटतं, की तिथे जाऊन काही होऊ शकेल?" शेखरने त्याला विचारलं. "दोनदा गेलोय मी ! माहिती, इतिहास सांगणारं तिथे कोणीच नाहीये. बागेत पावसाच्या जीवावर वाढलेली काही झाडं, बेरंग होत चाललेल्या काही दगडी चिरा ! आत जुनी भांडी कुंडी, त्या खेरीज मला नाही वाटत, काही मिळेल...!"

" बऱ्याचदा आपल्याला समोर दिसणारी उत्तर कळतील इतकी सहज नसतात." दामोदरनी आत जाण्याचे जणू ठरवलेच होते. " निर्जीव वस्तू बोलत नसतात, पण त्यांनी घडलेलं पाहिलं असतं, त्यांच्या डोळ्यादेखत काहीतरी घडलं असतं. त्यांच्या बदलेल्या जागा, रंग खूप काही सांगून जातात." 

" तुम्ही येता का हो, आमच्या पोलीस दलात?" दोन-तीन दिवसांची भेट हळू-हळू मैत्रीत बदलत होती.

" नको, तुमचं दल तुम्हाला लाखलाभो . मला गोळ्या झाडताना त्यांचा आवाज नबी सहन होत !" 

दुसऱ्या दिवशी सकाळी बंगल्यावर जायचे ठरले. 

" शेखर, आत तर जातोय, पण बाहेर नाही येता आलं तर...?" दामोदरनी एक भीती व्यक्त केली. 

" नाही, इथे कोणी आपल्याला मारणारं नाहीये. तसं असतंच, तर मी दोनदा सहीसलामत बाहेर येऊ शकलो नसतो. सावधगिरी म्हणून दोघांनी काही हत्यारं सोबत घेतली होती. शेखर न विसरता तो खंजीर घेऊन आला होता. दिगंबर आणि बाजीला बाहेर रस्त्यावर उभं केलं होतं. 

" नेहमी इथे यावं वाटतं. लोक उगाच घाबरतात !" फाटकाला हात लावत शेखर म्हणाला. 

" त्या तीन चोरांचे काय झाले पहिले न ? तरीही..!" दामोदरला सगळं घडलेलं माहिती होतं. 

" ते बंगल्यात वाईट उद्देशाने आले होते." 

अर्धवट वाळलेल्या पानांचा छानसा सुगंध पसरला होता. थोड्याश्या विश्रांतीनंतर पडणारा पाऊस गारवा अबाधित ठेवत होता. चिखल होता, पण चालायला वाट सुद्धा होती. मोठ्या झाडांना आलेली पावसाळी पालवी , कोणासाठी बरं आली असावी ? रातराणीच्या झाडाखाली काही पायदळी आलेली तिची फुले सांगत होती, की कोणीतरी येऊन त्यांना कुरवाळून गेलंय, रात्री ! त्या विशाल रातराणीच्या झाडाकडे पाहून दोघांना वाटले, की हे झाड रोज कोणाच्या तरी स्पर्शासाठी फुलत असावे. रात्री चांदणं पसरलं, की कोणीतरी चोर पावलांनी, कोणालाही दिसणार नाही, कळणार नाही, असे येऊन , बागेतल्या झाडांशी गप्पा मारून जात असावे ! बागेतल्या प्रत्येक झाडाशी आपुलकीने हितगुज होत होते, आणि रोज होत होते. ते जे कोणी होते, त्याला बाहेरच्या जगाशी नव्हते काही घेणे-देणे ! ही बागच त्याची सोबतीण होते. न पावलांचे ठसे, न आपल्या येण्या-जाण्याची एखादी खूण...! 

"इतके अज्ञातवासात कोणी जाते का ?" अचानक शेखरच्या तोंडून हा प्रश्न पडला.

" होऊ शकतं...! जिवंतपणी वाट्याला आलेली अवहेलना, त्रागा ! रोजच्या , विश्वासातल्या, बघण्यातल्या माणसांकडून आलेले कटू अनुभव, न संपणारा एकांत, हे सगळं कधी-कधी आपलं नातं या अबोल, पण तितक्याच सजीव प्राप्तींशी जोडते. भावनांना वाट मोकळीक मिळावी, म्हणून जी अपेक्षा माणसाकडून केली जाते, ती नाही पूर्ण झाली, की मन अश्यात गुंतवावे लागते. "

" आणि ते जे कोणी आहे, ते हयात नाहीये, हे कसे कळले तुला?" शेखरच्या आतला अधिकारी जागा झाला. 

" आजपर्यंत आलं का कुणी समोर ?" 

" नाही, पण...!"

" आपण आहोत, हे सिद्ध करण्यासाठी श्वास घेणे, हालचाल करणे, स्पर्श, आवाज, या पलीकडेही काही बाबी आहेत!"

" म्हणजे...?" ही भाषा शेखरला नवीन होती. 


" जाणिवा...! प्राण गेल्यानंतरही आपल्या आवडत्या वस्तू, वास्तू या बद्दल अपूर्ण राहिलेल्या जाणिवा माणसाला सहजासहजी हे लोक सोडून जाऊ देत नसतात. अनुभवलेले दुःख, वेदना, त्याचा प्रतिशोध घेण्याची तीव्रता माणसाला कधी-कधी भूलोकी घुटमळण्यास भाग पाडते." दोघे एका ठिकाणी उभे राहिले, बंगला समोर स्पष्ट दिसत होता.

" पण, इतक्या सुंदर जागेवर ,असे काय घडले असावे, की ज्याने याचे रूप इतके पालटले..?" शेखर अजूनही समोर निरखून पहात होता. 

"गुण, गुण बऱ्याचदा विरोध ओढवून घेतात. सुप्त शत्रूंना जन्म घालतात." 

समोरून एक वाऱ्याची झुळूक दोघांना सावध करून गेली. 

" लागूया कामाला...!" म्हणत शेखरने बंगल्याचे कुलूप फोडण्यासाठी आणलेली हतोडी बाहेर काढली. पहिला घाव बसला, तोच एक मोठा आवाज करत. कुलूप बरेच जुने, भक्कम आणि विक्षिप्त होते. ते गांजलेले होते, पण त्याच्यातले बळ मात्र कमी झाले नव्हते. ते तुटून खाली पडे पर्यंत शेखरला बराच घाम फुटला होता. 

" पाणी आणता का जरा...?" त्याने जागेवरून बाजीला बोलावले. घाई-घाईत बाजीने फाटक उघडले आणि तो आत आला. पाचोळ्यात काहीतरी हालचाल झाली. त्या बेरंगी पाचोळ्यातून एक काळाजर्द साप आला आणि बाजीच्या मार्गावर उभा राहिला. बाजीच्या तोंडून शब्दच फुटेना. जागेवर घामाच्या धारा सुरु झाल्या. 

" साहेब...!" काहीतरी घडलं हे कळताच शेखर त्याच्या बाजूने चालायला लागला. इकडे शेखर, तिकडे बाजी आणि मध्ये तो जीवघेणा भुजंग ! 

" तिथंच ठेवा, मी घेतो..." बाजीने घडा खाली ठेवला आणि त्या सापाकडे बघत तो पाठ न दाखवता तिथून चालू लागला.

" साहेब, अजून विचार करा, माझ्या मते नका जाऊ आत...!" दिगंबरने वडीलकीच्या सल्ल्याने सांगितले.

" हा आम्हाला नाही दिसला...! कदाचित आमच्या व्यतिरिक्त आत कोणी येऊ नये, म्हणून हा गडी पहारा देऊन बसलाय...!" त्याकडे शेखरने इतकं गांभीर्याने पाहिलं नाहीच. 

" जुनी बाग ए, जुनं बांधकाम आहे, असे प्राणी वावरणार न दिगंबरराव, आणि या मुक्या जीवांना काय घाबरायचं...?" त्याने घडा उचलला आणि पून्हा तो चालायला लागला. घडलेला प्रकार त्यांनी दामोदरला सांगितला. दामोदरने त्याच्या पिशवीतून एक भुकटी बाहेर काढली. ते उभे होते तिथपासून ते फाटकापर्यंत त्या भुकटीचे एक वलय तयार केले.

" साप, नाग, तत्सम सरपटणारे प्राणी या वलयात येणार नाहीत."

" कुठून शिकलात आपण हे सगळं..?" पुन्हा कुलुपाकडे वळत शेखरने दामोदरला विचारले. 

" माझे गुरु आहेत..! कोणत्याही संकटातून पहिल्या सुरक्षित स्थळापर्यंत जाता येईल, इतकं त्यांनी शिकवलं आहे. 

कुलूप धाडकन खाली जमिनीवर पडलं. त्याकडे शेखरनी निरखून पाहिलं. साधारण १५०-२०० वर्ष जुनं कुलूप, वजनाने असाधारण होतं. विशेष म्हणजे, पुढून आणि मागून अश्या चार किल्ल्या लावायची सोय होती. त्यावर तीन खटक्या होत्या. शेखरनी त्या खटक्या वर खाली करून पहिल्या. त्याने काहीच झाले नाही, तेव्हा त्याने कुलूप एका सुरक्षित स्थानी ठेवलं. जसे कुलूप तशीच कडी ! अत्यंत जड ! ती वर तर आली, पण ती बाहेर काढायला दोघांनाही बळ लागले. बराच वेळ काढल्यानंतर शेवटी दार मोठा नाद करत उघडले. 

आत पहातच दोघांचे डोळे दिपले. एक विशाल दिवाणखाना होता. रेशमी तलमी पडदे बंद खिडक्यांच्या फटीतून येणाऱ्या वाऱ्यासोबत झुलत होते. अनंतकाळापासून झाडलोट न झाल्याने धुळीने अखंड संगमरवरी फारशीचा ताबा सोडला नव्हताच. ते सहाजिक होते. एक काश्मिरी कालीन एखाद्या अजगरासारखा दिवाणखान्याच्या मध्यावर पसरला होता. वरून येणाऱ्या जिन्यापाशी तो संपला होता. त्याच्या दोन्ही कडांना सहा मोठ्या लाकडी, राजेशाही खुर्च्या आणि त्यावर झाकलेलं पांढरं कापड. कदाचित मालकालाही कळून चुकले होते, की आपला वावर दीर्घकाळ नसावा. प्रत्येक भिंतीवर तीन, अश्या तीन भिंतींना नऊ खिडक्या होत्या. डाव्या बाजूच्या खिडकीची काच तुटून आतंच पडली होती. त्यावरचे रक्ताचे डाग वाळलेले शेखरने पहिले. प्रत्येक खिडकीशी, आडोश्याला एक-एक मोठी समयी होती आणि वर भिंतीला आकड्यांनी पेटवायचे लामणदिवे. त्यांचे काळे झालेले आकडेही त्यालाच लागून होते. दिव्यांमधल्या वाती अर्धवट जळालेल्या होत्या. कोणीतरी अस्तित्वात असताना घडलेल्या आघटीताची सगळीच लक्षणे होती. पायरीपाशी थोड्या अंतरावर असलेल्या एका खुर्चीची जागा बदलली होती. तिथे कालीनावरची नक्षी ही थोडी लालसर होती. धुळीत माखली होती, तरी रंग वेगळा होता. वर छतावर असलेली झुंबरं कदाचित आजच डोलायला लागली होती. बऱ्याच वर्षांनी मुख्य दारातून हवा आत येऊन त्यांना खेळवत होती. हवेला देखील नवीन जागी प्रवेश मिळाला होता. झुबरांचा किलकिला आवाज कानाला तृप्त करत होता. 

" स्वर्ग असेल न इथे..?" दामोदरच्या प्रश्नाने शेखर भानावर आला.

" होता...!" अनावधानाने शेखरच्या तोंडून हे शब्द बाहेर पडले. खाली वाकून कालिनीचे निरीक्षण करणाऱ्या दामोदरला मागे टाकून, तो त्या जिन्यापाशी येऊन उभा राहिला. 

"वर कुणीतरी आहे...!" त्याच्या तोंडून पून्हा काहीतरी बाहेर पडले. तसा दामोदर सावध झाला. हवेने हलणारे पडदे सुखद वाटत होते, पण भीतीपण वाटत होती. उजेड होता, पण मर्यादित ! एक-एक जिना चढत शेखर वर जाऊ लागला. लाकडी कठड्यावर झालेले स्पर्श त्यात हुडहुडी भरत होते. शेवटच्या जिन्यावर भिंतीला एक दोरी टांगलेली त्याला दिसली. 

" ही कसली दोरी असावी...?" त्याने वरूनच दामोदर ला विचारले. 

" बघुयात का ओढून...?" म्हणत शेखरनेच ती दोरी ओढली.तर दारापाशी असणारी एक घंटा वाजली.तिचा आवाज मंजुळ होता. पण काय माहित, दामोदरचा थरकाप उडाला...! 


" पूर्वीच्या काळाची इशारा घंटा असेल ती ! " शेखरने ती दोरी एका खुंटीला बांधून ठेवली. त्याच्या पायाला काहीतरी लागलं. लागताच त्याचा छन-छन असा आवाज झाला. खाली वाकून त्याने ते पैंजण उचलले...! चांदी पार काळी पडली होती. थोड्याच अंतरावर दुसरेही होते. 

" इथे कोणीतरी स्त्री रहात होती...!" तो पर्यंत दामोदर वर आला. 

" हो, बंगल्यात कोणीतरी अज्ञात शिरलं असावं, आवाज होऊ नये, म्हणून तिने...!" शेखरच्या तोंडून निघालेले हे तिसरे वाक्य होते, ज्याचा मनातल्या-मनात दामोदर संदर्भ लावत होता. इच्छा असूनही त्याने शेखरला याबद्दल काही विचारले नाही. दोघांनी वरून खालचा दिवाणखाना पूर्ण पहिला. फारसे विस्कटलेले काही नव्हते, पण मानसिकता उद्धवस्त करणारे बरेच काही या बंद दाराच्या आड घडले आहे, हा अंदाज दोघांनी मांडला. वर असलेल्या सहा खोल्यांपैकी एकंच खोली अर्धी उघडी होती. 

दारावरच्या रंगापासून ते खिडकीच्या पदड्यापर्यंत, सगळेच तिथे वेगळे होते. यातल्याही खिडक्या अर्ध्या उघड्या होत्या पण धूळ कुठेही नव्हती. खोलीच्या मध्यावर एक मोठा सागवानी पलंग होता. एका कोपऱ्यात एक अरश्याचे मोठे कपाट. शेखरने त्या आरश्यात स्वतःला पाहिले. एका कडेला ओळीत खूप साऱ्या टिकल्या लावून ठेवल्या होत्या. अजुंनही त्या भक्कम चिकटल्या होत्या. त्याने कपाट उघडण्याचा प्रयत्न केला. पण त्याला बाहेरून कुलूप होते. शेजारी एका खिडकीला टेकून एक मेज आणि खुर्ची होती. वाळलेली दौत आणि बोरूही बाजूला होते. एका रेशमी रुमाला खाली एक कागद फडफडत होता. शेखरनी तो कागद बाजूला केला. तो फडफडणारा कागद अतिशय जीर्ण झाला होता. जास्त हाताळला असता, तर कदाचित त्याचे तुकडे पडले असते. त्याने बाजूची खुर्ची बाहेर ओढताच मोठा आवाज झाला. त्यावर बसून तो ते वाचू लागला. 


" जन्म नकोसा झाला, तरी श्वास सूरु आहेत, तो पर्यंत जगावं लागतं. स्वतःसाठी सुख-दुःख संपले, म्हणजे सगळेच संपले असे नाही. रावसाहेबांच्या जाण्यानंतर त्यांच्या जिवाभावाची काही मोजकी माणसं माझ्याकडून अपेक्षा लावून आहेत. त्यांची जवाबदारी आहे माझ्यावर. या वास्तूच्या आवारात अहोरात्र वावरणारी ही माणसंच आता काय ती उरली आहेत. उरल्या गावात फक्त भय, घृणा आहे. 

काळाच्या गर्भात काय असते, हे फक्त लिहिणाऱ्याला ठाऊक असते. आपण फक्त त्यावर चालु शकतो. घडणाऱ्या गोष्टींमागे माणूस आणि नियतीचा काय हेतू आहे, हे कधी उमगत नाही. खुपशे प्रश्न घेऊन देवासमोर उभे राहिले, तरी येणारा काळंच उत्तरं देईल, हे आपल्यालाही माहित असतं. जे काही घडलं , ते टाळता आलं असतं, हे घडून गेल्यावर कळलं, की वेदना तीव्र होतात. त्याने झालेले नुकसान भरून येणारं नसतं, पण ते एक सत्य म्हणून स्वीकारून पुढे चालावे लागतेच ! 

माझा एकांत हा शेवटचा सोबती उरला आहे. त्याने कमी काळात खूप काही शिकवले. गेलेल्या माणसांच्या चांगल्या आठवणीत तासनतास चिंतन करत राहणे, लिहिणे, निसर्गाशी एकरूप होऊन त्याच्याशी बोलणे, हे सगळे त्यात आलेच. डोळ्याला दिसणाऱ्या , ऐकू येणाऱ्या, आजूबाजूला वावरणाऱ्या कोणाचं विषयी माझी तक्रार नाहीये, पण त्यांना त्यांच्या मर्यादा आणि त्यांचे स्वजीवन आहेच. माझ्या एकांतातल्या जगण्याला , माझ्या शब्दांना मर्यादा नाहीये ! डोक्यात असणाऱ्या भविष्यातल्या त्या कल्पनांना मर्यादा नाहीये ! निसर्ग भरभरून देतोय, त्याला मर्यादा नाहीये ! मनातं असलेल्या त्या दुःखाला मात्र मर्यादा पडल्या आहेत. ते कमी होतंय ! कदाचित, ते आतल्या-आत विरतंय ! एखादा आजार बरा व्हावा, तसं ते बरं होतंय...! आणि मी त्यात समाधानी आहे. इतरांना ते कळण्याइतपत मी ते जाहीर नाही करू शकत. 

मी डोळ्यादेखत माझ्या जिवाभावाच्या माणसांचे पाहिलेले मृत्यू मला एक-एक श्वास देतात. आज माझ्या नासण्याने कोणाला फारसा फरक पडणार नाहीये. कपाटातून एक शिशी काढायची, आणि मृत्यूची वाट पहात पलंगावर आरामात निद्रिस्त व्हायचं.पण नियतीच्या विरोधात जाणे, म्हणजे परमेश्वराच्या विरोधात जाण्यासारखं आहे. जीव जाण्याआधी, हे सगळं विश्व कोणाच्या तरी उपयोगी पडेल, अशी व्यवस्था अजून झाली नाहीये. एखाद्या शरीरातून फक्त प्राण जाणे म्हणजे मृत्यू नाही. इहलोकाशी असलेले सगळे लागेबांधे तोडणे, प्रत्येक आवडती-नावडती गोष्ट इथल्या-इथे सोडणे म्हणजेच मृत्यू नाही. असलेल्या, येणाऱ्या सकटांतून कायमचा पळ काढणे म्हणजे मृत्यू आहे. भावनांच्या आहारी जाऊन एखाद दिवशी मी अशी गेले, तर आत्म्याला होणाऱ्या वेदना अधिक क्लेश देतील. त्याला काही दिवस अजून इथे रहायचे असल्याची सल, मृत शरीराकडे पाहून उजागर होईल. त्यापेक्षा विधीने लिहिलं आहे, तो पर्यंत सगळ्याचा सामना करत जगण्याची रोज नवी आणि सुंदर कारणे शोधणे, म्हणजे जगणे ,हे मला रावसाहेब आणि सर्जाच्या एकाचवेळी झालेल्या मृत्यूतून उमगले. अकाल मृत्यू भय निर्माण करतो. "

" किती वेदना..?" मागून दामोदरही वाचत होता. 

" भय मृत्यूचेही नाहीये, तो कसा येईल, किती त्रास देईल, किती कष्ट होतील, याचेही नाहीये. तो येईल, या एकाच सत्यात एक सुखदता दडली आहे. हे प्राण शरीर सोडून गेल्यावरच , सत्याचा खरा शोध लागतो. गत जन्मीची कर्मे समोर येऊन, पुढचा जन्म येईपर्यंत शिक्षा भोगावी लागते हे खरंय ! मग जे मी गेल्या काही दिवसात अनुभवलं आहे, तर काय होते...? "

" हे एक पान नाहीये...तिने खूप काही लिहून ठेवलं असणार...अगदी सुरवातीपासून...!" शेखरनी घाई-घाईत खालचे लागून असलेले कपाट उघडायचा प्रयत्न केला. पण ते बंद होते. 

" जगण्याची किती तीव्र इच्छा होती तिच्यात...!" दामोदर ने त्या पत्रावर तो रुमाल टाकला. 

"हो, एखाद्याचे आयुष्य खूप सुंदर असते, पण मृत्यू, प्रत्येकाचाच दुख:दायी असतो.ज्या दिवशी तिने हे लिहिलं , त्याच दिवशी तिचा...!" 

" रात्र होती...!" दामोदर च्या विधानाला शेखरने दुरुस्त केले. 

" हे तुला कसं कळलं?" 

" कोणाला चालण्याचा आवाज येऊ नये, म्हणून तिने पैंजण काढून ठेवले होते." शेखरने ते पैंजण समोरच्या मेजावर ठेवले. 

एव्हाना बरंच चित्र स्पष्ट होऊ लागलं होतं. दोघांच्या मनातली भीती केव्हाच नाहीशी झाली होती. त्या पानाची उरलेली पानं कुठे सापडतायत का, म्हणून शोध सुरु झाला. खोलीत फारसा उजेड नव्हता. खिडकी असावी, म्हणून दोन पडदे दामोदर ने बाजूला केले. त्याचा त्याच्या डोळ्यावर विश्वास बसेना.

सोन्याचं पाणी चढवलेल्या लाकडी पट्ट्यांची एक तसबीर त्यांच्या समोर उभी होती. रंगाने फारशी गोरी नव्हती, पण सावळा रंग तासबीरीत देखील उजळत होता. कोणाची कसब जास्त कसबी होती. निर्माण करणाऱ्या परमेश्वराची, की तासबीरीत तिला जशीच्या तशी उतरवणाऱ्या त्या चित्रकाराची, याचा अंदाज लागणं कठीण होतं. डोळ्यांमध्ये दाटून आलेले भाव, सुख आणि दुखातल्या मधले होते. निळसर डोळे आणि त्यावर अर्धवट झाकलेल्या गुलाबी पापण्या ! एखाद्या अर्धवट फुललेल्या पाकळी सारखे तिचे ओठही खूप सुंदर होते. उजव्या हातात तिने धरलेली बासरी अजून सापडली नव्हती. दामोदर च्या मागे उभा असलेला शेखर, तिचे ते रूप बघतच राहिला. ती होतीच तशी ! 

" हिचेच अक्षर आहे हे...!" दामोदर म्हणाला. 

" हो, इतके सुंदर , दुसऱ्या कोणाचे असूच शकत नाही."

" काय घडलं आहे, याचा छडा लावलाच पाहीजे." 

" पण, नाव नाहीये काही..!" शेखरची उत्सुकता आता वाढू लागली होती. तिथली एकही वस्तू त्यांनी सोबत घेतली नाही. पायऱ्या उतरून ते खाली आले. दुपार होत आली होती. काहीतरी ठरवून शेखर आपल्या घरी आला. पण दामोदरला त्याने एका छोट्या मोहीमेवर पाठवायचे ठरवले. सोबत बाजीही होताच. 

रात्री जेवून दामोदर आणि बाजी निघाले. आभाळ दाटून आले होते. पण हवेत गारठा असल्याने पावसाची शक्यता कमी होती. दामोदर मागे बसला. तासभर टांगा दौडत शिवपुरीच्या त्या टेकडीमागे असलेल्या जगलांत पोहोचला. 

" बाजी, रस्ता बरोबर आहे ना ?" दामोदर याआधी कधी या वाटेवर आला नव्हता. 

" हो , जवळचा रस्ता आहे. पावसापाण्याचं बरं पडतं. जंगलाच्या तोंडावर असलेलं वडाचं झाड लांबून दामोदरला दिसून आलं. भयाण शांततेत घड्यांच्या टापा, घुंगरं आणि टांग्याच्या आवाजाने अख्ख जंगल संशयास्पद वाटत होतं. टांग्याच्या पुढील आणि मागील बाजूस लागलेले मोठे कंदील फक्त डोळ्यापुढची वाट दाखवत होते. अचानक पुढचा कंदील विझला. समोर पूर्ण काळोख झाला, तरी घोडे मात्र वेग कमी करायला तयार नव्हते. 

" त्यांना दिसतंय का काही पूढे?" दामोदरला पुढचं काहीएक दिसत नव्हतं. " या रस्त्यावर आलेत का कधी तुमचे घोडे..?" 

" खाली उतरून आधी कंदील लावता का ? उगाच घोड्यांचा पाय घसरला तर आपली फजिती होईल, त्यांनाही मार लागू शकतो ! " लगाम ओढून बाजी खाली उतरला. त्याने कंदीलाचा काच काढून त्यावरची काजळी पुसली. थोडी वात वर करून त्याने काढी ओढून ती पेटवली. अचानक दोन्ही घोडे खिंखळू लागले. त्यांचे लगाम टांग्याच्या खाली पडले. काय घडतंय, हे कळायच्या आत दामोदरला त्या उजेडात काहीतरी दिसले. तसा तो मागे लावलेला कंदील घेऊन घनदाट काळ्या जंगलात पसार झाला. 

पळता-पळता त्याला धाप लागली. त्याने बाटलीतून प्यायचे पाणी काढले आणि तो पिऊ लागला. तो टेकलेल्या झाडामागून दोन हात बाहेर आले, आणि त्याचा गळा आवळू लागले. जिवाच्या आकांताने दामोदर ओरडू लागला. त्याला काहीच सुचेना. झाडामागून त्याचा गळा अवळणारा बाजी त्याला कसा दिसणार. 

" काही नाही मिळणार बंगल्यात..!" बाजीच्या आवाजात एक भयानक राकट आणि असुरी आवाज मिसळला होता. " दोघ जाल जीवानिशी. माझ्या मार्गावर जो येईल, त्याला जीवाला मुकावं लागेल, हे कळत नाही का तुम्हाला ?" 

" कोण आहेस तू..!" दामोदरला कळून चुकले, की हा मानव नाहीये. " हिमंत असेल तर समोर ये ना ! भ्याड आहेस, भ्याडासारखाच मागून हलाल करशील का ? " गळ्याभवती हात तसेच अवळते ठेऊन बाजी समोर आला. तो बाजी नव्हताच मुळी. त्या चेहऱ्यावर कोणीतरी ओरबाडल्याचे वार होते. त्याने पूर्ण चेहरा रक्ताने माखला होता. त्याचे डोळे देखील फुटले होते. अंगावरचा अंगरखा पूर्ण फाटला होता. 

" तुम्हाला फार हौस आहे न, काय घडले, ते जाणून घ्यायची." असे म्हणून त्याने दामोदरला उचलले आणि हवेत भिरकावले. दामोदर त्याच्या पासून दहा-बारा फुट जमिनीवर पडला. बाजी पाय आपटत त्याच्याकडे येऊ लागला. येऊन तो सरळ दामोदरच्या छातीवर बसला. जास्त वाट पहाण्यात काहीच अर्थ नव्हता. दामोदरनी आपल्या कमरेचा सुरा काढला आणि त्याच्या छातीत घातला. सुरा छातीत शिरताच असाह्य कळीने बाजी कळवळला. तो छातीवरून उठला, उठल्यावर त्याचा तोल जाऊन तो पडू लागला. दामोदर सावरून उठला. 

" आता बोल...!" दामोदर त्याच्याकडे पाहून बोलू लागला. पण काहीही उत्तर आले नाही. बाजीच्या आतून तो पाशवी आत्मा केव्हाच निघून गेली होती. बाजीच्या अंगातले उरलेले प्राणही तो घेऊन गेला. दामोदरने बाजीचे प्रेत उचलले, आणि तो टांग्याकडे जाऊ लागला. घोड्याने टांगा धरून ठेवला होता. दामोदरने लगाम हाती धरला आणि तृष्णा नदीच्या काठी वसलेल्या चित्रकारांच्या वस्तीच्या रस्त्याला लागला. बाजीचे प्रेत त्याने टांग्याच्या खालच्या बाजूला नीट झाकून ठेवले होते. 


खडकीतून नर्मदा वाकून आत बघत होती. एका कोपऱ्यात आनंद भिंतीवर हळू-हळू डोकं आपटून घेत होता. 

" काय झालं आनंदराव?" तिने सावधपणे विचारलं. तसं त्याने लांबून अर्धवट उघड्या खिडकीकडे पाहिलं. रांगत-रांगत तो खिडकीपाशी आला. 

" पाणी पाजता का मला...?" 

" हो, तुमचा तांब्या द्या..! " आनंद तसाच जाऊन तांब्या घेऊन खिडकीशी आला. त्यात असलेलं पाणी नर्मदेने खाली ओतलं. ते पूर्ण काळ झालं होतं. वर येण्यास इतरांना परवानगी नव्हती. नर्मदेनी तांब्या वरून खाली टाकला आणि पुन्हा खिडकीत आली. 

" माझ्यावर इतका का अत्याचार चालला आहे?" आनंद अक्षरशः रडकुंडीला आला आहे. " अंगाचा दाह होतो आहे, कोणता असाध्य आजार झाला आहे मला, ते तरी सांगा...!"नर्मदेच्याही डोळ्यांत पाणी आलं. "आजार असता, तर आत्तापर्यंत बरा झाला असता...! आनंदराव, थोडा धीर धरा. हे सगळं जे काही चाललंय, त्यात तुमचा दोष नाहीये, तुम्ही फक्त शिक्षा भोगताय...!" 

"कशाची? "

" आनंदराव, तुमचा जन्म झाला तेव्हा मी वाड्यावर होते. जे घडलं, ते माझ्यासमोर घडलं...!" 

" काय घडलं..?" खच्ची झालेला आनंद कान देऊन ऐकू लागला. 

" तुमच्या आईंना कळा सुरु झाल्या आणि विठोबा मला बोलवायला आला. पंतांची फार इच्छा होती, कि आजची रात्र टाळून तुम्ही जन्माला यावं. अमावस्या होती ! कीर्तिकर बुवा पण येऊन बसले होते...!"

" पंत, जे होतं आहे, त्याला तुम्ही आणि मी काहीही करू शकत नाही. हजारो पोरं जन्माला आली असतील आज."

" तुम्हाला कळत कसं नाहीये, आहो हा परम अनिष्ठतेचा काळ आहे."

" पंत, जर आपण आत्ता यात काही गोंधळ केला, तर वहिनींच्या जीवावर बेतू शकतं.


खडकीतून नर्मदा वाकून आत बघत होती. एका कोपऱ्यात आनंद भिंतीवर हळू-हळू डोकं आपटून घेत होता. 

" काय झालं आनंदराव?" तिने सावधपणे विचारलं. तसं त्याने लांबून अर्धवट उघड्या खिडकीकडे पाहिलं. रांगत-रांगत तो खिडकीपाशी आला. 

" पाणी पाजता का मला...?" 

" हो, तुमचा तांब्या द्या..! " आनंद तसाच जाऊन तांब्या घेऊन खिडकीशी आला. त्यात असलेलं पाणी नर्मदेने खाली ओतलं. ते पूर्ण काळ झालं होतं. वर येण्यास इतरांना परवानगी नव्हती. नर्मदेनी तांब्या वरून खाली टाकला आणि पुन्हा खिडकीत आली. 

" माझ्यावर इतका का अत्याचार चालला आहे?" आनंद अक्षरशः रडकुंडीला आला आहे. " अंगाचा दाह होतो आहे, कोणता असाध्य आजार झाला आहे मला, ते तरी सांगा...!"नर्मदेच्याही डोळ्यांत पाणी आलं. "आजार असता, तर आत्तापर्यंत बरा झाला असता...! आनंदराव, थोडा धीर धरा. हे सगळं जे काही चाललंय, त्यात तुमचा दोष नाहीये, तुम्ही फक्त शिक्षा भोगताय...!" 

"कशाची? "

" आनंदराव, तुमचा जन्म झाला तेव्हा मी वाड्यावर होते. जे घडलं, ते माझ्यासमोर घडलं...!" 

" काय घडलं..?" खच्ची झालेला आनंद कान देऊन ऐकू लागला. 

" तुमच्या आईंना कळा सुरु झाल्या आणि विठोबा मला बोलवायला आला. पंतांची फार इच्छा होती, कि आजची रात्र टाळून तुम्ही जन्माला यावं. अमावस्या होती ! कीर्तिकर बुवा पण येऊन बसले होते...!"

" पंत, जे होतं आहे, त्याला तुम्ही आणि मी काहीही करू शकत नाही. हजारो पोरं जन्माला आली असतील आज."

" तुम्हाला कळत कसं नाहीये, आहो हा परम अनिष्ठतेचा काळ आहे."

" पंत, जर आपण आत्ता यात काही गोंधळ केला, तर वहिनींच्या जीवावर बेतू शकतं. जे होतं आहे, ते होऊ द्या...!" 

" असं कसं, तुम्हीच म्हणालात न, या अनिष्ट काळात कुंडल्या असुरांच्या अधीन असतात म्हणून. आणि असा वेळ किती उरलाय ?" 

" पंत, नका थांबू, बाळ आणि आई, दोघही वाचणार नाहीत अश्याने, पुढचं पुढे पाहू...!" 

बाळाच्या टाहोंनी वाडा दुमदुमला. सुमन व्यवस्थित सुटली. बाळ व्यवस्थित, निरोगी होते. सगळे आत होते. पंत आणि कीर्तिकर बाहेर दिवाणखान्यात होते. बरोबर मध्यरात्रीच्या थोडा आधी आनंदचा जन्म झाला. दाराची कडी वाजली. एवढ्या रात्री कोण आलंय, या विचाराने दोघे घाबरले. हातात मोठी काठी घेऊन पंतांनी दरवाजा अर्धाच उघडला. बाहेर कुणीच नव्हते. पंतांनी चुबाजूने नजर टाकली. देवडीपर्यंत गेले. कुणीच नव्हतं...! परत येताना त्यांना एका मोठ्या झाडावर घुबड बसलेलं दिसलं.ते शांत होतं. पंत परत आत येण्यास निघाले. त्यांच्या पायाला एक फटका कापडाचा तुकडा लागला. कंदिलाच्या उजेडात त्यांनी तो उचलला आणि एकदम ओरडले..." बुवा...बुवा...!" होते तसे बुवा बाहेर आले. तो कापडाचा तुकडा त्यांनी आपल्या हातात घेतला. 

' तो आमचा आहे. आमचाच अधिकार आहे त्याच्यावर. यथावकाश आम्ही त्याला घेऊन जाऊ. तो पर्यंत त्याच्या जीवाचं काही बरं-वाईट होणार नाही, याची काळजी घ्या.त्याला काही झालं, तर तुमचे अख्खे कुळ नष्ट होईल. अशीच कुंडली आहे त्याची...!'

तो कागद घेऊन दोघे आत आले. त्या अंधारात काही कुंडली काढणे शक्य नव्हते. अख्खी रात्र सगळ्यांनी जागून काढ़ली. 

नर्मदेचे आश्रू थांबतच नव्हते. 

" विलायतेत तुम्ही गेलात, तेव्हा इथे तुमच्या आई-बापाने खूप वाईट दिवस काढले. प्रत्येक देव, प्रत्येक धर्म केला...!" 

" मला अजून का नाही सांगितलं त्यांनी...?" आनंद समोर एक-एक पान आता उघडू लागलं होतं. 

" भय...! प्रसंग समोर आला, कि माणूस हात-पाय मारतो.पण अघटीताचे भान आधीच माणसाला दिले, तर भीती विचार करू देत नाही आनंदराव. भीती, राग, लोभ हे विचारशक्तीला आधीच मारून टाकतात." 

" आता...पुढे...!" 

" तुम्हाला आम्ही काही होऊ देणार नाही. पण तो तुमच्या आत आहे. तो तुमच्याकडून , त्याला करायचं आहे, ते करून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करेल...!" 

" पण कोण करतंय हे सगळं..?"

" आनंदराव, या शत्रूला नाव, गाव, पत्ता काहीच नसतं. याला फक्त ध्येय असतं..! हेतू असतो लोकांना त्रास द्यायचा, जीव घ्यायचा. कीर्तिकर आहेत त्याच्या मागावर. ते गेलेत मुंबईला...!"

आनंदला एकदम लेखाची आठवण झाली. त्याला जास्तच असवस्थ वाटू लागले. त्याचा श्वास कोंडु लागला. 

" लेखा...?"

" आनंदराव, त्याने पाहिलेच सांगितलं होतं, त्याच्या मार्गावर येईल, त्याला त्रास होईल !" 

विलायतेत वर्षभरापूर्वी घडलेलं सगळं आनंदला आठवलं. घरच्यांनी जास्तच हट्ट केल्यामुळे, आनंद एकटाच घर घेऊन रहात होता. लेखाशी त्याची वाढलेली ओळख, हा एकच आधार त्याच्याकडे होता. भेटी वाढत होत्या, त्याची रूपांतर प्रेमात कसे झाले , हे त्याला कळले नाहीच.

त्याचा वाढदिवस त्या दोघांनी खूप आनंदात साजरा केला. जेवून आनंद आपल्या घरी परतत होता. अर्धी रात्र उलटून गेली होती. 

" थांब...!" सुनसान रस्त्यावर अचानक मराठीत आलेल्या या हाकेमुळे आनंद थोडा गोंधळला. 

" कोण...?" त्याने चारी बाजूला पाहिलं. कोणीच नव्हतं. 

" बाहेर नाही, आत आहे मी तुझ्या..!"

" उगाच काही बोलू नका. कोण असेल ते समोर या..!" काहीच हालचाल झाली नाही. अचानक त्याच्या नाकातून रक्ताची धार लागली. रक्ताचे थेंब खाली पडू लागले. अंगातले रक्त दुप्पट वेगाने प्रवाहित होऊ लागल्याचा अंदाज त्याला झाला. अश्यात कोणीतरी त्याच्या हातावर धारदार नखाने ओरबाडू लागलं. 

" कोण ए...कोण आहेस कोण तू?" आता मात्र आनंद घाबरला. 

" बोललो ना, मी तुझ्या आतच आहे. तू माझा वर्तमान आहेस, आणि मी तुझा भूतकाळ...!" काहीतरी आनंदच्या अंगात शिरू पहात होतं. त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली. एक-एक करून त्याच्या अंगावरचे कपडे फाटू लागले. त्याकब्या शरीरापेक्षा मोठी, त्या परावलंबी गोष्टीची व्याप्ती मोठी होती. तो रस्त्यावरच कोसळला.

डोळे उघडले तेव्हा तो एका दवाखान्यात होता. बाजूला लेखा बसली होती. " काही लोकांनी तुम्हाला इथे आणलं. खिशातल्या डायरीमुळे माझा पत्ता मिळाला या लोकांना म्हणून बरं झालं. घडलेलं सगळं आनंदने लेखाला सांगितलं. संध्याकाळी दोघे बाहेर निघाले. लेखा त्याला एका चर्च मध्ये घेऊन आली. 

" तुमच्यावर एका अज्ञात आत्म्याची दुष्ट सावली पडली आहे." पादरीच्या या वाक्याने दोघांच्या पाचावर धारण बसली. " आणि ते काय आहे, हे कोणालाही सांगता येणार नाहीये." 

"पण तुम्ही इतक्या खात्रीने कसे सांगू शकता?" लेखाने त्यांना विचारले. पादरीने हातात धरलेला पावित्र क्रॉस समोर केला. 

"ही परमेश्वराची पवित्र स्मृती उजव्या हातात धरा...!" आनंदने हात पुढे केला. पण त्याचा हात जागचा हलला नाही. खांद्यापासून तळव्यापर्यंतच्या शरीराची पूर्ण संवेदना नाहीशी झाली. त्याला घाम फुटला. "घ्या...घ्या ना...!" पादरी पून्हा नम्र आवाजात बोलू लागले. तरीही आनंदचा हात वर येत नव्हता. 

"नाही धरता येणार ! ईश्वर प्रचंड पवित्र शक्ती आहे. मनात किंवा शरीरात पाप, त्याच्या बद्दल संशय, किंतु, किंवा शरीरात त्याचा विरोध किंवा त्याला घाबरणारी शक्ती असली, की असं होतं." 

" मग..त्या शक्तीला आपण काढू...!"

" नाही, ती शक्ती फक्त तिच्या मूळ स्थानी पोहोचली तरंच निघू शकेल. पण तिथे पोहोचल्यावर , किंवा तिचे काम झाल्यावर ती या शरीराचा नायनाट ही करू शकेल हे लक्षात असू द्या. एकदा त्याचं इस्पित साध्य झालं, की त्याला हे शरीर काही कामाचं नाहीच. पण जो पर्यंत तो तिथे पोहोचत नाही, तो पर्यंत तो तुझे नुकसान होऊ देणार नाही. मुली, याला जप." 

आपल्या कर्माची शिक्षा लेखाला मिळते आहे, हे पाहून आनंद अधिक विचलित झाला. 

" मावशी...! ते माझ्या अंगात आहे, माझं जे व्हायचं ते होऊ देत, पण लेखाला कशाला याचा त्रास. मी बाहेर निघून याचा सामना करायला तयार आहे." त्याने नर्मदेला सांगितलं. 

" पण आम्ही नाहीये तयार...!" मागून पाणी घेऊन पंत आले. "कोण ती मुलगी...? आम्ही कधी पाहिली नाही...काही संबंध नाही...!" 

"पंत, काय बोलताय तुम्ही...!" आनंदने आतूनच पंतांना विचारले. 

" खरंय, नर्मदे, सांग याला, जो पर्यंत तू इथे आहेस, तो पर्यंत सुरक्षित आहेस. कीर्तिकर आले, की यातून तुझी कायमची सुटका 

करू तुझी. त्या मुलीचं जे होईल, त्याच्याशी आम्हाला काही घेणं -देणं नाहीये...!"

" पंत, माझ्यामुळे तिचा जीव धोक्यात आहे, कळतंय का तुम्हाला?" आनंद आता बापाच्या स्वार्थावर चिडू लागला. 

" असेल, त्याच्याशी आम्हाला घेणं-देणं नाहीये. तू आमचा एकुलता-एक आहेस. सात पिढ्या पुरेल, इतकी ही जायदाद त्या मुलीमुळे आम्ही वेवारशी नाही सोडू शकत. तुझ्यात जिव असला, तर या सगळ्याचा उपभोग तुला घेता येईल. मुली काय छप्पन मिळतील...!" 

पंतांचे हे रूप आनंदनी कधी पाहिलेच नव्हते. " पंत...! त्या मुलीचा पण बाप आहे , त्यालाही काळीज आहे हे लक्षात असू द्या...!" 

" आणि तुझ्या आणि माझ्या मागे ही अफाट संपत्ती आणि जवाबदारी आहे, हे तू लक्षात ठेव..!" त्यांनी धाडकन खिडकी लावली. 

" पंत, पोराचा जिव आहे त्या मुलीत." नर्मदेने त्यांची समजून काढण्याचा प्रयत्न केला. 

" मूर्ख आहे तो...वास्तवाचे भान नाहीये. त्याचं काही बरं-वाईट झालं, तर पूर्वज्यांनी कमावलेल्या या वाड्याचं, अफाट संपत्तीचं काय करायचं. आणि हे सगळं त्या मुलीच्या आणि याच्या फालतू प्रेम-कहाणी च्या नादाला लागून मी वाऱ्यावर नाही सोडू शकत...!" जात असलेले पंत मागे फिरले. " तुलाही एक सांगून ठेवतो,स्वतःची अक्कल चालवशील, तर गावाबाहेर हाकलून लावेल तुलाही...!" पंत जिना उतरून निघून गेले. 

लेखा निपचित पलंगावर पडून होती. तिच्या अर्धवट उघड्या डोळ्याने आनंदची वाट बघत होती. शरीर काहीच प्रतिक्रिया देत नव्हतं , क्रियाही करत नव्हतं. काशी तीनदा येऊन खाऊ घालून जात होती. पण दिवसेंदिवस तिचे शरीर कृश होत चालले होते. तिच्या चेहऱ्याचे तेज कुठच्या कुठे निघून गेले होते. भर दिवसा ,उघड्या डोळ्याने बघता यावे, इतके तेज सूर्याचे कोमेजून जावे, तसेच काहीतरी होते. 

तिसऱ्या दिवशी उशिरा दामोदर शेखर समोर उभा ठाकला. बाजीचा मृतदेह पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. त्याच्यावर रात्रीतून अंत्यसंस्कार करण्यात आले. 

"माया...! माया नाव होतं तिचं...!" दामोदर ने शेखरला वस्तीवरून आणलेली सगळी माहिती दिली. 

" त्या नराधमाच्या क्रौर्तेला ती बळी पडली. अख्ख्या गावाला माहिती होतं, पण साधे तिचे कर्म करायला कोणी धजावलं नाही." पिशवी घेऊन दामोदर त्याच्या घरी जायला निघाला. 

" आपण करूयात...!" जाता-जाता दामोदर थांबला. 

" कशासाठी ? तुमचा संबंधच काय तिच्याशी?" 

" तुम्हाला अजून वाटतं, की माझा याच्याशी काहीही संबंध नाही? त्या बंगल्यात जाऊन ,आपण सुखरूप परत आलो ! आणि हे...?" दामोदर च्या कमरेला टांगलेलं खंजीर त्याने बाहेर काढलं. " आणि तुमच्या शास्त्रात लिहिलं आहे ना, कर्म झाले नाही तर आत्म्याला गती मिळत नाही म्हणून..!" शेखरने मनाशी काहीतरी ठरवले होते. 

" आणि बाजीचा मृत्यू, त्याच्या जागी आज माझे अंत्यसंस्कार करावे लागले असते तुम्हाला." बाजूची खुर्ची ओढून दामोदर बसला. " वाटतं तितकं सोपं नाहीये हे सगळं...! ती आता त्या तसबीरीत दिसते, तशी नाहीये. प्रेतयोनीत अडकलेली एक अतृप्त आत्मा झालेली आहे ती, जी तिच्या मार्गावर येणाऱ्या प्रत्येकाला मारत सुटली आहे." 

" नाही , तुमच्यावर आणि बाजीवर हल्ला तिने नसेल केला. " 

" आणि हे तुम्ही खात्रीने सांगू शकता...?" दामोदर ला शेखरला यापासून परावृत्त करायचे होते. 

" हो, ती कोणाला मारू नाही शकत, कारण ती तिच्या ठिकाणांहून बाहेर पडू शकत नाही..!" शेखरच्या सांगण्यात आत्मविश्वास होता. 

" जरा अजून विस्तारित करून सांगाल का?" दामोदरला काही कळत नव्हतं. 

" तुमच्या अभ्यासानुसार मनुष्याचा जसा जन्म असतो, तसेच भोग त्याच्या वाट्याला येतात."

" हो , कलियुग याच धोरणावर चाललंय. अजूनतरी ! " 

"मग...! हिच्या वाट्याला असलं आयुष्य का ? ती का नाही सुटली यातून? तुम्ही पहिली न तिची तसबीर, तुम्हाला वाटलं का, हिच्या हातून काही अपराध, गुन्हे घडले असतील ? " शेखर त्या खांजीराकडे पाहून बोलला. 

" साहेब, आपल्याला डोळ्यासमोर जे घडतंय, ते आपण पहातोय, त्याकाळी जे घडलं, ते सगळे आपल्याला माहित नाहीये ना ! तिचे एखादे कार्य राहिले असेल, म्हणून मुक्ती नसेल मिळाली, किंवा, तिनेच स्वतःला बांधून ठेवलं असेल...!" 

हा वाद न संपणारा होता. तो दुसऱ्या दिवसांवर ढकलून दोघे विश्रांतीसाठी आपल्या ठिकाणी पोहोचले. 

....

मुंबईला झालेल्या दगदगिने कीर्तिकर थोडे आजारी होते. दुपारी त्याच्या घराच्या मागील अंगणात ते पहुडले होते. शिवपुरीला जाऊन शहानिशा करणे गरजेचे होते. पण तिथे त्यांनी जाऊन खरंच उपयोग होता का? ना ओळख, न पाळख..! कोणास काय विचारावे, हे सुद्धा कळत नव्हते. एक गोष्ट त्यांना पूर्ण ठाऊक होती ! लेखाचा जीव धोक्यात नव्हता. तिच्याद्वारे कोणीतरी काहीतरी सांगायचा प्रयत्न करीत होते. 

" मुंबईला जाऊन काही हाती लागले नाही. त्या पोरीच्या दुखण्यात मात्र भर पडली. " नंदा त्यांच्या जवळ येऊन बसली. 

" पंतांचा पोरगा आणि ती पोरगी, त्रास दोघांना होतो आहे. पण कोणामुळे, कशामुळे हे अजून समोर नाही आलेले."

" आपण पंतांना जाऊन भेटावे." नंदाने त्यांना सल्ला दिला. पुढच्या दारातून तोच खबऱ्या पून्हा आत येताना दोघांना दिसला. पंताच्याकडून पत्र होतं. त्यांना ताबडतोब त्यांनी वाड्यावर बोलावले होते. 

पहाटे पंत वाड्यावर पोहोचले. देवडीवरूनच त्यांची नजर वरच्या खोलीकडे गेली. एक वेगळा आणि याआधी कधीही न अनुभवलेला एक वास त्यांना आला. वाड्यात याआधी इतकी शांतता कधीच नव्हती. माणसाच्या प्रत्येक चाहुली सोबत एक अज्ञात चाहूल होती. होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर कोणीतरी बारीक नजर ठेवून होतं. हरेक सजीव-निर्जीव एका धाकाखाली जगत होते. अंगणातली तुळस जळत चालली होती. इतर झाडंही त्याच मार्गावर होते. एकही जनावर वाड्याच्या आसपास फिरत नव्हते. दिसत नसल्या, तरी अस्पष्ट काळ्या सावल्या प्रत्येक कोपऱ्यात आपलं बस्तान बसवून होत्या. वाऱ्यानेही आपला वेग थोडा कमी केला होताच. पावसाचेच दिवस होते. विजा वाड्याच्या रोखाने मुख करून चमकत होत्या. 

'कोण असले हा?' किर्तीकरांनी मनालाच प्रश्न केला. 'मानवी उपचारांच्या अधीन असेल, तर बरं आहे...! नाहीतर....!' किर्तीकरांनी त्याचे शब्द आठवले. ' अख्ख्या कुळाचा नायनाट.' पिशवीतून लपवून आणलेला नारळ त्यांनी थरथरत्या हातांनी बाहेर काढला. तळहातावर घेऊन, ते एक-एक पाऊल चालू लागले. जसं-जसं वाड्याच्या वास्तूचं अंतर कमी होत होतं, ते नारळ शेंडीकडून थोडं-थोडं जळत होतं. त्याच्या तापाने किर्तीकरांचा तळवा भाजू लागला. पण ते घाबरले नाही. कारण पुढे घरात त्यांची वाट बघणारं संकट अधिक भयावह होतं. वाड्याच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवताच, ते नारळ फुटलं आणि आतून काळं पाणी वाहू लागलं. त्यांच्या हातून नारळ खाली पडलं. 

" हे परमेश्वरा, तूझ्या इच्छेविरुद्ध घडतंय रे हे सगळं...!" ते देवाचा धावा करू लागले. "हे निसर्ग-नियमाच्या विरुद्ध आहे. आम्ही फक्त माणसं आहोत. या शक्तीशी लढण्याचे बळ दे आम्हाला...देवा!" आणि त्यांनी दुसरा पाय वर ठेवला. 

आतापर्यंत शांत असलेला वाडा, अचानक एका मोठ्या ,किळसवाण्या आवाजाने दुमदुमला. कोणीतरी अफाट वेदनेने ओरडू लागले. पंत, सुमन, नर्मदा, सगळेच बाहेर आले. बाहेर पायरीवर उभे असलेले कीर्तिकर आणि फुटक्या नारळातुन वाहणारे काळे पाणी त्यांनी पाहिले. सगळे त्यांच्या आजू-बाजूला गोळा झाले. कीर्तिकर वर पहात होते. आनंद जोरजोराने विव्हळत होता. सगळ्यांचीच तोंडं कोरडी पडली. त्या अंधारल्या खोलीत सुरु असलेला दोन वेगळ्या सावल्यांचा खेळ सगळ्यांना खालून दिसत होता. 

" बुवा, काहीतरी करा, थांबवा हे सगळं...सगळं संपून जाईल हो..!" सुमन त्यांच्या विनवण्या करू लागली. वर बघतच कीर्तिकर बोलले. 

" शिवपुरी...! तिथेच काय उत्तरं मिळायची ती मिळतील." आणि वाड्यात शिवपुरीला जायची तयारी सुरु झाली. नर्मदेने झोपडीत जाऊन अर्धा पोतं हळद आणली. चुलीवर पाणी ठेवले गेले. त्यात हळद आणि मीठ टाकले गेले. 

" मीठ म्हणजे हवा, पाणी आणि सूर्याच्या तेजाने बनलेले आहे, ज्यात सगळीच पंचमहाभूते आहेत. या पाण्याने सगळ्यांनी अंघोकी करा. लक्षात असू द्या. प्रवास लांबचा आणि धोकादायक आहे." नर्मदा सांगू लागली. इकडे किर्तीकरांनी गायीचे तूप काही गौऱ्यांवर टाकले आणि दोन दगडांच्या आधारावर चूल उभी केली. त्यावर भात शिजायला ठेवला. " मार्गात पिशाच्च लागतील, प्रत्येकाला या भाताचा घास देऊन, त्याला शांत करावं लागेल. प्रत्येकाने स्वतपाशी एक-एक शस्त्र ठेवा. त्याला हे लावा." त्यांनी आणलेली लिंबं त्यांनी सगळ्यांना दिली. सुमन व्यतिरिक्त सगळेच जाणार होते. 

" आम्ही वाड्याच्या बाहेर पडताच गोमूत्र आणि गंगेच्या पाण्याने सडा घाला. तुळशीपाशी दिवा लावा. तुळस अजून पूर्ण मेली नाहीये. ती जगवावी लागेल, कारण तिच्या ठिकाणी देवाचा वास असतो." किर्तीकरांनी पंचांग पहिले. ज्या चांगल्या मुहूर्तावर ,आनंदच्या प्रबळ स्थानी चांगले ग्रह असतील, त्याच मुहूर्तावर निघावे लागणार होते. त्यांच्या प्रबल्याने अनिष्ठता कमजोर पडणार होती. विठोबाने पागेतून दोन चांगले घोडे आणून वाड्याबाहेर बांधले. दोन दिवसांनी मुहूर्त निघाला. मध्यरात्री नंतर घुबड पेंगु लागला, की बाहेर पडायचं ,हे ठरलं. पुढची दोन दिवस हातात होती. पाऊस सुरूच होता. 

मध्यरात्र उलटू लागली. आभाळात चांदणं ढगाड होतं. विठोबानी पंजऱ्यात कोंडून ठेवलेलं घुबड पेंगु लागल्याची वाट सगळे बघत होते. डोळ्यांत तेल घालून सगळेच बसले होते. घुबडानी पिंजऱ्यात मान टाकली. तसा विठोबा उठला. देवडीच्या बाहेर येऊन त्याने घोडे टांग्याच्या खाली घातले. नर्मदा जिना चालून गेली आणि आनंदच्या खोलीचं कुलूप काढलं. हातात कंदील होता. आनंद पलंगावर बसला होता. नर्मदेने सांगितल्यावर तो मुकाट्याने उठला. तिच्या मागोमाग चालू लागला. तो अंगाने पूर्ण क्षीण झाला होता. जिन्याखाली उभ्या सुमननी पोराला डोळेभरून पाहिले. लांबूनच. शेजारी पंत देखील उभे होते. " बुवा, पोरगं तुमच्या स्वाधीन करतोय, त्याला होता तसा, नाहीतर आहे तसातरी परत आणा." कीर्तिकर काहीच बोलले नाही. आज १०-१५ दिवसांनी आनंदाचे पाय वाड्याबाहेर पडले होते. हळू-हळू एक-एक पाऊल बाहेर पडत होते. विठोबा टांगा घेऊन तयार होता. सगळे बसले. आनंदला बांधून ठेवण्यात आलं. टापांचा आवाज घुमवत टांगा शिवपुरीच्या दिशेने निघाला.

........

पिंजऱ्यात पेंगुन पडलेलं घुबड अचानक उठून ओरडू लागलं. त्याच्या बाजूला बसलेली रुक्मि सावध झाली. 

" पंत...पंत...!" अजूनही बाहेर उभे असलेले पंत या आरोळीने मध्ये धावत आले. पिंजऱ्यात घुबड जागं होऊन ओरडू लागलं होतं. पहाटेच्या पाहिल्या प्रहराचा अंदाज पार चुकला होता. पंतांना घाम फुटला. आनंदला झपाटणाऱ्याने मोठा दगा केला होता. मध्यरात्र अजून तेवत होती, तोच त्याने किर्तीकरांना आणि नर्मदेला उठवुन गावच्या वेशीबाहेर काढले होते. 

" काय मग...! शिवापुरीला जायचंय का ?" गुडघ्यात डोकं खुपसून बसलेला आनंद बोलू लागला. नर्मदेच्या अंगावर सरसरून काटा आला. "याला वाचवायला निघालात दोघे...? कसं शक्य आहे...?" अचानक घोड्यांचा वेग वाढला, ते दुप्पट वेगाने धावू लागले. आनंद कुत्सित हसू लागला. " बुवा, बोललो होतो न मी, हा आमचा आहे...!" 

" नाहीये तो तुझा...!" कीर्तिकर सावध झाले. " तू जे कुणि आहेस, हे जग तुझं नाहीये...!" 

" आमचं हे जग कधीच नव्हतं बुवा. माणसं लाचार असतात, जगण्यासाठी धडपड करत असतात. एक-एका श्वासाठी झुंजत असतात. आमचं तसं नाहीये...! आमचं ठरलेलं असतं सगळं. शरीराने, मनाने , भीतीने माणूस गंजला, की आम्ही त्याच्यावर हावी होतो." 

" नियतीच्या विरोधात जाऊ नकोस, नायनाट होईल तुझा...!" 

" आपलं बघा बुवा...आणि टांग्यात असलेल्या या दोघांचं ! काय संबंध तुमचा इथे...! याची कुंडली तुम्ही पहिली आहे न ? तरी जिवाच्या आकांताने याला वाचवायला निघालात !" टांगा वेगात धावत होता. विठोबाने लगाम घट्ट धरून ठेवला होता. 

" माझं काम होत नाही, तो पर्यंत हा माझ्या सोबत...नंतर याचाही...!" 

" ते मी नाही होऊ देणार...लक्षात असू दे, ज्याने जन्म घेतला आहे, त्याला कधीतरी मृत्यूलोक सोडून जावे लागतेच. तुझे नरकातले भोग तुझी वाट बघतायत."

" माझ्या वाटच्या यातना, ती पोरगी भोगते आहे ना ! " आनंदच्या आतला दानव हसू लागला. " तिचे शरीर कुठे तिचे राहिले आहे ? तुम्ही पाहिलंत न बुवा..! आणि हो, तुम्ही याला वाचवायला शिवापुरीला चाललात...! पण तिथेच याचा अंत आहे.!" 

" म्हणजे...!" किर्तीकरांनाही स्पष्ट ऐकायचं होतं. 

" तुमची ती नियती आणि तुमचे ग्रह, माणसाला त्याचा मृत्यू असेल, तिथे घेऊन जातात नं बुवा...?" 

" त्याचा अंत तिथेच आहे. काय कमाल आहे न बुवा...! ज्याला वाचवण्याचा आटापिटा करता आहात, त्याला मृत्यूच्या दाढेत स्वतः टांगा जुंपून घेऊन जाता आहात...!" 

विठोबा सगळं ऐकत होता. त्याने लगाम ओढून टांगा वळवायचा प्रयत्न केला. पण काही उपयोग होत नव्हता. टांगा त्याच्या ताब्यातून केव्हाच सुटला होता. भरधाव वेगाने तो धावत सुटला होता. किर्तीकरांचा अभ्यास, नर्मदेचे आनंदला वाचवायचे प्रयत्न घोड्यांच्या टापाखाली चिरडले जात होते. 

" तुला कळलं होतं...! वेशीबाहेर निघायचं नाही, हे तूच बोलली होतीस.पण शेवटी नशिबाने याला वेशीबाहेर काढलंच ना...पटलं न आता...! खेळ मी रचला होता.तुम्ही फक्त मोहरे म्हणून कामी आलात...!"

......

शिवपुरीच्या जंगलात एक टांगा अढळून आला. टांगा नुकताच मोडला होता. घोडे इतरत्र फिरत होते. तिथून जाणाऱ्या काही गावकऱ्यांनी पोलिसांना वर्दी दिली. दिगंबर ला घेऊन शेखर तिथे पोहोचला. टांगा पूर्ण मोडला होता. चाकं निखळून बाहेर पडली होती. घोड्यांच्या गळ्यातले लगाम देखील सुटून रस्त्यावर पडले होते. 

" दरोडेखोरांचं काम दिसतंय !" शेखरने अंदाज लावला. 

" नाही साहेब...सामान आणि घोडे आहे तिथेच आहेत." दिगंबरच्या बोलण्यात सुद्धा तथ्य होतं. टांग्यावर कोणाचेच नाव नव्हते. 

" टांग्याच्या पार भुगा केलाय करणाऱ्याने...!" प्रत्येक वेगवेगळा भाग न्याहाळत दिगंबर बोलत होता. 

" हो , पण त्यातली माणसं कुठे गेली?" 

" क्रांतिकारी पण नाहीयेत. घोडे घ्या आपल्या सोबत. आणि ते समान सुद्धा." दोन माणसांनी सगळं सामान टांग्याच्याच घोड्यावर लादलं आणि गावाकडे निघाले. गावात चौफेर माणसं फिरून तपास करायला लागली. मंदिरं, धर्मशाळा सगळीकडे फिरली. कोणत्याही नवीन माणसाचा तपास लागला नाही. कोणीतरी शिवापुरीला येताना हा प्रकार घडलेला होता. पूर्ण गावात वणवा पसरला. लोक घाबरून जाऊ नये, म्हणून गस्ती वाढवल्या. त्या रात्री एका अज्ञाताला शोधण्याच्या नादात, कोणीच घरी गेलं नाही. 

अर्धी रात्र उलटली. गावातल्या एका जुन्या गल्लीत कोणाच्या तरी चालण्याची चाहूल लागली. घराच्या ओट्यावर गस्तीवर फिरणाऱ्या काही पोरांना लांबून काहीतरी चालत येताना दिसलं. अत्यंत जड पावलं होती त्याची. रात्री स्पष्ट दिसत नव्हते, आणि सारख्या ठेचा लागत होत्या. त्यामुळे तो अडखळत चालत होतं. पोरं सावध झाली. एकाने हातात मशाल धरली आणि धीटपणे पुढे चालत गेला. 

" कुठलं हो पावनं तुम्ही?" त्याने लांबूनच विचारलं. "कोणाकडे जायचं आहे." काहीच उत्तर आलं नाही. त्या पोराने पेटली मशाल त्याच्या चेहऱ्याजवळ धरली आणि त्याला धक्काच बसला. लांबून त्याच्याकडे बघत असलेल्या इतरांना तोडक्या उजेडात कोणीतरी तडफडत जमिनीवर पडलेलं दिसलं. त्यांनी हत्यारं आणि मशाली जमा करायच्या आत प्रेताच्या बाजूला उभी असलेली दुसरी आकृती अंधारात नाहीशी झाली. 

प्रेताची अवस्था अत्यंत छिन्न झाली होती. पूर्ण चेहऱ्यावर एखाद्या हिंस्त्र श्वापदाने नखाने अक्षरशः मांस ओरबाडून काढले होते. डोळेही बाहेर आले होते. छाती फाडून हृदयापर्यंत त्याचे हात गेले होते. हे सगळे क्षणात झाले होते. सगळ्यांनाच घाम फुटला. आल्या पाऊली सगळेच मागे सरकले. स्वतःच्या सावलीलाच घाबरू लागले. मोजून चार जण, त्यातला एक गेला होता. 

गावाच्या मुख्य चौकात चार प्रेतं पाहिल्यावर सगळ्यांचीच तारांबळ उडाली. शेखर आपल्या दलासह तिथे दाखल झाला. मेलेल्यांच्या घरचा अक्रोश मनाला भोकं पडणारा होता. मृत्यूच्या कारणापेक्षा मारणारा किती क्रूर होता, याचा पुरावा प्रेतांची झालेली दुरावस्था दाखवत होती. 

"साहेब , जंगलातून लांडगं आलं असतील!" एका वृद्ध जाणकाराने आपलं मत मांडलं." वाघ...नाही, कित्ती वर्ष झाले, वाघ नाहीये जगलांत." दुसरा एकजण बोलला. हा-हा म्हणता अख्खा गाव तिथे गोळा झाला. प्रत्येकाची उत्तरं वेग-वेगळी होती. जे काल एका गल्ली पूर्ती मर्यादित होतं, ते आज पूर्ण गावात झालं. 

भीतीमुळे गावबंद झाला. रात्रीच्या अंधारात फिरणारी टोळकी बंद झाली. हत्यारांचा खच घेऊन शेखर आणि इतर लोक गावभर फिरू लागले. पण तथाकथित जनावराची साधी पाऊलं सुद्धा मिळाली नाहीत. मधूनच थोड्या अंतरावर एखादी सावली हुलकावणी देऊन पळत असे. झाडाखाली माणसं आणि झाडाच्या फांद्यांवर लक्षवेधी हालचाली होऊ लागल्या. रात्री घरात लहान मुल रडू लागले की आयांना धस्स होई. हवेनी दाराच्या हलक्या कड्या वाजू लागल्यात, की काळीज पिळवटून निघे. हातात मशाली आणि मुठीत जीव घेऊन गावभर गस्त घळणाऱ्यांच्या घरी तर परिस्थिती अत्यंत बिकट होती. रात्रीच्या उरल्या प्रहरात दिगंबरला मारुती मंदिराच्या मागच्या बाजूस एक छोटा दिवा तेवत असलेला दिसला. खिडकीतून धुराची एक रेष इशाऱ्यासाठी पुरेशी होती. त्याने मंदिराचे दार उघडले. हातात एक छोटी तलवार होतीच. 

"कोण तुम्ही..?" त्याने दरडावून विचारले. साठीच्या आसपासातली एक बाई दिवा घेऊन त्याच्याकडे पहात उभी राहिली. रात्रभर तिथे थांबून , दिगंबरने त्यांना सकाळी शेखर समोर हजर केले. 

" गावात फिरणारं कोणी जनावर नाहीये." बाजूला अत्यंत बिकट अवस्थेत कीर्तिकर बसले होते. " त्याने आम्हाला फरफटत या गावी आणले. वाडीच्या पंतांचा पोरगा आहे तो. झपाटलेला आहे. इथे आल्यावर त्याच्यात अधिक बळ भरलं आहे." 

" पण, इथे...?" शेखरचा अजूनही विश्वास बसत नव्हता.

" ते बुवा शुद्धीवर आले, की तुम्हाला कळेल. आमचा टांगा आणि त्यातलं सामान , सगळं गेलं..!"

" ते सांभाळून ठेवलंय आम्ही." 

" साहेब, तो असा सापडणारा नाहीये. उलट त्याच्या मागावर असणाऱ्यांचे अशेच मुडदे पडत रहातील. जन्म आणि मृत्यु, यातल्या सगळ्यात बलवान स्थानावर तो पोहोचला आहे. तो असा कुठपर्यँत राहील, आणि किती जणांना मारेल, याची गणती तुम्हाला करता येणारच नाही. "

नर्मदेच्या बोलण्यात तथ्य होतं. शेखरनी त्यांची स्वतःच्याच घरी व्यवस्था लावली. 

"इथे तुम्हाला काहीही त्रास नाही होणार. जपून रहा...!" अचानक त्याच्या दारावर थापा पडू लागल्या. त्याने बंदूक पुढे करून दारचं एक किवाड उघडलं. आलेल्या माणसाने निरोप दिला. 

" मला जावं लागेल. आलोच मी, तुम्ही यांची काळजी घ्या. " 

गावातल्या एका तरुण पोराला फरफटत मुख्य रस्त्यावरून ओढून नेताना गस्तीवरच्या काही लोकांनी लांबून पाहिलं. त्यातला एक शेखरला बोलवायला आला. चिखलात उमटलेल्या खुणा मशालीत दिसल्या. त्याचा माग काढत शेखर आणि ती पोरं एका वाड्यासमोर येऊन उभी ठाकली. सगळ्यांना प्रचंड घाम फुटला होता. आत एक मशाल पेटली होती. दाराच्या मोडक्या फळीतून शेखरने आत पहिले. साधारण त्याच्याच उंची-बांध्याचा एक माणूस त्याला वाड्याच्या अंगणात बसलेला दिसला. नुकतेच ओढून आणलेले प्रेत त्याच्या समोर पडलेले होते. या प्रेताचीही तीच अवस्था होती, जी पहिल्या चौघांची झाली होती. त्यांच्या अंगाला झालेल्या जखमातून वाहणारं रक्त तो पीत होता. शेखरचा आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना. त्याच फटीच्या खालच्या भागातून बघत असलेल्या बाकीच्या पोरांना तर घाम फुटला होता. 

" मी इथेच थांबतो, तुम्ही बाकीच्या गावकऱ्यांना गोळा करून आणा.." शेखरने इतरांना सांगितले. 

" साहेब, कोणीच येणार नाही. आणि तुम्हीही स्वतःचा जीव धोक्यात नका घालू. हा प्रकार वाटतो तितका सोपा नाहीये." एका पोराने मोलाचा सल्ला दिला. 

" हा आहे तरी कोण?" शेखरला वाटले, बरोबरच्या लोकांना काहीतरी माहिती असेल. 

" पहिल्यांदाच गावात असा प्रकार घडतोय साहेब. नरभक्षी असावा." त्यांच्या बाहेर असण्याची चाहूल कदाचित त्याला लागली असावी. तो सावध झाला. हसू लागला.

" या न, आत या...!" बाहेर असणाऱ्यांना तो काळाचाच आवाज आला. सावध होऊन शेखरने बाहेरून त्या मोठ्या दाराला कडी घातली. 

" काहीही केलं, तरी मी नाही सापडायचो. कोणालाच नाही. माझं काम झालं, की या शरीराचा मला काही उपयोग नाही, यालाही....!" आणि तो हसू लागला.

 एकदम रागाच्या भरात बोलला. " माझं इथे कोणाशीच वैर नाहीये...! माझ्या मार्गावर याल, तर जीवाला मुकाल." असे म्हणून तो उठला आणि दाराकडे धावत सुटला. आत्तापर्यंत घात लावून बसलेले बाहेरचे सगळेच तिथून पळत सुटले. एकाच्या हातातली एक मशाल दारापाशी पडली आणि दाराने पेट घेतला. पायथ्यापासून दार जळू लागले. थोड्या अंतरावर जाऊन शेखर मोठ्या हिमतीने एका झाडामागे दडला. पेटत्या दारातून त्या नराधमाला बाहेर येता आले नाही. 

" फक्त अमावस्या येई पर्यंत. गाव बेचिराख करून टाकेल. पुढच्या पिढ्या लक्षात ठेवतील, इतका घाण मृत्यू येईल..!" त्याच्या त्या असुरी किंचाळीने कानाला कानठळ्या बसत होत्या. शेखरने मोठ्या हिमंतीने ते पहिले. 

' हा कोण आहे, कुठून आला आहे ?' याची उत्तरं हाच देऊ शकेल. आत्तातरी इथून निघायला हवं. आपल्या हातात असलेली मशाल शेखरने त्या वाड्याकडे फेकली. दराने अजून जास्त पेट घेतला. चिडून तो आत गेल्याचे शेखरने पहिले. 

गावातले रस्ते दिवसाढवळ्या ओस पडले. काल घडलेला प्रकार ज्यांनी पहिला, त्यांनी तो भेटेल त्याला सांगितला. जनावरं सुद्धा बाहेर येईनाशी झालीत. मंदिरं तेवढी उघडी होती.पण त्यांच्या गाभाऱ्यातले दिवे मात्र आज लागले नाहीत. गावात अचानक आलेल्या या काळाचा ठाव-ठिकाणा कोणालाही ठाऊक नव्हता. 

दामोदर आपल्या घरीच होता. घडला प्रकार त्याचाही कानावर येत होता. जुन्या पुस्तकांत तो संदर्भ शोधत बसला होता. तोच दारात शेखर येऊन उभा राहिला. 

" काय...बसला का विश्वास?" 

" थोडासा...! काल पाहिलं मी त्याला." दामोदरने बसायला खुर्ची दिली. 

" तो माणूस नाहीये, हेच काय ते कळलं मला. कुठून आणि का आलाय, याचा काही संदर्भ लागत नाहीये." शेखर दामोदरकडे मदत मागायला आला होता. 

" जन्म आणि मृत्यू, यापलीकडचा विषय आहे हा ! त्या पिशाचाने धारण केलेलं शरीर माणसाचं आहे. त्यात काही अंशी मानवाचे गुण अजून आहेच. पण त्याची मानवी शक्ती याच्या पाशवीपणा पुढे क्षीण आहे. कसल्यातरी शोधात तो गावभर हिडतोय." दामोदरने आपला निष्कर्ष ठेवला. 

" हे तुम्हाला कसं कळलं ?" शेखरचा प्रश्न सहाजिक होता. 

" साहेब, त्याला गावाचा कोपरा-कोपरा माहिती आहे. आणि तो ज्या वाड्यात दबा धरून बसलाय, त्या वाड्याचा इतिहास पण चांगला नाहीये."

" इथे लोकांचा जीव धोक्यात आहे, तुम्ही कोडी कसली घालत बसलाय..?" शेखरला त्याचा राग येऊ लागला. 

" साहेब, त्या मुलीची निर्घृण हत्या करणाऱ्या सुभानाचा तो वाडा आहे. मध्ये देवघर नाही, आणि वास्तूची प्रवृत्तीही तशीच , असुरी...!" दामोदरच्या बोलण्यात तथ्य होतं. " दाट झाडीमुळे आत सूर्यप्रकाश येत नाही. कित्येक वर्ष लोटली, कोणी माणूस तिकडे फिरकला नाहीये. अश्या ठिकाणी या शक्तींना बळ मिळतं. क्षणो-क्षणी त्यांची शक्ती वाढत जाते. तुमच्या-माझ्या सारख्या माणसाला विचारसुद्धा करता येणार नाही , इतकी शक्ती त्यात असू शकते." 

" मग...आता ?" हे सगळं ऐकून शेखर हतबल होऊ लागला होता. 

" जिथे माणूस हतबल होतो, तिथे देव धावून येतो. एक गोष्ट लक्षात असू द्या...! असुरी शक्ती कितीही बळकट असली, तरी कोणत्यातरी पंचमहाभूतापुढे ती गुडघे टेकतेच. पण या साठी ही योग्य वेळ नाही." 

"मग, अजून किती जीव ...?" 

" नाही, चुकता आहात तुम्ही. तो प्रत्येकाला मारत नाहीये. फक्त त्याला मज्जाव करणाऱ्यांना मारतोय. दिवसा तो तुम्हाला त्याच्या सर्व-शक्तीसह मूळ स्वरूपात सापडणार नाही. पण रात्रीच्या अंधारात त्याला बाहेर काढणे देखील सोपे नाही. सापाला बिळाच्या बाहेर काढायचं, म्हणजे उंदीर बांधावा लागेल. आणि तोही लवकर शोधावा लागेल. 

त्या नराधमाला मारण्यासाठीचा उपाय सापडला नाही. पण दामोदरच्या बोलण्याने शेखरला मात्र धीर आला. 

" या पृथ्वीवर प्रत्येकाचा अंत, आणि त्या अंताची पद्धत ठरली आहे. फक्त ती अचूक हेरता आली पाहिजे." खिडकीतून दिसणाऱ्या मारुतीच्या मंदिराकडे बघत दामोदरने एक निश्वास सोडला. 

.......

शेखरच्या घरात दडून बसलेल्या किर्तीकरांना एव्हाना शुद्ध यायला लागली होती. जे घडले, ते अत्यंत दुर्दैवी होते. आणि जे घडतंय, त्याला थांबवायचा काही उपाय आत्ता तरी नाहीये. दिवस भीतीच्या सावटाखाली, तर रात्र मृत्यूच्या दारात उसनं पडलेल्या श्वासारखी होत होती. त्यांनी एकदा आपली पिशवी पहिली. त्यात भरपूर गोष्टी होत्या, पण त्या आता उपयोगी नव्हता. अर्ध्याहून अधिक आनंद आता त्या दुष्ट शक्तीच्या ताब्यात गेला होता.

" त्याचं काम झालं, की तो आनंदच शरीर छिन्न-विच्छिन्न करून सोडून देईल." ते हतबल होऊन म्हणाले. 

"हो, त्यांना त्याच्या कचाट्यातून बाहेर काढावं लागेल...!" नर्मदाही तितकीच हतबल होती. एवढ्यात दारावर कोणीतरी आलं.

" बरं झालं, तुम्हाला बरं वाटलं...! कोणाला घेऊन आलात बुवा तुम्ही गावात, कोण ए हा ?" दिगंबर त्यांना चहा घेऊन आला. 

" हे तोच सांगू शकतो...! आणि त्याचा या गावाशी काहीतरी मोठा संबंध आहे." हे बोलताना त्यांना दम लागत होता. 

" पण बुवा, असं कुठवर चालणार, त्याला जेरबंद करायलाच हवा. नाहीतर सारा गाव...!" 

सूर्योदयापासून अस्ता पर्यंत त्याला पकडणे शक्य होते. पण याच्याने तो फक्त सापडला असता. त्याचं नेमकं उद्धिष्ट कळणे गरजेचे होते. तो एका जिवंत माणसात अगदी निर्धास्त वावरत होता. दिवसा त्याच्या हालचाली दिसत नव्हत्याच. गावातलं कुणी मदतीला येईल असं वाटत नव्हतं. हा त्रागाही शेखरला एकट्यानेच पेलायचा होता. सोबत दामोदर होता. पण ही माणसाची माणसाविरुद्ध लढायची लढाई अजिबात नव्हती. तरीही हे धाडस करणे भाग होते. 

" ही जागा माहितेय मला." शेखरने दामोदरला तो वाडा दाखवला. " परिसरात क्रांतिकारी सापडले, की इथे अत्यंत निर्घृणपणे त्याचा छळ करण्यात येई. बऱ्याच जणांना इथे फासावर देण्यात आले आहे. धर्माच्या दृष्टीने अत्यंत कमकुवत जागा आहे. असं म्हणतात, त्या ठिकाणी असे अकाली किंवा अनैसर्गिक मृत्यू झालेले असतात. ती जागा शापित असते. इथे संताप आणि भय वावरते. त्याने जागा बरोबर निवडली आहे. 

"अग्निस घाबरतो तो..!" शेखरला स्वतःचा अनुभव आठवला. दोघेही वाड्याच्या मागच्या बाजूला गेले. तो भाग तसा अर्ध्याहून अधिक पडलेला होता. साप, विंचू ,सरडे मुक्त वावरत होते. थोडाही उजेड नव्हता. पण तो एका मोठ्या दगडी बाकावर बसलेला त्यांना दिसला. त्याचा तोरा थोडा माजोरडा वाटला. आभाळाकडे तोंड करून ,दोन्ही हात त्याने बाकाच्या टेकुला लावले होते. त्याचा चेहरा मात्र दिसत नव्हता. दोघेही एकदम शांत होते. पण आज दामोदर एक वेगळा विचार करून आला होता. 

"ऐका माझं, मी त्याच्या समोर जातो."

"कशाला ? जीव जड झालाय का ? " 

"तो मला नाही मारू शकत..! माझ्याशी त्याचं काहीच वाकडं नाहीये. तो मला ओळखतही नाही."

"याची खात्री देता येईल का तुम्हाला?" यावर दामोदर शांत बसला. दोघेही त्याच्या हालचालीकडे शांतपणे पहात होते. 

अर्धी रात्र उलटली. त्याच्या डाव्या बाजूने हालचाल होऊ लागली. तो उठला, आणि एक अंधारल्या कोपऱ्याकडे सरकू लागला. 

" मूर्ख आहेस तू...? " तिथे अजून कुणीतरी होते हे कळल्यावर दोघांना घाम फुटला. 

" तेव्हाही फुकट मेलास, आत्ताही फुकट मरशील...!" आणि तो हसू लागला. 

"कित्येक वर्ष गावात भटकतोयस. कोणीतरी येईल, तुला या त्रासातून सोडवेल. आलं का रे कुणी..?" तो एका माणसाशी बोलत होता हा अंदाज शेखर आणि दामोदरला आला. "नसतं येत कुणी...! मी येऊ देणार नाही." आता तो मांडी घालून जमिनीवर बसला. 

" सांग न, कुठंय तुझा मुलगा ? तुलाच ठाऊक असेल न ? तो मेला, पून्हा जन्माला आला, आणि आता पून्हा मरेल, इथेच आणून मारेल...!" 

त्याने चिडून त्या कोपऱ्याकडे पाहिले. तिथून काळीज चिरलं जाईल, एवढी जोरात आरोळी ऐकू आली. 

" तुला यायचा तो मृत्यू येऊन गेला रे, आत्ता फक्त तुझ्या वाट्याला भोग आहेत." कोणीतरी कोपऱ्यातून बोलले. "माणसाच्या जन्माला शाप ए तू ! मेल्यानंतर नरकातही जागा मिळाली नाही, तरी तुझ्या पापी आत्म्याला अक्कल नाही आली." त्या आवाजात तळतळाट होता, अभिशाप होते. काहीतरी अत्यंत दुर्दैवी घडून गेल्याची जाणीव होती. पण या बोलण्याने तो मात्र दुखावला. त्याने तडफडून जोरात आरोळी ठोकली. त्याने शेखर आणि दामोदरलाही कानठळ्या बसल्या. नकळत शेखरने त्याच्या हाताला असलेली काडी उगाळली आणि बाजूला असलेल्या सरपणाला आग लावली. दोघे पळत सुटले. 

" कशाला आग लावली." पळता-पळता दामोदरने त्याला विचारले. 

" माहित नाही , कोणाला तरी बळजबरीने त्याने बांधून घातले होते, मला नाही आवडले.त्रास झाला." दोघे गावातल्या एका मोठ्या चौकातील एका भिंतीमागे लपले. 

" पहाटेपर्यत याला थोपवावं लागेल. कोणी घराबाहेर यायला नको फक्त." दामोदर बोलला. दोघेही घामे-घुम झाले होते. 

एका मशालीच्या तोडक्या उजेडात तो दोघांना दिसत होता. पूर्ण पांढरा पडलेला चेहरा ! पूर्ण त्वचा कोरडी पडली होती. स्वतःला करून घेतलेलं घाव ही वाळले होते. डोळ्यातली बुबुळं लालसर झालेली. अंगावरचे कपडे लोंबत होते. अंगात जोर मात्र एखाद्या हिंस्त्र जनावरसारखा होता. तो त्यांच्या अगदी जवळ आला. आता मात्र याचा सामना करण्यावाचून पर्याय नव्हता. दामोदरने शेखरच्या कानात काहीतरी सांगितले. शेखरला हे अजिबात पटले नाही. पण दोघांना जीव वाचवणे गरजेचे होते. 

दामोदर अचानक त्याच्या समोर आला. 

"कोण आहेस कोण तू?" दामोदरच्या या प्रश्नावर त्याने काहीच उत्तर दिले नाही. 

" तुला विचारतोय, कोण आहेस तू?" 

" तू माझ्या गावात आहेस, माझ्या समोर...!" त्याने अत्यंत किसळवण्या आवाजात उत्तर दिले. 

" तू या गावचा असतास, तर असा लोकांना मारत फिरला नसता." दामोदरच्याही अंगात आता बळ आले होते. शेखर आपल्या जागेवरून निघाला होता. याला बंदिस्त करायची ही कदाचित शेवटची संधी होती. दमोदर तोंड फिरवून चालत निघाला. 

" कुठे जातोयस...?" दामोदरचं असं पाठ दाखवणं त्याला सललं. दामोदर काहीही बोलला नाही. झपझप चालत निघाला. तोही त्याच्या मागोमाग चालत होता.पण ज्या शरीरावर तो अवलंबून होता, त्या शरीरात बळ राहिले नव्हते. 

थोडं पुढे गेल्यावर दामोदर थांबला. त्याने वळून पाहिले. 

"इथेच, इथेच आणायचे होते तुला...!" आधीच तयार असलेल्या शेखरने मारुती मंदिराचा गाभाराच उघडला. आतून नर्मदेने जोर-जोरात घंटा वाजवायला सुरवात केली. अचानक घंटा वाजू लागल्याने त्याला असवस्थ वाटू लागले. तो पळायच्या प्रयत्नात असतानाच अचानक त्याच्या आजूबाजूला आग लागली. दामोदरने उभं करतानाच त्याला त्या वलयात उभं केलं होतं. एकाच वेळी घंटा, अग्नी, आणि येऊ घातलेला ब्रम्हमुहूर्त यामुळे त्याची शक्ती क्षीण होत गेली. पहिल्यांदाच कदाचित त्याला भय कसे असते, हे समजू लागले. 

" तू रहात असलेले शरीर कृश करत चालला आहेस. तुझे काम झाले, की तुला याची गरज नाही. तू अर्धपिशाच योनीत आहेस." कीर्तिकर पहाटे सूर्योदयापूर्वी बाहेर आले. 

" काट्यातून, दगडातून, धडपडताना कित्येक जखमा झाल्यात त्या शरीराला. आणि तू, मूर्ख. अरे, हे शरीर जर तुला आज, आत्ता इथे सोडून गेले, तर तुझे अस्तित्वच संपून जाईल." 

" माझं काम होऊ दे, मी स्वतः हे सोडून देईल. तो पर्यंत, मला त्रास देणाऱ्याला असंच मरावं लागेल...!" त्याचा आवाज पार खोल गेला होता. 

" तुला वाटतं आम्ही ते होऊ देऊ..?" 

कीर्तिकरांच्या डोक्यात काय सुरु होतं, हे त्यांचं त्यांनाच माहित. पण सुरु असलेला मृत्यूचा तांडव काही काळापूर्ती थांबला होता. अत्यंत घायाळ, दुर्दशा झालेलं आनंदचा देह तीळ-तीळ संपत चालला होता. त्याला पुनर्जीवित करण्यासाठी याच्याकडून त्याला सोडवणे भाग होते. 

लेखाची सुधारत चाललेली स्थिती थोडेसे आभाळ अजूनही आपल्यासाठी मोकळे असल्याची जाणीव करून देत होते. डोळे उघडे ठेवून छताकडे तासनतास बघणारी तिची निरागस दृष्टी काहीतरी शोधत असायची. तिच्या आजूबाजूला वावरण्यात कोणताही धोका नव्हता. काशीचीही भीती पळाली होती. गेल्या काही दिवसात घडलेल्या घटना भविष्यासाठी अत्यंत दुर्दैवी होत्या. कोणा तिऱ्हाताला सांगितले असते, तर सहज विश्वास बसला नसता. नातेवाईकांचे, मित्र-मंडळींचे येणे-जाणे जवळ-जवळ बंद झाले होते. पूर्ण घराला एक कळा आली होती. रस्त्यावरून येणारे-जाणारे संशयाने बघत. बाबांचे बाहेर जाणे फारसे होत नव्हते. पण चौकश्या करणाऱ्यांनी काशीचे जगणे मात्र अवघड करून सोडले होते. ती इमानी होती, धाडसीही होती. पण संशयी वृत्तीचे लोक जगातील कोणत्याही धडसाचा लीलया फज्जा उडवीत असतात. इथेही काहीसे असेच होते. 

"पूढे काय वाढून ठेवलंय, देवालाच माहित !" बाबा हळू-हळू हतबल होत होते. 

"काही नाही, थोडं थांबावं लागेल. वाईट व्हायचं असतं, तर आत्ताच झालं असतं." काशी त्यांना मधून-मधून धीर द्यायची. " असं हात-पाय गाळून चालायचं नाही !" तिच्या डोक्यात काय चाललं होतं हे बाबांना नेमकं कळत नव्हतं. पण ती जे काही करणार होती ते सगळ्यांच्या भल्याचंच असेल, हे ही बाबांना ठाऊक होतं. 

मंदिराच्या आवारात मधोमध आनंदला एका सुरक्षा चक्रात झोपवून आजूबाजूला सगळे बसून होते. गावात या बद्दलच्या चर्चेचे उत उठत होते. बळी गेलल्या लोकांच्या घरातून येणारा सुडाचा सूर वेगळा होता. कीर्तिकर आणि नर्मदाकडे कोणाच्याच प्रश्नाचे काहीच उत्तर नव्हते. तिथे असलेला दामोदरसुद्धा काही सांगू शकत नव्हता. आनंदच्या शरीरात त्याचे स्वतःचे प्राण थोडे शिल्लक होते. पण ते सगळे तो नराधम वापरून गावात उच्छाद मांडत होता. त्याला थांबवणे काहीसे अशक्य होते. 

शेखर त्याच्या ठाण्यात बसला होता. आता रात्री सहसा तो घरी जात नव्हता. सगळे कर्मचारी सूर्यास्त झाला की आप-आपले घरी निघून जात होते. तो मात्र तासनतास तसाच बसून असायचा. बऱ्याचदा त्याला झोपही तिथेच लागायची. आज वारा नव्हता. हवेत काहीतरी उदासीनता होती. एकही कोडं सुटत नव्हतं. उलट समोर होणारे प्रकार पाहून त्याला स्वतःच्या नाकर्तेपणावर संताप होऊ लागला होता. एकाएकी एक वाऱ्याची झुळूक त्याच्या पायापाशी घोंगावू लागली. बाहेरचा थोडासा कचरा आत येऊ लागला. हवा वाहू लागली आणि क्षणात वाढून वादळं होऊ लागले. आपल्या खुर्चीवरून उठून तो खिडक्या लावायच्या म्हणून बाहेर आला. त्याने बाहेर नजर टाकली. बाहेर कुणीही नव्हते. पण कोणाच्या तरी चालण्याचा आवाज त्याला आला. तो चार पायऱ्या खाली उतरला आणि फाटकाजवळ त्याला तोच म्हातारा दिसला. 

'हा कोण आहे...! पाहिल्या दिवशी दिसला, नंतर त्या बंगल्यावर यानेच आपल्याला...आणि आता इथे !' क्षणाचाही विलंब न करता शेखर त्याच्या दिशेने झपझप चालायला लागला. तो म्हातारा अत्यंत शांत चित्ताने पुढे चालू लागला. चालत तो मुख्य रस्त्यावर आला. भीतीमुळे आधीच सगळे मोकळे होते. पण रस्त्यावरच्या मशालीत तो म्हातारा आणि त्याची दिशा शेखरला स्पष्ट दिसत होती. एका वळणावर तो म्हातारा दिसेनासा झाला. शेखरने आजूबाजूला पहिले आणि त्याला धक्का बसला. तो बंगल्याच्या दारापाशी येऊन थांबला होता. त्या म्हाताऱ्याने त्याला तिथे आणून सोडले होते. कदाचित हा एखादा संकेत असावा. न भिता शेखर आत गेला. त्याने खिशात असलेल्या किल्लीने मोठे दार उघडले. एका खिडकीतून चंद्राचा उजेड आत येत होता. त्या उजेडात शेखरला जमिनीवर पडलेली असंख्य कागदं दिसली. ती त्याच वहीची कागदं असावीत हा अंदाज शेखरला आला. त्याने सगळा पसारा आवरला, एकसारखा केला आणि तो बाहेर पडला. 

"ही तिची आत्मकथा असावी !" शेखरने दामोदरला बोलावून घेतले. " कदाचित, या सगळ्याचा त्याच्याशी काही संबंध...?" 

" असू शकतो. तुम्ही हे सगळं वाचा...!" ठाण्यात एका मेजावर बसून दामोदर ती वही वाचू लागला. कोणत्याच कागदावर तारीख किंवा क्रमांक नव्हता. एक-एक कागद मोकळा होता. वाचता-वाचता दामोदरसमोर नवीन पात्र उभी राहू लागली. भीमा, रावसाहेब, सुभान आणि ज्याचा सारखा उल्लेख होत होता, तो सर्जा...! साधारण तीन-चार तासांत थोडीशी कडी उलगडू लागली.

" हे सगळं आपल्या समजुतीपलीकडे आहे." अर्धवट झोपेत असलेल्या शेखरला त्याने उठवले. 

"म्हणजे ?" अंग झटकत शेखरने विचारले. 

" तिने एवढ्याश्या आयुष्यात खूप काही सोसलं. आणि तिला आलेलं मरण...! त्याचा कुठेच ठाव-ठिकाणा लागत नाहीये. ती अजूनही बंगल्यात का आहे, याचे उत्तर सुद्धा यात कुठेही नाहीये. ते मंदिरातले लोक , तो नरपिशाच, काही-काही संबंध लागत नाहीये ! " 

"पण मग ही पानं आपल्यासमोर मांडण्याला काय अर्थ आहे."

" अगदीच निरर्थक आहेत असेही नाही. तो बंगला आणि गावात घडणाऱ्या घटनांचा काहीतरी संबंध असावाच !" 

आनंदला असं पडलेलं पाहून सुमनने टाहो फोडला. एकुलता-एक पोरगा असा मृत्यच्या दारात पाहून पंतांचेही काळीज फाटले. 

" त्याचा जीव वाचावा, म्हणून त्याला इथवर आणलंत बुवा तुम्ही...! आणि आता ?" पंतांचा रोष किर्तीकरांवर निघत होता. 

" पंत, वेळ आली, म्हणून तुम्हाला आणि बाईंना बोलावून घेतलं." त्यांना घेऊन आलेला दिगंबर बाजूलाच उभा होता. 

" तुम्हाला आधीच सावध केलं होतं. अगदी जन्म झाल्यापासून याच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ट आपल्याला माहिती आहे." किर्तीकरांनी आपली बाजू स्पष्ट केली. 

मारुतीमंदिराच्या गाभाऱ्यातला दिवा अखंड सुरु होता. तो एकंच आधार आता उरला होता. रामरक्षेचे पठणही अखंड होते. 

त्यारात्री दामोदर ती वही घेऊन मंदिरापाशी आला. झोपलेल्या आनंदच्या शेजारी जाऊन त्याने ती एका लाल कापडात ठेवली. आणि हळू आवाजात वाचायला सुरुवात केली. तास भर त्याने वाचन सुरु ठेवले. कुठेही काहीही हालचाल दिसली नाही. भीमाचा मृत्यू, सर्जाला बंगल्यावर आणून त्याची जवाबदारी, रावसाहेब आणि त्यांचे क्रांतिकारी, खंडेराव असे एक-एक नाव समोर यायला लागले. सर्जाचाही मृत्यू झाला. 

अचानक आनंदच्या शरीरात हालचाल होऊ लागली. दामोदरचे त्याच्याकडे पूर्ण लक्ष होते. शेखर आणि दिगंबरही सावध होऊन ऐकत होते. 

" बस...! संपत आलं न...!" अचानक आनंदच्या शरीरातून तो बोलू लागला. 

" मी बोललो न...ती अजून आहे. तिच्याच जागेवर...! इतक्या लवकर ती जाणार नाहीच." आणि तो पून्हा राक्षसी हसू लागला. 

" इतक्या सहजा-सहजी ती सुटणार नाहीये." सगळे अवाक होऊन ऐकू लागले. 

" तिच्यामुळे...तिच्याचमुळे आमची अशी गत झाली." हळू-हळू तो आता बोलू लागला. 

" पण आता, आता नाही सुटू शकणार ती ! आणि आता तर तिला वाचवायला नाहीये कुणी...!" तो पून्हा हसू लागला. त्याच्या हाताच्याही हालचाली सुरू झाल्या. दामोदरने वही बंद केली. ती लाल कापडात झाकली.

" बंद का केलं ? तो अजून बोलला असता." शेखरने त्याला दटावले. 

" नाही, ही जागा नाहीये." दामोदरने त्याला बजावले. " हे नेमका कोण आहे, हा तो इथे नाही सांगणार. इतक्या सहजा-सहजी तर नाहीच नाही."

" का ?" 

" सांगतो...!" दामोदरने पिशवीतून एक पान बाहेर काढले. त्या पानावरचे अक्षर वेगळे होते.

" मृत्यू म्हणजे सुटका नाही. कोणाचीच नाही ! उलट, इथे झालेल्या मृत्यूने काही नवीन कहाण्या लिहून ठेवल्या आहेत. या भूमीवर घडलेलं पाप अत्यंत जहाल आणि अक्षम्य आहे. झालेला प्रत्येक मृत्यू हा अपूर्ण आहे आणि प्रत्येक मावळत्या श्वासामागे अतोनात तळतळाट आहेत. ते सुटले तर क्षणात सुटतील आणि नाही सुटलेत, तर युगांपर्यंत सुरु रहातील. 

"तिचा आत्मा इथे कैद असेल. कारण तिच्या मृत्यूला जवाबदार असणारे अजून श्वास घेतायत. हा जन्म-मरणाचा खेळ असाच सुरु राहील. आणि याला थंबवायचं असेल, तर मला शोधा...!"  

" हे कोणाचं अक्षर आहे ?" शेखरने विचारले. 

" माहित नाही, पण हे थंबवायचं असेल, तर याला शोधावं लागेल. 

" प्रतिशोधाची असंख्य कारणे या मातीत जशीच्या तशी रहातील. एका शरीरातून दुसऱ्या शरीरात हे राक्षस प्रवास सुरु ठेवतील. ग्रहांचे तुटलेले संकेत, जन्म आणि मृत्यूच्या चुकलेल्या वेळा...! सगळं-सगळं पून्हा-पुन्हा डोळ्यासमोर दिसू लागेल." 

" म्हणजे...?" शेखरने पुन्हा विचारले. 

" सरळ अर्थ आहे. याचा प्रतिशोध पूर्ण होत नाही, तो पर्यंत हा असाच या भूमीवर असेल."

" असुरांनी लिहिलेल्या कुंडल्यांमध्ये जन्म घेतलेल्या मानवाच्या नाशीबात ...!" कीर्तिकर बोलले, तसे सगळ्यांनी त्यांच्याकडे नजर वळवली...! 

....

त्यांच्या डोळ्यात भूतकाळ दाटून आला होता. वेळीच न केलेले उपाय, काही गोष्टींवर नसलेला विश्वास यात अनेकांना आपले वर्तमान अंधारात दिसत होते. प्रत्येकाच्या मागावर असलेली भीती कोणत्यातरी रुपात खरी होत होती. समोर घडत असलेले एक-एक प्रसंग अस्वस्थ करणारे तर होतेच, पण कोडं अधिकच गुंतत जात होते. आप-आपल्या परीने ते सोडवण्याच्या प्रयत्नात, नवीन येणारी आव्हानं उभी रहात होती. 

"कोणते असुर ? कोणत्या कुंडल्या...?" दामोदरच्या प्रश्नावर किर्तीकरांनी आनंदकडे पाहिले.

"तुम्हाला वाटतं तसं हा कोणी पिशाच, प्रेत किंवा आगळ्या योनीतील नाहीये ! साधारण माणूस आहे हा ! बाधित म्हणू शकता, किंवा याच्या कुंडलीत असलेल्या दोषामुळे याला हा सगळा त्रास होतो आहे." बसल्या जागी किर्तीकरांनी आनंदची सगळी गाथा समोर बसलेल्यांना सांगितली. सगळं ऐकून कोणाचाच सहज विश्वास बसला नसता. पण सगळं डोळ्यासमोर होतं. घडत होतं. कोणीतरी घडवून आणल्यासारखं का होईना, पण होत होतं...!

" याचा इलाज असेलच ना...?" दमोदरने विचारले. 

" प्रत्येक गोष्टीला इलाज असतो. पण तो वेळेवर झाला पाहिजे. वेळ आल्यावर नाही."

 पंतांकडे त्यांनी टाकलेला कटाक्ष अतिशय केविलवाणा होता. त्यांच्या पाठोपाठ, सगळ्यांनीच पंतांकडे पाहिले. आज नियतीने पंतांना एक चांगला धडा दिला होता.ते स्तब्ध नजरेने आनंदकडे बघत बसले होते. 

"बोला पंत...!काहीतरी बोला !" ते काहीही बोलले नाही. बराच वेळ काहीच हालचाल झाली नाही. ते वेगळं अक्षर कुणाचं आहे, हे दामोदरला शोधावे लागणार होते. पण त्या आधी, त्या बंगल्याचा आणि घडणाऱ्या या घटनेचा काही सबंध आहे , हे सुद्धा बघावे लागणार होते. 

" मला नाही वाटत, की तुम्हाला यापुढे या गावात रहाता येईल. गावकऱ्यांनी जे काही सोसलं आहे, त्यावरून तरी..!" शेखरने एक वेगळी भीती बोलून दाखवली. सगळेच हतबल होते. या पारिस्थितीत, एक पाऊल टाकणे अवघड झाले होते, गाव सोडून पून्हा परत जाणे कसे शक्य होईल ? गावकऱ्यांची समजूत काढणे शक्य नव्हते. उगाचच धोका पत्करून उपयोग नव्हता. 

" आम्ही आत्ताच निघतो...!" कीर्तिकर बोलले." आमच्यामुळे गावाला त्रास...!" 

" नाही, कोणी कुठेच जाता कामा नये." दामोदर म्हणाला. 

" गाव तर काय, या गाभाऱ्यातून जरी आपण बाहेर पडलो, तरी जीवावर बेतेल." क्षणभर शांत बसून तो विचार करू लागला.त्याने पून्हा वही उघडली. बदललेली अक्षरं तो पुन्हा पून्हा वाचू लागला. कदाचित या परायणात त्याला त्याचा नारायण सापडेल, या आशेनेच ! तो एकदम उठला. 

" इथून कुणीच हलू नका. उद्या सकाळपर्यंत काहीतरी चांगलं घडून येईल." एवढे बोलून तो बाहेर पडला. गावातलं एक-एक मंदिर त्याने उघडून पाहिलं. तिथे ठेवलेल्या पोथ्या चाळून पाहिल्या. तिथे सापडलेलं एक-एक साहित्य त्याने तपासलं. कुठेही काहीच सापडलं नाही. त्यानेही काहीच बघायचं सोडलं नाही. तास-दोन तास असेच गेले. गावातलं एकही मंदिर असं उरलं नव्हतं.

"सांगा तरी, काय शोधताय...?" विठ्ठल मंदिरातच रहात असलेल्या पुजारीबुवांनी त्यांना विचारलं. त्याने सोबत आणलेल्या वहिचं एक पान त्यांच्या समोर घडी करून ठेवलं. त्या वयस्कर पुजारी बुवांनी ते पान दिव्यासमोर धरलं. काही काळ त्याकडे पाहून त्यांनी दामोदरकडे पाहिले. 

"कुठे सापडलं हे...?" त्यांच्या आवाजात आश्चर्याचे भाव होते. 

"गावाच्या पूर्वेला...!" 

"तरीच...! या माझ्यामागे." गाभारा लावून दोघेही गावाच्या एका बारीक बोळीत शिरले. रात्रीच्या अंधारात मशालीचा उजेड बोलका होता. एका जुन्या दारासमोर ते थांबले. चाळीशी पार झालेल्या एका माणसाने दार उघडले, तेच मुळात घाबरत ! 

"मी, भारद्वाज...!" त्या माणसाने दामोदरकडे संशयाने पाहिले. तरीही दोघांना आत घेतले. आत जाताच त्याने चिमणीची वात वाढवली. भारद्वाजने ती वही त्या माणसाला दाखवली. 

"त्यांचंच अक्षर आहे...!" एकदम त्या माणसाचे डोळे चमकले. भिंतीवर टांगलेल्या एका चित्राकडे त्याची नजर गेली. 

"माझे आजोबा...! गोविंदगुरुजी...! त्यांचंच अक्षर आहे. पण ही वही तुम्हाला...?" त्याच्या डोक्यात चाललेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याला त्या जागेवर जाऊनच मिळणार होतं. डोक्यावर टोपी चढवून तो निघाला.तिघे मंदिरात पोहीचले. त्याने झोपलेल्या आनंदकडे एक कटाक्ष टाकून एक सुस्कारा सोडला.

" आजोबा लिहिताना नेहमी सांगायचे. माणसाचा प्रतिशोध प्रत्येक थरावर अधिक क्रूर आणि घातक होऊ लागतो. एका जन्मातून दुसऱ्या जन्माकडे जाताना ,पूर्वकर्म आडवं येतं. त्याची फळं भोगल्याशिवाय पूढे सरकता येत नाहीच." तो बाहेर आला. येताना शेखरही त्याच्या सोबत आला. तिघे पायऱ्यांवर बसले. 

" आमचे आजोबा त्या बंगल्यावर नेहमी जायचे. तिथले देवघर त्यांच्याच ताब्यात होते. गावातही त्यांचा खुप मान होता." 

सगळी हकीगत संपेपर्यंत पहाटेचे वेध लागले. खूप आग्रह करून सुद्धा ते एकटेच आपल्या घराकडे गेले. त्यांनी सांगितली ती कहाणी सहज विश्वास बसेल, इतकी सोप्पी नक्कीच नव्हती. शेखर आणि दामोदर बराच वेळ विचार करत बसले. जाताना त्यांनी या सगळ्यावर संगीतलेला उपाय अवघड होता. दुखण्यापेक्षा इलाज जास्त जालीम होता. पण तो करावा लागणार होता. काहीही झालं तरी ! न करून पूढे खूप मोठे अनर्थ घडू शकतील, अशी ताकीदही देण्यात आली होती. 

पहाट होताच एक माणूस एक चिठ्ठी घेऊन गावाच्या बाहेर निघाला...! 

चांदेकरांच्या हाती चिठ्ठी लागली तेव्हा वाचून त्यांना फक्त भोवळ यायची राहिली होती. त्यात संक्षिप्त स्वरूपात सगळ्याच घटना लिहिल्या होत्या. लेखाचा काहीही दोष नसताना ,एवढ्या मोठ्या जीवघेण्या संकटातून ती नुकतीच वाचली होती. आणि त्यात अजून हा असला निरोप आल्यावर तिला आगीतून उचलून अजून मोठ्या आगीत ढकलून दिल्यासारखं होतं. बाजूला उभी असलेली काशी ही चिंतेत दिसत होती. 

" नाही, हे जमणार नाही ! कदापि नाहीच. एकुलती-एक मुलगी आहे माझी...! आणि तिचा या सगळ्याशी काय संबंध ? फक्त त्या मुलाच्या...? "

" समजू शकतो मी ! पण आता गोष्टी खूप पुढे गेल्या आहेत. जर आज याला आळा नाही घातला, तर पुढे येणारं संकट खूप मोठं आहे.तुमच्या मुलीच्याही जीवावर...!" निरोप्या या बाबतीत खूप हुशार होता. 

"पण...!" चांदेकरांच्या या आक्षेपावर काशीने त्यांना अडवलं. 

" तुम्ही आज थांबा. आमचा निरोप आम्ही कळवतो." निरोप्याची व्यवस्था लावून काशी आणि चांदेकर आत आले.

" आपल्याला जायला हवंय. आज जरी संकट टळलं असलं, तरी त्याची टांगती तलवार नेहमीच तिच्या डोक्यावर असणार आहे. काय तो साक्ष-मोक्ष...!" 

" म्हणून काय तिला समोर उभ्या असलेल्या मृत्यूच्या जबड्यात जाऊ देऊ. नाही, ते मला तरी शक्य नाही."

" तुम्हाला काय वाटतंय, ती बरी झालीये ?" काशीच्या या वाक्यावर मात्र ते जरा अचंबित झाले. 

"बघा जरा...!" काशीने त्या खोल्यांचे सगळे पडदे बाजूला केले. सूर्यप्रकाश सापडेल त्या वाटेने आत आला. पांढऱ्या शुभ्र फरशीवर तो पडताच जमिनीवर काही काळी पाऊलं ठळकपणे उमटली. 

"हे प्रत्येक खोलीत आहे. या सावल्या अजून तिच्या मागावर आहेत.आणि या तो पर्यंत रहातील, जो पर्यंत याचा पूर्ण निर्वाळा होत नाही. आपलं सगळ्यांचं नशीब बांधलं गेलंय आता या सगळ्याशी...!" 

दुसऱ्या दिवशी पहाटे बाबा, काशी आणि लेखा शिवपुरीच्या दिशेने निघाले. निरोप्या आपल्या घोड्यावर आणि त्याच्या मागे यांचा टांगा सुरु झाला. 

.....

थकवा आल्याने दामोदर क्षीण होत चालला होता. शेखरच्या हे लक्षात आलं होतं. गेले चार-सहा दिवस तो घरी देखील गेला नव्हता. तो हे सगळं करत होता, ते फक्त दुर्दैवाने संकटात सापडलेल्या काही माणसांना मदत व्हावी म्हणून. यात त्याच्या जीवाला असलेला धोकाही तो पूरता ओळखून होता. पण समोर असलेलं संकट कोणलाही साधं थकून , क्षणभर निवांत झोपू देण्याच्या मनःस्थितीत नव्हतं. 

"तुझा परिवार...?" 

" आई असते. पण सध्या ती यात्रेला गेली आहे. परिवार झालाच नाही ! करताच आला नाही. कळायला लागल्यापासून जुने वाडे, तत्याच्या दंतकथा, त्यांचं खरं-खोटं करून लोकांना त्यातून बाहेर काढण्यात स्वतःला व्यस्त करून घेतलं." दामोदरच्या घरात दोघे बसून होते. 

" इतकं बळ, इतकी आस्था आणि चिकाटी कुठून येते ? " शेखरचे प्रश्न संपत नव्हतेच. 

"थोडं स्वतःमध्ये आहे. उरलेलं परमेश्वर देतोय...!" 

रात्रीच्या गर्भात कित्येकतरी अप्रिय घटना दडलेल्या असल्या, तरी दिवस मात्र नेहमीप्रमाणे उगवत होता. गावातले लोक मंदिराकडे फिरकले नाही. लांबून हात जोडून निघून गेले. नर्मदेने बसल्या ठिकाणीच त्या दगडी दिव्याची वात थोडी वर केली. गावाच्या वेशीवर कळा आली होती. तसाही गाव पहिल्यापासून गाव पंचक्रोशीत कुप्रसिद्ध होताच. त्यात अजून हे नवं ! ती भूमी शापित नव्हती, तिथला प्रत्येक जीवही शापित नव्हता, एखाद्या वंशपरंपरागत चालत आलेला कोणताच प्रभाव नव्हता. तिथे पाप पेरले गेले होते, आणि त्याचे परिणाम उगवत होते. अश्यात अनेक भाकड-कथांचा जन्म झाला. संध्याकाळी लोक पारावर बसायचे बंद झाले. रात्री-अपरात्री दाराची कडी वाजली, की घरात भीतीने रडारड सुरु होत होती. रात्रभर उनाड कुत्री रडत बसायची. एखाद्या गोठ्यातलं जनावर अचानक मरून पडलेलं असायचं, तर कुठे रात्री लहान मुलं भिंतीकडे पाहून उगाच तासनतास रडत बसायचं. प्रत्येक जण हैराण झालं होतं. अख्ख गाव हैराण झालं होतं. यातून सुटका कशी होणार, याचा विचार करणं सोडून आता गावकऱ्यांनी गाव सोडण्याचा विचार जवळ-जवळ पक्काच केला होता. या विचारला जुन्या-जाणत्या लोकांनीही पाठिंबा दिला होता. कोवळ्या पिढीने अश्या भीतीच्या सावटाखाली आपलं उभं आयुष्य पणाला लावणं धोक्याचं होतं. 

"होईल सगळं व्यवस्थित...!" शून्यात नजर खिळवून बसलेल्या शेखरकडे बघत दामोदर म्हणाला. 

" तो म्हातारा कोण होता...?" त्याला एकदम बंगल्यावर घडलेला प्रसंग आठवला. 

" तुम्हाला अजूनही वाटतं, की हे गाव, इथली माणसं तुमच्या-माझ्या सारखीच साधी आहेत ?" दामोदरने वही बाहेर काढली. "कित्येक घटक असेही आहेत, ज्यांनी हे सगळं आपल्या डोळ्यानी पाहिलं आहे ! भोगलं आहे. तो म्हाताराही त्यातलाच असावा...!"  

" हो...कदाचित !"

गावात घडून गेलेल्या इतक्या सगळ्या घटनांचे पडसाद बंगल्यावर उमटले होते. जीव असलेले घटक जीव मुठीत धरून शांतपणे उभे होते. पावसाच्या पाण्याने वाढलेल्या वेड्या-वाकड्या वेली, घनदाट झाडं , सगळेच निपचित पडून होते. एखाद्याला घाबरून घरातल्या अंधाऱ्या कोपऱ्यात दडून बसावं, अगदी तसंच होतं सगळं. आतून बंद असलेल्या खिडक्यांमध्ये मात्र एक सुप्त हालचाल सुरु होती. सारखंच कोणीतरी काचेतून बाहेर बघत होतं. वातावरणात एक भय-युक्त आतुरता होती. सूर आणि असुर दोघांपैकी कुणीतरी दारावर येऊन धडक मारून गेले होते. भर दिवसा बंगल्याच्या अवती-भवती भयाण शांतात होती. तिथे साचलेले पाणी प्यायला येणारी पाखरंही गेले काही दिवस फिरकली नव्हती. दिवस रात्र खडा पहारा असल्यासारखं, प्रत्येक घटक आपल्यातच दंग होता. 

थोडासा डोळा लागल्याने दामोदर ला तसंच ठेऊन शेखर बंगल्यावर आला. फाटकाच्या बाहेरून त्याने आतलं सगळं पाहिलं. या आधी त्याने पाहिलेलं जिवंतपणा आत्ता त्याला दिसलाच नाही. मनातून त्यालाही थोडी भीती वाटली. या वेळी तो एकटा होता, लख्ख सूर्यप्रकाश बंगल्याच्या आवारात पसरला होता. पण मनात असलेली भिती तो नाकारू शकत नव्हता. इथे आपला जीव कोणी घेणार नाही, ही त्याला खात्री होती. पण आपल्या इथे येण्याला कोणाचा तरी प्रखर विरोध होऊ शकतो, ही जाणीव त्याला आतल्या-आत होत होतीच. पण आत गेल्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्याच्या बऱ्याच प्रश्नांची मूक उत्तरं त्याला कदाचित आत मिळणार होती. पहिल्यांदा बंगल्याबाहेर थांबलो, बंगल्यात चोरी करायला आलेल्या त्या तिघांची अशी झालेली दशा, आपल्या जीवावर बेतलेला प्रसंग, तो खंजीर, सगळं-सगळं त्याला जसच्यातसं आठवत होतं. तिळमात्रही ते विसरून जाण्यास वाव नव्हता. आपण या गावचे नाहीत, दुर्यान्वये काही संबंध नाही, तरीही आपल्याला हे सगळे अनुभव यावेत, ही बाब साधी नव्हती. या आधीच्या अधिकाऱ्यांचा इतिहास बघता, कोणालाच असे अनुभव आले नव्हते. 

बंगल्याचे फाटक आवाज करत आत सरकले. अंगण ओलं होतं. पण येण्या-जाण्याची वाट मात्र स्पष्ट दिसत होती. शेखर आत जाऊ लागला. मुख्य दारावर त्यानेच ठोकल्या कुलुपात त्याने किल्ली अडकवली आणि ते उघडून त्याने बाजूला ठेवले. चिखलाने भरलेले आपले बूट त्याने बाहेरच काढून ठेवले. आत काही एक बदलले नव्हते. सगळे आपल्या जागेवर व्यवस्थित होते. कोणीतरी नित्य-नियमाने आवरून ठेवल्यासारखे. फुटलेल्या खिडकीतून वाऱ्याने पाचोळा आत फेकला होता, तेवढाच काय तो बदल घडला होता. आत येऊन त्याने पूर्ण बंगला पहिला. या आधी तो दामोदर सोबत आत आलाच होता. त्यामुळे स्थापत्याची जुजबी माहिती त्याला होतीच. पायऱ्या वर चढून तो त्या मोठ्या तसबिरी पाशी जाऊन उभा राहिला. खाली दिवाणखान्यात झुबरांची किलकील सुरु होती. 

"तू तुझ्या आयुष्यात खूप काही भोगलं आहेस...!" अचानक तो समोर उभं राहून बोलू लागला. " माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या आयुष्यात इतकं घडलं असतं, तर कदाचित मी केव्हाच स्वतःला संपवलं असतं. पण तू असं काहीही केलं नाहीस. मरण यायची वाट पाहिलीस, यातना भोगल्यास, एकांत सोसलास, विरहही स्वीकारला. शेवटच्या श्वासापर्यँत पराभूत मात्र झाली नाहीस...!" अचानक त्याला गहिवरून आले. 

"सगळं तू लिहून ठेवलं. तुला ठाऊक होतं, कुणीतरी ते वाचेल आणि तुझ्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडेल. पण एक विचारतो, खरं-खरं सांग ! तू गेलीस, तुझ्यावर अन्याय अत्याचार करणारेही गेले ! मग प्रतिशोध कुणी कुणावर घ्यायचा ? नियतीने नशिबावर ? भूतकाळाने वर्तमानावर आणि भविष्यावर...?" ते रेशमी पांढरे पडदे वाऱ्यानी थोडे मोकळे केले. 

"तुझा भास अजून इथे जाणवतो. मला, इथल्या प्रत्येक गोष्टीला, बाहेरच्या झाडांना, वेलींना...! तू आहेस हे नाकारता येत नाही. पण का आहेस, हे मात्र अजूनही त्यांच्यासारखं मलाही पडलेलं कोडं आहे." त्याने कमरेला खोचलेलं खंजीर बाहेर काढलं. "हे तुझंच आहे ना ? नीट बघ, याचा वापर झाला आहे." त्याने दोन्ही हातात ते धरलं. " आता कुणी उरलंय असं मला तरी नाही वाटत." 

ती बोलेल या अपेक्षेने तो तिथेच उभा राहिला. अचानक त्याच्या मागून तिच्या अर्धवट उघड्या खोलीचे दार वाजू लागले. ते शेखरला आत यायचे आव्हान होते. त्याला क्षणभर धक्का बसला. पण आज याचा शोध लावल्याशिवाय इथून जायचं नाही, हे तो मनोमन ठरवून आला होता. कमरेला भरलेलं पिस्तुल ही होतंच. अत्यंत सावध रित्या तो आत आला. आतही सगळं व्यवस्थित होतं. एक मोठ्या लाल पडद्यामागे एक मोठं कपाट होतं. त्याने त्या कपाटाच्या कडीला हात लावला. उघडण्यासाठीम्हणून त्याने ती कडी पिळली. ते जराही हललं नाही. त्याने थोडे बळ वाढवले. कपाटावर त्या धक्क्याने हलणाऱ्या पेटीकडे त्याचे लक्ष गेले नाही. एकदम वाऱ्याची एक मोठी झुळूक आली आणि पेटीवर असलेले काहीतरी त्याच्या अंगावर पडले. त्यावर खूप धूळ होती. शेखरच्या डोळ्यात धूळ गेली. ती झटकून त्याने खाली पडलेली वस्तू पाहिली. एक छोटी लाकडी डबी होती. त्यात एकच पान त्याला सापडले. सगळं घेऊन तो उजेडात गेला. 

" हे पान सगळ्या जगासाठी नाहीये. ही काहाणी इतक्यात संपणारी नाहीये. तिच्या किंवा कोणाचाच मृत्यू या दुष्टचक्रास थांबवू शकणार नाही...! जो पर्यंत ते सगळे पून्हा इथे येत नाहीत. त्यांचे इथे पून्हा येणे ठरलेले आहे. हिने तो पर्यंत आपल्या आत्म्याला आताच बंदिस्त करून ठेवणे गरजेचे आहे. इच्छा असूनही तिला बाहेर जाता येणार नाही. हा उलट प्रतिशोध आहे. हिच्या मृत्यूनंतरही हिच्या आत्म्याला प्रताडीत करण्यासाठी ते पून्हा येतील. त्यांच्या कुंडल्याच तश्या आहेत. 

'अर्धा जन्म मानवाचा,अर्ध पिशाच्च असे योग असतील. ते अख्ख्या भूमीला धारेवर धरतील. त्यांच्याशी जोडली गेलेली प्रत्येक मानवजात त्यांच्या कर्माची फळे भोगण्यास बांधील राहील." शेखरने तिथली एक खुर्ची बसण्यास ओढली. 

" प्रत्येकाला या न त्या मार्गाने जन्म घ्यावाच लागेल. इथे यावंही लागेल. मृत्यूच्या भ्याड भयासोबत, जगण्याची उमेद ही येईल...! त्या अमावस्येपर्यंत सगळेच येतील...!"

ते सगळं वाचून शेखरच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. कोडं बरचसं सुटलं. गुंता बराच उकलला. घाई-घाईत त्याने पानाची घडी केली आणि तो बाहेर येऊ लागला. त्याने या वेळेस आठवणीने खोलीचे दार लावले. दार लावताना त्याच्या लक्षात आले. खालचं झुंबर जोरात हलु लागलं होतं. तरी त्याने कडी घातली. आपल्या खिशात बंगल्याची किल्ली असल्याची खात्री तो करू लागला. पण त्याच्या लक्षात आले. किल्ली बाहेरच्या दारालाच कुलुपासोबत लटकत होती. तो तसाच खाली येऊ लागला. दोन पायऱ्या उतरला आणि त्याचा पाय कुणीतरी ओढला. ते ओढणे इतके वजनदार होते, की शेखर उरलेल्या पायऱ्या गडगडत खाली आला. त्याच्या पाठीला आणि खांद्याला मार लागला. अचानक खिडक्या फुटून त्याच्या काचा त्याच्या दिशेने येऊ लागल्या. प्रचंड दुखापतीत त्याने कसेतरी स्वतःला वाचवले आणि एका मोठ्या खुर्चीमागे तो लपून बसला. हळू-हळू सूर्य ढगाआड गेला. भर दिवसा अंधार होऊ लागला. 

झुंबराला कुणीतरी लटकल्या सारखे हलत होते. त्याचा वेध शेखरकडे होता. अचानक त्याच्या कमरेचा पट्टा ओढला गेला. त्याबरोबर पिस्तुलही ओढले गेले. तसेही ते काही कामाचे नव्हतेच. शेखरने दाराकडे पहिले. ते थोडेसे उघडे होते. बाहेर पळायला एकंच मार्ग होता. हा न दिसणारा शत्रू नेमका कुठे होता, हे कळणे कठीण होते. त्याचा वेग आणि त्याच्यातील कपट जहाल होतं. आपला जीव बंगल्यात धोक्यात नाहीये, हा शेखरचा समज केव्हाच हवेत विरला होता. हिंमत करून तो दाराकडे पळत सुटला. पण दाराला स्पर्श करताच दार त्याच्या समोर धाडकन बंद झालं. त्याची आपोआप कडी लागली आणि दाराच्या फुटलेल्या काचेतून त्याला बाहेर पडलेली किल्ली दिसली. आजूबाजूच्या फुटक्या- उघड्या खिडक्या आपल्याकडे दयादृष्टीने पहात असल्याची जाणीव शेखरला झाली. आज पर्यंत नेहमीच आपल्या जागी निश्चल असलेली मायाची तसबीर खिळ्यातून बाहेर निघाली आणि खाली शेखरसमोर आदळली. त्याचे तुकडे झाले. आत्ता पर्यंत शेखरला पुरतं कळून चुकलं होतं की आपण अडकलो आहोत, आणि सुटकेची सगळीच दारं तात्पुरती बंद आहेत. 

जाग आली तेव्हा दामोदरला अस्वस्थ वाटू लागले. हवा उग्र आणि प्रदूषित भासत होती.त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं. दाराला कडी घालून तो बाहेर निघाला. गाव सुनं झालं होतं. एखाद दोन तोंडं दिसली फक्त. बाकी कुणीही बाहेर नव्हतं. तो तडक मंदिरात आला. तिथे काहीच नवीन घडल्यासारखं वाटत नव्हतं. पण शेखर मात्र दिसला नव्हता. त्याने बाहेर पाहिलं. तिथेही तो दिसला नाही. खांद्यावरच्या पिशवी हलकी वाटू लागल्याने, त्याने ती तपासली. त्यात खंजीर नव्हते. त्याला थोडा संशय आला. पळत तो दिगंबरच्या घरी गेला. 

"साहेब कुठे गेले तुमचे." हा प्रश्न ऐकताच दिगंबरच्या पायाखालची जमीनच सरकली. तो तडक कपडे करून उठला. दोघांनी मिळून अख्खा गाव पालथा घातला. शेखर कुठेही दिसला नाही. 

" साहेब बंगल्यावर तर....!" दिवस अर्धा उलटून गेला होता. 

"अजून सूर्यास्त होण्यास वेळ आहे. आपल्याला गेलं पाहिजे. किर्तीकरांनी घेऊन जाता आलं तर पाहू." ते पून्हा मंदिरात आले. 

"तुम्हाला यावं लागेल. शेखर बंगल्यावर गेला आहे." हे ऐकताच आनंद गालातल्या गालात हसू लागला. सगळे त्याकडे पाहू लागले. 

"काळजी नका करू. जिवंत आहे तो...!" असे म्हणत तो हसण्याचा वेग वाढवू लागला. " इतक्या सहज नाही मरत कोणीच....!" 

आता मात्र तिथे असलेल्यांची धाबी दणाणली. कोणाला काहीच सुचत नव्हते. 

"उपयोग नाही होणार जाऊन." कीर्तिकर म्हणाले. " त्याला वाचवायला जाऊ, हे त्याच्याच जीवावर बेतेल." 

"मग ? त्याला असंच सोडता नाही येणार." दामोदर विचारात पडला. पण काहीही करता येणं शक्य नव्हतं. हातातून वेळ आणि धैर्य दोन्ही सुटत चाललं होतं. 

"बाहेर या...!" दिगंबर घाई-घाईत आत आला. दामोदर आणि कीर्तिकर बाहेर आले. बाहेर बराच गोंधळ उडाला होता. पाच-पन्नास माणसं हातात भाले, कुऱ्हाडी ,लाठ्या-काठ्या घेऊन उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर रोष दिसत होता. 

"त्याला बाहेर काढा." त्यातला एक म्हणाला. 

"आमचं गाव आहे हे. त्याचं काय करायचं, ते आम्ही आमचं बघतो. तुम्ही त्याला आमच्याकडे द्या, आणि हे गाव सोडून निघून जा." दुसरा एक जण म्हणाला. 

"गावात जे काही होतंय, ते तुम्ही आल्यापासून ! याआधी कधीही गावाचा जीव असा धोक्यात नव्हता आला.त्याला आमच्याकडे द्या ! आम्ही बघतो त्याचं काय करायचं ते." हातात मशाल असलेला एक माणूस बोलला. गावातले लोक रोज होणाऱ्या प्रकाराला कंटाळले होते. आज याचा न्याय-निवाडा करायचा हे ठरवूनच आले होते. 

"ते जमणार नाही. तुम्हाला काय वाटतं? तूमच्या स्वाधीन केलं, तर तुम्ही सहज त्याला ठार माराल, आणि हे सगळं संपेल ? असं काहीच नाही होणार...!" दामोदरने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. माणसं पुढे सरकू लागली. त्यांच्या डोळ्यात अक्षरश: यमदूत दिसत होते. 

"साहेब, मला वाटतंय, हा प्रकार दिसतोय तितका साधा नाहीये." दिगंबर फक्त दामोदरला ऐकू जाईल असं बोलला. दामोदर थोडं माणसांकडे सरकला. त्याने एकाच्या डोळ्यात पहिले. त्याला वेगळाच संशय आला. तेवढ्यात त्या माणसाने दामोदरवर आपली काठी उगारली. त्याने ती चुकवली खरी, पण त्यामुळे मागे असणाऱ्या लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला.तिथेच चकमक सुरु झाली. विशेष म्हणजे, मंदिराच्या आजूबाजूला रहाणारं कुणीही त्यात नव्हतं. बराच वेळ लढून दिगंबर आणि दामोदर थकले. काही माणसं आत गाभाऱ्यात जाण्याचा प्रयत्न करत होते. त्याआधीच नर्मदेने दार लावून घेतले होते. काय प्रकार चाललाय, हे एव्हाना दामोदर आणि दिगंबरच्या लक्षात आला होता. जमावतली काही माणसं आधीच जखमी होऊन आली होती. ही तीच माणसं होती, जी काही दिवसांपूर्वी आनंदने मारली होती. ती अर्धमेलीच राहिली होती. ही फौज आनंदने येणाऱ्या काळासाठी राखीव करून ठेवली होती. आणि आता ती बाहेर पडत होती. ते शक्तिशाली होते, पण त्यांचं नियंत्रण आनंद करत होता. गावातील इतर लोकांनाही त्याने आपल्या पाशात ओढलं होतं. 

मंदिराच्या दारावर पडलेल्या दबावाने आत्तापर्यंत दार अर्धे खिळखिळे झाले होते. कड्या-बिजागऱ्या निखळू लागल्या होत्या. आतले लोकही घाबरले होते. तेवढ्यात मागून एक खिडकी खाडकन उघडली.भारद्वाजने त्यांना आवाज दिला. त्या एवढ्याश्या खिडकीतुन सगळे बाहेर निघायला लागले. गाभाऱ्यात निपचित पडलेला आनंद मात्र तसाच पडून राहिला. 

"तूर्तास तुम्ही तुमचा जीव वाचवा. त्याला काहीही होणार नाही." सगळे बाहेर सुखरूप पडले. भारद्वाजने खिडकी लावून घेतली. 

"हे सगळे त्यालाच सोडवायला आले आहेत. या गल्लीतून बाहेर पडा. उजवीकडे वळलात की माझं घर सापडेल. बाहेर पिंपळाचे मोठे झाड आहे." त्याने बोटाने दाखवलेल्या दिशेकडे सगळे पळाले. भारद्वाज त्या खिडकीतून आत गेला आणि एका मोठ्या कापडाने त्याने देव झाकला. पेटलेली पणती त्याने विजवली आणि तोही बाहेर पडला. बाहेर अर्धे जखमी झालेले दामोदर आणि दिगंबर आता पुरते थकले होते. दार धाडकन उघडले. झाकलेला देव पाहून ते सगळे अधिक चेकाळाले. आत आता आनंदही उठून हालचाल करू लागला होता. त्याला आपले अंश पाहून बळ आलं. तो तसाच बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागला. शरीरात नसलेली शक्ती आणि आतून होणारा आटापिटा, यात त्याचा पूर्णपणे गोंधळ उडाला होता. 

बाहेर येऊन तो त्याला ठरलेल्या दिशेने चालू लागला. त्याला जाताना बघून दामोदरच्या लक्षात सगळा प्रकार आला. पण तो पर्यंत उशीर झाला होता. कसलीही पूर्वकल्पना न देता दिगंबर आनंदला पकडायला धावला. आनंदने त्याला ओढत त्याच्यासोबत नेले सुद्धा ! दामोदर मात्र खिन्न मनाने त्याच्याकडे बघत राहिला. इतर लोकही आले होते, तसे एक-एक करत निघून जात होते. काही वेळातच पूर्ण मंदिर आणि चौक मोकळा झाला. वेदनेने कण्हत दामोदर ,आनंद गेला तिकडे जाऊ लागला. आनंद त्याला दिसला नाही. पण थोड्याच अंतरावर दिगंबर मात्र रस्त्यावर निपचित पडलेला होता. त्याच्या शरीराची हालचाल थांबली होती. 

सूर्यास्त होऊ लागला होता. सिवपुरीच्या वेशीबाहेर टांगा येऊन थांबला. आत सगळीच शांतता होती. निरोप्या टांग्याजवळ आला. 

" तुम्ही इथेच थांबा. कोणत्याही सुचनेशिवाय गावात जाणं योग्य नाही." तो पुन्हा घोड्यावर बसून गावात जायला निघाला. 

नियतीने प्रत्येकाच्या नाशीबात लिहिलेले खेळ ,काळ खेळवून घेत असतो. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या असंख्य घटना, वरवर जरी सध्या वाटत असल्या, तरी त्यामागचा भूतकाळ विदारक असतो. तो फक्त त्या घटनेशी निगडित लोकांनाच पूर्ण ठाऊक असतो. लेखाला माहिती होतं, की आपल्या मागे लागणारे हे शुक्लकाष्ट आपल्या जीवावर बेतू शकते. पण फक्त आनंदासाठी ती यात उतरली. विलायतेत आलेले अनुभव, पादरीने तिला दिलेले संकेत आणि इशारा, दोन्ही तिने धाब्यावर बसवले होते. आज तिला इथे आणण्याचे कारण म्हणजे, यातून तिची कायमची सुटका व्हावी, हे जरी असले, तरी हे सगळे का घडून आले, हे देखील जाणून घेणे तिच्यासाठी महत्वाचे होते. आनंदवर आलेले संकट पुढे किती काळ तिच्या प्रारब्धाशी खेळणारं होतं, हे सुद्धा तिला जाणून घ्यायचं होतं. 

बराच वेळ टांग्यात बसल्याने तिला अस्वस्थ वाटू लागले होते. हे लक्षात येताच काशीने थोडी तरपाल बाजूला केली. आजूबाजूला काहीही धोका नसल्याचे पाहून ती खाली आली. तिच्या हाताला धरून लेखाही खाली आली. कित्येक दिवसांनी तिला हा सगळा निसर्ग बघायला मिळाला होता. तिच्या बंगल्यातून होणारे सूर्यास्त समुद्रात होत होते. इथे ते टेकड्यांच्या आड होत होते. पाखरं किलकीलत आपल्या घरट्याकडे वळत होती. त्यांची चिल्लीपिल्ली अधीर होऊन गोंगाट करत होती. पावसाने वाढवलेला गारठा वाऱ्यासोबत निवांत झाडा-झुडपातून हिंडत होता. 

"किती सुदंर आहे हे सगळं...!" आपल्या मुलीच्या तोंडून कित्येक दिवसांनी काहीतरी बाहेर पडलं, हे पाहून बाबांनाही थोडं हायसं वाटलं. 

"कित्येक दिवसापासून अश्या एखाद्या ठिकाणी यावं, मनात होतं ! "

" हो, खूप काही घडून गेलं, त्यामुळे आयुष्याचा बराचसा काळ असाच निघून गेला." 

"हो...!" ती तिथेच उभी राहिली. निसर्ग डोळ्यात साठवत. पुढचा एकही विचार तिला शिवला नाही. वेशीच्या आत सुरु असलेला मृत्यूचा तांडव तिला ठाउकही नव्हता. 

निरोप्या गावातल्या चार गल्ल्या फिरून चुकला होता. काहीतरी अघटित घडले आहे, याचा अंदाज त्याला आलाच होता. पण आधीच ठरल्याप्रमाणे तो तडक भारद्वाजच्या घराकडे वळला. सूर्यास्त झाला होता. 

" ते आले आहेत ! तुमच्या सांगण्यानुसार त्यांना वेशीबाहेर थांबवलं आहे." भारद्वाजने दार उघडताच त्याने निरोप दिला. भारद्वाजने एक मोठं पोतं त्याच्या घोड्यावर लादलं. 

" त्यांची गावाबाहेच्या खंडोबाच्या टेकडीवर मुक्कामाची व्यवस्था कर. या पोत्यात सगळं आहे. निघ आता. कोणाशी काही बोलू नको. कुणी हाक मारली तरी मागे वळून पाहू नकोस. निरोप्या घोड्यावर बसला. दार लागलं. तो जसा पूढे सरकू लागला, तसा घोड्याच्या आजूबाजूला धुळीचे लोण वाढू लागले. कोणीतरी आपल्या मागावर आहे, हे कळल्यावर त्याने घोड्याला सुसाट धावण्याचा इशारा केला. तो त्या धुळीच्या लोणाला अर्ध गाव फिरवू लागला. बराच वेळ हा खेळ खेळून झाल्यावर तो वेशीच्या आत उभा राहिला. पोतं तसंच ठेवलं. खाली उतरून त्याने मागे पाहिलं. काहीच नसल्याची खात्री करत तो खंडोबाची टेकडी चढू लागला. वर जाऊन इशारा करताच काशी सगळा लवाजमा घेऊन वर चालू लागली. रात्री खंडोबाच्या टेकडीवरून येणारा धूर पाहून त्या वाड्यात अस्वस्थता निर्माण झाली. भारद्वाजच्या घरात मात्र आशेची एक पणती पेटली. 

किर्रर्र अंधारात कोणीतरी बंगल्याचे फाटक उघडल्याचा आवाज येऊ लागला. अजूनही अर्ध बेशुद्ध अवस्थेत असलेल्या शेखरला थोडी शुद्ध आली. वर टांगलेल्या झुंबरात तो अडकला होता.डोक्यातून रक्त थेंब-थेंब करत जमिनीवर पडत होते. आत अंधार असल्याने त्याला काहीही दिसत नव्हते. मृत्यूचे भय तो पार बाहेर सोडून आला होता. पण या रहस्याचा छडा लावल्याशिवाय मरायचे नाही, हे ही त्याने ठरवले होतेच. अंधारातच त्याने नजर त्या तसबिरीकडे वळवली. बाहेरचे दार वाजू लागले. आत कोण येणार आहे, कशासाठी येणार आहे, याची काहीही कल्पना त्याला नव्हती. 

"बाहेर असतास, तर आतापर्यंत प्राण गेले असते." तोच खर्जा, भारदस्त आवाज शेखरच्या कानी आला. 

" तिकडे जे काही चाललंय, आम्हाला ते थांबवता येणार नाहीये."

"कोण आहात तुम्ही. आणि माझ्या मागावर...?"

"तेच सांगायला आलोय...! आज पर्यंत वेळ आली नव्हती. आणि यापूढे वेळ मिळणार नाही...!" तो आवाज आता जवळ येऊ लागला होता. 

"जन्म पूर्ण होतो, तो आत्मा सुखरूप दुसऱ्या योनीत जातो तेव्हा." तो आवाज शेखरच्या आजूबाजूला फिरत होता. "आपलं कार्य अर्धवट राहिलं, तर त्याला धड मोक्षही मिळत नाही, आणि धड दुसऱ्या जन्मांतही जाता येत नाही. गत जन्माच्या खुणा आहेत या. अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी कामी येत असलेला जन्म आहे हा ? "

" मला काही कळत नाहीये. आधी मला खाली उतरवा...!" शेखर जास्त अस्वस्थ होऊ लागला होता. 

"हेच गाव, गावात आल्यावर तुझ्यासोबत घडलेल्या घटना, हा बंगला...! तुला वाटतं, हे सहज घडतंय ? " शेखर विचार करू लागला. 

"इथे आलाय का कधी...?" त्याने प्रश्न विचारला. 

"नाही...!"

"आलायस..!" शेखर पुढंच ऐकण्यासाठी अधीर होता.

" मागचा पूर्ण जन्म इथे घालवलाय तू...?" 

"मी...? कसं शक्य आहे." 

"हो...! या वास्तूत, या दऱ्या-खोऱ्यात, या रानात." त्या आवाजात आता हळू-हळू बदल होत होता. त्यात एक जिव्हाळा ऐकू येऊ लागला होता. 

" माझा मुलगा...माझा लेक...माझा सर्जा...!" 

हे ऐकून शेखरचा स्वतःच्या कानावर विश्वास बसलाच नाही. 

" हे कसं शक्य आहे ? "

" का शक्य नाही ? तुला किंवा मला विचारून हे सगळं होत नसतं बाळा. हे सगळं नियती लिहीत असते." शेखर तसाच लटकत होता. 

" तुझं प्रेम होतं न तिच्यावर ? पण नियतीने ऐनवेळी तुमच्यावर घाला घातला आणि सगळं काही विस्कटलं. त्या नराधमाने तुम्हाला, मला, या सगळ्या बंगल्याला उद्धवस्त केलं."

"खोटं आहे सगळं, हे फक्त कथांमध्ये होत असतं."

"कथा कुठेतरी अनुभवातून जन्माला येत असतात बाळा...! आणि हा अनुभव आहे. अजूनही तुला वाटतं, हे सगळं खोटं आहे ? घडणाऱ्या घटना, गेलेले जिव, लोकांचे होणारे हाल...!"

"याला पुरावा काय ?" 

" तुझा अजूनही न गेलेला जिव...!" हे ऐकुन शेखरचे धाबेच दणाणले.

" तू गावात आल्यापासून मी तुझ्या सोबत आहे. रोज तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसावं लागायचं. तुला या जन्मांत पाहिलं आणि धन्य पावलो. कित्येक वर्ष या बंगल्याबाहेर पहारा देतोय. कुणी आत येऊ नये म्हणून राखण करतोय. या मालकांचं कधीही न फिटणारं ऋण फेडत !"

शेखरला त्याच्या सांगण्यात आता कुठे तथ्य वाटू लागलं. आपण आल्यापासून या क्षणापर्यंत घडलेल्या घटनांचा पूर्ण आवेग आज या वळणावर येऊन थांबला होता. आपल्याला येणारा आवाज हा आपल्या गत-जन्मीच्या पित्याचा आवाज आहे, यावर मात्र त्याचा विश्वास अजूनही बसत नव्हता. 

"तुझा मृत्यू मी माझ्या डोळ्याने पाहिला...!" त्या आवाजात एक गहिवर येऊ लागला. "पण तुला वाचवू मात्र शकलो नाही. इतकी मुभा नव्हती मला. माझा जीव जाताना डोळ्यासमोर तूच होतास. तुझ्या काळजीने मला आजवर इथे अडकवून ठेवलं होतं. माझ्या शिवाय तुला, आणि तुझ्याशिवाय मला नव्हतं रे कुणी...!" झुंबर थोडं खाली येऊ लागलं. आपली सुटका होतेय, हे शेखरलाही कळलं.

" ज्या नराधमाने तुमच्या आयुष्याची राख-रांगोळी केली, हा तोच आहे. मागच्या जन्मी त्याच्या मृत्यूचा राहिलेला सूड उगावतोय...! " शेखरच्या पायाला जमीन लागू लागली. ती फरशीवर स्थिरावला. तसा आवाजही शांत झाला. त्याने स्वतःला सावरले. आजूबाजूचा कानोसा घेतला. 

"तुला हे सगळं कळावं, म्हणून तुला इथे अडकवून ठेवला होता. तुला ज्या जखमा झाल्यात, त्या भरतील. पण काळाच्या अंगावर झालेल्या जखमा भरून निघायला वेळ लागेल...!" आवाज हळू-हळू मंदावू लागला. 

"हा बांगला, इथली भूमी सोडू नकोस. बाहेर तुझ्या जीवाला धोका आहे. तुला वाचवण्याचे बळ नेहमी माझ्या अंगात नसेल...! पण वेळ आल्यावर तो इथे येईलच." शेखरने दार बंद होण्याचा आवाज ऐकला. आतल्या अंधारात आता तो एकटा होता. गत जन्मीच्या बऱ्याच खुणा इथे लपल्या होत्या. त्या शोधायच्या होत्या. पुढे सगळेच चांगले घडेल, याची शाश्वती त्यालाही नव्हती. पण यात आपण एकटे नाही, ही त्यालाही खात्री होती...

...

" ते आलेत...!" आत भारद्वाजने कळवले. " आता जास्त सावध व्हायला हवं ! पुढचा सुडाचा प्रवास अवघड आहे." पंत, नर्मदा, कीर्तिकर, सगळेच धास्तावले होते. मंदिरात जे घडलं, त्याची धुसरशी कल्पना देखील कुणाला नव्हती. सगळ्यांच्या मनात आता मृत्यूच्या भयाने घर केले होते. भारद्वाजने ऐनवेळी त्यांना त्याच्या दाढेतून बाहेर काढले होते. 

या दुष्टचक्राला बरेच वळसे होते. पुनर्जन्म आणि सूड एकत्र आले, की उभं रहाणारं सुडचक्र अतिशय घातक होत जातं. त्याला माणूस, नाती-गोती ,जिव्हाळा यातील कशाचीच तमा नसते. ते आपल्या मार्गावर येणाऱ्या प्रत्येकाची गत करत जातं. इथेही तसेच होते. काहीही संबंध नसलेले ते चोर, दिगंबर, हकनाक जीवानिशी गेले होते. आपल्या अतिताशी नुकताच सामना झालेला शेखर अजून बंगल्यात अडकला होता. फक्त आनंदशी संबंध असलेली लेखा , एक शिक्षा भोगून, दुसऱ्या शिक्षेच्या दाराशी उभी होती. आणि पुरातन इतिहासाचा अभ्यास करणारा दामोदर या सगळ्यांपासून लांब असून देखील आता याचा अविभाज्य भाग झाला होता. ही प्रत्येकाची गत जन्मीची कर्म होती, जी रोज एक नवीन अध्याय जोडत होती. याचा अंत निश्चित होता. पण तो कसा, कोणाच्या हातून, आणि कुठे होणार, हे कोणालाही माहित नव्हतं. 

चार दगडं एकमेकांना जुळली. काशीने चूल मांडली. हात-पाय खरचटून आलेला निरोप्या थोड्या अंतरावर तंबू ठोकत होता. 

"गाव चांगलं नाहीये." काशी लाकडं सावरत म्हणाली. मध्येच तिची नजर अंधारलेल्या गावाकडे गेली. लांबून सुईच्या टोकाइतक्या दिसणाऱ्या मशाली टिमटीम करत होत्या. 

"गाव चांगलंय, माणसं माणसासारखी वागत नाही." निरोप्या तंबू ठोकत होता. " माणसं राक्षसी वागायला लागली. माझा जन्म आहे याच गावचा ! जुनी लोक सांगायची आमची ! सगळं होतं गावात. दया, माया, एकी, जीवाला जीव देणारी नाती-गोती. पण यांच्यातच एक-दोन वेगळ्या प्रवृत्तीचीही माणसं होती. त्यांच्या कर्माने गावावर असली संकटं यायला लागलीत." त्याने सोबत आणलेला एक कंदील पेटवला आणि तंबूच्या बाहेर एका खांबाला टांगला. कंदिलाच्या त्या रेशमी उजेडात काशी चमचम करत होती. लेखाच्या आईसोबत आली होती. आई गेली आणि काशीच्या नाशीबात आयतं मातृत्व चालत आलं. लेखाला मोठा करता-करता तिच्या चेहऱ्यावर म्हातारपण पिकत गेलं. स्वतःचा असा संसार तिला नव्हताच. 

"लग्न करून मी सासरी गेल्यावर तू इथे काय करशील गं ?" लेखाच्या या सहज प्रश्नाला उत्तर काशिकडे नव्हतं. 

" चार भिंतींमध्ये खूप कामं असतात !" एवढ्यावर लेखाची समजूत काढली. 

लेखाच्या आईला दिलेल्या वचनात ती बांधील राहिली. विलायतेहुन लेखाच्या पत्रात तिचा थोडासा उल्लेख वाचून तिला आभाळाइतका आनंद व्हायचा. वेदनाविना झालेल्या या आईवर चांदेकरांचा आणि लेखाचाही तसाच विश्वास होता. यया सगळ्याला तोंड द्यायला तिच्याकडे कुठून बळ आलं, माहित नाही, पण तिने हिमतीने सगळ्याचा सामना केला. आजही सगळी भिस्त तिच्यावर होती. ती चतुर होती, सावध होती !

"हत्यार चालवता येतं का तुला ?" जेवण झाल्यावर निरोप्या तंबूच्या बाहेर आपला एक छोटा सुरा पाजत बसला होता. 

" नाही." 

" वेळ शिकवील सगळं ! हे असुदे सोबत." नुकताच पाजलेला सुरा ,नव्या धारेने लखलखत होता. 

"रात्री काही वाटलं, तर मला आवाज द्या. मी इथे टांग्यात झोपलोय."

आत मंदिरात जायला वाव नव्हता. निरोप्याने कंदील बारीक केला.मशालही विजवली. एकाच तंबूत काशी आणि लेखा होते. बाबा आणि निरोप्या टांग्यात होते. आळी-पाळीने पहारा द्यायचं ठरलं होतं. 


नर्मदा देखील काही वेगळी नव्हती. फार वर्षांपूर्वी पंतांनी तिला आणि तिच्या आईला गावात आणलं. आपल्या अवती-भवती चालल्या सामान्य गोष्टींच्या आतलं काळं-बेरं ती अचूक ओळखत होती. गावात एखाद्या जागेचा संशय आला, माणसाला, बाईला, पोरांना बाधा झाली, की नर्मदा आणि तिची आई त्यांना आपल्या झोपडीत घेऊन येई. माय-लेकी त्याची सेवा करायच्या. बऱ्याचदा ती बाधा फोल ठरायची. पण यांनी केलेल्या इलाजाला मात्र गुण यायचा. मिळेल तितकं पदरात पाडून घेण्याचा प्रामाणिकपणा दोघींच्या अंगी होता. पण गावातील अधाशी वैदूंची नजर त्यांच्यावर पडली. त्यांचे बंद पडू लागलेले धंदे यांच्या मुळावर उठले. एक दिवशी रात्री झोपडीला लागलेल्या आगीत नर्मदेचं सगळं उद्धवस्त झालं. सुमननी तिला पदरात घेतलं. तिचं लग्नही लावून दिलं. पण तिच्या अंगी , अज्ञाताला अचूक ओळखण्याचा गुण तिच्या अंगी आजही होताच. तिला सुमन आणि पंतांनी जवळच ठेवलं, ते कदाचित आजच्या दिवसासाठीच ! 

अमावस्या जवळ आली होती. प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर हरल्याचे भाव होते. गेलेले जीव रात्री स्वप्नात येऊन विनवण्या करत होते. गावातला प्रत्येक काळा कोपरा अधिक गडद होऊ लागला होता. आलेला दिवस बघता-बघता जायचा. काहीही अघटित घडले नाही, याचे समाधान असायचे, पण काही स्कारात्मकही घडले नाही, याचा धाकही वाटू लागला होता. 

भारद्वाज आपल्या देवघरात पूजा करत होता. त्याचा पूजा करण्याचा वेग आज रोज पेक्षा जरा जास्त होता. हातातलं काम लवकर उरकून, कुठेतरी जायच्या विचारात तो होता. त्याने पटापट देव धुतले, कपडे करून त्याने बाहेर जाण्यासाठी दार उघडले. 

"अहो, काय घाई आहे, आणि गंध कुठे आहे ?" त्याच्या बायकोने त्याला मागवून हाक मारली. काहीही न बोलता एक ठिपका त्याने स्वतःच्या कपाळावर ठेवला आणि तो बाहेर पडला. जाताना त्याने घराला बाहेरून कडी घातली , खिशातून एक लाल रंगांची चिंधी त्याने त्या कडीला अडकवली. अलीकडे-पलीकडे कुठेही न बघता तो तडक वेशीबाहेर आला. 

" तुम्ही आज गावात या ! मी सांगेन त्या मार्गाने." काशी , चांदेकर त्याच्याकडे पाहून अवाक झाले. 

"मी भारद्वाज, पुजारी आहे. घाबरू नका !" निरोप्याने त्याला आधीच ओळखले. तो रात्री सोडलेला टांगा बांधत होता. 

" बरोबर माध्यान्ह झालं, की त्या बाजूने तोंड झाकून गावात यायचं. ती पाठ आहे गावची. रस्ता थोडा अवघड आहे. हा आहे तुमच्यासोबत." निरोप्या कडे बोट दाखवत त्याने त्यांना सांगितले. 

"तुम्हाला आमचा पत्ता कुणी दिला ?" चांदेकरांना प्रश्न पडला. 

" सगळ्या शंका दूर होतील. काळजी नका करू." एवढे बोलून तो खंडोबाच्या मंदिरात गेला. 

बाहेर उजडलेला दिवस बघून शेखरला हायसं वाटलं. कालची रात्र त्याने खूप कष्टात घालवली होती. भीमा असाच पाठ दाखवून निघून गेला होता. आपल्या गत जन्मीच्या बापाला साधं नीट भेटता ही आलं नव्हतं. अजूनही त्याला अपेक्षा होती, की बंद दारातून तो आत येईल...पोराला पोटाशी धरेल. सुकलेला गळा भरून आला. त्याने फारशीला हात लावला आणि तसाच तो कपाळाला लावला. त्याला एकदम रडू कोसळले. 

"रडू नकोस...!" एकदम त्याला एक कोमल आवाज ऐकू आला. 

" आपलं बालपण आठव...! किती सुंदर होतं ! दिवसभर खेळायचो. रानात, दर्याखोऱ्यात घोड्यावरून हिंडायचो. नदीवर निवांत पाण्यात पाय टाकून बसायचो" 

"हो , तू घाबरायची. मी बळजबरीने तुझे पाय त्या पाण्यात धरून बसायचो...फक्त तुझी भीती जावी म्हणून !" गहिवरल्या आवाजात शेखरने तिला उत्तर दिले. रात्री थकव्याने झालेल्या नाजूक झोपेत त्याला बराचसा पूर्व जन्म आठवला. 

" तू शिकवलेलं सगळं माझ्या लक्षात होतं. पण ऐनवेळी काहीच लक्षात राहिलं नाही. काहीही आठवलं नाही...! खूप अंधार होता, आणि तो हल्ला ही खूप घातकी होता."

"तू दिसत नाहीयेस मला...!" उठून शेखरने आपल्या आजूबाजूला पाहिलं. 

" तू मला नाही पाहू शकणार.मी जन्मांतही नाहीये, मृत्यूतही नाहीये. धड पूर्ण मनुष्यही नाहीये मी आता." तिलाही भरून आले. "मी अजूनही गेल्या जन्मात आहे. तू मात्र नवीन शरीर धारण करून आला आहेस. त्यामुळे मी तुला दिसणे शक्य नाही." 

"तुझ्या ऐवजी मी का नाहीये ?" 

" कारणं आहेत त्याला." त्याला पैंजणाचा आवाज ऐकू आला. एकाच पायातील होते ते. 

" तुझ्या मृत्यूचा सूड मी घेतला होता. त्याला मी मारलं होतं. कोणत्याही शस्त्राने नाही. फक्त मनाचे आणि भयाचे खेळ खेळून. त्याच्या मनात मृत्यूपेक्षा मृत्यूची भीती जास्त होती. तो घाबरत होता. तो मनाने कमजोर झाला होता. त्याला मृत्यूने गाठलं, त्यावेळी तो पुरता खचून गेला होता. राग ,द्वेष आणि भीतीने झालेला मृत्यू मानवाला सहज मुक्तीमार्गावर जाऊ देत नाही." ती खाली आली. त्याच्यापासून काही अंतरावर ती उभी असल्याचा भास शेखरला झाला.

"आणि तू...? " त्याने तिला विचारले. 

"माझा मृत्यू झाला, तेव्हा माझ्याही मनात राग, द्वेष, सूड या सगळ्या भावना होत्याच. कदाचित तू पुन्हा येशील,म्हणून मी थांबले असे मला वाटत होते. पण...!" ती मध्येच थांबली. 

" पण..पण काय ?" 

" त्याने मला जाऊ दिलेच नाही. त्याचा प्रतिशोध अपूर्ण राहिला. मी ज्या योनीत त्याचा वध केला, त्याच परिस्थितीत मला त्याने बांधून ठेवले. त्याने माझे शरीर संपवले. माझ्या आत्म्याने त्याची प्रतारणा केली होती. त्या आत्म्याला संपवायचे आहे."

"पण तू बाहेर पडू शकली असतीस...!"

"बाहेर काहीही नव्हतं माझ्यासाठी. कोणीही ओळखीचं नाही. कुणी बोलणारं, ऐकून घेणारं नाही. या एकांतात मी गेले कित्येक वर्ष तुझी वाट पाहिली." 

"मला नाही कळलं हे...कधीच नाही !"

त्याच्या डोळ्यात तिला एकदा बघायची इच्छा तीव्र होत होती. तिला देखील त्याच्यासमोर यायचे होते. मागच्या जन्मी अपूर्ण राहिलेली अनेक स्वप्न नियतीच्या या खेळात कधीही पूर्ण होणारी नव्हती. तिचा आवाज कानी आल्याने त्याला थोडे बळ मिळाले. गेले अनेक तास तो या जन्मी कोण होता, हे सगळं विसरला. गेले काही तास, तो त्याचा मागचा जन्म जगत होता. त्याला बरंच काही आठवलं होतं. त्याच्या बापाचा मृत्यू, त्याने त्याचा घेतलेला सूड, त्याची स्वतःची हत्या आणि त्यानंतर या कहाणीत अपूर्ण राहिलेले सगळेच जन्म त्याला आठवत होते. 

" मी काय सांगते, ते नीट ऐक. तो या गावात आला आहे, तेच मुळात तुला आणि मला संपवण्यासाठी. त्याला या जन्मी मारून संपवता येईल, पण त्याला संपवताना, तो मुलगा ...!"

हे वास्तव होतं. सर्जा आणि मायाच्या प्रेमापेक्षा कित्येक जास्त पटीने विदारक आणि थरारक. दोघांचे वर्तमान एकमेकांसमोर उभे राहिले, तेच वेगवेगळ्या वेशात. वेगवेगळ्या देशात असूनही ते आज एकत्र आले आणि अदृश्य स्वरूपात ती आणि स्पर्श न करता येण्यासारखा तो...! मागच्या जन्मी अपूर्ण राहिलेला मृत्यू आणि जन्म, हे देखील या जन्मात आलेच होते. दोघांचे ध्येय एक होते. वाटा आणि समार्थ्यही वेगवेगळे. शेखरला मनुष्य म्हणून त्याच्याशी लढायचे होते. मायाला एक आत्मा म्हणून त्याला बळ देऊन स्वतःलाही वाचवायचे होते. 

" हे सगळं झालं, की मी तुझ्यासोबत येईन."

"आज सोबत आहोत न आपण...!" तिने त्याची समजूत काढली. 

" असं नाही...! तुला बघता यावं, स्पर्श करता यावा...! तुझं ऐकून तुला बरंच काही सांगता यावं म्हणून." 

" सगळं मनासारखं झालं असतं. तर कदाचित आपण आज एकत्र जगलो असतो, या जगाचा निरोप आनंदाने घेतला असता...!" 

शेखरच्या वेदना कुठल्याकुठे नाहीश्या झाल्या होत्या. तो तिच्या अदृश्य स्वरूपात देखील मग्न होत होता. बाहेर काय चाललंय, याची तमा त्याला नव्हती. पण ती मात्र अस्वस्थ होत होती. तिला हुरहूर होती, ती त्याच्या जीवाची ! तिला काळजी लागली होती, ती त्याचं या जन्मी काही बरं-वाईट झालं तर...?


हातात एकही मार्ग न राहिलेला दामोदर, हतबल होऊन नैराश्येच्या मार्गावर होता. कोणताही सोईस्कर उपाय त्याच्या आत्तातरी त्याच्यासमोर नव्हता. तो वाट बघत होता, ते फक्त शेखर समोर येण्याची. शेखरचा शोध त्याला बंगल्यासमोर घेऊन आला होता. न भिता त्याने फाटक उघडले. आत काहीतरी घडून गेल्याची कुणकुण त्याला बाहेरूनच लागली. आज कोणतेही हत्यार त्याच्याकडे नव्हते. त्याला समोर दिसत होते, ते बंगल्याचे बंद दार ! धाडसाने चालत तो दाराजवळ आला. काचेवर रात्रीतून जळमट साचलं होतं. त्याने ते बाजूला केलं. आतल्या तोडक्या उजेडात त्याला एका खांबाला टेकून बसलेला शेखर दिसला.त्याला तो श्वास घेताना आणि किरकोळ हालचाल करताना दिसल्याने दामोदरचा जीव भांड्यात पडला. दाराबाहेर हालचाल जाणवू लागल्याने शेखरही सावध झाला. एवढ्या वेळात त्यानें त्याची बंदूक शोधून ठेवली होती. त्याला खंजीरही सापडलं होतं. त्याला बाहेर दामोदर दिसला. त्यास त्याने संकेत करून डाव्या तुटलेल्या खिडकीकडे यायला सांगितले. 

" इथे कसे फसलात तुम्ही ? तुम्हाला अर्धा गाव शोधतोय !" 

" दामोदर, यातलं काहीही आत्ता सांगता येणार नाही. फक्त एक लक्षात ठेवा, की त्याचं लक्ष मी आहे."

"दिगंबर मारला गेलाय...! आणि तो मंदिरातून नाहीसा झालाय."

"हे तुमच्या जवळ असू द्या...!" आपलं खंजीर त्याला देत शेखर म्हणाला. 

"आणि तुम्ही ? "

" मी इथे आहे, तो पर्यंत मला काहीही धोका नाहीये. आता मी काय सांगतो, ते नीट ऐका...!"

काही वेळाने दामोदर तिथून बाहेर पडला. जाताना त्याच्या शंकेचं बरचसं समाधान झालं होतं. तिथून निघून तडक तो त्या वाड्याच्या रस्त्याला लागला. 

भर दुपारी टांगा धापा टाकत भारद्वाजने सांगितलेल्या वाटेवर निघाला. निरोप्याच्या हातात लगाम होती. घोडा भरधाव धावत होता. गावाची वेस पार विरुद्ध दिशेला राहिल्या होत्या. दिवसाचा मध्यान्ह ऐन भरास आला होता. सूर्याच्या त्या उजळ पसाऱ्यात दुष्ट शक्तीचा प्रकोप कुचकामी ठरतो थोडावेळ. तिथे जागृत होणारे काही ग्रह, काही काळापुरती त्यांना मर्यादा घालतात. रात्रीच्या अंधारात होणारे पापांचे प्रकोप, यावेळी जरा मंदावलेले असतात. भारद्वाजने घालून दिलेली वेळ सर्वश्रुत होती. टांगा आपल्या इस्पित स्थळी पोहोचला. आजूबाजूला चिटपाखरू देखील नव्हतं. बाहेर थोड्या अंतरावर सगळे थांबले. काशी टांग्याखाली उतरली. निरोप्याने घोडा सोडला. घोडा पूढे सरकू लागला. त्याच्या मागोमाग सगळे जाऊ लागले. गावाची हद्द आली. लेखाने आपले पाऊल गावाच्या हद्दीत टाकले. तिच्या अंगावर सरसरून काटा आला. पायाला चटका लागल्यासारखा तिने पाय झटकला. क्षणभर तिला काही सुचले नाही. तिचा मंदावलेला वेग काशीच्या लक्षात आला. " थोडा त्रास होईल." निरोप्याने त्यांना ताकीद दिली. "गावातल्या प्रकाराचा प्रभाव." प्रत्येकाने गावात प्रवेश केला. एखाद्या तुंबळ युद्धांनंतर नी:पाटाचे अवशेष उरावे, तशी गत गावाची झाली होती. 

"हे सगळं त्यांनी केलंय ?" चादेकरांनी निरोप्याला विचारले. 

"हो, हे त्याचेच काम आहे." चादेकरांनी मागून येणाऱ्या लेखाकडे एक कटाक्ष टाकला. काशी शांतपणे तिच्या मागवून चालली होती. त्या निमुळत्या गल्लीतून चालत चौघे मुख्य चौकात आले. 

"या सगळ्याच्या मुळाशी हा चौक आहे. इथूनच या रक्तरंजित कथेला सुरवात झाली." चालताना चांदेकरांचे चित्त थाऱ्यावर नव्हते. क्षणभर उगाच आलो, असेच त्यांना वाटले. जो-तो घरातुन या नवीन तीन मणसांकडे बघत होता. त्यांच्या डोळ्यातील संशय आणि भय स्पष्ट दिसत होतं. सुमारे अर्धा मैल चालून एका जुन्या घरासमोर ते थांबले.भारद्वाज बाहेर आला. 

" हा सगळा खेळ नशिबाचा आहे. याच्याशी संबंध असलेले सगळेच आता इथे जमले आहेत." सगळ्यांना एकत्र करून भारद्वाज बोलू लागला. त्याने आजवर घडलेलं सगळं काही ,वहीत होतं, तसं सगळ्यांना सांगितलं. तिथे जमलेल्या जवळ-जवळ सगळ्यांचाच, आज घडत असलेल्या घटनांशी थोडातरी संबंध होताच. आनंदच्या कुंडलीत असलेला दोष, आणि शुवापुरीशी त्याचं असलेलं नातं, लेखाला आलेले अनुभव, ही बरीचशी गणितं आता कुठे उलगडू लागली होती. 

"तुम्हाला इथे बोलवण्यामागे हाच हेतू होता. तुमच्या मुलीला होणारा त्रास ,इथून सुरु झाला आहे. आनंदच्या शरीरात जे काही आहे, ते आनंदला इतक्या सहजा-सहजी सोडणारं नाहीये. त्याच्या जवळ जाऊ पाहणाऱ्या, अथवा त्याला त्याच्या वास्तवाशी घट्टपणे जोडून ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो त्रास देईल. त्यांच्या आणि आनंदच्या नात्यात तो भीतीची भिंत म्हणून उभा राहील." भारद्वाजने चांदेकरांना सांगितले. 

"तुम्ही काढलेली कुंडली योग्य होती." भारद्वाज आता किर्तीकरांकडे वळले. "आनंदच्या जन्माच्या वेळेस असलेला ग्रहयोग हा त्या कुंडल्यांसाठी पोषक होताच. आणि तसाच योग येणारी अमावस्या आहे. दीड दिवसानंतरची ! हा एक शाप आहे. हे कधीही न संपणारं एक शुक्लकाष्ट आहे. यात तुम्ही आत शिरता, तुम्हाला त्रास होतो, तुम्ही भोगता, कमकुवत असाल तर तुमचा बळीही जातो ! आणि यातून तुम्ही तरून गेलात, तरी हा शाप मात्र आपलं पुढंच सावज शोधत निघून जातो. असंख्य अतुप्त आत्मे, पाताळात दडून बसलेली असंख्य गुपीतं, गेले कित्येक युगं या शापचं रक्षण करतायत. आपण मात्र साधारण मानव आहोत. हे का घडतंय, कोणामुळे घडतंय, आपण याचा विचार करतो, आणि थकलो, की विचार करणं सोडून देतो." 

"पण तुम्हाला हे सगळं कसं ठाऊक...!" सहज पंतांच्या मनात शंका आली. 

" तुम्ही आनंदचे वडील ना ...?" भारद्वाजने त्यांना उलट प्रश्न केला. 

"हो...!" 

भारद्वाजने किर्तीकरांकडे पहिले. कीर्तिकरांनी आपली पिशवी उघडली. त्यात कापडात गुंडाळी करून ठेवलेला एक निरोप त्यांनी भारद्वाजच्या हाती ठेवला. 

" अनावधाने झालेल्या पापाची परतफेड करण्यासाठी दोषी जमा होतायत. त्यांचा दोष माहित नसताना सुद्धा, त्यांना बळी जावे लागेल. त्यांच्या चिकित्सेला आणि प्रश्नांना काय उत्तर द्यावे ? आल्या-आल्या अकस्मात त्यांना काळाने अघोरी दर्शन दिले. मी तिथेच होतो. फार काळ सत्य लपून रहाणार नाही, या न त्या मार्गाने ते अक्राळ रुपात समोर येईलच. आपल्या आज्ञेप्रमाणे त्यांना सावध करेन. "

"हा मी त्यांना पाठवलेला पहिला निरोप होता. मला खात्री नव्हती, पण या सगळ्यावर मात करायची असेल, तर या सगळ्यांना याच दिवशी इथे येणं भाग होतं." 

सगळे सुन्न होत होते. उकलणारे एक-एक गूढ आता प्रत्येकाला विनाशाच्या दाढेत ओढू पहात होते. 

"आता...पुढे काय ?" चांदेकर अधिक अस्वस्थ होऊ लागले होते. 

"आता जे काही करायचे आहे...ते हिला...!" लेखाकडे बोट दाखवताच चांदेकरांची बोबडी वळली. त्यांचा घसा पूर्ण सुकला. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला.

"नको, नाही...! माझ्या समोर माझ्या मुलीला तुम्ही मृत्यूच्या खाईत लोटता आहात. मी तसे होऊ देणार नाही...!" त्यांनी लेखाचा हात धरला आणि ते दारापाशी जाऊ लागले. 

"नाही जाता येणार तुम्हाला...!" भारद्वाज त्यांना शांतपणे म्हणाला. ते थांबले. 

" सहसा तुम्हा लोकांचा यावर विश्वास बसत नाही. पण माझं ऐका...! यातून तिची सुटका नाही. " भारद्वाज त्यांना सामोरं गेला. 

"इथून गेलात, आपल्या घरी सुखरूप पोहोचलात, तरीही तुमच्या मुलीची यातून सुटका होणार नाहीये. उद्या त्या मुलाचं काही बरं-वाईट झालं, तरीही नाही. कारण ती आता याचा भाग झाली आहे. तिची सुटका करण्याचा मार्ग, तिलाच चालावा लागेल." बाजूला टांगलेल्या खुंटीवरच्या पिशिवीतून त्यांनी कापूर बाहेर काढला. लेखाच्या तळहातावर ठेऊन त्यांनी तो पेटवला. पेटत्या कापराचा धूर त्यांनी तिच्या नाका-तोंडाशी धरला. त्या सुगंधाने तिला जरा भान आले. 

"हे बघ, ज्या मुलावर तू आजही अतोनात प्रेम करतेस, तो तुला इतक्या सहज मिळणार नाहीये. त्याला तुला तुझ्याकडे आणावं लागेल. मृत्यूच्या दाढेतून ओढून...! तुझी आहे का तयारी ? " भारद्वाजने लेखाला विचारलं. 

"आहे...!"

भारद्वाजकडे पहात ती पूर्ण आत्मविश्वासाने म्हणाली. 

"मला ठाऊक आहे, यात माझा जिवंही जाऊ शकतो. पण माझी आहे तयारी." 

पंतांना रडू कोसळले. चांदेकरांनी मुलीच्या पाठीवर हात ठेवला. ते काहीच बोलले नाही. 

"जे होईल, ते पहिले जाईल. शेवटच्या श्वासापर्यँत मी माझ्या मुलीच्या मागे उभा राहील." चांदेकरांना समजून चुकले होते, की या सगळ्याचा सामना करण्यावाचून दुसरा पर्याय नशिबाने त्यांच्या समोर ठेवला नाहीये. 

"येणारे दीड-दोन दिवस आपण आपल्या मृत्यूला सामोरे जाणार आहोत. ही जागा सगळ्यात सुरक्षित आहे. इथे तो येऊ शकत नाही." 

सगळ्यांनी अंधार पडण्याची वाट पाहिली. सगळं शांत होताच भारद्वाजने लेखाच्या पदराला रक्षा बांधली. 

"स्त्रीचा पदर तिच्या लज्जा रक्षणासाठी असतो. पण आज पासून ते परवा सकाळपर्यंत, तुझा पदर तुझ्या जीवाचं रक्षण करेल." आणि त्यांनी घराचे दार उघडले. 

" कोणीही समोर आलं, कोणीही परावृत्त केलं तरी आपल्या वाटेवरून हटू नकोस. तुझ्या मार्गात असंख्य रोडे उभे रहातील. पण विचलित होऊ नकोस, घाबरू नकोस." दाराची कडी धरत ते म्हणाले. लेखा चालायला लागली. चांदेकरांचे हृदय पिळवटून निघाले. तिने जाताना एकदा तिच्या बापाकडे आणि काशीकडे पहिले. काशी शांत होती. लेखा बाहेर चालत गेली. 

....

भारद्वाजचे घर आता थोडे मागे राहिले होते. गाव नवीन, रस्ते नवीन. लेखाची पाऊलं आनंदच्या शोधात हळू-हळू पूढे पडत होती. एका घरासमोर येताच तिची पावलं थबकली. त्या घरातून एका स्त्रीच्या किंकाळ्या बाहेर पडत होत्या. घराच्या खिडकीतून एक दिवा आपला मलूल प्रकाश बाहेर पाडत होता. 

"ए, ये न, माझं बाळ बघ न, हलत नाहीये. कित्ती वेळ झालं, हसत नाही ! सहा महिन्यांचं आहे. ये न, माझ्या बाळाजवळ थांब थोडं." ती स्त्री लेखाला पहाताच खिडकीपाशी आली आणि तिच्या विनवण्या करू लागली. 

"ये न, तू पण बाई आहेस न ? माझं रडणं तुझ्या हृदयापर्यंत पोहोचत नाहीये का ?" ती बाई आता जोरा-जोरात रडू लागली. खिडकीची दारं अपटू लागली. लेखाला तिची दया येणं सहाजिक होतं. तिने तिच्याकडे पाहिलं. तिच्या घराकडे जायला तिने पाय वळवले.

"ये...ये...!" अचानक त्या बाईने आपला सूर बदलला. लेखा सावध झाली. 

"ये न, घाबरू नकोस...!" 

वळलेले पाय पून्हा आपल्या मार्गावर आले. लेखाने त्या बाईकडे पूर्ण दुर्लक्ष केले.

" कुठे जाशील...!" त्या बाईच्या बदलेल्या आवाजाने लेखाच्या अंगाचा थरकाप उडाला. 

" मरशील...!" झपझप पाऊलं टाकत लेखा तिथून निघाली. अशी बरीचशी जाळी तिला पार करायची होती. तिचा नुसता भास झाला, तरी आनंदच्या आतला आनंद पुनर्जीवित होणार होता. तेच तिचं ध्येय होतं. 

अस्ताची वाट बघत दामोदरही एका ठिकाणी दबा धरून बसला होता. त्या सुनसान रस्त्यावर मृत्यू आता कोणत्या स्वरूपात येईल, हे सांगणे कठीण होते. पण शेखरच्या मैत्री खातर त्याने स्वतःचा प्राण पणाला लावलाच होता. लोकांच्या मनात असणारी हळहळ त्याला शांत बसू देणार नव्हतीच. अनेक वर्षांपासून मातीत दडलेलं गूढ पुढे किती जीव घेणार , हे त्याचं त्यालाच माहित होतं. एका ठिकाणी एकसारखं बसून त्याच्या हाता-पायाला मुंग्या येऊ लागल्या होत्या. त्या पडक्या भिंतीला टेकून पाठही सोलली जाऊ लागली होती. एका क्षणाची वाट बघत तो कित्येक क्षण एकाच स्थितीत बसला होता. त्याने कूस बदलली. थोड्या अंतरावर त्याला कोणीतरी फरफटताना दिसले. अंधार असल्याने त्याला ते काय आहे, हे पूढे जाऊन पाहणं भाग होतं. थोडा सावध होऊन तो पूढे सरकला आणि त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. 

दिगंबर होता तो. स्वतःच्या शरीराची लक्तरं घेऊन फरफटत होता.

"दिगंबर...तुम्ही..! तुम्ही जिवंत आहात...?" दामोदरला त्याच्यात प्राण असल्याचे पाहून निस्सीम आनंद झाला. मातीने आणि रक्ताने पूर्ण माखलेलं त्याचं शरीर एकाद्या फाटक्या कागदांच्या गुंडाळीसारखं झालं होतं. कसातरी उजवा हात उंचवून त्याने दामोदरला जवळ बोलावलं. आनंदाच्या भरात दामोदर ही त्याला वाचवायला त्याच्यापाशी गेला.

"तुम्ही जिवंत होतात, तर आलात का नाही...?" त्याच्या जवळ जाऊन दामोदरने त्याच्या जखमा पुसण्याचा प्रयत्न केला.

"पाणी...पाणी द्या मला !" दिगंबरच्या तोंडून मोठ्या कष्टाने शब्द बाहेर पडत होते. 

"हो..!" म्हणत दामोदर आपल्या पिशिवी कडे वळला. त्यातून पाणी काढताना कसलीशी सावली त्याच्या अंगावर पडली. वीज चमकावी तसा तो झटकन बाजूला झाला. एक भला मोठा दगड जमीनीवर धाडकन आदळला. काहीही लक्षात यायच्या आत दिगंबरनी त्याच्यावर दुसरा दगड उचलून उगारला. दामोदरच्या लक्षात आले. दिगंबर केव्हाच मेला होता. हे त्याचे प्रेत होते, जे आता बाधित झाले होते. 

"खच पडेल प्रेतांचा...!" अचानक दिगंबर बोलू लागला. " त्याच्या मार्गावर जाल, तर खच पडेल." उगारलेला दगड त्याने दामोदरवर उगारला. सावध झालेला दिगंबर पुन्हा मागे सरकला. त्याच्या प्रहाराने दिगंबरला काहीही फरक पडणार नव्हता. त्याला त्याच्या पिशवीपाशी पोहोचावे लागणार होतेच.

"सांग त्याला, लवकरच त्याची मुक्ती होईल यातून.त्याच्या पापाचा घडा भरलाय. तो जो कुणी आहे ना, त्याला त्याच्या अंताकडे जावेच लागेल." दामोदर बोलताना हळू-हळू सरकत होता. 

" अंत तुम्हा मनुष्यांना असतो रे...! मृत्यू, अंत, या सगळ्यातून आम्ही कित्येक योजने लांब आलो आहोत." दोघांमध्ये अंतर थोडे होते. दमोदरला काहीतरी करणे भाग होते. पूर्ण शक्तीनिशी तो उठला. उठताना त्याने दोन्ही मुठींत वाळू भरली आणि बरोबर दिगंबरच्या डोळ्यात फेकली. बेसावध असलेला दिगंबर या अचानक झालेल्या हल्ल्याने थोडा गांगरला. सैर-भैर होऊ लागला. वेळ साधून दामोदर तिथून निसटला, तो एका झेपीत पिशिवीपाशी आला. खंजीर कमरेला न लावण्याचा मूर्खपणा त्याच्या जिवावर बेतला होता. दिगंबर त्याच्याकडे चाल करत येऊ लागला. पिशवीपाशी बसलेल्या दामोदरला त्याने मानेने मागून पकडले. दामोदर सावध होता. त्याने श्वास रोखून धरला. खंजीर हातात लागताच त्याने तो उलटा धरला आणि किंचाळणाऱ्या दिगंबरच्या मुखात सरकवला. तो वार इतका जड होता, की खांजीराचे बारीकसे टोक दिगंबरच्या मानेच्या मागच्या बाजूस निघाले.दिगंबरची पकड सैल झाली आणि सुटली. तोंडातून उरलेले रक्त त्याच्या अंगावरून वाहू लागले. दामोदरचा सदराही लाल झाला. दिगंबर जमिनीवर तडफडू लागला. संधी साधून दामोदर त्याच्यावर स्वार झाला. 

" त्यालाही असाच फरफटत नेईल, जिथे त्याचा अंत लिहिला आहे." एवढा शेवटचा निरोप सांगून त्याने तो रक्ताने माखलेला खंजीर त्याच्या तोंडातुन बाहेर काढला. पुसून तो कमरेला बांधला. दिगंबरचे प्रेत त्याने उचलून बाजूला केले. कोणाला सहज दिसणार नाही असेच ठेवले. तो त्याच्या पिशवीपाशी आला. चामडी बाटलीतून त्याने पाणी घेतले आणि दिगंबरच्या मुखात ओतले. 

आयुष्यातलं पाहिलं धाडस दामोदर जिंकला होता. आज पर्यंत तो शोध लावत असलेल्या त्या कहाण्या आज त्याच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. त्याने प्रत्येक कहाणीचा सामना कधी केलाच नव्हता. पण आज त्याच्या हातून ते धाडस झालेच. एवढे बळ त्याच्या अंगात कुठून आले, हे त्याचे त्यालाच कळेना ! समोर पडलेल्या त्या अजस्त्र प्रेताला पाहून रडावं, की आपल्याच अंगात आजवर लपून बसलेलं बळ बाहेर आलं, आणि आपला जीव वाचला, म्हणून आनंद साजरा करावा, हे ही त्याला कळलं नाही. एक बारीकसा दगड त्याने त्या प्रेताला मारला. काहीही हालचाल झाली नाही. आपली पिशवी उचलून दामोदरने आपली जागा बदलली. 

आभाळ स्वच्छ होतं. चंद्राचा मात्र पत्ता अजून कुठेच नव्हता. चंद्र काही तास नसणार, या विचाराने तारका मात्र आपल्या परीने आभाळ लख्ख करत होत्या. उजेडाच्या नावाखाली काही जीव सोडणाऱ्या मशाली होत्या.

"मी जाऊ का...!" शेखरचा धीर सुटत होता.

"नाही, तुला जाता येणार नाहीये." मायाने अदृश्य स्वरूपात त्याला बजावले.

"बाहेर काय चाललंय, काहीच कळायला मार्ग नाहीये. लोकांचा जीव धोक्यात आहे. माझ्यामुळे...!" त्याला बाहेर असलेल्या लोकांची, दामोदरची काळजी वाटू लागली होती. 

"मला कळतंय, पण तुला बाहेर राहुन काहीही करता येणार नाहीये. त्याच्या समोर तुझी शक्ती क्षिण आहे. आणि तुला जर याही जन्माला मुकावं लागलं, तर तू सुद्धा माझ्याच सारखा या फेऱ्यात अडकाशील.पुन्हा कोणत्या जन्मी तुझी सुटका होईल, ते मलाही सांगता येणार नाही...!" मायेच्या बोलण्यात तथ्य होते. हा मुळात जन्म मृत्यूचा फेरा नव्हता. या सुडाचा फेरा होता. या जन्मी नाही संपला, तर पुढच्या जन्मी...!

त्या वाड्यात तो दबा धरून बसला होता. आजची रात्र आणि उद्या सूर्यास्त होईपर्यंत त्याला तिथे लपून बसणं भाग होतं. उद्या सुर्यास्त झाल्यानंतर , परवा ब्राम्हमुहूर्त लागेपर्यंतची वेळ त्याची होती. त्या काळात त्याला त्याचा सूड पूर्ण करायचा होता. त्याने धारण केलेल्या शरीरात आता जास्त त्राण उरले नव्हते. त्याची शक्ती क्षिण होत चालली होती, हे त्यालाही कळलं होतं. आपलं इस्पित साधण्याच्या आत त्याला हे शरीर सोडणं शक्य नव्हतं. कारण या शरीराची कुंडली तशी होती. जर हे शरीर सुटलं, तर फ्याला ,याच ग्रहामानाचे दुसरे शरीर मिळणे अशक्य होतं. जश्या जन्माला मर्यादा होत्या, तश्या मृत्यूनंतरही काही मर्यादा होत्याच. या शरीराने त्याला हालचाल करता येत होती, बोलता येत होतं, व्यक्त होता येत होतं. हे शरीर सुटलं, तर तो फक्त एका हवेच्या स्वरूपात वावरणार होता, हे त्याला पुरतं ठाऊक होतं. बाहेर त्याच्या विरोधात कंबर कसलेले काही मानव त्याला कोणत्याही क्षणी मात देऊ शकत होते. त्याच्या अंगात कपट होतंच.तो त्याचा मूळ स्वभाव होता. पण बाहेर असणाऱ्या लोकांचे बळ त्याच्यावर हावी होऊ शकलं असतं. आपला अंत त्यालाही ठाऊक होता, पण तो त्याला मान्य नव्हता. त्याला पहिल्यापासून ठाऊक होता, तो फक्त माज. शोषितांना बळाने छळणं. जे आपलं नाही, ते बळाने मिळवणं, त्यावर सत्ता गाजवणं, आणि जर विरोध झालाच, तर तो चिरडून टाकणं. या त्याच्याच वाडा होता. त्याच्यावर लहान असताना झालेले संस्कार इतके घातक होते, की त्याच्या अत्याचाराच्या गाथा ऐकून या वाड्याच्या जुन्या , भक्कम भिंतीन्न सुद्धा तड़े गेले असावेत. गोर-गरीब, जनावरं, इतकंच काय तर गावातल्या असंख्य लेकी-बाळींच्या किंकाळ्यांनी तो वाडा दर काही दिवसांनी हादरत असे. त्यातल्या वास्तूपुरुषाची जडण-घडणच तळतळाटाने झाली होती. भिंतीचा रंग लाल होता, आणि वरचं छत काळं ! अश्या या दोन्ही रंगाच्या सावलीत तो वाढला होता. 

आपल्या कपटाने त्याने रावसाहेब, माया, खंडेराव, यांना तर मारलंच ! पण त्यासोबत त्या भूमीतल्या माणुसकीला देखील त्याने कायमची मूठ-माती दिली. या वाड्यासमोरून जाणाऱ्या माणसांची आणि जनावरांची संख्या कमी होत गेली. हळू-हळू गडी माणसं देखील येईनाशी झालीत. रात्री बेरात्री त्या वाड्याच्या भिंती मध्ये दडलेले , त्रासलेले आवाज बाहेर पडू लागत होते. रात्रभर, विशेष करून अमावास्येला ते किंचाळत, याच्या पापाची गाथा यालाच वाचून दाखवत ! त्याने छळून मारलेल्या, कधी मरायला सोडुन दिलेल्या सावल्या त्याचा माग काढत वाड्याच्या भिंतीवर नाचायला लागल्या होत्या. त्याला रात्री भास व्हायला लागले होते. कुणीतरी आपल्या छातीवर बसलंय, कुणीतरी आपले हात-पाय छाटून वाड्याच्या दारांना टांगून जातंय ! कुणी आपले डोळे काढून जमिनीवर फेकतंय. कुणी आपलं तोंड पाण्याने भरलेल्या बंबात , आपला श्वास जाईपर्यंत दाबून धरतंय ! कधी वाड्याला आग लागली म्हणून हा अंगणात येऊन हाहाकार करायचा. कधी एखादी सावली मागे लागलीय, म्हणून गावभर वेड्यासारखं पळत सुटायचा. हाए सगळं रोज होत होतं असंही नव्हतं. पण जेव्हा होत होतं, तेव्हा त्याच्यासाठी ते जीवघेणी आठवण ठेऊन जात होतं. रोज सकाळी-संध्याकाळ तो आपल्या गच्चीवर येऊन त्या टेकडी कडे बघत बसायचा.कपटाने गेलेला सर्जाचा जीव त्यास स्वस्थ बसू देत नव्हता. तशीच नजर विरुद्ध दिशेला असणाऱ्या बंगल्याकडे जायची. तिरस्कार, जळफळाटाने भरलेल्या त्याच्या मनात एकदाही क्षमा मागावी हा विचार आला नाही. कदाचित त्यालाही माहीत होतं, की आपली कर्म क्षमेच्या पलीकडे गेले आहेत. 

त्याचे शेवटचे दिवस बघणारे गावात जवळपास नव्हतेच.त्या दिवसांत त्याच्यापाशीही कुणी नव्हते. जो-जो त्याच्या पापात भागीदार होता, त्या प्रत्येकाचा अंत असाच झाला होता. कुणीही पूर्ण आयुष्य जागून मेलं नव्हतं. एखाद्याचे प्रेत जंगलात फासावर लटकलेले दिसायचे, एखाद्याच्या प्रेतावर जंगली श्वापदाने ओरबाडून खल्याच्या खुणा दिसायच्या ! एखाद्याच्या मानेभावती साडीचा फास असायचा, तर कुणी रात्री विहिरीत पाय घसरून पडत होतं. प्रत्येकाचे असे झालेले हाल पाहून त्याच्या काळजात धस्स व्हायचं. त्याला स्वतःचा अंत असाच दिसत होता. पण अंगात असलेला माज काही केल्या जात नव्हता. पाप-पुण्याची चाड अंगात बालपणीपासून नव्हतीच. 

आलेला मृत्यू, हा त्याच्याही जन्मभराच्या कर्मासारखाच होता. कोणीही प्रत्यक्ष त्याचा जीव जाताना पहिले नव्हते. वाड्यातून रात्री-बेरात्री कानठळ्या बसणारे आवाज, जीव वाचवण्याच्या धडपडीत वस्तूंची होणारी पडझड, यावरून गावकऱ्यांनी असंख्य भाकड-कथा रचून ठेवल्या होत्या. कर्माच्या गतीवर असलेलं एक जिवंत उदाहरण गावकऱ्यांना मिळालं होतं. त्याचे चरित्र इतके भयंकर होते, की माणुसकीच्या नात्यानेही त्याच्यावर दया करण्यास कुणी जात नसे. शेवटच्या दहा दिवसांत, भीतीच्या संशयावरून त्याने स्वतःला स्वयंपाक करून खाऊ घालणाऱ्या आचाऱ्याचीच कोयत्याने खांडोळी करून बाहेर रस्त्यावर फेकली होती.मानव जन्मात, त्याच्या हातून झालेली ती शेवटची हत्या ठरली. त्यानंतर होणाऱ्या उपासमारीला कंटाळून त्याने दिसेल तो पक्षी, प्राणी मारून खाण्यास सुरवात केली. पहाटे लोकांच्या गोठ्यातील बकऱ्या अर्ध्या मरून पडलेल्या असायच्या, तर कुठे अर्धवट शरीराचे कावळे, पारवे, कोंबड्या रस्त्यावर मातीत मिसळलेल्या असायच्या. गावकरी भ्रभीत झाले होते, तसे त्यांच्या मनात याच्याबद्दल रोषही वाढत होता. टोळी करून त्याला मारण्याचे धाडस मात्र कुणी केले नाही. 

त्या रात्री मात्र आवाज खूप वाढू लागले होते. आजूबाजूचे लोक आप-आपल्या घरात दबा धरून बसले होते. त्याच्या किंचाळण्याने कोणातच घराबाहेर पडण्याची हिमंत होईना ! तो वाडाभर पळत होता. ज्यांनी गच्चीवरून पाहिलं, त्यांना फक्त त्याच्या भयभीत होऊन पाळतानाच्या सावल्या दिसल्या. त्याच्या हातात त्याचा कोयता होताच. वार फक्त हवेत फिरत होते. कधी भिंतीवर, कधी बंबावर , कधी भांड्यांवर पडण्याचे आवाज येत होते. समोर कोण होतं, कळण्यास काहीच मार्ग नव्हता. पण तो मात्र मरणाच्या आर्त याचना करत तडफडत होता. रात्र अशीच उलटली. सकाळी देखील कुणी तिकडे फिरकलं नाही. दुसऱ्या रात्री देखील हेच सगळं, अधिक विदारक झालं. सलग चार रात्र हे सगळं चाललं. पाचव्या पहाटे सगळं अचानक शांत झाला. सूर्योदय झाल्यावर काही धाडसी लोक त्याच्या वाड्याच्या बाहेर उभे राहिले. वाड्याच्या गटारातून काळे पाणी बाहेर वहात होते. लोकांचा संशय बळावला. भारद्वाजच्या आजोबांना बोलावणे पाठवले. हातात गंगाजल घेऊन ते आत गेले. त्याचं प्रेत वाड्याच्या दिवाणखान्यात ,एका कोपऱ्याला पडलं होतं. पूर्ण अंगावर त्याच्याच कोयत्याचे वार होते. त्याने स्वतःला इतके रक्तबंबाळ करून सोडले होते, की त्या घावांनीच त्याचा जीव गेल्याचा प्राथमिक समज झाला. पण तसं काहीही नव्हतं. तो गेला होता ! त्याच्या हातून घडलेल्या कोणत्यातरी एका, किंवा अनेक पापांनी एकत्र येऊन त्याचा अंत केला होता. ठरल्याप्रमाणे भर-दिवसा त्याचा अंत्यविधी पार पडला. चितेला अग्नी देण्यास कुणी पुढे येणार नव्हतं. पर्याय म्हणून पेटत्या चितेवर त्याला ठेवण्यात आलं. त्याला घेऊन येणारी बैल-गाडी देखील जाळण्यात आली. जुंपलेला बैल पूजा करून देवाला सोडण्यात आला. धगधगत्या अग्नीने देखील त्याला नाकारले. वातावरण नसताना पाऊस सुरु झाला. शेवटी कंटाळून लोक घरी परतले. पुढे काय झाले, हे प्रेताला आणि अग्निलाच ठाऊक ! 

वाडा तसाच उदास राहिला. हळू-हळू लोकांनी भयभीत होऊन तिथून लांब जाण्यास सुरवात केली. तो असताना देखील कुणी फिरकले नव्हते. आता तो नव्हता, तरीही त्याचे भय, कर्म आणि गती मात्र तिथे होते. प्रत्येक पावसाने थोडे-थोडे अवशेष पाण्यात वाहून नेले. वादळं येऊन भिंती पाडून गेलीत. वाड्यातली विशाल वृक्षे छतावर कोसळली आणि त्यातून येणाऱ्या सूर्यप्रकाशने त्या पापाने घेरलेल्या वास्तूला खंडर बनवले.

त्याचे शरीर आणि त्याचा आत्मा , आयुष्यभर फक्त पाप करीत राहिले. त्याचा अंतही तसाच झाला. आत्मा इतका कलंकित झाला होता, की त्याला नरकाच्या दारातून परत पाठवले गेले. पण, कुंडलीच्या या खेळाने त्याला पुनर्जीवित केले. हा कु-योगायोग इथे बरोबर लागू पडला. त्याला त्याच्या दयनीय मृत्यूचा प्रतिशोध घेण्याची संधी त्याला नक्षत्रांनीच पुन्हा दिली होती. कधी-कधी अनावधानाने दिलेले एखादे वरदान, इतरांसाठी जीवघेणा शाप ठरतो. इथेही तेच होत होते. जुळून आलेले ग्रह आणि त्याचा झालेला अंत, या सगळ्याची एक अभद्र सांगड बसली. वयात आल्यावर त्याने आनंदचा शोध घेतला. त्याचा अंशतः ताबा मिळवला. त्याच्या आजूबाजूच्या लोकांनाही त्याने भयभीत केले आणि आज सरते-शेवटी तो इथेच येऊन पडला होता. त्याला सगळं आठवत होतं. मृत्यूकडे त्याची वाटचाल सहज नव्हती. शरीराने कित्येक यातना भोगल्या होत्या. उपासमार झाली होती. वेदनेने, भयाने त्याला रात्र-रात्र झोप लागत नव्हती. कित्येकदा उघड्या डोळ्यांनी त्याने सूर्योदय पहिला होता. या सगळ्याचा मुळाशी त्याला तो बंगला आणि माया दिसत होती. तिच्याच आत्म्याने शेवटच्या क्षणापर्यंत आपली प्रतारणा केली. तिच्या मुळे आपला अंत, इतका विदारक झाला ! याच विचाराने काही शेवटचे श्वास घेतले होते. मनात पेटत असलेल्या या सूडाच्या अग्नीत त्याचा शेवट झाला खरा, पण त्याची दुरात्मा मात्र सैरा-वैरा भटकत राहिली. 

त्याच्याच मोडलेल्या वाड्यात आता तो आश्रयास राहिला होता. हीच जागा त्याच्यासाठी योग्य होती. त्याला सगळं काही आठवत होतं. 

वाट पहाणे आणि सगळं काही येणाऱ्या काळावर सोपवण्याव्यतिरिक्त दुसरा काहीही पर्याय शिल्लक नव्हता. मृत्यूची अजस्त्र दाढ आपली व्याप्ती वाढवत सगळीकडे अदृश्य स्वरूपात फिरत होती. बाहेरच्या अंधारात पडत असणाऱ्या सावल्या अधिकच विक्षिप्त होत होत्या. इथे काय घडतंय, याची पुसटशी कल्पना सुद्धा उर्वरित जगाला नसावी. जो-तो आप-आपल्या परीने स्वतःचा आणि जवळच्या माणसांचा जीव वाचवण्याच्या धडपडीत होता. लेखा बद्दलची चिंता तिथे प्रत्येकाला होतीच. समोर दामोदर आणि शेखरही नव्हते. बाजी आणि दिगंबर केव्हाच या सगळ्यातून मुक्त झाले होते. त्यांचा नंतर काहीच ठाव-ठिकाणा लागला नव्हता. 

भर वादळात भरकटलेल्या पाचोळ्यासारखी लेखा गावभर हिंडत होती. बंद खिडक्यांमधून , दाराच्या फटीतून , कुणी घराच्या छता-भिंतीआड लपून तिला बघत होते.पण तिच्या समोर येऊन तिची विचारपूस करावी, हे धाडस मात्र कोणाच्याही उरात नव्हते. गावातल्या म्हाताऱ्या-कोताऱ्या , तिच्या वाटेवर पाण्याने भरलेले पेले, कणिक ,असलं बरंच काही ठेऊन, तिला अमावस्या सुखरूप पार पडावी म्हणून साकडं घालत होते. कुठे तिच्या पाठिवर, कुठे तोंडावर दारं खाडकन बंद होत होती. अधिच अजारपणातून उठल्याने तिचे तेज कमी झाले होते. त्यात अंधारात तिची गत अधिकच दयनीय झाली होती. पुढचा कोणताही विचार न करता, ती या अग्निकुंडात पडली होती, ते फक्त आनंदसाठी. चालून-चालून तिच्या पायाची सालं निघून आली होती. ती पोहोचत असलेल्या प्रत्येक चौकात हीच गत होती. तिच्या आतली भीती हळू-हळू बोथट होऊ लागली होती. 

रात्र आरंभली होती. चंद्राची चाहूल सुद्धा आकाशात नव्हती. चालता-चालता ती वाड्याच्या समोर आली. आत तिला काहीतरी जाणवलं. वाड्याच्या विरुद्ध दिशेला लपून बसलेल्या दामोदरला तिच्या येण्याची कल्पना सुद्धा नव्हती. ती शांतपणे वाड्याच्या समोर उभी राहिली. त्या पडक्या वास्तूकडे बघत. तिचे पाय पुढे सरकत नव्हते. कदाचित तिच्या आतल्या एखाद्या सुप्त शक्तीने यावेळी तिची मदत केली होती. 

"आनंद" तिने बाहेरून हाक मारली. आत त्याला एखादा झटका बसल्यासारखे झाले. 

"मला माहिती आहे, आत आहात तुम्ही...!" त्याने एका कपारीतून बाहेर पाहिले. त्याला एका स्त्रीची आकृती दिसली. 

" नाहीये तो...! जा इथून." अंगाला कापरं फुटावं, इतक्या मस्तवाल आवाजात त्याने तिला बजावले. 

" आनंद, तो तुम्हाला काहीही करू शकणार नाही.तुम्ही बाहेर या." 

आत्तापर्यंत त्याने ताबा घेतलेल्या आनंदच्या आत लेखाचा आवाज पोहोचला. आपल्या शरीरातून हे अभद्र लक्षण जावे, म्हणून त्याची धडपड सुरू झाली. 

" उगाच मूर्खपणा करू नकोस. तुझा आनंद आता तुझा राहिला नाहीये." त्याने पून्हा आवाज काढला. 

" हे तू कोण ठरवणारा ? ज्याचं त्याला ठरवू दे ! " तिने देखील तितक्याच धीराने त्याला उत्तर दिले. आनंद आपले पाय उचलायचा प्रयत्न करू लागला.

" आत ये...! घेऊन जा आपल्या आनंदला." त्याने तिला सरळ-सरळ आव्हान दिलं. 

ती वाड्याकडे सरकू लागली. आनंदने तिथला एक दगड घट्ट धरून ठेवला. तिची पावलं सरळ मृत्यूच्या आगारात सरकत होती. याचे तिला भान नव्हते. वाड्याच्या दाराला तिने हात लावला. दार आत गेले. आतला अंधार अधिक गडद झाला. तिने पाऊल आत ठेवले. त्याने एका पडक्या भिंतीची सावली स्वतःवर घेतली. अजून ती त्याच्या आवाक्याबाहेर होती. चार पैकी एक पायरी ती चढली होती. दुसऱ्या पायरीवर पाय ठेवताच ती आत ओढली गेली. 

तो हात आनंदचा होता. पण ते ओढणे आनंदचे नव्हते. तिला त्याने वाड्याच्या आतल्या अंगणात फेकले. 

"हे घर आहे माझं ! इथे माझी सत्ता चालते. तुझ्या आनंदची नाही." तो तिच्या अंगावर गुरगुरला. 

"बघायचा तुला...तुझा आनंद...?" तो एक-एक पाऊल तिथे टांगलेल्या मशालीकडे टाकू लागला.

लेखाच्या सर्वांगाला कापरं फुटलं. ती पूर्ण भानावर आली. 

" तू, तू नेणार त्याला ! माझ्या तावडीतुन..?" 

त्याच्या डोळ्यातून ज्वाला निघत होत्या. कपड्यांच्या पूर्ण चिंध्या झाल्या होत्या. काळा पडलेला त्याचा चेहरा पूर्ण सुजला होता. केस पूर्ण पिंजारलेले. हाता-पायावर जागोजागी जखमा आणि त्यांच्या आजूबाजूला सुकलेलं रक्त होतं. हे सगळं त्याने आनंदच्या शरीरासोबत केलं होतं. एखादा प्राणी त्याची शिकार फाडून ठेवतो, तसंच आनंदचं झालं होतं. त्याच्या बांध्याची अक्षरशः लक्तरं झाली होती. 

क्षणभर त्याला मशालीच्या उजेडात लेखा पाहू लागली. ती भानावर आली होती. अंगात असेल तेवढं बळ एकवटून ती जोरात किंचाळली. आनंदचं हे रूप तिला सहन नाही झालं. 

" जा न घेऊन. जातेस न..!" तो तिच्या जवळ येऊ लागला. अगदी तिच्या समोर आला. भीतीने लेखा थरथरू लागली. या आधी तिने असा प्रकार स्वप्नात सुद्धा पहिला नव्हता. 

"अजून बघायचंय...?" तो तिच्या अगदी जवळ आला. त्याच्या अंगातून अतिशय उग्र दर्प येत होता. भीती आणि किळस याने लेखाला भुरळ यायला लागली होती. त्याने त्याची जीभ बाहेर काढली. जिभेवर जागो-जागी तांबडे-काळे डाग पडले होते. त्याने तिच्या कडे बघतच, माशालीतून एक निखारा उचलला आणि जिभेवर ठेवला. ओल्या निखाऱ्याच्या चटक्याने आनंदने एक गगनभेदी आरोळी ठोकली. ती ऐकून लेखाने आपले कान झाकले. बघता-बघता तो निखारा त्याने गिळला. वेदनेने आनंद वेडा झाला. 

" हेच करतो मी ! त्याला इतक्या वेदना दिल्या आहेत, की त्याचे शरीर आता काहीच कामाचे राहिले नाहीये. तो मला अडवू पण शकत नाही, इतका तो दुर्बल झालाय. तो तेच करतो, जे मी त्याच्याकडून करवतो. तेच बोलतो, जे मला सांगायचंय. आणि तू त्याला घेऊन जाशील...? कुठे ? मी बाहेर येताच त्याच्यात असलेला उरलेला जीव सुद्धा जाईल. मग जा घेऊन...! त्याचं प्रेत ! पण त्यासाठी तुला थोडं थांबावं लागेल. उद्या सूर्यास्त होईल, तेव्हा माझं काम सुरु होईल, आणि रात्रीतून ते संपेल. मग तू आणि आनंद...!" तो किळस येईल असं हसू लागला. 

आत्तापर्यंत भयात असलेल्या लेखाने हळूच पदराला बांधलेली गाठ सोडली. एका चिमटीत मावेल तितकी रक्षा तिने घेतली आणि अगदी हाताजवळ असलेल्या त्याच्या पायाला ती लावली. पायावर निखारे ठेवल्यासारखा तो ओरडला आणि झटकन बाजूला झाला. जागा झाल्याने लेखा तिथून निघाली. तो सावरला. 

" तुला काय वाटलं ! इथून जाशील ? इथून आजवर कुणीही गेलं नाही." लेखाने त्याला दिलेल्या आव्हानाचा त्याला राग आला. त्याने मशाल ठेवली आणि एका अंधारल्या कोनाड्यातून त्याचा कोयता बाहेर काढला. पण त्याला लेखा समोर दिसली नाही. तो जास्तच चिडला. त्या अंधारात लेखाला त्याचे लाल डोळे जास्तच भयानक वाटले. ती चुकून बाहेरच्या नाही, तर आतल्या बाजूस आली होती. तिच्या पायाला खंगलेल्या वाड्याच्या अवशेषांचे तुकडे टोचत होते. तो तिला अधाश्या सारखा शोधत होता. 

" तू बाहेर जाऊ शकणारच नाही. तू एकटी आहेस, जी याला पूर्वपदावर आणू शकते." 

एका भिंतीच्या आडोश्याला उभ्या असलेल्या लेखाच्या डोक्यावर माती पडू लागली होती. तो भिंतीच्या त्या भागात होता. त्याने जोरात भिंतीवर आपलं डोकं आदळलं. वरून एक मोठी शिळा लेखाच्या डोक्यावर पडू लागली. आणि कुणीतरी तिला जोरात बाजूला ओढले. ती किंचाळणार, इतक्यात त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला. 

" मी दामोदर, इथे कशाला आलात तुम्ही?" लेखाला दामोदरसुद्धा त्यातलाच एक वाटला. ती ओरडायचा आणि सुटायचा प्रयत्न करत होती. त्याने तिला सावध केले. 

"ओरडू नका. त्याच्या हाती लागाल, तर तो तुम्हाला मारल्यावाचून रहाणार नाही. शांत उभं रहा." 

लेखामध्ये इतकं धाडस असेल, हे दामोदरला माहित नव्हते. पण हे धाडस तिच्याच जीवावर बेतले होते. त्याने तिला सावध केले. 

" हे बघा..! तुम्हाला त्याच्या समोर जावं लागेल. त्याला वाड्याच्या बाहेर काढावं लागेल." लेखा ऐकू लागली. तो तिच्या शोधात अख्खा वाडा फिरत होता. दामोदरला वेळ मिळत होता. 

"त्याला आव्हान नका देऊ. आनंदला हाक मारा, आणि या वाटेने बाहेर पडा."

तो तिला शोधत वाड्याच्या मागच्या दरवाजात आला. 

"आनंद...!" लेखाने जोरात आरोळी मारली. 

" आनंद, बाहेर आणा त्याला...!" तिचा ओरडण्याचा थोडा परिणाम होऊ लागला. त्याची पाऊलं थबकली. 

"त्याला बाहेर आणा आनंद, त्याशिवाय तुमची आणि माझी सुटका होणार नाही." हा आवाज आनंदच्या कानातून हृदयापर्यंत गेला. तो स्वतःचे शरीर ओढू लागला. तो त्याला एक पाऊलही टाकू देत नव्हता. 

" त्याला बाहेर काढा आनंद...!" 

उरलेलं सगळं बळ एकवटून आनंद त्याला ओढू लागला. त्याच्या आत लेखाचा आवाज घर करत होता. आज पर्यंत त्याच्या तालावर नाचणाऱ्या आनंदला कित्येक दिवसांनी कोणीतरी त्याच्या नावाने हाक मारली होती. तो जागृत होऊ लागला होता. त्याची पाऊलं पडू लागली होती. तो पूर्ण बळ लावून त्याला ओढत होता. पहिले पाऊल जमीनीवर पडले आणि आनंदच्या आत असलेल्या त्याला आपल्या पराजयाची पाहिली पायरी दिसली. 

" त्याला बाहेर काढावं लागेल आनंद. त्याला त्याच्या वाड्यातून बाहेर काढा." लेखाचे भय कुठल्या-कुठे पळाले होते. ती आनंदला बळ देऊ लागली होती. त्याला ओढत आनंद दारापाशी घेऊन आला. मागून दामोदरने पूर्ण शक्तीनिशी त्याला आपल्या वाड्याबाहेर रस्त्यावर ढकललं. 

तो रस्त्यावर पडला. उठायची धडपड करू लागला. आनंदने त्याला उठू दिले नाही. त्याचा कोयता त्याच्या हातातून निसटला. आता त्यालाही कळून चुकले होते की आपल्याला चुकीच्या वेळी बाहेर काढलं आहे. तो क्षीण होऊ लागला होता. 

" आता वेळ नाहीये. याला अपल्याला न्यावं लागेल." दामोदर त्याच्याकडे चालत जाऊ लागला. 

"कुठे ?" थकलेल्या लेखाने त्याला विचारलं. 

" त्याचा अंत इथे नाही, आपल्या हातून तर नाहीच नाही !" 

त्या अजस्त्र देहाला दामोदरने उचलले. आनंद आणि आत असलेला तो, त्यामुळे देहाचे वजन वाढले होते. त्याला खांद्यावर घेऊन दोघे बंगल्याकडे निघाले....!

माणसाच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे, की ही सृष्टी तो चालवतोय. न सृष्टी निर्माण करण्याची शक्ती, न पुढे ती कशी चालेल याचे नियोजन. स्वतःच्याच पापाच्या आणि विवंचनेच्या डोंगरखाली तो पुरता अडकलेला आहे.त्यात या भूमीवरून पाप नाहीसे करण्याचे बळ कुठून येणार ? आपल्या याच समजुतीच्या आविर्भावात, तो मत्सरी होतो. त्यात लालूच जन्माला येते. त्यात अहंकाराचे बीज पुढे गेल्यावर एक विषारी महावृक्ष होऊ लागते. आणि यात नकळत त्याच्या पापाचा घडा भरत जातो. याची नोंद त्याच्याकडे नसली, तरी नियती याची नोंद घेत असते. त्याची शिक्षा-अशिक्षा सुद्धा ठरते. त्याच्या पापाचा आलेख बघून, त्याच्या उर्वरित आयुष्याचा आणि त्याच्या मृत्यूचा निर्णय होत असतो. त्याच्या आत असलेला अहंकार, माज, कटुता आणि निर्दयता, इतक्या सहजासहजी बाहेर निघत नाही. त्याचा मूळ स्वभाव कधीही बदलत नाही. इथेही तसेच काहीतरी होते. मूळ सुभानचा अंत केविलवाणा आणि घृणेने भरलेला होता. संपूर्ण आयुष्य त्याने फक्त अहंकारात आणि कमकुवत लोकांवर अत्याचार करून घालवले. त्याचा त्यावेळीचा अंत ठरलेला होता. 

शेखरची अस्वस्थता वाढत होती. भुकेने पोटात तयार झालेले खड्डे आणि थकवा, या सोबत बाहेर काय सुरु आहे, याचा तणाव त्याच्या मानसिकतेला जास्तच खच्ची करत जात होता. कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची त्याची तयारी तासातासाने ढासळत चालली होती. तो या काळात पूर्ण बंगला फिरून आला. प्रत्येक खिडकीतून तो बाहेर बघत होता. दिवसा त्याला हळू-हळू कोमेजणारी बाग दिसत होती. झाडं-पानांच्या हालचाली दिसत होत्या. पण आता अंधारात त्याला काहीच दिसत नव्हते. 

"तू इतकी वर्ष या अंधाराशी कसं जमवून घेतलंस ?" त्याने न दिसणाऱ्या मायास प्रश्न केला. 

" या पेक्षा जास्त महत्वाचं हे आहे, की मी इतकी वर्ष बाहेर निघालेली नाहीये." तिने अत्यंत शांतपणे उत्तर दिलं. 

त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं. तो काही तासांत कंटाळला होता. आणि ती मृत्यूनंतरही , एका अज्ञात कालखंडासाठी आत बंदिस्त होती. कोणाला दिसत नव्हती, कोणाशी बोलत नव्हती. बाहेर पावसाच्या पाण्यावर फुलणारी तिची बाग, ती खिडक्यांमधून जेमतेम दिसणारी हिरवळ, पाखरांचा किलबिलाट, आणि खूप साऱ्या आठवणी ! 

" कसं सोसलं हे सगळं?" 

" जे नाशीबात असतं, त्याच्याशी मैत्री करून घ्यावी ! ते आपलंसं करून घ्यावं. त्यात कधीतरी आपल्या मनासारखं बदल घडेल, ही आशा सोडू नाही. या प्रतारणा, हा जिव्हारी लागणारा एकांत यांच्यात मी स्वतःला गुंतवून घेतलं. बालपणीच्या आठवणी रोज आठवायचे. रावसाहेब, तू, ते घोडे, बाहेरचं सुंदर जग...या सगळ्या आठवणींनी रात्र आणि दिवस निघून जायचे." तिचा खोल जाणारा आवाज , तिच्या एकांताची गाथा सांगत होता. न बघता सुद्धा तिच्या डोळ्यातून गळणारे टिपूस त्याला दिसत होते.

"वर गच्चीवर गेले, की बाहेर रस्त्यावर फिरणारे लोक दिसतात. वाटतं, त्यांना बोलवावं, गप्पा माराव्यात. पण भीतीमुळे कुणी आत येत नाही. मुक्याने जगात चाललेल्या हालचाली पाहून समाधान मिळतं."

रात्री केव्हातरी शेखरचा डोळा लागला. आज त्याला झोप लागली, हेच महत्वाचं होतं. माया शांतपणे त्याच्या आजूबाजूला हिंडत राहिली. सर्जाच्या स्वभावातल्या अनेक खुणा तिला त्यात दिसल्या. चेहरा नवा असला तरी स्वभाव आणि गुणात काहीसे साम्य होतेच. शेवटी एका जन्माचा मोठा काळ त्याने घालवला होता. बराचसा बदल अपेक्षित होता. काही तडजोडी होत्या, ज्या मायाला करायच्या होत्या. एकाच जन्मात तिच्या संपून गेलेल्या सहाजिक इच्छा-अक्षांशा कधीही भरून न निघणाऱ्या होत्या. या अश्या जगण्यात तर नाहीच नाही. इथे सगळं अपूर्ण होतं. स्पर्श नव्हता, दृष्टी होती ती ही अपूर्ण. संवाद होते, आंधळे ! संवेदना होत्या, त्याही एकांगीच ! मानवी आयुष्यातली एकही खूण तिच्यात आज नव्हती. भूक, तहान, झोप , थकवा, काहीच नाही. पण शेखर माणूस होता. त्याला हाए सगळं लागू पडत होतं. उद्या काय घडणार आहे, त्याचा त्याच्या उर्वरित आयुष्यावर परिणाम होणार होता. त्याला जगणे आणि मरणे दोन्ही महत्वाचे होते. त्याच्या मागच्या जन्मावर तिचा अधिकार होता, पण या जन्मावर तिचा किती अधिकार होता, हा एक संभ्रम होता. 

आपल्याला मुक्ती मिळावी, म्हणून त्याचा जीव टांगणीला लावणे, कितपत योग्य ? याचा विचार तिने, तो पाहिल्यांदा बंगल्यात आला, तेव्हाच केला होता. असे शेकडो वर्ष ती बंदिस्त राहिली असती, तरी तिची हरकत नव्हती. पण नियतीला हे मान्य नव्हते ! नियतीला हा खेळ कदाचित याच जन्मी संपवायचा असेल. असुरांच्या कर्मांना आव्हान तरी द्यायचे होतेच...! 

"आणि तुला वाटतं, हे इतकं सोपं आहे?" स्मशानात त्या दोघांनी आनंदला एका जाड झाडाच्या बुंध्याला बांधून ठेवले होते. तिथे कुणी येणार नव्हते. ती जागा पवित्र होती. 

" नाही, पण अवघडही नाहीये." लेखाने त्याला उत्तर दिले. 

तिच्यातला लढाऊ बाणा त्याला आवडला. खूप धाडस होते तिच्यात ! इथे येताना तिला माहित देखील नव्हते, की तिला कोणत्या दिव्याला सामोरे जावे लागणार आहे. तिचा जीवही जाऊ शकतो, हे ही तिला माहित होतं ! तरीही ती तयार झाली. 

" प्रेम -प्रेम म्हणतात ते यालाच का ?" त्याने सहज विचारलं. 

" कदाचित, तुम्ही कधी ...?"

" छे-छे...नाही मिळाला वेळ ! आमच्या सारख्याचे आयुष्य दुसऱ्याच्या कारणी लागतं. जुने वाडे, खंडरं, किल्ले, यांच्यात दडलेल्या कहाण्या , त्यांचे रहस्य ! या सगळ्यात सुरु झालेला लहानपण आज इथे येऊन मोठं झालं. हे मी निवडलं, आणि यात मला खूप शांतात मिळते." 

"पण कुणीतरी असावं नं, पुढे आपली गाथा सांगणारं ? उतार वयात आपला सांभाळ करणारं." 

"याचा विचार नाही केला अजून. कदाचित आता करीन...!" 

स्मशानात सहसा कुणी येत नव्हतं. गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या घडामोडी लक्षात घेता , आता तर नाहीच नाही..!

"स्मशानाबद्दल लोक उगाच काहीही विचार करतात." आजूबाजूला पसरलेला निसर्ग पाहून दामोदर म्हणाला. 

"याच्याइतकी शांत जागा नाहीये कुठेच. माणसाच्या अंगातली चेतना कुठेही गेली, तरी शरीराशी असलेला मोह इथेच सुटतो. इथेच त्त्याचा आत्म्याला शरीर मनसोक्त बघुन घेण्याची शेवटची संधी मिळते. जन्म कितीही वर्षाचा असो, इथे तो संपतोच ! लोभ संपतो...! लोक उगाच घाबरतात ! या सारखी पवित्र जागा नाही कुठे..! ""हा या जागेवर इतका शांत कसा ?" लेखाने लांब झाकून ठेवलेल्या आनंदकडे पाहिलं. " हा पाहिल्यांदा आला आहे इथे, असं नाही ! इथे जो सन्मान माणसाला मिळतो, तो याला मिळाला नाहीये. कदाचित म्हणून तो अस्वस्थ असेल. वाट बघत असेल, कुणीतरी त्याच्यासाठी रडेल...! पण आता ते शक्य नाहीये." 

लेख आनंदकडे चालत गेली. तिची परिस्थती मायापेक्षा वेगळी नव्हती. ती आनंदला घ्यायला आली होती. त्यात ती कितपत यःस्वी होणार होती, याची शाश्वती तिलाही नव्हती. क्रूर नियती कधीच नसते. तिच्या मनात स्वार्थ, किंवा कुणाला छळण्याची मानसिकता कधीच नसते. ती निर्जीवही नसते. ती पाण्यासारखी असते. माणसाचे कर्म तिला वाट करून देत असतात. गेल्या काही काळापासून प्रत्येकाच्या आयुष्यात घडलेले छोटे-मोठे प्रसंग नियतीने त्यांच्या कर्माला दिलेली एक गतीच होती. आनंदचा देह शांत पडलेला होता. या देहात प्राण कोणाचेही असोत. या वेळी ते स्वतःबद्दल काहीतरी विशिष्ट विचार करत होते. सूर्याची कोवळी किरणे या देहावर पडली होती. त्याचा चेहरा दगडासारखा काळा पडला होता. शरीर अत्यंत कृश झाले होते. जागेजगी जखमा होत्या, काही भरत आल्या होत्या. काही कालच्या, एकदम नव्या होत्या. 

"हात नका लावू त्याला !" दामोदरने तिला लांबून सावध केले. "त्याला आत्ता झालेला कोणताही स्पर्श कळणार नाही. हा आनंदच आहे, याची खात्री नाही." 


लांबून भारद्वाज आणि निरोप्या येताना दिसले. त्यांनी आपले घोडे बाहेर ठेवले. 

" बरं झालं, याला इथे आणलं आधी." भारद्वाजने निरोप्याला खूण केली. त्याने नदीच्या व्हात्या पाण्याने भरलेला एक घडा आनंदच्या अंगावर ओतला. त्याच्या शरिराला लागलेली बरीच मळवट दूर झाली. त्याच्या दोन्ही हातांनी केशरी दोरे बांधले.

"याचा काही उपयोग होईल, असं वाटतं तुम्हाला ?" दामोदरने त्यांना विचारलं. 

" हे आनंदसाठी आहे, यावर, हे आपल्या समाधानासाठी आहे." 

"अजून पूर्ण दिवस जायचा आहे." निरोप्याने घोड्यावर लादून आणलेलं सगळं सामान काढलं. ते दिवसभर त्यांना पुरेल एवढंच होतं.

"पुढे...!" दामोदर ने त्यांना विचारलं. 

"जे ठरलंय, त्यात बदल होणार नाही. याला त्याच्या ठिकाणी न्यावेच लागेल." तिथे एक मोठा दगड पाहून ते त्यावर बसले. 

घाबरलेलं गाव आता दारं उघडून बाहेर येऊ लागलं होतं. संकट आटोक्यात आल्याचं त्यांना कळलं होतं. पण पूर्णपणे संपलं ,याची काहीच खात्री नव्हती. लहान मुलं तर चार दिवसांपासून भिंतीच्या आत होते. जनावरं घरात, अंगणात आणि कुलुपात होते. दारांवर ,खिडक्यांवर काळे पडदे चढले होते.घरा-घरात देव-धर्म सुरु झालं होतं. आजची अमावस्या इतर दिवसांपेक्षा वेगळी नव्हती. पण गाफील रहाणं शक्यच नव्हतं. भारद्वाजच्या घरात अक्षरश: कोंडून ठेवलेले सगळेच खूप कंटाळले होते. कुणालाही बाहेर पडण्याची मुभा नव्हती. "बाहेर पडून बघावं का ?" चांदेकरांना सारखी डोळ्यासमोर लेखा दिसत होती. उघड्या डोळ्यांनी रात्रभर भिंतीला पाठ लावून बसले होते. काशी देखील जागीच होती. इतरांनाही झोप नव्हती. "नाही,नको ! आपल्या बाहेर जाण्याने होत्याचं नव्हतं व्हायचं...!" पंत बाहेर जाण्यास तयार नव्हते. रात्रभर त्यांनाही बाहेरून नको-नको ते भयानक आवाज येत होते. बाहेर पाऊल टाकण्याने स्वतःचा आणि बाहेर असलेल्यांची धोका वाढणार होता. 

या पुढचा प्रवास काल रात्रीहून जास्त अवघड होता. आनंदला पाठीवर घेऊन, गावच्या या वेशिवरून य्या वेशीवर जायचे होते. मध्ये कुठेही त्याचा पाय जमीनीवर टेकवायचा नव्हता. जमीन शापित होती. त्याच्या मागच्या जन्माचं सगळं गुपित, क्रौर्य त्या जमिनीत होतं. नुसत्या स्पर्शाने त्याच्या पायाने ते डोक्यापर्यंत पोहोचलं असतं. घोड्यांचे लगाम आणि नाथा सुटल्या. दामोदरने त्याची व्यवस्था केली. रात्रीपासून त्याच्यातही बळ असे उरले नव्हते. सूर्य डोक्यावर असताना सुरु होणारा प्रवास काही तास चालणार होता. दुसरा मार्ग होता, पण त्या जंगलातून आणि लांबचा होता. त्यात जीवाला धोका होता. सूर्य माथ्यावर येताच त्याने आनंदला उचलून खांद्यावर घेतले. त्याला वाट दिसू नये, म्हणून त्याचे डोके जमिनीकडे केले. लेखा ही मागे सोबत होतीच. आज आनंद बराच जड भासत होता. पण जाणे भाग होते. वाटेने कोणाशी बोलण्याची मुभा नव्हती. कोणास उत्तर देण्याची मुभा नव्हती. थकण्याची मुभा नव्हती. पाण्याने भरलेला कातडी पिशवी, ते खंजीर आणि त्याची पिशवी सोबत घेऊन दामोदर निघाला. अमावस्या लागण्यास अजून वेळ होता.स्मशानाच्या बाहेर त्यांनी पाऊल टाकले. अर्ध्याशुद्धीवर असलेला आनंद दामोदरच्या पाठीवर हिंदोळे घेऊ लागला. 

तिघांनी गावची वेस मागे टाकली. गावात काहीच नवे घडले नव्हते. दामोदर थोडा थकायला लागला होता. अचानक एका मोठ्या बाभळीच्या झाडाची फांदी घोंगावू लागली. तिच्या फांद्या ताड-ताड करत वाटेवर पडू लागल्या. तो प्रकार पाहून दामोदर जागेवर थांबला. त्याने आपला रस्ता बदलला. गावच्या एका निमुळत्या गल्लीत तो शिरला. त्याला मागून भयानक आवाज येऊ लागले. हाए आवाज चहूबाजूंनी येत होते. गल्लीतून बाहेर येताच त्याला समोरचे दृश्य पाहून धडकी भरली. तो तिथेच येऊन पोहोचला होता. बाभळीच्या मोडून पडलेल्या काटेरी फांद्यानी आता तिथे एक काट्याचं वलय करून ठेवलं होतं. दामोदर क्षणभर थांबला. आधीची डाव्या बाजूची गल्ली टाळून तो उजव्या बाजूस शिरला. बरंच चालून आल्यावर पुन्हा तेच घडलं. आता मात्र गत्यंतर उरलं नव्हतं. त्याला त्या काट्यातून जावे लागणार होते. काहीही विचार न करता त्याने काट्यात पाय टाकला. जे हलके होते, ते मोडून पडले, पण जे जड होते, ते पायात रुतु लागले. त्याला असाह्य वेदना झाल्या. पण नाईलाज होता. साधारण शंभर पाऊलं तो चालून गेला.पाय रक्तबंबाळ झाला. पण तो थांबला नाहीच. शरीरातून घामाच्या धारा वहात होत्या. पाठीवरचं ओझं अधिक-अधिक जड होत होतं. 

त्याच्या मागून चालत असलेल्या लेखालाही त्याच्याच मार्गाने जाणं भाग होतं. तिची परिस्थिती अधिकच खंगली होती. नजर जात होती, तिकडे तिला काळ्या सावल्या, अर्धवट मारून पडलेली जनावरं केकाटताना दिसत होती. शेवटचे काही श्वास उरले असताना ते तिच्याकडे पाणी मागत होते. पण हे सगळं रचित होतं. गाव त्याचं होतं. गावातल्या मृतम्यांचा तो अघोषित पालक झाला होता. वाईटावर असलेल्या निर्विवाद सत्तेमुळे तो नकारात्मक सजीव आणि निर्जीवांचा सर्रास वापर करत होता. फक्त दामोदरच्या पाठीवर असल्याने आणि सूर्यप्रकाश प्रखर असल्याने त्याला स्वतःला हालचाल करता येत नव्हती. ते त्या कचाट्यातून सुटले. अमावस्या सुरु झाल्याचं दामोदरच्या लक्षात आलं.पण सवय झाल्यासारखी पाऊलं चालत होती. पाठीवर पाप होतं. शरीर थकत आलं होतं. धीर सुटत होता. पण थांबता येत नव्हतं. 

"कुठवर चालत रहाल?" लेखाला अचानक कानात जोरात आवाज आला. तिने आजूबाजूला पाहिलं. तिला कोणीच दिसलं नाही. "थकाल, पडाल ! तुम्हाला काय वाटलं, इतकं सोपं आहे. खांद्यावर टाकलं, की नेलं...?"

लेखाने आजूबाजूच्या घरांकडे पाहिलं. प्रत्येक घराच्या दारापाशी तिला तो उभा असलेला दिसला. कुठे अंगणात, कुठे छपरावर, कुठे विहिरीपाशी ! सगळीकडे तोच दिसत होता. ती घाबरली आणि तिचे चालते पाय थांबले. तिने दामोदरला आवाज द्यावा, म्हणून त्याच्याकडे पहिले.दामोदर त्याच्या खांद्यावर असल्याचं तिला दिसलं. हळू-हळू ते सगळे वाढू लागले. आणि काही क्षणात इतके वाढले, की सर्वत्र दिसू लागले. काही कळायच्या आत, तिथे गर्दी झाली. दामोदर आणि तिच्यात अंतर पडलं. तिला दामोदर दिसेनासा झाला. आणि ती हरवली. सगळ्याच एकसारख्या आकृत्या तिच्या आजूबाजूला गोळा झाल्या. आणि अचानक एक-एक करून अदृश्य होऊ लागल्या. काही वेळाने लेखा त्या रस्त्यावर एकटी उरली. 

कधी-कधी अंगात असलेलं धाडस एखाद्या कारस्थानासमोर लीलया बळी पडतं. लेखाचे तेच झाले. लवकरच तिच्या लक्षात आलं, की ती त्या गावात, त्या रस्त्यावर नसून, त्याने रचलेला एका मायावी सापळ्यात फसली आहे. हतबल होऊन ती सैरा-वैरा धावू लागली. आनंद, दामोदर यांना बोलावू लागली.पण तिला समोर दिसत होतं, ते फक्त विराण, धुळीने माखलेलं गाव आणि ओसाड रस्ते. 

भारद्वाजच्या घरात दडून बसलेल्या चांदेकरांना लेकीच्या आर्त किंकाळ्या ऐकू आल्या. त्या दुसऱ्या कुणालाही ऐकू आल्या नाहीत. प्रमाणाच्या बाहेर अस्वस्थ होऊन ते ताडकन उठले. कोणी अडवायच्या आत त्यांनी दार उघडलं आणि ते घराच्या बाहेर पडले. घराचं दार त्यांच्या पाठीवरच बंद झालं. लेकीच्या ओरडण्याचा माग घेत ते रस्त्यांवर धावू लागले. त्यांना कुणीही दिसलं नाही. रस्त्यावर चिट-पाखरूही नव्हतं. ते लेखाला शोधत वाट फुटेल तिकडे धावू लागले. या धावण्यात त्यांच्याशी कुणीतरी स्पर्धा करत होतं. मुलीच्या त्या किंचाळण्यात, ते हे देखील विसरले, की आपला कुणीतरी पाठलाग करतंय. 

पाठलाग निवळला. चांदेकर पळून-पळून दमले होते. आता त्यांच्याही लक्षात आले होते, की हा एक सापळा आहे. पण क्षणभर का होईना, हे दु:स्वप्न असावं आणि आपली पोरगी सुखरूप आपल्या समोर उभी रहावी, असं त्यांना वाटलं. तहानेने घसा कोरडा होऊ लागला. आजू-बाजूच्या खिडक्यांमधून या धाप लागलेल्या म्हाताऱ्याला लोक बघत होते. पण कुणी बाहेर येऊ धजत नव्हते. त्यांची दृष्टी क्षीण होऊ लागली. पाय लटपटू लागले. ते कोसळले...! 

अमावस्या सुरु झाली होती.

आकाशात अनंतकाळापासून चंद्राचा हा खेळ सुरू आहे. त्याची कमी-जास्त होत जाणारी कोर सगळ्याच राशींना , ग्रहांना आणि नक्षत्रांना आपल्या तालावर नाचवत आली आहे. अथांग पसरलेल्या सागराला देखील भरती-आहोटी च्या शिस्तीत बांधत आली आहे. सगाराने कित्येकदा प्रयत्न केला असेल, त्याच्या पर्यंत पोहोचण्याचा. पण तो नाही पोहोचू शकला. लाटांनी त्याला स्पर्श करण्यासाठी अक्षरश: थैमान घातले, पण इतक्या उंचावर जाऊन देखील त्यांना परत आपल्या पाण्यात येऊन मिसळावं लागलं. अतिशय सुदंर, लोभस दिसणारी ती चंद्रकोर सगळीकडेच आपले असणे सिद्ध करून जाते !

याच रात्रीत पाताळात दडलेल्या असंख्य कु-प्रवृत्ती बळावतात. रात्रीच्या अंधाराला उजागर करणारा एकमेव स्त्रोत, जेव्हा काही काळासाठी आकाशात दिसत नाही, अश्या प्रवृत्तींना बाहेर येता येते. सर्वत्र अंधार असला तरी चंद्राचा धाक आकाशात असतो. माणूस , श्वास घेणारे इतर प्राणी आणि सजीव, यांना जसं काळाने आपल्या ताब्यात ठेवलं आहे, तसंच चंद्राच्या प्रकाशाने रात्रीला आणि अंधारात होणाऱ्या चांगल्या-वाईट घटनांना आपल्या ताब्यात ठेवलं आहे. पण अमावास्येचं आकाश वेगळं असतं. पातळही वेगळं असतं. काही इच्छा भूतलावरच ठेवून गेलेले जागृत होतात. प्रतिशोधाच्या शोधात असलेले जागृत होतात. त्रासदायक असलेले जागृत होतात. दुर्बलांच्या राशीला असणारे जागृत होतात. कित्येक युग, जन्म, वर्ष आणि दिवस काळाच्या आड दडून बसलेले गूढ जागृत होते.

आपल्या मागे लेखा नाहीये, हे दामोदरला केव्हाच कळून चुकले होते. तरीही त्याच्या गतीत काहीच फरक पडला नव्हता. गावची दुसरी वेस अजून लांब होती. कित्येक रस्ते बदल्याने त्याला बाहेर पडण्यास उशीर झाला होता. पायाची अक्षरशः सालं निघत आली होती. पाठीच्या मध्यातून कळ निघत होती, अख्या शरीरात दाह निर्माण करत होती. लेखाचं नक्की काय झालं, हे कळायला मार्ग नव्हताच ! त्यामुळे त्याला अत्याधिक अस्वस्थ वाटत होते. उगाचच ती या सगळ्यात जीवानिशी पडली, असेही त्याला क्षणभर वाटले. पाठीवरचं ओझं उतरवलं, की सुडाची एक चपराक आपणही त्याला द्यावी, याचा विचार त्याने करून ठेवला होता. तो चालत होता, त्याचा श्वास तुटत होता. पण धीर सुटत नव्हता. या सगळ्यात बाकीचे किती उरले आहेत, हे ही दामोदरला माहित नव्हते. आपण आहोत, तो पर्यंत आहोत ! 

अंधार पडू लागला. वेस ओलांडून आता दामोदर गावाबाहेरच्या एका निमुळत्या रस्त्याला लागला होता. त्याच्या येण्याच्या चाहुलीने पाखरं सुद्धा बाहेर आली नाहीत. रात्रीच्या अंधारात ही वाट अधिकच भीषण वाटत होती. पौर्णिमेनंतरचे काही दिवस ही वाट सुरु असे. जसं-जसं चंद्राची कोर निमुळती होत होती, तसा या वाटेवर अंधार होत असे. गावकरी आणि इतर, ज्यांना हा रस्ता माहीत होता, ते अश्या दिवसात सहसा या वाटेवर येत नसत. पावसाळ्यात या वाटेवर गुडघाभर पाणी साचायचं. ते आत्ताही होतं. त्या पाण्यातून एक पाय बाहेर काढण्यासाठी दामोदरला आपला तोल सांभाळताना नाकी-नऊ येत होतं. पाठीवर असलेलं वजन, आजूबाजूच्या काटेरी झाडात फसत होतं. काटे त्याला अक्षरश: ओरबाडून काढत होते. चिखलात रुतणारे पाय घसरण्याच्या भीतीने अजून आत घट्ट दाबून धरावे लागत होते. रस्ता नेहमीचा होता, एवढंच काय ते चांगलं होतं. 

त्याने रचून ठेवलेल्या सापळ्यात लेखा लीलया सापडली होती. मर्यादा उमटून पडताच, ते इथेच.तिला कळलेही नाही, की इतर दोघांची आणि तिची ताटातूट कशी आणि कुठे झाली. थकून ती तिथेच जमीनीवर बसली. पुढे काय होणार याचा विचार करणं सोडून देणं, तिला तरी शक्य नव्हतं ! कुठून मदत येईल, ही अपेक्षा तिने सोडून दिली होती. अस्ताला जाणाऱ्या सूर्याने तिला एकटं सोडलं होतं. आजूबाजूला घरं होती, पण आत माणसं असण्याची शक्यता धूसर होती. दिवे लागण्याची वेळ होती.पण कोणाच्याही घरात दिवा लागलेला दिसला नाही. लेखा खिन्न होऊन आजूबाजूला फक्त बघत होती. 

त्याचे पाऊल वेशीबाहेर पडताच गावातला एकएक दरवाजा उघडू लागला. आत्तापर्यंत घरात दडून बसलेले लोक हलक्या हाताने खिडक्या उघडू लागले. बाहेर बघू लागले. पावसाची एक हलकी सर वरून उतरत होती. बऱ्याच दिवसांनी पावसाचे एक शांत आणि पवित्र स्वरूप गावकऱ्यांनी बंद खिडकीआडून पहिले. ते आज खूप काळाने सुखावणारे होते. अमावस्या अजून टाळली नव्हती. पण भीती मात्र दामोदरच्या पाठीवर बसून गावाबाहेर चालती झाली होती. आज गावच्या जमिनीवर पडलेला पाऊस, खरंच त्या शापित भूमीला पवित्र करण्याच्या हेतूने बरसणार होता. गावातल्या पावित्र्याला मोकळा श्वास घेण्याचे वेध लागले होते. 

भारद्वाज भर अंधारात खंडोबाची टेकडी उतरून गावात आला. त्यानेच तिथे धुनी-मशाली लावून गावकऱ्यांना कळवले होते. घरासमोर येताच काही पावलांवर त्याला चांदेकर दिसले. ते मूर्च्छित होते, हे लक्षात येताच त्याने त्यांना घरात नेले. 

"तो गेलाय गावाबाहेर...!" हे ऐकण्यासाठी आसुसलेले कान तृप्त झाले. घराची दारं उघडून त्यांने गार वाऱ्याला आत येऊ दिले.


रस्ता संपला. दामोदर बंगल्याच्या बाहेर येऊन उभा राहिला. जिवापेक्षा कित्येक जास्त पटीने श्रम झाले होते, पण त्या श्रमाहून मोठा आनंद होता. बरीचशी विघ्ने पार करून तो त्याला इथपर्यंत घेऊन आला होता. यात खूप जणांचे हकनाक प्राण गेले होते, कित्येक जणांचे आयुष्य पणाला लागले होते. स्वतः दामोदर सुद्धा मृत्यूच्या सावटाखाली वावरत होता. त्याच्या उभ्या आयुष्यात त्याने इतकं गूढ काहीही पाहिलं नव्हतं. कोणताच अनुभव इतका दांडगा आणि इतका जवळचा नव्हता. एका हाताने त्यांने ते लोखंडी फाटक उघडलं आणि त्याला पाठीवर घेऊन त्याने पाहिलं पाऊल आत टाकलं. 

आत्तापर्यंत शांत बसलेला वारा अचानक झाडांवरून खाली उतरून आला.जोर-जोरात फांद्या हलवून तो काहीतरी सांगत होता. तिथली जमीन त्या नराधमाला ओळखत होती. बऱ्याच वर्षांपूर्वी स्वतःच्या पायाने चालत येऊन त्याने इथे पापाचा रचलेला इमला कोणीच विसरलं नव्हतं. इथले जीव आणि निर्जीव, दोन्ही त्याच्यावर सूड उगावण्याच्या तयारीत होते. त्यांच्या झालेल्या या दैनेला, तोच जवाबदार होता. आत सुद्धा परिस्थिती वेगळी नव्हती. बाहेर घोंगावणाऱ्या वाऱ्याने मुक्यानेच आत तो आल्याची वर्दी दिली. छताला टांगलेली झुंबरं खाली येऊ पहात होती. खिडक्यांची दारंही सुडाचा बेत आपसात ठरवत होते.आत्तापर्यंत शांत खुंटीला धरून बसलेले पडदे अवतीभवती आवळून त्याचा फास तयार करत होते. शांत होती, ती जमीन, जिने अत्यंत जवळून त्याचे क्रौर्य पहिले होते. भिंतीही शांत होत्या , ज्यांच्या आत त्यांनी मृत्यूने थैमान घातलेल्या त्या रात्रीचं सगळं नाट्य पाहिलं होतं. त्याला दमोदरच्या पाठीवर निवांत पहुडलेला पाहून त्या बंगल्याच्या आतली संपूर्ण श्रुष्टीच पेटलेली भासत होती. पाऊस इथेही भुरभुर सुरूच होता. पण त्याच्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते. आज सगळेच एकवटले होते. ज्या वेदना, जे हाल या बंगल्याने सोसले होते, ते आज एक-एका झाडाच्या फांदीला आठवत होते. आतल्या प्रत्येक गोष्टीला आठवत होते. 

दामोदर त्या सुकल्या कारंजापाशी आला. सगळं झाल्यावर त्याने यातच आपले हात धुतले होते. पाणी सुकून एक हयात उलटली होती. पण रक्ताचे डाग काही केल्या जात नव्हते. त्या कारंजाला बिलगलेली एक वेल दामोदरच्या पायाला विळखा मारू लागली. हळू-हळू तो विळखा त्याच्या गुडघ्याच्या वर येऊन त्याला आपल्या पाशात घेऊ लागला. खजिरीवर एक हात असलेल्या दामोदरने त्या वेलीला तोडून मोकळे केले. तो पुढे चालू लागला. वेल पून्हा आपल्या जागेवर स्थिरावली. दामोदरचा वेगही आता वाढला होता. पुढे काय होईल याची उत्सुकता सगळ्यात जास्त त्याला होती. या सगळ्याचा शेवट कसा होईल याची काहीही कल्पना त्याला नव्हती, पण तो चांगला व्हावा, यासाठी त्याने खाल्लेल्या खस्ता ही अपार होत्या. त्याचे एक-एक पाऊल सगळ्यांनाच आपल्या परिणामाकडे घेऊन जाणारे होते. यात बळी गेलेल्यांच्या आत्म्याची शांतीही सामील होती. गेले कित्येक वर्ष या गावाने भोगलेले दुःख ही यात होते. सामान्य माणसाच्या मनात, रात्री-बेरात्री फिरताना दाटून येणारे भय यात होते. वाड्यातून येणाऱ्या त्या आवाजांनी थरकापाने उडालेल्या लहान मुलांच्या अपूर्ण निद्रा यात होत्या. यात नकळत गुरफटलेल्या सगळ्याच पात्रांनी सहन केलेल्या त्या प्रत्येक रात्रीचा हिशोब यात होता. हे सगळेच आता एका ठिकाणी स्थिर होणार होते. 

शेवटी त्याने त्याला मागूनच पाठीवरून खाली सोडले. त्यात प्राण आहेत किंवा नाही, ही शंका दामोदरला आली. पण मागे न बघता तो बंगल्याच्या दाराकडे जाऊ लागला. त्याच्या पायाने सरकलेली किल्ली त्याने हातात घेतली आणि कुलूप उघडले. कुलुपचा आवाज झाला आणि आत शेखरला पूर्ण जाग आली. त्याने दाराकडे पाहिले. अचानक चमकलेल्या विजेत त्याला दाराशी उभा असलेल्या दामोदर दिसला. संथ उठून तो दाराकडे बघत राहिला. त्याच्या डोळ्यांवर त्याचा आधी विश्वास बसलाच नाही. गेले अनेक तास तो त्याची वाट पहात होता. 

"मला वाटलं...?" तो त्याच्या समोर येऊन तो म्हणाला. 

"काय ? माझ्याने हे शक्य होईल की नाही...!" थकलेल्या दमोदरच्या तोंडून कित्येक तासांनी शब्द बाहेर पडले. 

" थोडी आली शंका...!" 

"जास्त नाही काही...! तुम्हाला इथे ताटकळत बसावं लागलं असतं."

" हो, अनेको जन्म...! तुमच्या सगळ्यांची पुन्हा जन्म घेण्याची वाट पहात...!" आपल्या चामडी पिशवीतून त्याला दामोदरने पाणी पाजले. शेखरचा आत्मा सुखावला. त्याने तोंड धुतले. बाहेरच्या दाराची चाहूल झाली. विजा शांत झाल्याने बाहेर काहीच दिसत नव्हते. 

"अर्धी रात्र होईल आता...!" शेखर त्याला म्हणाला. 

" हो, आणि उद्या एक नवी सकाळ सगळ्यांना एक नवा अनुभव देऊन जाईल."

"गावात...!" 

" सगळे व्यवस्थित आहेत. अनेकांचे बळी गेले, अनेक जण वाचले म्हणून सुप्त आनंदात आहेत."

" आता याचे काय करायचे...?" या प्रश्नाला अजूनतरी काहीच उत्तर नव्हते. 

गावातलं पाप पावसाने धुवून काढलं. एका जागी अश्रू ढाळत बसलेली लेखा पावसाने सुखावली. अंगावर पावसाचे थेंब पडताच तिने एकंच टाहो फोडला.तिचा हा आक्रोश मात्र आजूबाजूच्या लोकांना ऐकू गेला. दारं उघडली. लोक आपल्या अंगातून तिच्याकडे पहात होते. ती कुणाला ओळखत नव्हती, पण प्रत्येकाच्या मनात तिच्या बद्दल आता एक दया निर्माण झाली होती. एकदम तिच्या अंगावर एक मोठी साडी पडली.ती काशी होती. अनेको संकटांना तोंड देताना लेखाला आपण एकटं असण्याची जाणीव ,काशीच्या एका स्पर्शाने धुवून निघाले. अक्षरश: मृत्यूशी दोन हात करून आलेल्या आपल्या मानस-पुत्रीला काशीने कुशीत घेतले. माय-लेकींनी अश्रूंना मोकळी जागा करून दिली. 

" आता तुझा मार्ग मोकळा झाला...! जा, त्याला घेऊन ये." आधीच थकलेल्या लेखाला अजून आनंदला सुखरूप परत आणायचे होते. ती उठली. आपला पदर तिने तपासला.त्यात असलेली रक्षा ओली झाली होती. काशीने सोबत आणलेला एक लाल दोरा तिच्या दोन्ही हातांनी घट्ट बांधला.

"हा त्याच्या हाताला बांध." दाताने उरलेला दोरा तिने लेखाच्या हातात दिला. 

"मला येता येणार नाही. पण तुझंही काही वाईट होऊ देणार नाही." 

पावसाने वेग आता वाढवला होता. तश्यात लेखा आपलं उरलेलं कार्य सिद्धीस नेण्यासाठी निघाली. अंधार मी म्हणत होता. पण आता गावातल्या लोकांनीच या अंधाराला संपवायचे ठरवले होते. एक-एका घराबाहेर मशाली निघाल्या. तिच्या सोबत कुणी जात नव्हते, पण तिला वाट दिसण्यापूर्ती उजेड तर नक्कीच झाला होता. आपल्या लेकीला मिळालेला हा आधार पाहून काशीचे डोळे पाणावले. त्या अंधारलेल्या अमावास्येच्या रात्री लेखा आनंदला घ्यायला बंगल्याकडे निघाली. 

सगळे काही शांत होते. बाहेर बागेत झाडांची सळ-सळ सुरूच होती. बाहेर ओट्यावर निपचित पडलेल्या आनंदचे आणि त्याच्यावर हावी असलेल्या त्या नराधमाचे काय करायचे हे दोघांनाही सुचत नव्हते. शेखर चोर पावलांनी त्याच्याकडे सरकू लागला. तो जिवंत असण्याची शक्यता फार कमी होती. दमोदरच्या अंगावरच्या जखमा पाहून ,त्याने तो अंदाज लावला असावा. त्याच्या खूप जवळ येऊन तो खाली बसला. त्याने त्याच्या छातीवर हात ठेवला. तो थंड झाला होता. त्याच्या नाकाला बोट लावल्यावर मात्र शेखर चपापला. त्याचे श्वास सुरु होते. त्यात अजूनही अंतिम चेतना होती. हे एक बरं होतं. आता यापुढे एखादा जीव जावा, हा विचार अत्यंत व्यथित करणारा होता. नको होते हे निष्कारण जिव घेणारे घोळ. नको होता तो जीवघेणा थरार ! 

"अनेको निष्पाप लोकांचा बळी घेऊन कसा शांत झोपला आहे. वाटतं, की तो खंजीर घ्यावा, आणि असा याच्या छातीत उतरवून द्यावा." शेखर आनंदकडे पाहून बोलला. 

" हो, याला आणताना माझ्याही मनात हजारदा हा विचार आला." मागून दामोदर बोलला. 

"पण याचा अंत आपल्या हातून नाहीये...!" शेखरने त्याला उत्तर दिलं. 

" याचा अंत, तिच्याच हातून आहे. हा तुझा, माझा, सगळ्यांचा अपराधी आहेच. पण खरा अपराधी हा आहे, त्या निसर्गाचा, नियमांचा आणि नियतीचा. जिच्या विरोधात जाण्याचा याचा प्रयत्न इथे दुसऱ्यांदा फसला."

त्याला आत नेण्यासाठी म्हणून शेखरने त्याचे हात आपल्या गळ्याभवती घातले. तेवढ्यात त्याचे लक्ष बंगल्याच्या दाराकडे गेले. बाहेरचे लोखंडी फाटक काड-काड करत उघडले आणि एक मोठी मशाल सण-सण करत आत आली. काही कळायच्या आत ती मशाल शेखरच्या डोक्यावरून जात मागे उभा असलेल्या दमोदरच्या अंगावर जाऊन विसावली. अंगावर वीज पडल्यासारखा दामोदर बाजूला सरकला, पण त्याच्या कपड्याने पेट घेतला. शेखरने बाहेर पहिले. एक वीज कडाडली आणि त्याला फाटकाच्या आतून धावत येणारी लेखा दिसली. आनंदला तसेच टाकून शेखर दामोदला सांभाळायला गेला. 

" तो दामोदर नाहीये....!" जवळ येत असलेली लेखा जोरात ओरडली. काही कळायच्या आत दामोदरने कमरेचे खंजीर उपसले आणि शेखरवर उगारले. 

" हो, नाहीये मी दामोदर तुझा...!" दुसऱ्या चमकणारी लख्ख वीज दमोदरच्या चेहऱ्यावर पडली. त्याचा चेहरा उग्र झाला. डोळे लाल झाले. त्याचा जळकाअंगरखा फाटू लागला. आणि शेखरच्या डोळ्यासमोर एक जीवघेणे जळजळीत वास्तव आ वासून उभे राहिले. आपला मृत्यू आपल्याला कवेत घेऊन उभा असल्याचे दारुण चित्र शेखरला दिसले. 

" काय माणसं आहात तुम्ही !! स्वतःच्या प्रजातीतले धोके केव्हा ओळखाल ? " त्याने शेखरला आपल्या फासात घेतले. लेखा अजूनही लांब होती. "मी आधीच ओळखलं ! आणि माझ्या नंतर हिने...!" 

" हो, तुला मी आधीच ओळखलं होतं. तुझ्या मागे चालत होते न मी...!" लेखा आता जवळ येऊ लागली. 

" दिवसभर अंगावर प्रकाश होता न तुझ्या ...? त्यामुळे हळू-हळू आनंद जागृत होत होता." लेखा आनंदजवळ आली. आपल्या हातातला दोरा तिने त्याच्या हाताला बांधला. आता ती खूप जवळ आली होती. नकळत तिने पदराला बांधलेली राख हवेत उधळली. सगळीकडे धूर झाला. त्याच्या हातातला खंजीर खाली पडला. ती रक्षा डोळ्यात गेल्याने शेखरलाही अस्वस्थ वाटू लागले. दामोदरचा विळखा थोडा सैल झाला. शेखरने त्याला पूर्ण शक्तीनिशी ढकलले. धूर कमी झाला, तसा त्यांना थोडे स्पष्ट दिसू लागले. अंधारात दामोदर तिथून निसटला होता. 

शेखरने लेखाकडे पाहिले. 

"यांच्यासाठी मला इथवर यावं लागलं. " ती आनंदला सरकवून सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करू लागली. शेखरने त्याचे पाय ओढले आणि बंगल्याच्या आतील बाजूस ओढले. सगळे आत आले आणि बंगल्याचे दार धाडकन बंद झाले.

आनंद, शेखर आणि लेखा, तिघे त्या बंगल्यात अडकले. 

" माझा विश्वास सुद्धा बसत नाहीये, की दामोदर...!" शेखरला अजून विश्वास बसत नव्हता. 

" त्याचे मागे चालत होते मी. त्याच्या हालचाली खूप बारकाईने पहात होते. यानेच मला चुकवलं. मुद्दाम, कारण याचं खरं रूप मी ओळखलं. आनंद पार आधीच शुद्धीवर आला होता. त्याच्या डोळ्यांचे बदलते रंग मी पाहिले. पण तो याच्या पाठीवर होता...!" 


शेखरला पूरते कळून चुकले, की आता आपण एकटेच उरलो आहोत. त्याचे धैर्य खचू लागले.ते लेखालाही जाणवलं. 

" आता कळलं का...! मला तुम्ही घेऊन आलात, की मी तुम्हाला ?" सगळीकडे आवाज घुमू लागला. 

"का आणलं, हे पण सांगेन मी...! माणसाने मनात शंका, प्रश्न, प्रतिशोध घेऊन मरू नाही. माझ्यासारखं होतं. बसावं लागतं, वर्षानुवर्षं, वाट बघत." आवाज चहूबाजूंनी येत होता. दोघेही प्रचंड घाबरले होते. 

" आनंदची आता मला गरज उरली नाहीये. असाही तो शरीराने क्षीण झाला आहे. क्षणांत मरेल तो..! आणि ही... लेखा, त्याला वाचवायचा केविलवाणा प्रयत्न करत, ही पण यात फसली. ही पण जाणार जीवानिशी." लेखाच्या अंगातून एक थंड तरंग गेली, तशी ती थरथरली. 

" आणि तू....सर्जा....!!!" शेखरला तो एकदम समोर असल्याचं जाणवलं. 

"मागच्या जन्मीचा मृत्यू, इतक्या लवकर विसराशील असं वाटलं नव्हतं मला. पुन्हा जन्म घेतला. माझ्याच हातून पुन्हा मरण यावं म्हणून…..!" आणि त्याच्या क्रूर हास्याने अख्खा बंगला दणाणला. 

"आणि हा एक...! तुम्ही माणसं कुंडली पाहून मैत्री करत नाही न, याचाच हा परिणाम...दामोदर...!" 

" त्याचा दोष नाहीये...! सोड त्याला." शेखरने त्याला खणखणीत उत्तर दिलं. 

" दोष कसा नाही...! याच्या तर कुंडलीतच दोष आहे. आनंदच्या आहे तसा...! तेच नक्षत्र, तीच अमावस्या...तीच तारीख ! याला नेहमी हातच्याला ठेवलं होतं. आणि त्याचा वापर झाला." 

त्याचा सगळा खेळ पाहून शेखरला स्वतःवर कीव आली. 

" तसाही घात करून मारण्याची तुझी जुनी सवय आहे." शेखरने आपल्या खंजिरीवरची पकड घट्ट केली. 

"नकोस घट्ट पकडू...मरणार आहेस तू !" अचानक शेखरचं लक्ष त्याच्या बाजूला गेला. तो अक्राळ-विक्राळ होऊन त्यांच्या बाजूला येऊन बसला होता. त्याला असं अचानक आलेलं पाहून लेखा जोरात किंचाळली. दोघे वेगळ्या दिशेला पळाले. शेखर भिंतीकडे पळाला, तर लेखा एका मोठ्या मेजाच्या मागे गेली. या नादात आनंद मात्र एकटा राहिला. 

आता अंधारात खेळ सुरू झाला होता. लेखा लपली होती, तो मेज हलू लागला. तिच्या मागे असलेल्या एका खिडकीची काच निखळून तिच्या अंगावर पडणार, इतक्यात ती मेजाच्या खाली सरकली. मेजा खालून तिला त्याचे पाय दिसू लागले. ती श्वास रोखून बसली होती. काहीही न सुचल्याने ती उलट दिशेने बाहेर आली. त्याने तिला गाठले आणि खाली तुटून पडलेल्या काचेवर फेकले. शेखर , जो भिंतीच्या आडोश्याला उभा होता, त्याच्या गळ्याभवती एक पडदा विळखा मारू लागला. त्याचा श्वास कोंडला गेला. पण त्याच्याकडे असलेल्या खांजिरीने त्याने तो पडदा कापून काढला. 

लेखाला आता कळून चुकले होते, की आपला मृत्यू जवळ-जवळ निश्चित आहे. पण तिला असं मरायचं नव्हतं. कमीत कमी मूर्च्छित असलेल्या आनंदला बंगल्याबाहेर काढणं भाग होतं. तिने त्याच्या पावलांचा वेध घेतला. तो बरोबर दिवणखान्याच्या मध्ये उभा होता. त्याच्या तीन दिशांना आनंद, शेखर आणि ती स्वतः होती. त्याला काही कळायच्या आत तिने पूर्ण शक्तीनिशी तो मेज त्याच्या दिशेने सरकवत आणला. त्याचा वेग जास्त असल्याने दामोदरला काही कळले नाही. त्याला जोरात धक्का बसला आणि तो शेखरच्या दिशेने फेकला गेला. शेखरने त्याच पडद्याने त्याला आंधळं करण्याचा प्रयत्न केला. त्याला काहीच दिसेनासं झालं. तो जागीच हातवारे करू लागला. वेळ मिळाल्याने शेखर आणि लेखा आनंदकडे सरसावले. त्याला खेचून दाराकडे घेऊन जाऊ लागले. त्यांनी दार उघडले आणि ते जागीच थबकले. दार उघडताच समोर तोच होता. 

" मूर्ख आहात तुम्ही." म्हणत त्याने शेखरचा गळा पकडला. ही पकड पाहिल्याहून जास्त घट्ट होती. शेखर कळवळला. त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली. पाय लटपटू लागले. त्याने त्याला जमिनीपासून थोडं वर उचललं. त्याचा प्रतिकार करणाऱ्या लेखाला त्याने केव्हाच लांब फेकलं होतं. तेवढ्यात त्याच्या पोटात काहीतरी शिरले. खाली पडलेलं खंजीर आनंदने त्याच्या पोटात लोटले. तो दोन पाऊलं मागे सरकला. आनंद उठेल, मारेल, हे त्याला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. त्याला उठलेलं पाहून शेखरला सुद्धा आश्चर्य वाटलं.  

"खूप झाला तुझा हा खेळ आता..!" आनंद खूप दिवसांनी बोलला होता. बाजूला पडलेल्या लेखाला तो धूसरसा दिसला. 

" किती त्रास देतोयस..? तुझं काय वाईट केलं होतं रे, या सगळ्यांनी ?" आनंदने त्याच्या पोटातील खंजीर उपसलं. तो जास्त कळवळू लागला. 

" माझ्यात राहिलास त्यामुळे, तुझी सगळी पापं, तुझी गचाळ मानसिकता, तुझी सगळी कर्म कळाली मला..! पण एक लक्षात ठेव. कर्माला गती असते. तुझ्या त्या कुंडल्या लिहिणाऱ्या असुरांपेक्षा श्रेष्ठ काहीतरी आहे. त्याला आम्ही आमच्या देवघरात ठेवलंय." आनंदने खंजीर त्याच्या समोर धरलं. 

" याला आत घेऊन चला." शेखरने त्याला आत लोटायचा प्रयत्न केला. तिघे आत आले आज दार बंद झालं. 

तो आता दिवणखान्याच्या एकदम मध्यावर होता. वरचं झुंबर हलू लागलं. हवा एकदम बदलली. खिडकीतून आत शिरत ती दिवाणखान्यात सगळीकडे फिरू लागली. त्या हवेत नेहमीपेक्षा जास्त गारठा होता. ब्रम्हमुहूर्त होत आला होता. वर काहीतरी हालचाल झाली. ती हालचाल होताच दिवाणखान्यात असणाऱ्या निर्जीव वस्तू सुद्धा झुकल्या. एकाच पैंजणाचा आवाज शेखरने ओळखला. इतर दोघांसाठी मात्र हे नवं होतं. 

"सुभान...!" त्या आवाजाने त्याच्या काळजाचा थरकाप उडाला. त्याला कित्येक वर्षांनी कोणीतरी त्याच्या नावाने हाक मारली होती. 

" मागच्या जन्मी तर तुझाही मृत्यू केविलवाणा झाला होता. इतका क्लेशदायक मृत्यू येऊनही तुझा आत्मा मेला नाही. तो तसाच राहिला. क्रूर , कपटी , सूडाने पेटलेला...! "

" तुलाच मारायला आलोय..ये , समोर ये..!" 

" मी तेव्हा तुझ्या हाती लागले, तुझ्या कपटाने ! पण आता लागेल की नाही , शंका आहे !" 

" तेव्हाही माझ्या हातून मेली होतीस. आज सुद्धा..!" आणि तो गडगडुन हसू लागला. 

" हाच अहंकार...! याच्यामुळेच तुझी आज ही गत झालीये. अहंकारी, निर्दयी, कपटी ! "

त्या मोठ्या जिन्यावरून ती खाली आली होती. ती त्यालाही दिसत नव्हती. न दिसल्यामुळे त्याचा पारा चढला. शेखरने लेखा आणि आनंदला एका अंधाऱ्या कोपऱ्यात दडवून ठेवलं. ती त्याच्या एकदम समोर उभी होती. काहीच बोलत नव्हती. 

"तू एकदा समोर ये ! कित्येक वर्षांपासून मी वाट पहातोय. जिवंतपणी मरणयातना भोगल्या आहेत मी, तुझ्यामुळेच...!" 

"नाही सुभान..." माया एकदम ओरडली.

" यातना मी भोगल्या आहेत. आधीही आणि मेल्यानंतरही." आणि तो वर उचलला गेला. तिने एकदम त्याला सोडलं. तो खाली जमिनीवर कोसळला.

" अगं ए...! तुलाही माहिती आहे. मी असा मरणार नाही. संपून-संपून माझं हे शरीर संपेल. मला मृत्यू नाहीये. "

"आहे न, इथे जन्म घेतलेल्या प्रत्येक प्रवृत्ती आणि प्राण्याला मरावं लागतं, संपावं लागतं, नाहीतर त्याला दुसरा जन्म घेता येत नाही. आणि तुला तर नरकात सुद्धा जागा मिळणार नाहीये."

ब्रम्हमुहूर्त पूर्वेकडून उगवत होता. पण त्याला जागृत करणारा प्रत्येक कण पृथ्वीवर होता. अंधारात कोलाहल माजवणाऱ्या या शक्तींना संपवण्यासाठी निसर्गाच्या काही घटकांची गरज होती. निसर्गाच्या विरोधात जाणाऱ्या या नराधमाला, निसर्गच धडा शिकवणार, ही काळ्या दगडावरची रेष ! पण त्याला निसर्गासमोर उभं करणं भाग होतं.

शेखर तेवढ्यात तिथून निसटला. एका अंधाऱ्या खोलीत जाऊन खांद्यावर एक मोठा दोरखंड घेऊन आला. मायाने आधीच त्याला जखडून ठेवले होते. त्याला बांधले गेले. पाऊस थांबला होता.पण अजून वेळ होता. 

" किती वेळ बांधून ठेवशील ?" तो हसू लागला. तुमची शक्ती तरी किती आहे ? हे तीन मानव आणि तू, एक अतृप्त , या बंगल्यात कैद , एक अपूर्ण, अतृप्त आत्मा." 

" नाही सुभान...! तुला मारण्यासाठी शक्ती लागणार नाहीये !" 

दोरखंडात जखडून ठेवलेला दामोदर एकदम खाली ओढला गेला. हळू-हळू फरफटत तो दाराच्या दिशेने जाऊ लागला. दारही धाडकन उघडलं गेलं. बाहेर ओट्यावर येऊन तो स्थिरावला. शेखरने त्याचे खंजीर बाहेर काढले आणि जमिनीवर ठेवले. त्याचे दोन्ही हात पाय खांबांना बांधून ठेवण्यात आले. त्यालाही कळत नव्हते, हे चाललंय काय ? मायाच्या सांगण्यावरून बागेत एका कोपऱ्यातल्या खोलीतुन काही हत्यारं बाहेर आलीत. शेखर आणि आनंद कामाला लागले. कारंजाच्या आत उतरून त्यांनी खणायला सुरवात केली. बराच वेळ खणून झाले. कुदळीला धातू लागू लागले. वरची माती बाजूला झाली आणि एक मोठी पेटी बाहेर आली. ती पेटी पहातच दामोदरच्या आतला सुभान बेभान झाला. 

"हीच तुझी सगळी शक्ती...!" माया पेटीकडे पाहून म्हणाली. 

"तुझ्या शेवटच्या गड्याने तू मेल्यावर ,तुझ्यावर केलेले हे उपकार इथे पुरून ठेवले होते." 

गोंधळलेल्या शेखरने ती पेटी उघडून पहिली. पून्हा विजा चमकू लागल्या. आत असलेलं सुभानच अर्धवट जळलेलं प्रेत त्यात होतं. आता फक्त काही हाडं शिल्लक होती. 

" तू मेलास त्यावेळी तुझा अंत्यविधी करणारं नव्हतं कुणी...! पुढची कार्य झाली असती, तर कदाचित तुला असं जगावं लागलं नसतं. पण विधीच्या नियमानुसार हे झालं नाही. आता होईल...!" तिने बांधलेल्या सुभानला सोडलं आणि अंगणात फेकलं. पावसाच्या सरी पडायला सुरुवात झाली. आतापर्यंत बाहेरची हवा न लागलेला तो सापळा त्या सरींमध्ये न्हाऊ लागला. अंगातून प्राण गेल्यानंतर त्या देहाला शुद्ध करण्याच्या भानगडीत कुणी पडलं नव्हतं. आता हे काम पाऊस करत होता. आपली हाडं जळताना पाहून सुभान जास्तच बेभान होत होता. हाडांवर पडणाऱ्या सरींनी त्याच्या अंगाचा दाह होऊ लागला होता. तो तडफडत आपल्या सापळ्याकडे सरकू लागला. आनंद, शेखर, लेखा, माया, हे सगळं बघत होते. 

"सुभान...! हे इथे होतं, म्हणून मी इथे होते !" 

सगळी अर्धवट जळालेली हाडं त्या पावसाच्या पाण्याने शुद्ध झाली. सुभान मधलं उरलेलं बळ क्षीण होऊ लागलं. तो त्या भिजलेल्या हाडांजवळ जाऊन रडू लागला. 

" प्रत्येक पापाचा अंत असतो सुभान...! ज्या शरीराच्या जोरावर तुझा आत्मा पापं करत सुटला होता, ते शरीर हळू-हळू नष्ट होईल.." शेखरने खंजीर उचलला आणि त्याच्या हृदायात उतरवला. उतरवताना आपल्या हातून दामोदर मरतोय, हे त्याला जाणवलं. 

" एक चांगला मित्र गमावला मी तुझ्यामुळे." रडतच शेखरने पून्हा तो खंजीर उपसला. पुन्हा आत सरकवला. आधीच जखमांनी घायाळ झालेले शरीर दोन गावात निषतेज झाले. आनंद शेखर जवळ आला. त्याने त्याला उचलले. लेखाचेही डोळे भरून आले. सगळे बाजूला बसले. आकाशातून एक मोठी वीज पडली. तिचा दाह इतका भयंकर होता, की सुभानची हाडं आणि दामोदरचं प्रेत त्यात पेटून उठलं. जो निसर्गाच्या विरोधात गेला. त्याचा अंत्यविधी आज निसर्गाने केला. त्याचसोबत अंत्यविधी झाला, तो भयाचा , अमानुष अत्याचाराचा , पापाचा...! 

ज्या मातीत हे पाप घडले, त्याच मातीत ते पंचमहाभूतांच्या हवाली झाले. त्याच्या शरीराचा अंत्यविधी पूर्ण न पहाता गावकरी निघून गेले. त्यावेळी निसर्गाने आणि नियातीनेही त्याला वाऱ्यावर सोडले. पण आज मात्र त्याला गती मिळाली होती. त्याच्यातलं पाप विरघळून , त्याचा आत्मा शुद्ध झाला होता. एखाद्या नवजात शिशु सारखा, ज्याला न भूतकाळ आठवत होता, न भविष्याची चिंता होती. 

पहाट झाली होती. झाडांवर पाखरांची पिल्लं भुकेने ओरडू लागली. रात्रभर सगळे जागे होते. लेखा आनंदच्या मांडीवर डोकं ठेऊन निवांत पडली होती. 

"चला...घरी जायचंय तुम्हाला ?" शेखरने दोघांना जागं केलं. 

पूर्ण जन्म एका निर्दयी शापाखाली वावरणाऱ्या आनंदने आपण मुक्त झाल्याची संवेदना शेखरला मिठी मारून व्यक्त केली. 

"हिच्यामुळे तुला आजचा दिवस बघायला मिळाला आहे. हिचे अनंत उपकार आहेत तुझ्यावर. हिला कधीही अंतर नको देऊस." 

" तुम्ही...?" लेखाने शेखरला प्रश्न केला. त्याने मागे बंगक्याकडे पहिले. 

माया पहाटेच मुक्त झाली होती. जाताना आजूबाजूची बाग फुलवून गेली होती. आज सगळ्या खिडक्या उघड्या होत्या. पहाटेच्या स्वच्छ वाऱ्याने आतली जळमटं, धूळ झटकून काढली होती. शेखरचे डोळे भरून आले. 

"माहित नाही...! पण कदाचित उर्वरित आयुष्य इथेच घालावेन. इथे माझं बालपण आहे, निसर्ग आहे. मागच्या जन्मीच्या, या जन्मीच्या खूप आठवणी आहेत." 

एक पांढरी आकृती तयार होऊन त्यांच्या समोर उभी राहिली. तो दामोदर होता. 

"मित्रा... मैत्रीला जगलास...जीव दिलास ? "

" या पेक्षा मोठं पुण्याचं काम नाहीये." दामोदरचा आत्मा एखादया तेजस्वी साधूसारखा भासत होता. 

"कोणाला काही सांगू नका, इथलं गूढ, गुपित, इथे, या बंगल्याच्या आवारात राहील, याची काळजी घ्या...!" एवढे बोलून तो आभाळात निघून गेला. 

रात्रभर वाट बघणारे सगळे आता बंगल्याच्या आवारात येऊ लागले. त्या तिघांना समोर उभं पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावले...! 

" संपलं...! या भूमीवरचं भयनाट्य संपलं ! " भारद्वाज शेखरच्या जवळ येऊन म्हणाला.

"हो...!" 

बंगल्याचं दार सगळे बाहेर पडल्यावर पून्हा बंद झालं. पण आतला निसर्ग आता खुलला होता. शेखरने पुन्हा मागे वळून पाहिले. निसर्गाने त्याला घातलेली साद ऐकण्यासाठी...!

"येईन मी, पून्हा कधीही न जाण्यासाठी....! म्हणाला आणि तो चालता झाला....!



समाप्त...!



Rate this content
Log in

Similar marathi story from Horror