कौस्तुभ,नक्की ये हं!
कौस्तुभ,नक्की ये हं!


कौस्तुभ ! मी जयश्री, एक शिक्षिका.
खरं म्हणजे 'मी शिक्षिका', असा मुद्दाम उल्लेख करत आहे. कारण तू एक शिक्षिकेचा मुलगा. कौस्तुभ, तू अचानक मनाला हुरहूर लावून निघून गेलास. देशसेवेच स्वप्न उराशी बाळगणारा तू, कर्तव्यपूर्तीसाठी झिजलास. तुझ्या या बलिदानाचे ऋण, आमच्यासारख्या सामान्य नागरिकांकडून फिटणे अशक्यच. देशाची नागरिक म्हणून तुझा जितका अभिमान करावा तितका कमीच आहे रे. पण कौस्तुभ मला तुझ्या ह्या बलिदानासोबतच अभिमान करावासा वाटतोय तो तुझ्या आईचा. आपल्या एकुलत्या एक मुलाला, सीमेवर देश रक्षणासाठी पाठवण्याच धाडस त्या माऊलीत कुठून आलं असेल रे ?
आपण सगळेच जाणतो की, जीवनात दोन गुरू खूप महत्वाचे असतात. 'एक म्हणजे आई आणि दुसरा म्हणजे शिक्षक'. खरं म्हणजे गुरू होण्याचं भाग्य एकतर आईला लाभते नाहीतर शिक्षकाला / शिक्षिकेला. पण मला तर सगळ्यात भाग्यवान ती माऊली दिसतेय जिने तुला जन्म दिला. कारण ती गुरू म्हणून फक्त आईचं नव्हे तर शिक्षिका सुद्धा सिद्ध झाली. आज तिने गुरू म्हणून आई आणि शिक्षिका हे सत्यच अजरामर करून टाकलंय.
कौस्तुभ, मीसुद्धा एकुलत्या एक मुलाची आई आहे. तुझ्या आईप्रमाणेच शिक्षिकासुद्धा आहे. पण तुझ्या आईशी जेव्हा मी माझ्यातल्या आईची तुलना करायला जातेय, तेव्हा मात्र मी खूप पावलं मागे असल्याचं मला भासतंय. आज माझा सात वर्ष वयाचा मुलगा जेव्हा मोठा झाल्यावर शास्त्रज्ञ बनेल, असे म्हणतो तेव्हा कौतुक वाटतं. पण त्या कौतुकाबरोबरच खंतही जाणवते की त्याला असे स्वप्न बघण्यास कदाचित मीच तर भाग पाडले नसेल ना?
मनात प्रश्न देखील येतो की, कौस्तुभच्या आईची संस्कार जडणघडण कशी असेल.
'जीवन वैयक्तिक नसून सामाजिक आहे', अशी सुरुवातच असेल का तुला मिळत असलेल्या शिक्षणाची? आपण देशाचे सुजाण नागरिक आहोत आणि आपण देशासाठी देणं लागतो, असा पायाचं रचला असेल का तुझ्या व्यक्तिमत्वाचा? कौस्तुभ, आज माझ्यासारखे असंख्य शिक्षक /शिक्षिका, स्वतःच्या मुलांना डॉक्टर, इंजिनीअर किंवा एखादा मोठा अधिकारी करण्याचं स्वप्नं बघत असतील. पण तुझ्यासारखा सैनिक तूच. तुझा हा सैनिकाचा रुबाब अशा देखण्या लाखो पदांना झुकवेल यात काही शंकाच नाही. कौस्तुभ, तुझ्या आईचं काळीज, माझ्यात रुजवायला मला आई म्हणून अनेक जन्म घ्यावे लागतील. एकुलत्या एक मुलाच्या मनात देशसेवेच बीज रुजवण्याच धाडस फक्त एका वाघिणीतच असू शकतं आणि ती वाघीण, अजूनतरी मी बनणे शक्य नाही.
कौस्तुभ, शाळेतील १५ ऑगस्टनिमित्त, माझ्या मुलाने भाषण केले. भाषणाच्या शेवटी त्याने लष्करातील सैनिकांसाठी एक गाणे म्हटले 'संदेसे आते है, हमे तडपाते है, के घर कब आओगे?', मधेच थोडं थांबून तो पुन्हा गायला... 'मै एक दिन आऊंगा, मै एक दिन आऊंगा... त्याचे ते शब्द ऐकून डोळे, अश्रूंनी गच्च भरले आणि क्षणाचाही विलंब न करता त्याला छातीशी कवटाळले. केवढी भावनिक झाले होते मी? शोकांतिक शब्दाचे बोल माझ्या मुलाने गायल्यावर, मी एवढी भावनिक होऊ शकते, तर त्या तुझ्या आईने तो आघात कसा सहन केला असेल? तुझ्या आईच्या काळजाचे किती तुकडे झाले असतील?
समाजसुधारक म्हणून आजपर्यंत अनेक आदर्श माझ्या डोळ्यासमोर उभे राहीले, पण त्या सगळ्यातही खरी आदर्श म्हणून मला तुझी आईच नजरेसमोर येते. कारण वैयक्तिक जीवन समर्पित करणे थोडे सोपे रे, पण एक आई म्हणून एकुलत्या एक मुलाला देशाच्या हवाले करणं... कठीण, खूप खूप कठीण.
कौस्तुभ, आज तुझ्या आईने आम्हा सर्व शिक्षक बंधूभगिनींसमोर एक नवीन आदर्श घडवून दिलाय. आम्ही नक्कीच सन्मान करू आणि देवाला विनंती सुद्धा की, त्या माऊलीसारखं खंबीर काळीज आम्हाला दे.
कौस्तुभ, तुझी आई एक आदर्श आई, आदर्श शिक्षिका, थोर समाजसुधारक, सुजाण नागरिक आहे. याचा तुला नक्कीच अभिमान वाटत असेल.
कौस्तुभ, आज हा स्वतंत्र भारत निसर्ग झाला आहे. तू शुभ्र पक्षी बनून ये, भगव्या बलिदानाचं स्वागत खंबीरपणे करणाऱ्या तुझ्या आईसाठी. कारण चार सिंहाचं बळ जरी तिने बाळगलं असलं तरी ती शेवटी एक आई आहे.
कौस्तुभ, पक्षी बनून नक्की ये आणि आईला आवाज दे.
येशील ना?