कथा ..... ' कल्पवृक्ष '
कथा ..... ' कल्पवृक्ष '
निवेदनाच्या एका कार्यक्रमात नुकतीच ओळख झालेल्या स्नेह्यांकडे जाण्याचा योग जुळून आला..सुरुवातीच्या जुजबी कौटुंबिक चौकशी नंतर त्यांनी सौंची ,लेकीची ओळख करून दिली....काका-काकूंच्या वयाच्या मानानं लेक जरा लहानच वाटली...कारण काका आता निवृत्त झाले होते....उशिरा झाली असेल मुलगी असं म्हणून मी जस्ट हाय केलं तिला..पहिल्याच भेटीत मी काही विचारणं टाळलं तरी काका माझ्याशी छान बोलत होते... एक नेहमीचा प्रश्न आलाच....जो आता खूपच सवयीचा झालाय....कसं सुचतं गं तुला इतक्या लिहायला...माझंही ठरलेलं उत्तर गेलं...
मग मात्र काकांच्या मस्त गप्पा सुरु झाल्या..म्हणजे ....पुढची दहा-पंधरा मिनिटं मी फक्त श्रोता होते आणि काका वक्ता...लेकीचे भिंतभर लावलेले फोटो त्यांनी मला दाखवले..भिंतीवर त्यांनी फोटोचं फॅमिली ट्री केलं होतं... तिच्या ऍक्टिव्हिटीज...तिचा अभ्यास...तिचं शॉपिंग...यावर बोलत राहिले... जवळच लावलाय क्लास उगाच टेंशन नको..तिच्या शाळेच्या वेळा पाळतो आम्ही...मोबाईल नाही घेऊन दिलाय तिला अजून पण माझ्या मोबाईल चा ताबा तिच्याकडेच असतो ती घरी असते तेव्हा....काका बोलत होते.. प्रत्येक शब्दातून मला एका बापामधलं मातृत्व दिसत होतं...काकूंनी चहा आणून दिला...त्या फारच अबोल असल्याचं जाणवलं मला...काकांचा बोलण्याचा ओघ सुरू होता...विषय एकच ते आणि त्यांची लेक....
माझं घड्याळाकडे लक्ष होतं..हळूच काकांना रोखत म्हंटलं...काका मला निघायला हवं..कार्यक्रमाची वेळ होत आली...हं...घड्याळाकडे पहात काकांनी एक सुस्कारा टाकला...आता मला निघायला लागणारच होतं हे पाहून ते म्हणाले...श्रद्धा एक सांगु...हो काका सांगा ना प्लिज...she is my adopted daughter...एका क्षणात या सागराची लाट माझ्या अंगावर आदळली...हा सगळा माझाच अट्टाहास...दत्तक घायची तर ती मुलगीच हा सुद्धा माझाच आग्रह...पहिल्याच भेटीत सगळं सांगितलं ना....सॉरी आणि थँक्स सुद्धा तुला... श्रद्धा.....
मी हलकं हसत निघाले...आदळलेली लाट आता विरली होती....कुठलं, कोणाचं बीज कुठं रुजत होतं...स्वतःच्याच रोपट्यावर जीवापाड प्रेम करणारे बाप असतातच...त्याचबरोबर अनेक विकृत मनोवृत्तीच्या बापाचे अत्याचार, स्त्रीभ्रूण हत्येच्या घटना आपण वाचतो....पण काकांमधला बाप किती मोठा होता...दुसऱ्याचं बीज आपल्या अंगणात लावून तळहाताच्या फोडा प्रमाणे त्याची निगा राखत होता....त्याच्या अंगणातलं ते रोपटं अगदी छान तरारलं होतं... ...त्यांचा फॅमिली ट्री कित्ती छान बहरला होता..निवृत्त झालेल्या काकांमध्ये मला एक वटवृक्ष दिसत होता...पण त्याचबरोबर दिसला... त्यांच्या कन्येला सावली देणारा...सुरक्षित घरटं देणारा...लेकीसाठी सगळी वादळं स्वतःच्या अंगावर घेऊन तिच्या सगळ्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारा...एक कल्पवृक्ष....