लढाई अस्तित्वाची... भाग - १
लढाई अस्तित्वाची... भाग - १


डॉ. हेलन केलर नाव तर ऐकलंच असेल. अनेकांच्या त्या प्रेरणास्त्रोत आहेत. आमची मोक्षाही त्यातील एक... तर बघुया अशाच एका महत्त्वाकांक्षी मोक्षाची कथा... कथा समग्रपणे सत्यघटनेवर आधरित आहे. तर चला मग या खडतर, संघर्षपूर्ण आणि रोमांचक प्रवासाचे आपणही साक्षीदार बनू या...
——————
”हेल्लो मोक्षा, काय सुरु आहे पिल्लुचं.... मस्ती...? नुसती मस्ती करायची काय...? अगं इकडे बघ ना. मावशी आली आहे तुझी. ये मोक्षा....”
प्रिती मोक्षाशी बोलण्याचा प्रयत्न करित होती पण ती तिला प्रतिसाद देत नाही आहे हे तिच्या लक्षात आले होते. ती एक कर्णबधिर मुलांची शिक्षिका होती म्हणून तिला वाटलं काही तरी गडबड आहे. आपण मुक्ताशी बोलायला हवं. पण तिच्या प्रतिक्रियेची तिला थोड़ी भीती वाटत होती.
प्रिती हळूच मुक्ताला म्हणाली, ”कसं काय मोक्षाशी खेळायला मज्जा येत असेल ना.”
“हो गं. आता ती छान भरभर चालते. शहाणं बाळ माझं लवकरच चालायला लागलं. आता दिडची होईल ती.”
“खरंच गं. मोक्षा इकडे बघ ना. तू तर बघतच नाही. माझा आवाज़ नाही येत आहे काय तुला,” प्रिती मुक्ताला थोड़ा इशारा देत म्हणाली.
“अगं, ती अशीच करते तिला जेव्हा वाटेल तेव्हाच ती बघते.”
“पण तुला एक सांगू मुक्ता, असं बर नाही. आता तर तिने पूर्ण प्रतिसाद द्यायला हवा. बरं ती थोडं काही बोलते काय?”
“नाही गं. ती नुसतीच तोंडातल्या तोंडात शब्दांचा खेळ करते. तशी मीही उशीराच बोलले होते.”
“अगं पण तू उशीर बोलले म्हणून तीही तशीच करेल असं होत नाही ना गं राणी!”
“म्हणजे तुला म्हणायचं तरी काय...”
“कदाचित तिला ऐकायला येत नाही.”
“ऎ काही काय गं वेड्यासारखी बोलतेस. तू असेल त्या बहिऱ्यांची टिचर. ते तंत्र तू घराबाहेर ठेव. उग़ाच काही तरी चेष्टा नको करू.”
“हे बघ मुक्ता माझं ऐक एवढी हायपर नको होऊस मी काय म्हणते आहे आधी ऐक तर.”
“हे बघ तू माझ्या लहानपणीची मैत्रीण आहेस म्हणून मला तुझा अपमान करायचा नाही.”
“हे बघ मी एक प्रयोग करुन बघते मग ठरवू काय करायचं ते.”
“उगाच काही तरी मुर्खपणा मला नाही करायचा.”
“तू माझं ऐक नाही पटलं तर मी गप्प बसेल. आता तर ठीक आहे ना?”
प्रितीने मुक्ताला एक मोठं भांडं आणायला लावलं आणि अलगद मोक्षा मागे नेवून जोरात आदळलं. मुक्ताने प्रखर आवाजाने लगेच आपले कान बंद केले पण मोक्षाने काहीच प्रतिसाद नाही दिला. वारंवार करुनही तिचा काही प्रतिसाद नव्हता. एवढ्या जोराच्या आवाज़ाला ती दचकून रडायला हवी होती पण तिने पापणीसुद्धा वर खाली केली नाही. तिने साधं लक्षसुद्धा दिलं नाही.
“हेच मला तुझ्या निदर्शनास आणून द्यायचं होतं. बघ मुक्ता कदाचित तिला ऐकायला येत नाही.”
प्रिती चिंतित स्वराने बोलली. मुक्ताला धक्काच बसला. तिने लगेच मोक्षाला जवळ घेतले आणि रडू लागली.
“तू वेडी झालीस काय गं. कशाला अशी रडतेस?”
“मला खूप टेन्शन आलं गं. माझ्या इवल्याशा जिवाला काही झालं तर?”
“तू चिंता नको करू. यात काही काळजी करण्याइतकं नाहीच. आपण आधी तिच्या काही टेस्ट करू मग बघू काय आहे ते आणि तुझं असं हरुन कसं चालणार. एक दोन audiologist आहे माझ्या परिचयाचे जाऊ आपण त्यांच्याकडे. चल तू आवर मी निघते उद्याचं सांग तसं मला आणि आता रडू बिडू नको बाई.”
“ह्म्म्म्म्म्म मी बोलते संजयशी. कळवते तसं तुला.”
संजय परतला ऑफिसमधनं आणि मोक्षाशी खेळत होता तेव्हा त्याच्या नकळत तिने त्याच्या समोर तोच प्रयोग परत केला. संजय खूप घाबरला अगदी कानाजवळ जोराचा आवाज झाला पण मोक्षाला काहीच फ़रक पडला नाही. प्रितीने तिला जे सांगितले ते त्यांच्याही लक्षात आले.
मुक्ताने मोक्षाला जवळ घेतले आणि संजयच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली.
“मी आहे ना तुमच्यासोबत तू काळजी नको करु.”
मुक्ताला क्षणभर झोप नाही आणि संजयसुद्धा नुसते कड़ पलटीत होता.
कसाबसा दिवस उजडला. मुक्ताने प्रितीला तडकाफडकी फोन करुन डाॅक्टरांची अपॉईंटमेंट घ्यायला सांगितली. वेळेच्या आधीच दोघेही हजर होते. नर्सने मोक्षाला जवळ घेतले व बाहेरुन इजा वगैरे दिसते काय तपासले. तिची केस हिस्ट्री घेतली.
मुक्ता एम॰एस॰सी॰ आणि संजय सिव्हिल इंजिनीअर.
एक न एक मुद्दा तिने मुक्ताला समजावून सांगितला.
“बर ताई, तुमच्या घरी कोणी दिव्यांग आहे काय?”
“नाही हो पिढ़्यानपिढ़्या असं कोणीच जन्माला नाही आलं.”
“बरं गरोदर असताना कोणता अपघात झाला काय? म्हणजे पडणं वगैरे.”
“अरे नाही असंही काही झालेलं नाही.”
“बरं काही आजार. कसली औषधं घेता काय? किंवा एखादं औषध नकळत घेण्यात आलं असेल? बघा काही आठवतं काय?”
तिने विचारल्या माहितीनुसार तिला तिसऱ्या महिन्यात झालेल्या डोकेदुखीवर तिने कोणत्याही डाॅक्टरांचा सल्ला न घेता नाईस हे औषध घेतले होते. नंतर त्यावर तिच्या डाॅक्टरांनी तिला त्या औषधांचे गर्भावर होणारे परिणामही सांगितले पण आपल्याला काही होणार नाही याच भ्रमात ती राहीली आणि तिच्या एका चुकीचा परिणाम मोक्षाला भोगावा लागला कर्णबधिरत्वाच्या स्वरूपात.
“म्हणजे डाॅक्टरांचा सल्ला न घेता औषध घेतले.”
“ह्म्म्म्म्म...”
“बसा बाहेर मी बाळ टेस्टला नेते.”
नंतर तिला brainstem evoked response audiometry (BERA) test करायला आत घेऊन गेले. दोघेही जीव मुठीत घेऊन बसले होते. वातावरणात चित्तथरारक शांतता पसरली होती. मुक्ताने अलगद संजयच्या खांदयावर मान ठेवली. त्याने तिचा हात हळूच हाती घेतला. एकामेकाला धीर द्यायचा प्रयत्न दोघेही आपआपल्या परिने करित होते.
“संजय माझ्याच चुकीचे परिणाम आहेत रे हे सगळे,” गालावर सरसावलेले अश्रू पुसत ती म्हणाली.
“अगं मुक्ता, काही नाही होणार आपल्या मोक्षाला.”
“संजय असंच व्हायला हवं. माझ्या काळजाचा तुकडा आहे ती.”
तेवढ्यात टेस्ट आटोपून इवल्याशा मोक्षाला घेऊन नर्स आली. तिला हाती घेऊन संजयच्या डोळ्यात डबडबलेले अश्रू भराभर कोसळले आणि तिला घेऊन ते डाॅक्टरांच्या कॅबिनमध्ये गेले. दोघांच्या ही मनातील घालमेल त्यांनी भापली होती. प्रत्येकच आई-वडिलांची हीच स्थिती असते जेव्हा त्यांना आपल्या पाल्याच्या अपंगत्वाची माहिती कळते. बाळ गर्भातच असताना सप्तरंगी स्वप्न पालक आपल्या मनात सजवतात. आपल्या पदरी असलेलं बाळ हे सर्वगुण संपन्न असावं अशी प्रत्येकच पालकाची इच्छा असते. पण जेव्हा त्यांना त्यांच्या अपंगत्वाबद्दल कळतं तेव्हा त्यांच्या भावनांचा चुराडा होतो आणि आपल्या सामाजिक स्थितीबद्दल तर आपल्याला चांगलंच माहिती आहे त्यामुळे पालक डिप्रेशनमध्ये जातात आणि त्याचा परिणाम पाल्यावर होतो.
यातलं काहीच पालकांना माहिती नसतं त्यामुळे मानसिक आणि भावनिक आघात त्यांच्यावर होतो. आता आपल्या पाल्याचं काय होईल? ती समाजात कशी वावरेल? काय तिला कधीच ऐकायला नाही येणार? समाज आपल्या पालल्याला स्वीकारेल काय?
लोक काय म्हणतील? असे शेकडो प्रश्न त्यांच्या मनात उलाढाल घालतात... आणि त्यांची चांगलीच हिरमोड होऊन बसते. म्हणून पालकांची मानसिक आणि भावनिक सावरणे आणि त्यांना धैर्य प्रदान करणे ही डाॅक्टरांची नैतिक जबाबदारी असते.
“आधी तर एक सांगतो तुम्ही खूप सुज्ञ पालक आहात. अगदी वेळेवर आलात. घाबरायची आणि काळजी करायची अजिबातच गरज नाही.”
दोघांचे डोळे अजूनही डबडबलेलेच होते. अश्रू खाली सरसावणारच तेवढ्यात डाॅक्टर म्हणालेत, “अरे तुम्हा दोघांनाही चष्मा आहे. ह्म्म्म्म्म हेही एक अपंगत्वच हो ना. पण हा चश्मा घालायची लाज नाही वाटत ना आपल्याला. शिवाय आज काल तर फॅड झालंय याचं. बघा रिपोर्ट हाती आहेत माझ्या. बाळाला मध्यम श्रवणदोष म्हणजे ५६ ते ७० डी. बी. चे कर्णबधिरत्व आहे.”
“अरे देवा... एवढं,” दोघेही ऎकून घाबरलेच.
“अहो ताई काळजी करायची अजिबात गरज नाही. मी समजावून सांगतो तुम्हाला. आधी आपण कर्णबधिरत्व म्हणजे काय हे जाणुन घेऊया.”
क्रमशः