मध्यरात्रीची थाप
मध्यरात्रीची थाप
मध्यरात्री एक-दीडचा सुमार होता. शहराच्या एका कोपऱ्यातली ती चाळ शांत निजली होती. रात्रीच्या शांततेने सगळा परिसर आपल्या कवेत घेतला होता. मिट्ट काळोखाने वेढलेला तो सगळा परिसर अंधाराच्या दहशतीखाली गप्प झाल्यासारखा भासत होता. कुठेही कसलाही आवाज होत नव्हता. चाळीसमोरचा रस्ता सुनसान पडला होता. चिटपाखरू देखील दिसत नव्हतं. एकुलता एक दिवा रस्त्यावर आणि चाळीच्या गेटवर आपला प्रकाश पाडून अंधाराला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होता. तीन मजली असलेल्या त्या चाळीत सगळीकडे सन्नाटा पसरला होता. दाटीवाटीने बांधलेले चाळीतले गाळे शांततेच्या डोहात बुडाले होते. गहन शांततेत बुडालेला तो सगळा परिसर कुठल्याही हालचालीची खूण दर्शवत नव्हता.
दोनचे ठोके पडले आणि पहिल्या मजल्यावरच्या कोपऱ्यातल्या त्या खोलीचा दिवा चालू झाला. पिवळ्याधमक प्रकाशात न्हाऊन निघालेल्या त्या खोलीच्या खिडकीतून तो प्रकाश बाहेर पडू लागला अन् त्यामुळे काळोखात बुडालेली ती सबंध इमारत एकच डोळा असणाऱ्या एखाद्या राक्षसासारखी दिसू लागली. ती खोली होती केशवची !
केशव पाटील. गावाकडून शहरात पैसे कमावण्यासाठी आलेला चार-चौघांसारखा एक साधा तरुण. गावाकडे आईवडील शेती सांभाळायचे पण तरी बदलत्या काळानुसार आणि वाढत्या महागाईनुसार एकुलत्या एका केशवने शहरासारख्या ठिकाणी जाऊन आपले हातपाय हलवणं गरजेचं झालं होतं. शिक्षणात त्याला तितकीशी गती नव्हती म्हणून जेमतेम साक्षर होईपर्यंत त्याचं शिक्षण पूर्ण झालं. कष्ट करून, गाठीशी पैसे बांधून इथेच शहरात घर थाटण्याची त्याची स्वप्नं होती आणि अर्थात त्यात गैर असं काहीच नव्हतं. गावकडून शहराकडे धाव घेणाऱ्या प्रत्येक तरुणाची हीच हकीकत होती. केशवला ह्या चाळीत ही खोली एका मित्राच्या ओळखीतून मिळाली होती. दहा बाय बाराची खोली आणि मागे मोरी, हे एवढं त्याच्यासारख्या सडाफटिंग एकट्या माणसासाठी पुरेसं होतं. शहारासारख्या ठिकाणी असूनही खोलीचं भाडं त्याच्या आवाक्यातलं होतं म्हणून कसलीही कानकूच न करता आणि जास्त खोलात शिरून विचार न करता त्याने लगेच 'हो' म्हणून टाकलं होतं.
केशवला इथे येऊन काहीच दिवस झाले होते. आजूबाजूच्या लोकांशी थोडीफार ओळख झाली होती. त्याची खोली चाळीच्या पहिल्याच मजल्यावर होती आणि इथे बहुतेक करून त्याचे शेजारी म्हणून कुटुंबे होती. दोन घरे सोडून बाबू सोनार यांचं घर होतं. त्यांची दोन मुले, विशाल आणि प्रतीक. केशवपेक्षा काहीच वर्षांनी लहान असावीत. केशव जेव्हा नवीन राहायला आला तेव्हा ते दोघे आणि वरच्या मजल्यावर राहणारे आणखी दोघे, विनीत आणि सुभाष असे चौघे तिथेच गप्पा मारत होते. केशवने घराचं कुलूप काढलं आणि या चौघांच्या नजारा त्याच्याकडे वळल्या. एकंदर केशवचा अवतार बघून पाणी गावकडचं आहे हे त्यांनी चटकन ओळखलं. चौघांनी एकमेकांकडे फाजील, टारगट नजरेने बघितलं. एकमेकांना खुणा करीत ते चौघे, विशाल, प्रतीक, विनीत आणि सुभाष, केशवच्या दारसमोर उभे राहिले. आत केशव त्याच्या सामानाची मांडामांड करत होता.
"दादा, नवीन आलेला दिसतोस ?", विशाल म्हणाला आणि केशवची नजर या चौघांवर पडली.
"हो", केशव अर्धवट म्हणाला.
"असं होय, मी विशाल.." असे म्हणत चौघांनी अगदी हसत आपापली ओळख करून दिली. त्यांच्या हसून आणि आपूलकीपूर्वक बोलण्याने केशव सुद्धा मोकळा झाला. त्याने मग स्वतःची ओळख करून दिली. या चौघांनी जे हेरलं होतं ते अगदी अचूक होतं. केशवच्या खोलीतून बाहेर पडतांना नकळत त्यांच्या मनात ती योजना शिजू लागली होती.
बघता बघता केशवची आणि या चौघांची चांगली मैत्री झाली. एक दिवस असेच दुपारचे गप्पा मारायला म्हणून हे चौघे केशवच्या घरी आले होते. नोकरीच्या शोधार्थ सकाळी फिरफिर करून दमलेला केशव नुकतंच जेवण आटोपून विश्रांतीसाठी पहुडला होता. दारावर थाप पडली म्हणून त्याची झोप चाळवली. जाऊन पाहतो तर हे चौघे. त्यांना पाहून केशवला खूप आनंद झाला. या चौघांच्या सोबतीमुळे आताशा त्याला अजिबात एकटं वाटत नव्हतं. सतरंजीवर पाचजण बसले. कुणीतरी पत्त्यांचा कॅट आणला होता. बघता बघता खेळाचा डाव मांडला गेला. केशव अगदी खुश होऊन खेळत होता पण त्याच्या हे लक्षात आलं नव्हतं की त्याच्या नकळत हे चौघे आळीपाळीने त्याच्याकडे आणि एकमेकांकडे पाहून सूचक हसत होते. काहीवेळ गेला आणि प्रतिकने तो विषय काढलाच!
"केशव दादा, तुला माहीत आहे का, आपली ही चाळ शापित आहे..", प्रतीक अगदी खालच्या आवाजात म्हणाला.
"श्या प्रत्या, केशव दादाला कुठे माहीत असणार.. तो नुकताच आलाय ना चाळीत..", सुभाष उगीच त्याच्यावर ओरडल्यासारखं करू लागला.
'शापित' ऐकल्यावर केशवने कान टवकारले. "काय ? शापित ?", तो म्हणाला.
त्याची उत्सुकता चाळवलेली बघून हे चौघे मनातून खुश झाले. त्यांची योजना हळूहळू अंमलात यायला सुरुवात झाली होती.
विशाल चेहेऱ्यावर गूढ भाव आणून म्हणाला, "अरे हो दादा, चाळीतले जुने लोक म्हणतात की आपली ही चाळ शापित आहे म्हणे.. अवसेच्या रात्री, मध्यरात्री दोन नंतर, चाळीत एक जखीण फिरते आणि प्रत्येक घराच्या दारावर थाप मारते आणि जर कुणी दार उघडलं तर....", विशाल बोलता बोलता थांबला.
"तर ? तर काय होतं सांग ना ?", केशव उताविळपणे म्हणाला.
"तर, ती जखीण त्याच्या पोटात आपली नखं खसकन खुपसते आणि त्याच्या नरडीचा घोट घेते..", अतिशय गंभीर आवाजात विशालने वाक्य पूर्ण केलं. सबंध खोलीत शांतता पसरली. हे चौघे चोरट्या नजरेने केशवची काय प्रतिक्रिया असेल हे बघू लागले. केशव मात्र ते ऐकताच विचारात पडला होता. खरंच असं होत असेल का ? मध्यरात्री खरंच दारावर थाप पडत असेल का ? आणि ती जखीण खरंच अस्तित्वात असेल का ? का उगीच लोकांनी काहीबाही अफवा पसरवल्या असतील ? त्याच्या मनात अनेक विचार फिरू लागले. त्याचा या गोष्टीवर पक्का विश्वास बसावा म्हणून विनीत म्हणाला,
"हो दादा, कदाचित तुला हे सगळं खोटं वाटत असेल पण तसं नाहीये.. भीतीपोटी किंवा लज्जेपोटी इथल्या बाकीच्या लोकांनी ही गोष्ट तुझ्या कानावर घातली नसेल पण आम्ही तुझे मित्र आहोत म्हणून आम्ही तुला ही गोष्ट सांगतोय.. तू इथे नवीन आहेस आणि येत्या काहीच दिवसांत आवस आहे म्हणून जरा सांभाळून रहा..", विनीत अगदी दबक्या आवाजात केशवला म्हणाला. बाकीच्या तिघांनी त्याच्या सुरात सुर मिळवला.
बघता बघता सायंकाळ झाली तसे ते चौघे आपापल्या घरी निघून गेले. ते गेले आणि इतका वेळ गजबजलेली केशवची खोली एकदम रिकामी झाली. केशव पुन्हा एकटा पडला. त्या सर्वांच्या सोबतीने आणि खेळण्याच्या नादात मनाच्या तळाशी गेलेले विचार आता मात्र डोकं वर काढू लागले. दिवस मावळायची वेळ झाली तरी त्याच्या डोक्यात तोच विषय घोळत राहिला.
हे खरं असेल का ?
या घटनेला आज सहा-सात दिवस लोटून गेले होते. दिवसभराच्या व्यस्त आयुष्यात केशवच्या डोक्यातून 'तो' विषय केव्हाच निघून गेला होता. चार दिवसाखाली त्याला शहरातल्या एका मोठ्या कापड दुकानात नोकरी मिळाली होती. तो खूप खुश होता. या नोकरीच्या जोरावर काही पैसे जोडायचे आणि पुढे आणखी चांगली नोकरी पाहायची असं त्याने ठरवलं होतं. नवीन नोकरी, नवीन ठिकाण ह्या सगळ्याशी जुळवून घ्यायला लागणार होतं. नोकरी सुरू झाली आणि जणू त्याचं वेळापत्रकच बदललं. अख्खा दिवस दुकानात जात असे आणि संध्याकाळी सहाच्या सुमारास तो थकून-भागून घरी परतत असे. दिवस वेगात जात होते. एके दिवशी संध्याकाळी तो घरी लवकर आला होता. खोलीसमोरच्या कठड्याला टेकून चाळीतल्या गमतीजमती बघत होता. तेवढ्यात त्याला जिना चढून येणारे सुभाष आणि विनीत दिसले. त्या सर्वांना भेटून त्याला बरेच दिवस झाले होते. नोकरीमुळे वेळच मिळत नव्हता. केशवने त्या दोघांना हाक मारली. वर जाणारे ते दोघे केशवचा आवाज ऐकून त्याच्यापाशी आले. ख्याली-खुशाली विचारून झाली. बोलता बोलता विनीतने मुद्दाम त्यादिवशीचा विषय पुन्हा काढला.
"अरे दादा, तुझ्या लक्षात आहे नं..? उद्या अमावस्या आहे!", विनीत मुद्दाम खालच्या आवाजात केशवला म्हणाला.
त्याचा निरोप घेऊन ते दोघे तिथून सटकले. झालं! डोक्यातून गेलेला तो विषय पुन्हा त्याच्या मनात घुमू लागला. खरेतर गावाकडे त्याला ह्या भूता-खेताच्या गोष्टी काही नवीन नव्हत्या. दर दिवशी गावात कुठली न कुठली वावडी उठतच असायची. वेशीवर भूतं फिरतात, विहिरीत हडळी राहतात, परवा मेलेल्या अक्काचं म्हणे भूत झालं, कुणाला पछाडलं तर कुणाला भूत बघून वेड लागलं.. गावाच्या मातीत वाढलेलं त्याचं मन या गोष्टींबाबत बरीच माहिती राखून होतं आणि नाही म्हटलं तरी या सगळ्या विषयी मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी सुप्त भीती घर करून होती ! ती संध्याकाळ आणि रात्र तो पूर्णवेळ याच गोष्टीचा विचार करत राहिला. मनातून भीती वाटत असली तरी नाही म्हणायला त्याला त्या गोष्टीची खूप उत्सुकता वाटत होती. खरंच असं होत असेल का ? शहरासारख्या ठिकाणी सुद्धा भूतं असतात म्हणजे काय ! त्याच्या मनात हे असे विचार घोळत राहिले.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला जाग ती ह्या विचारानेच की आज अमावस्या आहे..! स्वतःचं आटोपून तो कामावर निघणार त्यापूर्वी त्याची नजर भिंतीवर टांगलेल्या कॅलेंडरवर पडली. आजच्या तारखेच्या कोपऱ्यात एक काळाकुट्ट ठिपका आज आवस असल्याचं दर्शवत होता. दुपारनंतर कधीतरी आवस लागत होती. केशवने मनात उचंबळून येणाऱ्या अनेक विचारांना कसंबसं थोपवलं कामावर निघून गेला...
रात्रीचे आठ वाजले होते. केशव रात्रीचं जेवण उरकून बसला होता. भिंतीवर लावलेल्या घड्याळाने नऊचे ठोके दिले आणि त्याची तंद्री भंगली.. 'अरेच्चा, नऊ वाजले..', त्याच्या मनात विचार आला. 'अजून काहीच तास...', तो मनातल्या मनात म्हणाला.
केशवने आज दिवसभरात एक गोष्ट पक्की केली होती अन् ती म्हणजे आज रात्री दोन वाजता नक्की काय होतं हे स्वतः तपासून बघायचं! खरंच कुणी येतं का ह्या सगळ्या नुसत्या अफवा आहेत हेच आज त्याला जाणून घ्यायचं होतं. इतके दिवस मनातल्या विचारांनी त्याला पछाडून सोडलं होतं.. आजचा दिवस.. आजची आवस निर्णायक होती. आज काही करून त्याला भेंडावून सोडणाऱ्या त्या प्रश्नांची उत्तरे त्याला मिळवायचीच होती.!
साधारण दहाच्या दरम्यान केशवने निजण्याची तयारी केली. अंथरूणात जाण्यापूर्वी एकदा खिडकीतून डोकावून बाहेर बघितलं. आज कुणास ठावूक पण गारवा जरा जास्तच होता. लोकांची वर्दळ तशी कमी झाल्यासारखी वाटत होती. घरोघर जेवणं-खावणं, झोपण्याची तयारी सुरू होती. आत्ताच्या घडीला तरी तशी काही वेगळी जाणीव होत नव्हती. खोलीत पुरेसा गारवा पसरला म्हणून केशवने खिडकी पुन्हा लाऊन घेतली. खोलीतला एकुलता एक बल्ब मालवला अन् त्यासरशी खोलीत घुप्प काळोख दाटून आला. तो अंधार पाहून अगोदर त्याच्या काळजात भीतीची एक हलकी लहर उठली पण अंधाराला डोळे सरवताच तो शांत झाला. कदाचित मनातल्या उलट्या-सुलट्या विचारांचा प्रभाव असावा.. पांघरूण अंगावरून ओढून घेत तो झोपण्याचा प्रयत्न करू लागला पण दुर्दैवाने झोप काही केल्या लागत नव्हती. अनेक विचारांनी, कल्पनांनी, तर्क-वितर्कांनी मेंदू उर्जित अवस्थेत होता अन् म्हणूनच त्याक्षणी तरी त्याला झोप लागणं अशक्य होतं. अखेर अर्ध्या तासाने मग त्याला कुठेतरी झोप लागली..
घड्याळाचे काटे नियोजित गतीने आपलं मार्गक्रमण करत कालाचा वेग दर्शवत होते. घड्याळाच्या होणाऱ्या टिक टिक आवाजाखेरीज खोलीत कुठलाच आवाज होत नव्हता. यथावकाश अकरा वाजले, बारा वाजले.. मध्यरात्रीचा प्रहर सुरू झाला.. वेळ जणू मंद गतीने सरकत होती. खोलीत काहीसं उबदार वातावरण निर्माण झालं होतं परंतु बाहेर मात्र चांगलाच गारठा पसरला होता. रात्रीचा अंधार मी मी म्हणत होता. त्यात भरिस भर म्हणून आभाळातल्या चंद्राचं अस्तित्व गायब होतं. अमावास्येची ती गर्द काळोखी रात्र ऐन भरात होती !
चाळीतले सगळे आवाज, हालचाल, वर्दळ केव्हाच शांत झाले होते. जो तो आपापल्या घरात, सुरक्षित वातावरणात गुडूप झोपी गेला होता. निद्रेच्या जाड दुलईखाली गडप झालेला जो तो, बाहेरील वातावरणाच्या प्रभावापासून अनभिज्ञ होता..
मध्यरात्री दोनचे ठोके पडले आणि केशवला त्या आवाजाने खडबडून जाग आली. अंथरूणांत उठून बसत त्याने आजूबाजूला बघितलं. सर्वत्र अंधार होता. लगोलग उठून त्याने खोलीतला बल्ब चालू केला. त्यासरशी लख्ख प्रकाश खोलीभर पसरला. केशवची नजर भिंतीवर टांगलेल्या घड्याळाकडे गेली. दोन वाजून काही मिनिटे झाली होती. वेळ अगदी अचूक होती. आता कुठल्याही क्षणी 'ती' येणार होती. पुन्हा अंथरूणात जाऊन बसत केशव पुढे काय होईल याची वाट बघू लागला..
पाच दहा मिनिटे असतील आणि चाळीतल्या पहिल्या मजल्यावरच्या व्हरांड्यात हालचाल जाणवू लागली. रात्रीच्या मिट्ट काळोखात एक आकृती अगदी संथ गतीने पावले टाकत केशवच्या खोलीच्या दिशेने जात होती. अंधाराच्या प्रभावामुळे तिचं नख सुद्धा दिसणं मुश्किल होतं. जमिनीवर काहीतरी घासल्यासारखा खरडल्यासारखा आवाज तेवढा होत होता अन् त्या आवाजाने शांततेचा डोह ढवळून निघत होता. नीरव शांततेत तो आवाज खोलीत बसलेल्या केशवच्या सतर्क कामांनी टिपला. भीतीची थंड लहर त्याच्या मानेतून दौडत गेली. 'ती' आली होती.. केशव कानात प्राण आणून बारीकसारीक आवाज टिपण्याचा प्रयत्न करू लागला.
इकडे, अंधारात ती आकृती एक एक खोलीला मागे टाकत सावकाश पावलांनी सर्वात शेवटच्या घराजवळ येऊन थांबली. ते घर केशवचं होतं.
काही क्षणांचा अवधी गेला.. केशवच्या उरातली धडधड शिगेला पोहोचली होती. पुढच्या क्षणी काय होईल याची त्याला भयंकर उत्सुकता लागली होती की तेवढ्यात..
ठक ठक.. ठक ठक..
दारावर थाप पडली...!
त्या आवाजासरशी केशवचं काळीज भीतीने अक्षरशः त्याच्या घशात आलं. 'ती' आली होती. म्हणजे त्याच्या कानावर आलेलं ते सगळं खरं होतं. खुद्द एक भयंकर पिशाच्च अवसेच्या मध्यरात्री त्याच्या दाराबाहेर उभं राहून दार ठोठावत होतं ! मनातल्या त्या विचारांनी केशव ताडकन अंथरूणातून उठून बसला. त्या दरम्यान दारावर पुन्हा ती थाप पडली. आता मात्र केशव चांगलाच घाबरला पण मनात कुठेतरी तो विचार डोकावू लागला,
एकदा दरवाजा उघडून बघूयात तरी.. नक्की कोण आहे बाहेर....
मनात तो विचार आला आणि त्याची भीती काही अंशी कमी झाली आणि त्याची जागा उत्सुकतेने घेतली..
पुन्हा एकदा दार ठोठावलं गेलं.. यावेळचा जोर जरा जास्तच होता...
ठक ठक.. ठक ठक.. ठक ठक...!!!
शांततेने वेढलेल्या त्या परिसरात तो आवाज चांगलाच घुमला !
विचारांच्या तंद्रीत गुंतलेला केशव त्या आवाजाने भानावर आला. दोन ढांगात तो दारापाशी पोहोचला. मनातल्या मनात देवाचं नाव घेत, थरथरत्या हाताने त्याने दाराची कडी काढली. सावकाश दार आत उघडलं अन् त्यासरशी थंड वाऱ्याचा झोत भसकन त्याच्या अंगावर आला. त्या वाऱ्याने त्याच्या अंगावर शहारे आले.. केशवची नजर समोर गेली आणि खोलीतल्या प्रकाशात त्याच्या नजरेला जे दिसलं ते पाहून त्याचे डोळे भीतीने अक्षरशः पांढरे पडले!
दारात खुद्द जखीण उभी होती !
अंगभर काळा बुरखा, पांढरीफटक सुरकुटलेली त्वचा, लांबसडक वाढलेली हातांची नखे, भयंकर बीभत्स चेहरा, डोळ्यांच्या जागी लालभडक बुबूळं, तोंडातून विचकलेले दात, डोक्यावर विखुरलेल्या राठ केसांच्या जटा.. खिक् खिक् करून तो अभद्र आकार दात विचकून हसू लागला. केशवच्या काळजात ते दृश्य पाहून चर्र झालं. सर्वांगाला कंप सुटला. आत्यंतिक भीतीने तोंडातून एकही शब्द फुटेनासा झाला. त त प प करत केशव एकएक पाऊल मागे सरकू लागला. भीतीने सताड उघडे त्याचे डोळे केवळ आणि केवळ दारात उभ्या जखीणीवर रोखले होते. दार उघडता क्षणी तिने वखवखल्या नजरेने केशवला न्याहाळलं. आज आयतं सावज हाती सापडल्याचे विकृत आनंदी भाव तिच्या चेहेऱ्यावर अवतरले. दात विचकून हसत खुरडत खुरडत तिने उंबरा ओलांडला आणि खोलीत प्रवेश केला. हाताची तीक्ष्ण नखे केशवच्या रोखाने करत, ती एक एक पाऊल केशवच्या दिशेने टाकू लागली. भिऊन मागे मागे सरकणारा केशव मागच्या भिंतीला जाऊन आदळला अन् ती जाणीव होताच आणखी हादरला. त्याच क्षणी झपकन दिवे गेले. एकुलता एक बल्ब विझला अन् अख्खी खोली पुन्हा अंधारात बुडाली. तो काळोख पाहून केशवच्या काळजात धस्स झालं. त्याचा गळा आपल्या तीक्ष्ण नखांनी फाडून काढण्याच्या बेतात पुढे सरकणारी ती जखीण तो अंधार पाहून विचित्र आवाजात आनंदाने चित्कारली. राहिलेलं दोनचार पावलांचं अंतर एका झेपेत पार करत भसकन ती केशवच्या अगदी जवळ जाऊन उभी राहिली. भीतीच्या जबर तडाख्याने केशव आधीच गलीतगात्र झाला होता आणि त्यात ते अमानवी प्रकरण थेट त्याच्या इतक्या जवळ, काही इंचाच्या अंतरावर बघून त्याला भीतीने भोवळ येऊ लागली. विकृत हसत ती जखीण अर्धवट वाकून चिरक्या आवाजात केशवच्या कानात म्हणाली,
"दे दे.. अवसेचं रक्त दे.. देsss.."
अन् तिचे शब्द पुरे होतात न होतात तोच तिने आपली तीक्ष्ण नखे खसकन केशवच्या पोटात खुपसली. त्या अतीव वेदनेने केशवच्या तोंडून कर्कश किंकाळी बाहेर पडली. खर्र खर्र नखे फिरवत त्या जखिणीने केशवचं सबंध पोट फाडलं. वेदनेने कळवळत तडफडत अखेर केशवचा देह गतप्राण होऊन खाली पडला. त्याच्या चिंधड्या झालेल्या देहातून तो रक्ताने माखलेला हात बाहेर काढत तिने चाटून घेतला. रक्ताची तहान भागताच ती तृप्त झाली. चेहेऱ्यावरचं विकृत बीभत्स हास्य आणखी रुंदावलं अन् डोळ्यांची पापणी लवायच्या आत ती जखीण तिथून निघून गेली.!
किंकाळीचा तो आवाज ऐकताच बऱ्याच वेळापासून दुसऱ्या मजल्याच्या जिन्यात दबा धरून बसलेले 'ते' चांगलेच हादरले. तो आवाज केशवचा होता हे त्यांनी ओळखलं होतं. भयभीत नजरेने जो तो एकमेकांकडे बघू लागला. ते होते, विशाल, प्रतीक, विनीत आणि सुभाष. सुभाष मात्र बऱ्यापैकी आत लपला होता. त्याने एखाद्या चेटकिणीसारखा भयंकर मेकअप आणि अवतार केला होता. केशव चाळीत राहायला आला त्या दिवसापासूनची त्यांची योजना ते आज अंमलात आणणार होते. त्याला त्या दिवशी खोटी कथा सांगून भीती दाखवली त्याप्रमाणे आज अवसेच्या रात्री जखीणीचं रूप घेऊन, त्याचं दार वाजवून त्याला चांगलंच घाबरवणार होते. कालच विशालने जाऊन कुठूनतरी काळाकुट्ट बुरखा आणला होता. विनीतच्या घरून मेकअपच्या सामानाची सोय झाली होती. आईवडील गावी गेल्याने सुभाषच्या घरी तयारी झाली होती. सगळं ठरलं होतं आणि कुठल्याही क्षणी ते चौघे दबक्या पावलांनी केशवकडे जाऊन त्याच्या दारावर थाप देणार होते..
परंतु त्यांना ठावूक नव्हतं, त्यांच्या अगोदरच एक मध्यरात्रीची थाप केशवचा घात करून गेली होती....
समाप्त

