मित्राच्या कथा आणि व्यथा..!
मित्राच्या कथा आणि व्यथा..!


माझा मित्र कसा हुशार आणि चोखंदळ आहे, हे या पूर्वी मी आपणास सांगितले आहे. आज त्याच्या माणूसकी आणि सोशिकपणा बद्दल सांगणार आहे. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींकडून चांगले संस्कार झाले असल्यामुळे स्त्री दाक्षिण्य हा गुण त्याचे नसानसात भिनला आहे. कुठल्याही लाईनमध्ये उभा असल्यावर मागे जर लेडीज असेल तर तो क्षणाचाही विलंब न लावता त्यांना आपल्या पुढे येवून रांगेत उभे करतो. त्या साठी तमाम पुरुष मंडळींचा रोष ओढवून घेतो. बस किंवा रेल्वे मध्ये चढताना, आपला हात आडवा लावून सर्व महिलांना आधी जावू देतो. त्यामुळे कित्येकदा त्याची इतरांसोबत बाचाबाची पण झाली आहे. त्याच्या या वागण्याचा समाजातील सर्व पुरूष व घरातील सर्व महीला नेहमीच विरोध करत आल्या आहेत. एका प्रसंगात त्याला समोरचे दोन दात पण गमवावे लागले होते. झटापटीत मोबाईल हरवणें, कागदे गहाळ होणे, ही नित्याची बाब. सोशल मीडिया वर सक्रिय असल्यामुळे, महिलांना आदराने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे, आलेली स्वीकारणे, नेहमी ख्यालीखुशाली विचारणे, महादेवाच्या पिंडी वरील पान चूकेल पण मित्रा चा गुड मॉर्निंग आणि गुड नाईट मेसेज नाही चुकणार. त्याचे परिणाम त्यालाच भोगावे लागतात, ब्लॉक होणे आणि मग ब्लॉक का केले असेल याचा विचार करणे, अशा फेऱ्यातून जावे लागते. पण काही असो... चिकाटी जबरदस्त आहे त्याचेकडे. कित्येकदा फ्रेंड बुकचा स्क्रीन शॉट त्याने मला( उपहासाने) पाठविला आहे.
घरीसुद्धा असेच वागणे. जे वाढलें ते निमूटपणे खायचे. अन्नाला नाव नाही ठेवायचे. पोट आहे म्हणून भूक लागते आणि भूक लागते म्हणून अन्न लागते... असे त्यानी घरातील पाटीवर खडूने लिहून ठेवले आहे.
बाकी माझे म्हणाल तर.... पोरांना बोलता येत नाही.... आणि मला सांगता येत नाही..... तुमचा काय आहे अनुभव?
ता. क.- जे या पोस्टला होकार देतील, समजावे घरचे फेसबुकवर नाहीत आणि जे नकार देतील, समजावे घरचे फेसबुकवर आहेत.