अपूर्ण प्रेम कहाणी...
अपूर्ण प्रेम कहाणी...
मृग नक्षत्राचा पाऊस पडून गेला होता म्हणून सगळीकडे पेरणीची घाई होती..कोणी कापूस लागवड करत होते तर कोणी हळद लागवड करत होते आणि काहीजण सोयाबीन व इतर पिकाची पेरणी..सगळीकडे कामाची घाई होती.. मधे मधे ऊनसावलीचा खेळही सुरू होता..
आज अजयने सुद्धा पेरणीची सुरूवात केली होती.. पेरणीसाठी तो त्याचा सालगडी आणि एक रोजंदारी माणूस असे तिघेजण होते.. अजय तिफणीमागे खात पेरत होता..त्याचे वडील आता थकले होते म्हणून कामाची सर्व जबाबदारी अजयवर होती..तसे वडिलांचा सुद्धा खूप मोठा आधार होता छोटे मोठे काम ते करत असत आणि अजयला त्यांचा अनुभव ही खूप कामाला यायचा..अजय हा खूप मनलाऊन शेती करत होता..खूप शिकून नोकरी न लागल्यामुळे तो आता शेतीकडे वळला होता..
दुपारी एक-दीड वाजता तिफन सुटली आणि बैलाला चारा वैरण करून सर्वजणांनी दुपारचे जेवण केले.. जेवण झाल्यावर सर्वजण झाडाखाली थोडा वेळ आराम करत होते.. अजय झाडाच्या बुडाला टेका देऊन आपल्या मोबाईल वर काहीतरी पाहत बसला होता.. अचानक त्याने रस्त्याकडे पाहिले आणि रस्त्याने त्याला त्याचा मित्र सुनील गावाकडून येताना दिसला.. सुनील ला पाहून अजय रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडा खाली गेला आणि तेथे जाऊन सुनील ला बोलत उभा टाकला.. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु झाल्या आणि अचानक सुनील अजयला मनाला.. अरे तुला सांगायचं राहूनच गेलं आरती आली आहे आज मला येतानाच दिसली तिचा नवरा आणि ती दोघेही आले आहेत गावाकडं.. ही गोष्ट ऐकताच अजय पूर्णपणे भूतकाळात रमून गेला त्याला तिथून सुनील कधी निघून गेला हे देखील कळाले नाही तो भूतकाळातला एक एक क्षण आठवू लागला..
अजय हा दहावी झाल्यानंतर शहरांमध्ये शिकत होता आणि आरती गावातील शाळेत शिकत होती.. आरती ही त्याची लहानपणापासूनच मैत्रीण होती.. तो सुट्ट्यांमध्ये जेव्हा कधी गावाकडे येईल तेव्हा ते दोघेही खूप आनंदी असायचे आरती तो गावाकडे आला की सारखी त्याच्या सोबत राहायची पण वयाप्रमाणे दोघेही दूर दूर होत होते कारण माणसाचं जसजसं वय वाढतं तसं तसं बंधने ही वाढतात पण मन मात्र तसेच राहतं
एकदा अजय दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावाकडे आला होता तो आला की आरती खूप खुश झाली अजयला सुद्धा आरतीला बोलून खूप आनंद झाला होता. एके दिवशी अजय आपल्या छतावर मोबाईलवर काहीतरी पहात बसला होता आणि तेवढ्यात अचानक समोरच्या छतावर आरती आली आणि अजयला म्हणाली मला तुला काहीतरी बोलायचे तु पटकन खाली बोळात (दोन घरांच्या मधील छोटा रस्ता) ये.. आणि आरती लगेच खाली निघून गेली.. अजयला वाटलं की आरती काहीतरी अभ्यासातलं विचारेल नाहीतर काही काम असेल म्हणून अजय सुद्धा लगेच खाली बोळात निघून गेला.. तो जसा बोळात गेला की लगेच त्याच्यासमोर आरती येऊन उभी टाकली आणि तो काही बोलणार तेवढ्यातच लगेच आरती त्याला आय लव यु म्हणून आणि त्याच्या हातात एक चिट्ठी देऊन तेथून पटकन निघून गेली.. अजय हे ऐकून पूर्णपणे घायाळ होऊन गेला.. त्याला त्याच्या कानावर विश्वास बसेना की आरती एवढ्या सहजपणे आय लव यू म्हणाली असेल आणि तेही अचानक.. अजय याच विचारात घरामध्ये आला आणि आपल्या बेडवर बसून आरतीची चिट्ठी वाचू लागला चिठ्ठीमध्ये सुरुवातीलाच एक चारोळी लिहिली होती..
पत्रास कारण की सख्या
माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे...
तुही सांगणा रे एकदाच
तुझेही माझ्यावर सेम आहे...
पुढे खूप सारंं लिहिलं होतं, खुप सारे प्रेम पुरावे दिले होते पण त्यावेळी तरी अजयला त्याची काहीच किंमत वाटत नव्हती. आरती वर प्रेम व्हावं असं त्याच्या मनामध्ये देखील कधी आलं नव्हतं ना त्याने कधी त्याचा विचार सुद्धा केला होता.. आरती ला काय उत्तर द्यावं म्हणून अजय खूप बेचैन झाला होता आणि इकडे आरती सुद्धा आजयच उत्तर काय येईल म्हणून खूप बेचैन होती.. एक-दोन दिवस उलटले तरी अजय ने तिला काहीच उत्तर दिलं नाही आणि तिने त्याला संधी पाहून विचारायचं कधी सोडलं नाही.. चार-पाच दिवस ती सारखी अजय च्या समोर जायची आणि त्याला सारखी विचारायची पण आजय नेहमीच तिच्या समोरून निघून जायचा..एके दिवशी सकाळी सकाळी आजय तोंड धूवत होता त्या वेळेस त्याच्या पाठीमागुन आवाज आला “कुणाला इतकही परेशान करू नये आपल्या वरूनच विचार करावा की समोरच्यालाही मन असतं” अजयने पाठीमागे पाहिलं तर आरती उभी होती.. अजयने चिडून तिला उत्तर दिलं.. ह्या मनाफिनाच्या गोष्टी माझ्यासमोर करू नको,पुन्हा जर माझ्याजवळ प्रेमाच्या गोष्टी करायच्या असतील तर माझ्या समोर सुद्धा येऊ नको..अजय खूप रागाने तेथून निघून गेला..त्याच बोलणं एकूण आरती खूप नाराज झाली आणि खाली मान घालुन तीही रडत तेथून निघून गेली..हे सारं आरतीच्या घराच्या खिडकीतून तिच्या वाहिनीने पाहिलं..दुपारी जेव्हा घरी कोणीच नव्हत तेव्हा तिच्या वाहिनीने तिला सकाळच्या घटनेबद्दल विचारलं तेव्हा आरतीने सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली पण वाहिनीने मैत्रीच्या नात्याने विचारलं तेव्हा आरतीने त्यांना सगळं सांगून टाकलं.. आरतीला वाहिनीने एक कल्पना सुचवली की तू काही दिवस अजयला दिसायचे नाही,त्याला बोलायचे नाही, तो स्वतःहून जरी बोलला तरी जेवड्यापुरत तेवढं बोलायचं, त्याला इग्नोर करायचं मग त्याला कळेल तुझी किंमत,,आणि अरतीनेही तसेच केले फक्त तीन दिवसात अजयला आरतीचे असे वागणे आवडतं नव्हते तो सारखा आरतीच्या मागे लागून तिला विचारात होता की तू असे का वागतेस पण वाहिनीने सांगितल्या प्रमाणे आरतीही त्याला भाव देत नव्हती.. तेव्हा अजयला आरती ची किंमत कळाली आणि तोही आता आरतीच्या प्रेमात पडला होता म्हणून त्यांनीही ठरवलं आरतीला हो म्हणून उत्तर द्यायचं आणि तेही चिट्टीतूनच आणि तो लिहायला लागला....
सांगतो सखे मीही आज
माझंही आता सेम आहे...
परत एकदा सांग तू मला
तुझं किती ग प्रेम आहे...
अजयने चिट्टी लिहून आरतिला दिली आणि तिच्यासारखं I love you म्हणून तो ही निघून गेला..रात्री आरतीने तिच्या वडिलांच्या फोनवरून अजयला फोन लावला आणि रात्री तीन वाजेपर्यंत फोनवर खूप वचणे, शपता,आणाभाका झाल्या आणि दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली..
दिवस कसे निघून गेले हे दोघानाही कळलं नाही जसे जसे दिवस जात होते तसे तसे त्यांचे प्रेम वाढत गेले पण हे प्रेम जास्त दिवस टिकले नाही..अचानक आरतीचे तिच्या मामाच्या मुलासोबत लग्न जमलं हे अजयला जेव्हा कळलं तेव्हा त्याच्या पाया खालची जमीन निघून जात आहे असं वाटलं..त्याला ह्या गोष्टीवर विश्वास बसेना.त्याने आरतीला विचारण्याचा खूप प्रयत्न केला पण आरती त्याला भेटत नव्हती..तो जवळ आला की आरती लगेच त्याच्यापासून लांब जाई..त्याला आरतीचे असे वागणे खूप त्रास देत होते..तिच्या वडिलांच्या फोनवर त्याने कित्येक वेळा फोन लावला पण फोन काही आरती उचलेना..अजयचा खूप कोंडमारा होत होता पण तो काय करणार.. आखेर आरतीचे लग्न झालं पण आरती एकदाही त्याला न सांगता लग्नाला तयार झालीच कशी हा प्रश्न मात्र अनुउत्तरित राहिला..
अजय भूतकाळात रमुन गेला असताना त्याच्या वडिलांच्या आवाजाने तो भानावर आला आज्या ये आज्या आरे चाल ना लवकर लावली त्यांनी तीफण घे लवकर ओटी भरून खाताची..अजय तसाच उठला आणि खातची ओटी घेऊन तिफानी मागे पेरायला लागला पण त्याचे मन काही लागेना..त्याला आत्ताच्या आत्ता जाऊन आरातीला जाब विचारण्यासाठी जावे असे वाटत होते..म्हणून त्याने पोट दुखण्याचे नाटक केले मग काय त्याच्या सालगड्याने लगेच त्याच्या वडिलाला सांगितले आणि वडिलांनी खाताची ओटी घेऊन अजयला घरी जाण्यास सांगितले..अजय तासाचा घरी आला त्याच्या घराच्या आगोदर आरतीचे घर होते..तो आरतीच्या घरासमोर आल्यावर त्याला गेटमधून आरती दिसली आणि दोघांचीही नजरानजर होतच अजय ने तिला भेटण्याचा इशारा केला..आणि अजय पुढे येऊन त्याच्या ओट्यावर येऊन बसला पण आरती काही येईना.. तो सारखा वाटेकडे डोळे लावून बसला आणि अचानक त्याला आरती येताना दिसली..आरती आली पण त्याला न बोलता तिने एक चिट्टी त्या ओट्यावर फेकली आणि निघून गेली..अजय ने ती चिट्टी वाचायला सुरवात केली....
प्रिय... अजय
तू माझ्यावर खूप नाराज असशील. तुझं नाराज होणं योग्यच आहे म्हणा., पण मी तरी काय करणार रे..तुला तर माहीतच आहे की आमची तेव्हाची परिस्थिती खूप वाईट होती.माझ्या वडीलावर कर्जाचा डोंगर होता तेव्हा माझ्या मामाने आमचं सगळं कर्ज फेडले आणि घर सुद्धा बांधून दिलं..माझ्या मामीला कॅन्सर झाला ती फक्त एक दोन महिने जगणार होती आणि तिची शेवटची इच्छा होती की माझं आणि त्यांच्या मुलाचं लग्न व्हावं..म्हणून घरच्यांनी माझ्या माघारी माझं लग्न त्याच्यासोबत जमवलं..तूच सांग अश्या वेळी मी नाही म्हणून कसे सांगू आणि तुला काय आणि कसं सांगावं म्हणून मी तुला टाळत होते...मला माहित आहे तू समजुन घेशील...माफी मागायची सुद्धा माझी लायकी नाही तरीही पण मला माफ करशील का....आणि हो माझ्या हृदयात तू तेव्हाही होतास आणि आताही आहेस...आणि कायम राहशील.....
तुझीच....
आरती...
अजय उठला आणि तडक आपल्या शेताकडे निघून गेला..जाऊन वडीलाला माझं पोट दुखायचे राहिले असे सांगून आपल्या कामात मन लाऊन व्यस्त झाला.....
