नासा येवतीकर

Tragedy

4.4  

नासा येवतीकर

Tragedy

मैत्रीचं झाड

मैत्रीचं झाड

4 mins
2.3K


जीप आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात सुरेशचा जागेवरच मृत्यू दैनिकात एक छोटी बातमी वाचून संतोषचे मन सुन्न झाले. ऑफिसमध्ये खुर्चीवर बसल्या ठिकाणी छताच्या पंख्याकडे शून्य नजरेने पाहत विचार करत होता. सुरेश आणि संतोष खूप जिवलग मित्र, लंगोटीयार म्हटले तरी चालेल. पहिल्या वर्गापासून तर कॉलेजच्या शिक्षणापर्यंत ते दोघे एकाच वर्गात आणि एकाच बाकावर बसायचे. सुरेश दिसायला अगदी गोरा जरी नसेल तर जास्त काळा देखील नव्हता, डोक्यावर केस कमीच, उंची साधारणपणे साडेपाच फूट, पळण्यात खूपच चपळ, अभ्यासात हुशार नव्हता मात्र खेळाच्या बाबतीत त्याला कोणी चॅलेंज देऊ शकत नव्हते. कबड्डी, खो-खो, धावणे यात तर तो पहिल्या क्रमांकावर राह्यचाच शिवाय त्याचा आवडता खेळ क्रिकेटमध्ये तो गोलंदाजी आणि फलंदाजी सुद्धा अव्वल असायचा. त्याचे घर म्हणजे एक झोपडीच. झोपडीला लागून एक मोठे वडाचे झाड होते. सुरेश आणि त्यांचा परिवार घरात कमी आणि त्या झाडाखाली जास्त वावरत असत. ते झाड म्हणजे त्यांचे दुसरे घरच होते. संपूर्ण उन्हाळा त्याच झाडाखाली जात असे. दिवसा झोका खेळायचं आणि रात्रीच्या वेळी तेथेच झोपायचं. त्याच्या घरी ना लाईट होती ना टीव्ही. पण क्रिकेटचा सामना असला की मित्रांच्या घरी जाऊन क्रिकेट पाहत असे. खास करून संतोषच्या घरी जाऊन हमखास क्रिकेट बघायचं, त्यामुळे दोघेही संतोषच्या आई-बाबाच्या तोंडून शिव्या खायचे. दहाव्या वर्गात असतांना असेच ते दोघे सामना पाहत बसले त्यावेळी संतोषचे बाबा बाहेरून आले आणि त्यांना खूपच राग आला. " असेच जर मॅच बघत बसलात तर दहावीत लवकरच दिवे लावता तुम्ही ...!" एवढं बोलून ते मधल्या खोलीत गेले. संतोषने लगेच टीव्ही बंद केलं आणि सुरेषला घरी जाण्याचे खुणावले. दहावी संपेपर्यंत मॅच बघणार नाही असे वचन दिला आणि अभ्यासाला लागला. दहावीची परीक्षा संपली. तसं संतोष आणि सुरेश रोज सकाळी क्रिकेट खेळायला मैदानावर जात असत. त्यांच्यासोबत इतर ही त्यांचे मित्र असायाचे. त्यांची क्रिकेटची टीम खूप चांगली होती. त्यामुळे गल्लीगल्लीत त्यांच्या टीमची चर्चा होऊ लागली होती. दहावीचा निकाल लागला. त्यांची संपूर्ण टीम कमी जास्त फरकाने पास झाली. सर्वांनी मिळून एकाच कॉलेजात प्रवेश मिळविला. कॉलेजमधून एक क्रिकेटचा संघ निर्माण केला गेला. त्यात सुरेश, संतोष सह इतर दोघांचा नंबर लागला. संतोषच्या वडिलांनी स्पष्टपणे नकार दिल्यामुळे संतोष त्या टीममधून बाहेर पडला पण सुरेश मात्र त्यात खेळत राहिला. त्याची बॉलिंग आणि बॅटिंग पाहून सारेच चकित होत असत. 18 वर्षाखालील संघासाठी त्याला पत्र आलं. पत्र वाचून त्याला खूप आनंद झाला. 

" संतोष, मला परवा मुंबईला जायचं आहे, मात्र ......"

" मात्र काय यार, तुझ्याजवळ पैसे नाहीत ना मुंबईला जाण्यास ..."

"हो, यार कसे जाऊ ?" 

"त्याची काही काळजी करू नको, होईल त्याची व्यवस्था, तू मुंबई ला जाण्याची तयारी कर"

सर्व मित्रांनी पैसा गोळा करून सुरेशला दिले. संघात त्याची निवड होणार सर्वाना खात्री होती. त्यादिवशी त्याने मुलाखत देण्यासाठी मुंबईला गेला होता. त्याचा खेळ खूप चांगला होता मात्र त्याच्या जागी दुसऱ्याच खेळाडूची निवड झाली. कारण सुरेशच्या पाठीमागे कोणी गॉडफ़ॉदर नव्हते, ना पैसा होता ना वशिला. तो अगदी उदास होऊन परत आपल्या गावी आला. संतोष खूप आनंदाने त्याच्याकडे जातो काही गोड बातमी ऐकायला मिळेल म्हणून पण निराश होतो. बारावीत शिकत असताना देखील सुरेश अभ्यासात आणि वर्गात फार कमी आणि मैदानावर जास्त वेळ राहू लागला. त्याला संघात स्थान मिळवायचे होते त्यासाठी जीवतोड मेहनत घेत होता. अपेक्षेप्रमाणे बारावीच्या परीक्षेत सुरेश नापास झाला. त्याचे बाकी सर्व मित्र बारावी पास झाले आणि सर्वत्र विखुरले गेले. सुरेश मात्र गल्ली बोळात क्रिकेट खेळणे चालूच ठेवले. गावोगावी कोणच्या वाढदिवसानिमित्त आयोजित खुले क्रिकेट सामन्यात सुरेश चमकू लागला. प्रत्येकजण सुरेशला आपल्या संघाकडून खेळण्यास ऑफर देऊ लागले. या खेळातून त्याला प्रसिद्धी सोबत पैसा देखील मिळू लागला. पेपरमधल्या अधूनमधून बातम्याने त्याच्या मित्राला देखील समाधान वाटत होते. काही वर्षे लोटली. दरम्यानच्या काळात त्याचे लग्न झाले. झोपडीतला सुरेश चांगल्या घरात राहू लागला. घराजवळच्या वडाचे झाड पाडून सुरेशने तेथे मोठे घर बांधले होते. त्याच्या हातात बऱ्यापैकी पैसे पडू लागले होते. क्रिकेट खेळण्यासोबत तो लहान मुलांना कोचिंग देखील देऊ लागला होता. त्यामुळे त्याची आर्थिक स्थिती सुधारत गेली. सध्या तो चांगला क्रिकेटर आणि कोच म्हणून प्रसिद्धीस आला होता. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन अपत्य होती. आपल्या लाडक्या सोनूचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सुरेश गावातून केक आणण्यासाठी गेला. बराच वेळ झालं सुरेश आलं नाही म्हणून त्याला फोन केलं तर फोन ही लागत नव्हता. सुरेशच्या घरच्यांना खूप काळजी वाटत होती. रात्र होत आली. मुलगी तयार होऊन वाट पाहून थकून गेली पण सुरेश काही घरी आले नव्हते. काही वेळानंतर फोनची घंटी वाजली

" हॅलो, हे सुरेशचे घर आहे का ?"

सुरेशच्या पत्नीने फोन उचलला, " होय हे सुरेशचेच घर आहे"

"आपण कोण बोलतय ? " 

" मी सुरेशच्या पत्नी बोलत आहे, काय झालंय ?"

" मी पोलीस स्टेशनमधून बोलतोय, आपण लवकरात लवकर स्टेशनला यावं"

लागलीच ती पोलीस स्टेशनला पोहोचली. डोळ्याने जे दृश्य पाहिले ते खूपच भयानक होते. सुरेशच्या मोटारसायकलचा अपघात झाला होता आणि त्याच्या डोक्यावरून जीपचे चाक गेल्यामुळे चेहरा पूर्ण चेंदामेंदा झाला होता. इतर काही बाबी वरून तो सुरेशच आहे याची खात्री पटली. स्टेशनमधले सर्व सोपस्कार पूर्ण करून डेडबॉडी घरी नेण्यात आले. वाढदिवसाच्या आनंदच्या जागी मृत्यूचा दुखवटा सर्वत्र पसरला होता. ती बातमी वाचल्याबरोबर संतोषने सर्व मित्रांना दुःखद बातमी कळविली. चार-पाच दिवसांनी सर्व मित्र एकत्र येऊन सुरेशच्या घरी भेट दिली. एक चांगला उमदा खेळाडू काळाच्या पडद्याआड गेल्याचं दुःख सर्वानाच होतं. सर्वांनी मिळून सुरेशच्या घरच्यांना जमेल तेवढं आर्थिक हातभार दिलं. सुरेश गरीब होता पण कष्टाळू, स्वाभिमानी आणि होतकरू होता. याचा सर्व मित्रांना अभिमान देखील वाटत होता. सर्वांनी मिळून त्याचाच घरासमोर एक वडाचे झाड लावलं आणि त्याला नाव दिलं मैत्रीचं झाड. दरवर्षी ते सर्व मित्र त्या वडाच्या झाडाखाली एकत्र येतात आणि आपल्या जिवलग मित्राची आठवण काढतात. आज ते झाड सर्वाना मैत्रीची शिकवण देत असते. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy