माझ्या आदरणीय शिक्षिका!
माझ्या आदरणीय शिक्षिका!


माझ्या आदरणीय शिक्षिका!
आपल्या आयुष्यात आपली 'आई' ही आपली पहिली गुरु असते. पण जसे आपण शाळेत जायला लागतो आपले शिक्षक हेच आपले खऱ्या अर्थाने गुरु होतात. घरात आपण आपल्या जवळच्या परिचयातील जिव्हाळ्याच्या माणसांबरोबर राहात असतो. शाळेत आपण अपरिचित व्यक्तींबरोबर शिक्षण घेतो. प्रत्येक मूल आपापल्या घरचे संस्कार घेऊन शाळेत येते. प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगळी असते. शारिरीक ठेवण वेगळी असते. मानसिक, बौद्धिक क्षमता वेगळी असते. अशावेळेस सर्वांना समान स्तरावर वागवणे शिक्षकांकरता आव्हान असते. प्रत्येक शिक्षक प्रत्येक शिष्याचा स्वभाव समजून घेतात. प्रत्येकाला अभ्यासात रस नसतो. मग त्या शिष्याचा कल कुठे आहे याचे निरीक्षण करून शिक्षक त्याला योग्य मार्गदर्शन करतात. शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार करतात. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात आदर निर्माण होईल असे त्यांचे वर्तन असते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात आपल्या शिक्षकांबद्दल आदर असतो.
अशाच एका आदर्श गुरुंबद्दल आज मी इथे कृतज्ञतापूर्वक लिहीणार आहे. माझ्या शाळेतल्या वर्गशिक्षका!त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मी माझे आचरण ठेवले आहे. त्यांचा स्वभाव शांत होता. त्या शिस्तप्रिय होत्या. शाळेतील रोजची प्रार्थना आणि राष्ट्रगीत नियोजित वेळेत मी शिस्तबद्ध पध्दतीने केले पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष होता. त्यांनी मला स्वयंशिस्तीचे, समाजसेवेचे शिक्षण दिले. आजच्या कठीण काळात त्याचा उपयोग हौत आहे. त्यांची शिकवण्याची पध्दत वेगळी होती. त्यांनी फक्त पाठ्यपुस्तक वाचून शिकवले नाही तर वेळोवेळी मला कठीण परिश्रम करायला लावले. मला व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षण दिले. माझ्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. विषयाची हाताळणी आणि मांडणी शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करायची याचे मौल्यवान मार्गदर्शन त्यांनी मला केले. त्यांनी मला विविध भाषांची गोडी लावली. शब्दकोषाचा वापर कसा करावा, वाक्यरचना कशी करावी हे त्यांनी मला शिकवले. त्यांनी माझ्याकडून ज्ञानेश्वरीच्या पसायदानातील ओव्या मुखोद्गत करुन घेतल्या.माझ्यात लिहीण्या, वाचण्याची गोडी त्यांनी निर्माण केली. माझ्यातील अनेक सुप्त कलागुणांना त्यांनी वाव दिला. शाळेच्या दिवाळीच्या मासिकातील सुयोग्य मांडणी आणि कलाकुसरीचे महत्त्व त्यांनी मला उत्तमरीत्या पटवून दिले. क्रिडास्पर्धा असो अथवा वक्तृत्व, नाटक,गायन, नृत्यस्पर्धा असो त्यांनी वेळोवेळी मला प्रोत्साहित केले. कठीण विषय सोप्या पद्धतीने शिकवण्यात त्यांची हातोटी होती. त्यांच्यामुळे माझ्यातला आत्मविश्वास दुणावत गेला.
आज मी जे काही यश मिळविले आहे. त्याचे श्रेय मी त्यांना देते. आपल्या शाळेतले शिक्षक आपल्या शिक्षणाचा पाया पक्का करतात. त्याची इमारत होऊन आपल्या आयुष्याची कारकीर्द उज्वल होते. असे गुरू प्रत्येक शिष्याला मिळो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते व हा लेख इथेच पूर्ण करते.
धन्यवाद!