कथा.... 'संवेदना'
कथा.... 'संवेदना'
नेहमीप्रमाणे माझं लिखाण सुरू होतं... बाई सुद्धा तिचं काम मन लावून काम करत होती...फरशी वर तिचं फडकं एका लयीत फिरत होतं...प्रत्येक खोली पुसताना फॅन फुल्ल करण्याची तिची सवय...त्यामुळे फरशी वरचा तिचा प्रत्येक फरांटा पट्कन वाळत होता....फरशी पुसताना तिची बडबड सुरू होती..... कोण गावाला गेलं होतं म्हणून तिला दोन कामांना सुट्टी मिळाली होती ते आनंदानं सांगत होती आणि दुसरीकडे वैतागून म्हणाली..ताई, ती तिसऱ्या माळ्यावरची आहे ना तिची नणंद आलीये.. तिच्याबरोबर तिच्या दोन पोरी पण आल्यात...नुसता पसारा घालतात.. एकेक भांड धुवायला टाकतात...इतकंच नाही तर ती टवळी येताना तिचा पोपट पण घेऊन आलीये..मलाच धुवायला लागतो तो पिंजरा रोज...ती बसते त्याला मांडीत घेऊन..तिचं बोलणं ऐकून मला हसायला आलं....त्या मालकीणी पेक्षा हीच तिच्या नणंदेवर जास्त कावल्यासारखी वाटली....मी ऐकतेय की नाही याच्याशी तिला काहीही घेणं-देणं नव्हतं...ती फक्त घडाघडा मनातला राग बाहेर काढत होती..
गॅलरीतल्या ग्रील वरच्या सावलीत चिमण्या आणि साळुंक्या रोजच्या सारख्याच कुंडयांमध्ये बागडत होत्या...बंद
काचेवर चोच मारत होत्या...त्यांनाही आज बाईंनं हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला...इतक्यात खट्कन आवाज आला.....पंख्याची पाती हलली...त्याची गती थोडी कमी-जास्त झाली....आधी कळलं नाही पण नंतर लगेच लक्षात आलं.. बाईनं चिमण्यांना उडवल्यानंतर एक चिमणी घाबरून उडाली ती घरातच शिरली आणि पंख्याला थडकली....आणि बेड वर जोरात आपटली...
अरे माझ्या कर्मा..ताई पाप घडलं माझ्या हातून...बाईनं गळा काढला..म्हंटलं ओरडू नकोस...शांत रहा जरा...मी बघितलं...चिमणीला पात्याचा मार लागला होता...पण नशीब ती गादीवरचं पडली होती...तिचा श्वास सुरू होता...मी बाईच्या हातातलं सूप घेतलं...कचरा तिथेच खाली टाकला...पेपरचा मऊ कागद घेऊन तिला सुपामध्ये घेतलं...तिच्यात धुगधुगी होती...तिच्या चोचीवर थेंब थेंब पाणी घातलं...ते पाणी सुपात पसरलं...चिमणीसह ते सूप पुन्हा खिडकीत नेऊन ठेवलं...बाई पुन्हा पुन्हा तिसऱ्या माळ्यावरच्या नणंदेच्या नावानं बोटं मोडत होती...
मग मात्र पुढची पंधरा-वीस मिनिटं आमच्या गॅलरीमध्ये येरझाऱ्या सुरू झाल्या....नजर निपचित पडलेल्या चिमणीवर खिळली होती...एरवी मला न विचारता घरातल्या कुठल्याही वस्तूला हात न लावणाऱ्या बाईनं बरणीतून दाणे काढले आणि सुपात टाकले...आता त्या चिमणीनं डोळे किलकिले करायला सुरुवात केली...दोन-तीन दाणे टिपले...सुपात सांडलेलं पाणी प्यायली..बाहेर तिचे मित्र-मैत्रिणी चिवचिवाट करत होते...मला तर ते सगळे तिला चिअर-अप करत होते असंच वाटलं...हळूच ती इवल्याशा पावलांवर उभी राहिली...मान इकडे तिकडे फिरवत पंख पसरवत ती तिच्या घोळक्यात गेली सुद्धा....
माझ्या इतकीच बाई पण अस्वस्थ झाली होती...चिमणी जिवंत राहिली..पुन्हा उडून गेली....याचा आम्हा दोघींना खूप आनंद झाला...पण बाईनं तो आनंद टाळ्या पिटत व्यक्त केला... आकाशाकडे पहात म्हणाली देव पावला..समाधानात आम्ही गॅलरीतून आत आलो...इतक्यात माझी मेड पुन्हा जोरात ओरडली....ताई... म्हंटलं, काय झालं आता ओरडायला? चिमणी तर तर जिवंत राहिली की...गेली ना उडून...मग काय?
ताई एक राहिलंच की...अगं काय आता?...ताई आपण मोबाईल मध्ये फोटोच नाही काढला...तुमी शूटिंग बी केलं नाही....मी हसले...म्हंटलं बरं झालं नाही केलं ते...त्याचमुळे तिचा जीव वाचला...
मी पुन्हा लिहायला बसले...लिंक तुटली होती...एका वृत्तवाहिनी वरची बातमी आठवत होती....कुठल्याशा नाल्यात एक माणूस गटांगळ्या खात होता...लोकं त्याचं शूटिंग करण्यात गुंग होते...कोणीही त्याला मदत करायला उतरलं नव्हतं...तो तसाच बुडून मरण पावला होता..
आम्ही फोटो काढला नाही की शूटिंग सुद्धा केलं नाही त्यामुळेच एक मुका जीव वाचला होता, याचा मनस्वी आनंद झाला ...तुटलेली लिंक पुन्हा जोडली गेली....त्या समाधानात माझी लेखणी अजून वेगानं कागदावर 'संवेदना' उमटवू लागली....