हरवलं माझं अंगण ..भाग (2)
हरवलं माझं अंगण ..भाग (2)


*हरवलं माझं अंगण*...भाग ...(2)👇👇👇
आई माझी भाग्यलक्ष्मी पहाटे चार वा. तिचा दिवस सुरु व्हायचा. घड्याळ ,गजर याची कधी तिला गरज वाटली नाही अगदी बरोबर त्याच वेळेला कोंबडा आरवायचा जसा गर्भातल्या नारायणासाठी शंख पुकारून स्वागत करतो ... आईचा उठण्याची वेळ कधीच मागेपुढे होत नसे . गर्भपहाट हळूहळू खुलायची तशी तिची लगबग चालायची , शुचिर्भूत होऊन गायीगुरांचा गोठा घर अंगणाची झाडझूड करुन चुल पोचारून ,पेटवून पातेल्यात आंघोळीसाठी पाणी गरम करायला ठेवून अंगणातल्या तुळशीपुढे शेणाचं सारवण .... तो वास नाकाला अत्तरगंधापेक्षाही मधुर भासायला ... तिकडून सूर्यनारायण आणि इकडून आईची तुळसपूजा साक्षात रूक्मिनी ऊभी आहे अंगणात ,....आईची सखी वाटायची तुळस .प्रदक्षिणा घालताना काहीतरी पुटपुटायची ...नतंर गोठ्यातल्या गाईला हळदीकुंकू लावून कोरभर भाकरी मुखात द्यायची ... मायेनं पाठीवर हात फिरवायची तेव्हा गाय लाडानं हंबारायची अन आईचं तोंड चाटायची दोघी एकमेकीच्या मुके घेताना जशा. मायलेकीचं ....आईच्या बांगड्यांची किणकिण आणि पायातल्या नऊ भार जोड्यांची टपटप आवाज अख्ख्या घरादाराला किती मायेनं जागवायचा. तुळशीपुढे तेवणारी पणती अख्ख अंगण उजळून सूर्यदेवाला रामराम घालायची ...थोड्या दूरवर एक चुलत आज्जी मोठ्या आवाजात हरीपाठ म्हणायची तिच्या आवाजानं संपूर्ण गाव भक्तीमय व्हायचा ... दारापुढच्या लिंबाचे झाड त्यावर आईनं अंड्यासाठी पाळलेल्या कोबंड्या रात्रभर झोपलेल्या ...फडफड करत खाली यायच्या आई त्यांना मुठभर दाणे ऊकीरड्याच्या बाजूला फेकायची प्पाप्पा असा आवाज दिला की त्या भरभर गोळा होऊन दाणे टिपायच्या त्यांच्यात एक लालकरडा रंगाचा मोठा लालचुटुक तुरा असलेला कोंबडा कर्ता पुरुष भासायचा ...गावात सगळीकडे घोळ किंवा तुर्हाटीच्या काड्यांचा झाडूचा खरखरा झाडताना आवाज ठेका धरून पेटलेल्या चुलीतला धूर अन धुळ सा-या गावभर फिरायचे ...आई म्हणायची उठा रे लेकरांनो रखमाआईने पांडुरंग जागवला तुम्हीही ऊठा आता ...राखेचा डेपसा ठेवला बघा चुलीच्या भानोशीवर दात घासून तोंड धुवून घ्या ...
तोपर्यंत बाप माझा गायीम्हशीची धार काढून लिंबाच्या झाडावर बादली टांगून जनावरांना चारावैरण खायला घालून शेताकडे जायच्या तयारीत असायचा ...गुळ घातलेला चहा उकळता उकळता दोघजन दिवसभराच्या कामाचे नियोजन करायचे ..चहा पिऊन झाला की आई आमच्यापुढे निरस्या दुधाची बादली अन तांबे ठेवायची ,.. वडील म्हणायचे पोरांनो कच्चंच दुध प्यायचे लय ताकद असते कच्च्या दुधात तांब्यातांब्या दुध प्यायचो आम्ही ..एक तांब्या दुधाचा भरून घमेल्याखाली आई झाकून ठेवायची ...बापाला रोज जेवताना दुधभाकरीचा काला करुन द्यायची .उरलेलं दुध आई शेजारीपाजारी कुणी दुध मागितले तर फुकट द्यायची कारण वडील म्हणायचे दुध कधी विकायचं नाही .पोराबाळांना खाऊ दे भरपूर दहीदुध ,ताक ,तुप
दुध म्हणजे गोरख त्याला कधी मोल लावायचा नाही.
आई कधीतरी दुधभाकरीचा काला खाताना दिसायची . सगळ्यांना पोटभर मिळाले पाहूनचं तीचं पोट भरायचं . समाधानाचं तेज चेहऱ्यावर झळकायचं
दुध पिकवायचा बाप माझा ...
भरल्या गोकुळात नांदायचो
दहीताकातून लोण्याचा गोळा
आई ओंजळी अलगद झेलायची .