ONKAR GOTHANKAR

Drama Tragedy Others

4.5  

ONKAR GOTHANKAR

Drama Tragedy Others

कुंभमेळा (प्रकरण - २)

कुंभमेळा (प्रकरण - २)

12 mins
196


प्रकरण २



एखाद्या लहान मुलाला खेळणं हवं आणि ते त्याला न मागताच मिळावं अगदी तस्सं रोहिणीचं झालं होतं. राकेश आदर्श नवरा होता. तो रोहिणीची खूप काळजी घ्यायचा. रोहिणीपण आपल्या सर्व इच्छा मनसोक्तपणे पुरवून घ्यायची. अखेर नव्याची नवलाई संपली. नव्या सुनेचं कौतुक म्हणून सासूबाई रोहिणीला सकाळी चहा आणून द्यायच्या. त्यांना वाटायचं की हे काम रोहिणीने करायला पाहिजे. पण पहिले काही दिवस त्या काही बोलल्या नाहीत. रोहिणीला घरातली कोणतीच कामे जमायची नाहीत. सासूबाईच हळूहळू सगळी कामे उरकायच्या. रोहिणी सुरुवातीला कामाला जायची. नंतर तिला नोकरीचा कंटाळा आला तसा तिने नोकरी सोडून दिली. ती राकेशला म्हणाली," मी आता नोकरी नाही करणार ! घरीच बसून काहीतरी करेन !"


देशमुख कुटुंब उच्चभ्रू वसाहतीत राहत होतं. हळूहळू तिथल्या बायकांशी रोहिणीचं सूत जुळलं. मध्येच कोणीतरी कल्पना आणली की विणकाम शिकूया ! झालं ! नव्या उपक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीला सगळ्याजणी अगदी मन लावून विणकाम शिकायच्या. नंतर-नंतर रोहिणीसकट सगळ्यांचाच उत्साह मावळत गेला. सगळ्याजणी मग फक्त गप्पा मारण्यासाठी आणि इकडंतिकडचं 'गॉसिप' करायला जमू लागल्या. त्यांचं ठरलेलं असायचं, एका आठवड्यात हिच्या घरी तर पुढच्या आठवड्यात दुसरीच्या ! जेव्हा रोहिणीच्या घरी सगळ्या जमल्या होत्या तेव्हा रोहिणीच्या सासूबाई थोड्या आजारी होत्या. आत बेडरूममध्ये थोडा आराम करत होत्या. मध्येच रोहिणीच्या मैत्रिणींपैकी एकीने खाण्यापिण्याविषयी विचारलं तेव्हा रोहिणी म्हणाली," थांब आणते मी !" लगेच दुसरीने रोहिणीला थांबवलं आणि म्हणाली," तू कशाला जातेयस ? तुझ्या त्या मोलकरणीला बोलव ना घेऊन !" रोहिणी गोंधळून म्हणाली," माझी मोलकरीण ? कोण गं ? आमच्याकडे थोडी ना कोणती मोलकरीण आहे ?" त्यावर पहिली म्हणाली," अगं तीच गं...., तुझी सासू !" रोहिणी हे ऐकून थोडीशी रागावली आणि म्हणाली," ए, तोंड सांभाळून बोल ! असं काय पण काय बोलतेस ? सासूबाई आहेत त्या माझ्या !" दुसरी म्हणाली," सासूबाईच आहेत ना ! आई नाही ना ? मग ?" त्यावर तिसरी रोहिणीला बोलली," ए तू घाबरतेस बोल ना तिला !" रोहिणी तिच्याकडे वळून म्हणाली," ए मी काही घाबरत नाही हा कोणाला ! त्या थोड्या आजारी आहेत म्हणून !" तिसरी थोड्या नाटकीपणाने," एवढं काय बरं झालंय 'तुझ्या' सासूबाईंना ?" रोहिणी उत्तरली," थोडा सर्दी-ताप आहे !" दुसरी म्हणाली," एवढंच ना ! मग त्यात काय एवढं ? आणू शकतात त्या ! बोलव पटकन ! खूप भूक लागलीय आम्हाला !" रोहिणी म्हणाली," थांबा ना, मी आले पटकन घेऊन ! कशाला त्यांना उगाच त्रास ?" त्यावर पहिली म्हणाली," आता तर बोलवच, नाही तर आम्ही समजू की तू तिला घाबरतेस ! (बाकीच्या बायकांकडे वळून) हो की नाही ?" सगळ्या जणी," हो, हो ! आम्ही पण हेच समजू !" रोहिणीने थोडा विचार केला. तसंही तिला तिथून उठण्याचा कंटाळा आला होता. ती त्या बायकांना म्हणाली," ठीक आहे ! बोलावते मी !" दुसरी रोहिणीला टाळी देत," ये हुई ना बात ! अगं या सासवा असतात ना त्या खूप नाटकी असतात ! आजारी पडायची नाटकं करतात ! मग तुझ्यासारख्या साध्याभोळ्या सुना त्यांची सेवा करतात आणि त्या मस्तपैकी बेडवर आराम करतात !" सगळ्याजणी," हो ! हो ! अगदी बरोबर !" म्हणाल्या. रोहिणी त्यांना शांत करत म्हणाली," ठीक आहे ! ठीक आहे ! मी बोलवते लगेच !" मग तिने सासूबाईला हाक मारली," आई !" आतल्या खोलीतून काही प्रतिसाद आला नाही. पहिली लगेच म्हणाली," नाटक करतेय बघ !" रोहिणीने परत एकदा हाक मारली," आई !" तेव्हा मात्र आतून आवाज आला. अस्पष्ट अशा आवाजात सासूबाई " अं....काय झालं रोहिणी ?" म्हणाल्या. रोहिणी लगेच म्हणाली," आम्हाला जरा खायला आणता का ?" सासूबाई," अगं....., मला जरा बरं वाटत नाहीये गं !" पहिली परत म्हणाली," नाटकं आहेत गं सगळी ! काही नाही झालं असणार तिला !" ते ऐकून रोहिणी परत म्हणाली," जरा आणून दया ना, मी जरा 'बिझी' आहे थोडीशी !" सासूबाई कशाबशा आधार घेत उठल्या, किचनमध्ये गेल्या, प्लेट भरली आणि मग हळूहळू भिंतीचा आधार घेतघेत हॉलमध्ये रोहिणी बसली होती तिथे आल्या. रोहिणीला बायकांबरोबर गप्पा मारताना बघून त्यांना खूप राग आला आणि त्या म्हणाल्या, "रोहिणी, तू तर म्हणालीस की तू बिझी आहेस म्हणून ! अशी बिझी आहेस का तू ? इथे मी आजारी आहे आणि तू.... इथे टवाळक्या करत बसली आहेस ?" सगळ्या बायकांनी हळूहळू काढता पाय घेतला. रोहिणीला सासूबाई आपल्याला सर्वांसमोर बोलल्या यात स्वतःचा अपमान वाटला. सासूबाई आराम करायला परत बेडरूममध्ये गेल्या तेव्हा रोहिणी रडायला लागली.


राकेश घरी परतेपर्यंत रोहिणी गॅलरीत तशीच विमनस्क चेहऱ्याने बसून राहिली होती. राकेशने आल्यावर पाहिलं की रोहिणी आज गप्पपणे गॅलरीत बसून आहे. तो तिच्याजवळ गेला आणि तिची हनुवटी वर उचलून म्हणाला," रोहिणी, काय झालं गं ? अशी का बसली आहेस इथे गप्प-गप्प ?" रोहिणीने राकेशकडे पाहिले पण काहीच उत्तर दिले नाही. तिने मान परत खाली घातली. राकेशने परत हनुवटी उचलून विचारलं," काय झालंय सांगशील का ? तू सांगितल्याशिवाय कसं कळेल मला ? कोणी काही बोललं का तुला ?" तेव्हा रोहिणी म्हणाली,"तुझ्या आईलाच जाऊन विचार जा !" राकेश बेडरूममध्ये गेला तर आई अजून झोपली होती. त्याने तिला उठवून विचारलं," आई, काय झालं गं ? काही बोललीस का गं तू रोहिणीला ?" आई काहीच बोलली नाही. राकेश पुढे म्हणाला," काय झालं आई ? तू काही बोलता का नाहीस ? आजारी आहेस का ?" मग त्याने आईच्या डोक्याला हात लावून बघितलं तर थोडासा ताप होता. राकेश लगेच थंड पाणी आणि एक कपडा घेऊन आला आणि आईच्या कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवू लागला. थोड्या वेळाने पट्टी बदलता-बदलता त्याने आईला विचारलं," तू रोहिणीला काही बोललीस काय गं ? ती गॅलरीत गप्पपणे बसलीय ! विचारायला गेलो तर म्हणाली," आईला जाऊन विचार !" त्यावर आई म्हणाली," तुझी बायको ना काहीच कामाची नाहीये ! घरात तर काही काम करत नाहीच, वर सोसायटीतल्या तीन-चार बायकांना गोळा करून गप्पा झोडत बसते. इथे मी आजारी आहे आणि ती मला म्हणते कशी, खायला घेऊन या ! मी म्हटलं तिला की मला बरं वाटत नाहीये तर म्हणाली की मी 'बिझी' आहे थोडीशी ! मला वाटलं की खरंच काहीतरी काम करत असेल म्हणून मी उठले कशीबशी आणि घेऊन गेले तिच्यासाठी तर ही बया त्या बायकांबरोबर मस्तपैकी आरामात गप्पा मारत बसली होती. मग सुनावलं मी तिला की इथे मी आजारी आहे आणि तरी तू मला अशा अवस्थेत मला बोलावलंस ! मग आता मला सांग मी यात काय चुकीचं बोलले ?" राकेश लगेच म्हणाला," आई, थांब हा मी आलो जरा !" आणि बाहेर गॅलरीजवळ आला.


रोहिणी अजून तिथेच बसून होती. राकेश तिच्याजवळ गेला आणि म्हणाला," काय गं, तुला आई आजारी आहे हे माहित नव्हतं का ? आणि तू काय एवढी बिझी होतीस काय गं, स्वतः उठून घ्यायचंस ना खायला !" रोहिणी," तू पण आता मलाच बोल ! मला माहित होतं का आई आजारी आहेत ते ! आणि मी जरा सोसायटीतल्या बायकांशी शिवणकामाबद्दल बोलत होते, म्हणून बोलावलं ! त्यात माझं काय चुकलं? मला माहित असतं तर मी बोलले असते का ?" राकेश हे ऐकून विचारात पडला. रोहिणी खोटं बोलत असली तरी त्यामागची सत्यपरिस्थिती त्याला माहित नव्हती. त्यामुळे तिचे म्हणणे त्याला पटले. तो म्हणाला," ठीक आहे. तुला माहित नव्हतं. पण पुढच्या वेळी अशी चूक करू नकोस !" रोहिणीला राकेश एवढ्या लगेच शांत होईल असे वाटले नव्हते. ती खुश झाली. तिला सासूबाईंचा खूप राग आला होता. त्या तिला सर्वांसमोर ओरडल्या होत्या. राकेश परत बेडरूममध्ये आईजवळ गेला. आत जाऊन तो आईला म्हणाला," अगं आई, तिला माहित नव्हतं गं की आजारी आहेस ते ! नाहीतर आली असती गं ती ! आणि ती त्या बायकांशी शिवणकामाबद्दल बोलत होती, टवाळक्या नव्हती करत !" आई सुनेने आपल्या मुलाला कशा पद्धतीने पढवून पाठवले आहे हे पाहून हतबुद्धच झाली. पण तिच्या अंगात तेवढी ताकद नसल्याने ती फक्त 'हम्म' म्हणाली आणि मान फिरवून परत झोपली. राकेश थोडा वेळ तिचे डोके चेपत बसला.


त्या घटनेपासून सर्व बायका रोहिणीचं घर सोडून इतरजणींच्या घरी जमायला लागल्या. इथे आईने राकेशला सांगितलं की, रोहिणी घरातील कोणतीच कामं करत नाही. सगळी कामं त्यांनाच करावी लागतात. राकेशला या गोष्टीबद्दल वाईट वाटले. त्याने या गोष्टीबाबत रोहिणीला विचारले असता रोहिणी खांदे उडवून म्हणाली," मी आईकडे असतानापण कामं नाही करायची. मग इथे आल्यावर कशी करू ?" राकेश थोडा आवाज चढवून म्हणाला," याचा अर्थ ही कामं आईने करायची का ?" रोहिणीने राकेशच्या रागरंग पाहून चटकन आपला पवित्रा बदलला आणि म्हणाली," मी असं म्हणत नाहीये. पण मला जे जमतच नाही ते मी कसं काय करणार तूच सांग ?" रोहन," मग शिकून घे ना ! आई शिकवेल तुला सगळी कामं !" रोहिणीने सासूबाईंचा उल्लेख ऐकताच तोंड वेंगाडलं आणि म्हणाली," त्यापेक्षा आपण मोलकरीण ठेवूयात ना ! आमच्या घरी पण होती मोलकरीण !" राकेशने थोडा विचार केला आणि त्याने या कल्पनेला संमती दिली. गेले काही दिवस त्याला जाणवत होतं की सासूसुनेमध्ये सारखी धुसफूस चालू आहे. पण जोपर्यंत त्याला कोणाची बाजू योग्य हे कळत नव्हते तोपर्यंत तो काहीच करू शकत नव्हता.


राकेश जेव्हा कामावरून घरी येई तेव्हा दोघीजणी राकेशजवळ एकमेकांची तक्रार घेऊन येत. रोजरोज त्याच तक्रारी त्याही दिवसभर कामाने थकून आल्यावर ऐकणे राकेशला खूप त्रासदायक वाटायचे. त्यातल्या त्यात आई थोडी त्रासून तक्रार करायची तर रोहिणी थोडी लाडीकपणे तक्रार करायची. त्यामुळे राकेशचा ओढा आईपेक्षा रोहिणीकडे वाढू लागला. रोहिणीने राकेशचा आपल्याकडे वाढत चाललेला कल ओळखला आणि त्यानुसार आपल्या वागण्यात बदल केला. ती तेव्हापासून फक्त तक्रार न करता लाडाने त्याच्याशी बोलू लागली. त्याचं मन न दुखवता त्याच्या मर्जीने वागू लागली. दिवसभर राकेश घराबाहेर असताना ती सासूवर दादागिरी करायची आणि राकेश घरी आल्यावर सासूबाईंची अगदी खूप काळजी असल्यासारखी वागायची. राकेशला त्यामुळे खरी बाजू कळतच नव्हती.


काही महिन्यांनी रोहनच्या बाबांना पक्षाघाताचा झटका आला. त्यामुळे त्यांना नोकरी सोडावी लागली आणि ते अंथरुणाला खिळले. सासूबाई नेहमी त्यांची देखभाल करत बसायच्या. त्याच्यातच त्यांचा दिवस जायचा. त्यातच रोहिणी बाळंत झाली. मुलगा झाला. मुलाचं नाव 'जयेश' ठेवण्यात आलं. राकेशचा पगार चांगला होता. पण घरात खाणारी तोंडं पाच आणि कमावणारा एक अशी परिस्थिती निर्माण झाली. राकेशचा पगार तरीदेखील पुरून उरला असता पण रोहिणीचे वायफळ खर्च थांबण्याचे नावच घेत नव्हते. तिच्या माहेरी तिची आई आणि ती दोघीच जणी होत्या. त्यामुळे रोहिणीने कितीही उधळपट्टी केली तरी चालून जायचे. मात्र इथे अगदी उलट परिस्थिती होती. सध्या देशमुखांना पैसे खर्च करताना भविष्याचा विचार करायला लागायचा. जसजसा जयेशचा खर्च वाढू लागला तसतसा राकेशवरील ताण वाढला. मग त्याने मोलकरणीला कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय ऐकून रोहिणी बिथरली. ती म्हणाली," मोलकरणीला काढलं तर मग घरातली कामं कोण करणार ? तुझे ते म्हातारा-म्हातारी ?" आता राकेशला अशा शब्दांचे काहीच वाटत नसे. तो पूर्णपणे रोहिणीच्या अधीन झाला होता. तिला दुखावणे त्याला आता जीवावर यायचे. आईवडिलांशीही तो फार कमी बोलायचं. फक्त तो, रोहिणी आणि जयेश ! अजून कोणी तरी घरात राहतं हेच तो विसरून गेला होता. त्यामुळे तो अडखळत म्हणाला," तू थोडंसं काम शिकून घे ना प्लीज ! पगार नाही ग पुरत माझा ! जयेशचा खर्चपण वाढत चाललाय आता !" रोहिणी हे ऐकून भडकली आणि उसळून म्हणाली," खबरदार, जर माझ्या जयेशचं नाव घेशील तर ! तुझे आई-बाबा बघ कसे आयतोबासारखे गिळताहेत ते ! त्यांना जाऊन बोल जा हे सगळं ! मग निदान लाज तरी वाटेल त्यांना फुकटचं गिळायची !" राकेश काकुळतीला येऊन," अगं, असं रागवते कशाला पटकन ? बघू आपण काहीतरी !" रोहिणी थांबायचं नाव घेत नव्हती. ती म्हणाली," ते काही नाही ! मोलकरीण राहणारच ! तुला हवं ना तर तुझ्या आईबाबांना घराबाहेर काढ !" राकेश परत काकुळतीच्या स्वरात," अगं लोक काय म्हणतील ?" रोहिणी अजून रागात," तू काढतो आहेस की मी काढू त्यांना घराबाहेर ? सांग !" राकेश हात जोडून," अगं बाई, मी बघतो काहीतरी ! नाही काढत मोलकरणीला ! बस्स ?" आणि घराबाहेर पडला.


रोहिणीला त्याचक्षणी जाणवले की राकेशला त्याच्या आईबाबांची काहीच पडलेली नाहीये. तर मग मी तरी का म्हणून त्यांचा पुळका ठेवू ? आता काही ना काही करून या दोघा म्हाताराम्हातारीला घराबाहेर काढलं पाहिजे ! मग या घरात फक्त आम्हीच तिघं ! दोघं राजाराणी आणि आमचा राजकुमार !" या विचारावर ती स्वतःशीच हसली. पण दुसऱ्याच क्षणी तिला प्रश्न पडला की त्यांना घराबाहेर काढायचं तरी कसं ? हा विचार करत ती फेऱ्या मारत असताना तिची नजर आतल्या खोलीत पडली. जयेश आतमध्ये आजी-आजोबांबरोबर बसला होता आणि गप्पा मारत होता. रोहिणीला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती की, जयेशची त्याच्या आजी-आजोबांशी चांगलीच गट्टी जमली आहे. तो शाळेतून आल्या-आल्या आधी त्यांच्या खोलीत जायचा. त्याची आजीदेखील त्याला मांडीवर बसवायची आणि वेगवेगळ्या गोष्टी सांगायची. जयेश हे सगळं नंतर रोहिणीला येऊन सांगायचा. जयेशने एकदा असाच रोहिणीला विचारलं होतं," आई, तू आजी आणि आजोबांशी बोलत का नाहीस गं ?" रोहिणीला काही क्षण काय उत्तर द्यावे हेच कळेना. थोडा विचार करून मग ती म्हणाली," तुझी आजी ना खूप वाईट आहे. ती माझ्याशी खूप वाईट वागते." जयेश निरागसतेने," असं कसं ? माझ्याशी तर खूप चांगली वागते. गोष्ट सांगते, खाऊ देते." रोहिणी गडबडीने म्हणाली," ते मला नाही माहित, पण तू त्यांच्याकडे जात जाऊ नकोस ! कळलं ?" जयेश," का ? मी जाणार !" रोहिणी रागाने," तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ?" जयेश पाय आपटत म्हणाला," मी जाणार म्हणजे जाणारच !" रोहिणीने त्याच्या थोबाडीत मारली. जयेशने भोकाड पसरले. त्याचा आवाज ऐकून आजी बाहेर आली. ती जयेशजवळ जाणार एवढ्यात रोहिणी त्यांना म्हणाली," अजिबात जवळ जाऊ नका त्याच्या ! लांब राहा ! कृपा करून आमच्या कुटुंबापासून लांब राहा ! प्लीज !" आजी हे उद्गार ऐकून आल्यापावली मागे फिरली. जयेशला त्या खोलीत पाहून रोहिणीला हा प्रसंग चटकन आठवला आणि ती तडक खोलीत शिरली. खोलीत शिरून तिने जयेशचा हात धरला आणि सासूबाईंना म्हणाली," तुम्हाला मी मागेच बोलली होती ना की आमच्या कुटुंबापासून लांब राहा ? मग तरीसुद्धा असं का वागता ? कळत नाही का तुम्हाला एकदा सांगितलेलं ?" मग तिने जयेशला खेचतच बाहेर नेले. पुढचे कितीतरी दिवस तिच्या डोक्यात सासूसासऱ्यांना घराबाहेर काढण्याचा विचारच रुंजी घालत होता.


एके दिवशी ती जयेशला शाळेत सोडून घरी आली आणि टीव्ही पाहत बसली. चॅनेल बदलत असताना मध्येच एका न्यूज चॅनेलने तिचे लक्ष वेधले. त्यावर कुंभमेळ्याची माहिती देत होते. येत्या महिन्याभरात नाशिकला कुंभमेळा भरणार होता. कुंभमेळ्याची सगळी माहिती सांगून झाल्यानंतर त्या चॅनेलवर कुंभमेळ्यात घडणाऱ्या दुर्घटनांची माहिती सांगत होते. न्यूज अँकर सांगत होती की, कुंभमेळ्यात माणसे हरवणे, चेंगराचेंगरी होणे या गोष्टी मोठ्या प्रमाणावर घडतात. शिवाय हरवणाऱ्या माणसांमध्ये म्हाताऱ्या माणसांचे प्रमाण जास्त होते. धक्कादायक गोष्ट ही होती की ह्यांतील बहुतेकांना त्यांच्याच मुलांनी सोडलेले असते. ही बातमी ऐकून रोहिणीच्या डोक्यात एक कल्पना आली. तिने विचार केला की, आम्ही दोघांनी ह्या दोघा म्हाताराम्हातारीला कुंभमेळ्यात नेऊन सोडले तर ? लोकांना सांगता येईल की, गर्दीत हरवले ! फुकटची ब्याद जाईल आमच्या मागून मग ! हा, असंच करूया !" पण दुसऱ्याच क्षणी तिच्या लक्षात आले की, तिचे सासरे तर अर्धांगवायूमुळे हिंडूफिरूही शकत नाहीत. मग त्यांना कुंभमेळ्यात कसं नेणार ? तिचं डोकं आज खूपच भराभर चालत होतं ! तिने ठरवलं की राकेशला सांगून चांगली औषधं मागवूया. ते थोडे हिंडतेफिरते झाले तरी चालेल. ठरलं तर ! आता फक्त राकेशला पटवायचंय ! रोहिणी ती बातमी परत बघायला लागली.


त्या बातमीमध्ये कुंभमेळ्याची तारीख, अपेक्षित जमावसंख्या, तिकडच्या सोयीसुविधा याबद्दल माहिती दिली होती. तिने मग या कल्पनेवर खूप विचार केला. जयेश खेळायला गेला होता. संध्याकाळी राकेश कामावरून घरी आला. तेव्हा रोहिणी त्याच्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन आली. ते बघून राकेशला खूप बरे वाटले. त्यानंतर रोहिणीने त्याला सांगितले की," बाबांसाठी चांगली औषधं आण !" राकेश," का ? काय झालं गं ?" रोहिणी थोडी घुटमळत," नाही, या औषधांनी तितकासा फरक पडत नाहीये ! म्हणून म्हटलं !" राकेश," ठीक आहे, आणतो मी !" दुसऱ्या दिवशी राकेशने नवीन औषधं आणली. रोहिणीने ती स्वतः सासूबाईंना नेऊन दिली आणि सासरेबुवांना म्हणाली," लवकर बरे व्हा !" ते बिचारे दोघेजण सूनबाईमधला हा आकस्मिक बदल बघून चकित झाले, पण काहीच बोलले नाहीत. न जाणो, कधी बुद्धी फिरली तर घराबाहेर काढायची ! त्याच आठवड्यात एका रात्री जेवण झाल्यानंतर रोहिणी आणि राकेश फिरायला बाहेर गेले होते. तेव्हा रोहिणीने तो विषय काढायचे ठरवले. ती राकेशला म्हणाली," ऐकलं का ?" राकेश," बोल, काय म्हणतेस ?" रोहिणी," आपण आईबाबांना कुंभमेळ्यात सोडून येऊया काय ?" राकेश आश्चर्यमिश्रित रागाने," क्काय ? शुद्धीत आहेस ना ? काय बरळते आहेस कळतंय का तुला ?" रोहिणी," हो ! मी शुद्धीतच आहे आणि पूर्ण विचार करूनच बोलतेय ! मागे का तूच नाही बोलला होतास त्यांना घराबाहेर काढायचं म्हणून ?" राकेश आश्चर्यचकित होऊन," मी ? मी असं म्हणालो होतो आईबाबांबद्दल ?" रोहिणी," तूच म्हणाला होतास ना की, लोक काय म्हणतील असं ! इथे लोकांना कळणार पण नाही की ते दोघे हरवले आहेत की आपण सोडून आलो ते !" राकेश," कदाचित म्हणालो असेन पण माझ्या बोलण्याचा अर्थ तो नव्हता !" रोहिणी रागाने," अर्थ काहीही असूंदे, त्यांना कुंभमेळ्यात सोडून यायचं म्हणजे यायचं ! कळलं ?" राकेश थोडासा आवाज चढवून," रोहिणी, तू नको तो हट्ट नको करूस, कळलं ?" रोहिणी रुसून," तुला हट्ट समजायचाय की अजून काही ते समज ! पण तू त्यांना सोडून यायला तयार नाही झालास तर मी जयेशला घेऊन माहेरी निघून जाईन ! समजलं ? मग तू त्या दोघं म्हाताराम्हातारीचे पाय धू आणि पाणी पी रोज !" आणि ती फणकाऱ्याने तिथून निघाली. राकेश धावतच तिच्या पाठीमागे गेला आणि हात जोडून म्हणाला," तुझ्या हात जोडतो, माझी आई ! आपण करूया तसं, पण तू असलं काही करू नकोस !" रोहिणी लगेच आनंदित होऊन म्हणाली," आता कसं बोललास ! (राकेशकडे रोखून पाहत) पण मला एक सांग, तुला पण ते दोघे नकोच आहेत ना, मग आधी टाळाटाळ कशाला करत होतास ?" राकेश," आता काय बोलू मी तुला ? ........जाऊंदे !" मग घरी येईपर्यंत रोहिणी राकेशला आपल्या मनातील कल्पना समजावून देत होती आणि राकेश काहीही न बोलता ती निमूटपणे ऐकून घेत होता. (क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama