ONKAR GOTHANKAR

Others

2.8  

ONKAR GOTHANKAR

Others

कुंभमेळा (प्रकरण - १)

कुंभमेळा (प्रकरण - १)

9 mins
667


प्रकरण १


"रोहिणी, उठ चल लवकर !” आई रोहिणीला झोपेतून उठवताना सांगत होती . रोहिणी आळस देत," काय आहे गं आई, कशाला उठवते आहेस एवढ्या लवकर, आज उशिरा जायचंय मला कामाला !" आई परत तिला हलवत म्हणाली," उठ गं, तयारी करायचीय खूप, पाहुणे येणार आहेत आज ! आणि ऐक, आज कामाला जाऊ नकोस ! " रोहिणी न उठताच म्हणाली," कोणते पाहुणे येणार आहेत ?" आई म्हणाली," अगं तुला बघायला पाहुणे येणार आहेत !" रोहिणी हे ऐकून पटकन उठून बसली आणि म्हणाली," काय ? मला बघायला पाहुणे येणार आहेत ?" आई तिचं अंथरुण आवरत म्हणाली," हो गं बाई, तुलाच बघायला येणार आहेत ! आता जा पटकन, आवरून घे तुझं !" रोहिणी स्वतःशीच कसलासा विचार करत वॉशरूममध्ये शिरली. आंघोळ केल्यावर ती कामाची बॅग भरायला लागली. ते पाहून आई म्हणाली, " अगं, तुला बोलले ना मी मगाशी की नको जाऊस कामाला, मग तरीपण बॅग का भरत आहेस ? " रोहिणी, " अगं लवकर येते मी ! पक्का !" आई विचारात पडली आणि म्हणाली," ठीक आहे. पण वेळेत ये. नाहीतर उशीर करशील." रोहिणी," नाही गं आई ! चल बाय ! येते मी !"


रोहिणी कारमध्ये बसली आणि ऑफिसच्या दिशेने निघाली. जाताना मध्ये ट्रॅफिक लागलं. तेव्हा तिने आरशात बघितलं तर घाईघाईत तिचे केस थोडेसे विस्कटले होते आणि मेकअपपण थोडासा बिघडला होता. कार ट्रॅफिकमध्ये अडकली होती, म्हणून तिने पटकन आपल्या नवीनच घेतलेल्या पर्समधून छोटा मेकअप किट बाहेर काढला आणि हलकासा मेकअप केला. मेकअप करून आरशात बघत असतानाच तिची नजर एका होर्डिंगवर पडली. ‘५०% सेल !!!’ " ओह माय गॉड ! सेल !" रोहिणी किंचाळलीच. बाजूचा रिक्षावाला दचकून तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. तिने लगेच अनघाला, तिच्या मैत्रिणीला फोन लावला आणि म्हणाली," हॅलो, अनघा कुठे आहेस ? अगं इथे हाजीअलीला ब्रँड-फॅक्टरीमध्ये सेल लागलाय !" अनघा," मग त्यात काय नवीन ? तिथे तर नेहमीच सेल असतो !" रोहिणी,” अगं आता ५०% सेल आहे !" अनघा," क्काय ? ५०% ?" रोहिणी," मग मी काय तुला असाच टाइमपास म्हणून कॉल केलाय का ?" अनघा," मला एक सांग, सेल कधीपासून कधीपर्यंत आहे ?" रोहिणी," अगं सेल काल सुरु झालाय आणि परवापर्यंत आहे !" अनघा," मग तर आपण आजच जाऊया !" रोहिणी," हो, हो, आजच जाऊया ! (मग थोडा विचार करून) .......नको, नको, आज नको, आज घरी काम आहे. उद्या जाऊया !" अनघा," म्म....., ठीक आहे. " रोहिणी," चल बाय !" थोड्या वेळात ट्रॅफिक सुटलं आणि भर्र्कन कार पळवत रोहिणी कंपनीत पोहोचली.


रोहिणीच्या कंपनीचं ऑफिस मस्त आलिशान होतं. एकंदरीत तिच्या राहणीमानाशी सुसंगत होतं. रोहिणी लगेच आपल्या केबिनमध्ये शिरली. कालच्याच फाइल्स अजून टेबलावर पडून होत्या. तिने लगेच बॉसला फोन केला आणि म्हणाली," सर, मला आज हाफ-डे हवाय !" बॉस," पण तुमचं कालचंच काम पेंडिंग पडलं आहे. मग ?" रोहिणी," सर, मी उद्या जास्त वेळ काम करेन. मग तर चालेल ?" बॉस,"म्म....., ओके." रोहिणीने मग दुपारपर्यंत दोन-तीन फाईलचं काम संपवलं आणि ती निघाली. जातानापण तिने त्या होर्डिंगवर परत एकदा नजर टाकली आणि स्वतःशीच म्हणाली," मी येतेय उद्या !" आज तिला घरी जेवायचं कंटाळा आला होता. म्हणून ती मॅक-डीमध्ये गेली. तिथे जाऊन एक 'बिग मिल' मागवला आणि आपली भूक शांत केली. मग कारने घरी पोहोचली.


रोहिणीचं घर म्हणजे २ बीएचकेचा फ्लॅट होता. आई हॉलमध्येच काहीतरी करत होती. रोहिणीला आलेली पाहताच ती म्हणाली," रोहिणी, एवढा उशीर ? तुला मी सकाळीच सांगितलं होतं ना की लवकर ये, उशीर करू नकोस म्हणून, मग उशिरा का आलीस ? तू ना माझं हल्ली काही ऐकतच नाहीस!" आई ओरडत असली तरी त्या ओरडण्यामागे काळजी होती आणि ती रास्तच होती. रोहिणीचे बाबा गेल्यापासून घराचा आणि रोहिणीचादेखील सगळा भार आईवर पडला होता. आईने तो समर्थपणे पेललापण होता. स्वतःचा इच्छाआकांक्षा मारून रोहिणीचे सर्व हट्ट पूर्ण केल्या होते. तिच्या कोणत्याच मागणीला कधीच नाही म्ह्टले नव्हते. पण या गोष्टीमुळेच रोहिणी थोडीशी हट्टी आणि आक्रस्ताळी बनली होती. एखादी गोष्ट मनासारखी घडली नाही तर ती आदळआपट करायची. लहान होती तोपर्यंत कौतुक वाटायचं पण जसजशी मोठी होत गेली तसा तिचा राग आईला डोईजड होऊ लागला. रोहिणी एकुलती एक असल्याने आई त्याकडे दुर्लक्ष करायची. पण काही वेळा अति व्हायचं. तेव्हा मात्र आई खूप ओरडायची. मग रोहिणीला अजूनच राग यायचा आणि ती स्वतःला खोलीत कोंडून घ्यायची. मग तिला हजारवेळा विनवण्या केल्याशिवाय ती बाहेर यायची नाही. आईने तेव्हा खूप कष्ट केले होते. पण त्यामुळेच आता घरात पैसा खेळत होता. कश्शाचीच कमी नव्हती.


लहानपणी आई कामाला जाताना रोहिणीला शेजारच्यांकडे सोडून जायची आणि कामावरून घरी आल्यानंतर घरची सगळी कामं आटोपायची. रोहिणीचा स्वभाव थोडासा आळशी होता. म्हणून ती मोठी झाली तरी कामांना हात म्हणून लावायची नाही. त्यामुळे आईलाच सगळी कामं आटोपायला लागायची. शिवाय रोहिणीला काही बोललं तर ती फुरंगटून बसायची. नंतर नंतर तर आईने तिला कामं करायला सांगणंच बंद केलं. हळूहळू आईच्या कष्टांमुळे घरची परिस्थिती बदलायला लागली. दोघी मायलेकी चाळ सोडून फ्लॅटमध्ये जाऊन राहू लागल्या. आई पण हळूहळू थकायला लागली होती. म्हणून तिने घरात मोलकरीण ठेवली. ती मोलकरीणसुद्धा रोहिणीच्या आळशीपणामुळे त्रासून गेली. एकदा का रोहिणी खायला वेफर्स-बिस्किटं घेऊन सोफ्यावर बसली तर मोलकरीण झाडू मारायला, लादी पुसायला आली तरी ढिम्म हलायची नाही. शेवटी जेव्हा आई येऊन पाच-सहा वेळा सांगणार तेव्हा ही महामाया उठणार तेपण हातातलं खाणं संपत आलं असेल तर ! तिने नोकरीदेखील घरात बसून कंटाळा येऊ लागला होता म्हणून पकडली. तेवढेच जास्त पैसे हातात असायचे आणि जास्त शॉपिंग करता यायची.


रोहिणीच्या आवडीनिवडीदेखील श्रीमंतासारख्या बनल्या होत्या, सोफ्यावर आरामात बसून टीव्ही बघणे, कारण नसताना उगाचच मोलकरणीवर डाफरणे आणि महत्त्वाचं म्हणजे गरज नसतानादेखील शॉपिंग ! त्यातल्या त्यात तिला शॉपिंगचा खूप वेड होतं. आणि जर सेल लागला असेल तर भारंभार कपडे घेतल्याशिवाय तिला करमायचंच नाही. त्यातले बहुतांश कपडे ती फारतर एक-दोन वेळाच वापरत असे. मग तो पसारा आईलाच आवरावा लागे. आईची नुकतीच मुख्याध्यापिका म्हणून बढती झाली होती. त्यामुळे तिच्याजवळ असलेला वेळीदेखील तिला अपुरा पडायचा. आई सध्याच्या परिस्थितीबद्दल शेजारच्या वहिनींना अजूनपर्यंत धन्यवाद म्हणायची. त्यांनीच तिला त्यावेळी नुकत्याच चालू झालेल्या खाजगी शाळेत शिक्षिकेच्या पदासाठी अर्ज करायला सांगितले होते. आईचा स्वभाव बोलघेवडा होता. त्यामुळे अल्पावधीतच ती मुलांमध्ये लोकप्रिय ठरली. म्हणूनच एवढ्या वर्षांनी मिळालेला मुख्याध्यापिकेचा बहुमान केवळ नशिबाने मिळालेला नव्हता, तर आईच्या एवढ्या वर्षांचे कष्ट, कामाविषयी प्रामाणिकता आणि विद्यार्थ्यांविषयी प्रेम व जिव्हाळा यांची ती एकत्रित फलश्रुती होती. तिच्यासारख्या नेहमी विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणाऱ्या व्यक्तीसाठी हे पद म्हणजे 'लाईफ अचिव्हमेंट'च होती. असे असले तरी तिला एक गोष्ट नेहमी खटकायची. विद्यार्थ्यांना शिस्त आणि चांगले वळण लावणारी मुख्याध्यापिका घरी आई असूनसुद्धा आपल्या मुलीला वेळीच शिस्त आणि चांगले वळण लावू शकली नव्हती. याचा अर्थ असा नव्हता की, रोहिणी दुर्वर्तनी होती. पण तिचा हेकेखोरपणा अनेकांना त्रस्त करणारा होता. तिला एखादी वस्तू हवी असली किंवा एखादी गोष्ट तिच्या मनासारखी घडायला हवी असेल तर ती घडायलाच हवी. नाहीतर हिचा पारा चढणार आणि त्यामुळे बाकीच्यांची तारांबळ उडणार ! रोहिणीच्या या स्वभावामुळे तिला दोन-तीन नोकऱ्या सोडाव्या लागल्या होत्या. तसंही तिला आई जोपर्यंत नोकरी करते आहे तोपर्यंत नोकरी असण्या-नसण्याने तितकासा फरक पडणार नव्हता. त्यामुळे नोकरी सोडावी लागली तरी ती निश्चित असायची. आईला मात्र तिच्या आयुष्याबद्दल, लग्नाबद्दल थोडी का होईना काळजी वाटायची. म्हणूनच तिने आज रोहिणीला बघायला काही पाहुण्यांना बोलावले होते. रोहिणी लवकरात लवकर मार्गी लागलेली आणि आयुष्यात स्थिरस्थावर झालेली आईला पाहायची होती. त्यासाठीच तिची धावपळ चालू होती.


जेव्हा रोहिणी कामावरून घरी परत आली तेव्हा पाहुणे घरी यायला दोन तास बाकी होते. तरीदेखील आईला सगळी तयारी होईल की नाही याची शंका वाटत होती. तसे बघायला गेले तर आईला अजून एक दिवस तयारीसाठी मिळाला असता तरी तिला तो अपुराच पडला असता. तिने तिच्या मदतीसाठी तिच्या बहिणीला म्हणजेच रोहिणीच्या मावशीला बोलावलं होतं. मावशीला पाहताच रोहिणीचा चेहरा खुलला. पटकन ती मावशीच्या कुशीत शिरली. मग तिचे आईच्या ओरडण्याकडे लक्षच राहिले नाही. मावशीला कडकडून मिठी मारल्यानंतरच तिचे आईच्या बोलण्याकडे लक्ष गेले. आईने तिला लवकरात लवकर फ्रेश होऊन तयार होण्यास सांगितले. रोहिणी 'हो' म्हणाली आणि वॉशरूममध्ये शिरली. जवळजवळ अर्ध्या तासात ती तयार झाली. आईने आज तिच्यासाठी खास साडी विकत घेतली होती. रोहिणी साडी बघून कुरकुर करायला लागली, तसे आईने तिला दटावले. ती म्हणाली," अगं आजपुरती नेस, रोजरोज कुठे नेसतेस तू ? आज पाहुणे येणार आहेत ना तुला बघायला ! पटकन तयार हो !" तयार झाल्यानंतर रोहिणीने आरशात पहिले तर स्वतःशीच म्हणाली," या साडीत मी एवढी पण वाईट दिसत नाहीये ! चॉईस चांगला आहे तसा आईचा !"


नंतर मग घाईगडबडीत वेळ कसा गेला कळलंच नाही. पाहुणे आले. आई आणि मावशीने त्यांचे स्वागत केले. मुलगा आणि त्याचे आईवडील आले होते. मग आईने रोहिणीला सरबताचे ग्लास घेऊन बाहेर पाठवले. रोहिणीला हे सर्व म्हणजे गंमतच वाटत होती. ती मुलग्याकडे पाहून पटकन हसली. ते पाहून मुलगा चकितच झाला. रोहिणी ट्रे आत ठेऊन बाहेर आली आणि पाहुण्यांसमोर सोफ्यावर बसली. तिने मान तर खाली घातली होती पण मध्येमध्ये डोळ्यांच्या कोपऱ्यांतून मुलाकडे पाहत होती. मुलगा दिसायला देखणा होता. रोहिणीला तो पाहताक्षणीच आवडला. पण तिच्या मनात लग्नाबद्दल कोणतेच विचार नव्हते. पाहुण्यांनी देखील रोहिणीला लगेच पसंत केलं. रोहिणीचा स्वभाव सोडला तर तिच्यात नकार देण्यासारखं काहीच कमी नव्हतं आणि स्वभावाचं म्हटलं तर तो त्यांना अजून कळायचं बाकी होता. मुलग्याने काही प्रश्न विचारले, शिक्षणाबद्दल, नोकरीबद्दल, आवडी-निवडी, वगैरे. आईने पाहुणे यायच्या अगोदर रोहिणीला काही सूचना दिल्या होत्या. त्या सुचनांनुसार रोहिणीने त्या प्रश्नांची उत्तरे दिली. मग रोहिणी आत गेली. मुलग्याने देखील त्याचा होकार सांगितला आणि थोड्याच वेळात ते तिघेजण निघाले.


दरवाजा बंद करताच आई आणि मावशी आनंदाने ओरडल्या आणि त्यांनी एकमेकांना टाळी दिली. आवाज ऐकून रोहिणी बाहेर आली आणि म्हणाली," अगं ओरडताय काय अशा लहान मुलींसारख्या ? (मावशीकडे वळून) आणि मावशी, हे सगळे दागिने काढायला मला मदत करना !" मावशी तिचे दागिने उतरवायला लागली. मध्येच रोहिणीने आईला विचारलं," अगं आई, तो मुलगा काय म्हणाला गं ? त्याला आवडले का मी ?" आईने एकदा मावशीकडे बघितले आणि म्हणाली," अगं.....तो.....नाही म्हणाला !" रोहिणीने पहिलं आईकडे आश्चर्याने पाहिलं आणि नंतर मावशीकडे. मग ती आईला म्हणाली," काय ? तो नाही म्हणाला ? अगं पण का ? मी छान नव्हते का दिसत ? (मावशीकडे वळून) मावशी, तू सांग ना, मी छान नव्हते का दिसत ? सांग ना !" आई तिची समजूत घालत," हो गं माझी बाय, तू छानच दिसत होतीस, आता त्यांनाच तू नाही आवडलीस तर त्याला आपण तरी काय करणार ?" रोहिणी पाय आपटत म्हणाली," ए, असं थोडी ना असतं ? मला आवडला ना तो, मग त्याला पण मी आवडली पाहिजे ना ? ही काय फालतूगिरी आहे ?" मावशी आश्चर्याने तिच्याकडे बघत म्हणाली," काय म्हणालीस ? तुला आवडला होता तो ?" रोहिणी पटकन बोलून गेली," हो ना गं !(आईकडे वळून) आई, त्यांना परत नाही का बोलवता येणार ? " आई आणि मावशी हे ऐकून हसू लागल्या. आई हसतच म्हणाली," अगं, ते परत येणारच आहेत ! न येऊन कसं चालेल ?" रोहिणी खुश होऊन," म्हणजे.... आई तू त्यांना आधीच परत एकदा बोलावलंस ? लव्ह यू आई ! मी यावेळी अजून चांगली दिसेन ! अजून छान साडी नेसेन ! हवं तर अजून एक नवीन भारीवाली साडी विकत घेऊया आपण ! की डायरेक्ट काय म्हणतात त्या साडीला..... नऊवारी की काय ते, ती नेसू ? मग तर आवडेना ना मी त्यांना ? बोल ना आई ! पण नक्की परत येणार आहेत ना ते ? की तुम्ही दोघी फसवत आहेत मला ?" आई मावशीकडे पाहत म्हणाली," हो गं माझी बाय, ते जर परत नाही आले तर लग्नाची बोलणी कशी करता येईल ?" रोहिणी आश्चर्याने," क्काय ? लग्नाची बोलणी ? म्हणजे ? कळलं नाही मला !" हे ऐकून आई आणि मावशी दोघीही परत हसायला लागल्या. रोहिणी आळीपाळीने दोघींकडे आश्चर्याने बघत," तुम्ही दोघी हसताय का ?" मावशी हसत-हसत तिला म्हणाली," अगं, त्या मुलाने पण तुला पसंत केलंय ! आता आमची रोहिणी नवरी होणार बरं का !" हे ऐकून रोहिणीचा आनंद गगनात मावेनासा झाला. ती लटक्या रागाने आईला म्हणाली," आई, मग तू माझ्याशी खोटं का बोललीस ? (मावशीकडे वळून) आणि मावशी तू सुद्धा ?" मावशी हसतच," मग काय ! नाहीतर आम्हाला कसं कळलं असतं की तुलापण तो मुलगा आवडलाय ते ? आम्ही कसं तुझ्या इच्छेविरुद्ध तुझं लग्न लावून देणार ? (आईला) हो की नाही गं सविता ?" यावर रोहिणी लाजली. आई आश्चर्याने रोहिणीकडे पाहत," अगो बाई, तुला लाजता पण येतं ?" रोहिणी "इश्श्य !" म्हणाली आणि आत पळाली. हे बघून आई आणि मावशी परत हसू लागल्या.


हळूहळू लग्नाची सगळी बोलणी झाली. मुलाचं नाव 'राकेश' होतं. त्यांचा टू बीएचकेचा फ्लॅट होता. अगदीच श्रीमंत नसले तरी बऱ्यापैकी खाऊनपिऊन सुखी मंडळी होती. आईला तर रोहिणीसाठी चांगलं संस्कारी कुटुंबच हवं होतं. तिनेच सगळी बोलणी केली. नाही म्हणायला मावशी होतीच तिच्या सोबत ! लग्न व्यवस्थित पार पडलं. दोन्ही पक्षांनी यथाशक्ती खर्च केला. रोहिणी खूप खुश होती. लग्नात मध्ये-मध्ये राकेशशी बोलताना दिसत होती. त्यांना बोलताना बघून आई मावशीला म्हणाली," काय छान जोडा दिसतोय ना या दोघांचा ?" मावशी," हो ना ! अगदी लक्ष्मी-नारायणासारखा दिसतोय ! नजर लागेल असा !" आईला सोडून सासरी जाताना रोहिणी खूप रडली. मावशीलापण अश्रू थांबवता आले नाहीत. नवी नवरी देशमुखांच्या घरात आली. (क्रमशः)


Rate this content
Log in