अर्धांगिनी
अर्धांगिनी
असंच एक दिवस बाबांनी वयात आलेल्या सोनालीला विचारलं की, सोना आता यावर्षी तुझे एम.ए पूर्ण होईल, मनात विचार येतोय की तुझ्यासाठी एक चांगलं स्थळ शोधावं आणि तुझे हात पिवळे करावे।
मनात लाजल्यासारखी पण चेहऱ्यावर कोणताही भाव न उमटवत सोनाली बाबांना म्हणाली, काय हो बाबा तुम्हाला एवढी घाई झालीय. मी काय तुम्हाला ओझं झालीये का?
आपल्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवत बाबा म्हणाले, सोनाली कधीही मुलगी आपल्या बापासाठी ओझे नसते ग. पण ती, 'दुसऱ्याच धन' असते हे मात्र खरं. बरं ते सोड मला सांग तुझी अपेक्षा तरी काय आहेत? तुझा जीवनसाथी कसा असावा असं तुला वाटतंय?
सोनाली लाजऱ्या स्वरातच सांगू लागली, बाबा माझा जीवनसाथी असा असावा की ज्याच्यामुळे समाजात माझा मानसन्मान वाढावा.
भाऊराव जरा हसले आणि आपल्या मुलीला म्हणाले, हो ग माझी लाडकी चिमणी शोधूया मग तसाच जीवनसाथी. त्यानंतर सोनालीसाठी अनेक स्थळं आली. डॉक्टर, इंजिनीयर, सी.ए पण सोनालीने मात्र सगळ्या स्थळांना नकार दिला. बाबांना कळेना की सोनाच्या मनात नेमकं काय चालू आहे. मग एके दिवशी बाबा म्हणाले, सोना अतिशय उत्तम स्थळ आणूनही तू नकार देत आहेस, तुझ्या मनात नेमके काय चालू आहे?
तुझे काही प्रेमप्रकरण तर नाही ना? सोनाली दचकून बाबांना म्हणाली, अहो काहीही काय बोलताय? मी काय तशी मुलगी दिसतेय का तुम्हाला? बाबा सोनालीला सावरत म्हणाले, अगं तसं नाही सोना, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. बरं मग ठिक आहे, उद्या एक मुलगा येतोय बघायला, यशवर्धन पाटील, पी.एस.आय (PSI) आहे. घरदार एकदम झकास, पैसाच पैसा आहे. तुला कसलीही कमी पडणार नाही आणि शिवाय मुलगा देखणा आहे.
बाबा हे सगळं सांगत असताना सोनाली मधेच बाबांना थांबवत म्हणाली,बाबा मला नकोय PSI नवरा.
पेशाने शिक्षक असलेले बाबा आता चिडले आणि सोनाला म्हणाले, अग काय बोलतेयस? PSI पण नको मग कोणता नवरा हवाय तुला?
सोना म्हणाली, बाबा तुम्ही चिडू नका, पण माझी लहानपणापासून इच्छा आहे की मी लग्न करीन तर एका फौजीशीच. म्हणून कुणी फौजी असेल तर बघा, देखणा नसला तरी चालेल।
भाऊराव आता जरा जास्तच चिडले आणि संतापातच सोनाला म्हणाले, डोकं फिरलंय का तुझं? अग एकटी मुलगी आहेस तू आमची. फौजीशी तुझं लग्न लावून काय आयुष्यभर चिंता करत बसू का आम्ही?
सोनालीला रडायला आलं. ती बाबांना म्हणाली, बाबा तुम्ही शिक्षक म्हणून मला अभिमान वाटत होता, पण आज तुम्ही असं बोलताय की तुम्हाला बाबा म्हणण्याची लाज वाटतेय मला. shut up म्हणून बाबांनी सोनाला गप्प केले. संतापातच ते तिला म्हणाले, उद्या यशवर्धन येतोय, तेव्हा पुढच्या तयारीला लागा. सोनाली तिच्या रूममध्ये रडतच गेली. दुसऱ्या दिवशी यशवर्धन आणि कुटुंब सोनालीला बघायला आले. सोनाली साडी वैगेरे नेसून तयार झाली. प्रश्न उत्तरांचा कार्यक्रमंच तो, चर्चा सुरू झाली. यशवर्धनने होकार दर्शविला. बाकीची बोलणीही झाली. शेवटी उठतांना सोनाली म्हणाली, की यशवर्धन मला तुमच्याशी लग्न करण्यात अजिबात रस नाही पण केवळ बाबा म्हणतायत म्हणून मी हे लग्न करतेय.
यशवर्धनला खूप राग आला, तो चिडून म्हणाला, सोनाली तुझ्यासारख्या उद्धट मुलीशी लग्न करण्यात मलाही रस नाही. चला आई बाबा. ते जात असतानाच भाऊराव विनवू लागले. अहो असे जाऊ नका, ती जे बोलली त्याबद्दल मी माफी मागतो. पण पाहुणे थांबले नाहीत.
आता मात्र भाऊराव अनावर झाले, ज्या लेकीला पाच बोटही लावली नव्हती, त्या लेकीला त्यांनी गालावर सपासप मारले. सोना खूप रडली. त्या दिवशी घरात कुणीही जेवले नाही. आई मात्र बाबांना समजावू लागली की, जाऊ द्या, करू द्या तिला मनासारखं, शेवटी तिचं नशीब।
काही दिवसांनी बाबांनी सोनालीचं लग्न तिच्या म्हणण्याप्रमाणे फौजीशी लावून दिलं. पण बाबांनी सोनालीशी अबोला धरला. सोना सासरी निघताना बाबांना नमस्कार करायला आली, पण बाबांनी तिला आशीर्वाद म्हणून खूप कडवट शब्दात निरोप दिला.सासरी जात असताना, रस्त्यात सोनाला बाबांचेच शब्द आठवत होते. "एक दिवस तुझ्या आयुष्यात खूप मोठं वादळ येईल आणि तू चुकीच्या निर्णयाबद्दल पश्चाताप करशील" सोनाला सारखे वाटत होते की, बाबा असे कसे बोलू शकतात.
पण काही दिवसांनी सोना संसारात रुळली. तिला आता आई बाबांचीही आठवण येईना. एका महिन्याच्या सुट्टीनंतर सोनाचा नवरा म्हणजेच, राहुलची जाण्याची वेळ आली. तो सोनाला सांगू लागला की, तू एवढी शिकलेली मुलगी पण एका फौजीशी लग्न करण्याचं धाडस दाखवलंस, म्हणून अभिमान वाटतो तुझा. सोना म्हणाली, फौजी जगातल्या कोणत्याही शिक्षणापेक्षा देशसेवेच शिक्षण मनाशी बाळगणाऱ्या फौजीची बायको आहे मी, फौजीण म्हणतात मला. दोघंही हसले आणि एकमेकांच्या सहवासात सगळ्यांचा निरोप घेण्यासाठी गावात हिंडले.
दुसऱ्या दिवशी राहुल गेला. सोनाला करमत नव्हतं. पण या ना त्या कामात ती मन गुंतवत होती. राहुलचा फोन यायचा दोघेही खूप बोलायचे, हसायचे. तीन महिने उलटले, फोनवरच्या गप्पा सुरूच होत्या. त्यात राहुल एके दिवशी खूप खुश दिसला कारण त्याच्या सोनाने त्याला आनंदाची बातमी कळवली, की तो बाप होणार. राहुलला काय करू आणि काय नाही असे झाले. बघता बघता सहा महिने उलटून गेले, राहुल तब्येतीची विचारपूस करू लागला. दिवसामागून दिवस जाऊ लागले. सोना सासू सासऱ्यांसोबत खुश होती.
पण एक दिवस मात्र सोना पूर्णपणे हादरली. कारण सीमेवर देशाचं रक्षण करणारा तिचा राहुल छातीवर चार गोळ्या झेलून शहीद झाला. सोनाली खूप दुःखी झाली कारण राहुल त्याचं बाळही बघू शकला नाही याची तिला खंत वाटली. राहुलचे शव गावात आणले, सोना हादरली पण डगमगली नाही. तिने सगळ्या गावकऱ्यांसमोर राहुलला सलाम केले आणि ती अभिमानाने म्हणाली, "फौजी तुमचे अपूर्ण काम, आपला छोटा राहुल पूर्ण करेल हे वचन आहे तुम्हाला." सगळ्यांनी डोळ्यात अश्रू भरून सोनालीला कवटाळले, जनसमुदायाने टाळ्यांचा आशीर्वाद वाहिला. राहुल आपल्या कणखर फौजीणीसमोर अनंतात विलीन झाला. कधीचा अबोला धरलेले बाबा सोनाला म्हणाले, सावर स्वतःला, तरी मी तुला म्हणत होतो, बाबांचं वाक्य पूर्ण होण्याअगोदर सोना म्हणाली, "बाबा तुम्ही आलात धन्यवाद,या आता." बाबांना अपमानास्पद वाटले, म्हणून ते निघून गेले.
काही दिवसांनी गावकऱ्यांनी शहीद राहुलचा पुतळा बांधला. सोना शिक्षिका म्हणून नोकरी करू लागली. गोंडस बाळ जन्माला आलं. बाळाचं नाव राहुल ठेवलं. नातवाला बघायला सोनाचे आईबाबा आले. बाबांचा अबोला कायम होताच. पण बाबांचे तरी काय चुकत होते, शेवटी ते एक वडील होते. आपल्या एकुलत्या एक मुलीसाठी त्यांनी मनात अनेक स्वप्न रंगवली होती आणि सोनाने मात्र तिची जिद्द पूर्ण केली. दोष कुणाचाही नाही शेवटी दैव सगळ्या गोष्टींना आपापले महत्व असतेच. आईबाबा निघाले. निघताना सोनाला म्हणाले की, येत जा घरी अधून मधून.
काही दिवस उलटले, सोना अचानक एक दिवस बाबांकडे आली. बाबांना तिला बघून धक्का बसला. कारण तिच्या हातात एक मोठी बॅग आणि वर्तमान पत्र होते. बाबांना वाटले की सोना आता कायमची इथेच राहायला आली असेल. बाबा सोनाला म्हणाले, काय ग सोना काय झाले आणि तू अशी अचानक. सोना म्हणाली हो बाबा मी तुम्हाला न कळवताच आले, कारणही तसेच होते. बाबा सोनाला म्हणाले हे बघ पोरी मी आजही तुझ्यावर तेवढंच प्रेम करतो, पण असं स्वतःच घर सोडून येणं बरं नाही. लग्नानंतर मुलीचं घर तिचं सासरचं.
सोना मधेच म्हणाली, एक मिनिट बाबा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी माझं घर सोडून नाही आलीये, मी तुम्हाला हे वर्तमान पत्र द्यायला आलीये आणि हो ही बॅग, अहो यात काही सामान आहे तुमच्यासाठी, माझ्या राहुलने घेतलेलं. तो जम्मू काश्मीरला असताना त्याने तुमच्यासाठी, आईसाठी सुंदर कपडे आणि शाल घेतलेली. तेच तुम्हाला द्यायचं म्हणून मी आले, येतांना रस्त्यात वाचनालयात पेपर वाचला तर एक बातमी कळली, म्हटलं तुम्हालाही सांगावी.
बाबा सुन्न झाले, सोनाने वर्तमानपत्र त्यांच्या हातात टेकवले आणि ती वाचू लागली, "PSI यशवर्धन पाटील यांची स्वतःला गोळ्या झाडून आत्महत्या, भ्रष्टाचारात अडकलेल्या परिस्थितीला कंटाळून संपवले यशवर्धन यांनी जीवन. यशवर्धन यांच्यावर लाच घेण्याचा आरोप."
बाबा हा तोच यशवर्धन, ज्याच्याशी तुम्ही माझे लग्न लावून देणार होतात. बाबा कदाचित कोवळ्या वयात विधवा होणं, माझ्या नाशिबातच लिहीलं असेल, पण भ्रष्टाचारी यशवर्धनची विधवा होण्यापेक्षा, शहीद राहुलची विधवा होण्याचा अभिमान वाटतोय मला.
बाबा निःशब्द झाले. थोड्या वेळानंतर भानावर आले तर आपली लाडकी लेक दरवाज्यातून बाहेर जाताना दिसली. त्यांनी सोना म्हणून आवाज दिला. सोना थांबली. बाबांकडे वळून म्हणाली, "बाबा तुझ्या आयुष्यात एक दिवस खूप मोठं वादळ येईल, असा आशीर्वाद देण्यापेक्षा सौभाग्यवती भव, असा आशीर्वाद दिला असता तर किती बरं झालं असतं ना?"
सोना पुन्हा बाहेर जाऊ लागली.
बाबा,सोना सोना आवाज देत होते.
पण फौजीण सोनाने मागे वळूनही बघितले नाही.