Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

नासा येवतीकर

Tragedy

4.2  

नासा येवतीकर

Tragedy

कळी उमलण्या आधी

कळी उमलण्या आधी

4 mins
1.1K


घरात आज मांगल्याचे स्वरूप आले होते. सारेच जण अगदी आनंदात वावरत होते. फक्त गीताचे वडील पांडुरंगालाभ सोडून. नातेवाईकांना पाहून तो हसण्याचा प्रयत्न करत होता मात्र चिंतेची एक लकेर त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. गीताचा छोटा भाऊ गणेश इकडून तिकडे उड्या मारण्यात व्यस्त होता. त्याला देखील नवा कोरा ड्रेस मिळाला होता त्यामुळे तो जाम खुश होता. घरात आज खूप पाहुणे आले होते आणि त्यांच्या सोबत आलेल्या लहान बच्चे कंपनीमुळे तो खरोखरच आनंदी झाला होता. गीता दीदीला आज नवरी सारखं सजवले होते म्हणून तो अधूनमधून तिला सारखं म्हणत होता, " दीदी आज तुझं लग्न आहे का ? " पण दीदी या प्रश्नाला काहीच उत्तर देत नव्हती. गीताचे आत्या मामा मावशी काका हे सारे पाहुणे रात्रीच आलेले होते तर उर्वरित पाहुणे सकाळी सकाळी उतरले होते. निमित्त होतं, गीता दीदी मोठी झाली होती म्हणजे उपवर झाली होती. ही बातमी गीताच्या आईकडून पहिल्यांदा बाबाला कळाले. मग बाबांनी तसा निरोप पाहुण्यांना कळविले. एक तारीख निश्चित करण्यात आली, कार्यक्रम करण्याचा. गीता ज्यादिवशी उपवर झाली त्यादिवसापासून तिचे बाहेर जाणे बंद करण्यात आले. ती गावातल्याच सातव्या वर्गात शिक्षण घेत होती. तिची शाळा देखील बंद झाली. शाळेतील मॅडम त्यांच्या घरी जाऊन त्यांची भरपूर समजूत काढली पण सारे व्यर्थ ठरले.

घरातील वाडवडील मंडळीनी तिला शाळेत पाठविण्यास नकार दिले. तसं गीताच्या मनात शिकण्याची खूप इच्छा होती मात्र तिच्या इच्छेचा विचार करणारा कोणी नव्हता. मुलगी उपवर झाली की सर्वात जास्त चिंता आणि काळजी मुलीच्या बापाला होत असते. कधी एकदा तिचे हात पिवळं करावं असे त्याला होऊन जाते. त्याला कदाचित कारण ही तसंच असू शकते की, रोजच्या पेपरमधल्या बातम्या वाचल्या की काळजात धस्स करतंय. मुलीचे लग्न होईपर्यंत बापाच्या काळजाला एक घोर लागलेले असते. कमी शिकलेल्या आई-बाबांना तर जरा जास्तच काळजी वाटायाला लागते. उपवर झालेल्या मुलीकडे गल्लीतले पोरं ही वाईट नजरेने पाहत असतात. गीताच्या बाबतीत ही तेच घडू नये म्हणून पांडुरंग काळजी करत होता. कार्यक्रमात खूप पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळी आली होती. कोंबडे आणि बकरे कापून सर्वाना मेजवानी देण्यात आली. गीता दिसायला सुंदर होती, त्यात आज अजून सुंदर दिसत होती. दृष्ट लागावी असे तिचे सौन्दर्य उजळून दिसत होते. त्याच पाहुण्यामध्ये एक पाहुणा गीताला पाहून आपल्या घरची सून करून घेण्याची माहिती दिली.

सारं कार्यक्रमाची आवरा आवर झाल्यानंतर गीताच्या आई ला ही बातमी पांडुरंगाने सांगितली तशी ती देखील आनंदी झाली. दुसऱ्या घरात बसून गीता हे सारं ऐकत होती. तिच्या मनात चलबिचल चालू झालं होतं. तिला काही तरी बोलायचं होतं, मात्र कोणाला बोलणार ? ती मनातल्या मनात घाबरून गेली होती. दुसऱ्यांदा शाळेतील मॅडम तिला शाळेत घेऊन जाण्यासाठी आले होते, यावेळी मात्र आईने सरळ गीताचे लग्न ठरले आहे असे सांगितले. हे ऐकून मॅडमला धक्काच बसला. ते निमुटपणे शाळेत परत गेले. गीताला मॅडम शी बोलायचे होते मात्र तशी संधी मिळालीच नाही. एके दिवशी पाहुणे आले नि बघून गेले. ही फक्त औपचारिकता होती. गीता पसंद असल्याचा त्यांनी निरोप दिला. गीताच्या मनात काय आहे ? याचा कोणी ही विचार केला नाही. पाहुण्याचं घर खूप मोठं होतं, त्यांचा एकुलता एक मुलगा होता, भरपूर पैसा, धन दौलत होती. हे सारं पाहून पांडुरंग मागचा पुढचा विचार न करता स्थळ पसंद असल्याचे कळविले. दिवसेंदिवस गीता विचारात गढून राहू लागली. उपवर होण्यापूर्वी ची गीता आता दिसत नव्हती. निद्रानाश झाला होता, डोळे सुजल्यासारखे वाटत होते. ती मोकळ्या मनाने नाचू शकत नव्हती, फिरू शकत नव्हती. ती पार बंधनात अडकून पडली होती. काही वेडेवाकडे करावं तर आपल्या आई-बाबाचे काय ? हा विचार करून ती शांत राहत होती. काही दिवसातच तिचे वयाच्या तेरा-चौदाव्या वर्षात लग्न झाले ते ही तिशीच्या वयातील पुरुषासोबत. गीता ही कोवळी पोर तर तो तिशीचा पुरुष. जोडा काही शोभून दिसत नव्हता पण असे स्थळ पुन्हा मिळणार नाही म्हणून पांडुरंगाने हे लग्न लावून दिले. बापाची काळजी मिटली पण पोरीची चिंता सुरू झाली. तिला घरात कोणत्याच गोष्टीची काळजी नव्हती. सर्व काही सुख सोयी सुविधा होत्या. मात्र तिचा नवरा रोज पिऊन घरी यायचा. त्याला कशाचेही होश राहायचे नाही. त्याच धुंदीत तो गीतासोबत झोपायचा. तिला कधी प्रेमाचा एक शब्द देखील कधी बोलायचा नाही. लग्न झाल्यानंतर पाच सहा महिन्यात तिला गर्भ राहिलं. तिचं वय किती आणि ती आता आई बनणार होती. ही बातमी ऐकून घरीदारी सर्वाना आनंद झाला. मात्र गीताच्या चेहऱ्यावर कोणातच भाव दिसत नव्हता. नऊ महिने पूर्ण झाले होते गर्भाला. तिला खूप त्रास होऊ लागला होता. म्हणून ह्या वेदना अश्याच असतात म्हणत तिचे सांत्वन करू लागले. एके दिवशी खूपच वेदना होत होत्या म्हणून गावातीलच बाळंत करणाऱ्या बाईला बोलून आणण्यात आलं. तिला वेदना असह्य होऊ लागल्या, त्याच त्रासात ती तडफडून शेवटी आपला देह ठेवला. गर्भ सुद्धा तिच्या सोबतच मेलं. दोन्ही जीव शांत झाले होते. वयाच्या पंधरा वर्षाच्या आत गीताचे जीवन संपुष्टात आलं. नशीबालाच दोष देत पांडुरंग रडत बसला होता. गीताची अंत्यविधी शाळेसमोरून जात असताना सारेच दुःखामध्ये डोळ्यात अश्रू आणून तिला पाहत होते. आई बाबांच्या अज्ञानामुळे अजून एक कळी फुलण्याआधीच गळून पडल्याचं दुःख मॅडमला होत होतं. 


Rate this content
Log in

More marathi story from नासा येवतीकर

Similar marathi story from Tragedy