RohiniNalage Pawar

Others

4.8  

RohiniNalage Pawar

Others

सासरचं आयुष्य

सासरचं आयुष्य

3 mins
3.1K


    असं म्हणतात की,माहेर आणि सासर सारखंच असतं.जसं की एकाच नाण्याच्या दोन बाजू...ठीक आहे.मानलं असं की दोन्ही सारखेच असतात,तिकडे आई वडील असतात तसे इकडे सासू सासरे असतात.भाऊ बहीण असते तस दीर आणि जाव असते...


पण म्हणाऱ्यांसाठी कितीही सासर माहेर एक असलं ना तरी, तरी मुलींसाठी शेवटी सासर हे सासर आणि माहेर हे माहेरचं असतं. ती सासरी तिच्या हक्कच्या एका माणसाच्या विश्वासावर तिकडंच सगळं काही सोडून येते.ती रीतचं आहे हे ही काहीजण ऐकवतात,किंवा मुले नाहीत का बायकोसाठी आई वडिलांना सोडून वेगळे राहतात असंही ऐकायला येत.पण कुठेच कशाची आणि कोणाची कशाचं प्रकारची बरोबरी होऊ शकत नाही.ती सासरी आल्यावर हक्क फक्त नवऱ्यावरच गाजवू शकते.बाकीच्यांवर नाही.वाटेल तेवढी चेष्टा मस्करी ती फक्त त्याच्याबरोबरच करू शकते. बाकीच्यांशी जरी केली तरी त्याला मर्यादा असतात,पण नवऱ्यापाशी मनसोक्तपणे हसता, बोलता, खिदळता,आणि सगळं अनावर झालंच तर रडता ही येतं.


सासरचं प्रत्येक नातं तिला जवळ कराव लागत,आणि आनंदाने करते ही,पण नवऱ्याला तिच्या माहेरच्या जवळच्या नात्याचा काहीच थांगपत्ता नसतो.इकडे प्रत्येक कार्यक्रमाला तिची उपस्थिती महत्त्वाची असते,पण माहेरच्या कार्यक्रमांना मात्र गैरहजेरी असली तरी चालते हो...का तर इकडे आल्यावर तिकडचा जास्त विचार नाही करायचा.तिकडे माणसं आहेत इकडेही आहेत असं बरंच काही बरेच जण ऐकवतात.पण माणसा-माणसामध्ये जो फरक असतो ना तोच सासर आणि माहेर हे वेगळे असतात हे दाखवतो.


इकडे तिची काय इच्छा असते की,तिचा नवरा तिच्या प्रत्येक दुःखात वाटेकरी व्हावा, असं नाही की ती दुःख पेलू शकत नाही,पण माहेरला असताना थोडी ठेच जरी लागली ना तरी तिला लगेच आईला सांगायची सवय असते,मग आता इकडे ठेचा लागल्यावर ती कोणाला सांगणार ना,शेवटी नवऱ्यालाच ना...दररोज काहीतरी घडत असेल तिला दररोज ते सांगावं वाटतं. नवऱ्याने तिचं 'रोजनिशीच' पान व्हावं.फक्त तिचे सगळे शब्द त्यावर उतरून घ्यावेत,आणि वही मिटून ठेवावी, एवढंच जरी केलं ना तरी तिला खूप झालं, तुम्ही तिला समजावा किंवा समजावू नका, तिचं मन एकदा मोकळं झालं ना मग तिची चिडचिड ही कमी होती,आणि बिघडलेली परिस्थितीही निवळते,पण अस घडत नाही,नवरा दिवस भर दमून भागून येतो आणि रात्री ती त्याला सगळं काही सांगायला जाते,पण काही जण असे बोलतात की ..माझ्या डोक्यात माझ्या कामाची गणगण असते त्यात तू तुझं नको ऐकवत जाऊस,मी घरचं पाहू की बाहेरचं, की मी घरीच येऊ नको...तुम्ही हे सगळं सहज बोलून जाता,आणि मग तिला सगळं काही स्वता:मुळे घडतंय अस वाटू लागतं.ती येण्याने तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम सुरू झालेत अस वाटत,तिला तुमचं आधीच आयुष्य माहीत नसतं.ती आताच्या आयुष्यात जागा करू पाहत असते,पण तुम्ही मात्र तुमच्या पहिल्याच आयुष्यात असाल तर तिचा प्रत्येक शब्द तुम्हाला वैताग वाटतो.

अशावेळी तिने काय करायचं हो,तुम्हाला काही हवं असेल किंवा काही झालं असेल तर तुमची आई तिथे हजर असते . पण तीच काय, तुम्ही सोडले तर तीच इकडे हक्कचं कोणीच नसतं.,तिने कोणाला बोलायचं.तिचा आलेला राग तुम्ही इतर कोणावर किंवा कशावर ही काढू शकता, पण तिला अस नाही हो करता येत.कारण ती रेघेला रेघ जोडत असते आणि तुम्ही समांतर चाललेला असता...


तुम्ही स्वतः मध्ये बदल करा ,कामाचा लोड कमी करा किंवा अजून काही,अस मी मुळीच तुम्हाला सांगणार नाही,माझं फक्त एव्हडच म्हणणं आहे की,ती जर काही सांगत असेल तर ते फक्त ऐकून घ्या, कोणाची तक्रार करत असेल तर निवारण करा. तिचं डोकं शांत असेल ना तर तुम्हाला ही तिचा त्रास होणार नाही आणि त्यानंतर तुम्ही जे सांगाल ना ते ही तिला लगेच समजेल.शब्दाला शब्द वाढला ना की तेच शब्द कधी रस्ता बदलतात आपल्यालाच समजत नाही,आणि मग क्षुल्लक शब्दांत वाद निर्माण होतो.Rate this content
Log in