कायदा (*६०*) साठीचा
कायदा (*६०*) साठीचा


नुकताच एक कायदा घोषित झाला. वयोवर्ष साठ वृद्धत्वाला न्याय... वृद्ध मायबापांची जबाबदारी मुलांनी घ्यावी आणि जो पाल्य यथायोग्य काळजी घेईल त्यासाठी म्हणे सरकारकडून प्राप्तीकरात सूट मिळेल ! वृद्धाश्रमी असलेल्या मात्यापित्यांची सर्वेक्षण करुन अशा मुलांबाबत योग्य निर्णय घेतला जाईल. आईवडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांकडून स्थावर संपत्ती परत घेता येईल अशा प्रकारच्या तरतुदी करण्यात आल्या. ह्या स्वरूपाची बातमी नुकतीच पेपरमधे छापून आली. अंर्तमुख करायला लावणारी हेडलाईन...
खरंतर आपल्या लोकशाही आणि कुटुंबवत्सल देशात अशा काही कायदेशीर गोष्टी कराव्या लागाव्यात हेच किती खेदजनक आहे. त्यात असेही म्हटलेले आहे, हल्ली धकाधकीचे जीवन आणि कमी आर्थिक उत्पन्नामध्ये आईवडिलांना सांभाळणे कठीण होते आहे... काही अंशी मान्य... परंतु सद्यस्थितीत बरेच पालक पेन्शनर आहेत. स्वतःचा खर्च स्वतः भागवू शकतात. शिवाय त्यातून मुलांच्या संसारालाही हातभार लावतात. खेड्यापाड्यात मात्र वेगळी स्थिती आहे. तेथील शेतकरी वर्ग, छोटा उद्योजक यांच्याकडे म्हातारपणी पैसा नाही म्हणून त्यांना डावलणे, वाऱ्यावर सोडणे कितपत योग्य आहे ? काही पर्याय आहे का त्यांना ! अशांना तर वृद्धाश्रमात पण जागा नसते... कारण बरेचसे आश्रम भाडेतत्वावर चालतात आणि जे सेवाभावी विचारातून चालतात तिथे खरचं जेष्ठांच्या सोयीयुक्त असतात ! मनाने विकलांग झालेल्या वयाचं भान ठेवून जिव्हाळा, प्रेम मिळते ? की उपकार भावना असते की नाईलाज... की अतिरिक्त काळ्या धनाचा सदुपयोग, त्यातून समाजसेवेचे पुण्य पदरी पडावं म्हणून केलेला खटाटोप ! ज्याला ना मायेचा ओलावा ना दुःखाचा पालव....
जन्मदाते जड व्हावे एवढी संकुचित प्रवृत्ती कशामुळे निर्माण झाली... कुठे हरवला माणसाचा विवेक ? का नकोशी झालीत जिवंत माणसांना जिवंत माणसं ? का नकोत नाती ? ज्यांनी आयुष्य पणाला लावून, त्याग समर्पण देऊन नव्या पिढीला घडवले, सुसंस्कृत केले त्यांनीच का नाकारावी जुनी पिढी ! का ओझं वाटावं ! प्रत्येक नकारात्मक गोष्टींचा सबंध यांच्यापाशीच का रेंगाळावा ? सासूसासरे चुकीचेच असतात, वागतात हा ग्रह लेकीसुनांच्या मनी का पक्का असतो ? मुलांना आपले जन्मदाते कसे आहेत हे शेवटपर्यंत कळू नये ? सहचारिणी त्यांच्याबाबत जे बोलेल, सांगेल हेच अंतिम सत्य, इतकं खात्रीशीर असावं, तेही विधान कुणाप्रती केले जाते याची जराही खंत, चीड नसावी, विश्वास नसावा, किती निर्बुद्धपणा हा. म्हातारपण शाप वाटावं इतकं तिरस्करणीय व्हावं.
कुटुंबातील सदस्यांनी हे कुठेतरी, कुणीतरी थांबवायला हवं. पुढाकार घेऊन रोखायला हवं, अन्यथा घराएवजी वृद्धाश्रमचं जागोजागी उभे दिसतील... भकास, अंधारमय, प्रत्येक वयाची साठीचा श्वास असाच गुदमरून जाणार का ?
जरा विचार करून पहा, जास्त काही नको यांच्या जगण्याला दोन प्रेमाचे शब्द, आपुलकी अन मायेचा स्पर्श आणि पोटासाठी थोडेसे अन्न जेवढे महिन्याकाठी तुमचे हाॅटलिंगचे बिल होते त्यातल्या फक्त चौथ्या हिश्श्यात यांचा खाण्यापिण्याचा खर्च भागेल हो... मित्रमैत्रिणींना पार्ट्या देताना कधी खर्च डोईजड वाटतो का तुम्हाला ? मग जन्मदात्यांसाठीचा हिशोब का अनावश्यक वाटावा. घरात अडचण व्हावी, अडगळ वाटावी इतकी का कवडीमोल ठरावी आयुष्याची संध्याकाळ ! साध्या कागदी रद्दी, शोपिस, भौतिक वस्तू यांना तुमच्या घरात स्वतंत्र जागा मिळावी अन् आईबापाची सोय करताना जागा कमी पडावी... किती मोठा विरोधाभास आहे हा विचाराचा... कुत्र्यामांजरांना जागा मिळाली प्रेम मिळावे, काळजी घेणारी मनोवृत्ती सख्ख्या नात्याच्या रक्ताप्रती इतकी उदासीन, बेजबाबदार का व्हावी ? का बेफिकीर असावी ? या वयाला काय हवं असते हो... फक्त निरपेक्ष प्रेम, मायाममता... बाकी कसलीच आस नाही की भास नाही. हवी असते फक्त मायेची ऊब. म्हणतात वयाची साठी आणि बुद्धी नाठी पण असे नाही हो... मनाने हळवे झालेले असतात जीवनातले टक्केटोणपे सोसताना, धकाधकीच्या आयुष्याला स्थिरत्व यावं, समाधान लाभावे हे वाटणे स्वाभाविक आहे. स्वतःसाठी जगायचे राहून गेलेले क्षण पुन्हा मनमोकळेपणाने फुलवले तर तरुण पिढी उपहासाने म्हणते म्हातारचळ लागलंय, वय झाले पण सोय येईना आम्हास समाज नावं ठेवतो हसतो यांच्या थिल्लर वागण्यामुळे असा तक्रारीचा सूर निनादतो सतत आणि एकटेपण घालवण्यासाठी केलेला प्रयत्न उपदव्याप, मूर्खपणा यात गोवावा ! नाही पटत हे सर्व...
वयाची साठी ...म्हणजे
अनुभव शिदोरी
असावी घरोघरी
अशी ही माधुरी ...
मुलगा असो वा मुलगी बऱ्याच ठिकाणी आईवडिलांची जबाबदारी काहीतरी पळवाटा शोधून नाकारली जाते. काही मुलंमुली तर वृद्ध आईवडिलाकडूनचं यावयातसुध्दा भरपूर अपेक्षा ठेवून असतात... पैसा, श्रम, घरगुती कामं, नातवंडाची पूर्ण जबाबदारी त्यांच्याच वास्तुत अश्रितासारखी वागणूक मिळते. सतत अवहेलना, पदोपदी अपमान तुम्ही कसे निष्क्रिय आहात याची जाणीव देत असतात... कृतीतून वा शब्दातून... ह्या अशा वागण्याचे परिणाम पुढे जाऊन लेकराबाळांच्या मनात संस्कार घडतील याची जराही जाण, भान नसावी एवढे बेफिकीर...
आपण काहीतरी, कुठेतरी चुकतो याचे अजिबात भान न ठेवता उलट मानसिक टाॅर्चर करून बेदखल करून मोकळे होतात.
सर्वच मुलंमुली आईवडिलांची काळजी घेत नाही असेही नाही... काळजी घेणारे, भावना जपणारे, कष्ट सोसलेल्या हाल अपेष्टांची जाणीव ठेवणारे / असणारे ही आहेत. ज्या घरी आईबाप समाधानी, आनंदी असतात ते घर सदैव चैतन्यमय राहते. तिथे सुखसमृद्धीची अजिबात वाणवा नसते. लक्ष्मी आणि सरस्वती दोघी एकत्र बघावयास मिळतात. एक वेगळीच सकारात्मक उर्जा असते अशा घरात. सुखशांती नांदते समाधान असते. घर एक मंदिर भासावं अशा संवेदना जागृत असतात...
कायद्याने जेष्ठांना अनेक सवलती दिल्या पण त्यांची कायदेशीर पूर्तता करताना जीव मेटाकुटीस येणार मनावर दबाव येणार, पर्यायाने शारीरिक व्याधी, डिप्रेशन येणार. असुरक्षितता जाणवेल, असुरक्षित होतील... संपत्तीसाठी जन्मदात्यांना कायमचे संपवणारे राक्षसही आहेत इथेचं...
मातृपितृ देवो भवः मानणारी संस्कृती आणि तिचे असे भयानक रूप समोर दिसावे ! काय म्हणावे या वृत्तीला !
मुलांच्या नावे केलेली संपत्ती पुन्हा नावावर येऊ शकेल, परंतु होणाऱ्या मानसिक त्रासामुळे जगण्याची उमेद कशी मिळणार... अशा मुलांना धडा शिकवला जाईल परंतु किती जण त्या भितीपोटी आपल्या पालकांचे उर्वरित आयुष्य सुखी करतील हे काळचं ठरवेल. प्रत्यक्षात कायद्याचा धाक म्हणून निरस, बेगडी वागणं असेल की आणखी काही सांगता येणार नाही. मानसिक गरज अपूर्णचं राहील हेही तितकेच खरे वास्तव... कारण खाणेपिणे, औषधोपचार एवढीच वृद्धात्वाची गरज नसून मायाप्रेम, जिव्हाळा, आपुलकी यांची गरज असते... सशक्त आधार हवा असतो...
गरज आहे समजून घेण्याची, गरज आहे मानसिकता बदलण्याची, गरज आहे संस्कारक्षम पिढी निर्मितीची, गरज आहे आपल्यातले माणुसपण जागृत करण्याची आणि एक चांगला विचार रूजण्याची... मुळात असे कायदेच अस्तित्वात यावे हे सुसंस्कृत आणि कुटंबवत्सल देशात जन्माला यावीत हेचं खरं तर आपले दुदैव !
मातृपितृ देवो भवः मानणारी संस्कृती तिचे असे भयावह रूप समोर यावे...केवढे दुर्भाग्य आपले ....!