कधी कुणाच्या व्यंगावर हसू नका
कधी कुणाच्या व्यंगावर हसू नका


एका शाळेत एक खूप गर्विष्ठ मुलगी राहत असते. तिचे नाव रीमा. ती दिसायला तर सुंदर असतेच पण पैशाने श्रीमंतसुद्धा असते. रीमाचे आईवडील चांगले कमवत असतात. शिवाय दोघं दिसायला सुंदर असतात. लहानपणापासून रीमाने गरिबी अनुभवलेली नसते की कुरूपता पाहिलेली नसते. रीमाचे घरात, शाळेत, क्लासमध्ये सगळीकडे लाड होत असतात. रीमाच्या शाळेत एक दिवस एक नवीन मुलगी येते. तिचे नाव सोनल. ती दिसायला अतिशय कुरूप असते. शिवाय परिस्थितीने गरीब असते. ती बोलताना अडखळत असते.
तिच्यावर शाळेत सगळे हसत असतात. शाळेतल्या बाई तिला रीमाच्या बाजूला बसायला सांगतात. रीमाला खूप राग येतो. रीमा बाईना म्हणते, बाई ही कुरूप भिकारीण माझ्या शेजारी नको. हिला धड बोलतासुद्धा येत नाही. हिला बघून मला घाण वाटते.
बाई रीमाच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष करतात. रीमा त्या दिवशी रागातच घरी जाते. रात्री तिचे जेवणात लक्ष नसते. आईला लगेच कळते. ती रीमाला विचारते, काय झालं रीमा तुझे लक्ष जेवणात नाही. शाळेत कुणाशी भांडण झालं आहे का? बाई ओरडल्या का?
त्यावर रीमा रागात म्हणाली, आज शाळेत एक नवीन मुलगी आली आहे. तिचे नाव सोनल. ती दिसायला कुरूप आहे. शिवाय गरीब आहे. आणि तिला धड नीट बोलताही येत नाही. मला ती अजिबात आवडत नाही. मी बाईंना सांगितलं की हीची जागा बदला. पण बाईंनी माझं अजिबात ऐकलं नाही. बाईंनी माझ्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केले. आता मला रोज त्या कुरूप मुलीच्या शेजारी बसावं लागणार. आई तू शाळेत येऊन बाईंना सांग ना.
आई बाबांकडे बघते. बाबा म्हणतात, ठीक आहे. आम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही येऊ. आता तू शांतपणे जेव. आई तिला समजावते जेवत असताना शांतपणे, सावकाश जेवावे. जेवणाच्या ताटावर बसून कट कट करू नये.! आई-बाबांना आपल्या मुलीचा स्वभाव माहित असतो.
रीमा शांतपणे जेवून झोपी जाते. दिवसामागून दिवस जात असतात. रीमा रोज सोनलला चिडवत असते. तिला त्रास देत असते. पण सोनल शांतपणे सगळं सहन करत असते. एक दिवस रीमा शाळेत खेळताना जोरात पडते. तिच्या गुडघ्याला जबर मार बसतो. शाळेतून डॉक्टरना बोलावतात. रीमाच्या आई-वडिलांना बोलावतात. या सर्व काळात वर्गातले सगळे लांबून बघत असतात. पण सोनल मात्र रीमाच्या जवळ बसून तिची सेवा करत असते. सोनलला जितके उपाय माहिती असतात ते सर्व ती सुरू करते. रीमा खूप घाबरलेली असते. तिला वाटतं आता आपला पाय गेला आणि तेवढ्यात डॉक्टर येतात. रीमाचे आई-वडील येतात.
जेव्हा डॉक्टर रीमाला तपासतात तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. रीमाच्या पायाची सूज कमी होत असते. हे कसे काय घडले? तेव्हा रीमाच्या वर्गशिक्षिका डॉक्टरना सांगतात, डॉक्टर या सर्वाचे श्रेय सोनलला. तुम्ही येईपर्यंत सोनल रीमाची सेवा करत होती.
डॉक्टर सोनलचे कौतुक करतात. रीमाचे आईवडील सोनलला जवळ घेऊन तिला शाबासकी देतात आणि रीमा बरोबर तिला घरी घेऊन जातात. रीमाची आई छान स्वैपाक करते. सगळे जेवायला एकत्र बसतात. जेवून झाल्यावर रीमाचे आई-वडील रीमाला म्हणतात, बघितलंस तू या मुलीला खूप त्रास दिलास पण आज तुझ्या मदतीला ही धावून आली. यापुढे कधी कुणाच्या परिस्थितीची, व्यंगाची टिंगल करू नकोस.
रीमाने सोनलची माफी मागितली आणि तिला धन्यवाद दिले.
तात्पर्य - कधी कुणाला कमी लेखू नका.