The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

pranav kode

Tragedy

3.8  

pranav kode

Tragedy

काळ आला आणि वेळही

काळ आला आणि वेळही

6 mins
9.1K


सायन्सचा पेपर देऊन नेहा धावत घरी आली. नेहमीप्रमाणे पेपर भारीच होता. मग काय स्वतःबरोबर घरातलं वातावरण पण रिलॅक्स करत होती, पण इतर मुलांसारखं मात्र तिचं अजिबात नव्हतं. आईला आज नेहमीपेक्षा उशीर झालाय पाहून तिनेसुद्धा पटापट आवरायला मदत केली. मानसीने तर तिच्या टेबल खुर्चीसोबत जून पासूनच तासांसाठी गट्टी केलेली, त्यात बोर्डाच्या परीक्षेला फक्त तीन महिनेच उरल्यामुळे पुस्तकासमोर नातेवाईक मित्रांसोबत ती स्वतःलाही पूर्ण विसरून गेली होती. खूप मोठ्ठ व्हायचं आणि उंच आभाळात विमान उडवायचं हे तिने पाचवीत असतानाच ठरवलेलं आणि तिच्याच पावलावर पाऊल ठेवत नेहासुद्धा सहावीत असूनही ताईची पुस्तकं आवडीने चाळायची. एक आदर्श नातं कसं असावं याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे या बहिणींची जोडी होती. आई-वडिलांनाच नाही तर त्यांच्या शाळेला सुद्धा त्यांचा खूप अभिमान होता.

घड्याळात दहा वाजले, मालाडला साडेदहाची चर्चगेट फास्ट पकडण्यासाठी आईची घाई सुरु होती. घाईघाईत दोघींना नाश्ता दिला आणि आणि सर्व जेवण व्यवस्थित घ्या सांगून लगेच निघाली. बाहेरून टाळे लावता लावता ''मनूला त्रास देऊ नकोस '' असं नेहाला बजावायलाही विसरली नाही. बाबा लवकर कामावर जात असल्याने तशा दिवसभर दोघी एकट्याच. पण त्या एकटेपणाची भीती किंवा त्रास त्यांना कधीच वाटला नाही. दोघी एकमेकांची व्यवस्थित काळजी घेत दिवसभर मस्त राहायच्या. आई घाईघाईने निघाल्यामुळे नेहाने उरलीसुरली कामं उरकली आणि टिव्ही सुरु केला. लहानपणापासून फक्त पुस्तकं, अभ्यास आणि खेळ अशा संस्कारांमुळे दोघींनाही तसं टिव्हीच वेड कमीच. बघितलंच तर कधीतरी बातम्या किंवा ऐतिहासिक मालिका एवढच काय ते त्यांचं मनोरंजन. पण मग ताईला त्रास नको म्हणून नेहाने टिव्ही बंदच केला.

साडे अकरा वाजून गेलेले, मानसी तिच्या दिनक्रमाप्रमाणे सराव पेपर सोडवत होती. मग नेहासुध्दा वेळ जाण्यासाठी गोष्टीची पुस्तकं घेऊन बसली. घड्याळात बारा वाजलेले, मानसीचे उरलेले तास भराभर जाता होते पण नेहाचा वेळ मात्र जाता जात नव्हता. शेवटी आतल्या खोलीत जाऊन तिचं आवडतं काम घेऊन आली. जानेवारीतल्या आई बाबांच्या अनिव्हर्सरीची तयारी तिने नोव्हेंबरमध्येच सुरु केलेली. मग ग्रीटिंगचं सगळं सामान घेऊन ती आपल्या कामात मग्न झाली. मोठ्या बहिणीला चित्रकलेची तर तर हिला हस्तकलेची प्रचंड आवड. शाळेत दरवर्षी पहिल्या तीन क्रमांकात असूनही प्रत्येक स्पर्धेत शाळेला दोघींकडून हमखास खात्री असायची. दोन वाजले मानसीचा पेपर पूर्ण झाला. पुस्तकं आवरता आवरताच मानसीने मोठ्याने विचारलं ''आज जेवायचा विचार आहे का मॅडम'' तेव्हा मॅडमचं लक्ष घड्याळाकडे गेलं. ''तुझा पसारा आवरून ठेव तोपर्यंत मी जेवण वाढते'' म्हणत मानसी किचनमधे गेली. मानसीने तिच्या आवडीचा रेडिओ सुरु केला आणि दोघी जेवायला बसल्या. सगळं पुन्हा पुन्हा आठवूनसुद्धा मानसीने विचारलंच , ''अजुन काही सांगितलं नव्हतं ना आईने नेहा''. नेहा लगेच हसत ''विसरभोळी गं माझी ताई'' म्हणत किचनमधे गेली, फ्रिजमधून दह्याची पातेली काढली. आईने सकाळी घाईघाईत चुकून पातेली झाकण न ठेवताच आत ठेवलेली. दह्याचा रंगसुद्धा किंचित बदललेला होता. पण सहावीतल्या मुलीला एवढ कुठे लक्षात येणार म्हणा नेहाने दोन वाट्यांमध्ये दही घेतलं आणि झाकून पुन्हा आत ठेवलं. मानसीने हाक मारताच ''हे बघ ताई तुझ्यासाठी मी आईस्क्रिम बनवून आणलंय'' असं गमतीत म्हणत तिच्या हातात वाटी दिली मग गाणी ऐकत ऐकत दोघींचं जेवून झालं. सगळी कामे आटोपून दोघीही शांत बसल्या. मग दिवसभर अभ्यास केल्यामुळे नेहानेच ताईसाठी बुद्धिबळाचा डाव मांडला. नेहमीप्रमाणेच रडून चिडूनसुद्धा तासाभरातचं नेहाचा डाव गडगडला. साडेतीन वाजलेले आज आईचा फोन कसा नाही आला म्हणत नेहाने फोन बघितला तर चार्जिंग नसल्यामुळे तो बंदच झालेला नंतर चार्जिंगला लावते म्हणत नेहा पलंगावर पुस्तक वाचायला बसली आणि मानसीसुद्धा खुर्चीवर जाऊन बसली. ''डोकं जड झाल्यासारखं वाटतंय ग ताई" नेहा मानसीला म्हणाली "आज खेळताना थोडा डोक्याचा वापर केला असशील" असं गमतीत म्हणत तिने दुर्लक्ष केला. नेहा पुस्तक वाचता वाचता तिथेच झोपली आणि इकडे मानसीसुद्धा डुलक्या काढू लागली. आज लवकर उठल्यामुळे झोप येत असावी म्हणत मानसीने डोकं टेकून विश्रांती घेते म्हटलं.

दुपारच्या कधी चुकूनही न झोपणाऱ्या या दोघी आज दमल्यासारखं वाटल्याने गाढ झोपी गेलेल्या. थोडावेळ म्हणता म्हणता एक तास झाला दोन तास झाला सहा वाजता कुणीतरी दार ठोठावले. आठ-दहा वेळा बेल वाजवल्यावर मानसीला जाग आली. पण तोपर्यंत दारावर कुणीच नव्हते. मानसीला स्वतःलाच कळत नव्हते आपल्याला काय होतंय. पाच पावले चालण्याइतकेही त्राण तिच्यात नव्हते. तरीही तशीच चालत ती नेहाजवळ गेली नेहाला उठवायला हात लावला तर चटका बसण्याइतकं तिचं शरीर तापलेलं. मानसीने तरीही तिला उठवून पाणी दिलं "काय होतय नेहा" मानसीने विचारलं "पोटात दुखतंय थोडं" नेहा डोळे न उघडताच म्हणाली. नेहमीच्या मेडिसिन बॉक्समधली एक गोळी दिली. नेहाच्या पोटातही अचानकच दुखू लागलेलं. ती तशीच पडून राहिली सात वाजून गेलेले बाहेर हळू हळू अंधार पसरत चाललेला, आईला फोन करायला गेली. तर फोनही बंद. बिल्डिंगमधे राहण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे शेजाऱ्यांना काही कल्पनासुद्धा येत नाही. थोडा वेळ चार्जिंगनंतर फोन सुरु झाला. लगेच आईला फोन लावला. नेहाविषयी सगळं आईला सांगताना स्वतःबद्दल मात्र एकही शब्द तिच्या तोंडून फुटला नाही. आईलाही मानसीचा आवाज ऐकून काहीच सुचत नव्हते आईने लगेच शेजारच्या काकूंना घरी बघायला सांगितलं. काकींनी हात लावला तर नेहाला १००च्या वर ताप होता. मग त्यांनी क्षणाचाही विलंब न करता लगेच काकांना बोलावले. काकांनी दोघींना त्यांच्या गाडीत बसवलं आणि काकींसोबत लगेच डॉक्टरकडे निघाले काकींनी मानसीला हात लावला तर तिलाही नेहा इतकाच ताप होता. पण नेहाच्या काळजीमुळे तिचं स्वतःचं पोट दुखत असुनही तिने दुर्लक्ष केलं. मानसीला फक्त रडू येत होतं. काकांच्या सांगण्यावरून डॉक्टरांनी दोघांना तपासले दोघीनाही हात लावताच लगेच हॉस्पिटलमधे नेण्यास सांगितलं, कारण दोघींचीही तब्येत खूप नाजूक झालेली. तिथून ट्रॅफिकमुळे हॉस्पिटलला आणखी अर्धा तास, नेहा तर असह्य पोटदुखीमुळे हलूसुद्धा शकत नव्हती. मानसीलाही आता सहन होत नव्हते. हॉस्पिटलमध्ये लगेच अॅडमिट करून डॉक्टरांनी रक्त तपासले तर रक्तात अन्नातून विष असल्याचे आढळले. हॉस्पिटलध्ये पोहोचेपर्यंत नेहाची शुद्धच हरपलेली. डॉक्टर नेहाला लगेच आय सी यू मधे घेऊन गेले. मानसीची तब्येतसुद्धा नाजूकच होती, पण कदाचित तिच्या प्रतिकारक्षमतेमुळे तिच्या शरीरात विष पसरायला नुकतीच सुरुवात झालेली. बाहेर पूर्ण काळोख पडलेला, काकीसुद्धा नेहाला बघून आतून खूप घाबरलेल्या. काका डॉक्युमेंट्स पूर्ण करत होते त्यामुळे काकी बाहेर एकट्याच बसून नामस्मरण करत होत्या. तितक्यात मानसीचे आई बाबा आले. आईने बाहेरूनच नेहाला बघितलं रोज इकडून इकडे धावणाऱ्या आपल्या मुलीला असं सुया लावून झोपलेलं पाहून कोणत्या आईला अश्रू आवरता येतील. काकी आईला शांत करत होत्या तितक्यात डॉक्टर आले आणि मानसीची प्रकृती स्थिर असल्याचे सांगून नेहा विषयी बोलू लागले त्यांच्या त्या समाजवण्यावरून स्पष्ट कळत होते, की नेहाची तब्येत आणखीनच नाजूक होत चाललेली. मानसीसुद्धा इंजेक्शनमुळे बेशुद्धच होती. एकीकडे डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न तर नेहाचा स्वतःसाठीच सुरु असलेला संघर्ष. नेहाचं शरीर उपचारांना पाहिजे तितकी साथ देत नव्हतं डॉक्टर त्यांचे प्राण एकवटून प्रयत्न करत होते. पण त्यांचे ते प्रयन्त फक्त प्रयत्नच राहिले. इवल्याश्या गोड मुलीने अखेर तिची मृत्यूशी झुंज संपवली.

साडेआठ वाजलेले सर्वात आधी डॉक्टरांनी बाबांना कळवल्यावर त्यांना स्वतःला सावरणं खूप कठीण होतं. पण कुटुंबाचा विचार करून त्यांना धीर देण्यासाठी स्वतः दगड होणं किती कठीण असतं हे फक्त एक बापच समजू शकतो. आईला कळल्यावर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. अश्रूंना वाट मोकळी करून देण्याचीही हिम्मत नव्हती तिच्यात. मानसीला कळल्यावर ती विश्वासच ठेवायला तयार नव्हती. शेवटी बहिणीला असं शांत निजलेलं पाहून ती शुद्धीत येऊनसुद्धा बेशुद्धच होती. शेवटी घरातील अन्नाची तपासणी केल्यावर एक भयानक गोष्ट समोर आली आईने घाईघाईत निघताना दह्याची पातेली फ्रीजमध्ये झाकण न ठेवताच ठेवलेली आणि त्याच्याच वरच्या रकान्यात नेहमीची फुलं वैगरे असत त्याच फुलांमधला एक पालीसारखा विषारी कीटक पातेलीच्या तळाला आढळला. उत्साहाच्या भरात नेहाने दही न ढवळताच घेतल्यामुळे तिच्याही ते लक्षात आलं नसावं आणि त्यामुळेच दह्याचा रंगही बदललेला. पण पुन्हा आत ठेवताना नेहाने मात्र झाकण ठेऊनच पातेली ठेवलेली. बाबांना वाटतय आपल्याला मुलांकडे कधी लक्षच देता आलं नाही. आईला वाटत होतं आपल्याच निष्काळजीपणामुळे सगळं घडलं आणि उपचारांना उशीर झाल्यामुळे मानसी स्वतःलाच दोष देत होती. पण त्याचा आता काहीच उपयोग नव्हता. चूक छोटीच होती पण त्या छोट्याश्या चुकीमुळेच आज त्या आईला तिची गोड, चुणचुणीत मुलगी बाबांना त्यांची गोंडस बाहुली , मानसीला तिची खोडकर बहीण आणि शाळेला एक आदर्श विद्यार्थीनी कायमची पारखी झाली.


Rate this content
Log in

More marathi story from pranav kode

Similar marathi story from Tragedy