RohiniNalage Pawar

Inspirational

4.2  

RohiniNalage Pawar

Inspirational

कृष्णाई

कृष्णाई

3 mins
870


एका मध्यमवर्गीय कुटुंबातील ही गोष्ट आहे. फार श्रीमंतीही नाही आणि खूप गरिबीही नाही. स्वतः कष्ट करून दोन वेळेचं जेवण करून आनंदाने राहणारे हे चार माणसांचं कुटुंब... पती, पत्नी (राहुल, नीलम) आणि राहुलचे आई-वडील.

राहुल आणि नीलमच्या लग्नाला आता 8वर्षे पूर्ण झालेली. पण घरात रांगणारं, बागडणार कोणीही अजून त्यांच्या कुटुंबात आलेलं नव्हतं... पण या वर्षी येणार होतं... आज लोकांची अपेक्षा असते आपल्याला वंशाला मुलगा हवा, मुलगी नको. पण अशी काहीच त्यांची अपेक्षा नव्हती... काहीही असो फक्त ते असणं ही गोष्टच त्यांच्यासाठी खूप मोठी होती.


अखेर तो दिवस उजाडला, आणि नीलमच्या पोटी एका मुलीचा जन्म झाला. घरात सगळ्यांना खूप आनंद झाला. जणू लक्ष्मी घरात आली, आठवा जसा 'कृष्ण' जन्मला होता तसं त्यांना 8 वर्षांनी झालेल्या मुलीचं नाव 'कृष्णाई' ठेवलं... कृष्णाईच्या जन्मानंतर काही वर्षांनीच म्हणजे 5 वर्षांनीचं नीलम हे जग सोडून अचानक गेली, जिथे मुलीला आईची सगळ्यात जास्त गरज असते, तिथेच नीलम कृष्णाईला सोडून गेली... तिचं ममतेचं छत्रं हरवलं... राहुल एक वडील म्हणून काय करणार होता पण तरीही वडिलांच्या रूपाने आई आणि वडील दोघांची जबाबदारी त्याने पार पाडली... तिला जसं कळायला लागलं तसा तिला फक्त राहुलच आठवायला लागला, आईची म्हणावी तशी कमी तिला कधी भासली नाही, आणि राहुलनेही ती कधी भासू दिली नाही.


वडिलांच्या सावलीखाली कृष्णाई मोठी झाली, तिचं शिक्षण अखेर शेवटच्या टप्प्यात आलं. आता मात्र राहुलची काळजी अजून वाढत चालली होती, कृष्णाईचं लग्न या विषयाने त्याचा पिच्छा पुरवला. कृष्णाई तशी हुशार होती म्हणून तिचं पदव्युत्तर शिक्षण तिच्या स्कॉलरशीपमधूनचं झालं, म्हणून राहुलला मुलगी ही ओझं आहे, तिचा खूप खर्च असतो असं कधी वाटलंच नाही. पण आता लग्न म्हटल्यावर त्याचंही मन त्याला खायला उठायला लागलं.


कृष्णाई पदवीद्धर झाली आणि स्पर्धा परीक्षा देऊ लागली. चढउतार येत अखेर तिने तिला हवं ते मिळवलं आणि ती जिल्हाधिकारी झाली. एक मुलगी म्हणून तिने तिचं आणि घराचं कधी शक्य न वाटणारं स्वप्न सत्यात उतरवलं. तिच्या आणि राहुलच्या जमापुंजीत तिचं लग्नही थाटामाटात पार पडलं. ती आता एका मोठ्या घरची सून आणि जिल्हाधिकारी म्हणून ख्यातीस आली.


लग्नानंतर खूप दिवसांनी राहुलला वाटलं तिला भेटावं म्हणून तिच्या कार्यालयात आजपर्यंत न गेलेल्या राहुलने आज पहिल्यांदा तिच्या कार्यालयात पाऊल ठेवले. एवढं सगळं पाहून त्याचं मन अगदी गहिवरून आलं, मुलीपाशी जाऊन उभा राहिला आणि मुलीने मिळवलेल्या कर्तृत्वाची शाबासकी म्हणून तिच्या डोक्यावर आशीर्वादरुपी हात ठेवला, आणि सहज तिला विचारावं वाटलं म्हणून त्याने तिला विचारलं... कृष्णाई तुला आता या क्षणी आसपासच्यांत आणि तुझ्यात सगळ्यात श्रेष्ठ कोण वाटतंय? तिने क्षणाचा विलंब न करता सांगितलं, बाबा... मीच.


राहुलचे डोळे पाणावले, तिच्या त्या उत्तराने त्याला वाटलं की, आजपर्यंत माझी माया, प्रेम, छत्र आणि संस्कार ती आता या ऐशोआरामात विसरून गेली. काहीच न बोलता त्याने तिचा मी येतो म्हणून निरोप घेतला. दारापाशी आला आणि मागे वळून तिला म्हणाला, बाळा... तू खरंच महान आहेस.

कृष्णाई हसली आणि म्हणाली, बाबा मला नाही का विचारणार की मी स्वतःला महान का म्हणाले म्हणून...

राहुल - बाळा तूच तर आहेस...

कृष्णाई - बाबा मी महान कशी असेल, आणि तीही माझ्या आई-बाबांच्या रुपात तुम्ही माझ्यासमोर असताना...

बाबा तुम्ही जेव्हा विचारलं तेव्हा तुमचा हात माझ्या डोक्यावर होता... आणि जेव्हा आपल्या आई-बाबांचा हात एखाद्या मुलीच्या डोक्यावर आशीर्वादरुपी असेल तेव्हा ती मुलगी जगातील महान व्यक्तीच असेल की नाही...

राहुल निःशब्द झाला... आणि नीलमने बाबाला कडकडून मिठी मारली.


बाबा, मी या 21व्या शतकातील जरूर आहे पण इतर मुला-मुलींसारखी नाहीये. मला आपल्या परिस्थितीची जाण करून जे संस्कार तुम्ही केलेत ना ते आजन्म असेच राहतील. एक अधिकारी म्हणून मी महान आहे की नाही मला माहित नाही पण एक मुलगी म्हणून मी तुमच्या संस्कारांनी महान जरूर आहे.


तात्पर्य - व्यक्ती नावाने आणि कर्तृत्वाने कितीही मोठा झाला ना तरी तो त्याच्या संस्कारात मिळालेल्या गुणांनीच ओळखला जातो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational