जंगल सफारी
जंगल सफारी
कोकणातील जंगलाचा एक अनुभव !
माझं आजोळ कोकणातील त्यामुळे नेहमीच कोकणात जाणे व्हायचे, बाबांनाही आवडायचं मग त्यांनी तिथे घर बांधले,
घर बांधायच्या आधी माझे लग्न झाले, त्यावेळची ही गोष्ट,
माझं लग्न ठरल्यावर मी आणि बाबा कोकणातल्या आमच्या देवाला पत्रिका ठेवून आलो त्या वेळी येताना रस्ता चुकलो एक डोंगर चढून उतरायचा होता, आणि नेमकं उतरताना कुठून उतरायचं हेच समजेना सगळीकडे काळे दगड मोठे मोठे कातळ, त्यात पायवाट कशी सापडणार दोघांमध्ये मिळून एकच बॅटरी होती संध्याकाळी 7 वाजले होते, कस बस त्या जंगलात उतरून घरी पोहोचलो एकदाचे, आणि रात्री 9 च्या बसने पुण्याला.
मी म्हणजे अगदी शूर वीर असल्यासारखे त्या आजींना सांगून आले होते मी न्यायला येईन तुम्हाला, आणि झाले त्यांचा फोन आला की, आम्ही येणार आहोत न्यायला या, बाबांना सुट्टी नव्हती, आणि आई तयारीत अडकलेली मग काय माझी स्वारी निघाली की,
त्या वेळी त्या गावात जायला बस नव्हत्या डोंगर चढून उतरून जावं लागतं असे, आणि रिक्षा केली तर पैसे खूप लागायचे,
आणि त्या म्हाताऱ्या असल्याने येताना रिक्षा ने यायचे होते,आणि जाताना ही तोच रिक्षा वाला मला घेऊन जाणार होता,
पण त्याला नेमके भाडे मिळाले आणि तो म्हणाला मी डायरेक्ट तिथे आजीच्या घरी येतो, तुम्ही पुढे जा, मग माझी स्वारी निघाली चालत, सॅक पाठीवर आणि हातात काठी,
काठी हातात असल्याशिवाय रानात जायचे नाही असं बाबा नेहमी सांगायचे,
म्हणून हातात काठी घेतली 6 वाजता संध्याकाळी डोंगर चढायला सुरुवात केली, उन्हाळा असल्याने दिवसही मोठे होते,
वर चढून आले खरी पण आता उतरायचा रस्ता नेमका कोणता हेच समजेना, समोर 2 रस्ते होते आता मात्र मी थोडी घाबरले, एक मात्र नक्की होत की कोणत्याही रस्त्याने गेलं तरी गाव आणि समुद्र येणार, त्यात मी झाशीची राणी ना एकटी निघाले होते 2 म्हाताऱ्या आजींना आणायला.
नेहमी करतो तस 10 20 केलं आणि 100 आलं डाव्या बाजूच्या रस्त्यावर, मग तिथून उतरायला सुरुवात केली, 7 वाजत आले होते, समुद्रात सूर्य मावळताना दिसत होता जणू मी खाली उतरून येण्याची वाट पहात होता,
पण...
थोडं खाली आल्यावर ती वाट कोणी बंद केली होती काटे टाकून मग त्याच्या बाजूने वळून पुन्हा उतरायला सुरुवात केली, संधी प्रकाश, पायाखाली पाचोळा त्यावर पाय पडला की आवाज, आजूबाजूला गर्द जंगल, आणि मी एकटी ,मागे वळून बघायची हिम्मत होत नव्हती, आणि समोर बघावं तर झाड आणि जंगल, निमूटपणे खाली मान घालून भराभर चालायला सुरुवात केली, 10 मिनिटे चालत होते, मागून कोणी येतंय असा भास होत होता, पण वळून बघणार कोण ?
आणि त्याच वेळी समोर एक म्हातारी पाळंदी वर बसलेली दिसली, एक माणूस जेमतेम जाईल एवढीच जागा तिथे, आणि ती त्यावर बसलेली मनात चरर झालं, पांढरे केस हिरवट नवारी काष्टा आणि हातात काठी केस विस्कळित झालेले, मला तिन विचारलं , केळकरांची का तू ?
मी हो म्हणाले, तर मला म्हणाली रस्ता चुकलीस की, म्हटल हो, आतून जाम घाबरले होते, पाळंदी पाशी पोहोचले, ती ओलांडली आणि ती म्हातारी म्हणाली आता माग न बघता जा, धीराची आहेस, काही कमी पडणार नाही कधी तुला, महादेव मंदिरात नमस्कार करून पुढे जा.
मी हो म्हणाले आणि जी पळत सुटले की पायाखाली रस्ता आहे की नाही हे बघितले नाही.
एकदम महादेव मंदिरात थांबले नमस्कार केला आणि आजीच्या घरी पोहोचले. त्या दोघी माझीच वाट पहात होत्या
मी अजून अंगणात पोहोचत नाही तो वर आजी म्हणाली की काय ग रस्ता चुकली म्हणून उशीर झाला का ? मी हो म्हणाले आणि अख्खा तांब्या पाणी प्यायले. डोक्यातून ती म्हातारी जात नव्हती, पुण्यात येईपर्यंत.
अशी माझी जंगलातील आठवण.
नंतर अनेकदा कोकणात जाण्याचा प्रसंग आला पण मनाशी पक्के होते डाव्या बाजूने जायचे नाही उजव्या बाजूने च जायचे.
