Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Vaishnavi Lalgunkar

Classics Drama Others


1.3  

Vaishnavi Lalgunkar

Classics Drama Others


झाड

झाड

2 mins 16.1K 2 mins 16.1K

यंदा जरा उन्हाळा वाढला आहे. माझ्या पानांवरच्या धुळीने जरा ठसका लागल्यासारखं होतं आजकाल. माझ्या फांद्या, पारंब्या, पानं ही सगळी जुन्या नव्याची सांगड असली तरी मजबूत आणि खंबीर आहे माझा बांधा आणि माझं खोड. कित्येक घरटी माझ्यात रुजली. काही घरटी वादळांनी हादरून कोसळली, काही भेदरली पण पुन्हा नव्याने उभी राहिली. नवी घरटी जोम धरू पहात आहेत इथे. मी प्रत्येक घरट्यातल्या अनेक आठवणी, माझ्या मुळांपाशी अगदी सोयिस्कर पद्धतीनं दडवल्या आहेत. ही घरटी विविध अनुभवांचं विणलेलं नातं बनलं आहे. कधीकधी मी देखील होतो भावनाविवश आणि मग याच आठवणी सोबत करतात. प्रत्येक घरट्यातली जोखीम वेगळी, प्रत्यके ऋतू वेगळे, प्रत्येक पाखरू वेगळं आणि प्रत्येक ऋतू मधला बदलणारा 'मी' , अनेक पानगळी आणि अनेक हिरवेगार अंकुर फुटणारे दिवस !

पावसाळा आला की मी देखील मृदगंधात हरवतो मात्र पाखरांना छाया देण्यात कधी कधी हे राहूनच जातं. भरल्या सायंकाळी, जेव्हा मी रिकामा असतो, पाखरं परतायची असतात, अशावेळी भूतकाळात रमायला होतं. संधीप्रकाशात आयुष्य पुन्हा एकदा उजळून निघतं. पण सूर्यास्तच बघायचा राहून जातो पाखरांची वाट बघण्यात.

पानगळीत, उन्हाळ्यात जेव्हा मी रिक्त होत जातो आणि माझीच जमिनीवरची पान आणि दूर जाणाऱ्या पाखरांचे अपेक्षा बाळगणारे डोळे बघतो तेव्हा वाटतं आपलचं काहीतरी चुकलं असणार ! मग मी पुन्हा नवी पालवी, नवी डहाळी, नवा हिरवेगारपणा, नवा वेष धारण करतो यांच्याच भल्यासाठी. मी कष्ट घेतो ते कधी कधी या साऱ्यांना कळायचं राहूनच जातं. मग अशावेळी मी देखील बोलणं टाळतो. ' यांची जबाबदारी मी घेतलीये, यांच्या अपेक्षा लगडल्या आहेत मला', अगदी सुरुवातीपासूनच हे भान ठेवतो मी, कायम ! मात्र मी देखील कधी कधी जाम कंटाळतो, वैतागतो, सगळ्यांना सगळं पुरवताना मलादेखील थोडा विश्राम हवा असतो.

पानं, पाखरं, घरटी, बारीक सारीक प्रसंगरूपी अनेक कीडे येतात आणि जातातसुद्धा. पण या सगळ्यात माझी कायम साथ देते ती माझी सावली. कधीच दूर न जाणारी. कुठलीही अपेक्षा न बाळगता मला अनेक जन्मांसाठी बांधल्या गेल्यासारखी. माझ्या प्रत्येक सुख दुःखात, हळवेपणात, कठोरपणात, रागात, प्रेमात, आवेगात माझ्या उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात, मला शाश्वततेच्या कुरणात नेणारी ती ! वाट भटकली की ती योग्य मार्ग दाखवते. वाटसरूंशी देखील प्रेमानी वागते. थोडक्यात मला पूर्णपणे सांभाळते ती ! तिचं असणं खूप महत्त्वाचं झालं आहे.

पाखरांचा किलबिलाट मला मोहरून टाकतो. ते देखील मला घट्ट पकडून असतात माझ्या चांगल्या वाईटात. फक्त पाखरांना सांगावसं वाटतं, की तुमच्या पंखात भरपूर बळ येईल तेव्हा उंच झेप घ्या, माझा पूर्ण पाठींबा असेल. मात्र वारा येईल त्या दिशेला वाहू नका, तुमची दिशा तुम्ही ठरवा. कधी हार मानू नका.

उडून जाताना तुम्ही जी घरटी रिकामी ठेऊन जात आहात, ती कायम तुमची वाट बघतील. कधीतरी याल ना परत ? निदान वाटसरू म्हणून ? यालच तुम्ही याची खात्री आहे ! नाहीतर उभा राहीनच मी, माझ्या पारंब्या पुन्हा मातीच्या कुशीत रुजवून ...

- एक बाबा


Rate this content
Log in

More marathi story from Vaishnavi Lalgunkar

Similar marathi story from Classics