ONKAR GOTHANKAR

Drama Tragedy Thriller

3.4  

ONKAR GOTHANKAR

Drama Tragedy Thriller

कुंभमेळा (प्रकरण - ३)

कुंभमेळा (प्रकरण - ३)

9 mins
428


रोहिणीच्या योजनेनुसार सगळे काही ठरले. राकेशने आई-बाबांना कुंभमेळ्याबाबत सांगितले तर ते बिचारे या गोष्टीने खूप खुश झाले. एव्हाना रोहिणीने बदललेल्या औषधांचा चांगला परिणाम सासरेबुवांवर होत होता. ते थोडेफार हिंडू-फिरू लागले होते. रोहिणी आता त्या दोघांची खूप काळजी घ्यायला लागली होती. सूनबाई बदलल्याचं त्या दोघांना खूप आश्चर्य वाटलं होतं. रोहिणी वरवर त्यांच्याशी खूप गोडगोड वागत होती, पण आतल्या आत स्वतःच्या मनाला समजावत होती की फक्त थोडेच दिवस! बस्स! नंतर काय मज्जाच मज्जा! असा विचार मनात येऊन रोहिणी खुश झाली. पुढील कल्पना तिच्या डोक्यात फेर धरू लागली. तिने राकेशला सांगून गाड्यांचे बुकिंग करवले. गाड्यांना खूपच गर्दी होती. रोहनला कशाबशा सीट्स मिळाल्या. पण नंतर तर वेगळेच प्रकरण उद्भवले. जयेश शेजारच्यांकडे राहायला ऐकेचना. रोहिणी खूप चरफडली. पण जयेश तयारच होत नव्हता. रोहिणीला या कामात जयेशची लुडबूड नको होती. पण जयेशला मात्र त्याच्या आजी-आजोबांसोबत यायचं होतं. या गोष्टीवरून रोहिणी जयेशला मारायला धावली. ती त्याच्यावर हात उगारणार इतक्यात, "सूनबाई, थांब!" असा आवाज तिच्या कानावर पडला. ती थांबली आणि मागे वळून बघितले तर सासूबाई उभ्या होत्या. खूप दिवसांनी त्यांनी रोहिणीला दटावले होते. त्या पुढे म्हणाल्या, "येऊ दे ना जयेशला यायचं असेल तर, तेवढंच त्याला नवीन काहीतरी बघायला मिळेल, नवीन गोष्टी बघायला मिळतील. मजा वाटेल त्याला!"


रोहिणी, "तसं नाही पण त्याची शाळा आणि अभ्यास बुडेल, म्हणून नाही बोलत होते मी त्याला आपल्याबरोबर यायला!"


सासूबाई, "तीन-चार दिवसांचाच तर प्रश्न आहे. आल्यावर भरून काढेल तो सगळा अभ्यास! (जयेशला जवळ घेत) तसा आपला जयेश खूप हुशार आहे! हो की नाही, जयेश?"


जयेश हसत, "हो....." रोहिणीच्या मते सासूबाई आज खूपच जास्त बोलल्या होत्या. ती काहीही न बोलता फक्त शांतपणे बघत राहिली.


अखेर जायचा दिवस उजाडला. राकेश रोहिणीला हळू आवाजात म्हणाला, "हे सगळं आपण नाही केलं तर चालणार नाही का? म्हणजे आई-बाबांना कुंभमेळ्यातच सोडून आलं पाहिजे का? मी हवं तर त्यांना कुठल्यातरी नातेवाईकांकडे सोडून येतो काही दिवसांसाठी!" हे ऐकून रोहिणी चवताळलेल्या वाघिणीसारखी त्याच्यावर धावून आली.


ती म्हणाली, "तिथे नेऊन सोडलं तरी तिथून हे दोघे परत येणारच ना केव्हा ना केव्हा! मला ही झंझट कायमचीच नकोय. आणि तुला जर एवढा पुळका येत असेल ना तू पण राहा त्यांच्याबरोबर तिथेच नाशिकला! तिघे मिळून देवदर्शन करा! आम्ही दोघे मायलेक राहतो इथे! कळलं का?" राकेश यावर काहीच बोलू शकला नाही. रोहिणीच्या मनात पटकन विचार आला की, आपली योजना आता जवळजवळ पूर्ण व्हायला आली आहे आणि अशावेळी असा धसमुसळेपणा करून चालणार नाही. राकेशवर रागावणे योग्य नाही, निदान आतातरी. या कामात मला त्याचीच तर साथ आहे. मग अशावेळी त्याला दुखावून कसं चालेल? म्हणून ती लगेच राकेशला म्हणाली, "अहो, ऐका ना!" राकेश थोडा रागात होता. त्याने फक्त 'हम्म' केले. रोहिणी म्हणाली, "अहो, मी आपल्या भल्यासाठीच सांगतेय ना, मग? मग अशावेळी मला साथ द्यायची सोडून असले नकोनको ते भलतेसलते विचार कशाला मनात आणताय ? (हळू आवाजात) कळतंय ना?" शेवटचं वाक्य ऐकून राकेश विरघळला आणि म्हणाला, "हो गं! आपण तू म्हणतेस अगदी तस्संच करू!" रोहिणीने खुश होऊन राकेशला मिठी मारली. राकेश मिठीत असताना पटकन म्हणाला, "बाबा, तुम्ही?" हे ऐकून रोहिणीने पटकन मिठी सोडली आणि बाजूला झाली. पण तिने पाहिले तर कोणीच नव्हते. तिने प्रश्नार्थक चेहऱ्याने राकेशकडे बघितले तर तो हसत होता. रोहिणी लटक्या रागाने त्याला मारायला धावली, तसे त्याने आपले दोन्ही हात पसरले आणि रोहिणीला पुन्हा मिठीत घेतलं. रोहिणी त्याच्या कानात हळू आवाजात म्हणाली, "तीन-चार दिवसांनंतर मिठी मारताना कोणी येईल अशी भीती बाळगण्याचं काही कारणच उरणार नाही!" राकेशने हे ऐकून मंद स्मित केले.


सगळी तयारी झाली. जयेश तर सारखा इकडून तिकडे धावत होता आणि त्याच्यामागून सासूबाई! मग हे पाचजण बस डेपोत पोहोचले. बस यायला अजून ५-१० मिनिटे बाकी होती. तेवढ्या वेळेत राकेश बसमध्ये खाण्यासाठी खाऊ घेऊन आला. तेवढ्यात बस आली. राकेशला चारच तिकिटे मिळाली होती. त्यामुळे जयेशला त्याने मांडीवर बसवले होते. एका सीटवर तो आणि रोहिणी बसले होते आणि बाजूच्या रांगेत एक सोडून मागच्या सीटवर त्याचे आई-बाबा बसले होते. बस चालू झाल्यावर थोड्याच वेळेत जयेश पटकन उडी मारून राकेशच्या मांडीवरून उठला आणि आजोबांच्या मांडीवर जाऊन बसला. बसच्या खिडकीतून त्याला अनेक नवनवीन गोष्टी दिसत होत्या. त्या बघून जयेश सारखा 'आजी हे काय आहे ?', 'आजोबा ते काय आहे?' विचारत होता आणि त्याचे आजी-आजोबादेखील न कंटाळता त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत होते. म्हणतात ना की नातवंडं ही आजी-आजोबांसाठी दुधावरची साय असते. त्यांचं आपल्या मुलांपेक्षा नातवंडांवर प्रेम जास्त असते. आणि इथे तर त्यांना त्यांच्या नातवाशी खूप दिवसांनी इतका मनमोकळा संवाद साधता येत होता. वर रोहिणीचा नेहमीचा रागीट कटाक्षदेखील नव्हता. त्यामुळे त्यांच्यादेखील तोंडाची टकळी अखंड चालू होती. मध्येमध्ये रोहिणीची नजर या तिघांवर पडत होती. या तिघांना हसतंखेळतं पाहून रोहिणीला एका क्षणी वाटले की, काय करतो आहोत हे आपण? आपल्या सुखासाठी..... आपल्या स्वतःच्या 'वैयक्तिक' सुखासाठी काय करायला निघालो आहोत हे आपण? पण तिच्या मनाने लगेच हा विचार बाजूला सारला आणि ती खिडकीतून गाडी कुठवर पोचली ते पाहू लागली.


काही वेळानंतर गाडी नाशिकमध्ये कुंभमेळ्याजवळ पोहोचली. तिथली अफाट गर्दी पाहून रोहिणीदेखील अवाक झाली. रोहनने एका हॉटेलमध्ये दुसऱ्या मजल्यावर रूम घेतली होती. त्या रूमच्या खिडकीतून कुंभमेळ्याचा सारा परिसर दिसत होता. त्यावेळी त्या परिसरात लाखो लोक जमा झाले होते. रोहन, जयेश आणि रोहनचे आई-बाबा सगळे तयार झाले. रोहिणी तयार हो असताना रोहिणीच्या हातून आरसा खाली पडला आणि फुटला. रोहिणी थोडीशी अंधश्रद्धाळू होती. ती चिंताग्रस्त चेहऱ्याने वॉशरूममधून बाहेर आली. सासूबाई जयेशबरोबर खेळत होत्या. रोहिणीचा पडलेला चेहरा पाहून त्यांनी विचारले, "रोहिणी, काय झालं गं? चेहरा का पडलेला तुझा?"


रोहिणी, "काही नाही हो सासूबाई, तो.... आरसा फुटला माझ्या हातातून, त्यामुळे...."


सासूबाई, "अगं, आरसाच फुटला ना, कधी ना कधी फुटणारच, तो आज फुटला, त्यात एवढं दुःखी होण्यासारखं काय आहे?"


रोहिणी, "पण आरसा फुटणं अपशकुनी मानतात ना हो सासूबाई? मला त्याचीच भीती वाटतेय!"


सासूबाई, "शकुन-अपशकुन असं काही नसतं गं, उगाच काळजी नको करूस तू!" सासूबाईंच्या या बोलण्यानंतरही रोहिणीच्या मनातली शंकेची पाल चुकचुकायची काही बंद झाली नाही. साशंक मनानेच ती साडी नेसून तयार झाली. तिच्या मनात असलेला हेतू सिद्धीस जाईल की नाही अशी तिला भीती वाटू लागली.


सगळ्यांची तयारी झाल्यानंतर सगळेजण निघाले. कुंभमेळ्याच्या ठिकाणी अफाट गर्दी होती. रोहिणी रोहनचा आणि जयेशचा एक हात पकडून चालत होती तर सासूबाई सासरेबुवांचा आणि जयेशचा एक हात पकडून चालत होत्या. सासूबाईंना गर्दीची थोडीशी भीतीच वाटत होती. त्यामुळे त्यांनी जयेशचा हात अगदी घट्ट पकडला होता. गर्दीतून कशीबशी वाट काढत ते पाचही जण नदीजवळ पोहोचले. एक-एक करून सर्वांनी दोन-तीन डुबक्या मारल्या. येताना मात्र सासूबाई रोहिणीचा हात पकडून होत्या. हळूहळू गर्दीतून वाट काढत ते पाचजण परत निघाले. परंतु, कुंभमेळ्याच्या त्या पवित्र पाण्यात डुबकी मारूनसुद्धा रोहिणीच्या मनातले वाईट विचार मात्र अजून तसेच होते. ती सासू-सासऱ्यांना कधी गर्दीत एकटं सोडता येईल याचाच विचार करत होती. तेवढ्यात सगळी माणसे अचानक इथे-तिथे सैरावैरा धावू लागली. नक्की काय झालंय ते रोहिणी-राकेशला कळेचना. राकेशने एका माणसाला थांबवून विचारले तेव्हा तो माणूस न थांबता धावत-धावतच राकेशला म्हणाला, "बॉम्ब आहे इथे, बॉम्ब!"


आणि राकेश पुढे काय बोलतोय हे न बघताच पळत सुटला. कुठल्याही क्षणी चेंगराचेंगरीला सुरुवात होण्याची शक्यता होती. राकेशने मागे वळून पहिले तर रोहिणी त्याच्या आईचा हात पकडून उभी होती आणि त्यांच्या मागेच जयेशला घेऊन त्याचे बाबा उभे होते. राकेशने रोहिणीचा हात पकडला आणि सगळ्यांना म्हणाला, "चला पटकन, बाहेर निघू इथून! नाहीतर चेंगरले जाऊ!" असे म्हणून रोहिणीचा हात आणखी घट्ट पकडून त्याने धावायला सुरुवात केली. रोहिणीदेखील त्याच्या मागून तिला जेवढं शक्य होईल तेवढ्या वेगाने धावू लागली. सुरुवातीला तिने सासूबाईंचा हात पकडून ठेवला होता. पण जसजशी गर्दी वाढू लागली तसा तिच्या मनातला सैतान जागा झाला. तिने विचार केला की हीच ती संधी आहे यांना इथे सोडण्याची आणि परत अशी संधी मिळणार नाही. नाही!!! आता नाही तर कधीच नाही! हीच आहे ती संधी जिची आपण एवढ्या दिवसांपासून आतुरतेने आणि प्रकर्षाने वाट पाहतोय! ही संधी गेली तर सगळंच मुसळ केरात! या विचारांनी तिने लगेच सासूबाईंचा हात सोडून दिला आणि राकेशबरोबर अजून वेगाने धावू लागली. राकेशला जाणवले की रोहिणीच्या धावण्याचा वेग वाढला आहे. पण त्याने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही आणि स्वतःचा वेग अजून वाढवला.


रोहिणी मनातून खूप खुश झाली होती. तिची योजना यशस्वी झाली होती. पण तिच्या मनातल्या सैतानाला खुश करता करता ती एक महत्त्वाची गोष्ट मात्र विसरूनच गेली होती. जयेश! जयेश सासूबाईंजवळच राहिला होता आणि सासूबाईंचा हात सोडताना रोहिणीच्या हे लक्षातच आले नाही. थोड्याच वेळात राकेश आणि रोहिणी गर्दीमधून सहीसलामत बाहेर पडले. राकेश धापा टाकत म्हणाला, "रोहिणी, आई-बाबा?"


रोहिणी आनंदी स्वरात म्हणाली, "त्यांना सोडलं मागे गर्दीत, ब्याद गेली कायमची!"


राकेशने एक निश्वास सोडला आणि रोहिणीला म्हणाला, "रोहिणी, जयेश धावून-धावून दमला असेल ना? कुठे आहे तो? पाय दुखत असतील खूप त्याचे!"


रोहिणीने आश्चर्याने राकेशला विचारले, "कोणाला विचारतो आहेस? जयेश तर तुझ्याकडे आहे ना!"


तसा राकेश थोडा चकित होऊन म्हणाला, "माझ्याकडे? तो तर सुरुवातीपासून तुझ्याबरोबरच होता."


रोहिणी गोंधळून, "माझ्याबरोबर.....?" तिच्या डोक्यात विचारांची चक्रे फिरायला लागली. जयेश माझ्याबरोबर नव्हता..... राकेशबरोबर नव्हता..... म्हणजे..... म्हणजे..... जयेश आई-बाबांबरोबर होता! रोहिणीच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. थरथरत्या आवाजात ती राकेशला म्हणाली, "राकेश..... जयेश आई-बाबांबरोबर आतच राहिला!"


राकेश, "क्काय?"


रोहिणी रडवेल्या सुरात, "राकेश..... राकेश, जा ना पटकन! जयेशला..... माझ्या सोन्याला आण ना रे शोधून! जा ना!"


राकेश खूप रागाने रोहिणीवर डाफरला, "अगं मूर्ख बाई, हे काय करून ठेवलं आहेस तू?"


"पहिलं जा आणि शोध त्याला!" रोहिणी कसंबसं एवढंच बोलू शकली. हे ऐकून रोहन लगेच परत गर्दीत घुसला. विषण्ण मनाने रोहिणीदेखील त्याच्या मागोमाग गर्दीत शिरली.


बहुतांश लोक चेंगराचेंगरीपासून वाचले होते. परंतु, काही कमनशिबी लोक इतरांच्या पायाखाली तुडवले जाऊन मरण पावले होते. रोहिणीच्या मनाची धाकधूक खूप वाढली होती. ती सर्व माणसांवर पटापट नजर फिरवत होती. पण जयेश कुठेच दिसत नव्हता. रोहिणी कावरीबावरी झाली, इकडेतिकडे सैरावैरा धावत सुटली. काही क्षण असेच गेले आणि नंतर तिची नजर एका जागी खिळून राहिली. काहीच न बोलता ती संथपणे त्या जागेच्या दिशेने चालू लागली. तिची दातखीळच जणू काही बसली होती. काही पावले चालल्यानंतर ती थबकली आणि शरीरात त्राण अजिबात नसावेत तशी पुढे तोल जाऊन गुडघ्यांवर बसली. तिच्या समोर तिचे सासू-सासरे होते. परंतु, काही वेळापूर्वी झालेल्या चेंगराचेंगरीमुळे त्यांचा मृत्यू झाला होता. रोहिणीचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली होती. कारण तिच्या सासू-सासऱ्यांनी जयेशचा हात शेवटपर्यंत सोडला नव्हता. सासूबाईंनी जयेशला पोटाशी घट्ट धरले होते आणि जाताना त्यालाही सोबत घेऊन गेले होते. रोहिणी होती नव्हती ती सर्व शक्ती लावून किंचाळली, "राकेश!!!"


राकेश लगेचच धावत आला. समोरील दृश्य पाहून तोही हतबुद्ध झाला. रोहिणीने त्याचा हात पकडला आणि म्हणाली, "राकेश..... राकेश..... राकेश बघ ना जयेश हलत नाहीये! काही बोलत नाहीये! बघ ना राकेश, बघ ना!" राकेश काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता.


रोहिणी पुढे म्हणाली, "आई-बाबा बघ ना, आपल्या जयेशला घेऊन गेले! आता पण बघ ना, कसे पोटाशी घेऊन झोपले आहेत! जसा काही त्यांचा नातू नाही मुलगाच आहे! राकेश..... राकेश त्यांच्याकडून आपल्या जयेशला परत आण ना, आण ना रे! मला माझा जयेश हवाय, राकेश!"


राकेशने रोहिणीला वर उठवले आणि म्हणाला, "रोहिणी..... रोहिणी..... शांत हो रोहिणी!"


रोहिणी थोडी उसळून, "जयेशला सांग ना घरी जायचंय ना! त्याला घरी नाही यायचंय का? त्याला बोल, आता आपण त्याच्या आजी-आजोबांना आपल्या सोबतच ठेऊ! मी..... मी..... कधीच भांडणार नाही त्यांच्याशी! चांगलं-चांगलं बोलेन! पण तू चल ना आधी! राकेश उठव ना रे त्याला!"


रोहिणीचे बोलणे संपते-ना-संपते इतक्यात राकेशने तिच्या कानाखाली वाजवली आणि म्हणाला, "आता तुला हे शहाणपण सुचतंय काय की मी आई-बाबांशी नीट वागेन आणि भांडण करणार नाही! हे तुला मी आधीच सांगत होतो तेव्हा तुझी अक्कल काय शेण खायला गेली होती? आता बोलून काय हे तिघे परत येणार आहेत का? तुझ्या मुर्खपणात सामील होऊन मी माझे आई-बाबा आणि माझा मुलगा असं सर्वस्व गमावलंय! आता तूही माझ्या आयुष्यातून निघून जा! यापुढे तुला माझ्या आयुष्यात अजिबात स्थान नाही! माझ्यासाठी तू मेलीस असं मी समजेन!" असं म्हणून त्याने रोहिणीला धक्का दिला आणि तिथून चालता झाला. रोहिणी हे ऐकून मटकन खाली बसली.


कुंभमेळा!!! या कुंभमेळ्याने तिच्या आयुष्यात खूप उलथापालथ घडवून आणली होती. कुंभमेळ्यात माणसं हरवतात. इथे तर रोहिणीचं सर्वस्वच हरवलं होतं. अचानक कसलासा विचार करून ती उठली आणि निघाली तडक पाण्याकडे. पाण्यात शिरताना काहीसं असंबद्ध बडबडत होती, "जयेश बाळा, मी येतेय! आई-बाबा तुमची सून येतेय! रागावू नका तिच्यावर!" आणि तिने पाण्यात बुडी मारली ते कधी वर न येण्याकरता!


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama