pranav kode

Others

3  

pranav kode

Others

बक्षिस

बक्षिस

2 mins
791


अविस्मरणीय म्हणावा असाच दिवस तो. एक साधी विद्यार्थ्यांसाठी म्हणुन ठेवलेली पार्टी ही इतकीच कल्पना होती मला. म्हणजे मी अकरावीत असताना जिथे शिकवणी साठी जायचो त्यांनी मुलांना असाच एक विरंगुळा म्हणुन कार्यक्रम ठेवला होता आमच्यासाठी ती पार्टी. सगळ्या मुलांची दोन आठवडे आधीच तयारी सुरू होती. कोण मुलांचे नाच बसवत होतं कोण खेळ ठरवत होतं मी तसा आधी पासूनच या सगळ्याच्या चार हात लांबच असायचो. त्या पार्टी मधलं विशेष असं माझ्यासाठी म्हणजे एकच छोटासा कार्यक्रम होता तो म्हणजे स्टुडंट ऑफ दि इयर हा आता हा प्रकार थोडा विचित्र होताच, कारण असे कोणतेच निकष नसतात ज्यावरून एखादा विद्यार्थी इतरांपेक्षा श्रेष्ठ म्हटला जावा हो पण उत्सुकता होतीच मला ते पारितोषिक मिळण्याची काही आशाही नव्हती. मी घरी सुद्धा कुणाला काहीच सांगितलं नव्हतं कारण मी हरवलोय हे सांगण्याची भीती मला कधीच नव्हती पण आई वडीलांच्या अपेक्षा वाढतील आणि मग रिकाम्या हाताने घरी आल्यावर होणार अपेक्षाभंग. तो नको होता मला.

पालकांना आमंत्रण होतं पण मी नकोच म्हटलं. अखेर तो दिवस आला सकाळी सहज आईने विचारलं आज काही कार्यक्रम आहे ना रे, आम्ही येऊ शकतो का. आता काय सांगावं काहीच कळत नव्हत आणि मी नाही सुद्धा म्हणु शकतं नव्हतो कारण त्यांचा आनंद हिरावून घ्यावा असं खरचं वाटत नव्हत. हो म्हटलंच मी मग.

खरंतर ही माझी मनातली गणितं फक्त माझ्यापुरतीच होती कारण आईचा सुद्धा तो एक अभिनयच होता त्यांना सर्वकाही आधीच कळलं होतं आणि का कुणास ठाऊक मनातलं कुणाशी बोलावं अशी सवयच नव्हती मला त्यामुळे दिवसभर मी आपला माझ्याच विचारात फिरत बसलेलो.

संध्याकाळी मी मित्रांसोबत पुढे गेलो आणि सुरवातीचे काही मुलांचे कार्यक्रम झाल्यावर अगदी वेळेवर आईबाबा मागून आले. आणि तो कार्यक्रम मला नको असताना सुरू झालाच. एका मागून एक मुलांना बक्षिसं मिळत होती. आईने हळूच मला विचारलं "काय रे तुला ह्यातलं काही आहे का?" मी आपला शांत बसुन राहिलेलो. थोड्याच वेळात काहीतरी चमत्कार व्हावा असचं घडलं अचानक माझं नाव मोठ्याने ऐकायला आलं मी काही क्षणांसाठी स्तब्धच झालेलो. आईने भानावर आणलं आणि उठलो जागेवरून. आई सोबतच मंचावर बोलावलं आणि तिच्याच हातून स्मृतिचिन्ह मिळाल. हे कमीच म्हणुन की काय मागे गाणं सुरु होतं 'पापा केहेते है बडा नाम करेगा... '.

अविस्मरणीय असा क्षण होता तो कधीच न विसरू शकणारा


Rate this content
Log in