कथा.…...' सरिता '
कथा.…...' सरिता '


मुंबईकरांसाठी तसा रोजचाच असतो हा बेस्टचा प्रवास....आज सुद्धा रणरणत्या उन्हात तापलेल्या रस्त्यावरून बस मुकाटपणे धावत होती....बसमध्ये पूर्ण शांतता होती....सगळे प्रवासी उन्हानं अगदी हैराण झाले होते...कोणी कानात इअर फोन घालून गाणी ऐकत होतं.. तर कुणी नुसतेच सुस्कारे सोडत होतं... पण सगळेच जण घाम पुसत गप्प बसले होते...काही उभे प्रवासी पुढच्या थांब्यावर कुणी उतरतंय का बघत होते...बसायला मिळालं तर एखादी झुळूक तरी येईल अंगावर याच अपेक्षेनं...
इतक्यात एका सिग्नलला एक माणूस घाईघाईनं बसमध्ये चढला आणि चढल्या-चढल्या डाव्या बाजूच्या आडव्या सिट वर बसला... तो खूप घामाघूम झाला होता जरा गोंधळलेला दिसत होता...बाजूची मुलगी लगेच चित्कारली..."गेट अप. इट्स फॉर लेडीज ओन्ली"... 'अं?'..त्यानं बावरलेल्या शब्दात विचारलं....ती आता marathi मध्ये बोलली...."ही सीट महिलांसाठी आहे"...त्याच्या मागून चढलेली बाई जरा चढ्या आवाजात म्हणाली, "अरे ऊठ ती बायकांची जागा आहे"..."हो हो"...असं तोतरल्या सारखं बोलत तो उठला..."जा पुढे रिकामी झाली एखादी जागा की बस तिकडे".. ती जरा जोरातच म्हणाली...आता सगळे जण त्या बाईकडे बघू लागले....पुढे जाताना त्याचा एका महिलेला धक्का लागला...'हाऊ डीसगस्टींग'...तिनं नाक मुरडलं... कंडक्टर नं बेल वाजवली आणि काही प्रवासी पुढच्या स्टॉप वर उतरले...ती मागून ओरडली..."अरे बस ना तिकडे आता"...त्यानं विचारलं..."कुठे बसू? इकडे की तिकडे?"...ती पुन्हा ओरडली..."बस कुठेपण आता"....सगळेच जण त्या माणसापेक्षा त्या बाईकडेच बघत होते... खरं तर सगळ्यांनाच कळून गेलं होतं एव्हाना....तो तिचा नवरा होता...आजारपणानं असेल किंवा एखाद्या अपघातानं त्याच्यावर थोडासा परिणाम झाला होता....पण पन्नाशीच्या आसपास असलेल्या एका 'पुरुषाला' ती 'बाई' चारचौघात इतकी 'कंट्रोल' करत होती....हे सगळ्यांना पचलं नव्हतं...अशा नवऱ्याला लहान मुलाप्रमाणे सांभाळणाऱ्या त्या बाईंकडे आदरानं बघण्याऐवजी सगळ्यांच्या नजरेत एक नाराजीच दिसत होती...
ते पाहून माझं मन मात्र जरा खिन्नच झालं...मनात आलं...किती कठीण जात असेल तिला...अर्धवट असलेल्या नवऱ्याला ती किती निगुतीनं सांभाळत होती...जणू काही आई होऊन त्याची काळजी घेत होती...मध्येच आईच्या हक्कानंच त्याला रागावत होती...एक तर अशा नवऱ्याला सांभाळताना तिला किती सहन करावं लागत असेल...तिला त्याचा आधार कसला...उलट तीच त्याचा आधार झाली होती.. तरीही एक बाई, एक पत्नी सार्वजनिक ठिकाणी त्या पुरुषाला, त्या नवऱ्याला 'कंट्रोल' करत होती हेच पुरुषी समाजमनाला सहन झालं नसावं असंच दिसलं मला अनेकांच्या नजरेतून...
महिला सक्षमीकरणाचे, स्त्री-पुरुष समानतेचे कितीही गोडवे गायले जात असले तरीही प्रत्यक्षात समाजमन बदललं आहे का?...हा प्रश्न माझ्या मनात तसाच घोंघावत राहिला..मी खिडकीतून बाहेर पाहू लागले...बाहेर..आपल्या बाहुपाशात सरितेला सामावून घेणारा, क्षितिजापर्यंत पसरलेला अथांग सागर दिसत होता...तर बसमध्ये मात्र ओहटी सुरू झालेल्या समुद्राला सामावून घेणारी, त्याला आपल्या कवेत घेणारी 'सरिता' मला दिसत होती......