STORYMIRROR

Sneha Salunke

Others

3  

Sneha Salunke

Others

दैव जाणिले कुणी

दैव जाणिले कुणी

3 mins
84


 ही कथा आहे एका उच्च मध्यम वर्गीय घरातली. नवरा बायको दोन्ही सुसंस्कृत , उच्च विदयाविभूषित , बँकेत लठ्ठ पगाराची नोकरी करणारे एक प्रौढ जोडपे. दोघांनी लहानपापासूनच गरीबी कधी अनुभवली नव्हती. बाह्य जगाची काळी बाजू दोघांनी कधी पाहिली नव्हती. या जोडप्याला सामाजिक बांधिलकी, कौटुंबिक जिव्हाळा, कलेचे संवर्धन आणि शिक्षणाची आवड असते. अनेक गरजूंना त्यांनी सढळ पणे मदत केलेली असते. 


उशीरा सुरू झालेल्या वैवाहिक जीवनात एका अपत्याचा प्रवेश सुध्दा उशिराने सुरू होतो. त्या मुलाला एखाद्या गोंडस रोपट्याला वाढवतात तसच लहानाचं मोठं करण्यात येतं. त्याचं नाव सुमेध ठेवण्यात येत. चांगल्या शाळेत त्याला प्रवेश मिळतो. सुमेध अभ्यासात खूप हुशार असतो. चवथित असताना स्कॉलरशिप परीक्षा मेरिट मध्ये उत्तीर्ण होतो. त्याची अभ्यासातील प्रगती पाहून आई वडील सुध्दा समाधानी असतात. आता सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेत पुन्हा सुमेध मेरिट मध्ये उत्तीर्ण होणारच याची त्यांना मनोमन खात्री असते. सर्व सुरळीत चालले असतानाच अचानक एके दिवशी सुमेध मैदानावर चक्कर येऊन पडतो आणि शाळेतून त्याला हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार करण्यासाठी नेत असताना त्याचा मृत्यु होतो.


आईवडिलांना शोक आवरेनासा होतो. बिचारे मुलाच्या विरहाने शोकाकूल होतात. असं कसं झालं? का झालं? अशा अनेक प्रश्नांनी त्यांची मती गुंग होते. आमचं काय चुकलं? देवाने आमच्यावर असा अन्याय का केला? आमचे संस्कार चुकीचे होते का? आम्ही सुमेधला उत्तम शिक्षण दिले. सर्व सवलती वेळच्यावेळी दिल्या. मग असं का व्हावं ? आम्ही कधीच कुणाचं वाईट चिंतल नाही. उलट आमच्यावर ज्यांनी अन्याय केला, त्यांनाही माफ केलं. मग असं का व्हावं? सुमेधच्या मृत्युनंतर सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली. आज्ञाधारक, हुशार होता हो तुमचा सुमेध.अगदी श्रावणबाळ. असं सोसायटीतील महले काकू म्हणत होत्या. पण सुमेध च्या आईचं चित्त थाऱ्यावर कुठे होते? कुणी कितीही तिचं सांत्वन केलं तरी ती शांत होणार नव्हती. ती एका जखमी वाघिणी सारखी विव्हळत होती. बॅंकेत उच्चपदस्थ अधिकारी मी. मला सगळे घाबरतात. माझ्या पुढे कुणाची ब्र काढण्याची हिंमत होत नाही असा माझा दरारा. अनेकांना जिवावर बेतलेल्या संकटातून मी वाचवले आणि आज माझ्या सुमेधला मी वाचवू शकले नाही.? आईच्या मनाला एक वेगळीच बेचैनी आली होती. घरात, ऑफिसच्या कामात कुठेही तिचं

लक्ष लागत नसतं.


सुमेधचे बाबा आईला समजावतात आपल्याकडे पैसा आहे त्यांतून आपण अनाथ आश्रमातल्या मुलांना सुमेधच्या वाढदिवशी पुस्तकं, वह्या, पेन, पेन्सिल या गोष्टीचे वाटप करूं. म्हणजे त्याची आठवण आपल्या मनात एखाद्या खजिन्या सारखी राहील. आपल्या अशा सत्कृत्याने सुमेधच्या आत्म्याला सुध्दा शांती मिळेल. पण आईचं मन काही केल्या सुमेध गेला आहे हे स्वीकारायला तयार नसतं. आणि एक दिवस सुमेधच्या अचानक झालेल्या मृत्यूचा ती शोध घ्यायचं ठरवते. आजपर्यंत तिने कधीही सुमेधच्या खाजगी गोष्टींत ढवळाढवळ केलेली नसते. पण आता ती सुमेधचे मोबाईल कॉल्स, कपाट, कपडे, मेल्स सगळं एका पाठोपाठ एक तपासू लागते. जसजसे दिवस जातात एकेका गोष्टींची तिला उकल होते आणि तेव्हा तिला कळत जातं सुमेध ला त्याच्या एका मित्रा पासून मानसिक त्रास होता. सुमेधच्या बाबांना हे ती निदर्शनास आणून देते. दोघं मिळून एक दिवस त्या मित्राला घरी बोलावण्याचा निर्णय घेतात..


तत्पूर्वी सुमेधच्या आईने त्याची इत्यंभूत माहिती मिळवलेली असते .जेव्हा. तो मित्र घरी येतो तेव्हा त्याला पाहताच यांना आठवतं हाच तो मित्र जो सुमेधला नाईट आऊटला घरी घेऊन जायचा,पिकनिक ला घेऊन जायचा. सुमेधच्या मनात किती वेळा जायचं नसलं तरीही इतरांच्या मदतीने फोन करून यायला लावणारा. त्या मित्राशी गप्पा मारता मारता त्यांना समजलं सुमेध ड्रग्स घ्यायला लागला होता.आईवडील दोघंही आश्चर्य चकित होतात. त्यांना प्रचंड धक्का बसतो. आपण त्याच्यावर चांगले संस्कार केले होते. आणि हा ड्रग्स घेत होता हे आपल्याला कसं कळलं नाही.आम्ही दोघं आमच्या करीअर मध्ये, नोकरीमध्ये एवढे बिझी होतो तरी आम्ही त्याच्या अभ्यासात, आजारपणात लक्ष दिलं आहे. लहानपणी तो नोकरांच्या हाताखाली वाढला.पण म्हणून आम्ही दुर्लक्ष केलं नाही. त्याच दिवशी आईवडील ठरवतात. आपण आपला मुलगा गमावला पण यापुढे दुसऱ्या कुणा मुलावर अन्याय होऊ द्यायचा नाही. दोघं मिळून parental workshop उघडून भावी पिढी ला व्य सनमुक्त करायचं ठरवतात. आपण आपल्या मुलाला जे देऊ शकलो नाही ते या मुलांना द्यायचं.या पुढे पालकांना योग्य मार्गदर्शन करून मुलांमधला सुजाण नागरिक घडवायचा अशी प्रतिज्ञा करतात. 


तात्पर्य. आईवडिलांनी मुलांकडे त्यांच्या न कळत्या वयात पूर्ण लक्ष दिलं पाहिजे.या वयात मुलांना आईवडिलांच्या पैशाची नाही प्रेमाची गरज असते.


Rate this content
Log in