महाराजा सयाजीराव गायकवाड
महाराजा सयाजीराव गायकवाड
सयाजीराव अवघ्या बारा वर्षाचे असतांना बडोदा संस्थानाचे महाराज झाले. साध्या शेतकऱ्याचा मुलगा 'गोपाळ' चाणाक्ष बुध्दी असल्याने अवघ्या बाराव्या वर्षी महाराज होऊन इतिहास घडवतो. गुजराथी तसेच मराठी या दोन्हींचा योग्य समतोल राखुन महाराजांनी इतिहास तर घडवलाच पण भविष्य देखील उज्जवल घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. प्रांतभेद महाराजांनी कधी केलाच नाही त्यांनी तर आयुष्यभर सर्वांथाने मदतच केली. ज्या लोकशाहीचे आपण गुणगान गातो तिचे निर्माते महाराज आहेत. सत्तेचं विकेंद्रिकरण करून ग्रामपंचायती निर्माण करण्याचं काम महाराजांनी केलं. जनतेला मतदानाचा अधिकार दिला. स्वतःच्या खर्चात कपात करून संपूर्ण येणारा महसुल महाराजांनी प्रजेच्या विकासासाठी कामी घेतलं. बडोद्यात पाणीटंचाई होती ते ओळखुन महारजांनी इंजीनिअर बोलवुन मोठ मोठे तलाव निर्माण करून पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. ज्या व्यक्तिंना अस्पृश्य म्हणुन समाजात हिणवलं जायचं त्यांना मोफत शिक्षण देऊन पुढे आणण्याचं काम महाराजांनी चोख केलं. मुला-मुलींसाठी प्राथमिक शिक्षण कायद्याने सक्तीचं आणि मोफत उपलब्ध करुन देणारे सयाजीराव पहिलेच होते. त्यांनी अगदी कमी कालावधीत शिक्षणाचे महत्तव ओळखुन समाज उत्थानासाठी शिक्षणाला प्रोत्साहन दिलं. त्यांनी शालेय पुस्तके देखील मोफत पुरवली तसेच अस्पृश्यांसाठी मोफत शाळा सुरू केली.
म.फुले व सावित्रीबाई फुले यांसारखं शिक्षणाला महत्तव देणारे कोणी असेल तर ते एकमेव महाराजा सयाजीराव गायकवाड. महाराजांच्या पत्नी महाराणी चिमणाबाई दुसऱ्या यांना अक्षर ओळख नव्हती म्हणुन त्यांच्या शिकवणीसाठी राजवाड्यात व्यवस्था केली. मला तरी वाटतं महाराणीच्या शिक्षणापासुन स्त्री शिक्षणाचा पाया घातला गेला आसावा. एका गुराख्याच्या पोरानं चौसष्ठ वर्षांच्या कारभारात स्वातंत्र्यपुर्व काळात शिक्षण, समाज परिवर्तन, कला, संस्कृती, आणि राष्ट्र भक्तीचं उतुंग काम केलंय. देशातील अनेक क्रांतीकारकांना आणि चळवळींना धोखा पत्करून महाराजांनी सढळ हाताने मदत केली.अशाप्रकारे मदत करणारे महाराज एकटेच होते. महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, पं. मदनमोहन मालवीय, बाळ गंगाधर टिळक, अशा अनेकांना महाराजांनी मदत केली.
महाराजांनी कलावंताचं कौतुकाबरोबरच सन्मानही केलं.राज्याची संपत्ती साहित्य आणि कलेच्या समृध्दीत असते या जाणिवेनं ग्रंथ प्रकाशनाचं आणि पुस्तकालयाचं काम महाराजांनी केलं. महाराजांविषयी महाराष्ट्रात जास्त चर्चा होताना दिसत नाही ही चिंतेची बाब आहे.आजच्या या काळात राजा कसा असावा याचं महाराज उत्तम उदाहरण आहेत.भारतातील अनेक प्रगतीपर कार्यांचा पाया महाराजांनीच रोवला.जगावेगळं कार्य करून महाराजांनी आपल्यावर उपकार केले आहेत. बाबा भांड यांनी 'युगद्रष्टा महाराजा सयाजीराव गायकवाड' ही कादंबरी लिहली आहे ज्याच्यातुन सयाजीरावांचे सर्वांग दर्शन घडले.महाराजाचं अलौकिक कर्तुत्व वाचुन तुमच्यापर्यंत पोहचवण्यात मला खुप आनंद होत आहे.समाजाची,राष्ट्राची प्रगती महाराजांच्या दुरदृष्टीमुळेच शक्य झाली.अशा या तीव्र जिज्ञासु महाराजांना माझा कोटी कोटी प्रणाम.
