कुसूम...एक वाघारी लढाई
कुसूम...एक वाघारी लढाई
कुसूम ही गावकुसा बाहेर ओसाड जागेवर दहा-बारा खोपटांच्या वस्तीत ती राहत होती.वस्तीच्या आजु-बाजुला भाबळीचे झाडे, पसरलेली होती. वस्तीतले ते असाह्य जीवन बघून अठराविश्व दारिद्रयातलं ते वास्तविक चित्र डोळ्यासमोर दिसतं. कुसुम लहानपणापासून हर एक कामात करारी व हरहुन्नरी होती कलागुणांमध्ये पारंगत व अभ्यासात हुशार असायची कुसुमच्या घरची परिस्थिती फार असाह्य होती बाप दिवसभर दारूच्या नशेत असायचा, कुसुमची आई राधाताई दुसऱ्यांच्या शेतात जिथे मिळेल तिथे मोलमजुरी करून आपलं घर चालवायची, दारूच्या आहारी जाणारा कुसुमचा बाप सुधाकर त्याला जराही काळजी वाटत नाही कि आपली सोळा-सतरा वर्षाची मुलगी झाली तिच्या भविष्याचं काय होईल याचं त्यांला काय बी घेनं देनं नाही...बापाच्या कमाईतून सुखाची आशा न बाळगता कर्तृत्वाची लढाई लढणारी करारी वृत्तीची कुसुम आपल्या आई सोबत दिवसभर शेतात मोलमजुरी करायची...
कुसुमचं ते तरणंताठं वय बघून कधीकधी आई रडत बसायची... कुसुमने आईला विचारलं आई का रडत आहे.राधाताई म्हणाली नाही गं कुसमे मी कशाला रडू..आपल्या आयुष्यात आलेलं हे फाटकं नशीब केंव्हा सुधरेल देव जाणे पर कुसुमे तुझी फार काळजी वाटते मला कुसुम..आई माझी काळजी करायची काही भी गरज नाही तु आहे ना माझ्या पाठीशी मंग मी समर्थ आहे.
राधाताई काळजाला ठेच लागल्यागत पुटपुटते आणं कुसुमला सांगु लागते बाप कामाच्या पैश्यांची दारू पिऊन जातो बाई पोरीची जराही काळजी वाटत नाही असा निर्दयीपणे हा माणुस बेपर्वाईने का वागतो दोन पैसे घरात द्यावे पण दारूच्याच मड्यावर पैसे उधळतो राधाताई रडक्या स्वरात कुसुमला सांगते कुसुमच्या त्या निष्पाप डोळ्यातुन असवांच्या धारा वाहू लागतात. राधाताई कुसुमला जवळ घेत तिचे डोकं सावरत कुसुमला राधाताई म्हणते कुसमे तु शाळेत हुशार हयस आणं उद्या पासन शाळेला जा तू कुसुम हो आई मला शाळा शिकुन अधिकारी व्हायचं आहे... आपलं हे असाह्य जीवन बदलायचं आहे मला
अचानक दारू पेऊन कुसुमचा बाप सुधाकर येतो आणि कुसुमला आवाज देतो ये कुसमेऽऽऽ कुसुम होकार देते काय बाबा सुधाकर फुल दारूच्या नशेत बोलतो ये कारटे तु राधे बरोबर कामाला गेली होती किती पैसे कमवले ते आताच्या आता दे कुसुम म्हणाली नाही बाबा माझ्याकडे पैसे नाहीत माझ्या कामाच्या पैश्यांची आईने बाजार आणला मी कुठुन पैसे आणु आणं सुधाकर दारूच्या नशेत काही माही शिव्या देत बोलु लागतो तेव्हा.. संतापाने राधाताई उटते आणि सुधाकरला कधी नाही बोलली अशी ठणकावून बोलायला लागते ये फुटक्या नशिबाचा दलिंदर...नीच माणसा पोरीला काय धमकावतो अरं तुला लाज नाय वाटत. घरात कवडीचं काही आणत नाय अरं तरणीताटी पोरीला असं बोलल्यावर तिच्या जीवाला काय वाटत असेल अरं दिवसभर दारू पेऊन कामाचे पैसे उधळतो आणं रोजचा नंगानाच करतो. कुसुम कावरी बावरी होऊन बाजूला बसुन रडते
राधाच्या त्या बोलण्याने सुधाकर चिडून म्हणतो ये राधे तुझ्या मायेची तुला आता सोडणार नाय.. सुधाकर राधाताईला मारायला लागतो तेव्हा कुसुम उठते आणि आईला घट्ट चिकटून जाते... कुसुम रडक्या स्वरात सुधाकरला सांगते बाबा आईला नका मारू मला मारा बाबा मला मारा कुसुम हुंदका देत सांगते... बाबा मि मेल्यावर तुमचा डोक्यावरचा भार तरी कमी होईल...नको मला हे बेजार जीवन... कुसुमचे हे शब्द ऐकुन सुधाकरला काहीच वाटत नाही... असाह्य वेदनांची हि लढाई जणू कुसुमच्या नसानसात भिडली होती. अशा रोजच्या कटकटीने कुसुम पार सुकली होती.
जवळच्या खोपटातून बायजाई येते आणं बायजाई सुधाकरला बोलते कायरं सुध्या काय कटकट लावली मुडदा बसवला तुझा किती जीव घेतो रं बाई पोरीचं माणसात ये जरा... सुधाकर म्हणतो ये म्हतारे जाते का इथुन काय बोलायचा संबंध नाय तुझा... चाल फुट...बायजाई...जातो रं बडव्या पर तुझा एक ना एक दिवस विलाज करेन...बायजाई जाते तिच्या खोपटात आणं सुधाकर अडाधट पडतो खाटेवर आणि सुसाम होतो...रधाताई कुसुमला जवळ घेत सावरते आता काय झालं ते विसरून कुसुमला राधाताईला म्हणते... कुसमे तू उद्यापासनं शाळेला जा मी काम करून शिकवीन तुला..तुझा बारावीचा अभ्यास हाय तो पुरा कर कुसुम हसत मुखाने म्हणाली हो आई...आज तुझ्या मुळे मला सुखाचा श्वास घेता येतो.नभाशी उंच भरारी घेण्यास मजबूत पंख देणारी काळजातली आई आहेस तू.. राधाताईला कुसुमचे ते शब्द ऐकुन खूप बरं वाटलं...
उद्याचा दिवस उजेडतो....आणि कुसुमची शाळेत जाण्याची तयारी होते. कुसुमची शाळा वस्ती पासून दोन किलो मीटरच्या अंतरावर असते. कुसुम वस्तीतून बाहेर पडते आणं शाळेच्या वाटेकडे जाण्यास निघते जाता जाता पुढे कुसुमची वर्ग मैत्रीण शाळेत जात असते. कुसुम सुमनला आवाज देते ..ये सुमे... सुमन थांबते... कुसुम काय गं सुमे येऊ दे की कुसुम सुमनकडे जाते दोघी मैत्रिणी किती दिवसा पासन भेटली नाही आज कुसुम दिसल्यावर सुमनला खूप आनंद होतो. सुमन कुसुमला बोलते काय गं कुसमे इतक्या दिवस वस्तीला काय करत होती... कुसुम अगं सुमे अडचण असल्यामुळं आई बरोबर कामाला जायचो...सुमन बरं मंग आज कोणत्या दिशेकडे सुर्य उगवला तुला आज काम नव्हतं का... कुसुम...अगं सुमे आईने मला कामाला नाही सांगितलं बारावीचा अभ्यास आहे त्यामुळं...सुमन बरं झालं कुसमे तु आज आली पेपरांविषयी आज अभ्यास देणार आहेत.
चावळत बोलत कुसुम व सुमन शाळेच्या वाटेनं जात होत्या अचानक तिकडच्या गावातून दारू पिलेले दोन गावसांड येत होते ते दोन दारूडे गावसांडाचं मुसडे सुजलेले होते... कुसुम व सुमनकडे त्यांची नजर पडते...आणि कुसुम व सुमनकडे वाईट नजरेनं बघायला लागली आणि ते दोघं म्हणू लागली.. देखो आपणी रूपा और पारू आ रही है... त्या दोघांना बघुन सुमन भ्याकुळ होते...आणं कुसुमला सुमन.. म्हणते कुसमे पळ इथून कुसुम नीडरपणे सुमनला धीर देऊन सांगते सुमे काय घाबरायचं नाही या सांडाना... कुसुम व सुमन त्यांच्याकडे न बघता गुप गुमानं शाळेच्या वाटेनं वेगाने झपाझपा चालु लागल्या...ते दोघं गावसांड ये रूपा पारू म्हणत त्यांचा पाठलाग करू लागले...ते दोघं गावसांड दारूच्या नशेत वाईट भावनेतून त्या निष्पाप मुलींचा बलात्कार करण्यास बितले होते. पण मुलगी ही दुर्गेचा व महाकालीचा अवतार असते हे त्या हिंसक राक्षसांना ठाऊक नसेल....ते दोघं हिंसक गावसांड कुसुम व सुमनचा हात पकडतात आणि म्हणतात हे मेरी रूपा पारू आमच्या दोघांच्या तावडीतून तुम्हा दोघींना सोडणार नाही...असं म्हणत ते दोघं कुसुम व सुमनला हिसका बोसकी करायला लागली सुमन पार घाबरली होती...पर कुसुम सशक्तपणे सक्षम होती.. आज तिला ह्या हिंसक गावसांडा पासून सुटका करायची होती...त्या दोघांच्या हिसका बोसकीन... कुसुमचा संताप वाढला आणं कुसुमला दुर्गेचा अवतार आठवला...कुसुमचा राग पारावर गेला होता.
संतापाने ओरडत जसं की वाघीणीच्या डरकाळीनं त्या दोघं दारूडे हिंसक गावसांडाच्या हाताला जोराने चावा घेतला आणि कुसुम त्यांच्या ताब्यातून सुटली व सुमन ही पळत सुटली त्यांना मारण्यासाठी काही आहे का कुसुम इकडे तिकडे बघू लागली जवळचं लाकडाचे दांडके पडले होते... कुसुमने घाई घाईने तिथून लाकडाचा दांडका उचलला आणि त्या दोघं हिंसक गावसांडावर वार करत तुटून पडली कुसुमचे ते भयान अवसान बघून भ्याकुळ सुमनच्याही नसात दुर्गेचा अवतार संचारला आणि त्या हिंसक गावसांडावर मारा केला. कुसुमच्या झुंजार नितीने व हिंमतीने सुमनला स्फूर्ती मिळाली आणि त्या हिंसक गावसांडाना बेदम जखमी केले... आणं कुसुम संतापाने त्यांच्याकडे बघुन म्हणते ये नीच वृत्तीच्या सांडानो आमच्या वाटेला आला तर मरणाचा दरवाजा उघडावा लागेल याद राखा.. त्या हिंसक गावसांडाना बेदम मार लागल्यामुळं विव्हळतात...
कुसुमच्या त्या वाघारी मारानं हिंसक वृत्तीच्या गावसांडाना चांगलाचं धडा शिकवला... कुसुमच्या अंगात वाघिणीसारखी चपळाई आणं घारीसारखी नभाशी भरारी घेण्याची ताकद पैदा केली आणं वाघारी होऊन हिंसकवृत्तीच्या गावसांडावर धावून गेली. अशा भयाण झुंजार नितीतून नव्यानं वाघारीचा जन्म होतो...असा दरारा प्रत्येक मुलीने केला पाहिजे जेणे करून अन्याय, अत्याचार, बलात्काराच्या घटना थांबतील....
वाघीणीची चपळाई, होती वाघारी लढाई
वेदनेची तु चिंगारी झाली...
अन्यायावर तू मात केली...
जगण्याची तू रित झाली...
गातो मी तुझी नवलाई...
वाघीणीची चपळाई, होती वाघारी लढाई
कुसमेची तू दुर्गा झाली...
वादळाशी तू भेट केली...
झुंजार होणार तुझी तरूणाई...
वाघीणीची चपळाई, होती वाघारी लढाई
जगण्याची स्फुर्ती तुझ्यातून मिळाली...
आतली ताकद,शत्रुला कळाली...
गं अंबाई गं अंबाई...
वाघिणीची चपळाई, होती वाघारी लढाई
