स्वप्नं
स्वप्नं


आजीचा शेवटचा मित्र आणि नातवाची पहिली मैत्रीण असं कोणत्यातरी सिनेमात ऐकलेलं आजी-नातवाच नातं. खरंच किती सुंदर आहे हे. आईवडील हे जरी केंद्रबिंदू असले तरी पालक आणि मुलांमधली दुवा ही आजीच असते... कधीही धडपडताना सांभाळून घेणारी. दुर्दैवाने मला माझ्या आजीची संगत फार कमी लाभली. मला आठवतसुद्धा नाही मी तिला पाहिलेलं. पण त्यांच्याबद्दल ऐकलेल्या बर्याच गोष्टींनी आम्ही अजूनही खूप जवळ आहोत.
असंच एकदा गावी गेल्यावर वाडीतल्याच एका घरात मी गणपती पाहायला गेलेलो. नंतर सहजच बोलताबोलता घरातल्या एका काकांनी जुना विषय काढला आणि मला एकेक गोष्टी सांगायला सुरुवात केली. ते कोण कोणाचे परके... माझ्या माणसांबद्दल इतकं आपुलकीने बोलत होते की त्यावरूनच कळलं मी कोणाचा नातू आहे ते. आजी अगदी स्वतःच्या मुलांसारखं गावातल्या सगळ्या मुलांना वागवायची. ते सगळं ऐकून मग दिवसभर मनात तेच विचार सुरू होते. आणि 'मनी वसे ते स्वप्नी दिसे' या उक्तीप्रमाणेच स्वप्नंसुद्धा तेच पडलं.
रात्री झोपलेलो आईच्या कुशीत पण झोपेत मात्र मी कधी आजीच्या कुशीत जाऊन पोहोचलो हे माझं मलासुद्धा कळलं नाही. शांत डोळे मिटून आजीच्या मांडीवर डोकं ठेऊन पडून राहिलेलो मी. आजी अलगद डोक्यावरून हात फिरवत मला तीच राजाराणी गोष्ट सांगत होती. मी माझ्या आजीचा आवाज कधीच ऐकला नाही पण त्या गोष्टीतला तो लाघवी आवाज केसांमधला तो मखमली स्पर्श अजूनही आठवतो. कधीच संपू नये असं स्वप्नं होतं ते आणि ती रात्र....
आणि दुर्दैवाने स्वप्नंच होतं ते...