मैफिल...
मैफिल...


एका मोठय़ा कार्यक्रमाचे मोफत पास मिळालेले. मी आणि माझी बहिण दोघंही खूप खुश होतो. कारण पहिल्यांदाच जगभरात कार्यक्रम करणार्या दिग्गजांना इतक्या जवळून ऐकता येणार होतं, त्यांना बघता येणार होतं. कारण इतके मोठे कार्यक्रम आम्ही फक्त टीव्ही वरच पाहिले होते. तो कार्यक्रम होता हिंदी नवीन गाण्यांचा तसं मी आणि माझी बहिण आणि मी आम्ही दोघंही संगीत शिकत असल्यामुळे कोणत्याही प्रकारचं संगीत ऐकण्याची आवडही होतीच. जी प्रत्येकालाच असायला हवी. संध्याकाळी सातचा कार्यक्रम होता. मुंबईतला आणि तोही हिंदी कार्यक्रम म्हणजे वेळेशी वाकडंच ते डोक्यात ठेऊनच आम्ही साडेसातच्या दरम्यान पोहोचलो.
तोपर्यंत खूप गर्दी झालेली. आम्हीही जाऊन बसलो त्यांना बसुन बघणं जरा कठिणच होतं पण व्यवस्थित ऐकू येत होतं. अपेक्षेप्रमाणेच कार्यक्रम साडेआठ च्या दरम्यान सुरू झाला. दोघे गायक स्टेज वर येताच फोटो काढण्यासाठी गर्दी, त्या गायकांच लोकांमध्ये फिरणं हे सगळच सुरुवातीला भारी वाटत होतं. दोघे गातही फार सुंदर होते. पण थोड्या वेळाने का कुणास ठाऊक सगळचं जरा विचित्र वाटत होतं डोळ्यांना छान दिसत होतं पण मनापर्यंत पोहोचत नव्हत. हळूहळू कार्यक्रम शेवटाकडे आला शेवटची गाणी झाली आणि कार्यक्रम संपला.
इतरांसारखाच माझ्याही चेहर्यावर आनंद होता. पण पुन्हा घरी जाताना सारखं काहीतरी राहिल्यासारखं वाटत होतं. नंतर हळूहळू एक एक गोष्ट उमगत गेली. तिथे फार मोठा स्टेज होता जगप्रसिद्ध वादक होते पण माझ्या शास्त्रीय संगीतातली बैठक ती मैफिल दिसत नव्हती प्रचंड लोक उत्सुकता दाखवतं होते पण शास्त्रीय संगीतातली प्रत्येक मिनिटाला मनापासून मिळणारी दाद दिसत नव्हती. कानांना सार काही सुंदर ऐकू येत होतं पण शास्त्रीय संगीतातील प्रतिभेने उत्स्फुर्तपणे होणारी अनुभुती दिसत नव्हती. सगळे प्रश्न सुटत होते. माझे. तेव्हा कळलं की आवडणं आणि प्रेमात पडणं ह्यात खूप फरक असतो. मला ऐकायला सगळचं आवडत होतं पण त्यादिवशी कळालं की मी शास्त्रीय संगीताच्या प्रेमात पडलोय.