कथा....'सुशिक्षित'
कथा....'सुशिक्षित'


"ए बाय जरा माज्या पाटीला हात लावती का?"...घरी परतताना स्टेशनरीच्या दुकानातून मी काही सामान घेऊन येत होते...दुकानाच्या पायऱ्या उतरत असताना मला आवाज आला... रस्त्याच्या बाजूला भाजी विकत बसलेली मावशी मला विचारत होती...तिची आवराआवरी सुरू होती..."हो मावशी थांबा हं" असं म्हणत मी माझ्या हातातली कापडी पिशवी पायऱ्यांवर कलंडून ठेवली..."तुमी शिकलेल्या पोरी मनून आदी विचारून घ्येतलं बाय"...मी नुसतीच हसले...."लई ऊन व्हतं आज...थकले बाई...पण आम्हा गरिबाला पोटासाठी धंदा करायलाच लागतो...नाय मनून कोनाला सांगनार...दोन ठाव खायाला लागतं आमाला बी..मनूनच उनातानात,रस्त्यावरची धूळ खात दिस-दिस भाजी विकतो आमी"...तिची टोपली तशी रिकामीच झाली होती...उरलेलं सामान... वजनाचा काटा, थोडीशी उरलेली भाजी सगळं मावशी पटापट भरत होती...जराशा वयस्कर मावशीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला सुरुवात झाली होती...एकेक सुरकुती खूप काही सोसल्याची साक्ष देत होती...हातात नुसत्याच काचेच्या बांगड्या, गळ्यात कसलीशी माळ, कपाळावर गोंदलेलं अगदी ठळक दिसत होतं...तिचं आवरून होईपर्यंत मी तिच्याकडे पहात होते हे तिला एव्हाना कळलं होतं..."पुसलं गेलं कुकु कवाच... तवापासून भाजीचा धंदा लावला...आता लेकी-सुना नांदतायेत पण जुना धंदा सोडवत नाही...हाड आहे ताट तोपतूर करनार"...ती बोलत होती, मी मध्येच घड्याळात पाहिलं..."झालंच बाई लेट व्हतोय ना तुला"....तेवढ्यात...."ए पोऱ्या नीट काढ तुजी फटफटी, पाटीला पाय लागला तर बघ, हानीन तुला, लक्षुमी हाय ती माजी"....."सॉरी अंटी"..."हा आत्ता कसं? जा बाजूनं जा"....स्वच्छ मनाच्या मावशीमध्ये परिस्थितीनं आलेला कणखरपणा मला दिसत होता...
मावशीचं सगळं आवरून झालं होतं..."हा आता लाव हात माज्या पाटीला"...
"तुज्या पोराबाळांचं भलं होईल पोरी"..."थँक यु मावशी"...ती चालू लागली...मी माझी पिशवी घ्यायला वळले...तशी पुन्हा काहीतरी आठवल्या सारखी ती मागे आली..."पोरी उतर माजी पाटी"..."मावशी काय राहिलं? मी देऊ का?"..."अगं बाय माजे पाटी उतर"..…मी हात लावला...."माजा कचरा... राहिला तितंच...तो उचलाया आले व्हते माघारी पूंना"...असं म्हणत भाज्यांची सालं, तुकडे, चहाचा कागदी ग्लास, आंब्याचं गवत सगळं आधीच गोळा करून ठेवलेलं मावशीनं पाटीच्या एका कोपऱ्यात कोंबलं...."लई त्रास दिला का गं पोरे...लाव आता हात...पुन्यानंदा नाही सांगनार, पन माजा कचरा असा रस्त्यावर सोडला असता तर मला नींद नसती आली बाय.."
लिहिता-वाचता न येणारी अशिक्षित मावशी तिनं केलेला कचरा उचलायला मागे फिरली होती...तिला कचरा उचलताना बघून मला अक्षरशः भरूनच आलं...मग ती झपाझप चालत तिच्या वाटेला लागली आणि मी सुद्धा...
रोज ऑफिस मधून येताना... ट्रेन मध्ये काहीबाही खाणाऱ्या, कुणाचं लक्ष असो वा नसो, कागद-प्लॅस्टिकची पिशवी सिटखाली किंवा खिडकीतून बाहेर बिनधास्तपणे भिरकवणाऱ्या...आपकी गाडी हैं क्या, आप कौन होती हो सिखानेवाली अशा तोंड विचकून बोलणाऱ्या....सो कॉल्ड एज्यूकेटेड वर्किंग लेडीज आठवल्या...आणि...अशा अडाणी शिक्षितांपेक्षा रूढार्थानं अशिक्षित असलेली भाजीवाली मावशीच मला कैकपटीनं खरी 'सुशिक्षित' वाटली....!!!