महामानव
महामानव
जगातील श्रेष्ठ घटनांमध्ये आपल्या देशाच्या घटनेचा समावेश होतो. समता, बंधुता आणि न्याय ही तत्वे आपल्या घटनेचा भक्कम पाया आहे. समाजातील सर्व घटकांना विकास आणि प्रगती साध्य करण्याची समान संधी घटनेने दिली. या घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे जगातील एक उत्तम संविधान तज्ज्ञ होते. त्यांनी जगातील अनेक देशांच्या संविधानांचा अभ्यास केला दे केला होता.
ज्ञान म्हणजे व्यक्तीच्या जीवनाचा पाया होय. म्हणून प्रत्येकाने आपल्या सर्वांगीण विकासासाठी हालअपेष्टा सहन करून का होईना पण शिक्षण मिळवले पाहिजे आणि त्या ज्ञानाच्या जोरावर स्वतंत्रपणे विचार करायला शिकले पाहिजे असे बाबासाहेब आंबेडकर यांचे ठाम मत होते. शिक्षणातून सर्वांगीण परिवर्तन होऊ शकते, यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा ठाम विश्वास होता. समाजाचा विचार करायचा असेल तर शिक्षणापेक्षा मोठे साधन नाही, कारण शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे साधन
आहे यावर त्यांची गाढ श्रद्धा होती. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि न्याय या मूल्यांवर आधारित समाज घडविण्यासाठी शैक्षणिक क्रांतीची गरज आहे याची ही जाणीव त्यांना होती. उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणुस हीनबल होऊन अल्पायुषी होतो तसेच शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जिवंतपणीच दुसऱ्यांचा गुलाम होतो, असे गुलामीचे कारण डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते. शिक्षणाच्या अभावामुळे माणसाच्या आयुष्यात गुलामी प्रवेश करते म्हणून स्वावलंबनाने, स्वाभिमानाने जगण्यासाठी शिक्षण घेणे फार महत्त्वाचे आहे.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे फार मोठे अर्थशास्त्रतज्ज्ञ होते. अर्थशास्त्रमध्ये डी.एस.सी पदवी मिळविणारे ते पहिले भारतीय होते. त्यांचे अर्थविषयक विचार हे मूलगामी आहेत. त्यांनी अर्थकारणावर प्रचंड लेखन केले. विधीमंडळात निवडून गेल्यावर त्यांनी वेळोवेळी शासकीय अर्थसंकल्पावर अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन केले. अर्थसंकल्पाचे कठोर विश्लेषण करण्यात त्यांचा हातखंडा होता.
अर्थसंकल्पातील आकडेवारी आणि सामान्य जनतेचे हित यामध्ये कशी मोठी तफावत आहे, ही बाब ते प्रभावीपणे आपल्या भाषणातून व्यक्त करत असत.
हिंदू समाजातील सगळ्या प्रकारच्या विषमतांपैकी एक, म्हणजे स्त्री-पुरुष विषमता. तिच्यामुळे स्त्रियांवर होणारे अन्याय दूर करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेले महत्त्वाचे अस्त्र म्हणजे कायदा. भारतात महिलांचे उद्धारक अनेक झाले पण कैवारी मात्र एकच झाला, बोधीसत्व बाबासाहेब आंबेडकर. स्त्रियांच्या हक्कांसाठी लढणारा असा योद्धा पून्हा होणे नाही. एका हाती कायद्याचे शस्त्र तर दुसऱ्या हाती चळवळीचे असे दोन्ही हाती शस्त्र घेऊन लढणारे योद्धे. आपल्या उण्यापूऱ्या ६५ वर्षांच्या आयुष्यात बाबासाहेबांनी सामाजिक क्रांती घडवून आणली.
बाबासाहेब आंबेडकर हे कर्ते पुरुष होते. समाजातील उपेक्षितांच्या जीवनात नवा सूर्य उगवण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या जीवनाचा मार्ग त्यांनी आपल्या आत्मप्रकाशाने प्रकाशित केला. रंजल्या गांजलेल्या साठी त्यांची करुणा पाझरत असे. बाबासाहेबांच्या श्रेष्ठत्व आणि महानतेच्या या आठवणी प्रेरणादायी आणि स्फूर्तिदायी आहेत.
