एक चर्चा...
एक चर्चा...


स्त्री पुरुष समानता गरजेची आहे का?
मला वाटतं आजचा विषयच चुकीचा आहे. कुठल्याही प्रश्नाला दोन प्रकारे उत्तर देता येते. एक 'नाही'.. दुसरे 'हो'. पण या प्रश्नावर एकच उत्तर आहे.... हो....! मुळात आजच्या काळाच्या अनुरुप विचार केल्यास, स्त्री विषयक सुधारणा राजा राम मोहनरॉय, महात्मा फुले, धोंडो केशव कर्वे यांचेपासून सुरू होवून, आजही सुरू आहेत. ही एक सतत घडणारी प्रक्रिया आहे. मला वाटतं 'दिशा' हा कायदा त्याचाच दृश्य परिणाम आहे. तसेही भारतात पुरातन काळापासून स्त्री ही शक्तीचे रूप म्हणून पुजण्यात येते. कृष्ण राधेशिवाय, राम सीतेशिवाय, शिव पार्वतीशिवाय अपूर्ण आहे. किंबहुना कृष्ण, राम, शिव यांचे नावाचे आधी राधा, सिया (सियाराम) यांचे नाव येते. समानता नाही तर जास्तीचा मान आहे. अनन्यसाधारण महत्व आहे.
नंतरच्या परकीय आक्रमणांमुळे, एक असुरक्षेची भावना समाजात निर्माण झाली. त्यातून स्त्रीला बंधन आली. जी नंतर समाजात रुढ झाली. परंतु वाईट चालीरीतींविरूद्ध येथील समाजाने कायम उठाव केला आहे. नवीन दृष्टीकोन स्वीकारण्याचे कार्य भारतीय समाजाइतके इतर कुठल्याही समाजात दिसून येत नाही. आपल्या परंपरा सांभाळून नवीन बाबींचा स्वीकार केला आहे. यात स्त्री समानतापण आली आहे.
आजच्या काळात तर पुरुषांपेक्षा स्त्री शिक्षण क्षेत्रात अग्रेसर आहे. बघा दहावी, बारावी, स्पर्धा परीक्षा, सगळीकडे स्त्रियांनी यश संपादन केले आहे. कुठल्याही सुधारणांसाठी शिक्षण महत्त्वाचे असते. शिक्षणाशिवाय सुधारणा होवू शकत नाही. स्त्री समानता ही पण सुधारणाच आहे. प्रत्येक क्षेत्रात स्त्री अग्रेसर आहे. राजकारण, समाजकारण, विज्ञान संशोधन, अवकाश यात्रा, इंजिनिअरिंग, मेडिकल, प्रशासन सगळीकडे आहे. आता तर शासनाने सुरक्षा क्षेत्रातही स्त्री समावेशास परवानगी दिली असून, स्त्री घराची नाही तर देशाच्या सीमांचे रक्षण करत आहे.....!!
समाजातील स्त्री वर्गाचे महत्त्व सर्वच धर्मांनी /देशांनी /राज्य घटनांनी मान्य केले आहे. पुरुषांपेक्षा ही स्त्री ला जास्त महत्व दिले आहे. कारण ती निर्माती आहे. तिच्याशिवाय उत्पत्ती शक्य नाही. म्हणूनच पाश्चिमात्य देशात 'लेडीज फस्ट' म्हणतात. भारतातही 'स्त्री दाक्षिण्य' म्हणतात. त्यामुळे समानतेपेक्षाही स्त्रीचा दर्जा उच्च आहे. वाईट चालीरीती सगळ्याच देशात, सगळ्याच धर्मात आढळतात. वेळ काळपरत्वे समाज त्याविरुद्ध आवाज उठवतो. आंदोलनं होतात, कायदे होतात, कायद्यांचा गैरवापरही होतो. परंतु ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. ज्या समाजात स्त्रीला महत्त्व आहे, तो समाज उच्च दर्जाचा मानला जातो. अहो, काही समाजात तर भारतामध्ये मातृसत्ताक पद्धत होती..... आजही आहे....!!
काही कारणांनी जुना स्त्रीविषयक आदर लोप पावून, तिचा एक उपभोगाची वस्तू म्हणून वापर झाला. परंतु आपण सर्वांना मिळून, स्त्रीला तिचा पूर्वीचा आदर मिळवून देणे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात आपल्या घरापासून केली पाहिजे. चला तर मग, आपण आपल्या घरातील स्त्रीचा, आपल्या संपर्कात येणाऱ्या स्त्रीचा आदर करावयास शिकूयात...
धन्यवाद..!