माहेर
माहेर


सईचे डोळे आज सारखे भरून येत होते...लेकीच्या-जावयाच्या आग्रहाला न जुमानता कुंदाताई आज पुन्हा घरी पुण्याला जायला निघाल्या होत्या...दोघांनाही वेळ नाही म्हणून; त्याच अधिक महिन्याचं वाण घेऊन ठाण्याला आल्या होत्या...रिटायर्डमेंट नंतर पहिल्यांदाच, इतके सलग दिवस त्या लेकीकडे राहिल्या होत्या...गेले पंधरा-वीस दिवस कसे गेले हे त्या दोघींनाही कळलं नव्हतं...कित्ती गप्पा झाल्या होत्या माय-लेकीच्या...शेवटी लेकीचा-नातवाचा मोह आवरून त्या आज परत निघाल्या होत्या...लेकीनं घेतलेली काळजी पाहून त्या इतक्या भारावून गेल्या की आता तीच आपली आई होऊ लागलीये की काय, असं त्यांना वाटून गेलं...लेकीकडून निघताना त्यांचंही मन जड झालं होतं....
डोळ्यातलं पाणी लपवत सईनं आईचं सामान बाहेर आणलं..'शेवटी आई ती आईच ..तिच्या प्रेमाला पर्याय नाही हेच खरं'...ती स्वतःशीच पुटपुटली...सई आईला नमस्कार करायला वाकली..."सुखी रहा..." कुंदाताईंनी लेकीच्या पाठीवर हात ठेवला...आईच्या स्पर्शानं सईचा बांध फुटला...डबडबलेल्या डोळ्यांनी आर्जव करत ती म्हणाली "आई थांब ना गं अजून...." "सयु काय हे? अगं किती दिवस रहायचं जावयाकडे?..निघायला नको का आता?...तिकडे दादाला कळवून सुद्धा झालंय....पण सयु एक सांगू?"....लेकीच्या चेहऱ्यावर मायेनं हात फिरवत कुंदाताई म्हणाल्या...सईनं नजरेनंच विचारलं..काय?.."सयु मी पुष्कळ भाग्यवान आहे बरं... देवानं मला एक तरी मुलगी दिली...आणि तीसुद्धा अगदी तुझ्यासारखी..." कुंदाताईंच्या बोलांनी सईला भरून आलं..."तुझी आजी गेली तेव्हाच माझं आणि ताईचं माहेर संपलं...पण आज 'तू' मला माहेराचा आनंद दिलास... माझंच बाळ माझी आई झालंय आता... मी तृप्त झालेय सयु..."..."आई"...असं म्हणत सईनंच आईला लेकीसारखं जवळ घेतलं....
सईनं आईला लिफ्टपर्यंत सोडलं...लिफ्ट बंद झाली तसे तिचे डोळे घळाघळा वाहू लागले....ती गॅलरीत गेली...ओला कार तिच्या कॉम्प्लेक्स मधून बाहेर पडत होती....
सईनंं तिचा मोबाईल घेतला आणि व्हाट्स अँप वर, त्या दोघींचाच असलेला 'सिक्रेट ग्रुप' ओपन केला....त्यावर तिनं मेसेज टाईप केला...'आईच्या माहेरासाठी लेक सासरी नांदते'....