भारत स्वतंत्र आहे का ?
भारत स्वतंत्र आहे का ?


१५ आँगष्ट २६ जानेवारी याचं दिवशी आपल्याला स्वातंत्र्याचे उमाळे येतात. ,देशाप्रती अतिव ,ओतीव ,रेखीव देशप्रेम जागे होते . आणि झेंडावंदन पार पडले की पुन्हा ये रे माझ्या मागल्या....आम्ही जातो फिरायला ....अशी तऱ्हा. भारत स्वतंत्र होऊन ७० वर्षे झालीत .आजचा ७१वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे.आजपर्यंत देशाची किती ,कशी अन कोणती प्रगती झाली ?......, थोर विचारवंत , थोर महापुरुष थोर सेनानी , अनंत लहानथोर व्यक्तींनी प्राण पणाला लावून स्वातंत्र्याची धगधगती मशाल स्थिर केली. अंधकारातून प्रकाशवाटा भावी पिढीसाठी तयार केल्या ...पण आपण कुठल्या वाटेने चाललोय हे आज प्रत्येकाने बघणे गरजेचे आहे. आज भारत स्वतंत्र आहे की अख्त्यारितली मालमत्ता हा प्रश्न पडतो. कारण.... स्वार्थी राजकारण , काळ्या पैशातून जन्मलेलं ढोंगी समाजकारण आणि प्रत्येक क्षेत्रात बोकाळलेला भ्रष्टाचार , देशात माजत चाललेली अराजकता , कशाचे द्योतक आहे ? ......न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून त्यातून निर्माण होणारी हिंसक प्रवृती स्वतःच्याचं मालमत्तेचे नुकसान करते.तेव्हा कसे अन कोणते देशाचे हित जपले जाते ! स्वतंत्रतेचे भान असते का ?
प्राणांचे बलिदान देऊन पारतंत्र्यातून खेचून आणलेल्या शूर वीरांच्या विचाराप्रती , त्यागाप्रती ,हाल अपेष्ठांप्रती कोणती बांधिलकी जपतो ! आपण....
देश शिक्षित झाला तर जगावर राज्य करेल , अशा दूरदृष्टी विचार असणारे महात्मा ज्योतिबा फुले ,आगरकर , राजाराम मोहनराँय यांनी जी चळवळ ऊभारली तिला आपण काय स्वरूप दिले ?.... जनतेच्याचं पैशातून निर्माण केलेल्या गडगंज संप्पतीतून सरस्वतीचे नव्हे पैशाचे झाडे ऊभारून फक्त माया जमवणारी मंडळी कसे काय विद्येचे प्रसारक होऊ शकतात.? .तिथे न गुणवत्ता ना नितीमत्ता फक्त सत्ता काम करते.
जातीपातीचे लेबलं लाऊन सरस्वतीची अहेवेलना केली जावी इतका हीन दीन विचार असावा !
कसा होईल भारत सुशिक्षित.... का वागतो आपण असे का सोसतो आपण हे सारे ....याला स्वातंत्र्य म्हणायचे की पारतंत्र !
आयाबहिणींवर भर दिवसा भर माणसात अन्याय ,अत्याचार ,बलात्कार होतो तेव्हा आपण काय भूमिका घेतो ! ...कोणती नैतिकता निभावतो !
स्वच्छतेचे दूत संत गाडगेबाबा यांचा आर्दश फक्त पुरस्कार घेण्यादेण्यापुरताचं काहो ....स्वच्छतेसाठी पुरस्कार आणि भल्या मोठ्या रकमेची लालूच द्यावी लागावी ! स्वतःच्या घराईतकीचं बाहेरही अंर्तबाह्य स्वच्छतेची काळजी घेतो का आपण ? घेतली तर जागोजागी अंगुलीनिर्देशक फलक लावायची गरज पडली नसती.
जन्मदाते हक्काच्या घरातून वृद्धाश्रमात का पोहचतो . का ? त्यांच्या स्वस्थ , निर्भय ,निच्छींत जगण्यासाठी कायद्याची गरज भासावी . का मुलीचा गर्भ सुरक्षित ठेवण्यासाठी कायद्यात शिक्षेची तरतूद करावी लागावी ! का हुंडाबळी व्हावे ...का सर्व ठिकाणी नियमभंग करावेत ..., गुन्हेगारी का वाढावी , का माणूस माणसाशी माणसासारखा वागत नाही.? या सर्व प्रश्नातून एक वास्तव यक्षप्रश्न निर्माण होतोयं ... भारत स्वतंत्र झाला , पण विचार परतंत्री झाले ...मी अन माझं एवढी संकुचित वृत्ती , प्रवृत्ती झपाट्याने वाढू लागल्याने विकास स्वकेंद्रित झाला ,.. कक्षा मर्यादित होताहेत . स्वातंत्र्याचा उपभोग घेताना माणूस सेल्फीश झाला.
हल्ली देशपातळीवरचे मोठे देशहिताचे निर्णय घेतले गेले ( असे भासवले तरी गेले ) नोटबंदी ,G.S.T , प्लॅस्टिकबंदी काय निष्पन्न झाले ,काय साध्य केले ?...काही ज्यांची चलती त्यांना नाही लागली गळती ...फक्त ताण आणि त्रास सर्वसामान्य व प्रामाणिक माणसालाचं झाला . तोही एक कुटील राजकारणाचाचं भाग ठरला .हाती फक्त सहीशिक्का्यांचा निष्क्रिय कागद उरला. गौडबंगाल सारे.
जोपर्यंत प्रत्येक मनात भारत माझा देश आहे अशी भावना सदोदित , श्वासागणिक , कृतीतून येत नाही तोपर्यंत स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहणाऱ्या भूमीपुत्रांचे आपण सारे कणभर का होईना उतराई होऊ शकणार नाही . देश माझा आहे , त्याचे संरक्षण , जपणूक , विकास मी करणारचं ही भावना खोलवर रूजायला हवी . ही काळाची गरज आहे.स्वयमशिस्त लागायला हवी .जागृती व्हायला हवी. कुविचारांच्या पारतंत्र्यातून भारत स्वतंत्र करूया . प्रगतीसाठी सारे एक होवूया.
आदम गोंडवीची एक ओळ आहे .ती मला फिरूनफिरून आठवतेः
' सौ मे सत्तर आदमी...
फिलहाल जब नाशाद है...
सर पे रखके हात कहीये...
देश क्या आझाद है ?...
🌸जयहिंद 🌸...वंदे मातरम् 🙏