खेळ दैवाचा...
खेळ दैवाचा...
अवि ए अवि उठ सकाळचे नऊ वाजलेत, रोज सहा वाजता अभ्यासिकेत जाणारा आज नऊ वाजेपर्यंत झोपला. विनायक झोपेत असणाऱ्या आपल्या रूम पार्टनरला उठवत म्हणाला.
जाऊ दे विन्या उद्या पेपर आहे कम्बाईनचा आज त्यासाठी मी रिलॅक्स घेणार. इतके दिवसात जे करायचं होतं ते केलं आज शांत राहून उद्या पेपर देणार आणि परवाला आपला सगळा पसारा घेऊन गावाकडं जाणार. जर पूर्व निघाला तर बघतो कुठं राहायचं आता घरून पैशाची अपेक्षा नाहीच राहिली.. अविनाश लोळत लोळत विनायकला म्हणाला.
विनायक त्याच्या अंगावरची चादर जोरात ओढतो आणि अव्या उठ चहा घेऊन येऊत आपण दोघे, उठ लवकर फ्रेश हो. डोळे चोळत अविनाश उठतो आणि तयार व्हायला लागतो.
अविनाश ग्रॅज्युएशन झाल्यापासून सतत पाच वर्ष एमपीएससीची तयारी करत असतो पण त्याला अजून त्याच्या नशिबाने साथ दिली नव्हती. त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. घरी नऊ दहा एकर जमीन होती. आजपर्यंत कसेबसे करून पैसे यायचे. पण आता घरचेसुद्धा खूप वैतागले होते. त्याचे वडील त्याला रोज फोनवर गावाकडे येऊन शेतीकडे लक्ष द्यायला सांगत होते. कारण त्याचे वडील आता थकत आले होते शिवाय त्यांना दोन मुलींचे लग्नही करायचे होते. आणि त्यांचा एक मुलगा अजून दहावीत होता. त्यांना वाटत होते की अविनाशचं आता काही होणार नाही. आतापर्यंत त्याच्यासाठी खूप खर्च केला आता अजून करण्याची आपली ऐपत नाही.
अविनाशही खूप मेहनती होता त्याने आतापर्यंत खूप जिद्दीने अभ्यास केला होता पण त्याला नशिबाने अजून साथ दिली नव्हती. आता त्याच्याकडे हा शेवटचाच प्रयत्न होता. हा पेपर देऊन तो गावाकडे जाऊन शेती करणार होता. कारण त्यालाही आता या सर्व गोष्टींचा खूप कंटाळा आला होता. पाच वर्षात एकही पोस्ट मिळालेली नव्हती आणि पैसा तर अमाप खर्च केला होता.
अविनाश आणि विनायक दोघेही चहा प्यायला हॉटेलवर जातात तिथे त्यांचे दुसरेही मित्र भेटतात. सर्वजण परीक्षेसंबंधी चर्चा करत असतात पण अविनाश मात्र शांत राहतो. त्याच्या डोक्यात विचारांनी घर केलेलं असतं.
अव्या काय झालंय तुला आज का बोलत नाहीस.. चहा पीत विन्या म्हणतो.. काही नाही रे असंच अविनाश त्याला लगेच उत्तर देतो..
हे बघ अव्या तुला मी लहानपणापासून ओळखतो तुझ्यापेक्षा जास्त मला तुझ्या गोष्टी माहीत आहेत. कसला एवढा विचार करतोस.... विन्या त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याला विचारण्याचा प्रयत्न करतो.
विन्या तुला तर सगळ्या गोष्टी माहित आहेत मी आजपर्यंत माझा खूप वेळ बरबाद केला आणि घरच्या टंचा पैसा पण.. आजपर्यंत एकही रुपयांची कमाई मी केली नाही.. आणि उद्याच्या पेपरमध्येसुद्धा काही होईल असं वाटत नाही. उद्याचा पेपर झाला की लगेच गावाकडे जाणार आणि लोकांच्या तोंडाला तोंड मला देता येणार नाही नाना तऱ्हेने लोक मला बोलणार.. खूप हलक्या स्वरात अविनाश बोलू लागला
लोकांचं काम असते ते, लोक तर बोलणारच आपण तेवढे लक्ष द्यायचं नाही.. आणि राहिले पेपरचे तर तो निघेल नाहीतर नाही निघणार... गावाकडे जाऊन कुटुंबाची जबाबदारी आता उचल इथे जशी मेहनत केलीस तशीच तिथेही कर. माहितीय तुझ्या घरावर कर्ज आहे जर हिमतीने कष्ट केलेस तर हेही दिवस तुझे निघून जातील.. आणि गावाकडे गेल्यावर लग्नाचंही बघ कुठपर्यंत असाच भरकटत फिरतोस.. त्याला धीर देत विनायक सांगतो..
दुसऱ्या दिवशी सकाळी अविनाश लवकर उठतो अकरा वाजता त्याचा पेपर असतो आणि रिपोर्टिंग टाईम दहाचा असतो.. आठ वाजता सगळं आवरून तो त्याच्या मित्रांना भेटायला अभ्यासिकेत जातो. सगळ्यांना पेपरच्या शुभेच्छा देऊन, चहा वगैरे घेऊन त्याच्या पेपरच्या सेंटरवर निघून जातो.. पेपरचा अनुभव तर त्याला भरपूर झालेला होता त्यामुळे त्याचं काही टेंशन नव्हतं. पण तरीही त्याच्या डोक्यात अजूनही विचाराचं कोडं चालूच होतं...
अविनाश आपल्या पेपरच्या सेंटरवर जातो. नाव नोंदणी, चेकअप,सही वगैरे करून शांत आपल्या ठिकाणी जाऊन बसतो आणि पेपर हातात येईपर्यंत त्याच्या डोक्यात विचारचक्र चालू होतं. त्याला आठवण होते ती रूमचे आणि मेसचे पैसे द्यायचे राहिले आहेत आणि त्यात अभ्यासिकेचेही, पण आपल्याकडे सध्याचा खर्च भागण्यापूरते पैसे आहेत मग द्यायचे कुठून. आपल्याच विचारात गर्क असताना गार्डिंगचे सर उत्तर पत्रिका समोर घेऊन उभे असतात पण त्याचे लक्ष नसते. अभ्यास जास्त झाला का लक्ष कुठंय, सरांच्या या आवाजामुळे अविनाश भानावर येतो. "अभ्यास जास्त नाही सर अडचणी जास्त झाल्यात".. अविनाश हलक्या स्वरात सरांना उत्तरला.
पेपरचा टाइम झाला आणि सर्वांना उत्तर पत्रिका वाटल्या. नेहमीप्रमाणे अविनाशने सर्व प्रश्नपत्रिका वाचून काढली आणि थोडंसं विश्लेषण केलं. नेहमीप्रमाणेच 40 ते 45 प्रश्न बरोबर येत होते आणि अंदाजे पाच एक वाढतील असा त्याचा अंदाज ठरला पण मनामध्ये एक गोष्ट निश्चित होती की एवढ्या मार्कने आपलं काहीच होणार नाही. म्हणजे आपला गावाकडं जाण्याचा रस्ता योग्यच आहे असे तो आता मनामध्ये ठामपणे ठरवतो. एकदाचा पेपर सोडवून तो हॉलच्या बाहेर ठेवलेली बॅग उचलून आपल्या रूमकडे पाई पाई चालू लागतो. बॅगमधला मोबाईलसुद्धा त्याने ऑन केला नव्हता..नेहमी सर्वांसोबत हसत खेळत राहणारा अविनाश आज अतिशय निराश झाला होता डोक्यामध्ये सारखं विचारचक्र चालू होतं. रूमवर येऊन त्याने आपल्या अंथरुणावर अंग टाकून दिलं आणि कधी त्याला झोप लागली कळलंसुद्धा नाही...
चार वाजता त्याला जाग आली. उठून त्याने पाहिले तर विनायक आणि अशोक आजच्या पेपरचं डिस्कशन करत बसले होते. अरे अशोक तुम्ही कधी आलात मला उठवायचं ना.. नाही उठवलं पेपरच्सा टेन्शनमुळे झोपला असेल म्हणून, विनायक अविनाशला उत्तरला आणि परत आपल्या पेपरच्या डिस्कशनला लागला. नेहमी पेपर झाल्यावर अविनाश अख्खा दिवस प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण करत बसत असतो पण आज त्याला पेपर बघायचीसुद्धा इच्छा नव्हती...
त्याच्यापुढे सध्यातरी पैशाचा खूप मोठा प्रश्न होता. म्हणून त्याने एक निर्णय घेतला तो म्हणजे आपल्या गळ्यातील सोन्याचं पान विकण्याचा. त्याचेही जास्त पैसे येणार नव्हते पण एक दोन अडचणी सुटत होत्या.. म्हणून त्याने विनायकला सोबत घेऊन आपल्या गळ्यातील आईने केलेले सोन्याचं पान विकलं. आणि संध्याकाळी आपल्या मेसवर जाऊन त्याचे पैसे देऊन टाकले आणि एक-दोन मित्रांकडून उसने पैसे घेऊन रूमचे इतर पैसे सारले. संध्याकाळी त्याने सर्व मित्रांची भेट घेतली आणि त्यांना अखेरचा निरोप दिला कारण उद्या सकाळी तो गावाकडे निघणार होता.
सकाळी लवकर उठून अविनाश आणि अशोकची गळाभेट घेऊन तो गावाकडे जाण्यास तयार झाला. विनायक आणि अशोक दोघेही त्याच्याच गावची आणि श्रीमंत घरची मुले होती. म्हणून दोघांनी मिळून अविनाशचा सर्व खर्च आपण करायचा असे ठरवलं होतं पण त्यासाठी अविनाशचा होकार हवा होता करण अविनाश खूप स्वाभिमानी मुलगा होता तरीही अशोकने त्याला बोलून दाखवले. माझा सख्खा भाऊही मला एवढं करणार नाही तेवढे तुम्ही केलात याचे उपकार मी जीवनभर कधी फेडू शकणार नाही आणि अजून उपकारात भर घालू नका. चला येतो अधून मधून फोन करत राहील. एवढे बोलून अविनाश आपल्या रूमच्या बाहेर निघाला. तो निघालेला पाहून विनायक आणि अशोकचे हृदय भरून आले होते. अविनाश दादा कोणाचेच ऐकणारा नव्हता.
अविनाश बस स्टँडवर आला आणि बसला थोडा वेळ होता म्हणून एका बाकड्यावर जाऊन बसला. लगेच त्याच्या मनात विचारांचं थैमान चालू झालं. एकेक विचार त्याला हतबल करत होते. आज आपलं वय 27 वर्ष झालं तरी आपण एक रुपयासुद्धा कमवत नाहीत. जीवनाचे इतकी वर्ष आपण बरबाद केले त्यात साध्य काहीच झालं नाही, सुरुवातीपासून जर गावाकडची शेती केली असती तर आज घरची ही परिस्थिती झाली नसती. आई-वडिलांनी आपल्यासाठी हाडाचे पाणी करून पैसे पुरवले. आईचा विचार मनात आला की कालचा गावाकडून फोन आलेला आठवला की आपल्या आईची तब्येत बरी नाहीये हे आठवलं की तो अजून बेचैन झाला. त्याला लवकरात लवकर बस लागावी आणि गावी पोहोचून कधी एकदा आईला पहावे आणि दवाखान्यात घेऊन यावे असे वाटू लागले. तेवढ्यात बस येते आणि तो बसमध्ये चढतो.
खिडकीच्या सीटवर जाऊन बसतो. गाडी निघणारच असते तेवढ्यात एक मुलगी येऊन त्याच्या शेजारी बसते. त्या मुलीचा चेहरा पाहण्यासाठी अविनाश वर पाहतो तोच त्याच्या काळजात धडकी भरते कारण त्याच्या शेजारी बसलेली मुलगी त्याच्या गावची आणि त्याच्या शेजारी राहणारी रिता होती...
अविनाश आज रिताला सहा महिन्यानंतर पाहत होता या सहा महिन्यांतसुद्धा तिच्यामध्ये खूप बदल झाला होता. रिताला पाहताच त्याला भूतकाळ आठवला...
रिता एका बऱ्या घरातील मुलगी होती अविनाशच्या तीन वर्षांनी मागे होती. घरा शेजारी घर असल्यामुळे दोघांचेही मने जुळली होती. दोघांनाही एकमेकावर कधी प्रेम झालं कळलंसुद्धा नाही. आणि एक दिवस अचानक अविनाशने हिम्मत करून तिला प्रपोज केलं, पण रिताच्या मनात अविनाशबद्दल प्रेम असलं तरी तिने एक अट घातली ती म्हणजे ज्यावेळेस अविनाशला मोठी नोकरी लागेल तेव्हाच ती तिच्या प्रेमाची कबुली देईल. म्हणूनच तर सुरुवातीला स्पर्धा परीक्षेचं हे वेड अविनाशला रीतामुळेच लागलं होतं पण पुढे त्याच्या परिस्थितीमुळे तो सारं विसरला होता पण आज अचानक रिता दिसल्यावर त्याला त्या गोष्टी पुन्हा आठवल्या....
योगायोगाने दोघेही एकमेकांशेजारी बसले पण, बोलण्याची सुरुवात कोणीच करत नव्हतं. रिताला वाटायचं की अविनाशने बोलावं आणि अविनाशला वाटायचं की रिताने बोलावं पण सुरुवात कोणीच करत नव्हतं. गाडी बसस्थानकातून निघाली आणि गाडीने वेग घ्यायला सुरुवात केली थोडं पुढे गेलं की बस कंडक्टर तिकीट काढण्यासाठी आला आणि सुरुवातीला रिताने कंडक्टरला पन्नास रुपये दिले आणि त्यांच्या गावचे तिकीट होतं 33 रुपये म्हणून कंडक्टर तीन रुपये सुट्टे मागत होता आणि ते रीता जवळ नव्हते...
तेवढ्यात अविनाश कंडक्टरला हलक्या स्वरात म्हणतो की माझ्याकडे शंभर रुपयाची नोट आहे त्यामधून माझं तिकीट आणि रिताचे तीन रुपये घ्या. पण रिता लगेच उत्तरते की काही गरज नाही तुम्ही मला दहा रुपये रुपये वापस द्या गावांमध्ये उतरल्यावर मी तुम्हाला सुट्टे पैसे देईल त्यावेळेस मला दुसरे दहा रुपये वापस द्या, पण कंडक्टर वीस रुपये आणि अविनाशला 74रुपये वापस देत म्हणतो की राहुद्या तो देतोय ना त्याला तुम्ही उतरल्यानंतर द्या. कंडक्टरने पैसे वापस दिल्यावर रिताला शांत बसणे भाग पडले. अविनाशला वाटलं की रिता किमान धन्यवाद तरी म्हणेल पण रिता मात्र अजूनही शांतच होती. "काय करतेस सध्या"मोठ्या हिमतीने अविनाश शांत स्वरात रिताला विचारतो.
वाट पाहते तुला नोकरी लागण्याची आणि तुझी पत्नी शोभावी म्हणून थोडंफार शिक्षण घेतेय. खिडकीच्या बाहेर पाहत रिता हलक्या स्वरात उत्तर देते. रिताचं बोलणं ऐकून अविनाश खूप गहिवरून आणि रिताच्या डोळ्यात पाहत म्हणतो,"म्हणजे अजूनही तू मला विसरली नाहीस. माझी आणि मला नोकरी लागण्याची वाट पाहतेस इतके प्रेम करतेस तर कशाला हा नोकरीचा अट्टाहास"आता मात्र आता अविनाशच्या नजरेला नजर भिडवून एकच वाक्य बोलते. सध्या माझ्या मनात भावना आणि प्रेम कदापिही नाही आणि मला नोकरीला लागल्याशिवाय तू एकही शब्द बोलण्याचा प्रयत्न करू नकोस आणि हे तुला माझं शेवटचं बोलणं आहे...
बिचाऱ्या अविनाशला रिताचा स्वभाव माहीत होता तिला समजून घेणे आणि समजावून सांगणं दोन्ही अविनाशसाठी खूप अवघड होतं म्हणून सध्या तरी अविनाशला गप्प बसावं लागणार होतं.त्याच्यासाठी सध्या पैसा आणि प्रेम दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी होत्या मेहनत केल्यावर तर पैसा मिळेल पण प्रेम... रिता तर नोकरीला लागल्याशिवाय बोलणारच नाही म्हणतेय. तिला कोण सांगणार की तिने कितीही नोकरीसाठी प्रवृत्त केलं तरीही नोकरी लागणं खूपच आणि खूपच कठीण आहे. दुसऱ्या एखाद्या क्षेत्रामध्ये प्रगती करायची म्हटलं तरी किमान दोन वर्षे तरी लागतील त्या वेळेस रिता तयार होईल पण तिच्या घरच्यांनी तिचे लग्न केले तर..
अविनाश दैवाच्या खेळात अडकत चालला होता, प्रत्येक गोष्ट त्याच्या विरुद्ध घडत होती.. विचार करत करतच बस गावामध्ये येऊन थांबली आणि रिता बस थांबण्या अगोदरच अविनाशकडे न पाहता बसच्या दारासमोर जाऊन उभी ठाकली. जशी काही बस थांबली लगेच उतरून आपल्या रस्त्याला लागली. अविनाश बसच्या खाली उतरतो तोपर्यंत रिता गायब झाली होती..
अविनाश खूप जड पावलांनी घरी आला, घरी येताच बापाने आले साहेब म्हणून टोमणे मारायला सुरुवात केली.. पण अविनाशने शांत राहण्याचा निर्णय घेतला होता. आईने थोडंफार सांत्वन केलं..
अविनाश गावाकडे येताच प्रचंड मेहनतीने शेती करायला लागला त्याने गावातील एका खाजगी सावकाराकडून 50000 रुपये शेती खर्चासाठी व्याजाने घेतले, दिवस-रात्र तो शेतामध्ये राबू लागला सध्या त्याच्याकडे पैसे कमी असल्याने परंपरिक शेतीवर भर देऊ लागला. अगोदरचा संपूर्ण भूतकाळ विसरण्याचा प्रयत्न करत सगळे लक्ष कामावर देऊ लागला, गावातील मित्र नातेवाईक जणू त्याला कोणीच नव्हते सर्वांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करु लागला...
शेती करत करत एक दिवस त्याला त्याच्या मित्रांनी व्हाट्सअपला एमपीएससी ची नवीन आलेली जाहिरात पाठवली, त्यामध्ये जागाही भरपूर होत्या. अविनाशला वाटलं की शेती करत करत आपण एवढे परीक्षा देऊन बघू असंही आपल्याला याचं व्यसन लागलं होतं पाहू काय होतं ते आणि अविनाश दिवसभर काम करून रात्री अभ्यास करू लागला. जसजशी परीक्षा जवळ येत राहिली तसा तसा तो रात्री उशिरापर्यंत जागून अभ्यास करत होता. पण या गोष्टी कोणालाच माहीत नव्हत्या. कारण अभ्यास ही तो शेतामध्येच त्याच्या आखाड्यावर करत होता. कुणालाही बोलण्यासाठी त्याच्याकडे एक मिनिटसुद्धा वेळ नव्हता इतका तो व्यस्त राहू लागला..
असंच एकदा रात्री अभ्यास करत बसल्यावर त्याला विनायकचा फोन येतो आणि त्याच्याकडून कळतं की रिताचं लग्न जमलं आणि तिचा होणारा नवरा हा पीएसआय आहे, हे हे शब्द अविनाशच्या कानांमध्ये गरम तेल ओतल्यासारखे पडले.... त्याचं कशातच मन लागेना पुस्तकं एका बाजूला पडली.. एका बाजूला मोबाईल आणि एका बाजूला तो..त्याला झोपसुद्धा येईना. काय करावे आयुष्यभर फक्त एकाच मुलीवर प्रेम केलं आणि तीही केवळ नोकरी नाही म्हणून आपल्यापासून दूर गेली... आणि त्यावेळेस अविनाश ठरवतो की नोकरी तर मी करणारच नाही पण किमान चार जण तरी माझ्याकडे नोकरी करतील...आणि अविनाश जातीचा उठून रात्री बारा वाजता त्याच्या शेतामध्ये जे छोटं लक्ष्मीचे मंदिर होता त्या लक्ष्मीच्या पाया पडतो आणि आशीर्वाद घेऊन आपल्या अंथरुणावर येऊन झोपतो....
क्रमश...
