Bhagyashree Mudholkar

Comedy Inspirational Others

5.0  

Bhagyashree Mudholkar

Comedy Inspirational Others

माझे सकारात्मकतेचे प्रयोग

माझे सकारात्मकतेचे प्रयोग

5 mins
1.1K


"अग जया चलतेस ना तू माझ्यासोबत. तयार आहेस ना." 

खरतर दुपारच्या साखरझोपेत असताना अडीच वाजता फोन वाजला, तर किती पंचाईत होते, हे माझ्यासारखी दुपारची झोप प्रिय व्यक्तींनाच कळेल ,पण तरीही पलीकडून माझी खास मैत्रीण प्रिया बोलत होती. त्यामुळे फोन उचलणे भाग होतं. आणि तिच्याशी बोलणंही भाग होतं.

"कुठे जायचंय मला काहीच कळलं नाही."मला काही आठवेनाच. 

"अशी कशी ग जया तू .आज दुपारी आपल्या महिला मंडळांमध्ये गोडबोले बाईंचं 'लोकांना कसं बदलायचं' या विषयावर व्याख्यान आहे. आपण जाणार होतो ना तिथे."प्रियाने आठवण केली.

खरं तर मुळातच व्याख्यान हा झोप येणारा विषय. त्यात दुपारची झोप सोडून, आपण त्या व्याख्यानाला गेलो तर, पुन्हा झोपणारच, अशा विचारांमध्ये मी होते. पण शेवटी मीच, आपण जाऊ त्या व्याख्यानाला, असं म्हटलं असल्यामुळे, तिला म्हटलं," ठीक आहे होते मी दहा मिनिटात तयार. ये तू घरी. जाऊया आपण." 

मंडळामध्ये गोडबोले बाईंचं व्याख्यान होतं. विषय इंटरेस्टिंग होता 'तुम्ही विचार करा आणि समोरचे लोक बदलतील' खरंतर पटणारा नव्हता, पण तरी त्या काय सांगणार, हे ऐकण्यासाठी आम्ही उत्सुकतेने गेलो होतो. 

व्याख्यान छानच होते. मतितार्थ असा होता की, समोरच्या व्यक्तीने जसं वागावं, असं तुम्हाला वाटतं, त्या पद्धतीने तुम्ही विचार करून, तुमचे विचार त्याच्यापर्यंत पोचवायचे ,आणि बोलण्यातही, तेच विचार आले पाहिजे. नकारात्मकता नको. अवघड होतं तसं करणं, पण म्हटलं प्रयोग करायला काय हरकत आहे. 

मी लगेच दुसर्‍या दिवसापासून सुरुवात केली. सुरुवात सकाळची दूधवाल्या पासूनच ."अहो दादा आज-काल किती घट्ट येतो तुमचच्याकडकच दूध .छान साय येते आणि लोणी सुद्धा खूपच छान. चांगलं आठवडाभरात महिनाभराचा तूप निघतं माझं." क्षणभर ते गवळी दादा माझ्याकडे बघतच राहिले, त्यांना मी कुचकट पणे बोलते की काय असं वाटलं, पण मी मात्र चेहऱ्यावर छान स्माईल आणून ,गोडबोले बाईंनी सांगितल्या प्रमाणे मनापासून मला जसे दूध हवं होतं तसं ते देत आहेत, अशी कल्पना केली आणि तसेच त्यांच्याशी बोलले. 

अर्थात हा प्रयोग एका दिवसाचा नव्हता. मला वारंवार म्हणजे किमान तीन ते चार महिने त्या व्यक्तीबद्दल तो विचार करावा लागणार होता. तर ती व्यक्ती बदलेल, असं गोडबोले बाईंचे म्हणणं होतं.

 सुरुवात झाली. आज एक तारीख आहे, म्हणजे लक्षात ठेवायला पण सोप्प की तीन महिने आपण असं किमान चार व्यक्तींना निवडून, आपलं पॉझिटिव्ह थिंकिंग त्यांच्या पर्यंत पोहोचणार आहोत. 

दुसरा नंबर राधा बाईंचा, आमच्या कामवाल्या बाईचा. मावशी एवढ्या फास्ट काम करायच्या, की पंधरा मिनिटात झाडू ,फरशी आणि भांडी करून फरार. मला आपलं त्यांनी जरा निवांत थांबावं, चार घरच्या गोष्टी सांगाव्यात आणि थोडंसं कानाकोपरा सोडून झाडतात, ते त्यांनी झाडावं पुसावं , भांड्यांना खरकटं राहू देऊ नये, असं वाटायचं त्यामुळे आता त्यांच्याशी बोलण्याची वेळ आली. 

फटाफट झाडू फिरवण्याचा त्यांचं काम चालू होतं, तेवढ्यात मी मावशींना म्हटलं ,"अहो राधा मावशी किती छान झाडता तुम्ही. एका सुद्धा कोपर्‍यात धूळ नसते आणि फरशी चकाचक. आणि भांडी तर किती छान .तुमच्यामुळे माझं किती काम हलकं होतं. भांडे पुसावे पण लागत नाही, लगेच वापरले तरी चालतात. 

त्या थोड्या चमकल्या. पण त्यांनी माझ्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. पण थोडंसं झाडताना व्यवस्थित झाडलं. असो तीन महिने येता-जाता वारंवार त्यांच्या कानावर माझी हे विचार पडतील, असं मला बोलावं लागणार होतं.

नंतरची पाळी अर्थातच नवरोबाची, येता-जाता रागवणं आणि वस्तू सापडल्या नाहीतर माझ्यावर कावणं ,हे माझ्या सरावाचं होतं "अग माझे मौजे कुठे ठेवले आहे. एक गोष्ट धड सापडत नाही ऑफिसला जाताना." आवाज आलाच.

"असं काय करताय समोरच्या ड्रॉवरमध्ये आहेत. नेहमी तर सापडतातच तुम्हाला. ठीक आहे एखाद्या दिवशी नाही सापडले तर काही हरकत नाही. किती प्रेमाने आवाज देता तुम्ही... खूप आवडतं मला तुमचा आवाज ऐकायला." मी जमेल तितका प्रेमळ सूर आळवला.

नवरोबाचा चेहरा एखादा बॉम्बगोळा पडल्यासारखा झाला होता. माझ्याकडडून उलट आरडाओरडा व्हायची. एवढे प्रेमाचे शब्द कधी अपेक्षाच नव्हती ना. 

नंतर पाळी होती माझ्या लाडक्या लेकाची. सकाळी लवकर न उठणं., उठल्यावर टाईमपास करणं. प्रत्येक गोष्टीसाठी मागे लागल्यावरच ते काम करणं. असं माझ्या बारा वर्षाच्या लेकाचं वागणं. आता हे बदलवण्यासाठी किती प्रकारची थिंकिंग वाक्य करावी, त्याची मी खुप प्रॅक्टीस केली आणि सकाळी सकाळी त्याला छान आवाज दिला.

"राघव अरे उठरे बाळ.रोज एव्हाना उठून तू तयार होत असतोस. आता पण लवकर उठ आणि पटापट आवर . तसं तर रोज पटापट आवरतोसच. आजही करशील ना भरभर काम. मला बुटिकला जायचेय." 

राघवचा घोर अपेक्षाभंग. आज आईला काय झालंय काही कळेच ना. नेहमी मी लेट होतो, लवकर उठत नाही, टाईमपास करत बसतो, असं म्हणणारी आई आज उलट बोलते. आपल्याविषयी. तेही प्रेमाने. काहीच तिरकसपणा नाही, राघव चकितच झाला होता.

घरातलं आवरून मी बुटीक ला निघाले. माझं छोटंसं बुटिक घराजवळच आहे. सकाळी तीन तास आणि संध्याकाळी तीन-चार तास असे मी तिथे असते. अगदी नुसतच गृहिणीपण नको ना. तिथे माझी मदतनीस आहे मेघना. ती कधीच वेळेवर हजर नसते. दहा वाजताची येण्याची तिची वेळ आहे. पण रोज साडेदहा ,पावणेअकरा कधीकधी अकरा अशीही ती येते, आणि मग ती आल्यावर रोजच माझी चिडचिड. तिलाही त्याची सवय झाली आहे. आणि मलाही. विचार केला हिलाही बदलून बघूया.

मेघना 10:50 ला आली. मी लगेचच तिचं कौतुक चालू केलं," अगं मेघना काल तू अकरा वाजता आली होतीस.आज दहा मिनिट लवकर आलीस. किती छान वाटलं मला. रोज अशी थोडीशी लवकर ये ना. तशी तू रोज वेळेवरच येतेस. खूप पंक्चुअल आहेस."

मेघना चकितच झाली. दरवेळी मॅडमचा ओरडा खाण्याची सवय. मॅडम चक्क दहा मिनिटं लवकर आलीस म्हणतात. नेहमी वेळेवर येते म्हणून कौतुक करतायेत. मॅडमची तब्येत ठीक आहे ना.  असो. पण मी तिला वेळेवर येते म्हणून कौतुक करूनच घेतलं आणि रोज आपण असंच करणार आहोत, पुढचे तीन महिने हे पक्कं ठरवलं.

खरंच सांगते मैत्रिणींनो तीन महिने वाट बघावी लागली नाही. एक दीड महिन्यातच मला प्रत्येकात थोडा थोडा फरक जाणवायला लागला. दूध खरोखरच गवळी दादा चांगलं द्यायला लागला. कामवाली बाई थोडसं कानाकोपऱ्यातून व्यवस्थित पुसून घ्यायला लागली. भांडी ही स्वच्छ निघायला लागली. नवरोबाची चिडचिड कमी झाली,थोड प्रेम वाढलं. मुलगा माझा आरडाओरडा वाचवायला लागला. थोडासा जबाबदारीने वागायला लागला. मेघना तर आता सव्वा दहा वाजेपर्यंतच बुटीक मध्ये पोचलेली असते. 

खरंच आहे. आपण समोरच्याला नेहमीच नकारात्मक ऊर्जा देत राहतो." तुझ्यात सुधारणा होणार नाही, तुझ्याशी बोलण्यात अर्थ नाही' तू असाच राहणार 'तुझ्या स्वभाव बदलणे अवघडच आहे." अशा बोलण्याने आपली नकारात्मक ऊर्जा त्याच्यापर्यंत जाते आणि तो तसाच वागत राहतो. त्याऐवजी, थोडासा उलट विचार करुन पाहिला तर आपल्याला समोरची व्यक्ती कशी वागायला हवी आहे, तशी ती वागते अशी नुसती कल्पना केली, तरी पण मनाला छान वाटतं. तीच कल्पना आपण त्याला बोलून दाखवली, त्याचं छोट्या-मोठ्या गोष्टीत कौतुक करत राहिलो ,आणि त्याच्यात सुधारणा होताना दिसली तर त्याला अप्रीशिएट करत राहिलो, तर नक्कीच फरक पडणार आहे, आपल्याही विचारसरणीत आणि समोरच्याच्याही विचारसरणीत.  आणि ती व्यक्ती खरोखर चांगली वागायला लागली ,तर आपल्याला जेवढा आनंद होतो, तेवढाच त्या व्यक्तीलाही होतो, हे लक्षात घ्यावं.

मैत्रिणींनो करून पहा तुम्ही हा सकारात्मकतेचा प्रयोग आणि कसा होतो हे मला नक्की कळवा. 

माझ्या या लेखासाठी आणि कथेसाठी ही खूप सारे लाईक, शेअर, आणि कॉमेंट्स येणार आहेत, असं थिंकिंग मी आधीच करून ठेवलंय बरं का.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy