क्वारंटाईन
क्वारंटाईन


"काय चाललंय काहीच कळत नाही उगीचच ब्यात अडकली आपल्याकडे..."
"काय झालं कशाला बडबड करता पेपर वाचताय ना..."
"अगं पेपर वाचतोय पण या कोरोनाच्या बळींची बातमी वाचली की असह्य होतंय मला निष्पाप बळी जात आहेत..."
"पण आपण काय करू शकतो जोपर्यंत त्यावर उपाय मिळत नाही..."
"काय ठरवलं होतं मी की कोकणात जाऊन दोन महिने मस्त राहणार, आंबे-फणसावर ताव मारणार... पण कुठलं काय लाॅकडाऊन पडला आणि सगळ्यावर पाणी फिरलं..."
"जाऊ द्या पुढच्या वर्षी जाऊ आपण एकदा काय तो रोग संपू दे..."
"ते आहेच गं पण खरंच आपण एवढी तयारी करून ठेवली होती जाण्याची, एसटीचे रिझर्व्हेशनसुद्धा केलेलं... सदाने तर प्लॅनिंग केलेलं कुठे आपल्याला फिरायला न्यायचं ते..."
"वर्षातून एकदा तरी गावाकडे जायला हवंच... आपण शहरात आलो की इथेच क्वारंटाईन होतो. गावाला जाणे कमीपणाचं वाटतं. पण आता पाहिलंस ना या रोगानं थैमान घातले... आणखी जो तो आपल्या हक्काच्या गावाकडे वळला, गावाकडे न जाणे पसंत करणारेसुद्धा गावाकडे जाण्यास धडपडू लागले. मान्य आहे पोटापाण्यासाठी शहरात वळावं लागतं. पण वर्षातून एकदा तरी गावाकडे जायलाच पाहिजे..."
"आता फक्त वाट पाहावी लागेल पुढच्या वर्षीच्या कोकणात जाण्याची... तोपर्यंत डोळ्यात साठवीण माझा कोकण. पण हे महाराजा कोकणच्या देवा लवकर या रोगाला मुळापासून नष्ट कर रे महाराजा..."