मनात आलंय तर
मनात आलंय तर
आज नवीन वर्षाचा पहिला दिवस मला सणासारखा वाटत होता. पण करणार काय नेहमीच ऑफिस, घरातली काम आणि रुटीन आहेच. मनात आलं सकाळी सकाळी घरापुढे छानशी रांगोळी काढावी. पण जाऊ दे पुन्हा दहा-पंधरा मिनिटं सगळ्या गोष्टीला उशीर होणार, मी विचार बाजुला सारणार होते,पण माझा यंदाचा संकल्प आठवला. मनात आलंय तर करुन टाकायचं.
सायंकाळची वेळ मी ऑफिसमधून आले.काॅलनीतल्याबागेमध्ये मुलं लगोरी खेळत होते. लहानपण आठवलं, आपणही खेळावं, पाच-दहा मिनिटं असं वाटलं, पण घरी गेल्यावर करावी लागणारी काम आठवायला लागली. पण म्हटलं जाऊ देत काम तर रोजचीच. मनात आलंय ना तर खेळूया दहा-पंधरा मिनिटे आणि खरंच त्या मुलांसोबत खेळता-खेळता, मन अगदी रिफ्रेश झालं.
रात्री आईचा फोन आला. उद्या तुझ्या आवडीच्या सांबरवड्या करणार आहे, ऑफिसमधून येता येता ये आणि घेऊन जा. ऑफिसमधून वाकडी वाट करून आई कडे जायची ते फक्त सांबारवड्यांसाठी. खरंतर जीवावर आलं होतं, पण आईच्या हातच्या सांबारवड्यांची चव इतर कशाला कशी बरं येणार? जाऊदे मनात तर आहेच ना, सांबारवड्या खायचं ,मग जाऊया . होऊन होऊन काय होईल, थोडीशी धावपळ होईल, पण मन तर समाधानी होईल आणि आईलाही भेटता येईल.
आईचा फोन झाल्यावर, मैत्रिणीचा फोन आला, ती विचारत होती, शनिवारी संध्याकाळी कालिदास ला छान नाटक आहे, चलतेस का सोबत ?खरं तर शनिवारची संध्याकाळ म्हणजे, माझ्यासाठी असणारी रविवारची सुखा स्वप्न बघण्याची वेळ. मी शनिवारची संध्याकाळ पण ,खूप डोळ्यात तेल आणून वाट बघत असते. अशा वेळी, नाटकाला जायचं म्हणजे तीन-चार तास जाणार, पण कालिदास ला पुन्हा पुन्हा चांगली नाटकं लागत नाहीत, हेही खरं. मनात आलंय ना ,गेलो नाही खूप दिवस नाटकाला, मग चला जाऊया.
मैत्रिणींनो तुमच्या लक्षात आलंच असेल ,यंदाचा माझा मुख्य संकल्प आहे तो म्हणजे मनात आलंय तर, करून टाकायचं .बऱ्याच गोष्टी अशा असतात की आपल्या मनात असतं, पण काहीतरी कारण पुढे करून ती गोष्ट करत नाही आणि नंतर मात्र ती मी केली असती तर... असा विचार करून पश्चाताप करत राहतो.
मनामध्ये कधी कधी विचार येत असतो, की काही वर्षांपूर्वी तर ही सगळी धावपळ मी आरामात करत होते. माझ्याकडे वेळ असता तर आताही मी हे केलं असतं. ही सगळी खरंतर, काही काम किंवा आपल्या आवडी, हौशी न पुरवण्यासाठी दिलेली कारणं असतात. त्यामुळे यंदा मनात आलेल्या गोष्टी करायच्या, हे मी पक्के ठरवले आहे.
व्यायाम करणे असो, कुठे फिरायला जाणे असतो छोट्या-मोठ्या खरेदी असो, स्वयंपाकातले किंवा खाण्यापिण्याचे प्रकार बनवणे असो, काही सणा समारंभांना जाणं असो ,काही सामाजिक कार्यक्रम असो, आवर्जून सगळीकडे भाग घ्यायचा आणि मनातले आनंदाचे छोटे-छोटे क्षण वेचत, मनाला प्रसन्न करत ,या वर्षाची वाटचाल मी करणार आहे.
थोडेसे मोबाईल, सोशल मीडिया, वेळ कमी करून ,आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना वेळ देणार, प्रत्यक्ष जाऊन भेटणार. थोडाबहुत वाचन वाढवणं, हाही यंदाच्या वर्षाच्या संकल्पमधला माझा महत्वाचा भाग आहे, बघूया कसं काही यश मिळते.नाही मनात आलंय तर करणारच.
लिखाणाचे बरेच विषय डोक्यात आहेत आणि आता छानसे सोशल मिडीयाचे व्यासपीठही उपलब्ध आहे. त्यामुळे वेगवेगळ्या निरनिराळ्या विषयांवर यंदा माझ्या हातून लेखनही भरपूर होणार आहे. तेव्हा मैत्रिणींनो तयारी ठेवा माझे बरेचसे लेख, वारंवार वाचण्याची आणि त्याला शेअर ,लाईक आणि कमेंट करण्याची .